प्रस्तावना :
संस्कृत व्याकरणाच्या अभ्यासकांना सर्वात शिरोधार्य ग्रंथ म्हणजे पतंजलींचे व्याकरणमहाभाष्य. महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत "शब्द म्हणजे काय?" "त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची?" "नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे?" "नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून?" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे "मराठीकरण" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.
या लेखाच्या प्रयोजनांच्या बाबतीत लेखाच्या मर्यादा काय आहेत?
(१) महाभाष्याची ओळख करून देणे. महाभाष्याचे नाव पुन्हापुन्हा बोलून ते साध्य झाले. पण ही ओळख खरीखरची करायची, तर भाषांतर मुळपाठ्याशी अधिक समांतर (जमेल तर शब्दशः) हवे, आणि मी बदलून माझ्या मनाप्रमाणे घातलेले कालबाह्य दाखले उपयोगी पडत नाहीत.
(२) त्या काळातल्या वैयाकरणांना, नव्हे अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे. तशी दृष्टी जिथे प्रकर्षाने जाणवते, तिथे मी मुद्दामून निदर्शनास आणली आहे. पण हेच जर सांगायचे असते, तर चपखल उदाहरणे देऊन वेगळ्या प्रकारे लेख लिहायला हवा होता. थोडी व्याकरणातली, थोडी न्यायशास्त्रातील, थोडी मीमांसेतील, थोडी आयुर्वैद्यकातील अशी चौफेर उदाहरणे द्यायला हवी होती.
(३) तिसरे प्रयोजन हे की मराठीची उदाहरणे देऊन ही चर्चा पूर्ण मराठीमय करायची, इतकेच नव्हे तर आजच्या मराठी भाषेबद्दल भाष्य करायचे. यात सर्व उदाहरणे मराठीतच आहेत, आणि सर्व दाखले आजच्या समाजाला लागू आहेत. पण हेच जर प्रयोजन असते, तर पतंजलींचा ऋणनिर्देश करून, फक्त त्यांची प्रश्नोत्तराची शैली उचलायला हवी होती, आणि स्वतंत्र रचना करायला हवी होती.
या मर्यादा जाणून लेख वाचला तर अनाठायी उत्तुंग अपेक्षांचा भंग होणार नाही, आणि विचारांना चालना देणारे मनोरंजन होईल अशी आशा आहे.
ऋणनिर्देश : गोव्यातील कवळे येथील वैदिक पाठशाळेतील टेंगसे गुरुजींनी संस्कृत व्याकरणाचे मूळ ग्रंथ माझ्या लहानपणी अभ्यासात येण्याला चालना दिली. पुढे व्याकरणाचार्य वा. बा. भागवत गुरुजींनी त्यांच्या पुस्तकातील माझ्या काही शंकांचे व्यक्तिशः निरसन केले. प्राध्यापक अशोक केळकर यांचे लेख वाचलेले आहेत, त्यांच्या मराठीविषयक मतांचा पगडा माझ्या लिहिण्यात दिसला तर मुळीच आश्चर्य नाही. या सर्व शिक्षकांची शिकवण घ्यायला मला थोडाच वेळ मिळाला (कधी केवळ दीड-दोन तासांची गाठभेट), आणि स्वतःचे गैरसमज करून घ्यायला वर्षानुवर्षे मिळाली. इथे ज्ञानात काही बेरीज झाली, तर ते त्या शिक्षकांचे ऋण आहे; काही उणे सापडले तर तो भाग माझ्या अवगुणाचा मानावा.
अनुक्रमणिका
१) शब्द म्हणजे काय
२) शास्त्र शिकायची प्रमुख प्रयोजने, प्रतिसादांत व्याकरणकारांची कार्यप्रणाली
३) शास्त्र शिकायची अन्य प्रयोजने
४) नियम आणि अपवाद, प्रतिसादांत "शुद्ध" भाषा बद्दल देवाणघेवाण
५) व्याकरणाचे प्रमाण म्हणजे लोकभाषा, प्रमाण बोली, नियमांसाठी कस, प्रतिसादांत "शब्दाची आकृती म्हणजे नेमके काय?"
६) प्रमाणबोली, प्रतिसादांत अधिक विस्तार
७) व्याकरणाचे कार्यकारी रूप म्हणजे नियम, व्याकरणात वर्णमालेचे काम काय, लेखसमाप्ती
पतंजलींच्या व्याकरण महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत "शब्द म्हणजे काय?" "त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची?" "नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे?" "नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून?" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न उपक्रमावर अन्य ठिकाणी उद्भवले आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे "मराठीकरण" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
***************************************************
॥ ओनामा शब्द-अनुशासनाचा हा ॥
ओनामा हा शब्द येथे सुरुवात या अर्थी वापरला गेला आहे. आणि सुरुवातीचा मंगल शब्द म्हणून वापरला गेला आहे. शब्दांच्या अनुशासनाच्या म्हणजे व्यवस्था लावणार्या शास्त्राचा प्रस्ताव येथे सुरू करत आहे.
आक्षेप : कोणते हे शब्द?
उत्तर : बोली आणि लेखी शब्द. (मुळात लोकवापरातले आणि वेदातले शब्द) बोली - बैल, घोडं, मोटार. लेखी - ओम् नमो जी आद्या, हृदयाची स्फूर्ती, आम्ही भारताचे नागरिक, वगैरे.
आक्षेप : "बैल" याच्यात शब्द कुठला?
(आक्षेप चालू) हे जे शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेले, तेच का?
आक्षेप-विरोध : नाही, ती पदार्थ वस्तू आहे.
आक्षेप चालू : मग हे जे हलते, डुलते, फुरफुरते आहे, तो शब्द आहे काय?
आक्षेप-विरोध : नाही, तिला क्रिया म्हणतात.
आक्षेप चालू : मग हे जे पांढरे, काळे, करडे, तांबूस आहे, ते शब्द आहे काय?
आक्षेप-विरोध : नाही, त्याला गुण म्हणतात.
आक्षेप चालू : मग यामध्ये जे तोडून तुटत नाही फोडून फिटत नाही, आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकसारखे दिसते, तो शब्द काय?
आक्षेप-विरोध : नाही, त्याला आकृती म्हणतात.
आक्षेप सारांश : तर मग शब्द म्हणजे आहे तरी काय?
उत्तर : ज्याचा उच्चार केला की शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेल्या जनावाराचा बोध होतो, तो शब्द. किंवा, ज्याने पदार्थाचा बोध होतो त्या ध्वनीला शब्द असे म्हणतात. लोक म्हणतातच ना - काहीतरी शब्द बोल, त्याला शब्द फुटेना, आमचा बाळ शब्द बोलतो, वगैरे. हे सगळे ध्वनी केल्याबद्दलच. तसला ध्वनी म्हणजे शब्द.
(पुढच्या वेळी येथपासून सुरू करेन :)
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे?
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
त्या काळात जे "ब्राह्मणाला योग्य" मानायचे, ते आपल्या काळात "सुशिक्षित माणसाला योग्य" असे मानायला काही हरकत नसावी. पुष्कळ ठिकाणी तसा आधुनिक अर्थ बर्यापैकी पटणारा निघतो. माझ्या मराठीकरणात तो तसा केला आहे.
*****************भाग २**************************
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे?
उत्तर : रक्षण, वाक्यबदल, शिक्षण, लघु-उपाय, आणि असंदिग्धपणा, हे मुद्दे प्रयोजने म्हणून एक-एक करून सांगतो.
"रक्षण" (मुळात वेदांचे उच्चार आणि अर्थासह रक्षण) आपल्या भाषेत कितीतरी उत्कृष्ट कलाकृती गुरुशिष्यांच्या मौखिक परंपरेतूनच सांगितलेल्या आहेत. त्यांचे रक्षण झाले पाहिजे.
आक्षेप : पण ध्वनिमुद्रण आणि लेखन पुरणार नाही काय?
उत्तर : नाही, मूळ उच्चारात आणि अर्थामध्ये, विशिष्ट बोलीच्या संदर्भाने, काही खुबी असतात. त्या गुरूकडून शिष्याकडे थेट गेल्या पाहिजेत. भाषेत उच्चारांची सरमिसळ, आणि उच्चारात बदल होतो. तो कधी इष्ट असतो, कधी अनिष्ट असतो. अशा लांब परंपरेत कलाकृतीचा -हास होऊ नये, शब्दाच्या उच्चारात, हेल काढण्यात काय अर्थ भरलेला आहे, ते परंपरेत कळत राहावे, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.
"वाक्यबदल" (मुळात : कर्मकांडे करताना वेदांच्या मंत्रात, आपल्या कार्याला योग्य करून घेण्यासाठी थोडे पण नेमके बदल करावे लागतात, त्याबद्दल) करारपत्रे, निविदा सूचना, वगैरे तयार करण्याची एक अगदी काटेकोर भाषा असते. पुढे विवाद होऊ नये, म्हणून वकिली पुस्तकात सांगितलेल्या नमुन्यात जशी आहे, तशीच भाषा ठेवावी लागते. पण त्या-त्या अशिलाला योग्य, किंवा स्वतःला लागू असे वाक्यबदल करावे लागतात. त्या "नमुनेदार" वाक्यांत फक्त स्त्री/पुरूष, एक व्यक्ती की अनेक, असे बदल नीट करायला शब्दांचे व्याकरण शिकावे लागते.
"शिक्षण" (मुळात : ब्राह्मणाला वेदांची सहा अंगे, पैकी एक व्याकरण, शिकणे भाग आहे, त्याबद्दल.) शालेय शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय माणसाला समाजात सन्मानाने वावरता येत नाही. शालेय विषयांपैकी एक व्याकरण होय, म्हणून ते शिकावे.
