व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ३
या भागासाठी तीन गोष्टींची खूप गरज होती : (१) मराठीतील संतवाङ्मयापासून ललित वाङ्मयापर्यंत सखोल व्यासंग, (२) मराठीतील ऐतिहासिक आणि कायद्याचे दस्ताऐवज, वृत्तपत्रकारिता यांचे उत्तम ज्ञान, आणि (३) मुद्देसूद विनोदबुद्धी. वाचकाने विनोदबुद्धी स्वत:हून आणली तर यातील एकषष्ठमांश गरजा तरी भागतील.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ३**************************
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे? (पुढे चालू)
उत्तर (पुढे चालू) : आणखी प्रयोजने हवीत काय - वाटेल तेवढी घ्या! ही पुढची एक-एक करून सांगतो -
परप्रांतीयांचे मराठी, दुष्ट शब्द, निर्जीव शब्द, असंबद्ध बोलणे, इश्श, हारी पडलो आता, प्रायश्चित्त, अकार चरण युगुल, आम्हां घरी धन, जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी, चावुण्डराजें, चार स्थळे, कुणी हीस पाहोनि
(मुळात : असुर लोक मंत्र म्हणताना चुका करतात म्हणून त्यांचा यज्ञ फसतो.) परप्रांतीयांचे मराठी - हुबळीहून आलेली सून, विरहात म्हणे "आमचे नवरे गेले", पांचाळी पाचही संपले का? परप्रांतीयांना मराठीत आदरार्थक बोलण्याचे नियम, "गेले" एका विशिष्ट प्रकारे म्हटले की "वारले" असा अर्थ होतो, असे बारकावे कळत नाहीत. मराठी माणसाशी कामापुरते बोलायची मारामार, मनातले बोलून सांगणे कठीण जाते. मराठीभाषकांचे आपापसात असे होऊ नये. म्हणून भाषेतले बारकावे शिकावे.
दुष्ट शब्द - (मुळात : इंद्राला मारायला यज्ञ करून वृत्राला जन्माला घातला, पण यज्ञातला एक शब्द चुकल्यामुळे इंद्राने वृत्राला मारले.) आनंदीबाईने मुद्दामून ध चा मा केला काय, आणि रघुनाथरावाने चुकून केला काय, राजाज्ञेतील दुष्ट शब्दाने खून होणारच. अनवधानानेही महत्त्वाच्या ठिकाणी चुकीचा शब्द बोलला जाऊ नये. म्हणून शब्दांचे ज्ञान शिकावे.
निर्जीव शब्द - लेखी (मुळात वेद) शब्द वाचताना कुठे जोर द्यायचा, कुठे हेल द्यायचा ते माहीत नसले, तर वाचलेले शब्द सरदलेल्या काडीसारखे मुळीच पेट घेत नाहीत. लेखीचा प्रकट बोलीशी संबंध कळावा म्हणून व्याकरण शिकावे.
असंबद्ध बोलणे - सभांमध्ये लोकांना आपल्याबाजूने जिंकायचे असेल, तर चतुर लाघवी शब्दच तो विजय मिळवून देतात. असंबद्ध अपशब्द बोलणे पराजय देते. म्हणून शब्दांवर प्रभुत्व मिळवावे.
इश्श - बायकांच्यात इश्श, गडे, वगैरे म्हणतात. लहान बाळे एकएक अक्षर दोनदा बोलून अर्थ समजतात आणि बोलतात दुदू, शिशी, वगैरे. भाषेच्या या लकबी कुठे कोणाशी ठीक ते जाणले पाहिजे, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे. (मुळात : पुरुषांनी बायकी आणि बालिश लकबी वापरू नयेत असे उदाहरण.)
हारी पडलो आता - नागपुरात एकटी राहाणारी बाई एकटे असल्याची भीती दूर व्हावी म्हणून दुर्गेचे व्रत करते. ती देवीच्या आरतीत म्हणते "हारी पडलो आता संकट निवारी". हे एक तर कोरडे पाठांतर आहे, नाहीतर पुरुष कवीच्या दृष्टीतून विचार. दुसरी बाई म्हणते "हारी पडले आता संकट निवारी". ही बहुधा स्वत:च्या मनातले बोलते आहे. (मुळात एका विशिष्ट मंत्रातल्या बदलाबद्दल सांगितले आहे.)
