व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त)

या भागात या लेखमालेचा समारोप होतो आहे. सुरुवातीचा मुद्दा हा की अभ्यास करताना व्याकरणाचे दृश्य आणि कार्यकारी स्वरूप काय असते? खरे तर या मुद्द्याने शेवट होऊ शकतो.
तरी पुढचा एक वर्णमालेबद्दल मुद्दा मी का जोडला असा प्रश्न पडू शकतो. पूर्ण संवादाचा डोलारा या पायावर बांधायला लागलो, की लोकांमध्ये शब्द-अर्थ संबंध आधीपासून ठरलेला आहे. आणि या लोकांत नित्य अर्थपूर्ण पण विशाल शब्दप्रपंचाची थोडक्यात व्यवस्था लावता यावी म्हणून आपण पुढे नियम सांगणार आहोत. पण वर्णमालेची गोष्ट वेगळी. एकेका वर्णाला अर्थ तर काहीच नसतो. मग त्याचा व्याकरणाशी संबंध काय? पुढे व्याकरणाचे नियम करताना उच्चारांची गणना करताना सोय व्हावी, आणि आपल्या भाषेत कुठले कुठले उच्चार चालतात त्यांची वर्गवारी लावण्यासाठी, म्हणून व्याकरणातच वर्णमालाही सांगतात. [वर्णमालेबाबत एक तपशीलवार लेखमाला (समज-गैरसमज,उच्चारक्रिया,व्यंजने,स्वर,शेवट) उपक्रमावर उपलब्ध आहे.]

ही लेखमाला येथे संपवत असल्यामुळे वर्णमालेचा हा संक्षिप्त विचार "परिशिष्ट"वजा वाटतो. मूळ महाभाष्यात हे प्रस्तावना-प्रकरण संपले की वर्णमाला प्रकरण सुरू होते. तिथे हे विवेचन परिशिष्ट नसून तर्कसंगत क्रमानेच आलेले आहे. मुख्य म्हणजे भाष्याच्या प्रस्तावनेतला भाग संस्कृतालाच नव्हे तर अन्य भाषांनाही लागू आहे. व्याकरणाचा आणि शब्दकोशाचा संबंध काय -वगैरे प्रश्न इथे हाताळले आहेत. म्हणून तो मुद्दा मी या लेखमालेत समाविष्ट केला. भाष्यातले पुढचे वर्णमालेचे प्रकरण फक्त संस्कृतालाच लागू असल्याकारणाने त्या सीमेवर ही मराठीकरणाची मालिका संपवतो आहे.