"लघु-उपाय" : सुशिक्षित माणसाला शब्दांचे ज्ञान जरूर असावे. शब्दांची वर्गवारी लावल्यामुळे शब्दज्ञानाचा पसारा आटोपशीर होतो, म्हणून शब्दांचे व्याकरण शिकावे.
"असंदिग्धपणा" यासाठी व्याकरण शिकावे. (मुळात : एका विशिष्ट यज्ञाच्या सामग्रीसाठी "लठ्ठ ठिपक्यांची कालवड हवी" असे म्हटले आहे. लठ्ठ ठिपके की लठ्ठ गाय, उच्चारावरून कळते, त्याबद्दल.) "पुरणपोळीचा बेत आहे, पाठवून द्या", असे गिर्हाईक म्हणतो. म्हणजे पुरण आणि पोळीचा, की पुरणाच्या पोळीचा? त्या दोन अर्थांत उच्चाराचा (स्वराच्या चढ-उताराचा) फरक असतो, हे माहीत असले तर आचार्याला शंका राहत नाही, आणि योग्य पदार्थ तो गिर्हाइकाकडे पुरवतो.
(विशेष : स्वतःला काही बोलायचे असले तर मराठी स्वभाषक व्याकरण शिकल्याशिवाय बोलू शकतो. वरच्या प्रयोजनांत कुठल्या ना कुठल्या बाबतीत शिकणारा दुसर्यांच्या शब्दप्रयोगाच्या अधीन असतो. म्हणून ही प्रयोजने पतंजलींनी वेगळी काढली असावीत. दुय्यम प्रयोजनांची यादी पुढे देत आहे. पुढचा भाग असा सुरू होईल -)
उत्तर (पुढे चालू) : आणखी प्रयोजने हवीत काय - वाटेल तेवढी घ्या! ही पुढची एक-एक करून सांगतो -
या भागासाठी तीन गोष्टींची खूप गरज होती : (१) मराठीतील संतवाङ्मयापासून ललित वाङ्मयापर्यंत सखोल व्यासंग, (२) मराठीतील ऐतिहासिक आणि कायद्याचे दस्ताऐवज, वृत्तपत्रकारिता यांचे उत्तम ज्ञान, आणि (३) मुद्देसूद विनोदबुद्धी. वाचकाने विनोदबुद्धी स्वत:हून आणली तर यातील एकषष्ठमांश गरजा तरी भागतील.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ३**************************
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे? (पुढे चालू)
उत्तर (पुढे चालू) : आणखी प्रयोजने हवीत काय - वाटेल तेवढी घ्या! ही पुढची एक-एक करून सांगतो -
परप्रांतीयांचे मराठी, दुष्ट शब्द, निर्जीव शब्द, असंबद्ध बोलणे, इश्श, हारी पडलो आता, प्रायश्चित्त, अकार चरण युगुल, आम्हां घरी धन, जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी, चावुण्डराजें, चार स्थळे, कुणी हीस पाहोनि
(मुळात : असुर लोक मंत्र म्हणताना चुका करतात म्हणून त्यांचा यज्ञ फसतो.) परप्रांतीयांचे मराठी - हुबळीहून आलेली सून, विरहात म्हणे "आमचे नवरे गेले", पांचाळी पाचही संपले का? परप्रांतीयांना मराठीत आदरार्थक बोलण्याचे नियम, "गेले" एका विशिष्ट प्रकारे म्हटले की "वारले" असा अर्थ होतो, असे बारकावे कळत नाहीत. मराठी माणसाशी कामापुरते बोलायची मारामार, मनातले बोलून सांगणे कठीण जाते. मराठीभाषकांचे आपापसात असे होऊ नये. म्हणून भाषेतले बारकावे शिकावे.
दुष्ट शब्द - (मुळात : इंद्राला मारायला यज्ञ करून वृत्राला जन्माला घातला, पण यज्ञातला एक शब्द चुकल्यामुळे इंद्राने वृत्राला मारले.) आनंदीबाईने मुद्दामून ध चा मा केला काय, आणि रघुनाथरावाने चुकून केला काय, राजाज्ञेतील दुष्ट शब्दाने खून होणारच. अनवधानानेही महत्त्वाच्या ठिकाणी चुकीचा शब्द बोलला जाऊ नये. म्हणून शब्दांचे ज्ञान शिकावे.
निर्जीव शब्द - लेखी (मुळात वेद) शब्द वाचताना कुठे जोर द्यायचा, कुठे हेल द्यायचा ते माहीत नसले, तर वाचलेले शब्द सरदलेल्या काडीसारखे मुळीच पेट घेत नाहीत. लेखीचा प्रकट बोलीशी संबंध कळावा म्हणून व्याकरण शिकावे.
असंबद्ध बोलणे - सभांमध्ये लोकांना आपल्याबाजूने जिंकायचे असेल, तर चतुर लाघवी शब्दच तो विजय मिळवून देतात. असंबद्ध अपशब्द बोलणे पराजय देते. म्हणून शब्दांवर प्रभुत्व मिळवावे.
इश्श - बायकांच्यात इश्श, गडे, वगैरे म्हणतात. लहान बाळे एकएक अक्षर दोनदा बोलून अर्थ समजतात आणि बोलतात दुदू, शिशी, वगैरे. भाषेच्या या लकबी कुठे कोणाशी ठीक ते जाणले पाहिजे, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे. (मुळात : पुरुषांनी बायकी आणि बालिश लकबी वापरू नयेत असे उदाहरण.)
हारी पडलो आता - नागपुरात एकटी राहाणारी बाई एकटे असल्याची भीती दूर व्हावी म्हणून दुर्गेचे व्रत करते. ती देवीच्या आरतीत म्हणते "हारी पडलो आता संकट निवारी". हे एक तर कोरडे पाठांतर आहे, नाहीतर पुरुष कवीच्या दृष्टीतून विचार. दुसरी बाई म्हणते "हारी पडले आता संकट निवारी". ही बहुधा स्वत:च्या मनातले बोलते आहे. (मुळात एका विशिष्ट मंत्रातल्या बदलाबद्दल सांगितले आहे.)
प्रायश्चित्त : (मुळात चुकीचे शब्द बोलून पाप लागते, त्यासाठी सारस्वती नावाचे प्रायश्चित्त करावे लागते. नको ते, असे.) लिहिलेल्यात चूक झाली तर शुद्धीपत्र करून द्यावे लागते, व्यापाराच्या कागदपत्रात चूक झाली तर नुकसानभरपाई करावी लागते. त्या चुका होऊ नये, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.
अकार चरण युगुल - अकार चरण युगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें । (ज्ञानेश्वरी १.१९)
शब्दांत आणि ध्वनींमध्ये एक प्रकारचे गूढ आध्यात्मिक आकर्षण आपल्याला जाणवते. आपल्याला ध्वनींचे विश्लेषण करावेसे वाटते. म्हणून शब्दाच्या ध्वनींबद्दल शिकावे.
आम्हां घरी धन -
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
म्हणून शब्दांचे ज्ञान मिळवावे.
जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी -
जैसी पुष्पांमाजी पुष्पमोगरी । कीं परिमळामाजी कस्तूरी ॥ तैसी भाषांमाजी साजिरी । मराठी या ॥
म्हणजे बाकी भाषाही त्यांच्यात्यांच्या ठिकाणी सुंदर असोत, त्यांची अस्मिता ती त्यांची, मराठीची अस्मिता आणि खास सौंदर्य मराठीचे. कोणी बाकी भाषांमधील शब्दांचा अभ्यास करत असेल तर करो बाबडा. मराठीचाही अभ्यास झाला पाहिजे खास.
आक्षेप : बरे तर, पण सांगा की हे पद्य कोणी रचले?
उत्तर : फादर स्टीफन्स नावाच्या इंग्रज पाद्रींनी रचले. मूळ भाषा इंग्रजी, पोर्तुगीज, येत असून ते मराठी, कोकणी आणि कन्नड मध्ये प्रवीण झाले. इतक्या भाषांमध्ये त्यांना मराठीचे सौंदर्य जाणवले, हे विशेष.
आक्षेप : वाटेल त्या इंग्रज साहेबाचे स्वीकाराल काय? मग काय - मेकॉले लाटसाहेब म्हणे की हिंददेशातल्या सगळ्या व्हर्न्याक्युलर भाषा दरिद्री आणि ओबडधोबड आहेत - तेही मानून घ्या.
उत्तर : मेकॉले चे मत साम्राज्याच्या प्रौढीतून आलेले आहे. त्यास विचारात घेण्याची काही गरज नाही. पण मराठीचा सखोल व्यासंग असलेल्या परकीयाचे मत ग्राह्य असावे.
चावुण्डराजें - चावुण्डराजें करवियलें
गोम्मटेश्वराच्या पायापाशी हजारावर वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आहे. आपल्या मराठी पूर्वजांची स्मृतिचिह्ने आपल्याला समजावीत, आणि आपली स्मृतिचिह्ने पुढच्या पिढ्यांना समजावीत, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.
