व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ५

हा भाग जरा लांब लिहिलेला आहे. पण यात तीन मोठ्या चर्चा करण्यालायक कल्पना आहेत.
पहिली ही की व्याकरणाचा पाया लोकांतली भाषा आहे. व्याकरण शब्दांत अर्थ भरत नाही, तो संबंध लोकांना व्याकरणाशिवाय कळतो.

दुसरा विषय पुष्कळांना जिव्हाळ्याचा आणि पोटतिडकेचा आहे. इथे पहिल्यांदाच मी पतंजलींच्या चर्चेचे निमित्त करून "प्रमाण बोली" या विषयाला हात घातला आहे. पण "प्रमाण" बोली असे न म्हणता "महाराष्ट्रभर वावरायचे असेल, आणि सगळ्या ठिकाणी लोकांना प्रशस्त वाटेल असे बोलायची पद्धत" असा प्रयोग केला आहे. मराठीच्या सर्व बोली त्यांच्या विवक्षित नियमांनुसार शुद्धच असतात. आपली-आपली बोली कळत असली तरी आपणा सर्वांना जोडणारी बोली जाणावी असे माझे मत लिहिले आहे.

तिसरी कल्पना ही, की व्याकरणाचे प्रस्तावित नियम वापराच्याच कसाला लावावे लागतात.

या भागात मुळातल्या आक्षेपकर्त्यात आणि उत्तर देणार्‍यात थोडी भांडाभांडी आहे. वादातही थोडे बारकावे आहेत. म्हणून भाषा थोडी क्लिष्ट झाली आहे. तरी पारिभाषिक संज्ञा कसोशीने टाळल्या आहेत. राजहंसाचा डौल नसला तरी या कवण्याचे चालणे चालवून घ्या!

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

*****************भाग ५**************************
आक्षेप : आता सांगा, शब्दाला व्याकरणशास्त्रावेगळे नित्य अस्तित्व असते काय?
उत्तर : दोन्ही प्रकारे वेगवेगळ्यांनी शास्त्र शिकवले आहे : (१) शब्द हे व्याकरणशास्त्राच्या आधीपासून नित्य आहेत, आणि (२) शब्द हे व्याकरणशास्त्र सांगते म्हणून बनतात. पण आपले शास्त्र कशा प्रकारे लिहिले आहे, ते बघू.

कात्यायन आचार्य म्हणतात -
*सिद्धच आहे शब्द-अर्थ-संबंध*

आक्षेप : इथे सिद्ध म्हणजे काय?
उत्तर : सिद्ध म्हणजे नित्य. कसे कळले म्हणता? लोक हा शब्द त्याच अर्थी वापरतात. जे अबाधित सत्य आहे, त्याला "सिद्ध" म्हणतात.

आक्षेप : छे हो! प्रयत्न करून जे साधते, त्याला सिद्ध म्हणतात. म्हणत नाहीत का "पुराव्याने सिद्ध करून दाखवीन!" कदाचीत कात्यायन आचार्यांना म्हणायचे असेल की शब्द व्याकरणाच्या खटाटोपाने सिद्ध करावे लागतात.
समाधान : "सिद्ध" हा शब्द "नित्य" या अर्थाने व्याडि-आचार्यांनीही वापरलेला आहे. इथेही तसेच आहे. नाहीतर "सिद्धच आहे, साध्य नाही", किंवा "आधीच सिद्ध आहे" असे थोडक्यात एकाच "सिद्ध" शब्दाने सांगायचे असेल. अहो म्हणतात ना? "अर्थ संदिग्ध वाटला तर शिष्यपरंपरेत विचारा, कारण तो संदिग्ध ठेवला तर गैरसमज होतो." त्या परंपरेतून कळते आपल्याला की "सिद्ध" म्हणजे "नित्य".

