व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ४

या भागात नियम आणि अपवाद म्हणजे काय ते सांगितले आहे. खरे तर हे फक्त व्याकरणाला लागू नाही. पूर्ण विज्ञानालाच लागू आहे. कुठल्याही अभ्यासात तथ्यांची एक मोठी रास आपल्यापुढे साचलेली असते. नियम/अपवाद करून आपण त्या सर्व तथ्यांचे वर्गीकरण करतो. असे नियम जर करता आले तर त्यायोगे आपण ती तथ्यांची पूर्वी अस्ताव्यस्त रास "समजलो" असे म्हणू शकतो.

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

*****************भाग ४**************************
आक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे? मराठीत चालतील त्या शब्दांचे की चालणार नाहीत त्या शब्दांचे? का दोन्हींचे?
समाधान : कुठल्याही एकाच प्रकारच्या शब्दांविषयी सांगितले तर पुरते. दोन्हींबद्दल सांगायची गरज नाही.
जसे "काविळीची साथ चालू असताना उकळलेले पाणी प्यावे," असा नियम आहे. म्हणजे न-उकळलेले पाणी पिऊ नये असे वेगळे सांगावे लागत नाही. "योग्य सोपस्कार न केलेली किंवा मांस खाणारी जनावरे खाऊ नये," असा नियम सांगितला म्हणा. तर मांस खाणारी कुत्री, मांजरे वगैरे जनावरे खाता येत नाहीत ते कळतेच. पण यज्ञ वगैरे सोपस्कार केलेली शाकाहारी जनावरे, म्हणजे बोकड, ससे, गुरे वगैरे, ही सर्व जनावरे खाता येतात, तेही कळते. तसेच बैल हा शब्द समजावला तर (मराठी प्रांताबाहेर करतात ते उच्चार) बॅल, बएल, बेल, बोईल हे सगळे चालणार नाही असे कळते. आणि सर्व न चालणारे उच्चार सांगितले, तर बैल असा योग्य उच्चार चालतो, हे आपोआप समजते.

आक्षेप : तर मग चालणार/न चालणार यांपैकी कुठले सांगणे उजवे?
समाधान : सुटसुटीतपणासाठी जे शब्द चालतात, तेच सांगणे बरे. कारण प्रत्येक शब्दाची कितीतरी अप-रूपे आहेत.

आक्षेप : बरे, तर जे शब्द चालतील त्यांची एक-एक करून यादी पाठ करावी लागेल काय? म्हणजे, बैल, घोडं, मोटार, वगैरे?
समाधान : नाही. एक-एक शब्दाचा उच्चार करून तो पाठ करणे जमायचे नाही. अशी कथा आपण ऐकलेली आहे - "बृहस्पतीने इंद्राला एक-एक शब्द एक हजार दिव्य वर्षांपर्यंत समजावून सांगितला, आणि तरी शब्दभांडार संपले नाही." बृहस्पतीसारखा गुरू, इंद्रासारखा शिष्य, आणि अभ्यासासाठी सहस्र दिव्य वर्षांचा अवधी, तरी जमले नाही. मग आजमितीच्या आपणां लोकांचे काय घ्या! मोजूच या. जगून जगून खूप जगलो, तर जगू शंभर वर्षे. विद्येचे चार टप्पे असतात - १. गुरूकडून ती शिकावी, २. आपणहून तिचे मनन करावे, ३. आपल्याला जे समजले ते दुसर्‍यांना शिकवावे, आणि ४. विद्या व्यवहारात आणावी. इथे अख्खे आयुष्य ती फक्त गुरूकडून शिकण्यात खपेल! म्हणून एक-एक शब्द पाठ करून जमणार नाही.

आक्षेप : मग हा शब्द नावाचा प्रकार शिकावा तरी कसा?
समाधान : अनेक शब्दांचे जर एकासारखे काही लक्षण असेल, तर ते सांगावे. मग ज्या-ज्या शब्दांचे त्यावेगळे लक्षण आहे तेवढेच वेगळे सांगावे. अशा प्रकारे थोडाच प्रयत्न करून शब्दांच्या मोठ्या राशीची वासलात लागेल.

आक्षेप : "सामान्य लक्षण" आणि "त्यावेगळे लक्षण" म्हणजे व्याकरणशास्त्रात काय म्हणतात?
समाधान : सामान्य लक्षण "नियम" म्हणून सांगायचे. त्यावेगळे लक्षण "अपवाद" म्हणून सांगायचे.

आक्षेप : आता कुठल्यातरी लक्षणाबाबत नियम तो कुठला आणि अपवाद तो कुठला समजायचा?
समाधान : त्यातल्या त्यात जो प्रकार जास्त प्रमाणात दिसतो, त्याला नियम म्हणायचे. जो प्रकार कमी प्रमाणात दिसतो, त्याला अपवाद म्हणायचे. उदा :

पड-तो, पड-ला
वाढ-तो, वाढ-ला
कळ-तो, कळ-ला
बोल-तो, बोल-ला
अशा शब्दांच्या जोड्यांत सुरुवातीचा ध्वनी न बदलण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीचा ध्वनी बदलत नाही असा नियम मानावा.
जा-तो, गे-ला
ये-तो, आ-ला
जोड्या पूर्वीसारख्याच, पण सुरुवातीचा ध्वनी बदलला. हे अपवाद म्हणून सांगायचे.

आक्षेप : आता नियम आणि अपवाद करताना, आपण शब्दांच्या वर्गांबद्दल बोलत असतो, की एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल?
समाधान : सोयीनुसार असेल. शब्दांच्या वर्गांबद्दल नियम, अपवाद सांगावेत, नाहीतर एका-एका विशिष्ट शब्दाबद्दल.

(पुढचा भाग असा सुरू होईल :)
आक्षेप : आता सांगा, शब्दाला व्याकरणशास्त्रावेगळे नित्य अस्तित्व असते काय?