व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ६
हा भाग पुन्हा लांबीला लहान लिहिलेला आहे. यातील मुद्द्यांची उपक्रमावर बाकी ठिकाणी ज्वलंत चर्चा होत आहे. ती विचारपूर्ण आणि आवेशपूर्ण मते या लेखाच्या अनुषंगानेही मांडली तर संवादात भर पडेल, म्हणून हा लिहून काढायची घाई केली.
मागच्या भागात प्रमाण बोलीचा उल्लेख सुरू केला त्याच्यावर अजून तरी कोणी क्रोध प्रकट केलेला नाही. म्हणून यावेळी त्याहूनही नाजुक आणि बोचरा मुद्दा हाताळणार आहे. मराठी मुलखाच्या वेगवेगळ्या भागातले सुशिक्षित लोक एकमेकांशी जोड बोली म्हणून वापरतात, (वर्हाडी माणूस कोकणी माणसाशी बोलताना वापरेल) अशी एक "प्रमाण" बोली आहे. ही बहुतेक करून दक्षिण महाराष्ट्रातल्या ब्राह्मण जातीच्या लोकांच्या घरगुती बोलीशी मिळतीजुळती आहे. (या लोकांत त्यांच्याच बोलीत चालतील, पण जोड बोलीत नाही, असे "प्रश्ण" वगैरे उच्चार आहेत, ते थोडेच आहेत).
ही गोष्ट योगायोगाने नसून याला ऐतिहासिक कारणे आहेत : (१) मराठेशाहीच्या रोपट्याचे मूळ दक्षिण महाराष्ट्रात पहिले रुजले. (२) शिवाजी दरबारात राजभाषेचे प्रमाण ठरवायला हणमंते नावाच्या शास्त्र्यास नेमण्यात आले (त्या काळातल्या नावा-आडनावांनी जातही सांगितली जाते.) (३) मावळातल्या आणि आजूबाजूच्या डोंगराळ किल्ल्यांमध्ये मराठेशाहीचे सामर्थ्य असले तरी कृष्णा, भीमेच्या (वगैरे) दक्खनी खोर्यांत तिचे स्थायी वैभव होते. (४) पेशवाईच्या काळातली बलशाली राजधानी पुणे शहर होते, आणि (५) नोकरशाही आणि विद्यार्जनाचा जवळजवळ एकाधिकार पूर्वी ब्राह्मणांकडे होता, हे सगळे खरेच (वगैरे वगैरे, ऐतिहाहिक कारणे संपली नाहीत).
आजच्या बृहन्महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक समान आहे. त्यापैकी बहुतेकांना या ऐतिहासिक कारणांविषयी आपुलकी नसेल आणि कदाचीत तेढही वाटत असेल. मग आज सहज प्रश्न विचारला जाईल - या "प्रमाण" बोलीचा मक्ता दक्खनेकडील ब्राह्मणांकडेच आहे काय? ही त्यांची घरगुती बोली आहे, म्हणून त्यांना अभिमान वाटून बाकी सर्वांना न्यून वाटावे काय? की दुसरी कुठली बोली (गडचिरोलीची म्हणू) ही महाराष्ट्रभर वावरणार्यांनी एकमेकांशी वापरावी, हल्लीची वापरणे सोडून द्यावे का? पतंजलींच्या या भागातील चर्चेचे निमित्त करून मी असे मत मांडतो की असे मुळीच नाही. मुळीच काही न शिकता दक्खनेतल्या ब्राह्मणांना महाराष्ट्रभर वावरण्यात सोय होत असेल त्याविषयी काही आपले पोट दुखणे नाही. पण आपली बोली आणि शिवाय प्रमाण बोली, दोहोंचे शिकून ज्ञान असले तर त्याहीपेक्षा अधिक फायदा आपल्याला मिळतो. आज मराठीची प्रमाण बोली वाङ्मय, कलाकृती, आणि शासनकारभार असलेली एक समृद्ध बोली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रभर वावराने आपण एकमेकांना जोडले जात आहोत, आणि त्या बाबतीत ही बोली आपल्या उपयोगी पडत आहे, तोवर (किंवा त्या कारणानेच, म्हणा ना) ही प्रमाण बोली कुठल्याच गावाचा आणि कुठल्याच जातीचा खाजगी ऐवज नाही. ही बोली जर अशी एकाकडून खाजगी मालमत्ता, आणि दुसरीकडून जुलूम मानली गेली, तर आपल्या लोकशाहीत ती बरखास्त होऊन मराठी-भाषक महाराष्ट्राची शकले पडणे हेच न्याय्य. नाहीतर महाराष्ट्राला जोडणारी बोलायची पद्धत कोणीतरी उदार होऊन दुरभिमान न ठेवता दिली पाहिजे (गडचिरोलीकर तसे उदार आहेत) आणि बाकीच्यांनी दिलखुलासपणे वापरायला घेतली पाहिजे (गडचिरोलीकर आपली पदपातशाही उभारणार नसतील तर ही शक्यता अंधुक वाटते).