आक्षेप : हा कसला द्राविडी प्राणायाम? सरळ सरळ "नित्य"असाच शब्द का नाही वापरला? हा तर फाजील संदिग्धपणा आहे.
समाधान : "सिद्ध" शुभ शब्द आहे, म्हणून तो कात्यायन आचार्यांच्या ग्रंथातला पहिला शब्द आहे. शुभशब्दाने सुरू झालेली शास्त्रे सांगणार्‍याला विजयी करतात, दीर्घायुषी करतात, आणि या शुभकामना देतात, की शिकणार्‍याच्या ही आकांक्षा "सिद्ध" होवोत.
उत्तर (पुढे चालू) : आणि शिवाय, "नित्य" असा शब्द लिहिला असता तरी शंका राहिल्याच असत्यात. "खूपच" किंवा "सारखेसारखे" असाही "नित्य" शब्दाचा अर्थ आहे. म्हणतात ना "याचे हसणे आणि बडबडणे नित्याचेच झाले आहे." काही करून शंका निघणारच होती - आणि मूळ अर्थ शिष्यपरंपरेतच विचारावा लागणार होता. म्हणून दोहोंपैकी "सिद्ध" हा मंगल शब्दच निवडला.

आक्षेप : बरे तर बरे. या आचार्यांच्या "सिद्ध आहे..." वाक्याचा या ठिकाणी काय संदर्भ लावायचा?
उत्तर : संदर्भ हा, की शब्द आणि अर्थ यांच्यामधला संबंध नित्य, म्हणजे व्याकरणाच्या आधीपासूनचा असला, तर नियम आणि अपवाद हे शब्दाच्या स्थायी आकृतीबद्दल केलेले आहेत, प्रत्येक उच्चाराबद्दल नव्हेत.


आक्षेप : आकृती स्थायी आहे असे कसे म्हणता? सोन्याची साखळी मोडून कानातले डूल बनवले, ते मोडून वळे बनवले, ते मोडून आंगठी. आकार तर सारखे बदलतात, मूळ सोने ते बदलत नसते. तसा शब्दोच्चारात बाहेर पडणारा आवाज तेवढा नित्य असतो.
उत्तर : नाही. आकृती नित्य असते. एक सोन्याचे वळे मोडले, तरी वळे ही आकृती दुसर्‍या एका सोनाच्या तुकड्यात दिसते. आकृती म्हणजे त्या वस्तूचे तत्त्व, तिचा "वस्तूपणा".


आक्षेप : बरे मग शब्द-अर्थाचा संबंध नित्य आहे हे कशावरून समजते?

*लोकांकडून* (कात्यायन)
लोकांमध्ये अर्थ एकमेकांना सांगायचा म्हणून शब्द वापरतात. शब्द उत्पन्न करायला त्यांना मोठा प्रयत्न करावा लागत नाही. मडके वापरण्यापूर्वी, माणसाला कुंभाराकडे जाऊन "मडके करून दे" म्हणून ते करवून घ्यावे लागते. शब्द वापरण्यापूर्वी कोणी व्याकरणकाराकडे जाऊन "शब्द बनवून दे" म्हणून जात नाही.

आक्षेप : अहो, जर लोकात अर्थ सांगण्यासाठी वापरतात तेच प्रमाण आहे तर मग शास्त्राची काय गरज?

*लोकांत अर्थासाठी शब्द वापरले जात असले तरी "बरे काय दिसते" तो बोलण्याचा प्रकार सांगण्यासाठी शास्त्र सांगतात.* (कात्यायन)
महाराष्ट्रभर वावरायचे असेल, आणि सगळ्या ठिकाणी लोकांना प्रशस्त वाटेल असे बोलायचे असेल म्हणा. तर कसे बोलायचे, असे अर्थपूर्ण शब्दांचे ही वर्गीकरण करावे लागते, म्हणून शास्त्र सांगतात. (मुळात "धर्मनियम" लावण्यासाठी असे प्रयोजन दिले आहे. ही पापपुण्याची गोष्ट आहे असे वाटते. पण पुढे उदाहरणे ही दिली आहेत. त्यातून असे दिसते की त्याकाळच्या "सभ्य लोकांत" बरे काय दिसेल असा पाप-पुण्याचा अर्थ लावता येतो. संस्कृत व्याकरणाच्या बाबतीत "धर्म" चा असाच आशय टि. म. विद्यापीठाचे माजी मुख्य आणि व्याकरणाचार्य वा. बा. भागवत गुरुजी सांगतात.)

