व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग २

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

त्या काळात जे "ब्राह्मणाला योग्य" मानायचे, ते आपल्या काळात "सुशिक्षित माणसाला योग्य" असे मानायला काही हरकत नसावी. पुष्कळ ठिकाणी तसा आधुनिक अर्थ बर्‍यापैकी पटणारा निघतो. माझ्या मराठीकरणात तो तसा केला आहे.

*****************भाग २**************************
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे?
उत्तर : रक्षण, वाक्यबदल, शिक्षण, लघु-उपाय, आणि असंदिग्धपणा, हे मुद्दे प्रयोजने म्हणून एक-एक करून सांगतो.
"रक्षण" (मुळात वेदांचे उच्चार आणि अर्थासह रक्षण) आपल्या भाषेत कितीतरी उत्कृष्ट कलाकृती गुरुशिष्यांच्या मौखिक परंपरेतूनच सांगितलेल्या आहेत. त्यांचे रक्षण झाले पाहिजे.
आक्षेप : पण ध्वनिमुद्रण आणि लेखन पुरणार नाही काय?
उत्तर : नाही, मूळ उच्चारात आणि अर्थामध्ये, विशिष्ट बोलीच्या संदर्भाने, काही खुबी असतात. त्या गुरूकडून शिष्याकडे थेट गेल्या पाहिजेत. भाषेत उच्चारांची सरमिसळ, आणि उच्चारात बदल होतो. तो कधी इष्ट असतो, कधी अनिष्ट असतो. अशा लांब परंपरेत कलाकृतीचा -हास होऊ नये, शब्दाच्या उच्चारात, हेल काढण्यात काय अर्थ भरलेला आहे, ते परंपरेत कळत राहावे, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.

"वाक्यबदल" (मुळात : कर्मकांडे करताना वेदांच्या मंत्रात, आपल्या कार्याला योग्य करून घेण्यासाठी थोडे पण नेमके बदल करावे लागतात, त्याबद्दल) करारपत्रे, निविदा सूचना, वगैरे तयार करण्याची एक अगदी काटेकोर भाषा असते. पुढे विवाद होऊ नये, म्हणून वकिली पुस्तकात सांगितलेल्या नमुन्यात जशी आहे, तशीच भाषा ठेवावी लागते. पण त्या-त्या अशिलाला योग्य, किंवा स्वतःला लागू असे वाक्यबदल करावे लागतात. त्या "नमुनेदार" वाक्यांत फक्त स्त्री/पुरूष, एक व्यक्ती की अनेक, असे बदल नीट करायला शब्दांचे व्याकरण शिकावे लागते.

"शिक्षण" (मुळात : ब्राह्मणाला वेदांची सहा अंगे, पैकी एक व्याकरण, शिकणे भाग आहे, त्याबद्दल.) शालेय शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय माणसाला समाजात सन्मानाने वावरता येत नाही. शालेय विषयांपैकी एक व्याकरण होय, म्हणून ते शिकावे.

"लघु-उपाय" : सुशिक्षित माणसाला शब्दांचे ज्ञान जरूर असावे. शब्दांची वर्गवारी लावल्यामुळे शब्दज्ञानाचा पसारा आटोपशीर होतो, म्हणून शब्दांचे व्याकरण शिकावे.

"असंदिग्धपणा" यासाठी व्याकरण शिकावे. (मुळात : एका विशिष्ट यज्ञाच्या सामग्रीसाठी "लठ्ठ ठिपक्यांची कालवड हवी" असे म्हटले आहे. लठ्ठ ठिपके की लठ्ठ गाय, उच्चारावरून कळते, त्याबद्दल.) "पुरणपोळीचा बेत आहे, पाठवून द्या", असे गिर्‍हाईक म्हणतो. म्हणजे पुरण आणि पोळीचा, की पुरणाच्या पोळीचा? त्या दोन अर्थांत उच्चाराचा (स्वराच्या चढ-उताराचा) फरक असतो, हे माहीत असले तर आचार्‍याला शंका राहत नाही, आणि योग्य पदार्थ तो गिर्‍हाइकाकडे पुरवतो.

(विशेष : स्वतःला काही बोलायचे असले तर मराठी स्वभाषक व्याकरण शिकल्याशिवाय बोलू शकतो. वरच्या प्रयोजनांत कुठल्या ना कुठल्या बाबतीत शिकणारा दुसर्‍यांच्या शब्दप्रयोगाच्या अधीन असतो. म्हणून ही प्रयोजने पतंजलींनी वेगळी काढली असावीत. दुय्यम प्रयोजनांची यादी पुढे देत आहे. पुढचा भाग असा सुरू होईल -)

उत्तर (पुढे चालू) : आणखी प्रयोजने हवीत काय - वाटेल तेवढी घ्या! ही पुढची एक-एक करून सांगतो -