प्रायश्चित्त : (मुळात चुकीचे शब्द बोलून पाप लागते, त्यासाठी सारस्वती नावाचे प्रायश्चित्त करावे लागते. नको ते, असे.) लिहिलेल्यात चूक झाली तर शुद्धीपत्र करून द्यावे लागते, व्यापाराच्या कागदपत्रात चूक झाली तर नुकसानभरपाई करावी लागते. त्या चुका होऊ नये, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.
अकार चरण युगुल - अकार चरण युगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें । (ज्ञानेश्वरी १.१९)
शब्दांत आणि ध्वनींमध्ये एक प्रकारचे गूढ आध्यात्मिक आकर्षण आपल्याला जाणवते. आपल्याला ध्वनींचे विश्लेषण करावेसे वाटते. म्हणून शब्दाच्या ध्वनींबद्दल शिकावे.
आम्हां घरी धन -
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
म्हणून शब्दांचे ज्ञान मिळवावे.
जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी -
जैसी पुष्पांमाजी पुष्पमोगरी । कीं परिमळामाजी कस्तूरी ॥ तैसी भाषांमाजी साजिरी । मराठी या ॥
म्हणजे बाकी भाषाही त्यांच्यात्यांच्या ठिकाणी सुंदर असोत, त्यांची अस्मिता ती त्यांची, मराठीची अस्मिता आणि खास सौंदर्य मराठीचे. कोणी बाकी भाषांमधील शब्दांचा अभ्यास करत असेल तर करो बाबडा. मराठीचाही अभ्यास झाला पाहिजे खास.
आक्षेप : बरे तर, पण सांगा की हे पद्य कोणी रचले?
उत्तर : फादर स्टीफन्स नावाच्या इंग्रज पाद्रींनी रचले. मूळ भाषा इंग्रजी, पोर्तुगीज, येत असून ते मराठी, कोकणी आणि कन्नड मध्ये प्रवीण झाले. इतक्या भाषांमध्ये त्यांना मराठीचे सौंदर्य जाणवले, हे विशेष.
आक्षेप : वाटेल त्या इंग्रज साहेबाचे स्वीकाराल काय? मग काय - मेकॉले लाटसाहेब म्हणे की हिंददेशातल्या सगळ्या व्हर्न्याक्युलर भाषा दरिद्री आणि ओबडधोबड आहेत - तेही मानून घ्या.
उत्तर : मेकॉले चे मत साम्राज्याच्या प्रौढीतून आलेले आहे. त्यास विचारात घेण्याची काही गरज नाही. पण मराठीचा सखोल व्यासंग असलेल्या परकीयाचे मत ग्राह्य असावे.
चावुण्डराजें - चावुण्डराजें करवियलें
गोम्मटेश्वराच्या पायापाशी हजारावर वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आहे. आपल्या मराठी पूर्वजांची स्मृतिचिह्ने आपल्याला समजावीत, आणि आपली स्मृतिचिह्ने पुढच्या पिढ्यांना समजावीत, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.
चार स्थळे -
(चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः ।
गुहा त्रीणि निहिता नेङ्गयति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति ॥ ऋग्वेद १.१६४.४५)
वाणीची असतात चार म्हणुनी ज्ञाते स्थळे जाणती ।
पैकी तीन लपून आत, चवथी सुस्पष्ट जी बोलती ॥
वाणीचे चार टप्पे असतात. फक्त सिद्ध योग्यांना अवगत असते ती "परा", आपल्याला काही बोलायचे आहे त्या अर्थाची जाणीव "पश्यन्ती", तिचे शब्दरूपांशी संबंध साधणारी "मध्यमा". या तीन वाणी आतमध्ये लपलेल्या असतात, त्या दिसत नाहीत. फक्त चवथी "वैखरीच" कंठस्वराने बोलली जाते. हे नीट समजतात ते खरे ज्ञानी. म्हणून शब्द, अर्थ, वगैरे यांचा अभ्यास करावा.
