व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ४
या भागात नियम आणि अपवाद म्हणजे काय ते सांगितले आहे. खरे तर हे फक्त व्याकरणाला लागू नाही. पूर्ण विज्ञानालाच लागू आहे. कुठल्याही अभ्यासात तथ्यांची एक मोठी रास आपल्यापुढे साचलेली असते. नियम/अपवाद करून आपण त्या सर्व तथ्यांचे वर्गीकरण करतो. असे नियम जर करता आले तर त्यायोगे आपण ती तथ्यांची पूर्वी अस्ताव्यस्त रास "समजलो" असे म्हणू शकतो.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ४**************************
आक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे? मराठीत चालतील त्या शब्दांचे की चालणार नाहीत त्या शब्दांचे? का दोन्हींचे?
समाधान : कुठल्याही एकाच प्रकारच्या शब्दांविषयी सांगितले तर पुरते. दोन्हींबद्दल सांगायची गरज नाही. जसे "काविळीची साथ चालू असताना उकळलेले पाणी प्यावे," असा नियम आहे. म्हणजे न-उकळलेले पाणी पिऊ नये असे वेगळे सांगावे लागत नाही. "योग्य सोपस्कार न केलेली किंवा मांस खाणारी जनावरे खाऊ नये," असा नियम सांगितला म्हणा. तर मांस खाणारी कुत्री, मांजरे वगैरे जनावरे खाता येत नाहीत ते कळतेच. पण यज्ञ वगैरे सोपस्कार केलेली शाकाहारी जनावरे, म्हणजे बोकड, ससे, गुरे वगैरे, ही सर्व जनावरे खाता येतात, तेही कळते. तसेच बैल हा शब्द समजावला तर (मराठी प्रांताबाहेर करतात ते उच्चार) बॅल, बएल, बेल, बोईल हे सगळे चालणार नाही असे कळते. आणि सर्व न चालणारे उच्चार सांगितले, तर बैल असा योग्य उच्चार चालतो, हे आपोआप समजते.
आक्षेप : तर मग चालणार/न चालणार यांपैकी कुठले सांगणे उजवे?
समाधान : सुटसुटीतपणासाठी जे शब्द चालतात, तेच सांगणे बरे. कारण प्रत्येक शब्दाची कितीतरी अप-रूपे आहेत.
आक्षेप : बरे, तर जे शब्द चालतील त्यांची एक-एक करून यादी पाठ करावी लागेल काय? म्हणजे, बैल, घोडं, मोटार, वगैरे?
समाधान : नाही. एक-एक शब्दाचा उच्चार करून तो पाठ करणे जमायचे नाही. अशी कथा आपण ऐकलेली आहे - "बृहस्पतीने इंद्राला एक-एक शब्द एक हजार दिव्य वर्षांपर्यंत समजावून सांगितला, आणि तरी शब्दभांडार संपले नाही." बृहस्पतीसारखा गुरू, इंद्रासारखा शिष्य, आणि अभ्यासासाठी सहस्र दिव्य वर्षांचा अवधी, तरी जमले नाही. मग आजमितीच्या आपणां लोकांचे काय घ्या! मोजूच या. जगून जगून खूप जगलो, तर जगू शंभर वर्षे. विद्येचे चार टप्पे असतात - १. गुरूकडून ती शिकावी, २. आपणहून तिचे मनन करावे, ३. आपल्याला जे समजले ते दुसर्यांना शिकवावे, आणि ४. विद्या व्यवहारात आणावी. इथे अख्खे आयुष्य ती फक्त गुरूकडून शिकण्यात खपेल! म्हणून एक-एक शब्द पाठ करून जमणार नाही.
आक्षेप : मग हा शब्द नावाचा प्रकार शिकावा तरी कसा?
समाधान : अनेक शब्दांचे जर एकासारखे काही लक्षण असेल, तर ते सांगावे. मग ज्या-ज्या शब्दांचे त्यावेगळे लक्षण आहे तेवढेच वेगळे सांगावे. अशा प्रकारे थोडाच प्रयत्न करून शब्दांच्या मोठ्या राशीची वासलात लागेल.
आक्षेप : "सामान्य लक्षण" आणि "त्यावेगळे लक्षण" म्हणजे व्याकरणशास्त्रात काय म्हणतात?
समाधान : सामान्य लक्षण "नियम" म्हणून सांगायचे. त्यावेगळे लक्षण "अपवाद" म्हणून सांगायचे.
आक्षेप : आता कुठल्यातरी लक्षणाबाबत नियम तो कुठला आणि अपवाद तो कुठला समजायचा?