सांगता करताना ही समीक्षा केली पाहिजे की या लेखमालेची प्रयोजने काय होती, ती साधली गेलीत काय आणि लेखमालेच्या मर्यादा काय?
एक प्रयोजन हे की (१) महाभाष्याची ओळख करून देणे. महाभाष्याचे नाव पुन्हापुन्हा बोलून ते साध्य झाले. पण ही ओळख खरीखरची करायची होती, तर भाषांतर मुळपाठ्याशी अधिक समांतर (जमेल तर शब्दशः) हवे होते, आणि मध्येमध्ये माझ्या मनाप्रमाणे खूपच कालबाह्य उदाहरणे द्यायचे कारण नव्हते. संस्कृतामध्ये आणि मूळ ग्रंथामध्ये रस वाटला तर वाचकांनी महामहोपाध्याय काशीनाथशास्त्री अभ्यंकरांचे महाभाष्याचे मराठी भाषांतर जरूर वाचावे.
दुसरे प्रयोजन हे की (२) त्या काळातल्या वैयाकरणांना, नव्हे अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे होते. येथे मधून मधून मी तशी दृष्टी जिथे प्रकर्षाने जाणवते, तिथे मुद्दामून निदर्शनास आणली आहे. आजकल प्राचीन वैचारिक साहित्याची फाजील पूजा करून, पुष्कळदा आपण त्यातले कठोर प्रश्न विचारून सत्य पडताळणारे मर्म विसरतो. अशा अशिक्षित पूजेत त्या विचारवंतांचा अपमान होतो असे माझे मत आहे. "पुराणकाळात रॉकेटे आणि अणुबाँब होते" अशी आत्मप्रौढी बंद होऊन, "काटेकोर उलटतपासणी करून सत्याची शहानिशा करणारे तल्लख विचारवंत होते" असे आपण भारतीयांनी अभिमानाने सांगावे, अशी माझी इच्छा आहे. पण हेच जर सांगायचे असते, तर चपखल उदाहरणे देऊन वेगळ्या प्रकारे लेख लिहायला हवा होता. थोडी व्याकरणातली, थोडी न्यायशास्त्रातील, थोडी मीमांसेतील, थोडी आयुर्वैद्यकातील अशी चौफेर उदाहरणे द्यायला हवी होती. पण त्यांपैकी पुष्कळ विषयांचे माझे वाचन जुजबी आहे. त्यात रस उत्पन्न झाला तर वाचकांनी ती शास्त्रे जरूर पडताळावीत.
तिसरे प्रयोजन हे की (३) मराठीची उदाहरणे देऊन ही चर्चा पूर्ण मराठीमय करायची, इतकेच नव्हे तर आजच्या मराठी भाषेबद्दल भाष्य करायचे. यात सर्व उदाहरणे मराठीतच आहेत, आणि सर्व दाखले आजच्या समाजाला लागू आहेत. पण हेच जर प्रयोजन असते, तर पतंजलींचा ऋणनिर्देश करून, फक्त त्यांची प्रश्नोत्तराची शैली उचलायला हवी होती. इथे तर अर्धेअधिक सरसकट वाङ्मयचौर्य केलेले आहे.
तर ही तीन्ही प्रयोजने थोडीथोडी साधली आहेत आणि थोडीथोडी फसली आहेत. या मर्यादा जाणून ही लेखमाला वाचली तर उंच अपेक्षांचा भंग होणार नाही, आणि विचारांना चालना देणारे मनोरंजन होईल अशी आशा आहे.

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

*****************भाग ७**************************
आक्षेप : आता हे व्याकरण म्हणजे नेमके कसे असते? ही चीजवस्तू काय?
उत्तर : व्याकरण म्हणजे सूत्र किंवा नियम.

आक्षेप : मग "व्याकरणाचे नियम" असा प्रयोग का करतात? अमक्याचे तमके असे म्हटले की वाटते की "अमके" आणि "तमके" या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिवाय तुम्ही म्हणालात की व्याकरणाने शब्दांचे ज्ञान होते. ढिम्म बसलेल्या नियमांनी थोडेच असे ज्ञान होणार आहे?
प्रत्याक्षेप : मग कशाने होते म्हणता?
आक्षेप : नियम लागू कसे करायचे त्या गतिमान व्याख्येने.
प्रत्याक्षेप : अहो, नियम म्हणजेच नियम लागू करण्याची पद्धतही आहे, असे नाही का?
आक्षेप : नाही. नियमाचे नीट व्याख्यान म्हणजे उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि काटेकोर मर्यादा सांगणे.

आक्षेपकर्ता वेगळे उत्तर सुचवतो : बरे तर. शब्द म्हणजेच व्याकरण असे म्हणू.
प्रत्याक्षेप : वि+आ+करण म्हणजे विशेष आकार (बदल) करून शब्द सांगणे. म्हणजे बदल घडवणारे व्याकरण शब्दापेक्षा वेगळे असे काहीतरी आहे. मग बदल घडवणारे काय असते, म्हणता? बदल घडवणारे नियम असतात.
प्रत्याक्षेप २ : "अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे" असे लोक म्हणतात. "व्याकरण=शब्द" असे ठरवले तर "अमक्यातमक्या आचार्याच्या मते शब्द असे आहेत" असा चुकीचा अर्थ निघेल. चुकीचा का म्हणता? कारण शब्द हे कुठल्या आचार्याच्या आधीचे आणि नित्य आहेत अशी आपली चर्चा झाली आहे. "अमक्यातमक्या आचार्याच्या मते नियम असे आहेत" म्हटले तर काहीतरी अर्थ निघतो.
प्रत्याक्षेप ३ : आचार्यांची मते सोडा, म्हणता? ज्या अर्थी लोकांना शब्द आणि अर्थ यांच्यातला संकेत माहीत आहे, त्यापैकी प्रत्येक संकेत मिळून व्याकरण तयार होते असे म्हणून चालणार नाही. कारण हे संकेत एकेक करून शिकायला आपल्याला आयुष्य पुरणार नाही हे आपण आधीच बघितलेले आहे. अनेक शब्दांची एका नियमाने वासलात लागणार असली, असे थोडेच नियम आणि अपवाद संकलित केले तरच हा अभ्यास शक्य आहे.

