लेखमालिका

उपक्रमाच्या सदस्यांनी वेळोवेळी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या लेखमालिकांचा वाचकांना अधिक चांगल्या रीतीने आस्वाद घेता यावा यासाठी अश्या लेखांना एकत्रित केले आहे.

अणू आहेत की नाहीत? - अणुवादाचे प्राचीन खंडन

धनंजय

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकलो की प्राचीन काळात भारतातले कणाद ऋषी अणु-वादी होते. त्यावेळी अशी शंका माझ्या मनात आली, की मग त्यानंतर त्या ज्ञानाची प्रगती का नाही झाली? त्या अणुवादाचे सांगोपांग खंडन झाले, हेच त्याचे कारण. खंडन करणार्‍यांपैकी प्रखर बुद्धिमत्तेचे शंकराचार्य हे अग्रणी होते.

प्राचीन अणुवादाचे स्वरूप काय होते? त्याचे आद्यशंकराचार्यांनी कसे खंडन केले? ते खंडन आज आपल्याला पटण्यासारखे आहे का? हे सर्व विचार मनात येऊ शकतात. म्हणून मूळ स्रोताकडे जाऊन बघणे उपयोगी ठरावे. ब्रह्मसूत्रांच्या शांकरभाष्यात हे विवेचन सापडते. दुसर्‍या अध्यायातली काही सूत्रे, आणि त्यावरील भाष्य या कार्याला वाहिलेली आहेत. याला "परमाणु-जगद्-अकारणत्व-अधिकरण", म्हणजे "परमाणू हे जगाचे कारण नसल्याचे प्रकरण" असे म्हणतात (ब्रह्मसूत्रभाष्य २.२.१२-२.२.१७). प्राचीन विचारवंतांचे वादविवाद आणि विचार अभ्यास करण्यासारखे असतात. केवळ "प्राचीन" म्हणून त्यांचा नवीन विचारांशी घटस्फोट होऊ नये. शिवाय प्राचीन विचारांच्या आह्वानाला पुरला, तरच नवीन विचार स्वीकार करावा. या कारणासाठी प्राचीन अणुवाद, आणि त्याचे खंडन आजही विचारात घेण्यालायक ठरावे.
पुढे वाचा

सृजनशीलता - तंत्र व मंत्र

शरद् कोर्डे

सृजनशीलता हे प्रत्येक माणसांत वसत असलेल्या विचारशक्तीचा विशिष्ट प्रकारे वापर करण्याचे एक तंत्र आहे. त्यांत चाकोरीबाहेर विचार करण्याचा भाग येतो. त्याचा उपयोग करणार्‍या माणसाकडून नवनिर्मिति होते. थोर शास्त्रज्ञ, क्रांतिकारक विचारवंत, संशोधक व साहित्यिक यांच्याकडून आपल्या कार्यांत व निर्मितींत कोणत्यातरी टप्प्यावर या तंत्राचा वापर झाल्याचे आढळून येते.
याचा अर्थ असा नाही की सृजनशीलता सर्वसाधारण माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. खरेतर आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी त्या तंत्राचा वापर करतो. मात्र त्यामुळे मिळणारे यश अनपेक्षित वाटते व आपण त्याचे श्रेय नशीबाला देऊन नंतर कधी त्याचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. तसे विश्लेषण केल्यास आपण प्रयत्न करीत असतांना केव्हातरी अभावितपणे चाकोरीबाहेरचा विचार केला होता असे आढळून येईल. या तंत्राचा हेतुपूर्वक उपयोग करण्याचा सराव केल्यास असे भाग्यशाली क्षण ही आपल्या बाबतींत नित्याची बाब होऊन बसेल. शिवाय एक असामान्य व्यक्ति म्हणून आपली कीर्ति होईल.
पुढे वाचा