कुणी हीस पाहोनि -
(उत त्वः पश्यन्न ददर्श वाचमुत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम् ।
उत त्वस्मै तन्वं विसस्रे जायेव पत्य उशती सुवासा: ॥ ऋग्वेद १०.७१.४)
कुणी हीस पाहोनि मुळी न पाही ।
दुजा वाणि ऐकोनि ऐकीत नाही ।
स्वामीस प्रकटून गूढार्थ राही ।
वस्त्रांस ढाळून कामातुरा ही ॥
जो तिच्याकडे नीट लक्ष देत नाही त्याला भाषा दिसून दिसत नाही, ऐकून ऐकू येत नाही. तिच्या स्वामीपुढे मात्र ती झाकणारी वस्त्रे सोडून आपले सौंदर्य दाखवण्यास आतुर असते. आपल्यापुढे तिचे सौंदर्य प्रकट व्हावे म्हणून तिच्यावर प्रभुत्व मिळवावे.
आक्षेप : ही सगळी प्रयोजने ज्याला व्याकरण नाहीतरी शिकायचे आहे त्याच्यासाठी ठीक आहेत. पण अक्षराला अक्षर लावून जमेल तितकी पुस्तके वाचणारे असतात (अक्षराला अक्षर जोडून वेद वाचणारे असतात), त्यांच्यासाठी प्रयोजने का नाही सांगत?
उत्तर : खरे आहे तुमचे म्हणणे. पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेची आधी शब्दरूपे शिकत, मग ग्रंथ वाचत. आजकाल मराठीत लोक पुस्तके बेधडक वाचतात. मग म्हणतात "बोली भाषा आम्ही लोकांत बोलून शिकलो, लेखी भाषा पुस्तके वाचून आम्हाला कळते, व्याकरणाचे काय काम? त्यांच्यासाठी व्याकरणाच्या आचार्यांनी केवळ मित्र होऊन म्हटले आहे, या शास्त्राचा अभ्यास करून ते रचण्याची आमची आपली ही प्रयोजने आहेत.
(विषय बदलण्यापूर्वी सारांश)
शब्द सांगितला. त्याचे स्वरूप सांगितले. प्रयोजने सांगितली.
(पुढचा भाग असा सुरू होईल :)
आक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे?
- मुद्रणसुलभ पान
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा


हजार वर्षे
हजार वर्षे ते आजचे जग यातली आपली एकांच लेखातील
गुंफण वाचुन मनी संतोष जाहला!
चावुण्डराजें - चावुण्डराजें करवियलें
तसे
धनंजये - धनंजये लिहवियले
गुंडोपंते - गुंडोपंते वाचियले
उपक्रमे वाचुनी अगम्य ते गम्यले
शब्द शब्दातुनी उलगडले
आपला
(जुना नि अडाणी)
गुंडोपंत
शब्द कसे शिकणार?
वा हा लेख सुद्धा सुंदरच.
गुंडोपंतांची कविता सुद्धा मस्त.
धनंजये लिहिले असे पाहिजे असे वाटले
आपण लेखात शेवटी म्हटले आहे की शब्दरुपे शिकावी लागतात. लिहून बोलून त्यांचे मर्म पद्धत इ. समजत नाही. मग ती शब्दरुपे कोण शिकवणार? ती स्वतः ची स्वतः कशी शिकणार?
-- (शब्दांकित) लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)
बारीक दुरुस्त्या
हे 'धनंजये लिहियले' असावे काय? 'लिहवियले' म्हणजे (कोणाकडून तरी) 'लिहवून घेतले' असे असावे, असे वाटते. (धनंजयमहोदयांजवळ एखाद्या स्टेनो-टायपिष्ट अथवा सेक्रेटरीची सेवा उपलब्ध असल्यास - आणि ती त्यांनी येथे वापरली असल्यास - हे बरोबरही असू शकते, पण अन्यथा नसावे.)