वेगळे समाधान : मग असे म्हणूया का, की शब्द आणि नियम या दोहोंचे मिळून व्याकरण बनते?
आक्षेप : "व्याकरणाचे नियम" आणि
"अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे" असे प्रयोग चालू शकतील का?
समाधान : होय. "नियम" आणि "शब्द" दोन्ही व्याकरणाचे अवयव आहेत. त्यामुळे "शरिराचा अवयव" म्हणतो, तसे "व्याकरणाचे नियम". आणि तसेच "अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे" म्हणजे "अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरणाचे नियम असे आहेत".

पुन्हा पहिले समाधान : तरी खरे म्हणजे शब्द आधीपासूनच असतात, त्यामुळे अभ्यास करण्यासारखे वेगळे नवीन असे नियमच आहेत. त्यामुळे "व्याकरण म्हणजे नियम" असेच म्हणूया.
आक्षेपाचे स्मरण : ढिम्म बसलेल्या नियमांनी थोडेच असे ज्ञान होणार आहे? नियमाचे नीट व्याख्यान म्हणजे उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि अशाप्रकारे काटेकोर मर्यादा सांगणे.
समाधानसाधक : अहो, "उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि अशाप्रकारे काटेकोर मर्यादा सांगणे" हे नियम शिकवण्याची पद्धत आहे.
पद्धतीची आणि खुद्द नियमाची गफलत करून चालणार नाही. मूळ नियमच काटेकोरपणे सांगितला तर पुरे. जो तो विद्यार्थी नियम समजून घेताना शिक्षकाकडून आपल्याला समजतील अशी उदाहरणे, प्रत्युदाहरणे शिकेल. शिकल्यानंतर नियम बदलत नाही, शिकतानाची उदाहरणे आणि प्रत्युदाहरणे लक्षातच ठेवली पाहिजेत असे काही नाही.
(विषय संपला.)

आक्षेप : तुम्ही सुरुवातीला शब्द-अनुशासनाबद्दल सांगितले. पण व्याकरणात वर्णमालेबद्दलही शिकतात ते का?
समाधान : शास्त्र सांगताना सोयीचे जावे म्हणून एका क्रमात एकापाठोपाठ वर्ण ठेवून त्यांचा उच्चार करून सांगणे हे प्रयोजन आहे.
आधीचे इतके-इतके वर्ण स्वर, त्याच्यापुढचे इतके-इतके वर्ण व्यंजने असे सांगायची सोय होते.

(आणखी एक समाधान सुचवले जाते.)
*इष्ट उच्चार शिकवण्यासाठी ही * (कात्ययन)
वर्णमाला सांगून इष्ट उच्चार कुठले ते सांगितले जाते. कोणीतरी सांगितल्याशिवाय आपल्या भाषेत थोडेच उच्चार चालतात
आणि परभाषेतले सगळे उच्चार आपल्या भाषेत नाहीत ते कसे कळणार?

(या समाधानाला) आक्षेप : सगळेच इष्ट उच्चार सांगायचे होते तर अतिह्रस्व, नाकातले स्वर, आघात केलेला स्वर हे सगळे वर्णमालेत सांगावे लागतील.