पतंजलींचा प्रश्न आहे : आपोआप "प्रमाण" बोललेले पुरते (एखाद्या भाषा-अशिक्षित पुणेकर ब्राह्मणासारखे) की शिकून "प्रमाण" चे ज्ञान असणे उजवे (सुशिक्षित अन्य मराठी माणसासारखे). पतंजली ज्ञानाच्या बाजूने बोलतात. इतकेच काय रोजवापरासाठी आपली बोली आणि यज्ञकार्यासाठी प्रमाणबोली वापरणार्या दोन ऋषींचा ते मोठ्या सन्मानाने उल्लेख करतात. म्हणजे योग्य ठिकाणी जिव्हाळ्यासाठी आणि खास अस्मितेच्या साहित्यनिर्मितीसाठी आपली बोली, आणि कार्यालयीन/वार्ताहार म्हणून/खूप किंवा दूरच्या लोकांशी काम असले तर प्रमाण बोली वापरायची, असा मी आधुनिक अर्थ लावतो.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ६**************************
आक्षेप : आता हे सांगा, की "बरे काय दिसते" ते शब्द जाणण्यात आहे, की तशा शब्दांचा प्रयोग करण्यात आहे?
प्रत्याक्षेप : या दोनमध्ये काय फरक आहे?
*ज्ञान असले की "बरे काय दिसते" सकट "बरे दिसत नाही ते काय" हेसुद्धा शिकले जाते.* (कात्यायन)
अर्थातच ज्याला बोलावे त्या शब्दांचे ज्ञान असते, त्याला त्या प्रसंगी जे बालायचे नाही, त्या शब्दांचे ही ज्ञान असते. जर एक "चांगले ज्ञान" तर दुसरे "वाईट ज्ञान" हे ओघानेच नाही का आले? एवढेच काय "बरे दिसते" त्या बोलण्यापक्षा "बरे नाही दिसत" तसे शब्द खूप जास्त आहेत. म्हणजे "चांगल्या" ज्ञानापेक्षा "वाईट" ज्ञान खूपच जास्त प्रमाणात झाले.
(आक्षेपकार "वापर"पक्ष उचलून धरतो.)
*"बरे काय दिसते" चा संदर्भ ज्ञानाशी नसून आचाराशी आहे.* (कात्यायन)
कार्यालयीन वगैरे कामात "बरे काय दिसते/दिसत नाही" ते वापरल्याने फायदा-तोटा होतो. ज्ञानाने नव्हे. तर वापराबद्दल बोला.
प्रत्याक्षेप : मग ज्यांना विनासायास "बरे दिसते तसे" बोलता येते, त्या सगळ्यांचा फुकटात फायदा होतो.
आक्षेपकर्ता : यामुळे तुम्हाला त्यांचा मत्सर वाटतो की काय?
प्रत्याक्षेप : मत्सर वगैरे मुळीच नाही. पण मग काही लोकांची आपोआप प्रगती होत असेल तर शिकण्यात काय राम?
आक्षेपकर्ता : नाही तर, ज्याला शिकून नवीन समजेल त्याचा शिकल्यामुळे फायदा होईल.
प्रत्याक्षेप : (विनोद) अहो आम्ही असेही बघितले आहे, की काही लोक न शिकताच छान बोलतात, आणि काही शिकूनही चुका करतात.
मग आपण हा विचार करून बघू, की फक्त ज्ञानच नाही, फक्त वापरच नाही, तर ज्ञानपूर्वक "बरे दिसते" त्या शब्दांचा वापर केला तर प्रगती होते.
"पुढारी"मध्ये ज्याचा लेख लिहून छापून आला, त्याला वर्तमानपत्रात लेख लिहिण्याचे ज्ञानही आलेच. किंवा आधी लेख लिहिण्याच्या पद्धतीचा अभ्यास करेल, त्याचाच लेख "पुढारी"मध्ये छापून येईल.
खरे तर हा तिसरा पक्ष नीट विचार करून बघाला पाहिजे, की ज्ञान असणेच चांगले.
आक्षेप : पण आपण आधीच नाही का बघितले की "हवे त्याचे ज्ञान" बरोबर "नको त्याचे ज्ञान" कळते, म्हणजे बेरीज वाईटाकडेच.
आक्षेपाचे निराकरण १: हा दोष नाही. एका ज्ञानाने उत्कर्ष होतो, म्हणजे दुसर्या ज्ञानाने अधोगती होते असे थोडेच असते. सभ्य समाजात प्रणाम करणे वगैरेंनी प्रतिष्ठा वाढते, पण हसणे, खोकणे, शिंकणे, उचकी येणे याबद्दल काहीच नियम नाही. त्याने उत्कर्ष नाही झाला तरी अपकर्षही होत नाही.
आक्षेपाचे निराकरण २: किंवा जे "चालणार नाही" त्याच्या ज्ञानाने जे "चालते" त्याचे ज्ञान अधिक बळकट होते. म्हणजे शेवटी ते चांगल्याकरताच.
आक्षेपाचे निराकरण ३: नाहीतर म्हणाच तुम्ही की "चालत नाही" त्याचे ज्ञान वाईट. पण तसेच म्हणणार असाल तर विहीर खणणार्याचे उदाहरण घ्या. खणताना तो धुळीमातीने माखतो, पण विहिरीला पाणी लागताच तो स्वच्छ होतो. विहीरच नसण्यापेक्षा आधी धुळीने माखून, मग स्वच्छ होऊन त्याचा अधिक फायदा होतो. तसेच आधी "न चालणार्या" शब्दांचे आणि "चालणार्या" शब्दांविषयीचे ज्ञान मिळवण्याबद्दल समजा.
