व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण

प्रस्तावना :

संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासकांना सर्वात शिरोधार्य ग्रंथ म्हणजे पतंजलींचे व्याकरणमहाभाष्य. महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत "शब्द म्हणजे काय?" "त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची?" "नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे?" "नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून?" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे "मराठीकरण" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.

या लेखाच्या प्रयोजनांच्या बाबतीत लेखाच्या मर्यादा काय आहेत?

(१) महाभाष्याची ओळख करून देणे. महाभाष्याचे नाव पुन्हापुन्हा बोलून ते साध्य झाले. पण ही ओळख खरीखरची करायची, तर भाषांतर मुळपाठ्याशी अधिक समांतर (जमेल तर शब्दशः) हवे, आणि मी बदलून माझ्या मनाप्रमाणे घातलेले कालबाह्य दाखले उपयोगी पडत नाहीत.

(२) त्या काळातल्या वैयाकरणांना, नव्हे अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे. तशी दृष्टी जिथे प्रकर्षाने जाणवते, तिथे मी मुद्दामून निदर्शनास आणली आहे. पण हेच जर सांगायचे असते, तर चपखल उदाहरणे देऊन वेगळ्या प्रकारे लेख लिहायला हवा होता. थोडी व्याकरणातली, थोडी न्यायशास्त्रातील, थोडी मीमांसेतील, थोडी आयुर्वैद्यकातील अशी चौफेर उदाहरणे द्यायला हवी होती.

(३) तिसरे प्रयोजन हे की मराठीची उदाहरणे देऊन ही चर्चा पूर्ण मराठीमय करायची, इतकेच नव्हे तर आजच्या मराठी भाषेबद्दल भाष्य करायचे. यात सर्व उदाहरणे मराठीतच आहेत, आणि सर्व दाखले आजच्या समाजाला लागू आहेत. पण हेच जर प्रयोजन असते, तर पतंजलींचा ऋणनिर्देश करून, फक्त त्यांची प्रश्नोत्तराची शैली उचलायला हवी होती, आणि स्वतंत्र रचना करायला हवी होती.
या मर्यादा जाणून लेख वाचला तर अनाठायी उत्तुंग अपेक्षांचा भंग होणार नाही, आणि विचारांना चालना देणारे मनोरंजन होईल अशी आशा आहे.

ऋणनिर्देश : गोव्यातील कवळे येथील वैदिक पाठशाळेतील टेंगसे गुरुजींनी संस्कृत व्याकरणाचे मूळ ग्रंथ माझ्या लहानपणी अभ्यासात येण्याला चालना दिली. पुढे व्याकरणाचार्य वा. बा. भागवत गुरुजींनी त्यांच्या पुस्तकातील माझ्या काही शंकांचे व्यक्तिशः निरसन केले. प्राध्यापक अशोक केळकर यांचे लेख वाचलेले आहेत, त्यांच्या मराठीविषयक मतांचा पगडा माझ्या लिहिण्यात दिसला तर मुळीच आश्चर्य नाही. या सर्व शिक्षकांची शिकवण घ्यायला मला थोडाच वेळ मिळाला (कधी केवळ दीड-दोन तासांची गाठभेट), आणि स्वतःचे गैरसमज करून घ्यायला वर्षानुवर्षे मिळाली. इथे ज्ञानात काही बेरीज झाली, तर ते त्या शिक्षकांचे ऋण आहे; काही उणे सापडले तर तो भाग माझ्या अवगुणाचा मानावा.

अनुक्रमणिका

१) शब्द म्हणजे काय
२) शास्त्र शिकायची प्रमुख प्रयोजने, प्रतिसादांत व्याकरणकारांची कार्यप्रणाली
३) शास्त्र शिकायची अन्य प्रयोजने
४) नियम आणि अपवाद, प्रतिसादांत "शुद्ध" भाषा बद्दल देवाणघेवाण
५) व्याकरणाचे प्रमाण म्हणजे लोकभाषा, प्रमाण बोली, नियमांसाठी कस, प्रतिसादांत "शब्दाची आकृती म्हणजे नेमके काय?"
६) प्रमाणबोली, प्रतिसादांत अधिक विस्तार
७) व्याकरणाचे कार्यकारी रूप म्हणजे नियम, व्याकरणात वर्णमालेचे काम काय, लेखसमाप्ती

 
^ वर