चार स्थळे -
(चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः ।
गुहा त्रीणि निहिता नेङ्गयति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति ॥ ऋग्वेद १.१६४.४५)
वाणीची असतात चार म्हणुनी ज्ञाते स्थळे जाणती ।
पैकी तीन लपून आत, चवथी सुस्पष्ट जी बोलती ॥
वाणीचे चार टप्पे असतात. फक्त सिद्ध योग्यांना अवगत असते ती "परा", आपल्याला काही बोलायचे आहे त्या अर्थाची जाणीव "पश्यन्ती", तिचे शब्दरूपांशी संबंध साधणारी "मध्यमा". या तीन वाणी आतमध्ये लपलेल्या असतात, त्या दिसत नाहीत. फक्त चवथी "वैखरीच" कंठस्वराने बोलली जाते. हे नीट समजतात ते खरे ज्ञानी. म्हणून शब्द, अर्थ, वगैरे यांचा अभ्यास करावा.
कुणी हीस पाहोनि -
(उत त्वः पश्यन्न ददर्श वाचमुत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम् ।
उत त्वस्मै तन्वं विसस्रे जायेव पत्य उशती सुवासा: ॥ ऋग्वेद १०.७१.४)
कुणी हीस पाहोनि मुळी न पाही ।
दुजा वाणि ऐकोनि ऐकीत नाही ।
स्वामीस प्रकटून गूढार्थ राही ।
वस्त्रांस ढाळून कामातुरा ही ॥
जो तिच्याकडे नीट लक्ष देत नाही त्याला भाषा दिसून दिसत नाही, ऐकून ऐकू येत नाही. तिच्या स्वामीपुढे मात्र ती झाकणारी वस्त्रे सोडून आपले सौंदर्य दाखवण्यास आतुर असते. आपल्यापुढे तिचे सौंदर्य प्रकट व्हावे म्हणून तिच्यावर प्रभुत्व मिळवावे.
आक्षेप : ही सगळी प्रयोजने ज्याला व्याकरण नाहीतरी शिकायचे आहे त्याच्यासाठी ठीक आहेत. पण अक्षराला अक्षर लावून जमेल तितकी पुस्तके वाचणारे असतात (अक्षराला अक्षर जोडून वेद वाचणारे असतात), त्यांच्यासाठी प्रयोजने का नाही सांगत?
उत्तर : खरे आहे तुमचे म्हणणे. पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेची आधी शब्दरूपे शिकत, मग ग्रंथ वाचत. आजकाल मराठीत लोक पुस्तके बेधडक वाचतात. मग म्हणतात "बोली भाषा आम्ही लोकांत बोलून शिकलो, लेखी भाषा पुस्तके वाचून आम्हाला कळते, व्याकरणाचे काय काम? त्यांच्यासाठी व्याकरणाच्या आचार्यांनी केवळ मित्र होऊन म्हटले आहे, या शास्त्राचा अभ्यास करून ते रचण्याची आमची आपली ही प्रयोजने आहेत.
(विषय बदलण्यापूर्वी सारांश)
शब्द सांगितला. त्याचे स्वरूप सांगितले. प्रयोजने सांगितली.
(पुढचा भाग असा सुरू होईल :)
आक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे?
या भागात नियम आणि अपवाद म्हणजे काय ते सांगितले आहे. खरे तर हे फक्त व्याकरणाला लागू नाही. पूर्ण विज्ञानालाच लागू आहे. कुठल्याही अभ्यासात तथ्यांची एक मोठी रास आपल्यापुढे साचलेली असते. नियम/अपवाद करून आपण त्या सर्व तथ्यांचे वर्गीकरण करतो. असे नियम जर करता आले तर त्यायोगे आपण ती तथ्यांची पूर्वी अस्ताव्यस्त रास "समजलो" असे म्हणू शकतो.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ४**************************
आक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे? मराठीत चालतील त्या शब्दांचे की चालणार नाहीत त्या शब्दांचे? का दोन्हींचे?
समाधान : कुठल्याही एकाच प्रकारच्या शब्दांविषयी सांगितले तर पुरते. दोन्हींबद्दल सांगायची गरज नाही. जसे "काविळीची साथ चालू असताना उकळलेले पाणी प्यावे," असा नियम आहे. म्हणजे न-उकळलेले पाणी पिऊ नये असे वेगळे सांगावे लागत नाही. "योग्य सोपस्कार न केलेली किंवा मांस खाणारी जनावरे खाऊ नये," असा नियम सांगितला म्हणा. तर मांस खाणारी कुत्री, मांजरे वगैरे जनावरे खाता येत नाहीत ते कळतेच. पण यज्ञ वगैरे सोपस्कार केलेली शाकाहारी जनावरे, म्हणजे बोकड, ससे, गुरे वगैरे, ही सर्व जनावरे खाता येतात, तेही कळते. तसेच बैल हा शब्द समजावला तर (मराठी प्रांताबाहेर करतात ते उच्चार) बॅल, बएल, बेल, बोईल हे सगळे चालणार नाही असे कळते. आणि सर्व न चालणारे उच्चार सांगितले, तर बैल असा योग्य उच्चार चालतो, हे आपोआप समजते.
आक्षेप : तर मग चालणार/न चालणार यांपैकी कुठले सांगणे उजवे?
समाधान : सुटसुटीतपणासाठी जे शब्द चालतात, तेच सांगणे बरे. कारण प्रत्येक शब्दाची कितीतरी अप-रूपे आहेत.
आक्षेप : बरे, तर जे शब्द चालतील त्यांची एक-एक करून यादी पाठ करावी लागेल काय? म्हणजे, बैल, घोडं, मोटार, वगैरे?
समाधान : नाही. एक-एक शब्दाचा उच्चार करून तो पाठ करणे जमायचे नाही. अशी कथा आपण ऐकलेली आहे - "बृहस्पतीने इंद्राला एक-एक शब्द एक हजार दिव्य वर्षांपर्यंत समजावून सांगितला, आणि तरी शब्दभांडार संपले नाही." बृहस्पतीसारखा गुरू, इंद्रासारखा शिष्य, आणि अभ्यासासाठी सहस्र दिव्य वर्षांचा अवधी, तरी जमले नाही. मग आजमितीच्या आपणां लोकांचे काय घ्या! मोजूच या. जगून जगून खूप जगलो, तर जगू शंभर वर्षे. विद्येचे चार टप्पे असतात - १. गुरूकडून ती शिकावी, २. आपणहून तिचे मनन करावे, ३. आपल्याला जे समजले ते दुसर्यांना शिकवावे, आणि ४. विद्या व्यवहारात आणावी. इथे अख्खे आयुष्य ती फक्त गुरूकडून शिकण्यात खपेल! म्हणून एक-एक शब्द पाठ करून जमणार नाही.
आक्षेप : मग हा शब्द नावाचा प्रकार शिकावा तरी कसा?
समाधान : अनेक शब्दांचे जर एकासारखे काही लक्षण असेल, तर ते सांगावे. मग ज्या-ज्या शब्दांचे त्यावेगळे लक्षण आहे तेवढेच वेगळे सांगावे. अशा प्रकारे थोडाच प्रयत्न करून शब्दांच्या मोठ्या राशीची वासलात लागेल.
आक्षेप : "सामान्य लक्षण" आणि "त्यावेगळे लक्षण" म्हणजे व्याकरणशास्त्रात काय म्हणतात?
समाधान : सामान्य लक्षण "नियम" म्हणून सांगायचे. त्यावेगळे लक्षण "अपवाद" म्हणून सांगायचे.
आक्षेप : आता कुठल्यातरी लक्षणाबाबत नियम तो कुठला आणि अपवाद तो कुठला समजायचा?
समाधान : त्यातल्या त्यात जो प्रकार जास्त प्रमाणात दिसतो, त्याला नियम म्हणायचे. जो प्रकार कमी प्रमाणात दिसतो, त्याला अपवाद म्हणायचे. उदा :
पड-तो, पड-ला
वाढ-तो, वाढ-ला
कळ-तो, कळ-ला
बोल-तो, बोल-ला
अशा शब्दांच्या जोड्यांत सुरुवातीचा ध्वनी न बदलण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीचा ध्वनी बदलत नाही असा नियम मानावा.
जा-तो, गे-ला
ये-तो, आ-ला
जोड्या पूर्वीसारख्याच, पण सुरुवातीचा ध्वनी बदलला. हे अपवाद म्हणून सांगायचे.
आक्षेप : आता नियम आणि अपवाद करताना, आपण शब्दांच्या वर्गांबद्दल बोलत असतो, की एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल?
समाधान : सोयीनुसार असेल. शब्दांच्या वर्गांबद्दल नियम, अपवाद सांगावेत, नाहीतर एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल.
(पुढचा भाग असा सुरू होईल :)
आक्षेप : आता सांगा, शब्दाला व्याकरणशास्त्रावेगळे नित्य अस्तित्व असते काय?
हा भाग जरा लांब लिहिलेला आहे. पण यात तीन मोठ्या चर्चा करण्यालायक कल्पना आहेत.
पहिली ही की व्याकरणाचा पाया लोकांतली भाषा आहे. व्याकरण शब्दांत अर्थ भरत नाही, तो संबंध लोकांना व्याकरणाशिवाय कळतो.
दुसरा विषय पुष्कळांना जिव्हाळ्याचा आणि पोटतिडकेचा आहे. इथे पहिल्यांदाच मी पतंजलींच्या चर्चेचे निमित्त करून "प्रमाण बोली" या विषयाला हात घातला आहे. पण "प्रमाण" बोली असे न म्हणता "महाराष्ट्रभर वावरायचे असेल, आणि सगळ्या ठिकाणी लोकांना प्रशस्त वाटेल असे बोलायची पद्धत" असा प्रयोग केला आहे. मराठीच्या सर्व बोली त्यांच्या विवक्षित नियमांनुसार शुद्धच असतात. आपली-आपली बोली कळत असली तरी आपणा सर्वांना जोडणारी बोली जाणावी असे माझे मत लिहिले आहे.