(काय वाटेल ते माना, पण ज्ञानाचा कधी तोटा होत नाही हा मथितार्थ).
आता ही उदाहरणे घ्या : बाकीबाब बोरकरांनी गोवेकरांना रिझवण्यासाठी कोकणीत सुंदर कविता, गाणी रचली. महाराष्ट्रासाठी मराठीत तशीच उत्तम कविता, गाणी रचली. महाराष्ट्रात त्यांचा सन्मान सर्वांना समजेल अशा मराठी रचनांमुळे झाला. आणि ऐहिक प्रगतीबद्दल घ्या, तर बॅरिस्टर अंतुले कोकणात स्वतःच्या घरची बोली बोलत असतील, पण विधानसभेत सर्वांना समजणारी बोलीच. हे जमले नसते तर माणूस कितीही राजकारण पटू असला तरी मुख्यमंत्रीपद नसते मिळाले. मोरारजी पूर्वीच्या मुंबई प्रांतातून निवडून येऊ शकले, तरी महाराष्ट्रातून ते शक्य झाले नसते. (मुळात दोन ऋषींविषयी उदाहरण दिलेले आहे.)
(पुढच्या भागात व्याकरण कसे सांगतात, शास्त्राची चौकट काय, हा नवीन विषय सुरू.)
आक्षेप : आता हे व्याकरण म्हणजे नेमके कसे असते?
उत्तर : व्याकरण म्हणजे नियम.
Comments
उत्तम पण
वा! उत्तम झाला आहे हा भाग!
भाषा शिकल्याने फायदाच होईल हा 'विवादास्पद' भागही ठीकच!
आता आक्षेपः
नाहीतर महाराष्ट्राला जोडणारी बोलायची पद्धत कोणीतरी उदार होऊन दुरभिमान न ठेवता दिली पाहिजे (गडचिरोलीकर तसे उदार आहेत)
यात गडचिरोलीकर उदार झाले हे कोणी ठरवले ?
ते उदार झाले की या दक्खनेच्या ब्राह्मणांनी तसे 'ठरवून' लादून टाकले?
शिवाय
हे दक्खनचे ब्राह्मण मग भाषेच्या कोणत्या भागात उदार झाले?
की यांची रीत फक्त 'आपल्या फायद्याचे काय ते पहा' इतकीच होती?
(जर भाषेची अस्मिता तितकीच प्रखर असेल तर काय हरकत आहे स्वतंत्र गडचिरोली राष्ट्र व्हायला ही? अशी ही नक्षलवादी चळवळ तेथे सूरू आहेच... ते का सुरु आहे, हे पाहिल्यास वर भाषिक राजकारणातही त्याची कारणे सापडू शकतील असे वाटते.)
माझा मूलतः आक्षेप हा, चार भामट्या लोकांनी 'दक्खनी भाषा हीच फक्त प्रमाण भाषा बाकी मात्र फक्त बोली' या ठरवून टाकण्याला आहे.
त्यामुळे त्या त्या भाषेला (म्हणजे, कोकणी, वर्हाडी, मालवणी, खानदेशी) जे काही न्युनत्व दिले गेले ते जुलुमीच आहे असे मला वाटते.
आपला
गुंडोपंत
~गडचिरोलीकरांना जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.~
गडचिरोलीकर
गडचिरोलीकर उदार आहेत हे मी ठरवले. सांगण्यास खेद वाटतो की मला एकही गडचिरोलीकर वैयक्तिक ओळखीचा नाही. (महाराष्ट्रातच मी मध्ये एकदा इनमिनतीन वर्षे राहिलो आहे, त्यामुळे, तेथील बहुतेक जिल्ह्यातील एकही व्यक्ती माझ्या ओळखीची नाही). पण बहुतेक मनुष्यप्राणी चांगले असतात असे गृहीतक मानून मी या अनोळखी गडचिरोलीकरांना उदार करून टाकले. दक्खनच्या लोकांच्या मनात गडचिरोलीकरांबद्दल काहीही मत आहे की नाही याबद्दल मला माहिती नाही.
कोणीच उदार झालेले नाही. साधारणपणे उदारपणाबद्दल कोणी विचार करत नाही. माझे शब्द थोडेसे व्यंग्यपूर्ण होते (पण दुष्ट नव्हेत). ज्यांची भाषा कुठल्याका ऐतिहासिक कारणामुळे प्रमाण होते, त्यांच्यात दुरभिमान वाढण्याचेच प्रमाण खूप आहे. हिंदीची प्रमाणबोली "खडी" बाकीच्या हिंदीभाषकांच्या बाबतीत, उर्दूची लखनवी बोली उर्दूच्या बाबतीत, कन्नडाची मैसूरजवळची बोली कन्नडच्या बाबतीत, इंग्रजीची लंडनच्या आजूबाजूची उच्चवर्गीयांची बोली अन्य इंग्रजी बोलींच्या बाबतीत, अमेरिकेतल्या दोन-किनार्यांवरची बोली अमेरिकन इंग्रजीच्या बाबतीत, बेइजिंगची बोली चिनीच्या बाबतीत, सौदी अरबस्तानातील प्राचीन बोली अरबीच्या बाबतीत, या सर्व बोली कुठल्याकुठल्या ऐतिहासिक कारणांमुळे त्या त्या ठिकाणी प्रमाण बोली झाल्या आहेत. त्या त्या बोली ज्यांच्या घरगुती बोली आहेत त्यांच्यापैकी अशिक्षित लोकांना फुकटचा दुरभिमान होतो. हा प्रकार इतक्या ठिकाणी इतक्या लोकांत दिसतो की गडचिरोलीच्या (किंवा मालवणच्या) उदार लोकांची बोली प्रमाण झाली तर त्यांच्यातल्या काहीकाही लोकांना दुरभिमानाची बाधा ग्रसेल, असे माझे भाकित आहे.