समाधान : त्यातल्या त्यात जो प्रकार जास्त प्रमाणात दिसतो, त्याला नियम म्हणायचे. जो प्रकार कमी प्रमाणात दिसतो, त्याला अपवाद म्हणायचे. उदा :
पड-तो, पड-ला
वाढ-तो, वाढ-ला
कळ-तो, कळ-ला
बोल-तो, बोल-ला
अशा शब्दांच्या जोड्यांत सुरुवातीचा ध्वनी न बदलण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीचा ध्वनी बदलत नाही असा नियम मानावा.
जा-तो, गे-ला
ये-तो, आ-ला
जोड्या पूर्वीसारख्याच, पण सुरुवातीचा ध्वनी बदलला. हे अपवाद म्हणून सांगायचे.
आक्षेप : आता नियम आणि अपवाद करताना, आपण शब्दांच्या वर्गांबद्दल बोलत असतो, की एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल?
समाधान : सोयीनुसार असेल. शब्दांच्या वर्गांबद्दल नियम, अपवाद सांगावेत, नाहीतर एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल.
(पुढचा भाग असा सुरू होईल :)
आक्षेप : आता सांगा, शब्दाला व्याकरणशास्त्रावेगळे नित्य अस्तित्व असते काय?
Comments
छान
वा छान! सोपे सुटसूटीत विवेचन.
लेखाचे छोटे आकारमान नि संवादात्मक मांडणी वाचनाला उद्युक्त करते का?
(आवांतर: बाकी पुर्वी जनावरे खाण्याची पद्धती होतीच म्हणायची तर!
चला म्हणजे आम्ही एक परंपरा तरी राखुनच आहोत बॉ! ;) )
आपला
गुंडोपंत
~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~
मुळातले भक्ष्य अभक्ष्याचे नियम
मुळातला "काय खाऊ नये" चा नियम
गावातला कोंबडा आणि गावातला डुक्कर खाऊ नये. म्हणजे रानकोंबडा आणि रानडुक्कर खाता येतो ते आपोआप कळते. आजकाल कोंबडा खाणारे बहुतेक गावा/शहरातलाच खातात म्हणून आधुनिक उदाहरण बदलले.
मुळातला "काय खावे" चा नियम
"पाच नखे असलेल्या प्राण्यांपैकी पाचच प्राणी खावेत"
म्हणजे पाच नखे असलीत तसे बाकी सगळे खाऊ नये असे आपोआप कळते.
हे पाच प्राणी (वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधाकांडातून बघून सांगतो - जय इंटर्नेट!) :
शल्यक - साळ (साळी ?शब्द चुकला का?) पॉर्क्युपाईन
श्वाविध - गेंडा
गोधा - घोरपड
शश - ससा
कूर्म - कासव
घोरपड वगैरे काही जंगलात राहाणारे लोक खातसुद्धा असतील. पण बहुतेक लोकांना हा नियम समजणार नाही. शिवाय गेंडा मारणे गुन्हा आहे. म्हणून मराठीकरण आणि आधुनिकीकरण केले.
सुरेख!
हा भागही सुरेख झाला आहे, आवडला. शब्दांविषयी इतके खोलात जाऊन केलेले तरीही सोपे सुटसुटीत चिंतन थक्क करणारे आहे.
महाभाष्य-लेखमाला
~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~गुंडोपंत.
पण कुणाला कळते? ज्याची ती मातृभाषा असते त्याला! इतरांना अशुद्ध भाषेतून काहीही बोध न होण्याची शक्यता असते. या उलट संस्कृत पंडितांची अतिशुद्ध हिंदी भाषा अजिबात कळत नाही. आता श्री. धनंजयांचे हे लेखच पहा. हे जर एखाद्या भाष्यकाराने शुद्ध हिंदीत लिहिले असते तर मला तरी कळाले नसते.--वाचक्नवी
असो. लेख फारच छान होताहेत. प्रत्येक लेख अजून मोठा असता तरी पचला असता.--वाचक्नवी
कसे?
पण कुणाला कळते? ज्याची ती मातृभाषा असते त्याला! इतरांना अशुद्ध भाषेतून काहीही बोध न होण्याची शक्यता असते.
छे छे!! मला तर विपरीत अनुभव आहेत!
माझ्या अत्यंत अशुद्ध हिंदीतूनही (व त्याहूनही गंभीर अवस्थेतल्या इंग्रजीतून) माझ्या भावना मी सहजतेने पोहोचवू शकलो आहे. कोणताही त्रास न होता!
मला त्यावेळी "कुणीच शुद्धीचा आग्रह" केला नाही. उलट त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न म्हणून (क्वचित)कौतुकच झाले.
मात्र त्याच वेळी माझ्या माय मराठीत मात्र येता जाता र्हस्व दीर्घ - काना मात्र्यावरून फटके मिळाले.