तिसरी कल्पना ही, की व्याकरणाचे प्रस्तावित नियम वापराच्याच कसाला लावावे लागतात.
या भागात मुळातल्या आक्षेपकर्त्यात आणि उत्तर देणार्यात थोडी भांडाभांडी आहे. वादातही थोडे बारकावे आहेत. म्हणून भाषा थोडी क्लिष्ट झाली आहे. तरी पारिभाषिक संज्ञा कसोशीने टाळल्या आहेत. राजहंसाचा डौल नसला तरी या कवण्याचे चालणे चालवून घ्या!
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ५**************************
आक्षेप : आता सांगा, शब्दाला व्याकरणशास्त्रावेगळे नित्य अस्तित्व असते काय?
उत्तर : दोन्ही प्रकारे वेगवेगळ्यांनी शास्त्र शिकवले आहे : (१) शब्द हे व्याकरणशास्त्राच्या आधीपासून नित्य आहेत, आणि (२) शब्द हे व्याकरणशास्त्र सांगते म्हणून बनतात. पण आपले शास्त्र कशा प्रकारे लिहिले आहे, ते बघू.
कात्यायन आचार्य म्हणतात -
*सिद्धच आहे शब्द-अर्थ-संबंध*
आक्षेप : इथे सिद्ध म्हणजे काय?
उत्तर : सिद्ध म्हणजे नित्य. कसे कळले म्हणता? लोक हा शब्द त्याच अर्थी वापरतात. जे अबाधित सत्य आहे, त्याला "सिद्ध" म्हणतात.
आक्षेप : छे हो! प्रयत्न करून जे साधते, त्याला सिद्ध म्हणतात. म्हणत नाहीत का "पुराव्याने सिद्ध करून दाखवीन!" कदाचीत कात्यायन आचार्यांना म्हणायचे असेल की शब्द व्याकरणाच्या खटाटोपाने सिद्ध करावे लागतात.
समाधान : "सिद्ध" हा शब्द "नित्य" या अर्थाने व्याडि-आचार्यांनीही वापरलेला आहे. इथेही तसेच आहे. नाहीतर "सिद्धच आहे, साध्य नाही", किंवा "आधीच सिद्ध आहे" असे थोडक्यात एकाच "सिद्ध" शब्दाने सांगायचे असेल. अहो म्हणतात ना? "अर्थ संदिग्ध वाटला तर शिष्यपरंपरेत विचारा, कारण तो संदिग्ध ठेवला तर गैरसमज होतो." त्या परंपरेतून कळते आपल्याला की "सिद्ध" म्हणजे "नित्य".
आक्षेप : हा कसला द्राविडी प्राणायाम? सरळ सरळ "नित्य"असाच शब्द का नाही वापरला? हा तर फाजील संदिग्धपणा आहे.
समाधान : "सिद्ध" शुभ शब्द आहे, म्हणून तो कात्यायन आचार्यांच्या ग्रंथातला पहिला शब्द आहे. शुभशब्दाने सुरू झालेली शास्त्रे सांगणार्याला विजयी करतात, दीर्घायुषी करतात, आणि या शुभकामना देतात, की शिकणार्याच्या ही आकांक्षा "सिद्ध" होवोत.
उत्तर (पुढे चालू) : आणि शिवाय, "नित्य" असा शब्द लिहिला असता तरी शंका राहिल्याच असत्यात. "खूपच" किंवा "सारखेसारखे" असाही "नित्य" शब्दाचा अर्थ आहे. म्हणतात ना "याचे हसणे आणि बडबडणे नित्याचेच झाले आहे." काही करून शंका निघणारच होती - आणि मूळ अर्थ शिष्यपरंपरेतच विचारावा लागणार होता. म्हणून दोहोंपैकी "सिद्ध" हा मंगल शब्दच निवडला.
आक्षेप : बरे तर बरे. या आचार्यांच्या "सिद्ध आहे..." वाक्याचा या ठिकाणी काय संदर्भ लावायचा?
उत्तर : संदर्भ हा, की शब्द आणि अर्थ यांच्यामधला संबंध नित्य, म्हणजे व्याकरणाच्या आधीपासूनचा असला, तर नियम आणि अपवाद हे शब्दाच्या स्थायी आकृतीबद्दल केलेले आहेत, प्रत्येक उच्चाराबद्दल नव्हेत.
आक्षेप : आकृती स्थायी आहे असे कसे म्हणता? सोन्याची साखळी मोडून कानातले डूल बनवले, ते मोडून वळे बनवले, ते मोडून आंगठी. आकार तर सारखे बदलतात, मूळ सोने ते बदलत नसते. तसा शब्दोच्चारात बाहेर पडणारा आवाज तेवढा नित्य असतो.
उत्तर : नाही. आकृती नित्य असते. एक सोन्याचे वळे मोडले, तरी वळे ही आकृती दुसर्या एका सोनाच्या तुकड्यात दिसते. आकृती म्हणजे त्या वस्तूचे तत्त्व, तिचा "वस्तूपणा".१
आक्षेप : बरे मग शब्द-अर्थाचा संबंध नित्य आहे हे कशावरून समजते?
*लोकांकडून* (कात्यायन)
लोकांमध्ये अर्थ एकमेकांना सांगायचा म्हणून शब्द वापरतात. शब्द उत्पन्न करायला त्यांना मोठा प्रयत्न करावा लागत नाही. मडके वापरण्यापूर्वी, माणसाला कुंभाराकडे जाऊन "मडके करून दे" म्हणून ते करवून घ्यावे लागते. शब्द वापरण्यापूर्वी कोणी व्याकरणकाराकडे जाऊन "शब्द बनवून दे" म्हणून जात नाही.
आक्षेप : अहो, जर लोकात अर्थ सांगण्यासाठी वापरतात तेच प्रमाण आहे तर मग शास्त्राची काय गरज?
*लोकांत अर्थासाठी शब्द वापरले जात असले तरी "बरे काय दिसते" तो बोलण्याचा प्रकार सांगण्यासाठी शास्त्र सांगतात.* (कात्यायन)
महाराष्ट्रभर वावरायचे असेल, आणि सगळ्या ठिकाणी लोकांना प्रशस्त वाटेल असे बोलायचे असेल म्हणा. तर कसे बोलायचे, असे अर्थपूर्ण शब्दांचे ही वर्गीकरण करावे लागते, म्हणून शास्त्र सांगतात. (मुळात "धर्मनियम" लावण्यासाठी असे प्रयोजन दिले आहे. ही पापपुण्याची गोष्ट आहे असे वाटते. पण पुढे उदाहरणे ही दिली आहेत. त्यातून असे दिसते की त्याकाळच्या "सभ्य लोकांत" बरे काय दिसेल असा पाप-पुण्याचा अर्थ लावता येतो. संस्कृत व्याकरणाच्या बाबतीत "धर्म" चा असाच आशय टि. म. विद्यापीठाचे माजी मुख्य आणि व्याकरणाचार्य वा. बा. भागवत गुरुजी सांगतात.)
*जसे की लोकांच्या रोजच्या वागण्यात आणि (वेदांत) सणासुदीच्या रीतिरिवाजात दिसतेच*
उदाहरणार्थ रोजची भूक शमवायची असेल वाटेल ते मांस खाऊन भूक शमवता येते. तरी महाराष्ट्रभर म्हणावे तर कुठले मांस खाल्ले तर बरे दिसते, आणि कुठले मांस खाल्लेले बरे दिसत नाही, त्याचा नियम सांगतात. जंगलाजवळ राहाणार्यांत मोराचे मांस खातात तरी शहरी संस्कृतीत ते खाल्लेले लोकांना आवडत नाही. आणखी उदाहरण द्यायचे तर बघा, एखादा पुरुष कामवासना कुठल्याही स्त्रीबरोबर भागवू शकतो. पण तिथेही सभ्य लोकांत काय चालते त्याचे नियम असतात.
(टिप्पणी : ही उदाहरणे थोडी अतिरेकी वाटतात. पण भाषा "सभ्य" वाटली नाही तर लोक गुणी व्यक्तीचे ही अवमूल्यन करतात. हे "ती फुलराणी" नाटक बघताना बहुतेक प्रेक्षकांना पटते. एखाद्या स्थानिक शैलीतले नाटक महाराष्ट्रभर खूप अपवादाने चालते. तिकीट विकत न घेता दूरदूरचे मराठी प्रेक्षक अशा नाटककंपनीच्या पोटातच नाही का लाथ घालत? सोपानदेव चौधरींनी म्हणे भीतभीत आपल्या आईच्या कविता लोकांना दाखवल्या. लोकविलक्षण प्रतिभेच्या होत्या म्हणून बहिणाबाईंना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. आडगावच्या बोलीत "लोकविलक्षण" नसल्या तरी चांगल्या कविता असत्या, तर महाराष्ट्राने त्यांचा "दुर्लक्ष" नामक भयंकर अपमान केला असता. सोपानदेवांच्या सुरुवातीच्या भीतीत हेच ज्ञान होते, असे वाटते. हा सगळा विचार करता, आता दिलेले दृष्टांत इतके काही अतिरेकी वाटत नाहीत. शिवाय पुढे असे दिसते की भाष्यकार संस्कृताच्या दूरदूरच्या बोली "चालतील" अशापैकीच मानतात, "अधर्म" नाही मानत.)