अनेक आदिवासी जमातींचा प्रश्न भाषिकही आहे आणि आर्थिकही. महाराष्ट्रातल्या अनेक जमातींच्या भाषेच्या भगिनी आर्य नसून द्रविड आहेत. तरी यातील काही काही जमातींची लोकसंख्या बरीच कमी आहे, आणि त्यांच्या वसाहती सलग नसून मराठीभाषकांच्या गावांमध्ये विखुरलेल्या आहेत. लोकशाहीत त्या त्या जमातीने हे ठरवायचे असते, की नागर वस्तीशी समेट करण्यातला आर्थिक फायदा-तोटा काय? त्यांच्याशी मुळीच न बोलता आपली सांस्कृतिक अस्मिता टिकणार आहे काय, की नागर संकृतीशी व्यवहार करूनही ती टिकणार आहे? नागर लोकांच्या शासनव्यवहाराची जुलमी म्हणून कमीतकमी ओळख असावी, की नीट शिकून कार्यक्षम ओळख असावी? वेगवेगळ्या जमातींना परिस्थितीनुसार त्याची वेगवेगळी उत्तरे मिळायची शक्यता आहे. मावळातले ठाकर जुलुमानी गांजले आणि मराठी लोकांमध्ये न मिसळून नष्टप्राय झाले. मावळातलेच महादेव कोळी मात्र गावकरी मराठी संस्कृतीत सामावले. गडचिरोलीतल्या काही जमातींनी बंड केले. अशा प्रकारे प्रत्येक जमातीची कथा वेगळी. जे लोक आदिवासी नाहीत त्यांनीही या प्रश्नाबद्दल विचार करावा. ठाकरांना एका "वन्यजनसंग्रहालयामध्ये" ठेवून जतन करावे काय? (या प्रकारची मते काहींची असतात!) ठाकरांची बोली (खरे तर भाषा) ही वैज्ञानिक दृष्टीने कुठल्याही मानवी भाषेच्या तुल्य आहे, हे जाणून अवघ्या महाराष्ट्राला मुख्य शासनाची भाषा म्हणून शिकायला द्यायची काय? मग गोंडांचे काय घ्या? किंवा मराठीचा जुलूम होतो म्हणून ठाकर खेड्यांतून मराठी शिक्षक काढून टाकावे का? मग ठाकर शेतसारा कसा भरणार, निविदा सूचनांना उत्तरे कशी देणार? त्यासाठी राज्यसरकारने प्रत्येक गावात एकेक पगारी दुभाषा नेमावा काय? (हीच दहा वर्षांपूर्वी तरी तथ्य परिस्थिती होती, कपोलकल्पित नव्हे!) या पगारी दुभाषाचे आर्थिक पारतंत्र्य पत्करले तर मराठी शिकायचा सांस्कृतिक जुलूम नाही, ही वजाबाकी धन की ऋण येते? ठाकरांच्या विखुरलेल्या वसाहतींचे वेगळे राज्य बनवले तर मधल्या मधल्या मोठाल्या मराठी गावांचे काय करणार? हे सोपे प्रश्न नाहीत.
येथे माझ्या लेखांमध्ये एक मोठी त्रुटी राहिल्याचे लक्षात येते. "दक्खनी बोली ही हल्लीची प्रमाण बोली आहे." हा बर्याच लोकांना जुलूम वाटला तर लोकशाहीत महाराष्ट्राचे आपोआप तुकडे व्हावेत. (माझी वैयक्तिक इच्छा आहे की तुकडे होऊ नयेत इतकी तरी आपुलकी महाराष्ट्रात असावी.) भारतातल्या पंजाबचे तुकडे झाले (हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब), म्हणून एवढे काही वाईट झाले नाही. जगातल्या बर्याच बोली/भाषा भामटेगिरीनेच समृद्ध झाल्या आहेत. इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चिनी, अरबी या सर्व साम्राज्याच्या भाषा आहेत, संगिनींनी पसरवलेल्या आहेत. या भाषांनी राजधानीत वसवलेली शासनव्यवस्था ती भाषा आत्मसात करून शासन न उलथता जिंकायची, की शासनव्यवस्था उलटवून प्रत्येक भाषिक अस्मितेसाठी एकेक शासनव्यवस्था स्थापन करायची, यात कुठले अधिक सोयीचे, ते प्रत्येक जमातीने ठरवायचे असते. बेळगावात जुलुमी कन्नडाचा मराठी भाषकांकडून प्रतिकार होतो, आणि कारवारात कन्नड जोड भाषा म्हणून शिकण्यास कोकणी भाषकांचा काही मोठा विरोध होत नाही - आर्थिक/शासकीय सोयीचे आणि अस्मितेचे तोलमोल दोहोंनी वेगवेगळे लावले, त्यांच्या परिस्थितीत फरक असेल म्हणूनच.