हे चूक असावे, असे वाटते. 'उपक्रमे वाचुनी' म्हणजे 'उपक्रमाने वाचले असता' असे होत असावे. बहुधा आपल्याला जे म्हणायचे आहे (असे मी समजतो), ते 'उपक्रमी वाचुनी' (म्हणजे उप्क्रमावर वाचले असता) असे मांडता यावे.
यातील 'गम्यले' हे निश्चित चुकीचे आहे. 'गमले' असे असावे.
यात वास्तविक चूक अशी काहीही नाही. फक्त तत्कालीन स्टाईल(याला मराठी प्रतिशब्द चटकन् सुचला नाही. क्षमस्व!)प्रमाणे कसे लिहिता आले असते, याचा विचार करीत आहे. 'उलगडियले' हे बरोबर असावे काय?
पण प्रयत्न छान आहे.
स्टाईल-धाटणी
धाटणी शब्द चालेल का?
मनोगती प्रशासनाचा आहे.
शैली ?
धाटणी पेक्षा शैली अधिक चांगले वाटते.
- युयुत्सु
--
फोनेटिक इनपुट मेथड्समुळे मदरटंगमध्ये थॉट्स एक्स्प्रेस् करणे इझी झाले आहे. मराठीत लिहा.
मानलं!
हा ही लेख उत्कृष्ट आहे.
पूर्वी बायकांनी स्तोत्रे किंवा आरत्या म्हणण्याची प्रथा नसावीच असे दिसते.
पण
सर्वथा आवांतर (पण तरीही!) :) :
"हारी पडलो आता संकट निवारी"
आपले एकुण स्त्री विषयक पुराणकालीन धोरण पाहता नसेलही कदचित तशी स्त्रियांनी आरत्या करण्याची प्रथा पण,
कोल्हापुर (व इतर काही भागात) स्त्रियाही "पडले" च्या ऐवजी "पडलो" म्हणतांना ऐकल्या आहेत. काही ठिकाणी साहित्यातही ते आले असावे असे वाटते (पण नक्की आठवत नाहीये!).
हा पण भाषाशैलीचा भाग की निव्वळ कन्नड नि तेलुगु च्या जवळ गेलेली मराठी म्हणायची?
मुळ आरती रचणारा/री कोणत्या भागातला/ली यावरूनही काही बोध होईल असे वाटते.
आपला
गुंडोपंत
लेखमाला
आधी कळायला कठीणच जाणार (!) असे समजून वाचलीच नाही! पण नंतर (धीर करून) सावकाश वाचल्यावर आवडली. गणपती अथर्वशीर्षातील "चत्वारि वाक्पदानि" चा अर्थ कळला असे वाटते. एक प्रश्नः
ऋग्वेदातल्या सूक्ताचे (?) भाषांतर कळले, पण हा असा काहीसा संदर्भ ("तिच्या स्वामीपुढे मात्र ती झाकणारी वस्त्रे सोडून आपले सौंदर्य दाखवण्यास आतुर असते.") पूर्वी ऋग्वेदातील "उषेच्या" संदर्भात वाचल्याचे आठवते. गूगलवर वरील सूक्त हे सरस्वती रहस्योपनिषदात आढळले. हा सरस्वती रहस्योपनिषद हा काय प्रकार आहे - ऋग्वेदाचाच भाग आहे का? तसे असल्यास उषा आणि वाणी (सरस्वती) यांच्या वर्णनात साम्य आहे यात विशेष काही नाही, पण तसे नसल्यास सरस्वती रहस्योपनिषद नंतरचे का? (विषयांतराबद्दल क्षमस्व).
चित्रा
उत त्वः चे सूक्त
वेद मी काही शिकलो नाही बुवा - ही ऋचा महाभाष्याच्या पुस्तकातून उतरवली.
पण ऋग्वेदाच्या संहितेत बघून हे दिसले (इंटर्नेटवर काय वाटेल ते मिळते!)