नाहीतर सणासुदीच्या नियमांबाबत बघूया ना - होळीला पुरण, संक्रांतीला तिळगूळ, आवसेला दिवे, असे गोडाचे करायची प्रथा आहे. त्याऐवजी शेवयांची खीर केली म्हणून काय तोंड गोड व्हायचे राहाणार आहे? तरी आपण प्रथा पाळतो, त्यात आपल्याला महत्त्व वाटते. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण आपण लावतो. फणसाच्या पानांचे लावले तर काय वाईट दिसणार आहे? तरी त्या संदर्भात आपण आंब्याची पानेच निवडतो. बर्थडे साजरा करताना केक कापताना एक विशिष्ट गाणे म्हणतात. नाही म्हटले, किंवा दुसरे कुठलेतरी गाणे म्हटले तरी काप पडणारच. पण ते गाणे म्हटल्यामुळे त्या समारंभाची अपेक्षित रंगत आणि आनंद मिळतो. (मुळातही वेदांतली उदाहरणे तशी सौम्यच दिली आहेत. खरेच आहे - सणासुदीचे पाप-पुण्य, आनंद, याबाबतच्या प्रथा पाळल्या न पाळल्या म्हणून खूप मोठा फायदा-नुकसान होत नाही. पण ज्या लोकांशी आपल्याला रोजचे व्यवहार करायचे असतात, त्यांनी दुर्लक्ष केले तर पोटापाण्याचे हाल होऊ शकतात.)
उदाहरणांबाबत सारांश : याच प्रकारे लोकांत अर्थपूर्ण वापरले जाऊ शकणारे सगळे शब्द असले तरी "बरे काय दिसते" असा नियम शास्त्र करते. त्यानेच माणसाची भरभराट होते.
(टीप : आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने बघायचे तर महाराष्ट्राच्या सर्व बोलींचा अभ्यास त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी "शुद्ध" अशाच प्रकारे व्याकरणाचे अभ्यासक करतात. पण बरेच अभ्यासक महाराष्ट्रभर वावरणारे लोक एकमेकांत जसे बोलतात त्याचा अभ्यास करतात. त्यांच्या अभ्यासाचा जास्त लोक उपयोग करून घेतात, कारण त्या वर्णनाच्या उपयोगाचे क्षेत्रही मोठे असते. व्याकरण सांगितल्याशिवाय लोकांत मुळातच शब्द आणि अर्थाचा संबंध ठरलेला असतो, हे एक. आणि व्याकरणातले प्रमाण लोकात काय चालते, आणि काय प्रतिष्ठा देते, असे दुसरे. ही किती उंच वैज्ञानिक उडी त्या काळातल्या आचार्यांनी घेतली होती, त्याचा आचंबा वाटतो. त्यांनी भाषा पाप-पुण्याची वापरली, हे खरे, पण दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच्या काळाला आजचे निकष लावायला गेलो, तर तो आपल्याकडून अतिरेक होईल.)
(व्याकरणाच्या नियमातून कधीच न ऐकलेले शब्द कधीकधी तयार होतात त्याबद्दल चर्चा)
*कधीच न वापरले गेलेले शब्दही आहेत* (कात्यायन)
आक्षेप : अहो, तुमच्या नियमांतून असेही काही शब्द निघतात की जे कधी वापरात ऐकलेले नाहीत, आणि कधी लेखी वाचलेले नाहीत. उदाहरणार्थ ओगरण्याचसाठीच्या, भोगस, अनुमानले वगैरे.
प्रतिप्रश्न : असे असले म्हणून काय मोठा तोटा झाला?
आक्षेप चालू : तुम्हीच तर म्हणालात की लोकांच्या वापरातून हे कळते की आपल्या भाषेत अमुक शब्द चालतो की नाही. कारण तुम्हीच शब्द व्याकरणाआधी नित्य असतात असे म्हणालात. आता तुमच्या शास्त्रातून हे "चालतील" असे कळते, पण हे तर कधी लोकांत ऐकले किंवा लेखी दिसले नाहीत, "चालतील" म्हणून ठरवायचे कसे?
आक्षेपकाराशी शब्दच्छल :
अहो, असे कसे परस्परविरोधी वाक्य बोलता. तुमच्याच तोंडून तर आता शब्द बाहेर पडले "ओगरण्याचसाठीच्या, भोगस, अनुमानले" असे, आणि असेही म्हणता की कधी ऐकले नाहीत. भारीच उलटसुलट हो बोलणे तुमचे.
आक्षेपकार आपली बाजू सावरतो :
आम्ही काही उलटसुलट बोलत नाही - "आहेत" म्हणतो म्हणजे "व्याकरणवाले 'आहेत' असे म्हणतात", आणि "वापरात नाहीत" असे म्हणतो तेव्हा "लोकांत वापरात नाहीत" असे म्हणतो. "आम्ही उच्चार केला नाही" असे कुठे म्हटले? काय म्हटले, म्हणता? "लोकात वापरात नाहीत" असे म्हणालो.
आक्षेपकाराशी शब्दच्छल चालू:
तुम्ही काय लोक नाहीत काय?
आक्षेपकर्ता समजावतो :
होय, लोकांमध्ये मीही एक आहे, पण मीच सर्व लोक नाही.
आक्षेपाला उत्तर :
*अजून तसा प्रयोग नाही तरी तशा अर्थासाठी तसा प्रयोग होईल* (कात्यायन)
अहो आम्ही "त्या अर्थासाठी तो शब्द लोक वापरतात, ते व्याकरणाच्या आधी" असे म्हटले होते. लोकांमध्ये तसा अर्थ बोलून दाखवायचा प्रसंग आला पाहिजे ना?
आक्षेप चालू :
*त्या अर्थासाठी वेगळे शब्द आहेत, म्हणून ते वापरात ऐकलेले नाहीत* (कात्यायन)
लोकांत हा अर्थ सांगायला वेगळे सोपे शब्द आहेत, तेच लोक वापरतील. "ओगरण्याचसाठीच्या" नाही म्हणणार, "फक्त ओगरण्यासाठी अशा (पळ्या)" असे म्हणतील; "भोगस" नाही म्हणणार, "भोगायचास" असे म्हणतील. "अनुमानले" नाही म्हणणार, "अनुमान केले" असे म्हणतील.
आक्षेपाचे समाधान :
*"अजून वापरात ऐकले नाहीत, तरी कुठल्यातरी विशेष प्रसंगी वापरतीलही* (कात्यायन)
पुढे कधीतरी दिसू शकेल अशा ग्रहतार्यांच्या स्थितीचा विचार खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, करतातच ना. अजून कधी ग्रहतार्यांची स्थिती दिसली नाही, कदाचीत आपल्या आयुष्यात दिसणार नसेल, तरी ती दीर्घकाळात कधी दिसू शकेल. दीर्घकाळात तसा शब्दप्रयोग अर्थासाठी चपखल असण्याचा प्रसंग निघेल, म्हणून तसे शास्त्र करावेच लागते. (मुळात : कोणाचे आयुष्य पुरणार नाही इतका एक लांबलचक यज्ञविधी शास्त्रात सांगितला आहे, त्याबद्दल.)
*आपल्या गावाबाहेरचेही मराठी आहे ना* (कात्यायन)
हे शब्द वापरणारे दुसर्या कुठल्या ठिकाणी असतील.
आक्षेप :
आम्हाला तर नाही दिसले.
समाधान :
शोधायचा प्रयत्न करा. मराठी बोलणारे खूप लोक आहेत. सहा भूखंडे आणि कित्येक लघुद्वीपांवर पसरले आहेत. खुद्द महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, वगैरे सगळे प्रदेश आणि उपप्रदेश आहेत. आपले स्वर्गस्थ पूर्वज, पृथ्वीवरचे आपण, आणि भावी पिढ्या आहेत. ज्ञानेश्वरी आहे, संतांच्या गाथा आहेत. प्रत्येक गावची वर्तमानपत्रे आहेत, कविता आहेत, कथा आहेत, कादंबर्या आहेत, दिवाळी अंक आहेत, संकेतस्थळे आहेत. तांत्रिक पुस्तके आहेत, शेतसार्याच्या पावत्या आहेत, मसाल्याच्या डब्यावरच्या पाककृती आहेत. हे सगळे असताना, हा असा एक शब्द मराठीत कधी वापरलाच गेला नाही असे म्हणणे म्हणजे मोठे साहस आहे.
आणि या सगळ्या प्रचंड मराठी बोली आणि लेखीच्या पसार्यात काहीकाही प्रादेशिक प्रयोग विशिष्ट अर्थांनी एकेका ठिकाणीच दिसतात. पूर्वेकडे "राहाणे" म्हणजे या क्षणी काहीतरी करत असणे, पण दक्खनी मुलुखात तसे नाही. तिथे ते फक्त कुठल्यातरी स्थितीत टिकून असणे, आणि वस्तीला असणे, या अर्थांनी वापरतात. सीमाप्रदेशात काम करून सोडतात, त्या अर्थाने बाकी महाराष्ट्रात काम करून टाकतात. वाहातुक नियंत्रण करणारे मोटारगाड्या सावकाश हाकायचा सल्ला देतात, तर बहुतेक लोक एकमेकांना कार सावकाश चालवायला सांगतात.
आणि शिवाय, तुम्ही म्हणता त्या उदाहरणांपैकी एक आम्हाला सापडले आहे -
पाहतां पाहतां अनुमानलें । कळतां कळातां कळों आलें । पाहातां अवघेंचि निवांत जाहलें । बोलणें आतां ॥ दासबोध १२.५.२२ (मुळात : आक्षेपकर्त्याने सांगितलेले शब्द वेदांमधल्या कुठल्यातरी ऋचेमध्ये आहेत.)
(टीप : यापेक्षा चांगले उदाहरण पाहिजे.)