आजी आजोबांच्या वस्तू

ऋषिकेश

हल्लीचं जग हे प्रचंड वेगाने प्रगती करतंय. ही प्रगती गेल्या काही दशकांत तर इतक्या वेगाने झाली की अनेक पूर्वापार वापरण्यात आलेल्या वस्तू हा हा म्हणता नाहीश्या व्हायला लागल्या. लहानपणापासून अनेक पुस्तके वाचायची सवय होती. पुस्तकांमध्ये उल्लेख येणार्‍या वस्तूंपैकी बर्‍याचशा वस्तू कधी ना कधी पाहण्यात अथवा ऐकण्यात आल्या असत. परंतु गेल्या २५ वर्षात परिस्थिती इतकी बदलली की आताच्या लहान मुलाने तिच पुस्तके वाचायला घेतली तर त्याला अनेक शब्द अडतील; काही वस्तू कोणत्या असा प्रश्न पडेल. यातील शब्दसंपदा ही वाचन वाढवून, संदर्भाने वाढेल असे वाटते; परंतु अनेक वस्तू मात्र आता दिसेनाशा झाल्या आहेत. केवळ दोन पिढ्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये आता बराच फरक आहे. ह्या लेखमालेत अश्या "आजी आजोबांनी" वापरलेल्या वस्तूंची माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
पुढे वाचा

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद

प्रकाश घाटपांडे

भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठेसाठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
पुढे वाचा

वर्णमाला

राधिका

संस्कृतभाषेला समजून घेण्यातली पहिली पायरी म्हणजे या भाषेतले उच्चार आणि ते सर्व एकत्र ज्यात गुंफले आहेत ती आपली वर्णमाला. आपली वर्णमाला आपल्याला पूर्णपणे पाठ असते. आपल्यापैकी काही जणांना दन्त्य, तालव्य वगैरे शब्द व त्यांचे अर्थही ठाऊक असतील. पण आपल्या वर्णमालेची रचना अशीच का केली आहे, या रचेनेचे काही तर्कसंगत स्पष्टीकरण आहे का? त्, थ्, द्, ध्, न् हे सर्व दन्त्य उच्चार आहेत हे माहिती असेलच पण मग ते याच क्रमाने का लिहिले आहेत? थ्, त्, ध्,द्,न् किंवा थ्,ध्,द्,त्,न् वगैरे क्रमाने का नाही? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कृ आणि लृ हे स्वर कसे , श् आणि ष् यांत फरक काय, असे प्रश्न मात्र आपल्याला पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता- या लेखमालेतून शोधणार आहोत.
पुढे वाचा

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण

धनंजय

संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासकांना सर्वात शिरोधार्य ग्रंथ म्हणजे पतंजलींचे व्याकरणमहाभाष्य. महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत "शब्द म्हणजे काय?" "त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची?" "नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे?" "नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून?" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे "मराठीकरण" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.
पुढे वाचा

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही

चंद्रशेखर

आधी बरेच यत्न करून मी कंबोडिया देशाचा ई-व्हिसा मिळवलेला असल्याने मी चटकन इमिग्रेशन काउंटर्स कडे जातो आहे. विमानातले माझे बहुतेक सहप्रवासी, आगमनानंतर मिळणारा व्हिसा काढण्याची तजवीज करण्यात गुंतलेले असल्याने मला रांगेत उभे न राहता पुढे जायला मिळाले आहे. विमानतळावरचा कर्मचारी व अधिकारी वर्ग बघून मात्र एकंदरीत भारताची आठवण होते आहे. तशीच संशयी व उर्मट मनोवृत्ती या मंडळींचीही दिसते आहे. मात्र विमानतळाची अंतर्गत व्यवस्था व सोई या सर्व प्रवाशांना सुखकर वाटतील अशाच आहेत. मी माझी बॅग घेऊन विमानतळाच्या बाहेर येतो. सियाम रीप शहरात आमची सर्व व्यवस्था बघणार आहेत ते श्री बुनला, समोरच माझ्या नावाची पाटी हातात घेऊन माझी वाट पहात उभे आहेत. मी त्यांना हात हलवून अभिवादन करतो. ते लगेचच माझ्याजवळ येऊन औपचारिक गप्पागोष्टी करत आहेत. इतक्यात शेजारच्या कोपर्‍यात उभ्या केलेल्या एका मानवी आकाराच्या मूर्तीकडे माझे लक्ष जाते. मूर्तीचा चेहरा व डोक्यावरची पगडी हे जरा निराळेच वाटतात. मात्र त्या मूर्तीला असलेले चार हस्त व त्यापैकी दोन हातात् असलेल्या शंख व व चक्र या वस्तू त्या मूर्तीची लगेच मला ओळख पटवतात. ही मूर्ती नक्की विष्णूचीच आहे यात शंकाच नाही. म्हणजे देवांच्या सहवासातले माझे दिवस अगदी विमानतळापासूनच आता सुरू झाले आहेत.
पुढे वाचा

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती

आनंद घारे

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस विजेचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचा उद्योग व्यावसायिक तत्वावर सुरू झाला होता. त्यात मुख्यतः जलविद्युत (हैड्रो) आणि औष्णिक (थर्मल) वीजकेंद्रे होती. ज्या ठिकाणी नदीला धरण बांधून तिचे पाणी साठवून ठेवणे शक्य असेल अशा जागी धरण बांधतात, त्याच्या जलाशयातल्या पाण्याचा प्रवाह वळवून तो टर्बाइन नावाच्या यंत्रांमधून नेला जातो आणि त्या प्रवाहामुळे त्या यंत्रांची चक्रे गोल फिरतात. त्या चक्रांच्या दांड्याला जोडलेल्या जनरेटर्समध्ये विजेची निर्मिती होते. भूगर्भातील कोळसा किंवा तेल, वायू वगैरे इंधने औष्णिक केंद्रांमध्ये जाळून त्या ऊष्णतेच्या उपयोगातून पाण्याची वाफ केली जाते आणि त्या वाफेच्या सहाय्याने वेगळ्या प्रकारच्या टर्बाईन यंत्रांची चक्रे फिरवली जातात. शून्यातून ऊर्जा निर्माण करणे ही गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्या केवळ अशक्य आहे. निसर्गातच पण वेगळ्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करण्याचे काम ही केंद्रे करतात. ऊन, वारा, समुद्राच्या लाटा यासारख्या ऊर्जेच्या इतर नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग वीजनिर्मितीच्या कामासाठी करण्याचे प्रयत्नसुध्दा पूर्वीपासून केले जात आहेत, आता त्यांना अधिक प्राधान्य मिळाले आहे, पण आपल्या आवश्यकता भागवण्यासाठी पुरेशी वीज त्यांच्यापासून तयार करता येण्याची शक्यता मात्र अजून दृष्टीपथात आलेली नाही.
पुढे वाचा

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने

अरविंद कोल्हटकर

मराठी भाषेत शेकडो शब्द आणि वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत जातो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रस्तुत लिखाणात असे २० शब्द आणि वचने आहेत. पाळीपाळीने आणखी अनेक शब्द आणि वचने मी सदस्यांपुढे ठेवणार आहे.

प्रथम शब्द अथवा वचन, नंतर त्याचा उगम आणि शेवटी सरल अनुवाद असे ह्याचे स्वरूप आहे.
पुढे वाचा

Comments

आण्णा हजारे बद्दल संस्कृत मध्ये निबंध हवा आहे

नमस्कार!
मला संस्कृत येत नाही. माझा मुलगा दहावीत शिकत आहे. त्याला संस्कृत मध्ये आण्णा हजारे यांच्याबद्दल निबंध लिहायला सांगितला आहे. तेव्हा मला या कामात तुमची मदत हवी आहे.
धन्यवाद!
हिरकणी

 
^ वर