*केवळ वर्णांची सामान्य आकृती सांगितली तरी बाकी सगळे उच्चार कळतात* (कात्यायन)
'इ' आणि 'ई' यांच्या ध्वनीची फक्त आकृती सांगितली की पुरे. ते शब्दांत अति-ह्रस्व किंवा खूप दीर्घ येतात, किंवा आघात करून उच्चार करावे लागले तर वर्णाची आकृती तीच राहाते. तसेच 'उ', 'ऊ'बद्दल.

आक्षेप : नुसती आकृती सांगितली तर बाकी सर्व प्रकार आपोआप सांगितले जातात असे म्हणतात, तर मग प्रामादिक उच्चारही बरोबर म्हणून सांगितले जातील. मग तसा प्रामादिक उच्चार करू नये म्हणून वेगळे वर्णमालेच्या पुढे पुन्हा तळटिपेत सांगावे लागेल.
प्रत्याक्षेप : हे "प्रामादिक" उच्चार कुठले?
आक्षेप : "प्रामादिक" म्हणजे
बरळलेला उच्चार, एक उच्चार सुरू केल्यावर अर्धवट सोडून दुसरा उच्चार सुरू करणे, धापा टाकताना खूप नि:श्वास टाकून, किंवा खूप उथळ श्वास घेऊन केलेला उच्चार, गाताना ताना घेताना वेडावाकडा केलेला उच्चार, एक ना दोन!
समाधान : अहो, हे प्रामादिक उच्चार प्रसंगामुळे कधीकधीच चुकून तोंडातून बाहेर पडतात. भाषा शिकताना ते कोणीच शिकत नाही. त्यामुळे वर्णाची आकृती सांगितली म्हणजे हे सगळे चुकीचे उच्चार सांगितले असे होत नाही. त्या वर्णांच्या आकृतींसारखे लोक शिकतात तेच उच्चार ग्रहण केले जातात.
आक्षेप १ : प्रयोजन काय ते एक नीट सांगा : सोयीच्या क्रमात सांगायचे, की इष्ट उच्चार सांगायचे?
आक्षेप १चे समाधान : दोन्ही प्रयोजने आहेत.
आंब्याच्या झाडाखाली हात धुतले तर हातही स्वच्छ होतात, आणि झाडाला पाणीही मिळते.

आक्षेप २: लोकांनी सुरुवातीला चुकीचाच, धापा टाकताना, किंवा बरळलेला उच्चार ऐकला तर? मग तुम्ही वर्णाच्या आकृती सांगा तरी त्या चुकीच्या उच्चारांचे ग्रहण होईल.
प्रत्याक्षेप : काय काय चुकीचे ऐकायला मिळणार आहे?
आक्षेप : व्याकरणात बदलताना जे तुम्ही प्रत्यय वगैरे जोडता ते.
समाधान : प्रत्यय वगैरे आम्ही सांगूच ना - तेव्हा नीट उच्चार करून सांगू.
आक्षेप : जे बदलणार आहेत ते मूळ शब्द चुकीचे ऐकायला मिळतील.
समाधान : जे तुमच्या शास्त्रात बदलणार आहेत ते मूळ शब्द शब्दकोशात दिले आहेत. तिथे त्यांचा निर्दोष उच्चार दिलेला आहे.
आक्षेप : बाकी काही शब्द आहेत, ते बदलत नाहीत, ते शब्द चुकीचे ऐकायला मिळतील.
समाधान : ते ही शब्द शब्दकोशात दिले आहेत. तिथे त्यांचा निर्दोष उच्चार दिलेला आहे.