(पुढचा भाग असा सुरू होईल)
आक्षेप : आता हे सांगा, की "बरे काय दिसते" ते शब्द जाणण्यात आहे, की तशा शब्दांचा प्रयोग करण्यात आहे?
हा भाग पुन्हा लांबीला लहान लिहिलेला आहे. यातील मुद्द्यांची उपक्रमावर बाकी ठिकाणी ज्वलंत चर्चा होत आहे. ती विचारपूर्ण आणि आवेशपूर्ण मते या लेखाच्या अनुषंगानेही मांडली तर संवादात भर पडेल, म्हणून हा लिहून काढायची घाई केली.
मागच्या भागात प्रमाण बोलीचा उल्लेख सुरू केला त्याच्यावर अजून तरी कोणी क्रोध प्रकट केलेला नाही. म्हणून यावेळी त्याहूनही नाजुक आणि बोचरा मुद्दा हाताळणार आहे. मराठी मुलखाच्या वेगवेगळ्या भागातले सुशिक्षित लोक एकमेकांशी जोड बोली म्हणून वापरतात, (वर्हाडी माणूस कोकणी माणसाशी बोलताना वापरेल) अशी एक "प्रमाण" बोली आहे. ही बहुतेक करून दक्षिण महाराष्ट्रातल्या ब्राह्मण जातीच्या लोकांच्या घरगुती बोलीशी मिळतीजुळती आहे. (या लोकांत त्यांच्याच बोलीत चालतील, पण जोड बोलीत नाही, असे "प्रश्ण" वगैरे उच्चार आहेत, ते थोडेच आहेत).
ही गोष्ट योगायोगाने नसून याला ऐतिहासिक कारणे आहेत : (१) मराठेशाहीच्या रोपट्याचे मूळ दक्षिण महाराष्ट्रात पहिले रुजले. (२) शिवाजी दरबारात राजभाषेचे प्रमाण ठरवायला हणमंते नावाच्या शास्त्र्यास नेमण्यात आले (त्या काळातल्या नावा-आडनावांनी जातही सांगितली जाते.) (३) मावळातल्या आणि आजूबाजूच्या डोंगराळ किल्ल्यांमध्ये मराठेशाहीचे सामर्थ्य असले तरी कृष्णा, भीमेच्या (वगैरे) दक्खनी खोर्यांत तिचे स्थायी वैभव होते. (४) पेशवाईच्या काळातली बलशाली राजधानी पुणे शहर होते, आणि (५) नोकरशाही आणि विद्यार्जनाचा जवळजवळ एकाधिकार पूर्वी ब्राह्मणांकडे होता, हे सगळे खरेच (वगैरे वगैरे, ऐतिहाहिक कारणे संपली नाहीत).
आजच्या बृहन्महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक समान आहे. त्यापैकी बहुतेकांना या ऐतिहासिक कारणांविषयी आपुलकी नसेल आणि कदाचीत तेढही वाटत असेल. मग आज सहज प्रश्न विचारला जाईल - या "प्रमाण" बोलीचा मक्ता दक्खनेकडील ब्राह्मणांकडेच आहे काय? ही त्यांची घरगुती बोली आहे, म्हणून त्यांना अभिमान वाटून बाकी सर्वांना न्यून वाटावे काय? की दुसरी कुठली बोली (गडचिरोलीची म्हणू) ही महाराष्ट्रभर वावरणार्यांनी एकमेकांशी वापरावी, हल्लीची वापरणे सोडून द्यावे का? पतंजलींच्या या भागातील चर्चेचे निमित्त करून मी असे मत मांडतो की असे मुळीच नाही. मुळीच काही न शिकता दक्खनेतल्या ब्राह्मणांना महाराष्ट्रभर वावरण्यात सोय होत असेल त्याविषयी काही आपले पोट दुखणे नाही. पण आपली बोली आणि शिवाय प्रमाण बोली, दोहोंचे शिकून ज्ञान असले तर त्याहीपेक्षा अधिक फायदा आपल्याला मिळतो. आज मराठीची प्रमाण बोली वाङ्मय, कलाकृती, आणि शासनकारभार असलेली एक समृद्ध बोली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रभर वावराने आपण एकमेकांना जोडले जात आहोत, आणि त्या बाबतीत ही बोली आपल्या उपयोगी पडत आहे, तोवर (किंवा त्या कारणानेच, म्हणा ना) ही प्रमाण बोली कुठल्याच गावाचा आणि कुठल्याच जातीचा खाजगी ऐवज नाही. ही बोली जर अशी एकाकडून खाजगी मालमत्ता, आणि दुसरीकडून जुलूम मानली गेली, तर आपल्या लोकशाहीत ती बरखास्त होऊन मराठी-भाषक महाराष्ट्राची शकले पडणे हेच न्याय्य. नाहीतर महाराष्ट्राला जोडणारी बोलायची पद्धत कोणीतरी उदार होऊन दुरभिमान न ठेवता दिली पाहिजे (गडचिरोलीकर तसे उदार आहेत) आणि बाकीच्यांनी दिलखुलासपणे वापरायला घेतली पाहिजे (गडचिरोलीकर आपली पदपातशाही उभारणार नसतील तर ही शक्यता अंधुक वाटते).
पतंजलींचा प्रश्न आहे : आपोआप "प्रमाण" बोललेले पुरते (एखाद्या भाषा-अशिक्षित पुणेकर ब्राह्मणासारखे) की शिकून "प्रमाण" चे ज्ञान असणे उजवे (सुशिक्षित अन्य मराठी माणसासारखे). पतंजली ज्ञानाच्या बाजूने बोलतात. इतकेच काय रोजवापरासाठी आपली बोली आणि यज्ञकार्यासाठी प्रमाणबोली वापरणार्या दोन ऋषींचा ते मोठ्या सन्मानाने उल्लेख करतात. म्हणजे योग्य ठिकाणी जिव्हाळ्यासाठी आणि खास अस्मितेच्या साहित्यनिर्मितीसाठी आपली बोली, आणि कार्यालयीन/वार्ताहार म्हणून/खूप किंवा दूरच्या लोकांशी काम असले तर प्रमाण बोली वापरायची, असा मी आधुनिक अर्थ लावतो.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ६**************************
आक्षेप : आता हे सांगा, की "बरे काय दिसते" ते शब्द जाणण्यात आहे, की तशा शब्दांचा प्रयोग करण्यात आहे?
प्रत्याक्षेप : या दोनमध्ये काय फरक आहे?
*ज्ञान असले की "बरे काय दिसते" सकट "बरे दिसत नाही ते काय" हेसुद्धा शिकले जाते.* (कात्यायन)
अर्थातच ज्याला बोलावे त्या शब्दांचे ज्ञान असते, त्याला त्या प्रसंगी जे बालायचे नाही, त्या शब्दांचे ही ज्ञान असते. जर एक "चांगले ज्ञान" तर दुसरे "वाईट ज्ञान" हे ओघानेच नाही का आले? एवढेच काय "बरे दिसते" त्या बोलण्यापक्षा "बरे नाही दिसत" तसे शब्द खूप जास्त आहेत. म्हणजे "चांगल्या" ज्ञानापेक्षा "वाईट" ज्ञान खूपच जास्त प्रमाणात झाले.
(आक्षेपकार "वापर"पक्ष उचलून धरतो.)
*"बरे काय दिसते" चा संदर्भ ज्ञानाशी नसून आचाराशी आहे.* (कात्यायन)
कार्यालयीन वगैरे कामात "बरे काय दिसते/दिसत नाही" ते वापरल्याने फायदा-तोटा होतो. ज्ञानाने नव्हे. तर वापराबद्दल बोला.
प्रत्याक्षेप : मग ज्यांना विनासायास "बरे दिसते तसे" बोलता येते, त्या सगळ्यांचा फुकटात फायदा होतो.
आक्षेपकर्ता : यामुळे तुम्हाला त्यांचा मत्सर वाटतो की काय?
प्रत्याक्षेप : मत्सर वगैरे मुळीच नाही. पण मग काही लोकांची आपोआप प्रगती होत असेल तर शिकण्यात काय राम?
आक्षेपकर्ता : नाही तर, ज्याला शिकून नवीन समजेल त्याचा शिकल्यामुळे फायदा होईल.
प्रत्याक्षेप : (विनोद) अहो आम्ही असेही बघितले आहे, की काही लोक न शिकताच छान बोलतात, आणि काही शिकूनही चुका करतात.
मग आपण हा विचार करून बघू, की फक्त ज्ञानच नाही, फक्त वापरच नाही, तर ज्ञानपूर्वक "बरे दिसते" त्या शब्दांचा वापर केला तर प्रगती होते.
"पुढारी"मध्ये ज्याचा लेख लिहून छापून आला, त्याला वर्तमानपत्रात लेख लिहिण्याचे ज्ञानही आलेच. किंवा आधी लेख लिहिण्याच्या पद्धतीचा अभ्यास करेल, त्याचाच लेख "पुढारी"मध्ये छापून येईल.
खरे तर हा तिसरा पक्ष नीट विचार करून बघाला पाहिजे, की ज्ञान असणेच चांगले.
आक्षेप : पण आपण आधीच नाही का बघितले की "हवे त्याचे ज्ञान" बरोबर "नको त्याचे ज्ञान" कळते, म्हणजे बेरीज वाईटाकडेच.