माझे व्यक्तिगत मत विचारले, तर जगाच्या कुठल्याही "साम्राज्यकर्त्या" वर्तमानपत्रात छातीठोकपणे लिहिता येईल इतपत इंग्रजी मी शिकलो, याबद्दल मला विशेष लाज वाटत नाही. कित्येक इंग्रजी भाषकांना बाकीच्या भाषांबद्दल तिरस्कार असला, आणि स्वतःच्या घरगुती प्रमाण-इंग्रजी भाषेबद्दल दुरभिमान असला, त्याबद्दल उलट मला त्यांचीच कीव येते. दुसरा कोणी माणूस माझ्यापेक्षा वेगळे तोलमोल करून इंग्रजी साम्राज्याला झिडकारून आंतरराष्ट्रीय कंत्राटे झुलू भाषेत लिहील. एखाद्या ठिकाणी असे बंड यशस्वीदेखील होईल - त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.
माझ्या स्वतःच्या विद्यार्थ्यांना मात्र मी साम्राज्यकर्त्यांची प्रमाण इंग्रजी शिकण्याचा/लिहिण्याचा प्रेमळ आग्रह करतो. कारण जगातल्या सर्व सुंदर भाषा शिकायची माझी इच्छा असली तरी आता बुद्धीची शक्ती राहिली नाही. आणि या कमालीच्या हुशार विद्यार्थ्यांनी भाषिक बंड करायचे ठरवलेच, तर त्यांनी मला क्षमा करून दुसर्या शिक्षकाकडे जावे.
आणि मला प्रमाण इंग्रजीतले समृद्ध वाङ्मय वगैरे मनापासून आवडते. तसेच मराठेशाहीने ढालतलवारीने प्रमाण ठरवलेल्या मराठी बोलीबाबत.
सलाम!
वा धनंजयराव,
ज्या ताकदीने आपण माझ्या मतांचे खंडन केले आहे ते वाचून मी अगदी गार झालो आहे! आपल्या एखादा विषय विस्तृतपणे माडून, चपखल उदाहरणे खंडन करण्याच्या शैली बद्दल परत (नि परत परत!!) अभिनंदन!
कित्येक इंग्रजी भाषकांना बाकीच्या भाषांबद्दल तिरस्कार असला, आणि स्वतःच्या घरगुती प्रमाण-इंग्रजी भाषेबद्दल दुरभिमान असला, त्याबद्दल उलट मला त्यांचीच कीव येते.
या विषयी सहमत आहे! (हे मराठी भाषकांनाही तितकेच लागू! )
इंग्रजी साम्राज्याला झिडकारून आंतरराष्ट्रीय कंत्राटे झुलू भाषेत लिहील हे भन्नाट!!! :)
आणि मला प्रमाण इंग्रजीतले समृद्ध वाङ्मय वगैरे मनापासून आवडते. तसेच मराठेशाहीने ढालतलवारीने प्रमाण ठरवलेल्या मराठी बोलीबाबत.
क्या बात है! मलाही हे समृद्ध वाङमय मलाही आवडतेच!
मराठेशाहीला यात आणून आपण मला एकदम 'मुहतोड जवाब' देवून टाकला आहे!
तेव्हा या विषयातली मी माझी मते मागे घेतो (म्हणजे काय करतो?) व आपले विचार मान्य करतो! (म्हणजे हे करतो!)
शेवटी जेत्याची (आर्थिक किंवा इतर) भाषा हीच मुख्य भाषा असते हे मान्य करण्याशिवाय पर्याय नाही हेच खरे!
आपला
आता कोणती सहीच न उरलेला :((
गुंडोपंत
अप्रतिम
लेखमाला आणि प्रतिसाद दोन्ही अप्रतिम झाले आहेत. प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे वर्णन करण्यासाठी शब्द सुचणे अवघड होते आहे.
दुरभिमान वाढण्याचेच प्रमाण खूप आहे. हिंदीची प्रमाणबोली "खडी" बाकीच्या हिंदीभाषकांच्या बाबतीत..
खरे आहे. इटलीमध्ये तोस्काना भागातील बोली प्रमाण मानली जाते आणि याचा त्या भागातील लोकांना पुरेसा दुराभिमान आहे.
आणि मला प्रमाण इंग्रजीतले समृद्ध वाङ्मय वगैरे मनापासून आवडते.
समृद्ध हा शब्द अगदी अचूक आहे. मलाही इंग्रजीतील वाङ्मय आवडते. साधारण १८०० च्या पुढचे वाचताना विशेष अडचण येत नाही पण शेक्सपिअर वगैरे वाचताना तळटीपा नसतील तर वाचायला अवघड जाते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
बेहतरीन!
अप्रतिम लेख!
प्रमाण भाषेविषयी माझे हेच मत मी वेगवेगळ्या संकेतस्थळांवर गेले कित्येक महिने मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, पण मला म्हणावे तसे यश येत नव्हते. धनंजयांच्या नुसत्या शब्दांसरशी गुंडोपंतांचा बुरूज ढासळला. मिडास राजासारखी हात लावील त्याचे सोने करायची अशी किमया विरळा !--वाचक्नवी
असं नाही हां!