येथपासून व्याकरणाचे नियम शिकायला सुरुवात करता येईल. कारण या शास्त्राची मुख्य तत्त्वे सांगितली (परतीच्या क्रमाने):
(१) सोयीसाठी वर्णमाला सांगू,
(२) जास्तीतजास्त शब्दांचे वर्णन कमीतकमी "नियम" आणि "अपवाद" सांगून करू,
सर्वात मुख्य (३) लोकांना बोलायला आपल्या शास्त्रातले नियम लागत नाहीत, उलट आपल्या नियमांची परीक्षा "लोक काय बोलतात" याने करायची असते,
(४) आपली बोली आपल्याला न शिकता येते. तरी दूरच्या मराठी लोकांशी बोलण्यासाठी, आपल्या आदल्या -पुढल्या पिढ्यांशी पुस्तकरूपाने संपर्क साधण्यासाठी, मराठीच्या जमतील तितक्या बोली (कमीतकमी प्रमाणबोली तरी) जरूर शिकाव्यात. हे आपण वावर आणि व्यासंगाने करू शकतो, किंवा भाषेच्या अभ्यासाने, आपली मर्जी.
मराठी भाषेचा आणि तिच्यावर प्रेम करणार्‍यांचा उत्कर्ष होवो अशी ही लेखमालेची इतिश्री.

Comments

पारिभाषिक संज्ञा-संन्यासाचा भंग

येथे "अतिह्रस्व" आणि "प्रत्यय" हे पारिभाषिक शब्द वापरलेले आहेत. आणखी थोडे असतीलही. या लेखमालेत पारिभाषिक शब्द जमले तर वापरायचेच नाही असे मी स्वतःला बंधन घातलेले होते. या सर्व ठिकाणी त्या त्या शब्दाच्या ठिकाणी "व्याकरणातले काहीबाही *%*#*" असे वाचले तरी बहुतेक ठिकाणी काम चालते, आणि लेखाचा अर्थ लागतो.

अभिनंदन आणि धन्यवाद!

या ज्ञानयज्ञाची यथोचित सांगता झाल्याबद्दल अभिनंदन! लेखमालिकेसाठी आपण घेतलेले कष्ट आणि विषय शक्य तितका सोपा करून सांगण्याची आपली हातोटी वाखाणण्यासारखी आहे आणि याबद्दल वाचकांतर्फे तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच. यापुढे कोणत्या विषयावर लिहिण्याचा मानस आहे?
या लेखाचे प्रास्ताविक आणि पुढे आक्षेपांतून झालेली चर्चा वाचनाचा एक वेगळाच आनंद देऊन गेली.
आपला
(आनंदित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

धन्य! धन्य!

धनंजयराव,
या लेखमालेला यथोचित समाप्तीपर्यंत नेण्याच्या कार्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद. आपले लेखन खरोखर सुंदर आहे.
अर्थात् एवढ्या एका वाचनाने आमच्या डो़क्यांत पूर्ण प्रकाश पडेल असे नाही. जमेल तेव्हा पुनःपुन्हा येऊन पारायणे करावी लागणार हे उघड आहे. परंतु दाखविलेली दिशा सुस्पष्ट आहे.
शेवटी हे आग्रहाचे सांगणे आहे की आपल्या एवढ्याशा व इतक्या सूत्रमय लेखनाने आमची तहान भागलेली नाही.
आपण आणखी खूप, सविस्तर व दीर्घकाळ लिहावे. आपल्या मते काही विषयांचा आपला व्यासंग जुजबी असला तरी आमच्या मानाने तो अफाटच असणार. तेव्हा इतर ठिकाणांकडे नुसते बोट दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष काही ज्ञानबिंदू आमच्या पात्रांत आपणच ओतावेत ही विनंती
- दिगम्भा

व्याकरण महाभाष्य :प्रस्तावना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
महाभाष्याचा प्रस्तावने वरील हे सातही लेख अप्रतिम आहेत. एकाहून एक सरस आहेत.परंतु ही प्रस्तावना साकल्याने समजून घेण्यासाठी हे सर्व लेख सलगपणे वाचता यायला हवेत.(जसे आपण पुस्तक वाचतो तसे.) जेव्हा अवश्यक वाटेल तेव्हा मागच्या पानावर सहजपणे जाता यायला हवे. मला तरी हे सगळे एका वाचनात समजण्यासारखे नाही.सावकाशपणे वाचत, समजले नाही ते पुनः पुन्हा पहात गेले तर काही समजेल. म्हणून अशा प्रकारे वाचनाची सुविधा आवश्यक वाटते.
..........यनावाला.