त्यातून १०व्या मंडलातले ७१वे सूक्त येणेप्रमाणे :
ऋषि - बृहस्पति: आङ्गीरस:
छन्द - त्रिष्टुप् (९वी ऋचा एकटी जगती)
देवता - ज्ञानम्
(सूक्तांचा त्यांच्या देवतांच्या नावानी उल्लेख करतात - म्हणजे हे "ज्ञानसूक्त")
त्याची पहिली ओळ अशी आहे -
बृहस्पते प्रथमं वाचो अग्रं यत्प्रैरत नामधेयं दधाना: । (वगैरे)
हे बृहस्पती! जेव्हा वस्तूंना नावे देण्यासाठी प्रथम वाचा पुढे पाठवून ... (असे काहीसे - वेदातले अर्थ लावायला मी शिकलेलो नाही, पण पुढे "वाचे"बद्दल ते पूर्ण सूक्त आहे, इतपत समजले. अर्धवट समजले तेवढे काव्यसौंदर्य खूप आवडले.)
ऋ ६.६४.२ मध्ये उषा वक्ष उघडे करून दाखवते पण ती ऋचा वेगळी. तिचा ऋषि भारद्वाज बार्हस्पत्य. कदाचित स्त्रीरूप दिलेल्या या कल्पनांना स्त्रीच्या देहसौंदर्याचे रूपक देणे वेगवेगळ्या कवींना आवरले नसेल.
आणि पुष्कळदा रूपक पटतेसुद्धा - अंधाराचे कापड ढाळून सतेज कांती दाखवणारी पहाट, आधी लपलेले अर्थ उघडे करून सुंदर अंतरंग दाखवणारी वाणी...
सरस्वती रहस्योपनिषद हे कृष्णयजुर्वेदाबरोबरचे एक छोटे उपनिषद आहे. त्यात वेदांमधून काही ऋचा उद्धृत केलेल्या आहेत आणि काही गद्य आहे. उपनिषदे वेदांच्या काळाच्या बर्याच पुढे, वगैरे वगैरे.
हे सगळे मी पाचेक मिनिटे इंटर्नेट बघून सांगतो आहे! तुम्हाला यातील पूर्वीपासून गम्य आहे, तुम्हाला कितीतरी जास्त माहिती पचेल, मग सांगता येईल. याच्यावर छान चर्चा होऊ शकेल, तुम्ही तो नवीन विषय म्हणून टाकाच.
छानच आहे
धनंजयराव आपल्या मालीका छानच् आहेत्. माझ्याप्रमाणे बहुसंख्य वाचकांना त्या आवडत आहेत.
माफ करा मी जरा जास्त पुढचा विचार करतो आहे तो म्हणजे (एक मराठीकरण - भाग ३, ४, ५ ,६) असे बरेच भाग तुमच्याकडून येतीलच या सगळ्याचे एक पुस्तक नक्की प्रकाशीत कराच. मी नक्की घेईन.
त्याहून महत्वाचे म्हणजे परदेशातील लहान मुलांना शिकायला सोपे जाईल, परदेशी पालकांना पण समजवून घेऊन पाल्यांना सहज शिकवता येईल असे करता आले तर बघा. तुम्ही छान उदाहरणे देऊन समजवता. तुमच्या पुस्तकाला (पेड ई-बु़क पण चालेल.) नक्की मागणी असेल.
तसे बघायला गेले तर (कुठल्याही भाषेचा) व्याकरण हा जरा नावडता पण नक्कीच गरजेचा विषय आहे. महाराष्ट्रात तर तो शिकवला जातोच. आपण सर्व बर्यापैकी शिकलो आहोतच. परदेशातील मराठी लहान मुलांना घरी बोलले जाते म्हणून मराठी समजते , थोडेफार बोलतापण आपसूक येते पण त्यांचे व्याकरण बोंबलले असते.
व्याकरण, भाषाप्रभुत्व याबाबत आपले कौशल्य वादातीत आहे. खरेतर मी हे व्य. नि. ने कळवू शकलो असतो पण अजुन कोणीतरी अनुमोदन देईल /द्यावे ह्या विचाराने येथे लिहले.
वा वा!
नक्कीच लिहा हो.
माझे मनापसून अनुमोदन आहे सहजरावांच्या प्रस्तावाला.
उत्तम प्रस्ताव आहे!
साध्या भाषेत सोपे केलेले नियम परदेशातच काय इथेही कामालाच येतील हो!
आपला
गुंडोपंत
शुद्धिपत्र!
