उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते?
आरागॉर्न
October 10, 2009 - 12:40 pm
पृथ्वी सूर्याभोवती फिरते? काहीतरीच. मग रोज आपल्याला सूर्य फिरताना का दिसतो? मित्राला सांगितले तर त्याने नासाचे ऍनिमेशन दाखवले. त्याने काय होणार आजकाल फोटोशॉपने काही करता येते. बर पृथ्वी इतक्या जोराने फिरते आहे तर आपल्या सगळ्यांना चक्कर का येत नाही? आणि कुणी खरेच जाऊन पाहिले आहे पृथ्वी फिरते का नाही ते? काय म्हणालात? स्पेस शटल? अहो ते अमेरिकन काही दाखवतात. त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? त्यांचे चंद्रावर उतरणे पण बोगस होते म्हणतात. लहान असल्यापासून बघतो आहे. सूर्य, चंद्र, तारे सगळे पृथ्वीभोवतीच फिरत आहेत. आता जे मला रोज दिसते त्यावर विश्वास ठेवू की तुमच्या बोलण्यावर? तुम्हीच सांगा.
---
मतप्रदर्शनाचे हे एक उदाहरण चर्चा करण्याऐवजी सोदाहरण मुद्दा अधिक स्पष्ट होईल असे वाटले. यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही याची कृपया नोंद घ्यावी.
दुवे:
Comments
गणित(?)
लेखाचा विषय गणित का? तुमच्या मतात/ लेखात गणित कोठेच दिसले नाही असे माझे मत. केवळ वाचनावरून आलेले. :-)
गलती
गलती से मिष्टेक हो गया..
थोडक्यात प्रतिसाद , विस्तृत चर्चा असलेली लेखमालाही
माझ्या वागण्यातून काय दिसते? मित्राला "उद्या इथून १०० फुटांवर उजवीकडे असलेल्या पार्कमध्ये भेटू" असे काही सांगतो. "इथून १००००० किमी दूर, डावीकडे [कारण तोवर पृथ्वी फिरली आहे] असलेल्या पार्कमध्ये भेटू" असे सांगत नाही. असे स्पष्ट दिसते की पृथ्वी स्थिर आहे हे माझे रोजव्यवहारातले गृहीतक आहे.
चर्चाप्रस्तावकाचे वागणे वेगळे आहे का?
"पृथ्वी सूर्याभोवती फिरते" यावर चर्चाप्रस्तावक विश्वास ठेवतात, असे काही त्यांनी सांगितलेले आहे. ("आता जे मला रोज दिसते त्यावर विश्वास ठेवू की तुमच्या बोलण्यावर?" हा "र्हेटोरिकल क्वेश्चन" असावा असे वाटते.) म्हणजे व्यवहारात नेमके काय करतात?
- - -
हेच उदाहरण घेऊन काही प्रतिसादकर्त्यांच्या मदतीने एक लेखमाला मी उपक्रमावर लिहिलेली आहे :
भूस्थिरवादाचा पुरस्कार
भूस्थिरवादाचा पुरस्कार (भाग २)
सेंट्रिफ्यूगल फोर्स
यातील समारोपाच्या तिसर्या लेखात मी असे लिहिले, ते वरील चर्चेचे माझे उत्तर म्हणून चालण्यासारखे आहे.
हम्म
लेखात उद्धृत केलेली अनेक मते मी लहानपणी मोठ्या विश्वासाने मांडलेली आठवतात. :-) परंतु वडिलधार्या मंडळींनी असे प्रश्न विचारल्याबद्दल तोंड बंद करण्यास सांगितलेले आठवत नाही आणि उत्तरे पटण्यास मला वेळ लागला होता म्हणून मी वडिलधार्यांनी मला पटवून देणे सोडावे असे सांगितल्याचे आठवत नाही.
प्रश्नकर्ता आणि विद्वान या दोघांनीही आपापला हेकटपणा/ इगो/ अजेंडा या पलिकडे पाहण्यास सुरुवात केली तर उत्तरे मिळण्याची शक्यता वाटते. - हे आपले माझे मत. ते खरे आहे हे दाखवण्यास पुरावा किंवा अभ्यास दोन्हीही नाही. :-)
पुलंचे मत काय होते?