*जसे की लोकांच्या रोजच्या वागण्यात आणि (वेदांत) सणासुदीच्या रीतिरिवाजात दिसतेच*
उदाहरणार्थ रोजची भूक शमवायची असेल वाटेल ते मांस खाऊन भूक शमवता येते. तरी महाराष्ट्रभर म्हणावे तर कुठले मांस खाल्ले तर बरे दिसते, आणि कुठले मांस खाल्लेले बरे दिसत नाही, त्याचा नियम सांगतात. जंगलाजवळ राहाणार्‍यांत मोराचे मांस खातात तरी शहरी संस्कृतीत ते खाल्लेले लोकांना आवडत नाही. आणखी उदाहरण द्यायचे तर बघा, एखादा पुरुष कामवासना कुठल्याही स्त्रीबरोबर भागवू शकतो. पण तिथेही सभ्य लोकांत काय चालते त्याचे नियम असतात.
(टिप्पणी : ही उदाहरणे थोडी अतिरेकी वाटतात. पण भाषा "सभ्य" वाटली नाही तर लोक गुणी व्यक्तीचे ही अवमूल्यन करतात. हे "ती फुलराणी" नाटक बघताना बहुतेक प्रेक्षकांना पटते. एखाद्या स्थानिक शैलीतले नाटक महाराष्ट्रभर खूप अपवादाने चालते. तिकीट विकत न घेता दूरदूरचे मराठी प्रेक्षक अशा नाटककंपनीच्या पोटातच नाही का लाथ घालत? सोपानदेव चौधरींनी म्हणे भीतभीत आपल्या आईच्या कविता लोकांना दाखवल्या. लोकविलक्षण प्रतिभेच्या होत्या म्हणून बहिणाबाईंना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. आडगावच्या बोलीत "लोकविलक्षण" नसल्या तरी चांगल्या कविता असत्या, तर महाराष्ट्राने त्यांचा "दुर्लक्ष" नामक भयंकर अपमान केला असता. सोपानदेवांच्या सुरुवातीच्या भीतीत हेच ज्ञान होते, असे वाटते. हा सगळा विचार करता, आता दिलेले दृष्टांत इतके काही अतिरेकी वाटत नाहीत. शिवाय पुढे असे दिसते की भाष्यकार संस्कृताच्या दूरदूरच्या बोली "चालतील" अशापैकीच मानतात, "अधर्म" नाही मानत.)

नाहीतर सणासुदीच्या नियमांबाबत बघूया ना - होळीला पुरण, संक्रांतीला तिळगूळ, आवसेला दिवे, असे गोडाचे करायची प्रथा आहे. त्याऐवजी शेवयांची खीर केली म्हणून काय तोंड गोड व्हायचे राहाणार आहे? तरी आपण प्रथा पाळतो, त्यात आपल्याला महत्त्व वाटते. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण आपण लावतो. फणसाच्या पानांचे लावले तर काय वाईट दिसणार आहे? तरी त्या संदर्भात आपण आंब्याची पानेच निवडतो. बर्थडे साजरा करताना केक कापताना एक विशिष्ट गाणे म्हणतात. नाही म्हटले, किंवा दुसरे कुठलेतरी गाणे म्हटले तरी काप पडणारच. पण ते गाणे म्हटल्यामुळे त्या समारंभाची अपेक्षित रंगत आणि आनंद मिळतो. (मुळातही वेदांतली उदाहरणे तशी सौम्यच दिली आहेत. खरेच आहे - सणासुदीचे पाप-पुण्य, आनंद, याबाबतच्या प्रथा पाळल्या न पाळल्या म्हणून खूप मोठा फायदा-नुकसान होत नाही. पण ज्या लोकांशी आपल्याला रोजचे व्यवहार करायचे असतात, त्यांनी दुर्लक्ष केले तर पोटापाण्याचे हाल होऊ शकतात.)

उदाहरणांबाबत सारांश : याच प्रकारे लोकांत अर्थपूर्ण वापरले जाऊ शकणारे सगळे शब्द असले तरी "बरे काय दिसते" असा नियम शास्त्र करते. त्यानेच माणसाची भरभराट होते.