भले शाबास. प्रुफे तपासूनही चूक पण काय नमुनेदार वाक्यात राहिली!
लेखांचे संपादन करून चूक सुधारता येत नाही :-(
आणखी पर्याय
असेच काही नाही. आणखी एक शक्यता आहे. प्रस्तुत महिला संपूर्ण कुटुंबाच्या वतीने / दृष्टीतून आरती म्हणत असण्याची शक्यता विचारात घेतली असता हे वाक्य ठीक वाटते. अध्याहृतातला शब्द 'मी'ऐवजी 'आम्ही' असा घेतल्यास (म्हणजे 'मी हारी पडलो'ऐवजी 'आम्ही हारी पडलो' असे), तर या वाक्यात व्याकरणदृष्ट्या काहीही चूक दिसत नाही.
(किंबहुना, बायका या पुरुषांच्या मानाने अधिक कुटुंबवत्सल असतात, केवळ स्वतःऐवजी संपूर्ण कुटुंबाचा विचार अगोदर करतात हा सार्वत्रिक समज लक्षात घेता या ठिकाणी ही शक्यता अधिक वाटते.)
फादर स्टीफन्स म्हणजे मराठीत ख्रिस्तपुराण रचणारे तेच ना?
याहून चांगले उदाहरण पाहिजे, बहुतेक
बरोबर आहे. तशी पूर्ण आरती लावून घ्यायला पाहिजे. शिवाय, पुढे कवी "नरहरी" स्वत:चा उल्लेख करतो, तो नीट बसावा म्हणून कदाचीत ते "कवीच्या दृष्टीने" म्हणावेच लागत असेल.
हा लेख नीट लिहायचा तर असा घाईघाईने लिहून चालणार नाही.
आरत्या, "घालीन लोटांगण", वगैरे सगळ्याची माझ्या डोक्यात सरमिसळ होत असणार, आणि बहुतेक पूर्ण आरती प्रपंचात की 'मी' देवाशी एकेरी संवाद करत असल्याचे मला वाटले असावे. पण ते वैयक्तिक.
(आजकाल मी आरत्या म्हणायचा प्रसंग फारसा येत नाही, म्हणून "आता काय वाटते" ऐवजी "लहानपणी काय वाटले असावे" असा विचार करतो आहे.)
सुखकर्ता रामदासांची, दुर्गे दुर्घट नरहरीची, घालीन लोटांगण म्हणे नामा, असे वेगवेगळे कवी आहेत, त्यामुळे काही 'मी' आणि काही 'आम्ही'च्या, आणि काही कवीच्या वतीने म्हणणे सहज शक्य आहे. तुमचे म्हणणे बरोबर वाटते.
याहून चांगले उदाहरण हवे खरे! त्या एकाच गीतात "मी" चा उल्लेख हवा, पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी भाषा मराठीत असावी, आणि त्या परिस्थितीत (देवाशी) वैयक्तिक संवाद साधणे अशी त्या कार्याची अपेक्षा असावी. या तीनही गोष्टी असायला पाहिजेत. मूळ वेद मंत्रात ते सर्व होते.
एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला एखादे प्रसिद्ध प्रेमगीत 'आपल्या वतीने' अगदी मनापासून ऐकवत असेल म्हणा. मूळ गाणे स्त्रीने पुरुषासाठी म्हटले असेल, तर आपल्या परिस्थितीला भाषा साजेशी करावी लागेल... असे काहीतरी उदाहरण कदाचीत या ठिकाणी समर्पक राहिले असते.
होय. ख्रिस्तपुराणवाले ते हेच.
उत्तम
हा भागही उत्तम आहे.
परप्रांतीयांना मराठीत आदरार्थक बोलण्याचे नियम, "गेले" एका विशिष्ट प्रकारे म्हटले की "वारले" असा अर्थ होतो, असे बारकावे कळत नाहीत.
नवीन भाषा शिकताना येणारी एक मोठ्ठी अडचण म्हणजे भाषेतील बारकावे. इंग्रजी शिकण्यार्यांना फ्राजल व्हर्बस असेच हैराण करतात.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre