व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग २

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

त्या काळात जे "ब्राह्मणाला योग्य" मानायचे, ते आपल्या काळात "सुशिक्षित माणसाला योग्य" असे मानायला काही हरकत नसावी. पुष्कळ ठिकाणी तसा आधुनिक अर्थ बर्‍यापैकी पटणारा निघतो. माझ्या मराठीकरणात तो तसा केला आहे.

*****************भाग २**************************
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे?
उत्तर : रक्षण, वाक्यबदल, शिक्षण, लघु-उपाय, आणि असंदिग्धपणा, हे मुद्दे प्रयोजने म्हणून एक-एक करून सांगतो.
"रक्षण" (मुळात वेदांचे उच्चार आणि अर्थासह रक्षण) आपल्या भाषेत कितीतरी उत्कृष्ट कलाकृती गुरुशिष्यांच्या मौखिक परंपरेतूनच सांगितलेल्या आहेत. त्यांचे रक्षण झाले पाहिजे.
आक्षेप : पण ध्वनिमुद्रण आणि लेखन पुरणार नाही काय?
उत्तर : नाही, मूळ उच्चारात आणि अर्थामध्ये, विशिष्ट बोलीच्या संदर्भाने, काही खुबी असतात. त्या गुरूकडून शिष्याकडे थेट गेल्या पाहिजेत. भाषेत उच्चारांची सरमिसळ, आणि उच्चारात बदल होतो. तो कधी इष्ट असतो, कधी अनिष्ट असतो. अशा लांब परंपरेत कलाकृतीचा -हास होऊ नये, शब्दाच्या उच्चारात, हेल काढण्यात काय अर्थ भरलेला आहे, ते परंपरेत कळत राहावे, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.

"वाक्यबदल" (मुळात : कर्मकांडे करताना वेदांच्या मंत्रात, आपल्या कार्याला योग्य करून घेण्यासाठी थोडे पण नेमके बदल करावे लागतात, त्याबद्दल) करारपत्रे, निविदा सूचना, वगैरे तयार करण्याची एक अगदी काटेकोर भाषा असते. पुढे विवाद होऊ नये, म्हणून वकिली पुस्तकात सांगितलेल्या नमुन्यात जशी आहे, तशीच भाषा ठेवावी लागते. पण त्या-त्या अशिलाला योग्य, किंवा स्वतःला लागू असे वाक्यबदल करावे लागतात. त्या "नमुनेदार" वाक्यांत फक्त स्त्री/पुरूष, एक व्यक्ती की अनेक, असे बदल नीट करायला शब्दांचे व्याकरण शिकावे लागते.

"शिक्षण" (मुळात : ब्राह्मणाला वेदांची सहा अंगे, पैकी एक व्याकरण, शिकणे भाग आहे, त्याबद्दल.) शालेय शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय माणसाला समाजात सन्मानाने वावरता येत नाही. शालेय विषयांपैकी एक व्याकरण होय, म्हणून ते शिकावे.

"लघु-उपाय" : सुशिक्षित माणसाला शब्दांचे ज्ञान जरूर असावे. शब्दांची वर्गवारी लावल्यामुळे शब्दज्ञानाचा पसारा आटोपशीर होतो, म्हणून शब्दांचे व्याकरण शिकावे.

"असंदिग्धपणा" यासाठी व्याकरण शिकावे. (मुळात : एका विशिष्ट यज्ञाच्या सामग्रीसाठी "लठ्ठ ठिपक्यांची कालवड हवी" असे म्हटले आहे. लठ्ठ ठिपके की लठ्ठ गाय, उच्चारावरून कळते, त्याबद्दल.) "पुरणपोळीचा बेत आहे, पाठवून द्या", असे गिर्‍हाईक म्हणतो. म्हणजे पुरण आणि पोळीचा, की पुरणाच्या पोळीचा? त्या दोन अर्थांत उच्चाराचा (स्वराच्या चढ-उताराचा) फरक असतो, हे माहीत असले तर आचार्‍याला शंका राहत नाही, आणि योग्य पदार्थ तो गिर्‍हाइकाकडे पुरवतो.

(विशेष : स्वतःला काही बोलायचे असले तर मराठी स्वभाषक व्याकरण शिकल्याशिवाय बोलू शकतो. वरच्या प्रयोजनांत कुठल्या ना कुठल्या बाबतीत शिकणारा दुसर्‍यांच्या शब्दप्रयोगाच्या अधीन असतो. म्हणून ही प्रयोजने पतंजलींनी वेगळी काढली असावीत. दुय्यम प्रयोजनांची यादी पुढे देत आहे. पुढचा भाग असा सुरू होईल -)

उत्तर (पुढे चालू) : आणखी प्रयोजने हवीत काय - वाटेल तेवढी घ्या! ही पुढची एक-एक करून सांगतो -

Comments

दादोबा तर्खडकर आणि पतंजली

"शुद्ध कसें बोलावें आणि शुद्ध कसें लिहावें" ते व्याकरण शिकून कळते असे दादोबा तर्खडकर म्हणाले. व्याकरणकाराकडून ते जरा गर्वाचे भासते. पण येथे मात्र मुख्य कारणे "लोकांचे बोलणे/लिहिणे नीट समजावे, पुढच्या पिढीपर्यंत नीट पोचवावे" अशा प्रकारची आहेत. यात नम्रपणा आहेच, पण एक वैज्ञानिक दृष्टी आहे.
पुढच्या प्रयोजनांपैकी "सुशिक्षित लोकांसारखे बोलले नाही तर हसे होईल", "अपशब्द बोलले तर पाप लागते", असेही आहे, पण ते दुय्यम.
सगळीच कारणे काही वैज्ञानिक दृष्टीला पटण्यासारखी नाहीत. "शाळेत शिकावे लागते" हे कारण वैज्ञानिक नसले, तरी प्रत्यक्षात बर्‍यापैकी लागू आहे, असे वाटते. आमच्या शाळेत पी. टी., एन्-सी-सी वगैरे प्रकार म्हणजे केवळ टिवल्याबावल्या होत्या. तरी हजेरी लावावी लागली. त्यातच व्यायमाची गोडी लागली असती, तर बरे झाले असते. सक्तीच होती, आवड लावून घेतली असती तर आता थोडा फायदा झाला असता, नाही का?

काही दारे-खिडक्या ?

पण येथे मात्र मुख्य कारणे "लोकांचे बोलणे/लिहिणे नीट समजावे, पुढच्या पिढीपर्यंत नीट पोचवावे" अशा प्रकारची आहेत. यात नम्रपणा आहेच, पण एक वैज्ञानिक दृष्टी आहे.

आपल्या लिखाणातून कळले की 'व्याकरणाला नम्रपणे बोली भाषेचे ही महत्व वाटते.' म्हणजेच व्याकरणाचे नियम हे समाजाने समाजा ला समजण्यासाठी असे काहीसे आहेत. (पंडितांनी त्यांच्या वादविवादासाठी नाहीत!)

समाज हा विवीध भाषा बोली व उच्चार वापरणारा असणार. याचा अर्थ असाही आहे का की, नवीन संकरीत शब्द, वेगळी उच्चार शैली यांना भाषेत अंतर्भूत करून घेण्यासाठी काही दारे-खिडक्या व्याकरणात आहेत? (मऊ भाषेत - ओपनसोर्स कनेक्टीव्हीटी? ;) )
असल्यास ती कश्या पद्धतीने आहेत?
(विषयांतर करण्याचा हेतु नाही, तसे भासल्यास क्षमा करा)

आपला
गुंडोपंत
"ज्या शब्दांनी भावना मनापर्यंत पोहोचतात ती भाषा शुद्ध असे मला वाटते!"

ओपनसोर्स कनेक्टीव्हीटी - खूपच समांतर

फारच उत्तम दृष्टांत.

कारण गुंतागुंतीचा प्रोग्रॅम बदलायला बरेच किचकट प्रोग्रॅमिंग शिकावे लागते, पण वापर करणार्‍याला प्रोग्रॅम मध्ये गडबड आहे ते वापर करताना सहज कळते. प्रोग्रॅमिंग कळायची गरज नाही.

व्याकरणाचे अभ्यासक सदासर्वकाळ ओपनसोर्समध्ये बदल करत असतात (म्हणजे तसे प्रस्ताव एकमेकांत सांगत असतात). बेटा-टेस्टिंग म्हणजे नियमांमधून काय वाक्ये आणि शब्द निघतात ते बघायचे. भाषा वापरणार्‍यांना सांगून विचारायचे - "असे-असे बोलले तर तुम्ही ते आपल्या भाषेतले मानाल का? किंवा आपल्या बोलीतले मानाल का?" नियम (किंवा त्यांची क्लिष्ट भाषा) माहिती असायची गरज नाही. भाषा वापरणारा सहज सांगू शकतो - "ह्यॅ - काहीतरी काय?" (तुमचा प्रोग्रॅम क्रॅश झाला) किंवा "बरोबर वाटतं" (अजून क्रॅश झाला नाही). अशी भरपूर चाचणी केली की त्या भाषेसाठी किंवा बोलीसाठी तो नियम मानला जातो.

> (पंडितांनी त्यांच्या वादविवादासाठी नाहीत!)
पंडीत काय, भांडणारच. नवीन नियमाचा प्रस्ताव असला की तो नीट बेटा-टेस्ट केला का, वापरणार्‍याने तो क्रॅश होऊ शकेल तसे सगळे नमुने पाहिले का, यावरून खडाजंगी होऊ शकतेच.
शिवाय प्रस्ताव सांगणार्‍याने कुठल्या बोलीसाठी ते नीट सांगितले पाहिजे. नाही तर वेगळ्याच बोलीत बोलणार्‍याकडे दुसरा पंडीत बेटा-टेस्ट करायला देतो. मग एकाचा बेटा-टेस्टर म्हणतो "बरोबर वाटतं" (अजून क्रॅश झाला नाही), दुसर्‍याचा म्हणतो, "ह्यॅ - काहीतरी काय?" (तुमचा प्रोग्रॅम क्रॅश झाला). म्हणजे पुन्हा वादविवाद.

समजणार्‍या भाषेत

समजणार्‍या भाषेत, त्याला समजणार्‍या उदहरणांनी मुद्दा समजावून देण्याची हातोटी आवडली.
असो, मला मऊ भाषेतले काही कळत नाही... उगाच ओपनसोर्स म्हणजे काय ते कळले होते नि त्याचा याच्याशी असलेला संबंध जाणवला म्हणून टाकले होते.

बाकी, आपल्या चर्चेत हे कळले की देवण घेवाण घडते. पण परभाषीक शब्द भाषेत सामावून घेण्याची सोय काय आहे? उदा. टेबल हा आंग्ल शब्द आहे तो मराठीत रुळला आहे. हा शब्द व्याकरणात कसा काय बसवला गेला? की लोकं 'बोलतात' म्हणून तो वापरात येत गेला कोणताही आगापिछा नसतांना?
मग तसे असेल तर उद्या
"मी टेबल वर पेपर्स ठेवून आर्टिकल राईट करत होतो." हे वाक्य ही काही कालावधी नंतर व्याकरण शुद्धच होईल का?

आपला
गुंडोपंत

आर्टिकल राईट करत असताना

> उदा. टेबल हा आंग्ल शब्द आहे तो मराठीत रुळला आहे. हा शब्द व्याकरणात कसा काय बसवला गेला?
वेगवेगळ्या भाषांमध्ये शब्दांची देवाणघेवाण सारखी होत असते. व्याकरणचे अभ्यासक त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतात ते शब्दकोश लिहिणारे.
पण शेपन्नास वर्षांपूर्वी मराठी भाषकांना इंग्रजीतले बॅट आणि बॉल वगैरे, हे उच्चार जड वाटत. त्याचा उच्चार ब्याट आणि बाल असा काहीतरी होई. आज मात्र इंग्रजीतले ते दोन उच्चार, थोडेसे बदलून, मराठीत मस्तपैकी सामावून गेले आहेत. याबद्दल मात्र व्याकरणकाराला कुतूहल वाटेल. कारण त्यासाठी मराठीतल्या ध्वनींची यादी बदलावी लागली. हा आमूलाग्र बदल ("नियमातला बदल") झाला.

> "मी टेबल वर पेपर्स ठेवून आर्टिकल राईट करत होतो." हे वाक्य ही काही कालावधी नंतर व्याकरण शुद्धच होईल का?
माझ्या मते हे वाक्य आजही जवळजवळ व्याकरणशुद्धच आहे. "शैली" तितपत आवडली नाही, पण तो तुम्ही विचारलेला प्रश्न नाही.
चौकट बांधणारे सर्व शब्द मराठीतले नेहमीचेच आहेत : मी, वर, ठेवून, करत, होतो. खूप महत्त्वाचा म्हणजे शब्दक्रम. तो खास मराठी. त्याच क्रमात इंग्रजीत म्हणून बघा :
I table on papers keeping article write doing was. अरे अरे! पहा तिथे इंग्लिशच्या मॅडम झीट येऊन पडल्या!

टेबल, पेपर, आर्टिकल या सगळ्या वस्तू आहेत. वस्तूंसाठी सारखे नवीन शब्द येतच असतात. व्याकरण म्हणायचेच तर हे की उच्चार कसा करता.
ठेइब्ल् , प्हेइपझ्, आSर्टक्ल् असा (शुद्ध) इंग्रजी उच्चार करत असाल तर बहुधा आजच्या मराठीततरी उच्चार अशुद्ध आहे असे म्हणेन. बहुतेक मराठी बोलणारे "ह्यॅ हे काय कॉन्व्हेंटसारखे!" असे नाक मुरडतील - त्यालाच व्याकरणकार "अशुद्ध" म्हणतात.

माझ्या मते तरी अजून याच्यापैकी "राईट" मराठी शब्दकोशात आला नाही. माझे मत विचाराल तर तो बहुतेक तो येणार नाही - ही वस्तू नाही - अशा शब्दांना मराठीत यायचा प्रवास जड जातो. पण उद्याचा दिवस कोणी बघितला आहे...

"पेपर्स" ऐवजी बहुतेक मराठी लोक "पेपर" म्हणतील असे वाटते ("बेटा-टेस्टिंग" म्हणजे विचारून बघावे लागेल). खूपच कमी लोक "पेपर्स" म्हणत असतील, तर ते बहुधा आजच्या मराठीत अशुद्ध म्हणू. तशी बर्‍यापैकी संख्या "पेपर्स" म्हणत असेल, आणि ते कुठले लोक असे सांगता आले, तर तो त्यांच्या बोलीत हा नियम मानला जाईल.

इंग्रजी शब्दांचे मराठीकरण या विषयाचा मी फारसा अभ्यास केलेला नाही. पण ज्याचा अभ्यास असेल त्याची विचार करायची पद्धत साधारण अशी असेल. निष्कर्ष वेगळे असू शकतील - अभ्यास (म्हणजे खूप लोकांशी बोलणे, त्यांचे बोलणे नोंदून घेणे) तर लागेलच.

पुन्हा हेच. "शैली"च्या दृष्टीने मला ते वाक्य आवडलेले नाही. ती वेगळी गोष्ट.

बस मधे बसलो...

वरील संवाद वाचल्यावर उत्सुकतेपोटी खालील प्रश्न...

बस मधे बसलो - यातील बसणे हा "बस" शब्दामुळे आला आहे का आधी पासून होता?

बैस बा

:-)
बैस, बस आधीपासूनचे.
या अभ्यासाला व्युत्पत्तीशास्त्र म्हणतात.
इथे मात्र व्याकरणाच्या विपरीत, आजच्या मराठी बोलणार्‍याच्या मताला खूप भाव नाही. जुनी कागदपत्रे, पुराणकालीन भाषा, संस्कृत, प्राकृतचा अभ्यास, भाषाभगिनींमधले समांतर शब्द, अशावरून पाळेमुळे सिद्ध करता येतात.
व्याकरणवाले आणि व्युत्पत्तीवाले एकमेकांना दुरूनदुरूनच मैत्रीपूर्ण रामराम करतात. (दुश्मनी वगैरे नाही - गैरसमज नको!)

इतरभाषीय शब्द

टेबल हा आंग्ल शब्द आहे तो मराठीत रुळला आहे. हा शब्द व्याकरणात कसा काय बसवला गेला?

टेबल सारखे वस्तुवाचक शब्द मराठीत वापरताना मराठी शब्दांसारखे संस्कार करून मराठी व्याकरणात बसवले जातात. उदा टेबले ('टेबल्स' नाही), टेबलावर ('टेबलवर' नाही) तसेच 'पेपरावर', 'पेपरात', 'फाइली', 'फाइलीवर' इ. भविष्यातही इतरभाषीय शब्द जसेच्या तसे घेताना असे बदल करावे लागतील.

ही वस्तू नाही - अशा शब्दांना मराठीत यायचा प्रवास जड जातो.

धनंजयरावांच्या या मताशी काही अंशी सहमत आहे. वस्तुवाचक शब्दांचा समावेश चटकन होतो उदा. पेन, टिव्ही, आइस्क्रीम, फोन इ. अनेक शब्द. पण अनेक इंग्रजी क्रियावाचक शब्द आज रूढ आहेत उदा '(गाडीची) किक मारणे', 'फोन करणे' इ. काही आधुनिक जसे की 'बोअर मारणे', 'इग्नोर करणे' इ.

चूभूद्याघ्या.

क्रियावाचक शब्द

पण अनेक इंग्रजी क्रियावाचक शब्द आज रूढ आहेत उदा '(गाडीची) किक मारणे', 'फोन करणे' इ. काही आधुनिक जसे की 'बोअर मारणे', 'इग्नोर करणे' इ.

चूभूद्याघ्या.
चूकभूल दिली, घ्या.
किक हे नाम आहे क्रियावाचक शब्द नाही. किकणे म्हटले तर क्रिया. असा शब्द मराठीत रूढ होणे कठीण. तसेच फोनणे, बोअरणे, इग्नोरणे इत्यादी.
धनंजयांनी केलेले विधान पटले.--वाचक्‍नवी

धन्यवाद!

वाचक्नवी, चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद! आमच्या व्याकरणविषयक मूलभूत संकल्पना यथातथाच असल्याने योग्य शब्द योजण्यात आणि उदाहरण देण्यात चूक झाली.

"राइट करणे" हे फारसे प्रचारात नसले तरी त्याच धर्तीवरील इतर काही 'गोष्टी' (अचूक संज्ञा माहीत नसल्याने सोयीस्कर शब्द) प्रचारात आहेत (विशेषतः आधुनिक/तांत्रिक क्रियांसाठी) जसे की "डिलिट करणे", "(मेल) सेंड करणे" असे म्हणायचे होते.

राईट करणे, डिलीट करणे इ. इ.

हा लेखमालेत माझ्या बाजूने मला शक्यतोवर एकही पारिभाषिक संज्ञा वापरायची नव्हती. असे स्वतःला बंधनच घातले आहे म्हणा!

म्हणून मी उत्तर वेगळेच देणार आहे. "राईट" बद्दल वर एके ठिकाणी मी प्रस्ताव मांडला. पण तो नियम नेमका कुठे लागू आहे ते काटेकोरपणे प्रस्तावात मी सांगितले नाही. त्यामुळे शशांक यांना जसे वाटले तसा त्यांनी प्रस्तावित नियम "बेटा-टेस्ट" केला. त्या परिस्थितीत तो नियम फसला (सोफ्टवेअर क्रॅश झालं). आता मला हे सांगणे आले की नियम क्रॅश-प्रूफ कसा करायचा. म्हणजे "राईट सारखे शब्द" यांचे अधिक काटेकोर वर्णन देणे. अशा प्रकारची देवाणघेवाण झाली की असे होईल : बदलून सांगितलेल्या नियमात लागू पडेल अशा जवळजवळ सगळ्या नमुन्यांत नियम क्रॅश होणार नाही. जर फारच थोड्या नमुन्यांत नियम चालत नाही असे लक्षात आले, तर ते थोडे अपवाद का? असा त्यांच्याबद्दल नियम सांगता येईल. असे विवेचन भाग ४ मध्ये आले आहे (मालिकेची जाहिरात!)

व्याकरणाबद्दल चर्चा आणि संशोधन हे असेच असते, त्याच्या प्रक्रियेच्या दृष्टीने शशांक यांनी अगदी बरोबर पुढची पायरी घेतली. या देवाणघेवाणीत "राईट सारखे शब्द" हा प्रकार जसा अधिक काटेकोर होऊ लागेल, तशी वाक्ये खूप लांब होऊ लागतील - "राईट सारखा अमुक लक्षण असून तमुक नसलेला शब्द". मग थोडक्यात बोलण्यासाठी आम्ही त्या कल्पनेला एक पारिभाषिक शब्द देऊन तो वापरू. तो खरोखर सोयीचा होईल, बोजड नाही.

अशा प्रकारे शशांक यांनी शास्त्रीय चर्चाप्रक्रियेचे (प्रोसेस चे) कार्यशील उदाहरणच दिले आहे.

हे विशिष्ट उदाहरण व्याकरण आणि व्युत्पत्तीशास्त्राच्या मधले आहे. मराठीतल्या इंग्रजी शब्दांबद्दल माझा अभ्यास नाही, म्हणून मी ही चर्चा पुढे चालवणार नाही.

उत्तम

हा भागही उत्तम आहे. शब्दांची व्यवस्था लावण्यासाठीचे प्रयोजन समजले. पुढील प्रयोजनांची आणि भागांची प्रतीक्षा आहे.

जबरदस्त

धनंजय महोदय,
आपल्या या लेख मालेसाठी सकाळी आल्या आल्या (कार्यालयात हो!) उपक्रमावर हजेरी लावावीशी वाटणार.

हा भाग उत्तमच.

यातील गुंडोपंत आणि आपल्यात झालेला संवाद अतिशय उद्बोधक आहे. मूळच्या पाणिनी आणि शिष्य यांच्यातिल संवादापेक्षा मला तो जास्त रोचक आणि डोक्यात प्रकाश टाकणारा वाटला. या लेखांवरील प्रतिसादातून अशीच सुंदर चर्चा व्हावी अशी सरस्वतीचरणी प्रार्थना.
--लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

खल्लास सही!

"फोनेटिक उनपुट मेथड्समुळे मदरटंगमध्ये थॉट्स एक्स्प्रेस् करणे इझी झाले आहे. मराठीत लिहा."

एक्सलंट साईन आहे! ;)

युअर्स
गुंडोपंत

हे नियम...

कारण त्यासाठी मराठीतल्या ध्वनींची यादी बदलावी लागली. हा आमूलाग्र बदल ("नियमातला बदल") झाला.

१. असे 'नियमातले बदल नियमीत करुन घेणारी' कोणती संस्था आहे?
त्यांचे कामकाज कसे चालते? उदा. आजच्या घडीला 'टेबल हा शब्द मराठी आहे'
असे मान्य कधी व कोणी केले?
२. या संस्थेचा यातला अधिकार नक्की काय व कसा?
३. या साठी ते काही साहित्य नियमीत पणे प्रकाशित करतात का?
४. असे बदल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते काय करतात?
५. समाजाला या संस्थेकडे आपले मत नोंदवण्याची काय सोय (फीडबॅक चॅनल) आहे?

हे प्रश्न अनेक दिवसंपासुन मनात घोळत होतेच. आपल्या चर्चेमुळे ते परत डोकावले. मग मी पण विचारूनच टाकले बॉ!
या प्रश्नांमुळे विषयांतर होत असेल तर यावर वेगळी चर्चा सुरु करुन उत्तर दिलेत तरी चालेल.

आपला
गुंडोपंत
~चौकटबद्ध सुमार भाषापंडितांनीच मराठीची वाट लावली~

संस्था

महाराष्ट्र सरकारच्या या विषयांवर कधीकधी चर्चा करणार्‍या काही संस्था येणेप्रमाणे (पण याबद्दल कोण्या जाणकराला विचारले पाहिजे)

महाराष्ट्र शासन भाषासंचालनालय
साहित्य संस्कृती मंडळ
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ

वगैरे

पण कोश लिहिणारे, प्रमुख वर्तमानपत्रांचे आणि प्रकाशनगृहांचे संपादक हेसुद्धा आपआपल्या प्रकाशनाच्या आंतर्गत नियमावली ठरवतात - वाचकांशी कळत-नकळत संवादाने ठरवत असतील असे वाटते. उपक्रमावर कोणाला तरी हे जरूर माहिती असले पाहिजे.

इंग्रजीसाठी अमेरिकेततरी कुठली सरकारी संस्था नाही. विद्यापीठे, संपादकमंडळे, वगैरे यांच्या संवादातून इंग्रजीतले नवे काळानुसार बदलणारे प्रयोग मान्य होतात. हळूहळू मान्यता पसरते - सगळे लोक एकत्र मान्य करत नाहीत.

व्याकरणात सुधारणा

मराठीच्या व्याकरणात कांही बदल सुचतात काय? मला एक सुचतो. प्रत्यय लावताना नाम व सर्वनामाचे रुप बदलू नये. प्रत्यय नामाला/सर्वनामाला न जोडता लिहावा. टंकलेखन, शुद्धलेखन तपासणे वेगवान होईल.

आपले मत काय?

व्याकरणाकाराकडून भाषेत बदल घडवून आणणे

प्रत्यय नामाला/सर्वनामाला न जोडता लिहावा

या लेखमालेत पारिभाषिक संज्ञा कमीत कमी वापरायच्या असे मी स्वतःला बंधन घातलेले आहे. त्यामुळे तुमच्या नेमक्या प्रश्नाला नेमके उत्तर बाकी वाचक देतीलच. याविषयी तुम्ही आणि अन्य वाचकांनी काही विचार करण्यासारखे मुद्दे एका चर्चेच्या विषयात सांगितले आहे. (तुम्हाला माहितच आहे हो! पण बाकीच्यांसाठी सांगतो) याबाबत कुतूहल वाटल्यास ती चर्चाही अवश्य बघावी.
या लेखमालेच्या मर्यादित संदर्भात तुम्हाला उत्तर देतो. ते तुमच्या प्रश्नास नेमके नसले, तरी विषयाला लागून आहे :
व्याकरण हे भाषेचे वर्णन करण्यासाठी असते, नियामन आणि बदल करण्यासाठी नाही, अशी आधुनिक व्याकरणाच्या अभ्यासाची चौकट आहे. साधारण अशीच वैज्ञानिक दृष्टी महाभाष्याच्या काळात होती. भाग ५ मध्ये ही चर्चा येईल की "शब्द हे लोकांत नित्यरूपाने असतात, व्याकरणाच्या चर्चा त्या मागाहून आलेल्या."
तुम्ही सांगता अशा प्रकारची बोली किंवा लेखी मराठीत लोक वापरू लागले, तर त्याची दखल घेणे (आणि त्याचे नीट वर्णन करणे) व्याकरणाच्या अभ्यासकाला भाग आहे. "बदल करणे" या बाबतीत राज्य बोलणार्‍या-वापरणार्‍याचे असते, व्याकरणाचा अभ्यासक म्हणजे केवळ बखरकार. व्याकरणकारापेक्षा या बाबतीत "भाषा वापरणारी व्यक्ती" म्हणून तुम्ही सुचवता ते बदल करण्यास तुम्हाला फार मोठा अधिकार मिळतो. आता वाट आहे फक्त बाकीच्या बोलणार्‍या-वापरणार्‍यांच्या सवयी बदलण्याची - व्याकरण मागाहून त्याचे वर्णन करेल.
इतिहासात अमुक-अमुक सारखे बदल कधी झाले का? असा नवीन शब्दनियम जर कधी वापरात आला तर बाकी नियमांशी खूप तफावत येईल का? अशा प्रश्नांच्या बाबतीत व्याकरणकाराला "एक्स्पर्ट विटनेस" म्हणून बोलावता येईल. पण एकट्या एक्स्पर्ट विटनेस च्या साक्षीवर निकाल लागत नसतात. नवीन प्रयोग वापरात आला की व्याकरणकाराला शरण यावेच लागते.

चला सुरु करु या

तुम्ही ला पटले असेल तर आज पासुन असेच लिहू या. मी ला बरे वाटते. गुंडोपंत ना काय वाटते?

तुम्ही शी बोलेन असे

तुम्ही शी व्यनि त असे लिहिणे चा प्रयत्न करीन. ("लिहायचा" कसे तोडणार माहीत नव्हते.) ही बोली चे नाविन्य अजून आत ऊन उमजले नाही तेव्हा चूक भूल होणारच. ती देणे घेणे बद्दल वायदा असू द्या. बाकी चर्चा मध्ये ते ते लोक ला जसे सोय चे वाटेल तसे तसे लिहीन. कारण मुद्दा चे बोलताना सगळे सुज्ञ वाचक चे लक्ष हे कडे वेधून ते नी मुद्दा ला सोडले, तर संवाद त विरस होईल, आणि चर्चा ला रंग भरणार नाही.
अजून तरी सवय मुळे शब्द नेहमी सारखे लिहिले जातात. ते मागे जाऊन खोडून सुधार करणे साठी दीडपट वेळ लागतो. ते मुळे हे चा लवकर कंटाळा येणे ची शक्यता आहे. तसा प्रकार चा दृढ निश्चय चा बाबत त मी थोडा लेचापेचा आहे.

वर चे वाचून उगाच मी ला गुजराती येत असले चा भास झाला! कमी त कमी गुजराती लोक हे बोलले सारखे मराठी येत असले चा तरी...

(तशी मस्त आहे गुजराती - पूर्वी अगदी अर्धवट समजू येई, तरी दूरदर्शन वर "आवो मारी साथे" बघताना मजा यायची. गुजराती त खुद्द मराठी ला समांतर, पण वेगळा, शब्दबदल होतो. गुजराती भाषक मराठी बोलताना, मराठी चे बदल नेमके माहीत नसतील म्हणून, "हे-ला ते-ला" वगैरे आदमास करून बोलतात, असे वाटते. - आश्चर्य म्हणजे हा पूर्ण परिच्छेद जनहितवादी चा नवीन नियम अनुसरून! आणि पूर्ण नेहमी जशी भाषा वापरतो तशीच ऐकू येते!)

हद्द!

धनंजया, हद्द आहे रे बाबा तुझी! तुझा व्याकरणाचा आणि भाषेचा व्यासंग पाहून थक्क झालो! तू जे काही लिहिलं आहेस त्यात मला काहीच गती नाही, पण एकंदरीत तुझे लेखन विद्वत्तापूर्ण वाटते आहे...

असो, पुढील भागांकरता मनापासून शुभेच्छा!

आता जाता जाता 'विद्वत्तापूर्ण' आणि 'विद्वत्ताप्रचुर' या दोन शब्दांचा अर्थ आणि व्युत्पत्ती सांग बरं! :)

तुझाच,
तात्यांजली! :)

'विद्वत्तापूर्ण' आणि 'विद्वत्ताप्रचुर'

आता जाता जाता 'विद्वत्तापूर्ण' आणि 'विद्वत्ताप्रचुर' या दोन शब्दांचा अर्थ आणि व्युत्पत्ती सांग बरं!

"विद्वत्तेचे पुरण भरलेला" आणि "विद्वत्तेचा पार चुरा झालेला" असे अर्थ म्हणायचे आहेत का तुम्हाला तात्या? पैकी पहिला अर्थ व्युत्पत्तीच्या दृष्टीनेही जवळपास जातो.

हा हा हा

गुड वन

ही ही

मस्त!

अगदी अनपेक्षित प्रतिसाद. :)

 
^ वर