(टीप : आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने बघायचे तर महाराष्ट्राच्या सर्व बोलींचा अभ्यास त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी "शुद्ध" अशाच प्रकारे व्याकरणाचे अभ्यासक करतात. पण बरेच अभ्यासक महाराष्ट्रभर वावरणारे लोक एकमेकांत जसे बोलतात त्याचा अभ्यास करतात. त्यांच्या अभ्यासाचा जास्त लोक उपयोग करून घेतात, कारण त्या वर्णनाच्या उपयोगाचे क्षेत्रही मोठे असते. व्याकरण सांगितल्याशिवाय लोकांत मुळातच शब्द आणि अर्थाचा संबंध ठरलेला असतो, हे एक. आणि व्याकरणातले प्रमाण लोकात काय चालते, आणि काय प्रतिष्ठा देते, असे दुसरे. ही किती उंच वैज्ञानिक उडी त्या काळातल्या आचार्यांनी घेतली होती, त्याचा आचंबा वाटतो. त्यांनी भाषा पाप-पुण्याची वापरली, हे खरे, पण दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच्या काळाला आजचे निकष लावायला गेलो, तर तो आपल्याकडून अतिरेक होईल.)

(व्याकरणाच्या नियमातून कधीच न ऐकलेले शब्द कधीकधी तयार होतात त्याबद्दल चर्चा)

*कधीच न वापरले गेलेले शब्दही आहेत* (कात्यायन)
आक्षेप : अहो, तुमच्या नियमांतून असेही काही शब्द निघतात की जे कधी वापरात ऐकलेले नाहीत, आणि कधी लेखी वाचलेले नाहीत.
उदाहरणार्थ ओगरण्याचसाठीच्या, भोगस, अनुमानले वगैरे.
प्रतिप्रश्न : असे असले म्हणून काय मोठा तोटा झाला?
आक्षेप चालू : तुम्हीच तर म्हणालात की लोकांच्या वापरातून हे कळते की आपल्या भाषेत अमुक शब्द चालतो की नाही. कारण तुम्हीच शब्द व्याकरणाआधी नित्य असतात असे म्हणालात. आता तुमच्या शास्त्रातून हे "चालतील" असे कळते, पण हे तर कधी लोकांत ऐकले किंवा लेखी दिसले नाहीत, "चालतील" म्हणून ठरवायचे कसे?

आक्षेपकाराशी शब्दच्छल :
अहो, असे कसे परस्परविरोधी वाक्य बोलता. तुमच्याच तोंडून तर आता शब्द बाहेर पडले "ओगरण्याचसाठीच्या, भोगस, अनुमानले" असे, आणि असेही म्हणता की कधी ऐकले नाहीत. भारीच उलटसुलट हो बोलणे तुमचे.

आक्षेपकार आपली बाजू सावरतो :
आम्ही काही उलटसुलट बोलत नाही - "आहेत" म्हणतो म्हणजे "व्याकरणवाले 'आहेत' असे म्हणतात", आणि "वापरात नाहीत" असे म्हणतो तेव्हा "लोकांत वापरात नाहीत" असे म्हणतो. "आम्ही उच्चार केला नाही" असे कुठे म्हटले? काय म्हटले, म्हणता? "लोकात वापरात नाहीत" असे म्हणालो.

आक्षेपकाराशी शब्दच्छल चालू:
तुम्ही काय लोक नाहीत काय?

आक्षेपकर्ता समजावतो :
होय, लोकांमध्ये मीही एक आहे, पण मीच सर्व लोक नाही.

आक्षेपाला उत्तर :
*अजून तसा प्रयोग नाही तरी तशा अर्थासाठी तसा प्रयोग होईल* (कात्यायन)
अहो आम्ही "त्या अर्थासाठी तो शब्द लोक वापरतात, ते व्याकरणाच्या आधी" असे म्हटले होते. लोकांमध्ये तसा अर्थ बोलून दाखवायचा प्रसंग आला पाहिजे ना?