हे जाणून घ्यायला आवडेल. मत काहीही असू दे पुलंशी सहमती आधीच नोंदवून ठेवतो.
विनायक
मतप्रदर्शन: इक्वल ऑपॉर्च्युनिटी सवय
श्री आरागॉर्न, सर्वप्रथम तुम्ही इतर काही चर्चांवर चपखल उदाहरण देऊन त्या चर्चांच्या उपयुक्ततेवर चांगले भाष्य केले आहे. इतर चर्चांचा संबंध या धाग्याशी जोडल्याबद्दल दिलगीर आहे. हा प्रतिसाद अप्रस्तुत वाटल्यास खरडीने कळवावे म्हणजे काढून टाकता येईल. श्री फाइनमन या प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञांविषयी मला प्रचंड आदर आहे. त्यांच्या प्रत्येक मताचा मी आदर करतो. भौतिकशास्त्रात काडीचीही गती नसतांना आणि खिशात पैशांची चणचण असतांना वसतिगृहातील माझ्या खोलीत त्यांची व्याख्याने असायलाच हवीत म्हणून मी त्यांच्या व्याख्यानांचा संच विकत घेतल्याचे आठवते. त्यांनी सामाजिक शास्त्रांविषयी मांडलेली मते खालील चित्रफितीत पाहता येतील.
..
अक्षय,
चित्रफितीबद्दल आभार. ही पाहिलेली आहे. फिनमन यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, वादच नाही. १० वर्षांपूर्वी मलाही त्यांची सर्व मते पटत असत. आता काही बाबतीत असहमत आहे. उदा, समाजशास्त्र आणि पदार्थविज्ञान यांची तुलना ग्राह्य नाही. समाजशास्त्र पदार्थविज्ञानाइतके काटेकोर होईल असे वाटत नाही. पण म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास करणारे सर्वच लोक निरूपयोगी काम करत आहेत असा निष्कर्ष काढणे मला पटत नाही. समाजशास्त्र, मानसशास्त्र, काही प्रमाणात जीवशास्त्र ही बरीचशी डिस्क्रिप्टीव्ह आहेत. बर्याच भौतिकशास्त्रज्ञांमध्ये एक लिमिटेशनही असते. ते म्हणजे प्रत्येक गोष्ट ते पदार्थविज्ञानाच्या चष्म्यातून बघायला जातात. म्हणून बरेचसा जीवशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे कोलॅबोरेशन असेल तर त्यांना एकमेकांची भाषा कळणे कठीण होते.
इथे एक व्यंगचित्र आठवले.
ताक : ह्या चर्चेत कुठलाही प्रतिसाद लेखकातर्फे अवांतर धरला जाणार नाही. २० ओव्हर फ्री हिट. एन्जॉय! :)
हा हा
श्री आरागॉर्न, मजेदार आणि चाणाक्ष व्यंगचित्र. धन्यवाद. फिनमन यांच्या समाजशास्त्रविषयी मताशी मीही आदर बाळगून असहमत आहे.
समाजशास्त्र
समाजशास्त्र पदार्थविज्ञानाइतके काटेकोर होईल असे वाटत नाही.
समाजशास्त्र गणिताइतके काटेकोर झाले तर त्याचे स्वरूप कसे असेल याची कल्पना सायन्स फिक्शन लेखक आयझॅक अझिमॉव्ह यांनी त्यांच्या फाउंडेशन सिरिजमध्ये मांडली आहे. याला त्यांनी सायकोहिस्टरी असे नाव दिले आहे. पदार्थवि़यानाचे नियम समाजाला लावून सायकोहिस्टरीच्या सहय्याने एखादी संस्कृती किती वर्षे राहील, तिचा र्हास कधी होईल यासारख्या भविष्यातील गोष्टींचे भाकित करता येते.
ज्यांना यात रस आहे त्यांनी फाउंडेशन सीरीज जरूर वाचावी.
---
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
आवडते...
ज्यांना यात रस आहे त्यांनी फाउंडेशन सीरीज जरूर वाचावी.
अथवा येथे ओळख वाचावी. :-)
लेख वाचला
लेख वाचला. चांगला आहे. पण तिथले प्रतिसाद वाचून तुम्ही ही ओळख चुकीच्या व्यासपीठावर मांडलीत असे वाटले. ही ओळख इकडे द्यायला हवी होतीत, चांगला प्रतिसाद मिळाला असता. असो..
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
धन्यवाद
धन्यवाद. शक्यतो एकच लेख मी दोन ठिकाणी घालायचे टाळतो. लेखा संदर्भात म्हणल्याप्रमाणे, धनंजयच्या शंकराचार्यांच्या लेखावरून जो तिकडे आला होता, त्यावरून लिहावेसे वाटले म्हणून तिकडे घातला. आणि प्रतिसादाच्या बाबतीत चढउतार हे दोन्हीकडे पाहीले आहेत. प्रत्येक चर्चा ही प्रत्येकाला आवडेलच अशातला भाग नसतो अथवा वेळ नसतो. तर कधी कधी टपाटप प्रतिसाद पडू शकतात. खूप प्रतिसाद केवळ वादग्रस्त चर्चांच्या बाबतीतच नाही तर कुठल्याही विषयाच्या बाबतीत होऊ शकते. पण कधी कधी आपण उत्साहाने लिहीले तरी काहीच उपयोग होत नाही असे ही होते...
चर्चा
मी आत्तापर्यंत जितके चर्चाप्रस्ताव टाकले त्यात हा सर्वात सोपा. कारण प्रस्ताव टाकल्यावर कोण काय म्हणते आहे याची फिकिरच नाही. आपण आपले मत मांडायचे, काम संपले. हे इतके सोपे असूनही मला इतक्या उशिरा कळावे याचा खेद झाला :प्
एकच उत्तर नाही
आपल्या प्रश्नाची स्थळकाळाप्रमाणे तसेच "पोलिटिकली करेक्ट" की नुसतेच "करेक्ट" या प्रमाणे वेगवेगळी उत्तरे संभवतात.
"जे जे दिसते ते ते सत्य" असे म्हणणारे माझे मित्र असतील तर "सूर्य पृथ्वीभोवती फिरतो" हे "पोलिटिकली करेक्ट"उत्तर आहे. वर ते कोणीही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवू शकतो. पण ते जाहीर लिहिले तर लाज जाईल म्हणून मौन किंवा "नो कमेंटस्" हे उत्तर. दुसरे म्हणजे ज्या संकेतस्थळावर हा प्रश्न विचारला आहे तिथे खर्या उत्तरापेक्षा "पोलिटकली करेक्ट" उत्तराला महत्त्व असल्याने मौनम् सर्वार्थसाधनम्. खरे उत्तर दिले तर मित्राची नाचक्की होईल हे खरेच पण काही विकृत, मागासलेल्या अश्या लोकांना हर्षवायू होईल.
हाच प्रश्न दुसर्या संकेतस्थळावर विचारावा. तिथे खरे उत्तर देईन.
जसे "संस्कृत जिवंत की मृत" चर्चेत एकाने "पलीकडच्या" संकेतस्थळावर "जिवंत आहे" असा पक्ष घेऊन खुद्द त्या संकेतस्थळाच्या मालकाशी कडोविकडीचा वाद घातला होता. मात्र उपक्रमावर याच प्रश्नावर संस्कृतच्या मृत्यूचा दाखला देणार्या डॉक्टरांशी सहमत आहे असे लिहिले होते.
एकाच प्रश्नाची निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी उत्तरे देता येणे ही एक कला आहे. सध्या त्याचा अभ्यास करतो आहे.
विनायक
सत्य म्हणजे काय?
याबद्दल तुमचेही मत जाणून घ्यायला आवडेल.
पृथ्वी सूर्या"भोवती" फिरते हे तुमच्या मते सत्य आहे का? (सूर्य खुद्द चल असल्यामुळे पृथ्वी पुन्हा "गोल" जाऊन पूर्वपदावर कधी येतच नाही, असे खगोलात आजकाल शिकवतात.) पोलिटिकली करेक्ट नसलेले सत्य काय आहे?