धनंजयांच्या नुसत्या शब्दांसरशी गुंडोपंतांचा बुरूज ढासळला.
असं काही नाही हां! (शब्दांनी मला काय होणार? कातडी पाहिली ना फोटो मध्ये कशी जाड आहे ती!?! :)) )
नुसते शब्द नव्हते हो! ते तर तोफगोळेच होते... एकदम मुलुख मैदान!
आमची दाणादाण उडाली...
आम्ही आपले गनिमीकावे वाले... ढाल तलवारवाली लोकं मग काय होणार?
तात्या तिकडे पळाले, आम्ही इकडे धावलो... पण काय करणार शेवटी गारद!
पण तरीही "जी बोललेली लिहिलेली कळते, ती ही भाषा एक प्रमाणभाषाच असते"
असा सावतासुभा नि तहाचा मसूदा आहेच! ;))
खुमखुमी जाणार नाही हो. अधुन मधून चकमकी सुरूच ठेवू ! ;)
आपला
विद्रोही
गुंडोपंत
~"जी बोललेली लिहिलेली कळते, ती ही भाषा एक प्रमाणभाषाच असते"~
नाक, सुंभ आणि लढेंगे.
वा! पंत , वा! बरे वाटले. तुमचे नाक अजून वर आहे आणि पीळ गेलेला नाही. 'बचेंगे तो और भी लढेंगे' ही तुमची जिद्द आम्हाला आवडली. असेच चालू द्या. --वाचक्नवी
वावा!
धनंजयराव, आपल्या लेखमालेतील भाग उत्तरोत्तर उत्कंठा वाढवणारे होत आहेत. वाचक्नवींना बेहतरीन असा शब्द स्फुरला तशीच काहीशी आमचीही अवस्था आहे. पुढे प्रतिसादातून झालेली, अनेक संलग्न मुद्द्यांचा उहापोह करणारी चर्चा, वादे वादे जायते तत्त्वबोधः चे उदाहरणच जणू. गुंडोपंताच्या चर्चेतील सहभाचेही कौतुक वाटले.
आपला
(आनंदित) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"
सुरेख!
लेखमालिका उत्तरोत्तर रंगतदार होत चालली आहे या वासुदेवरावांच्या निरीक्षणाशी सहमत आहे. हा भाग विशेष आवडला.
ई - शुद्धलेखन बद्दल
बद्दल लोकसत्ता-चतुरंग मध्ये आलेला हा लेख मजेदार आहे.
घरचा अहेर
हा लेख मीही उडत उडत वाचला होता. सावकाश वाचेन नंतर पण एक घरातली गोष्ट दाखवते. माझी हुशार गणली जाणारी भाचेकंपनी ऑर्कुटवर असते त्यापैकी वयवर्षे १६ काय लिहितो पाहा...
bin a long time since i had a chat wit u....ssup???
koll is goin on gr8....am fine here......how r u n d oters??
मलाही हे पाहून गुदमरल्यासारखंच होतं पण सांगून उपयोग होत नाही असा अनुभव आला. इथे स्पेलिंग येण्या न येण्याचा प्रश्न नसून वेळ कोणाला आहे इतक्यांशी बोलताना व्यवस्थित लिहायला असे असावे. ई-शुद्धलेखनाबाबत इतर भाषांचीही अशीच रड आहे की काय कोणास ठाऊक?
ई-लेखक/ कवींना या कारणासाठीही गांभीर्याने घेतले जात नसावे का काय असे मला वाटते. तशी उपरोल्लेखित पिढी हा अनेक अभ्यासांसाठी चांगला विषय आहे. (हे लिहून मी उगीच जागा भरते आहे. १०% आता आमचे कान ओढणार म्हणून.)
खरं आहे.
नवीन पिढीच्या कपड्यांप्रमाणेच शब्दांचाही आकार लहान होत आहे.
(नवीन पिढीचा प्रतिनिधी) आजानुकर्ण
थोडीशी पण फार काळजी नाही
खरे म्हणजे असे खूपच लघु-लेखन टेलिग्राफच्या तारांमध्ये सुद्धा होते. एसेमेस, इन्स्टंट मेसेंजरमध्ये सोय खूप आहे. हल्लीची पिढी महत्त्वाकांक्षी (चांगली या अर्थी) आणि "प्रॅक्टिकल" आहे. त्यामुळे या सोयीचा फायदा करून घेताना आपले म्हणणे कोणाला समजले नाही, तर ते त्यांच्या लक्षात लगेच येईल. महत्त्वाच्या उलाढाली या प्रकारे होऊ लागल्या की संक्षिप्त तरी सर्वमान्य असे संकेत निघतील - म्हणजे गैरसमज होणार नाहीत. सर्वमान्य संकेत म्हणजे एका प्रकारचे व्याकरण.
मग थोडीशी काळजी वाटते ती माझ्या स्वतःबद्दल. कारण असे संकेत तयार व्हायला दीड-दोन पिढ्या लागतात. ते संकेत सर्वमान्य होतील तोवर माझी शिकायची धमक कमी झालेली असणार, आणि मला निरक्षर म्हणून वावरावे लागणार.