आक्षेप चालू :
*त्या अर्थासाठी वेगळे शब्द आहेत, म्हणून ते वापरात ऐकलेले नाहीत* (कात्यायन)
लोकांत हा अर्थ सांगायला वेगळे सोपे शब्द आहेत, तेच लोक वापरतील. "ओगरण्याचसाठीच्या" नाही म्हणणार, "फक्त ओगरण्यासाठी अशा (पळ्या)" असे म्हणतील; "भोगस" नाही म्हणणार, "भोगायचास" असे म्हणतील. "अनुमानले" नाही म्हणणार, "अनुमान केले" असे म्हणतील.

आक्षेपाचे समाधान :
*"अजून वापरात ऐकले नाहीत, तरी कुठल्यातरी विशेष प्रसंगी वापरतीलही* (कात्यायन)
पुढे कधीतरी दिसू शकेल अशा ग्रहतार्‍यांच्या स्थितीचा विचार खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, करतातच ना. अजून कधी ग्रहतार्‍यांची स्थिती दिसली नाही, कदाचीत आपल्या आयुष्यात दिसणार नसेल, तरी ती दीर्घकाळात कधी दिसू शकेल. दीर्घकाळात तसा शब्दप्रयोग अर्थासाठी चपखल असण्याचा प्रसंग निघेल, म्हणून तसे शास्त्र करावेच लागते. (मुळात : कोणाचे आयुष्य पुरणार नाही इतका एक लांबलचक यज्ञविधी शास्त्रात सांगितला आहे, त्याबद्दल.)

*आपल्या गावाबाहेरचेही मराठी आहे ना* (कात्यायन)
हे शब्द वापरणारे दुसर्‍या कुठल्या ठिकाणी असतील.

आक्षेप :
आम्हाला तर नाही दिसले.

समाधान :
शोधायचा प्रयत्न करा. मराठी बोलणारे खूप लोक आहेत. सहा भूखंडे आणि कित्येक लघुद्वीपांवर पसरले आहेत. खुद्द महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, वगैरे सगळे प्रदेश आणि उपप्रदेश आहेत. आपले स्वर्गस्थ पूर्वज, पृथ्वीवरचे आपण, आणि भावी पिढ्या आहेत. ज्ञानेश्वरी आहे, संतांच्या गाथा आहेत. प्रत्येक गावची वर्तमानपत्रे आहेत, कविता आहेत, कथा आहेत, कादंबर्‍या आहेत, दिवाळी अंक आहेत, संकेतस्थळे आहेत. तांत्रिक पुस्तके आहेत, शेतसार्‍याच्या पावत्या आहेत, मसाल्याच्या डब्यावरच्या पाककृती आहेत. हे सगळे असताना, हा असा एक शब्द मराठीत कधी वापरलाच गेला नाही असे म्हणणे म्हणजे मोठे साहस आहे.
आणि या सगळ्या प्रचंड मराठी बोली आणि लेखीच्या पसार्‍यात काहीकाही प्रादेशिक प्रयोग विशिष्ट अर्थांनी एकेका ठिकाणीच दिसतात. पूर्वेकडे "राहाणे" म्हणजे या क्षणी काहीतरी करत असणे, पण दक्खनी मुलुखात तसे नाही. तिथे ते फक्त कुठल्यातरी स्थितीत टिकून असणे, आणि वस्तीला असणे, या अर्थांनी वापरतात. सीमाप्रदेशात काम करून सोडतात, त्या अर्थाने बाकी महाराष्ट्रात काम करून टाकतात. वाहातुक नियंत्रण करणारे मोटारगाड्या सावकाश हाकायचा सल्ला देतात, तर बहुतेक लोक एकमेकांना कार सावकाश चालवायला सांगतात.

आणि शिवाय, तुम्ही म्हणता त्या उदाहरणांपैकी एक आम्हाला सापडले आहे -
पाहतां पाहतां अनुमानलें । कळतां कळातां कळों आलें । पाहातां अवघेंचि निवांत जाहलें । बोलणें आतां ॥ दासबोध १२.५.२२ (मुळात : आक्षेपकर्त्याने सांगितलेले शब्द वेदांमधल्या कुठल्यातरी ऋचेमध्ये आहेत.)
(टीप : यापेक्षा चांगले उदाहरण पाहिजे.)