आक्षेपाचे निराकरण १: हा दोष नाही. एका ज्ञानाने उत्कर्ष होतो, म्हणजे दुसर्या ज्ञानाने अधोगती होते असे थोडेच असते. सभ्य समाजात प्रणाम करणे वगैरेंनी प्रतिष्ठा वाढते, पण हसणे, खोकणे, शिंकणे, उचकी येणे याबद्दल काहीच नियम नाही. त्याने उत्कर्ष नाही झाला तरी अपकर्षही होत नाही.
आक्षेपाचे निराकरण २: किंवा जे "चालणार नाही" त्याच्या ज्ञानाने जे "चालते" त्याचे ज्ञान अधिक बळकट होते. म्हणजे शेवटी ते चांगल्याकरताच.
आक्षेपाचे निराकरण ३: नाहीतर म्हणाच तुम्ही की "चालत नाही" त्याचे ज्ञान वाईट. पण तसेच म्हणणार असाल तर विहीर खणणार्याचे उदाहरण घ्या. खणताना तो धुळीमातीने माखतो, पण विहिरीला पाणी लागताच तो स्वच्छ होतो. विहीरच नसण्यापेक्षा आधी धुळीने माखून, मग स्वच्छ होऊन त्याचा अधिक फायदा होतो. तसेच आधी "न चालणार्या" शब्दांचे आणि "चालणार्या" शब्दांविषयीचे ज्ञान मिळवण्याबद्दल समजा.
(काय वाटेल ते माना, पण ज्ञानाचा कधी तोटा होत नाही हा मथितार्थ).
आता ही उदाहरणे घ्या : बाकीबाब बोरकरांनी गोवेकरांना रिझवण्यासाठी कोकणीत सुंदर कविता, गाणी रचली. महाराष्ट्रासाठी मराठीत तशीच उत्तम कविता, गाणी रचली. महाराष्ट्रात त्यांचा सन्मान सर्वांना समजेल अशा मराठी रचनांमुळे झाला. आणि ऐहिक प्रगतीबद्दल घ्या, तर बॅरिस्टर अंतुले कोकणात स्वतःच्या घरची बोली बोलत असतील, पण विधानसभेत सर्वांना समजणारी बोलीच. हे जमले नसते तर माणूस कितीही राजकारण पटू असला तरी मुख्यमंत्रीपद नसते मिळाले. मोरारजी पूर्वीच्या मुंबई प्रांतातून निवडून येऊ शकले, तरी महाराष्ट्रातून ते शक्य झाले नसते. (मुळात दोन ऋषींविषयी उदाहरण दिलेले आहे.)
(पुढच्या भागात व्याकरण कसे सांगतात, शास्त्राची चौकट काय, हा नवीन विषय सुरू.)
आक्षेप : आता हे व्याकरण म्हणजे नेमके कसे असते?
उत्तर : व्याकरण म्हणजे नियम.
या भागात या लेखमालेचा समारोप होतो आहे. सुरुवातीचा मुद्दा हा की अभ्यास करताना व्याकरणाचे दृश्य आणि कार्यकारी स्वरूप काय असते? खरे तर या मुद्द्याने शेवट होऊ शकतो.
तरी पुढचा एक वर्णमालेबद्दल मुद्दा मी का जोडला असा प्रश्न पडू शकतो. पूर्ण संवादाचा डोलारा या पायावर बांधायला लागलो, की लोकांमध्ये शब्द-अर्थ संबंध आधीपासून ठरलेला आहे. आणि या लोकांत नित्य अर्थपूर्ण पण विशाल शब्दप्रपंचाची थोडक्यात व्यवस्था लावता यावी म्हणून आपण पुढे नियम सांगणार आहोत. पण वर्णमालेची गोष्ट वेगळी. एकेका वर्णाला अर्थ तर काहीच नसतो. मग त्याचा व्याकरणाशी संबंध काय? पुढे व्याकरणाचे नियम करताना उच्चारांची गणना करताना सोय व्हावी, आणि आपल्या भाषेत कुठले कुठले उच्चार चालतात त्यांची वर्गवारी लावण्यासाठी, म्हणून व्याकरणातच वर्णमालाही सांगतात. [वर्णमालेबाबत एक तपशीलवार लेखमाला (समज-गैरसमज,उच्चारक्रिया,व्यंजने,स्वर,शेवट) उपक्रमावर उपलब्ध आहे.]
ही लेखमाला येथे संपवत असल्यामुळे वर्णमालेचा हा संक्षिप्त विचार "परिशिष्ट"वजा वाटतो. मूळ महाभाष्यात हे प्रस्तावना-प्रकरण संपले की वर्णमाला प्रकरण सुरू होते. तिथे हे विवेचन परिशिष्ट नसून तर्कसंगत क्रमानेच आलेले आहे. मुख्य म्हणजे भाष्याच्या प्रस्तावनेतला भाग संस्कृतालाच नव्हे तर अन्य भाषांनाही लागू आहे. व्याकरणाचा आणि शब्दकोशाचा संबंध काय -वगैरे प्रश्न इथे हाताळले आहेत. म्हणून तो मुद्दा मी या लेखमालेत समाविष्ट केला. भाष्यातले पुढचे वर्णमालेचे प्रकरण फक्त संस्कृतालाच लागू असल्याकारणाने त्या सीमेवर ही मराठीकरणाची मालिका संपवतो आहे.
सांगता करताना ही समीक्षा केली पाहिजे की या लेखमालेची प्रयोजने काय होती, ती साधली गेलीत काय आणि लेखमालेच्या मर्यादा काय?
एक प्रयोजन हे की (१) महाभाष्याची ओळख करून देणे. महाभाष्याचे नाव पुन्हापुन्हा बोलून ते साध्य झाले. पण ही ओळख खरीखरची करायची होती, तर भाषांतर मुळपाठ्याशी अधिक समांतर (जमेल तर शब्दशः) हवे होते, आणि मध्येमध्ये माझ्या मनाप्रमाणे खूपच कालबाह्य उदाहरणे द्यायचे कारण नव्हते. संस्कृतामध्ये आणि मूळ ग्रंथामध्ये रस वाटला तर वाचकांनी महामहोपाध्याय काशीनाथशास्त्री अभ्यंकरांचे महाभाष्याचे मराठी भाषांतर जरूर वाचावे.
दुसरे प्रयोजन हे की (२) त्या काळातल्या वैयाकरणांना, नव्हे अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे होते. येथे मधून मधून मी तशी दृष्टी जिथे प्रकर्षाने जाणवते, तिथे मुद्दामून निदर्शनास आणली आहे. आजकल प्राचीन वैचारिक साहित्याची फाजील पूजा करून, पुष्कळदा आपण त्यातले कठोर प्रश्न विचारून सत्य पडताळणारे मर्म विसरतो. अशा अशिक्षित पूजेत त्या विचारवंतांचा अपमान होतो असे माझे मत आहे. "पुराणकाळात रॉकेटे आणि अणुबाँब होते" अशी आत्मप्रौढी बंद होऊन, "काटेकोर उलटतपासणी करून सत्याची शहानिशा करणारे तल्लख विचारवंत होते" असे आपण भारतीयांनी अभिमानाने सांगावे, अशी माझी इच्छा आहे. पण हेच जर सांगायचे असते, तर चपखल उदाहरणे देऊन वेगळ्या प्रकारे लेख लिहायला हवा होता. थोडी व्याकरणातली, थोडी न्यायशास्त्रातील, थोडी मीमांसेतील, थोडी आयुर्वैद्यकातील अशी चौफेर उदाहरणे द्यायला हवी होती. पण त्यांपैकी पुष्कळ विषयांचे माझे वाचन जुजबी आहे. त्यात रस उत्पन्न झाला तर वाचकांनी ती शास्त्रे जरूर पडताळावीत.
तिसरे प्रयोजन हे की (३) मराठीची उदाहरणे देऊन ही चर्चा पूर्ण मराठीमय करायची, इतकेच नव्हे तर आजच्या मराठी भाषेबद्दल भाष्य करायचे. यात सर्व उदाहरणे मराठीतच आहेत, आणि सर्व दाखले आजच्या समाजाला लागू आहेत. पण हेच जर प्रयोजन असते, तर पतंजलींचा ऋणनिर्देश करून, फक्त त्यांची प्रश्नोत्तराची शैली उचलायला हवी होती. इथे तर अर्धेअधिक सरसकट वाङ्मयचौर्य केलेले आहे.
तर ही तीन्ही प्रयोजने थोडीथोडी साधली आहेत आणि थोडीथोडी फसली आहेत. या मर्यादा जाणून ही लेखमाला वाचली तर उंच अपेक्षांचा भंग होणार नाही, आणि विचारांना चालना देणारे मनोरंजन होईल अशी आशा आहे.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ७**************************
आक्षेप : आता हे व्याकरण म्हणजे नेमके कसे असते? ही चीजवस्तू काय?
उत्तर : व्याकरण म्हणजे सूत्र किंवा नियम.
आक्षेप : मग "व्याकरणाचे नियम" असा प्रयोग का करतात? अमक्याचे तमके असे म्हटले की वाटते की "अमके" आणि "तमके" या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिवाय तुम्ही म्हणालात की व्याकरणाने शब्दांचे ज्ञान होते. ढिम्म बसलेल्या नियमांनी थोडेच असे ज्ञान होणार आहे?
प्रत्याक्षेप : मग कशाने होते म्हणता?
आक्षेप : नियम लागू कसे करायचे त्या गतिमान व्याख्येने.
प्रत्याक्षेप : अहो, नियम म्हणजेच नियम लागू करण्याची पद्धतही आहे, असे नाही का?
आक्षेप : नाही. नियमाचे नीट व्याख्यान म्हणजे उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि काटेकोर मर्यादा सांगणे.