तर्कशुद्ध विचार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितात :
......................." दुसरे प्रयोजन हे की (२) त्या काळातल्या वैयाकरणांना, नव्हे अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे होते. येथे मधून मधून मी तशी दृष्टी जिथे प्रकर्षाने जाणवते, तिथे मुद्दामून निदर्शनास आणली आहे. आजकल प्राचीन वैचारिक साहित्याची फाजील पूजा करून, पुष्कळदा आपण त्यातले कठोर प्रश्न विचारून सत्य पडताळणारे मर्म विसरतो. अशा अशिक्षित पूजेत त्या विचारवंतांचा अपमान होतो असे माझे मत आहे. "पुराणकाळात रॉकेटे आणि अणुबाँब होते" अशी आत्मप्रौढी बंद होऊन, "काटेकोर उलटतपासणी करून सत्याची शहानिशा करणारे तल्लख विचारवंत होते" असे आपण भारतीयांनी अभिमानाने सांगावे, अशी माझी इच्छा आहे. "

त्यांच्या या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे. या सात लेखांतून उद्धृते घेऊन वैज्ञानिक दृष्टी नेमकी कुठे आणि कशी दिसते हे दाखविण्यासाठी एक लेख लिहावा असे मला प्रकर्षाने वाटते. चांगला मनाजोगा जमला तर इथे देईन.

........यनावाला.

मस्त रे !

धनंजय,
सातही भाग उत्तम झाले आहेत हे लेख भाषेविषयी विवेचनासाठी भाषाभ्यासकांना संकेतस्थळावरील संदर्भ म्हणून उपयोगात येईल असे वाटते.आपल्या लेखांचे पुन्हा पुन्हा वाचन केले तरच ते लक्षात राहतील हे मात्र खरे आहे,आम्हीही तसाच प्रयत्न करु !
पुन्हा एकदा आपले मनापासून अभिनंदन !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्याकरणशास्त्र

इतके वाचूनसुद्धा व्याकरणाची नक्की व्याख्या समजलीच नाही. मोरो केशव दामले(१९११) व्याकरणाची व्याख्याच करत नाहीत. ते करतात व्याकरणशास्त्राची व्याख्या! ते लिहितात " भाषेचा व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमांस अनुसरून होतो हे ज्या शास्त्रात सांगितले असते, त्याला व्याकरणशास्त्र असे म्हणतात. "..."भाषा म्हणजे मनातली कल्पना मनातल्या मनात किंवा बाहेर प्रकट करण्याचे जे साधन त्यास भाषा असे म्हणतात. "...'भाषा दोन प्रकारची:-स्वाभाविक आणि सांकेतिक. (अ) आवाज, चेहरा व हावभाव ह्यांच्या खुणांनी होणार्‍या भाषेस स्वाभाविक भाषा म्हणतात. ही सर्व प्राण्यांत दृष्टीस पडते. (आ) अमुक खुणेने किंवा शब्दाने अमुक कल्पनेचे किंवा अर्थाचे ग्रहण करावे, अशा प्रकारच्या संकेताने ठरलेल्या भाषेस कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असे म्हणतात. ..सांकेतिक भाषेचे अनेक प्रकार--नेत्रपल्लवी, करपल्लवी इत्यादी अनेक" . वाहतूक नियंत्रणाचे दिवे, बोटीवर लावायचे झेंडे, मूकबधिरांची भाषा या प्रकारात मोडतात. "त्यांतला महत्त्वाचा प्रकार म्हणजे वाणीच्या द्वारे उत्पन्‍न होणारी शब्दमय किंवा वैखरी वाणी होय. वैखरी वाणी उच्चारण्याचे किंवा लिहिण्याचे जे शास्त्र ते व्याकरण."
श्री. धनंजयांची स्तुती करणे आता मी सोडून दिले आहे. प्रत्येकाच्या स्तुतीने जर त्यांच्या अंगावर मूठमूठ मांस चढायला लागले तर अनवस्थाप्रसंग ओढवेल..--वाचक्‍नवी

अभिनंदन

लेख वाचायला उशीर झाला म्हणून उशीरा प्रतिसाद. लेखमाला उत्कृष्ट होती. ती खुलवून सांगण्याची हातोटी तर अप्रतिमच. आभारी आहे.