(पुढचा भाग असा सुरू होईल)
आक्षेप : आता हे सांगा, की "बरे काय दिसते" ते शब्द जाणण्यात आहे, की तशा शब्दांचा प्रयोग करण्यात आहे?


१ - एकाच सोन्यासाख्या कंठस्वरातून कधी "बैल", तर कधी "घोडं" असे वेगवेगळे आभूषणांसारखे आकार तयार होतात. पण या ठिकाणच्या "बैल"चा आकार आणि दुसर्‍या कोणाच्या कंठस्वरातून बाहेर पडणारा "बैल"चा आकार एकच. तसाच दोन्ही कंठांच्या स्वरातून बाहेर पडणारे "घोडं" चा आकार एकच.

Comments

महाद्वीपे

चार आकडा का लिहिला कोणास ठाऊक. सात किंवा सहा लिहायला हवा होता.

सहा की सात?

महाद्वीपे सातच.

जंबूप्‍लक्षाव्हयौ दीपौ शाल्मलिश्चापरो द्विज ।
कुश: क्रौंचस्तथा शाक: पुष्करश्चैव सप्तम: । ।


--विष्णुपुराण २.२.?

सहा की सात

आणि आधुनिक म्हणायची असती तर दक्षिण ध्रुवप्रदेश सोडून सहा महाद्वीपे सांगायला हवी होती. "चार" म्हणजे टंकनदोष म्हणूनही खपवता येत नाही.

शिवाय एक शुद्धिपत्र :
प्रथमे ग्रासे मक्षिकाया अस्तित्त्वम् | असे बोलीतले वैकल्पिक उच्चार संस्कृतात लिहिले तर चालते.
मराठीत मात्र "पहिल्या घासात माशीचे अस्तित्व" असे शब्दकोशातले रूप लिहिणेच प्रशस्त.

कधीकधी "उच्चाराप्रमाणे लिहा!" संस्कृताची मराठीत अडगळ होऊन ठेच लागते!

प्रमाण भाषा

त्यातून असे दिसते की त्याकाळच्या "सभ्य लोकांत" बरे काय दिसेल असा पाप-पुण्याचा अर्थ लावता येतो. संस्कृत व्याकरणाच्या बाबतीत "धर्म" चा असाच आशय टि. म. विद्यापीठाचे माजी मुख्य आणि व्याकरणाचार्य वा. बा. भागवत गुरुजी सांगतात.) अगदी चौकट करून तसबिरीत ठेवण्याचे वाक्य!

टीप : आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने बघायचे तर महाराष्ट्राच्या सर्व बोलींचा अभ्यास त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी "शुद्ध" अशाच प्रकारे व्याकरणाचे अभ्यासक करतात. पण बरेच अभ्यासक महाराष्ट्रभर वावरणारे लोक एकमेकांत जसे बोलतात त्याचा अभ्यास करतात. त्यांच्या अभ्यासाचा जास्त लोक उपयोग करून घेतात, कारण त्या वर्णनाच्या उपयोगाचे क्षेत्रही मोठे असते. व्याकरण सांगितल्याशिवाय लोकांत मुळातच शब्द आणि अर्थाचा संबंध ठरलेला असतो, हे एक. आणि व्याकरणातले प्रमाण लोकात काय चालते, आणि काय प्रतिष्ठा देते, असे दुसरे. ही किती उंच वैज्ञानिक उडी त्या काळातल्या आचार्यांनी घेतली होती, त्याचा आचंबा वाटतो. त्यांनी भाषा पाप-पुण्याची वापरली, हे खरे, पण दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीच्या काळाला आजचे निकष लावायला गेलो, तर तो आपल्याकडून अतिरेक होईल.--याचा भावार्थ सुद्धा!--वाचक्‍नवी

सुरेख!

हा भाग बर्‍याच प्रचलित गैरसमजांचे निराकरण करणारा ठरेल असे वाटते. आक्षेपकारांची उलटतपासणी मजेशीर आहे.
रंगसंगती साधताना आपण घेतलेल्या कष्टाचे कौतुक वाटते.