माझ्या परभाषीक मित्रांची मराठीत चुकीचे बोलला म्हणून बहुतेक वेळा खिल्ली उडवली गेली. मग अशा वेळी योग्य ते मुल्यमापन केल्यावर भंपक शुद्धलेखनापाई झालेली मराठीची पिछेहाट थांबवायची असेल तर हाच न्याय योग्य ठरतो असे जाणवत गेले.
माझी वाटचाल, 'बोलायचे लिहायचे तर शुद्धच लिहा बोला किवा लिहु बोलूच नका' ते "सगळे भंपक नियम काढा नि
"साधी मराठी माझी मराठी" हे म्हणा अशी झाली आहे.
शुद्धता या विषयी इंग्रजीतही अनेक वाद असतात असे वाटते. मात्र आपणही कदाचीत 'कायम फिरत असलेल्या त्या संपुर्ण पणे अशुद्ध स्पेलींग असलेल्या मेल' वाचल्या असतील. त्या मेल मधे एकही स्पेलींग पूर्णपणे शुद्ध नसले तरी मेल पूर्ण वाचता येतेच. अर्थ ही पुर्ण समजतो. हे एक महत्वाचे उदाहरण आहे असे मला वाटते.
त्यामुळे 'नीट विचार केला असता', जर जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो. या वाक्यात तथ्य आहे हे कळून येईल.
इतकेच नव्हे तर भाषा इतर भाषीकांमध्ये न्यायची असेल तर साधी मराठीला पर्यायच नाही!
अन्यथा त्यांना ती न कळण्याचा धोका आहेच!
आपण जे म्हणालात , 'या उलट संस्कृत पंडितांची अतिशुद्ध हिंदी भाषा अजिबात कळत नाही. ' तेच मी ही म्हणतो की हेच मराठीतही होते. मग काय उपयोग त्या शुद्धतेचा?
माझ्या मते 'सहजतेने संवाद साधणारी युझर फ्रेंडली' भाषा महत्वाची नि तीच टिकणार आहे!
आपला
साधी मराठीवाला
गुंडोपंत
~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~
सुंदर लेख
धनंजयराव,
आधीच्या भागांप्रमाणे चौथा भागही सुंदर आहे. आपली स्पष्टीकरणाची हातोटी आणि सहज-सुंदर शैली वाखाणण्यासारखी आहे, त्यामुळे पुढील भागांची आतुरतेने वाट पाहिली जाते.
आपला
(वाचक) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
उत्तम
चारही भाग उशीरा वाचले, मात्र वाचल्याचे सार्थक झाले. अतिशय उत्तम लेखमाला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.
वा !
हा भाग सुद्धा उत्तम. थोडा उशीराने वाचला.
अवांतर : मांसखाणार्या प्राण्यांबद्दल लिहिले आहे त्यावरुन आठवले. पाश्चात्यदेशांत म्हणे गायींना मांसमिश्रित पदार्थ खायला देतात. त्यातूनच म्हणे तो मॅड काऊ रोग झाला. खरेखोटे देव जाणे.
-- (शाकाहारी) लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)
अशुद्ध स्पेलिंग असलेल्या(?) मेल
अशुद्ध स्पेलिंग असलेले(माझ्या मते-मेल म्हणजे संदेश म्हणून मेल शब्द पुल्लिंगी)मेल. मतभेद संभवतो:
शुद्धता या विषयी इंग्रजीतही अनेक वाद असतात असे वाटते. मात्र आपणही कदाचीत 'कायम फिरत असलेल्या त्या संपुर्ण पणे अशुद्ध स्पेलींग असलेल्या मेल' वाचल्या असतील. त्या मेल मधे एकही स्पेलींग पूर्णपणे शुद्ध नसले तरी मेल पूर्ण वाचता येतेच. अर्थ ही पुर्ण समजतो. हे एक महत्वाचे उदाहरण आहे असे मला वाटते.
त्या तथाकथित अशुद्ध स्पेलिंगचे एक वैशिष्ट्य असते. त्यातील प्रत्येक इंग्रजी शब्दातले पहिले आणि शेवटचे अक्षर योग्य असते. मधली चुकीच्या क्रमाने असतात. हे इंग्रजी शब्द शुद्ध स्वरूपात अनेकदा डोळ्याखालून गेल्यामुळे स्पेलिंगकडे लक्ष न जाता शब्द शुद्ध स्वरूपातच वाचला जातो. पहिले किंवा शेवटचे अक्षर चुकीचे करून पहा, एकदम अस्वस्थ वाटते. अक्षरे लावून शब्द वाचणे अगदी बालबोध. मोठेपणी शब्द हा मुळाक्षर असल्यासारखा वाचला जातो. --वाचक्नवी