तारयंत्राच्या काळातला संक्षिप्तपणाचा कहर म्हणून एक विनोद सांगतात. सिंधवर १८४३ साली विजय प्राप्त केल्यावर इंग्रज जनरल नेपियरने "peccavi" असा एकच लॅटिन शब्द असलेली तार राजधानीला पाठवली. त्याचा इंग्रजी अर्थ "I have sinned" - म्हणजे नुसते ऐकले तर "माझ्यापाशी सिंध आहे!" त्यावर उलटटपाली लॉर्ड डलहौसीने तार पाठवली "vovi", म्हणजे "I have owed", अर्थात "मी आभारी आहे". पण "owed" चा उच्चार "Oude"सारखा, म्हणजे नुसते ऐकले तर "माझ्यापाशी 'Oude' अवध आहे!" (तेही हल्लीच जिंकलेले होते). या तारा पाठवल्याच्या घटना सत्य नसल्या (हा "पंच" मासिकातला केवळ विनोदच असला) तरी कथा तशी गमतीदार आहे.
मुख्य म्हणजे संकेत ठरलेले असले की लोक त्रोटक आणि संक्षिप्त प्रकारे असंदिग्ध संवाद साधू शकतात. बाजारपेठेत वीसेक वर्षे वापरल्याशिवाय "सोय" "गैरसोय" "संक्षेप" "गैरसमज" याच्या मर्यादा आपल्याला ठरवता येणार नाहीत.
:)
तुम्ही गहू कोणत्या गिरणीत दळता?
अप्रतिम प्रतिसाद आहे. लोकसत्ता-चतुरंगला पाठवा ही विनंती...
खरे आहे!
मस्तच प्रतिसाद. :) आपल्याला असा पॉझिटीव ऍटिट्यूड आवडतो बॉ!
गणणे
पुण्यात 'गणणे' हे क्रियापद बाद होणे, स्क्रू ढिला होणे वगैरे अर्थाने मुलांच्यात वापरला जातो. मला हा शब्द नवीन होता.
प्रकाश घाटपांडे
निगेटीव्ह ऍटिट्यूड
धनंजय,
प्रतिसाद अप्रतिम आहे.
पण सर्वमान्य संकेत म्हणजे एका प्रकारचे व्याकरणनाही, तर त्यास भाषा म्हणतात. ;)
संकेत सर्वमान्य होतील तोवर माझी शिकायची धमक कमी झालेली असणार, आणि मला निरक्षर म्हणून वावरावे लागणार.
भाषेच्या सुरुवातीची अवस्था अशीच होती.त्यात सुधारणा होऊन आजची शुद्धभाषेची निर्मिती झाली.कदाचित आपल्या सारख्या शुद्ध भाषेच्या आग्रह धरणा-या मित्रांना आवडणार नाही,पण येणा-या काळात संकेताची भाषा रुढ होईल यात वाद नाही.
ता.क.लेखमालिका उत्तरोत्तर रंगतदार होत चालली आहे,या विचारांशी सहमत.
संकेताची भाषा
ज्या मंडळींना इतरांनी वापरलेले सांकेतिक शब्द माहीत आहेत त्यांनाच अशा भाषेत संवाद साधता येईल. हा गट नेहमीच छोटा असेल. मीही लहानपणी सांकेतिक भाषेत लिखाण करून ठेवले होते. आता त्याचा मलाच अर्थ लागत नाही. तसेच यांचे होईल. संकेत बदलले की भाषा बदलत राहील, पण ती पुढे ज्यांची त्यांनाच कळणार नाही. जोपर्यंत बदललेली भाषा पाठांतरात किंवा लेखी वाङ्मयात येत नाही तोपर्यंत ती रूढ होण्याची भीती नाही. आपण निरक्षर होण्याची शक्यता फार धूसर आहे. --वाचक्नवी
संकेताची भाषा आणि सोय
संकेतांची भाषा खूपच सोयीची असली आणि बर्यापैकी असंदिग्ध असली तर लेखनात येते, आणि दीर्घकाळ टिकू शकते. याचे प्रमुख उदाहरण म्हणजे गणितातले लेखी संकेत. कुठलेही गणिती तत्त्व पूर्ण मराठी वाक्यात म्हणता येते, पण ते पुष्कळदा सोयीचे नसते.
उदा :
"कुठल्याही अज्ञात बदलत्या आकड्याच्या वर्गाचे त्याच आकड्याच्या संदर्भाने कलन केले, तर बरोबर दोन गुणिले तोच बदलता अज्ञात आकडा येतो."
यापेक्षा खूप सोयीचे असे :
d/dक्ष(क्ष^२) = २क्ष
खरे म्हणजे गणितातल्या काही सांकेतिक खुणा इतक्या अर्थगर्भित असतात, की त्यांची एक ओळ "साध्या" मराठीत लिहिता लिहिता एक पान भरून जाईल. मग ती मराठी साधी तर मुळीच राहात नाही. गणितातल्या खुणा १००% असंदिग्ध आणि १००% सर्वमान्य व्हाव्या लागतात हे खरे. पण काही सांकेतिक खुणा म्हणा ९०% असंदिग्ध आणि ९०% सर्वमान्य झाल्या तरी चांगल्याच टिकाऊ होऊ शकतील.