(लोकांच्या "सत्य" संकल्पनेच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या प्रामाणिकपणे असतात. या व्याख्या पोलिटिकल रंगाशी जुळत नाहीत. वर दुवा दिलेल्या लेखमालेतील प्रतिसादांमधून असे दिसून येईल. तुमचे मत खरोखरच्या कुतूहलाने विचारत आहे.)
"मृतभाषा" ही संकल्पना मात्र स्पष्ट व्याख्येची नाही. जर व्याख्या स्पष्ट नसली तर संदर्भाप्रमाणे उत्तर बदलू शकते. ("मृतभाषा" शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांचे विवेचन अशोक केळकर यांनी केले आहे, त्यांचे पुस्तक या क्षणी माझ्या हाताशी नाही.)
त्यापेक्षा स्पष्ट हे उदाहरण :
"मंगळसूत्राची किंमत काय आहे?"
"सोन्याचे १६,००० रुपये + कारागिरीचे १,६०० रुपये = १७,६०० रुपये."
.
"मंगळसूत्राची किंमत काय आहे?"
"सौभाग्याचे लेणे म्हणून हे मंगळसूत्र अमूल्य आहे."
.
येथे "किंमत" शब्दाचा अर्थ संदिग्ध असल्यामुळे संदर्भानुसार दोन वेगवेगळी उत्तरे मिळतात. अशी दोन वेगवेगळी उत्तरे मिळणे म्हणजे लबाडी नसावी, असे मला वाटते. दोन्ही उत्तरे प्रामाणिक असू शकतात. संदर्भ हवा. (अर्थात "प्रामाणिक", "सत्य", वगैरे शब्दांबद्दल तुमच्या व्याख्या काय त्यावर अवलंबून आहे.)
संस्कृत भाषा कितपत प्रचारात आहे, याबद्दल वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवर मी मते लिहिलेली आहेत. शक्यतोवर मी असल्या किचकट शब्दांच्या व्याख्या देऊन मर्यादित विधाने करायचा प्रयत्न करतो. पण कित्येकदा शक्य होत नाही. त्यामुळे वरील उल्लेख माझ्याबद्दलही असू शकेल. जर माझ्याबद्दल असेल, आणि माझ्या मतांमध्ये वरकरणी विसंगती दिसून येत असेल तर संदर्भानुसार स्पष्टीकरण देण्यास मी तयार आहे.
फ्लॅशबॅक
"पलीकडच्या"संकेतस्थळाचे मालक आणि इथल्या विदुषी या दोघांनीही त्यांच्या" संस्कृत मृत आहे"या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही समान गोष्टी सांगितल्या. विदुषींचे म्हणणे "भाषाशास्त्रानुसार एखादी भाषा बोलणारी एकही व्यक्ती जिवंत राहत नाही तेव्हा ती भाषा मृत होते. ती तशी होऊ नये म्हणून काही संस्था लोकांना संस्कृत बोलायला शिकवून ती पुनरुज्जीवित करतात." तर "मालकांचे " मत "संस्कृतचा रोजच्या जीवनात वापर दिसत नाही. बोलणारे फारसे नाहीत वगैरे." मालकांशी युक्तिवाद करताना आपण "पलिकडे" "कर्नाटकात मठूर गावात अगदी थोडे का होईना पण संस्कृत बोलणारे लोक आहेत म्हणून ही भाषा जिवंत आहे." तसेच "ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची मृत हे पटत नाही." असाही युक्तिवाद केलात. पण विदुषींविरुद्ध "इथे" हा युक्तिवाद केला नाहीत. "पलिकडचा" आपला युक्तिवाद मला पटला म्हणून तो मी इथे विदुषींविरुद्ध उद्धृत केला तेव्हाही आपण मौन बाळगलेत. उलट विदुषींशी "सहमत" असे लिहिल्याने आम्हा पामरांना संस्कृत जिवंत की मृत याबद्दल आपले नेमके मत काय आहे हेच समजले नाही. "उपक्रमावर" मृत आणि "पलिकडे"जिवंत असे आहे काय?
माझा साधा प्रश्न असा की एकच युक्तिवाद दोन्हीकडे लागू असेल तर तो दोन्हीकडे का केला नाही? एकच मत धारण करणार्या "मालकांना" विरोध आणि विदुषींना सहमती हे गौडबंगाल काय आहे?
विनायक
मृत भाषा
"मृत"भाषा शब्दाच्या दोन वेगवेगळ्या व्याख्या आणि निकष त्या दोन ठिकाणच्या चर्चेत आलेले होते.
मिसळपावावरती विसोबा खेचर यांच्या मतावरून "मृत"भाषेची जी व्याख्या सांगितली जात होती, त्यात एकही व्यक्ती बोलणारा असला तर ती भाषा जिवंत होती. ही व्याख्या, आणि हा निकष कधीकधी वापरलेला आपल्याला दिसतो. त्या व्याख्येप्रमाणे बघता संस्कृत भाषा जिवंत आहे. तिथे मी राधिका यांचा प्रतिवाद केला नव्हता, तर विसोबा खेचर यांचा प्रतिवाद केला होता - त्यांची व्याख्या आणि त्यांचे निकष वापरून.
उपक्रमावरती राधिका यांनी "मृत"भाषा शब्दाची अन्य व्याख्या आणि निकष विस्ताराने सांगितले, आणि चर्चा केली. त्यांनी चर्चिलेली व्याख्या आणि निकष सुद्धा भाषाशास्त्रामध्ये वापरलेले दिसतात. त्या व्याख्येच्या आणि निकषांच्या अनुसार मी त्यांच्याशी सहमत असल्याचे सांगितले.
संदर्भाविना वाचणार्या व्यक्तीला या विधानांमध्ये कदाचित शाब्दिक विरोध दिसेल. संदर्भासह वाचल्यास कुठलाही विरोध दिसणार नाही. "मृत" शब्दाच्या दोन व्याख्या असताना, आणि दोन निकष असताना, या दोन्ही संदर्भात एकच युक्तिवाद कसा लागू करावा, हे समजत नाही. व्याख्या आणि निकष विसोबा खेचर आणि राधिका यांनी त्या-त्या ठिकाणी दिला असल्यामुळे, माझ्या उत्तराचा रोखही स्पष्ट असावा.
आपल्या ओळखीच्या कोण्या जुन्या वळणाच्या स्त्रीला मंगळसूत्राच्या किमतीबद्दल प्रश्न विचारा. असे दिसून येईल की सोनाराला मंगळसूत्राची ठराविक किंमत दिली असेल, उदाहरणार्थ १७,६०० रुपये. पण दुसर्या परिस्थितीत मंगळसूत्राची किंमत तिला सांगवणार नाही - अमूल्य म्हणून सांगेल. त्या बाईच्या विविध प्रसंगी बदललेल्या उत्तरांना "गौडबंगाल" म्हणणारा व्यक्ती शूर म्हणावा की अविचारी? :-) कारण मुळात उत्तर बदललेले नाही. प्रश्न बदललेले आहेत, त्यामुळे उत्तरे वेगळ्या तथ्यांविषयी आहेत.
हे तुमच्या साध्या प्रश्नाचे साधे उत्तर आहे असे पटते का? साधे असले-नसले तरी प्रामाणिक आहे. बहुधा आपणा सर्वांच्या अनुभवात असे - संदर्भानुसार शब्दांचेच अर्थ वेगवेगळे असण्याचे - प्रसंग आले असतील, म्हणून उत्तर नाविन्यपूर्ण तर नाहीच.
"मृत"भाषा याबद्दल तुमची व्याख्या काय आहे? निकष काय आहेत? विदा उपलब्ध असल्यास त्या निकषांना लावून तपासावे. तुमच्या व्याख्येनुसार भाषा मृत आहे की नाही याबद्दल तुमचे उत्तर तुम्हाला आणि मला मिळेल.
- - -
"क्ष"च्या व्याख्येनुसार संस्कृत भाषा जिवंत आहे. ("क्ष"ला त्याच्याच निकषांबद्दल विदा माहीत नसल्यामुळे तो "मृत" म्हणतो, त्याचा प्रतिवाद केला.)
"य"च्या व्याख्येनुसार संस्कृत भाषा जिवंत नाही. (मात्र "य"ला या निकषांना तपासण्याचा विदा माहीत आहे. म्हणून सहमती सांगितली.)
धनंजयला "क्ष" आणि "य" या दोन्ही व्याख्या वापरात असलेल्या माहीत आहेत. त्या-त्या निकषाप्रमाणे जे उत्तर सयुक्तिक आहे ते धनंजय देतो. दोन वेगवेगळ्या तथ्यांबद्दल दोन वेगवेगळी उत्तरे. यात गौडबंगाल असे काय?
- -
"क्ष" देशात मोटार रस्त्याच्या उजवीकडे चालवतात.
"य" देशात मोटार रस्त्याच्या डावीकडे चालवतात.
धनंजयला "क्ष" आणि "य" या दोन्ही प्रकारचे कायदे वेगवेगळ्या परिस्थितीत आहेत, हे माहीत आहे. "क्ष" देशात तो मोटार रस्त्याच्या उजवीकडून चालवतो, तर "य" देशात रस्त्याच्या डावीकडून. धनंजयच्या दोन वेगळ्या देशांत वेगळ्या प्रकारे मोटार चालवण्यात गौडबंगाल असे काय?
- -
असे म्हणायचे आहे का की एकवचनी धनंजयने "गाडी उजवीकडेच चालवावी" किंवा "डावीकडेच चालवावी"? असला संदर्भहीन एक-शब्दहट्ट धनंजयने केला तर तो सत्यवचनीपणा ठरणार नाही, उलट धनंजयचा हा मूर्खपणा अपघात मात्र करवेल.
शूर म्हणावे की अविचारी
मी म्हणेन अविचारी. मी आणखीही बरेच म्हणेन पण आताच नाही.
-राजीव.
अवांतर
या सादप्रतिसादाशी प्रत्यक्ष संदर्भातील नाही पण त्यातील एका संदर्भाशी (मठूर गाव) खालील जाहीरात बघितली नसल्यास बघायला आवडेल असे वाटले...
पटले नाही
आता माझा स्वतःचा पुढचा मुद्दा असा की, ठीक आहे आपण मान्य करुया की संस्कृत ही फक्त तांत्रिकदृष्ट्याच जिवंत भाषा आहे, मराठी, इंग्रजी च्या प्रकारे 'जिवंत' भाषा म्हणता येतील, त्याप्रकारे संस्कृतभाषा जिवंत नाही. सो व्हॉट?
हे राधिकाबाईंचे त्या प्रतिसादातले वाक्य बघा. कारण मराठी, इंग्रजीप्रमाणे संस्कृत जिवंत नाही म्हणजे नेमके काय?इंग्रजी, मराठी आणि संस्कृत यात नेमका फरक काय? हा प्रश्न आपण विदुषींना केला नाहीत त्या अर्थी आपल्याला याचे उत्तर माहिती असावे. पण मला माहिती नसल्याने एकच तर्क करू शकतो. तो असा की की मराठी, इंग्रजी बोलणारे लोक जसे बर्यापैकी संख्येने दिसतात तितक्या संख्येने संस्कृत बोलणारे लोक दिसत नाहीत. त्या मुद्द्यावर आपण "मालकांशी" प्रतिवाद करताना असे म्हटले होते की नेमके किती लोक बोलणारे असले की भाषा जिवंत समजावी? तसा प्रश्न विदुषींना केला नाहीत.
मला वाटणारे उत्तर बरोबर नसेल तर आपण किंवा राधिकाबाई यांनी मराठी, इंग्रजी ज्याप्रकारे जिवंत आहेत त्या प्रकारे संस्कृत जिवंत का नाही याचे उत्तर द्यावे?
"ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची भाषा जिवंत हे पटणारे नाही" हा मालकांशी केलेला युक्तिवाद विदुषींविरुद्ध न करण्याचे नेमके कारण काय?
थोडक्यात माझी अशी अजूनही समजूत आहे की आपण जितक्या हिरीरीने "पलिकडे" "जिवंत आहे" असा किल्ला लढवलात तितक्या हिरीरीने इथे लढवला नाहीत.
कदाचित मी मंदमती असल्याने जास्त खोलातली उत्तरे समजणार नाहीत. त्यामुळे हा विषय इथेच संपवतो.
विनायक
"मान्य करूया की तांत्रिकदृष्ट्या..."
या प्रकारची वाक्ये रोजव्यवहारात आपण ऐकतो, तेव्हा वेगवेगळ्या व्याख्या आणि निकष असल्याचे चिह्न असते.
"ठीक आहे, मान्य करूया की तांत्रिकदृष्ट्या मी मंगळसूत्रासाठी १७,६०० रुपये 'किंमत' सोनाराला दिली. पण ज्या प्रकारे या चपलाहाराची दागिन्याची किंमत मोजता येते, आणि त्या काकणाची किंमत मोजता येते, त्या प्रकारे मंगळसूत्राची किंमत अमूल्य आहे..."
वगैरे.
बहुधा वरील विधानापूर्वी "मान्य करू की तांत्रिकदृष्ट्या..."च्या आधी बरीच चर्चा झालेली होती? या नांदीनंतर बोलणार्याला अमान्य व्याख्येचा उल्लेख असतो. पण अशा प्रसंगांत त्या वाक्याच्या आधी बहुधा बोलणार्याला मान्य निकषांची चर्चा असते.
मिसळपावावर जो प्रतिवाद मी केला, त्याचा दुवा पाठीमागे गेल्यामुळे मला सापडत नाही. पण त्या विषयात "जिवंत/मृत"वरून "अभ्यसनीय/टाकाऊ" अशा प्रकारचा संबंध लावलेला दिसत होता, असे अंधुक आठवते. म्हणून हिरिरी उत्पन्न झाली. पण हिरिरीचा खंडनातील मुद्द्यांशी थेट संबंध नाही. खंडनाचा संबंध त्या-त्या व्याखेतील तपशिलांशी आहे. बहुधा "संस्कृत कोणाला समजत नाही" असा काही मुद्दा त्या ठिकाणी असावा, तर त्याचे खंडन "जुनी मराठीसुद्धा बहुतेकांना समजत नाही" असे तिथे दिले असणार.
येथे विषयाची हाताळणी वेगळी होती. संस्कृत भाषा अभ्यसनीय आहे असे येथील अनेक प्रतिसादकांचे मत होते, तसे माझेही आहे. मग हिरिरी अशी वाटली नाही. हिरिरी न-वाटण्याचाही सहमतीच्या मुद्द्यांशी थेट संबंध नाही.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी चर्चिलेली तथ्ये वेगवेगळी होती, म्हणून त्यांच्यातून निघणारे अभ्यास-योग्य/अयोग्य निष्कर्षही वेगळे होते. दोन वेगवेगळे किल्ले होते. "वेगळ्या व्याखा-वेगळे तथ्य" या सामान्य प्रश्नाचे उदाहरण म्हणून जोवर चालते तोवर या ठिकाणी ही चर्चा ठीक होती. हिरिरीचा अभाव हा "वेगळ्या व्याखा-वेगळे तथ्य" या सामान्य प्रश्नापेक्षा वेगळा तपशील आहे. अवांतर तपशिलाची चर्चा म्हणून ती बंद करणे योग्य आहे.
परंतु आपण सर्वच मर्यादित मतीचे असल्यामुळे "विचारांची खोली न समजणे" हे कारण चर्चा संपवण्यासाठी योग्य नसावे.
रिंगा रिंगा
मी एका लहानग्याचे हात धरून रिंगा रिंगा रोजेस खेळत होतो आणि काय चमत्कार! सारे घर आमच्याभोवती फिरायला लागलेले मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. त्याला धरून ठेवायला कोणाला सांगितले तर ते देखील त्याच्याबरोबर फिरायला लागले. वेडे कुठले?
चर्चा
उपक्रमपंत, ही चर्चा फक्त एक उदाहरण म्हणून टाकली होती. संपूर्ण चर्चा उडवली तरी माझी हरकत नाही.
पूर्वपीठिका
चर्चेमागच्या प्रश्नाला धनंजय यांनी मागे लिहिलेल्या 'विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका'या लेखातल्या मुद्द्यांद्वारे सयुक्तिक उत्तर देता येईल असं वाटतं -
- हे अर्थातच त्यातले एक वाक्य. संपूर्ण लेख आणि त्याखाली लेखकाने अधिक स्पष्टीकरणार्थ दिलेले प्रतिसादही या संदर्भात मननीय ठरावेत.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी