पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -उत्तरार्ध

या लेखाच्या पूर्वार्धात, वातावरण बदलाची कारणे आपण थोडक्यात बघितलॊ आणि तसेच त्याचे परिणाम सुद्धा. "वातावरण बदल" हे नुसतेच एक hypothesis न राहता अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन आणि अभ्यासाअंती दुजोरा दिलेले शास्त्र हळू हळू होत गेले.

जागतिक तापमान वृद्धी, Ref: www.grida.no

तरी त्याला जागतिक स्तरावर प्रथम राजकीय पाठिंबा हा १९९०च्या दशकाच्या सुरवातीस मिळाला. १९९४-९५ मधे यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक पातळीवर पहिल्याने घडामोडी झाल्या आणि त्यातून १९९७ साली आंतरराष्ट्रीय "क्योयोटॊ करारनामा" तयार झाला. त्याच्या जास्त खोलात न शिरता इतकेच म्हणतो की:

  1. अमेरिका यात प्रथम सहभागी होती पण नंतर तिने अंग काढून घेतले. - कारण उद्योग धंद्यांवर विपरीत परिणाम होईल आणि आर्थिक घडी विस्कटेल अशी भिती विशेष करून रिपब्लीकन पक्षाला असल्यामुळे त्यांचे बहुमत असलेल्या सिनेटने प्रस्तावाला विरोध केला.
  2. या करारानुसार प्रगत राष्ट्रे २०१२ पर्यंत पर्यावरण बद्लाला कारणीभूत असलेले कार्बन डायऒक्साईड सह ६ ग्रीन हाऊस गॆसेस त्या त्या देशास अथवा समुदायाला (उ.दा. - युरोपिअन युनियन) विशिष्ठ प्रमाणात कमी करावे लागतील.

अमे्रिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जॊर्ज बुश यांना तर २००१ साली वातावरण बदल वगैरे काही मान्यच नव्हते पण आता वेगवगळ्या (राज)कारणांमुळे का होईना पण त्यांना हे मान्य करावे लागत आहे. पण त्यातही त्यांचा भर हा भारत आणि चीन या दोन मोठ्या विकसनशील देशांना पण ग्रीन हाऊस गॆसेस कमी करणे बंधनकारक असावे अशा आशयाची मागणी करण्याकडे आहे. भारत आणि चीनचे म्हणणे की प्रगत राष्ट्रांनी प्रगती करण्यासाठी काहीही केले, आता आम्ही प्रगती पथावर आहोत त्यामुळे आम्हाला पण उर्जावापर आणि इंधनवापर वाढवावेच लागणार...

पर्यावरण बदल आणि उद्योगांवरील विपरीत परीणाम - वस्तुस्थिती

क्योयोटॊ करारनाम्यातून बाहेर पडताना अमेरिकेची भिती होती की कार्बन डाय ऒक्साईड कमी करण्याला प्राधान्य दिल्यास त्याचा उद्योग धंद्यांवर विपरीत परीणाम होईल आणि आर्थिक घडी विस्कटू शकेल अशी. तर तसे खरेच झाले का? तर पाठीमागे वळून बघताना ह्याचे उत्तर नाही असे आहे. इंग्रजीतील या संदर्भात लागू होणारी म्हण म्हणजे, "Necessity is the mother of invention" . उद्यमशील माणूस / धंदे हे बिकट परिस्थितीचा सुद्धा उपयोग उद्यमशीलतेने करतात. याच नजीकच्या भूतकाळातील एक उदाहरण म्हणजे Y2K ची भिती. जेंव्हा उद्योगांना ह्या भितीने आणि तेही विशिष्ठ "मुहुर्ताची" (१ जाने. १२:००:०० सकाळ) माहिती मिळाल्याने ग्रासले तेंव्हा त्याचा उपयोग होऊन असंख्य उद्योगधंदे तयार झाले. कळत नकळत त्यामुळे इंटरनेटसंदर्भातील उद्योगधंदे वाढायलाही खूप मदत झाली. - ह्याचे कारण अर्थातच ठोस भिती - "अमुक वेळेस, अमुक पद्धतीने धंद्यांना अमुकप्रकारचा त्रास होऊ शकतो". परंतु पर्यावरण बदलाच्या बाबतीत मात्र ही भिती असली तर स्वत:वर किंवा आपल्या स्वत:च्या उद्योगावर त्याचा परिणाम होणार नाही असे वाटत राहते, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे सोपे जाते.

वृत्ती अथवा (दूर) दृष्टीतील फरक

मधे अमेरिकन सिनेटच्या एका समितीने माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि वातावरण बदल या समस्येवर आता वक्ता असलेले श्री. गोअर यांना बोलावले. त्यांनी एक चांगले उदाहरण दिले: १९९०च्या दशकात जेंव्हा अमेरिकेत "clean air act" बदल करून आला आणि पर्यावरण बदलावर जागतिक चर्चा घडू लागली तेंव्हा त्याचा परिणाम हा वाहननिर्मिती उद्योगांवर होणार हे समजून आले. ताबडतोब अमेरिकन वाहन कंपन्यांनी अनेक वकिलांना यावर विचार करायला नेमले तर जपानी कंपन्यांनी अनेक अभियंत्यांना! परिणाम जपानी कंपनीत "टोयोटो प्रियस" सारखी गाडी तयार झाली, होंडा आणि टोयोटा यांचे नाव कमी इंधन वापरणाया गाड्या म्हणून प्रसिद्ध झाले तर अमेरिकन फोर्ड, जनरल मोटर्सच्या बाबतीत याच्या बरोबर उलटे... आज ग्राहकांच्या पसंतीच्या जोरावर टोयोटाने गाड्या विकण्यामध्ये प्रथम क्रमांक गाठला तर फोर्ड ला अमेरिकेबाहेरील उद्योगावर स्वत:चे अस्तित्व टिकवावे लागत आहे...

लोकशाही म्हणजे ...

आपल्याला वरील उपमथळा वाचून कदाचित कळणार नाही की मला नक्की काय म्हणायचे आहे ते... पण लिंकनने केलेली "लोकशाहीची" व्याख्या लक्षात घेणे आणि तसे वागणे याचा उपयोग कसा होतो हे पाहण्यासारखे आहे. लिंकन म्हणाला होता की "लोकशाही म्हणजे लोकांनी चालवलेले, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य". गेल्या सहा-सात वर्षात अमेरिकन जनतेने बुश ला निवडून दिले त्या आधी क्लिंटन असताना देखील रिपब्लिकन पक्षाला सिनेट मधे बहुमत दिले. रिपब्लिकनांची पर्यावरण विषयक ख्याती अगदी अलिकडेपर्यंत चांगली नव्हती/ नाही. त्यामुळे केवळ उद्योंगांना जे योग्य त्याचा विचार करणे हीच निती झाली, पर्यावरणाचे प्रश्न हे पर्यावरणवाद्यांनी ("tree huggers") केलेले खूळ असा समज असलेले राज्यकर्ते आले. परंतु याच वेळी दुसरीकडे संशोधकांना वाटणारी काळजी वाढत असल्याने यावर उपाय शोधणे निकडीचे वाटू लागले. म्हणून सरकार काय करत नाही यावर नुसते बोलत न बसता किंवा काय करतेय याची वाट पाहात नुसते न बसता, आपल्याला त्यावर काय करता येईल यावर विचार करणारा वर्ग वाढीस लागला. त्यातून काही न्याय प्रविष्ट घटना घडल्या (उदा. - कार्बन डाय ऒक्साईड हा प्रदुषण निर्माण करणारा वायू आहे का हे ठरवायला सर्वोच्च न्यायालयात खटला भरला आणि परिणामी सरकारला ह्या वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलावयाला लावली), विद्यापीठ स्तरीय संशोधन झाले. वैज्ञानिक, सामाजिक, अभियांत्री्की, आर्थिक या सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसार माध्यमांनी पर्यावरणाला दिलेले महत्व, तसेच काही राजकीय चळवळी, काही सामाजिक तर काही स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीतील करता येतील असे प्रकल्प, अशा अनेक पद्धतीने अमेरिकन नागरिक "लोकांचे राज्य" चालवायचा प्रयत्न करत राहिले. मुख्य म्हणजे हे बर्यापैकी सकारात्मक होते - अर्थशास्त्र, उद्योगांना आणि समाजाला पुढे आणणे यात कुठेच अमेरिका मागे पडली नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यात नकारात्मक म्हणजे - मोर्चे, निषेध, अशा पद्धतीच्या राजकारणाला महत्व दिले गेले नाही. आपल्या हातात जे आहे ते करायचा आपण प्रयत्न करणे हाच एक दृष्टीकोन.

२००१ मधे माझा संबंध अशाच अमेरिकेतील एका संघटनेशी आला तिचे नाव "International Council for Local Enviornmental Initiative - ICLEI (इक्ली) " असे आहे. ICLEI ने स्थानीक स्वराज्यसंस्थांना नजरेसमोर ठेवून पर्यावरण बदल टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी म्हणून कार्यक्रम तयार केला आणि त्यात देशभरच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या कार्यक्रमाअंतर्गत एक विद्यापिठातील विद्यार्थी काम करायला (स्थानिक स्वराज्यसंस्थेस पैसे द्यायला न लागता) मिळायचा. त्या विद्यार्थी/विद्यार्थिनीचे काम असे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व इमारतीतील उर्जावापर, कचरा निर्मिती, वाहने, इंधन वापर इत्यादीची माहिती संकलीत करणे आणि त्या माहितीसाठी ज्या विशिष्ठ वर्षातील माहिती उपल्ब्ध असेल तिचा (baseline) वापर करणे. त्याच पद्धतीने संपूर्ण शहराची माहिती पण मोघम पद्धतीने संकलित करणे (कारण व्यक्तिगत अथवा उद्योगांची सर्व माहिती गोळा करणे शक्यही नाही आणि गरजेचेही नाही). या प्रकल्पाचा संकल्प म्हणून मी काम करतो त्या शहराचा (त्यावेळेस शहराची) महापौर आणि निवडून आलेल्या सदस्यांना ठराव करावा लागणार होता की शहरातून तयार होणारा "कार्बन डाय ऒक्साईड" (उर्जा/इंधनवापर) योग्य तितक्या % ट्क्क्यांनी दहा वर्षात कमी करायाचा. अर्थातच याची सुरवात राजकीय नेत्यांना समस्येबद्दल शिक्षण देण्यापासून झाली. जेंव्हा लक्षात आले की याने पैशाचा अथवा इतर काही त्रास होणार नाही किंबहुना मतदार झाले तर खूषच होतील तेंव्हा पाठिंबा लगेच मिळाला. परिणामी योग्य माहितीचे संकलन तर झालेच पण हळू हळू लोकशिक्षण पण झाले. त्याचसुमारास अनेक स्थानिक रहिवाशी ज्यांचे काम हार्वर्ड, एम आय टी, राज्य पर्यावरण विभाग, काही (संशोधनात्मक) आंतराष्ट्रीय संघटना यांच्याशी चालले होते ते सुद्धा एकत्र आले. आणि बरीच कामे सरकारी आणि रहिवाशांच्या/उद्योगांच्या दृष्टीने झाली. त्यात रस्त्यावरील, इमारतीतील आणि घरातील दिवे बदलून उर्जा बचतीचे दिवे लावणे येथपासून ते या राज्यातील पहिली "हिरवी" शाळा (ग्रीन स्कूल) बांधण्यापर्यंत अनेक गोष्टी झाल्या.

Capuano Early childhood learning center, Ref: www.hmfh.com
Capuano Early Childhood Center - Solar Panels, Ref: www.hmfh.com

असे प्रकल्प अमेरिकेतील अनेक शहरात राबवले गेले. इक्ली या संस्थेने याच प्रकारात भारतातपण प्रकल्प राबवले त्यात सांगलीत पण राबवला होता आणि त्याला मी २००२ मधे भेटही दिली होती.

याच पद्धतीने अमेरिकेत ब-याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कामे होत आहेत. स्थानिक नागरिकांचे गट, बिगरसरकारी संस्था (NGOs), विद्यापिठे, स्वराज्य संस्था, राज्य सरकारे, Environmental Pरotection Agency, NASA, National Oceanographic and Atmosp्हeric Administration, वगैरेसारख्या काही केंद्रीय संस्था या केंद्र सरकार आणि काही उद्योग पर्यावरण मित्र नसूनही तर बयाचजणांना या विषयी काही माहिती नसूनही जणू काही "सर्व भूतांस जी रात्र जागतो संयमी तिथे" तत्वाप्रमाणे काम करत आहेत. मला यातील काही गोष्टी जवळून पाहण्याचे अथवा त्यात काही अंशी सहभागी होण्याचे भाग्य लाभले...

एकंदरीत काय वरील मथळ्याप्रमाणे लोकशाहीतली लोकांची जबाबदारी लोक पाळत आहेत - सत्ताधायावर कमीत कमी (अगदीच शून्य शक्य नाही!) विसंबून राहून...

व्यक्तिगत स्तरावर: याच पद्धतीने मला एकदा इथल्या केंद्रसरकार (federal government) कडून अनुदान मिळाले होते त्याचा वापर करून पावसाळी सांडपाण्यावर (stormwater) व्यवस्थापन तयार करत असताना शास्त्रीय पद्धतीने लक्षात आले की आसपासची झाडांची आणि डांबरीकरण अथवा कॊंक्रीटीकरण यांचा अनाठायी उपयोग टाळल्याने - हे कार्बन डाय ऒक्साईड कमी करायला किंवा पाण्याचे पूर वाचवायला किती मदत होते.

आपल्या कडे पण काही संशोधन आणि प्रकल्प चालू आहेत पण त्याचे स्वरूप मर्यादीत, मुख्यत: लोकशिक्षणाच्या दृष्टीकोनातून मर्यादित आहे असे वाटते.

याची खरेच गरज आहे का?

कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की ही सर्व कटकट करण्याची खरेच गरज आहे का - त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न येथे सोडवायचे आहेत. याचे उत्तर सोपे आहे - असा प्रकल्प राबवल्याने जर उर्जा बचत होत असेल, पैसे वाचत असतील, सभोवतलचे वातावरण बदलत असेल आणि राहणीमान चांगले होत असेल तर अगदी कुणाचा वातावरण बदलावर विश्वास नसेल तरी काय हरकत आहे? आज युरोपातील प्रगत राष्ट्रे आणि अमेरिका हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने "वातावरण बदलावर" स्वत:च्या देशात आणि इतरत्र अभ्यास करत आहेत. ही समस्या कमी कशी करायची, त्याला तोंड कसे द्यायचे यावरून योजना आखत आहेत. त्यात नगररचना, प्रदूषण नियंत्रण, पाण्याची योजना, शेतीची योजना, उर्जा-इंधन वापर, वाहनांचा प्रकार आणि वापर या आणि अशा अनेक गोष्टी आहेत.

आपण काय करायला हवे आहे?

केवळ प्रगतीपथावर आहोत असे म्हणत आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आज आपण एका अशा ऐतिहासीक टप्प्यावर आहोत की जेथून अजून वर जाऊ शकू किंवा "टायगर इकॊनॊमीज" असे म्हणत जशी काही "आशियाई देशांची अवस्था झाली" तशी करून घेऊ शकू. आधीच्या लेखात म्हणल्याप्रमाणे ह्या विषयाचा संबंध आपल्या समाजाशी आणि देशाशी वेगवेगळ्या स्तरावर आहे: टिकाऊ (sustainable) - राहणीमान, अर्थव्यवस्था, आरोग्य, आणि सुरक्षा. "त्यांची चाळीस वर्षे (’खाणे झाले’) मग आमची पाच वर्षे झाली म्हणून काय बिघडते" म्हणणा-यांचे जसे होते तसेच याबाबतीत केवळ एका पक्षाऐवजी संपूर्ण देशाचे होऊ शकते. ’हुषार असलेले” इतरांच्या चुकांनीच सुधारतात तर ’तसे नसलेले’ स्वत:च्याच चुकांनी (जर सुधारले तर) सुधारतात..जगात राजकारण, उद्योग हे धुतल्या तांदळासारखे स्वच्च असतात असे कोणीच म्हणणार नाही. पण प्रगत राष्ट्रांत लहानापासून मोठ्यांपर्यंत एक गोष्ट नक्की माहीती आहे की स्वत:चे स्वार्थ हे स्वत:चे राष्ट्र टिकवले तरच टिकू शकतील... म्हणूनच

सौर उर्जेचा भारतास असलेला फायदा, Ref: www.solar4power.com
  1. आपल्याला या विषयावरील लोकशिक्षण, (environmental friendly -) स्वाचरण, राजकारण्यांना, प्रशासकांना आणि उद्योजकांना शिक्षण देऊन विचार करायला लावणे हे महत्वाचे आहे - हा सर्वात महत्वाचा भाग आहे.
  2. हरित उर्जा वाढवण्याची गरज आहे - सौर उर्जा, पवन उर्जा आणि इतर अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वाढता वापर - यातून फक्त वातावरण बदल ह्या एकाच समस्येवर उपाय मिळणार नसून त्यामुळे नवीन उद्योग तयार होऊ शकतात आणि इंधनाच्या बाबतीत काही अंशी स्वावलंबी होता येईल.
  3. पवनचक्की, Ref: www.shelterpub.com
  4. उर्जा व्यवस्थापन - मला वाटते काही प्रमाणात आपण (भारतीय) ही गोष्ट आपणहून स्वभावत:च करतो किंवा वीज कपातीमुळे! पण तरी नवीन कमी उर्जा वापरणारी उपकरणे वापरणे वाढवणे ह्या मुळे खूप फरक पडू शकेल.
    उर्जा वाचवणारे दिवे, Ref: www.eere.energy.gov
  5. सार्वजानीक दळणवळणाला प्रोत्साहन आणि वैयक्तिक गाड्यांचा मर्यादीत वापर
  6. नगररचना आणि व्यवस्थापन
  7. कचराव्यवस्थापन - हा जरी नगररचना व्यवस्थापनाचा भाग होऊ शकत असला तरी तितकाच तो स्वतंत्र भाग ही आहे.

यातील प्रत्येक गोष्टीवर बरेच काही सांगता येईल - पण तूर्त इतकाच विचार करू की जेव्हढे आपण भारतात हे सर्व प्रत्यक्षात आणू तितके त्यामुळे आपले राहणीमान पण सुधारेल, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संतुलनालापण फायदा होईल. शिवाय नवीन उद्योगांना पण फायदा होईल.

पर्यावरणसंदर्भात विचार करायचा झाल्यास आपण २६ जूनसारखे मुंबईतील पूर पाहिले, विस्थापीत बांगलादेशींच्या लोंढ्यावर ठाकयांनी जेंव्हा आरडाओरड केली तेंव्हा ते राजकारण म्हणून वाटणे सोपे गेले पण मग विलासरावांचेदेखील तेच म्हणणे आता ऐकावे लागले , पाण्याचे दुर्भिक्ष, सात जून ओलांडला तरी मुंबईत न येणारा पाऊस, वीज कपातीबद्दल न बोललेलेच बरे...

पण दुसरीकडे गेल्या दहा-पंधरा वर्षात भारताचे नाव हे प्रगत राष्ट्रात (विशेष करून अमेरिकेत) रस्त्यावरून ह्त्ती, उंट, गाई फिरणारा देश हे न राहता प्रबळ लोकशाही आणि उद्योगात जगाचे नेतृत्व करण्याची ताकद असलेला देश असे झाले आहे. याला सुपर कॊंप्युटर न द्यायची घोडचूक (वर अपमानित करून) जॊर्ज बुश (४१वा राष्ट्राध्यक्ष) ने केली यांनी परम तयार करून जगात विकला, यांणि "ऎन्ट्रीक्स" काढून आता जगभरचे उपग्रह स्वस्तात अवकाशात नेण्याची मोहीम काढली, यांनी कोकण रेल्वे कॊर्पोरेशन काढली पण ती कोकणातच न राहता मध्यपूर्वेतील आपले धंदे ताब्यात घेऊ लागलॊ, यांच्या आय़.टी. आणि कॊलसेंटरमुळे आपल्याला भारतीय ऎक्सेंट (आणि खाणे) पण समजायला लागला(ले)! यांचा मित्तल पोलादाचे धंदे विकत घेतोय आणि अंबानीची इराकमधील तेल क्षेत्रे विकत घे्यायची मजल मारतोय...

तात्पर्य - आपल्याला "वो भारत देश है मेरा" वगैरे म्हणण्याजोगे बरेच आहे आणि ते वाढावे असेच कायम वाटणार पण त्यासाठी आपल्याला राहणीमान आणि टिकाऊ जीवनपद्धती ज्यात - अर्थ, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि पर्यायाने पर्यावरण याकडे जाणीवेने लक्ष देणे निकडीचे आहे एव्हढेच म्हणावेसे वाटते.

Comments

उत्तम माहिती

उडत उडतच लेख वाचला, पण नकाशे व चित्र बोलकी आहेत. विषय तर अतिशय महत्वाचा आहेच.

पर्यायी ऊर्जा, इत्यादी गोष्टी चांगल्याच पण मला वृत्तीचे बदल जास्त महत्वाचे वाटतात - आपण कुठलीही गोष्ट का करतो आहोत ह्यामागे जर जास्त लक्ष घातलं तर नक्कीच आपला पर्यावरणावरचा ठसा कमी होईल.

खिरे

अत्युत्तम

विकास,

लेख अतिशय सुरेख आहे . असे लेखन मराठीतून होत आहे याबद्दल आभार. आपल्याला माहित असलेल्या विविध विषयांवर अधिकाधिक लोकांनी असेच लेखन करावे असे वाटते.

भारताने काय करायला पाहिजे याबाबत सुचवलेले सर्व पर्याय पटले आणि महत्त्वाचे वाटले. जबाबदारीची जाणीव प्रत्येक माणसाच्या मनात उत्पन्न होणे हे येथे महत्त्वाचे वाटते. कचरा, रस्त्यावरील गाड्या, नगररचना यांचा डोंगर हाहा म्हणता वाढत जाऊन त्याचा भस्मासूर कधी होतो ते कळेनासे होते. प्रत्येकाने यांत खारीचा वाटा उचलला तरी मोठा फरक पडेल असे वाटते.

उत्तम लेख

हा भागही उत्तम आहे. युरोपियन देशांनी पर्यावरण संवर्धनात आघाडी घेतली आहे असे दिसते. आजच्या घडीला अमेरिकेकडून सर्वात जास्त प्रदूषण होते. राज्यकर्त्यांची राजकीय आणि आर्थिक कारणांनी असलेली अनास्था पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिकांच्या रेट्यामुळे लवकरच दूर होईल अशी आशा. शिवाय येत्या निवडणुकीत या प्रश्नाबाबत ठोस पावले उचलण्याची इच्छा असणारा(री) राष्ट्राध्यक्ष झाल्यस अधिकच चांगले.
भारत आणि चीनने विकासाच्या नावाखाली याला विरोध करणे आत्मघातकी ठरेल. वैश्विक तापमानवाढीचे दुष्परिणाम जगातील सर्वांनाच भोगावे लागतील आणि जगाची निम्मी लोकसंख्या या दोन देशात असल्याने सर्वात जास्त परिणाम या देशांतील नागरिकांवरच होईल. भारतात या विषयावर जनजागृती करून राज्यकर्त्यांवर आणि प्रशासनावर आवश्यक तर दबाव आणून काही करता येऊ शकेल. चीनने(चे) काय करावे हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरित.

चीनची बातमी

चीनने(चे) काय करावे हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरित.

असे म्हणत असतानाच चीनने पर्यावरणविषयक नवीन धोरणावर विचार सुरू केला आहे असे शोधल्यावर समजले. रॉयटर्स ची बातमी पाहा.

सहमत

शिवाय येत्या निवडणुकीत या प्रश्नाबाबत ठोस पावले उचलण्याची इच्छा असणारा(री) राष्ट्राध्यक्ष झाल्यस अधिकच चांगले.

सहमत. लेख आवडला.

उत्तम

विकास,
उत्तम लेख. मुद्देसूद मांडणी, दुवे यातून बरीच नवीन माहिती मिळाली.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हेच

मलाही हेच म्हणायचे आहे.

अभिनंदन

उत्कृष्ट

विकासराव, अतिशय सुंदर लेख. या जटिल प्रश्नाच्या पार्श्वभूमीबरोबरच आपण काय करू शकतो यावरही आपण भाष्य केले आहे त्यामुळे हा लेख आवडला.
आपला
(प्रभावित) वासुदेव

सर्वसामान्य लोकांना आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणता येतील अश्या काही टीपा देता येतील का?
आपला
(सर्वसामान्य) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण लेख

अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण लेख

 
^ वर