यनावालांनीही वर म्हटल्याप्रमाणे लेख टाकावा.

कौतुकास्पद

धनंजय,

लेखमाला आवडली. त्यामागचा अभ्यास (व्यासंगच) आणि प्रयत्न तर खूपच मोठा आहे हे तर उघडच आहे , त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे! एका अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेखमालेबद्दल आपले अभिनंदन.

सुधारणा एकच सुचवावीशी वाटते ते म्हणजे ही लेखमाला ७ ऐवजी २-३ भागात एकत्रित केल्यास आणि सुरूवातीलाच लेखमालेचा उद्देश (प्रयोजन) आणि स्वरूप स्पष्ट केल्यास ते वाचणार्‍याला सोपे होईल. (७ वा भाग वाचल्यावर तुम्ही हा विषय का निवडलात ते कळले, त्यामागचे प्रयोजन समजले आणि ते का वाचायला पाहिजे ते अधिक स्पष्ट झाले - हेच आधी कळते तर मी तरी वाचले त्याहून जास्त कुतुहलाने लेख वाचले असते). अर्थात हे सर्व ज्यांना या विषयातले (फारसे - का काहीच) कळत नाही अशा माझ्यासारख्या लोकांना सोपे जावे म्हणून!

लेख जोडून संकलन केले पाहिजे खरे

तुमचे म्हणणे पटले - छोटे-छोटे भाग जोडून लेखाचे संकलन केले पाहिजे. माझ्या मनात मात्र हे "लेख" पेक्षा "चर्चेचे प्रस्ताव" होते. खरे म्हणजे जितके लेखांतून सांगितले गेले, तितकेच प्रतिसादांतून उपक्रमींनी पुरवले.

प्रयोजने मात्र मी पहिल्या भागाच्या सुरुवातीलाच (एका छोट्या परिच्छेदात) सांगितली होती बरे का! :-)
१. महाभाष्य गमतीदार आहे २. आजही आपण विचार करत आहोत ते प्रश्न तिथे आहेत ३. उदाहरणे/दाखले बदलून मराठीकरण करणार आहे
तीच प्रयोजने पुन्हा वेगळ्या शब्दांत इथे संकलित केली आहेत. प्रयोजनांचे समीक्षण मात्र लेखन पूर्ण केल्यावरच आता शक्य झाले.

क्रमशः लिहिण्यात अशी थोडी गडबड असते. साधारणपणे मी प्रास्ताविक परिच्छेद पूर्ण लेख लिहिल्यानंतर रचतो. प्रतिसादांतून माहिती आणि सुधारणा अंगीकारून हे लेख कधी एकत्र केले, तर प्रास्ताविक परिच्छेद पुन्हा नीट लिहायला लागेल.

सहमत आहे

लेखमाला उत्कृष्ट

मनोगताच्या धर्तीवर या मालेतील प्रत्येक लेखात "या सोबत वाचा" असे दुवे दिल्यास ते वाचकांसाठी फारच उपयुक्त ठरेल.


आम्हाला येथे भेट द्या.

महाभाष्याची नवीन आवृत्ती

संस्कृतामध्ये आणि मूळ ग्रंथामध्ये रस वाटला तर वाचकांनी महामहोपाध्याय काशीनाथशास्त्री अभ्यंकरांचे महाभाष्याचे मराठी भाषांतर जरूर वाचावे.
महाभाष्याचे अभ्यंकरलिखित मराठी भाषांतर आता उपलब्ध आहे. एकूण सात खंड, प्रत्येक खंडाची किंमत ५०० रुपये.-वाचक्‍नवी

 
^ वर