आक्षेपकर्ता वेगळे उत्तर सुचवतो : बरे तर. शब्द म्हणजेच व्याकरण असे म्हणू.
प्रत्याक्षेप : वि+आ+करण म्हणजे विशेष आकार (बदल) करून शब्द सांगणे. म्हणजे बदल घडवणारे व्याकरण शब्दापेक्षा वेगळे असे काहीतरी आहे. मग बदल घडवणारे काय असते, म्हणता? बदल घडवणारे नियम असतात.
प्रत्याक्षेप २ : "अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे" असे लोक म्हणतात. "व्याकरण=शब्द" असे ठरवले तर "अमक्यातमक्या आचार्याच्या मते शब्द असे आहेत" असा चुकीचा अर्थ निघेल. चुकीचा का म्हणता? कारण शब्द हे कुठल्या आचार्याच्या आधीचे आणि नित्य आहेत अशी आपली चर्चा झाली आहे. "अमक्यातमक्या आचार्याच्या मते नियम असे आहेत" म्हटले तर काहीतरी अर्थ निघतो.
प्रत्याक्षेप ३ : आचार्यांची मते सोडा, म्हणता? ज्या अर्थी लोकांना शब्द आणि अर्थ यांच्यातला संकेत माहीत आहे, त्यापैकी प्रत्येक संकेत मिळून व्याकरण तयार होते असे म्हणून चालणार नाही. कारण हे संकेत एकेक करून शिकायला आपल्याला आयुष्य पुरणार नाही हे आपण आधीच बघितलेले आहे. अनेक शब्दांची एका नियमाने वासलात लागणार असली, असे थोडेच नियम आणि अपवाद संकलित केले तरच हा अभ्यास शक्य आहे.
वेगळे समाधान : मग असे म्हणूया का, की शब्द आणि नियम या दोहोंचे मिळून व्याकरण बनते?
आक्षेप : "व्याकरणाचे नियम" आणि "अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे" असे प्रयोग चालू शकतील का?
समाधान : होय. "नियम" आणि "शब्द" दोन्ही व्याकरणाचे अवयव आहेत. त्यामुळे "शरिराचा अवयव" म्हणतो, तसे "व्याकरणाचे नियम". आणि तसेच "अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे" म्हणजे "अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरणाचे नियम असे आहेत".
पुन्हा पहिले समाधान : तरी खरे म्हणजे शब्द आधीपासूनच असतात, त्यामुळे अभ्यास करण्यासारखे वेगळे नवीन असे नियमच आहेत. त्यामुळे "व्याकरण म्हणजे नियम" असेच म्हणूया.
आक्षेपाचे स्मरण : ढिम्म बसलेल्या नियमांनी थोडेच असे ज्ञान होणार आहे? नियमाचे नीट व्याख्यान म्हणजे उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि अशाप्रकारे काटेकोर मर्यादा सांगणे.
समाधानसाधक : अहो, "उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि अशाप्रकारे काटेकोर मर्यादा सांगणे" हे नियम शिकवण्याची पद्धत आहे. पद्धतीची आणि खुद्द नियमाची गफलत करून चालणार नाही. मूळ नियमच काटेकोरपणे सांगितला तर पुरे. जो तो विद्यार्थी नियम समजून घेताना शिक्षकाकडून आपल्याला समजतील अशी उदाहरणे, प्रत्युदाहरणे शिकेल. शिकल्यानंतर नियम बदलत नाही, शिकतानाची उदाहरणे आणि प्रत्युदाहरणे लक्षातच ठेवली पाहिजेत असे काही नाही.
(विषय संपला.)
आक्षेप : तुम्ही सुरुवातीला शब्द-अनुशासनाबद्दल सांगितले. पण व्याकरणात वर्णमालेबद्दलही शिकतात ते का?
समाधान : शास्त्र सांगताना सोयीचे जावे म्हणून एका क्रमात एकापाठोपाठ वर्ण ठेवून त्यांचा उच्चार करून सांगणे हे प्रयोजन आहे.
आधीचे इतके-इतके वर्ण स्वर, त्याच्यापुढचे इतके-इतके वर्ण व्यंजने असे सांगायची सोय होते.
(आणखी एक समाधान सुचवले जाते.)
*इष्ट उच्चार शिकवण्यासाठी ही * (कात्ययन)
वर्णमाला सांगून इष्ट उच्चार कुठले ते सांगितले जाते. कोणीतरी सांगितल्याशिवाय आपल्या भाषेत थोडेच उच्चार चालतात आणि परभाषेतले सगळे उच्चार आपल्या भाषेत नाहीत ते कसे कळणार?
(या समाधानाला) आक्षेप : सगळेच इष्ट उच्चार सांगायचे होते तर अतिह्रस्व, नाकातले स्वर, आघात केलेला स्वर हे सगळे वर्णमालेत सांगावे लागतील.
*केवळ वर्णांची सामान्य आकृती सांगितली तरी बाकी सगळे उच्चार कळतात* (कात्यायन)
'इ' आणि 'ई' यांच्या ध्वनीची फक्त आकृती सांगितली की पुरे. ते शब्दांत अति-ह्रस्व किंवा खूप दीर्घ येतात, किंवा आघात करून उच्चार करावे लागले तर वर्णाची आकृती तीच राहाते. तसेच 'उ', 'ऊ'बद्दल.
आक्षेप : नुसती आकृती सांगितली तर बाकी सर्व प्रकार आपोआप सांगितले जातात असे म्हणतात, तर मग प्रामादिक उच्चारही बरोबर म्हणून सांगितले जातील. मग तसा प्रामादिक उच्चार करू नये म्हणून वेगळे वर्णमालेच्या पुढे पुन्हा तळटिपेत सांगावे लागेल.
प्रत्याक्षेप : हे "प्रामादिक" उच्चार कुठले?
आक्षेप : "प्रामादिक" म्हणजे बरळलेला उच्चार, एक उच्चार सुरू केल्यावर अर्धवट सोडून दुसरा उच्चार सुरू करणे, धापा टाकताना खूप नि:श्वास टाकून, किंवा खूप उथळ श्वास घेऊन केलेला उच्चार, गाताना ताना घेताना वेडावाकडा केलेला उच्चार, एक ना दोन!
समाधान : अहो, हे प्रामादिक उच्चार प्रसंगामुळे कधीकधीच चुकून तोंडातून बाहेर पडतात. भाषा शिकताना ते कोणीच शिकत नाही. त्यामुळे वर्णाची आकृती सांगितली म्हणजे हे सगळे चुकीचे उच्चार सांगितले असे होत नाही. त्या वर्णांच्या आकृतींसारखे लोक शिकतात तेच उच्चार ग्रहण केले जातात.
आक्षेप १ : प्रयोजन काय ते एक नीट सांगा : सोयीच्या क्रमात सांगायचे, की इष्ट उच्चार सांगायचे?
आक्षेप १चे समाधान : दोन्ही प्रयोजने आहेत. आंब्याच्या झाडाखाली हात धुतले तर हातही स्वच्छ होतात, आणि झाडाला पाणीही मिळते.
आक्षेप २: लोकांनी सुरुवातीला चुकीचाच, धापा टाकताना, किंवा बरळलेला उच्चार ऐकला तर? मग तुम्ही वर्णाच्या आकृती सांगा तरी त्या चुकीच्या उच्चारांचे ग्रहण होईल.
प्रत्याक्षेप : काय काय चुकीचे ऐकायला मिळणार आहे?
आक्षेप : व्याकरणात बदलताना जे तुम्ही प्रत्यय वगैरे जोडता ते.
समाधान : प्रत्यय वगैरे आम्ही सांगूच ना - तेव्हा नीट उच्चार करून सांगू.
आक्षेप : जे बदलणार आहेत ते मूळ शब्द चुकीचे ऐकायला मिळतील.
समाधान : जे तुमच्या शास्त्रात बदलणार आहेत ते मूळ शब्द शब्दकोशात दिले आहेत. तिथे त्यांचा निर्दोष उच्चार दिलेला आहे.
आक्षेप : बाकी काही शब्द आहेत, ते बदलत नाहीत, ते शब्द चुकीचे ऐकायला मिळतील.
समाधान : ते ही शब्द शब्दकोशात दिले आहेत. तिथे त्यांचा निर्दोष उच्चार दिलेला आहे.
येथपासून व्याकरणाचे नियम शिकायला सुरुवात करता येईल. कारण या शास्त्राची मुख्य तत्त्वे सांगितली (परतीच्या क्रमाने):
(१) सोयीसाठी वर्णमाला सांगू,
(२) जास्तीतजास्त शब्दांचे वर्णन कमीतकमी "नियम" आणि "अपवाद" सांगून करू,
सर्वात मुख्य (३) लोकांना बोलायला आपल्या शास्त्रातले नियम लागत नाहीत, उलट आपल्या नियमांची परीक्षा "लोक काय बोलतात" याने करायची असते,
(४) आपली बोली आपल्याला न शिकता येते. तरी दूरच्या मराठी लोकांशी बोलण्यासाठी, आपल्या आदल्या -पुढल्या पिढ्यांशी पुस्तकरूपाने संपर्क साधण्यासाठी, मराठीच्या जमतील तितक्या बोली (कमीतकमी प्रमाणबोली तरी) जरूर शिकाव्यात. हे आपण वावर आणि व्यासंगाने करू शकतो, किंवा भाषेच्या अभ्यासाने, आपली मर्जी.
मराठी भाषेचा आणि तिच्यावर प्रेम करणार्यांचा उत्कर्ष होवो अशी ही लेखमालेची इतिश्री.