अर्थ आणि शब्द

धनंजय महोदय,
आपली ही लेखमाला अतिशय उत्कृष्ठ आहे हे पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते.
आपण फारच बारकाईने आणि कष्टाने त्यात उदाहरणे आणि इतर टिप्पण्या भरत आहात. कमाल आहे.

आक्षेप : बरे मग शब्द-अर्थाचा संबंध नित्य आहे हे कशावरून समजते?
*लोकांकडून* (कात्यायन)

पूर्वी सुंदर मुलीला 'काय मारु दिसते' असे म्हणत (असे ऐकले आहे:)
मग तीला 'काय बाप मुलगी आहे' असेही म्हणतात. तसेच 'माल' असेही (असभ्य) म्हणतात. म्हणजे प्रमाण मराठीमध्ये असलेले सुंदर हे विशेषण मारु, बाप, माल या निरनिराळ्या रुपात बोली मध्ये प्रकट होते. शब्दाची आकृती आणि अर्थ यांची जोडी आहे पण सोन्याच्या वळ्याची आंगठी झाली. मला वरील आक्षेप आणि त्याचे समाधान योग्य रीतीने समजले आहे का? हे कृपया सांगावे.

--लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

सुंदर वळे

आमच्या (असभ्य) कंपूत कोणी "कविता सुंदर आहे" असे म्हटले की कळायचे की कविता ही ओळखीची (कोणाची बहीण वगैरे) आहे, किंवा कागदावरची आहे. वर्गात बसणारी ती "माल". तर त्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे होते - एक दुसर्‍या ठिकाणी वापरला तर अर्थ बदलणार. ते लोकांनीच ठरवले. (म्हणजे आमच्या कंपूतल्या लोकांनी नाही, आमच्याही आधी ते लोकांमध्ये ठरलेले होते.)

पण "सुंदर" हा शब्दच वेगवेगळ्या लोकांच्या तोंडातून वेगवेगळा बाहेर पडतो. बायकांच्या तोंडून थोडासा तारसप्तकाकडे, पुरुषांकडून खालच्या आवाजात, कोणी "स्सुंदर" अशी सुरुवात लांबवते - माझ्याच तोंडून वेगवेगळ्या वेळी ते थोडेसे वेगवेगळे ऐकू येते... यात वेगवेगळ्या लोकांच्या ध्वनीतून (वेगवेगळ्या सोन्याच्या तुकड्यांतुन) साधारणपणे एकच ध्वनीची आकृती "सुंदर" (वळे) ही निघते. प्रत्येकाचा ध्वनी लोकांमध्ये ठरलेला नसतो, पण त्या आकाराच्या ध्वनीचा आणि त्याच्या अर्थाचा संबंध लोकांमध्ये आधीपासून ठरलेला असतो.

सुंदर, सुंदर, सुंदर, स्सुंदर : वेगवेगळे सोन्याचे तुकडे, एकच 'वळे' आकृती
माल, म्माल, माल्ल्ल्ल्ल् : वेगवेगळ्या सोन्याचे तुकडे, एकच 'साखळी' आकृती
पण 'वळे' आणि 'साखळी' या आकृती वेगवेगळ्या.
'स्सुंदर' आणि 'म्माल' म्हणणारा कॉलेजकुमार एकच असला, तर एकच सोन्याचा तुकडा (ध्वनीयंत्र), त्याचेच एकदा (एक अर्थ हवा असला की) वळे केले, ते तोडून (दुसरा अर्थ हवा असला) साखळी केली. (त्या मवाल्याला "सोन्याचा तुकडा" त्याची आई तरी म्हणेल का?)

समजले

हा भागही उत्तम. शिवाय विशेष जिह्वाळ्याचा विषय. वळ्याचे उदाहरण आणि स्पष्टीकरण मला लेख वाचताना नीटसे समजले नव्हते. मात्र तुमच्या वरील प्रतिसादामुळे आता नीट समजले, धन्यवाद.

 
^ वर