समजा " :-) " ने एका मोठ्या मराठी/इंग्रजी वाक्याचा संक्षेप झाला, थोडासा संदिग्ध असला तरी चालेल - "मी हसतो आहे" की "मी खुश आहे" की "आपण हसूया" अशा थोड्या वेगवेगळ्या अर्थछटा संदिग्ध असल्या तरी चालेल. शिवाय केवळ बहुतांश लोकांनीच तो मानला तरी पुरे (अजूनही मी वयाने खूप मोठ्या प्राध्यापकांना ती खूण लिहून पाठवत नाही - काहींना ती मान्य नाही). तरी अशी खूण खूप टिकू शकेल.
म्हणूनच आदल्या आणि पुढच्या दोन्ही पिढ्यांशी सतत संवाद साधत असणे बरे. नाहीतर "बहुमान्य" झालेल्या काही खुणा आपल्याला फार उशीरा कळायच्या!
या खुणा लेखीशी संबंधित आहेत. व्याकरणाचा संबध खरा फक्त बोलीशी, लेखीशी फक्त बोलीकरवी मेहुणेसंबंध. नुसत्याच खुणांची नावे मोठ्याने म्हटली तर ती बोली भाषा होत नाही, आणि त्याचे व्याकरण विश्लेषण करत नाही. त्यामुळे 'डी-बाय-डी-एक्स् क्षवर्ग बरोबर दोन-क्ष' हे व्याकरणाच्या हद्दीबाहेर. तसेच जर कोणी तोंडाने "बा-स-ठी-क-लो-अ" असे म्हटले तर व्याकरणाच्या हद्दीच्या बाहेर. पण 'मी हहलोपो होऊन मग प्रकाटाआ लिहिले' हे पूर्णपणे व्याकरणाच्या हद्दीच्या आत.
भाषिक चिन्हे व संदेशन
भाषा ही संदेशन करीत असते. ब-याचदा हे संदेशन चिन्हाच्या पातळीवर असते.हावभावांची भाषा ही एका अर्थाने भाषिक चिन्हेच असतात किंवा उदाहरण म्हणजे ;) :) ही दोन चिन्हे घेऊ या यातून काही तरी भावना व्यक्त होतात.किंवा दुरवरच्या माणसाला आपण हात वर करुन खूणावतो हे संदेशन चिन्हच असते.भाषिक चिन्हांचा उपयोग माणूस आपल्या भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी करीत असतो परंतू स्वतंत्रपणे या चिन्हाला भाषिक संदेशनाइतके महत्व नसते कारण त्याला सर्वांनी मान्यता दिलेली नसते.त्याच्यातील एक अडचण अशी आहे की,भाषा ज्या समर्थपणे माणसातील भावना व्यक्त करते तितक्या स्पष्टपणे चिन्हभाषेचे संदेशन होत नाही.तरीही मी आपल्या वरील प्रतिसादासहित अगदी लोकसत्तेतील बातमी वाचून असे म्हणतो की,मराठीत किंवा इंग्रजीत येणारे i m gr8 किंवा अशा संकेतांना भविष्यात भाषा म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संकेताची भाषा
माझे वाक्य होते:
जोपर्यंत बदललेली भाषा पाठांतरात किंवा लेखी वाङ्मयात येत नाही तोपर्यंत ती रूढ होण्याची भीती नाही.
श्री. धनंजयांनी गणिती सांकेतिक भाषेबद्दल लिहिले आहे ते सर्वमान्यच आहे. तशी भाषा रूढ झाली , कारण ती लिखाणात आली. पाणिनीची किंवा संस्कृतमधील अन्य सूत्रात्मक सांकेतिक भाषा त्या क्षेत्रात रूढ झाली , कारण ती पाठांतराद्वारे संबंधितांत पोचली.
आता जी लघुसंदेशांची सांकेतिक भाषा आहे, ती तमाम जनतेत पोचून मोठ्या कालावधीसाठी रूढ होण्याची तितकीशी शक्यता वाटत नाही. अर्थात कुणी सांगावे? साथीचा रोग फार झपाट्याने पसरतो. --वाचक्नवी
देहबोली
"ठीक आहे" असे शब्द आणि त्यासोबत"ठीक नाही" असा अर्थ व्यक्त् करणारी देहबोली जेव्हा एकाच वेळी बाहेर पडते त्यावेळी देह बोली निर्णायक वा प्रभावी ठरते. प्रमाणभाषा ही वरण भात असेल तर् देहबोली ही मिसळपाव आहे. कुठल्याही भाषेला देहबोलीची जोड नसेल तर ती प्रभावी ठरु शकत नाही. गावाकडे एका बाईच पुजा सांगणार्या एका माणसाशी भांडण झालं. लैंगिक शब्दांचा यथेच्छ वापर दोन्ही बाजुनी. शेवटी बाईनी " बाम्हनाचा मानुस मराठ्याच्या बाईला............................." जो देहबोलीचा पट्टा सोडला त्याल तोड नाही. शब्दांकनाने फार तर अर्थ समजेल, पण देहबोलीने अन्वयार्थ समजतो.
प्रकाश घाटपांडे
मराठवाड्याचा अनुषेश
श्री. धनंजय,
आपले भाषेवरील प्रभुत्व पाहून आम्ही थक्क झालो आहोत. अर्थात माझे आजून या अगोदरचे भाग वाचने बाकी आहेत. उत्सुकता आहे ती तुम्ही आमच्या मराठवाड्याचा अनुषेश कसा भरला आहे ते पाहण्याची.
आपला,
(प्रभावित) भास्कर केन्डे