व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १

पतंजलींच्या व्याकरण महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत "शब्द म्हणजे काय?" "त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची?" "नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे?" "नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून?" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न उपक्रमावर अन्य ठिकाणी उद्भवले आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे "मराठीकरण" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

***************************************************
ओनामा शब्द-अनुशासनाचा हा
ओनामा हा शब्द येथे सुरुवात या अर्थी वापरला गेला आहे. आणि सुरुवातीचा मंगल शब्द म्हणून वापरला गेला आहे. शब्दांच्या अनुशासनाच्या म्हणजे व्यवस्था लावणार्‍या शास्त्राचा प्रस्ताव येथे सुरू करत आहे.

आक्षेप : कोणते हे शब्द?
उत्तर :
बोली आणि लेखी शब्द. (मुळात लोकवापरातले आणि वेदातले शब्द) बोली - बैल, घोडं, मोटार. लेखी - ओम् नमो जी आद्या, हृदयाची स्फूर्ती, आम्ही भारताचे नागरिक, वगैरे.

आक्षेप : "बैल" याच्यात शब्द कुठला?
(आक्षेप चालू) हे जे शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेले, तेच का?
आक्षेप-विरोध : नाही, ती पदार्थ वस्तू आहे.

आक्षेप चालू : मग हे जे हलते, डुलते, फुरफुरते आहे, तो शब्द आहे काय?
आक्षेप-विरोध : नाही, तिला क्रिया म्हणतात.

आक्षेप चालू : मग हे जे पांढरे, काळे, करडे, तांबूस आहे, ते शब्द आहे काय?
आक्षेप-विरोध : नाही, त्याला गुण म्हणतात.

आक्षेप चालू : मग यामध्ये जे तोडून तुटत नाही फोडून फिटत नाही, आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकसारखे दिसते, तो शब्द काय?
आक्षेप-विरोध : नाही, त्याला आकृती म्हणतात.

आक्षेप सारांश : तर मग शब्द म्हणजे आहे तरी काय?
उत्तर : ज्याचा उच्चार केला की शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेल्या जनावाराचा बोध होतो, तो शब्द. किंवा, ज्याने पदार्थाचा बोध होतो त्या ध्वनीला शब्द असे म्हणतात. लोक म्हणतातच ना
- काहीतरी शब्द बोल, त्याला शब्द फुटेना, आमचा बाळ शब्द बोलतो, वगैरे. हे सगळे ध्वनी केल्याबद्दलच. तसला ध्वनी म्हणजे शब्द.

(पुढच्या वेळी येथपासून सुरू करेन :)
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे?

Comments

लेखी उदाहरणे

ओम् नमो जी आद्या... (ज्ञानेश्वरीची प्रस्तावना. एक महत्त्वाची मराठी धार्मिक-वैचारिक-साहित्यिक कृती म्हणून [पुराणमराठी])
हृदयाची स्फूर्ती... (गडकर्‍यांच्या "वाग्वैजयंती"च्या प्रस्तावनेतून, एक महत्त्वाची वैचारिक-साहित्यिक कृती म्हणून [आधुनिक मराठी])
आम्ही भारताचे नागरिक... (भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून, आपल्या रोजच्या कायद्यांचा प्रमुख स्रोत असलेली कृती म्हणून)

धार्मिक-वैचारिक-साहित्यिक-कायदा या सर्व कारणांनी त्या काळात रोजव्यवहारात वेदांना महत्त्व होते.

साधु!साधु!

धनंजयराव,
आपले महाभाष्याचे मराठीकरण अत्यंत आवडले.
मुळाबरहुकूम आहे किंवा नाही हे कळण्याची माझी पात्रता नाही तरीही.
या उपक्रमाचे सर्वथा स्वागत करतो व पूर्तीसाठी शुभेच्छा देतो.
कितीही भाग झाले तरी आम्ही वाचायला उत्सुक आहोत याची खात्री बाळगून लिहीत रहावे.
- - दिगम्भा

असेच

आपले महाभाष्याचे मराठीकरण अत्यंत आवडले.
मुळाबरहुकूम आहे किंवा नाही हे कळण्याची माझी पात्रता नाही तरीही.
या उपक्रमाचे सर्वथा स्वागत करतो व पूर्तीसाठी शुभेच्छा देतो.
कितीही भाग झाले तरी आम्ही वाचायला उत्सुक आहोत याची खात्री बाळगून लिहीत रहावे.

अगदी असेच म्हणतो. हा भाग आवडला. पुढील भागांविषयी उत्सुकता आहे.

नक्की लिहा!

वा!!

एक वेगळा उपक्रम!
लिखाण आवडले.
नक्की लिहा, वाचायला आवडेल.

आपला
गुंडोपंत

हा लिव्हा भो लिव्हा

मला नाय बॉ आवडत याकरण ,पर लोकाले आवडते ना मंग लिव्हा
मी बी लिव्हावा म्हणतो इंगरजीच्या ग्रामरवर ;)

बाबूराव

तू दी आशिर्वाद, हांव बरयता

बाबूराव, तुका ते ग्यान भितरसान आपसूक कळता, मागीर तुका किते रे? फुडे सांगतलोच हांव की ही कारणां कित्याक सांगता तर त्या कारणां लागून माका हो अब्यास धादोस करता. तू तरी मन व्हड करून आशिर्वाद दिलो, बरयतलोच तर हांव.

हांव बरयता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कठिण शब्दांचे अर्थः
दी.....दे.
हांव....मी.( अहम् चा कोकणी अपभंश )
बरयता....लिहितो.
तुका.....तुला.(कोणाही व्यक्तीला तुम्ही, आपण असे न म्हणता तू असे सलगीने संबोधण्याची पद्धत गोव्याच्या कोकणीत आहे.)
भितरसान......आतून.
मागीर....नाहीतर.
किते......का ? कशाला ?
कित्याक .....कशाला?
माका....मला.
व्हड.....मोठे, विशाल.
बरयतलोच.....लिहिणारच.

सुंदर उपक्रम

वा वा धनंजयराव,
कमालच केलीत.
आपले मागचे दोनही व्याकरणविषयक लेख वाचले पण समजले नाहीत म्हणून काही लिहिले नाही.

या उपक्रमातून काही मौलिक कळेल असे वाटते.
आपल्या उपक्रमाला शुभेच्छा. वाचण्यास उत्सूक आहे.
--(तळहातावर बुद्धीरेषा नसलेला ) लिखाळ.

नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :) (वार्‍यावरची वरात-पुल)

अगदी हेच म्हणतो.

आपले मागचे दोनही व्याकरणविषयक लेख वाचले पण समजले नाहीत ..
या उपक्रमातून काही मौलिक कळेल असे वाटते.
.... वाचण्यास उत्सूक आहे.

अगदी हेच म्हणतो.

असेच

आपल्या उपक्रमाला शुभेच्छा. वाचण्यास उत्सूक आहे.

असेच म्हणतो. सुंदर उपक्रम आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

पतंजली-प्लेटो

वा! लेख आवडला. सर्वांना कळेल अशा भाषेत मांडलेले अधिक लेख येऊ द्यात.

मध्यंतरी चित्राताईंनी लिहिलेल्या प्लेटोचे गायनशिक्षणाबद्दलचे विचार या लेखाची आठवण झाली. त्याचा रिपब्लिक हा ग्रंथही अशाच प्रश्नोत्तरातून समोर येतो.

पातंजल महाभाष्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या ग्रंथाचे केवळ नाव ऐकले होते. या ग्रंथाचा प्रारंभ " अथ शब्दानुशासनम् |" असा असावा असे श्री. धनंजय यांच्या लेखना वरून वाटते. (पातंजल योगशास्त्राचा प्रारंभ "अथ योगानुशासनम्|"असा आहे.)
श्री. धनंजय यानी लिहिलेले भाषांतर इतके उत्तम आणि वाचनीय आहे की मी तीनदा वाचले तरी तृप्ती होईना. संपूर्ण ग्रंथाचेच भाषांतर त्यांच्या हातून व्हावे. ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध होईल हे नि:संशय. कोणताही चांगला प्रकाशक ते प्रसिद्ध करील. अवश्यकता वाटल्यास शासनाचे सहाय्य सुद्धा सहज मिळेल. संवाद रूपात असलेले आणि श्री. धनंजय यांनी लिहिलेले असे पुस्तक म्हणजे मराठी व्याकरण साहित्यात मोलाचे योगदान ठरेल या विषयी माझ्या मनात तिळमात्र संशय नाही. ते व्हायलाच हवे.
श्री. धनंजय यांच्या या लेखनाविषयी श्री. दिगम्भा यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद लिहिला तोच उपक्रमाच्या आम्हा सर्व सदस्यांचा असणार हे निश्चित.

अथ शब्दानुशासनम्

ग्रंथाचा प्रारंभ " अथ शब्दानुशासनम् |" असा असावा

बरोबर! "अथ" हा शब्द मंगलवाचक आहे, असे म्हटलेले आहे.
कात्यायनांनी पहिला शब्द "सिद्ध" असा मंगल वापरला (तो या लेखमालेत पुढे येईल).
पाणिनींनी "वृद्धि" हा पहिला मंगल शब्द वापरला (तो या लेखमालेत नाही येणार).

पूर्वी म्हणे लहान मुलांना मराठी लिहायला पहिले "ओ-ना-मा-सि-ध-ये" अशी अशी (जैन?) मंगल अक्षरे शिकवत. मला मात्र "अ-आ-इ-ई" असेच शिकवले गेले!

ओनामा

"ओनामा" याविषयी असे वाचले आहे की
पूर्वी मुलाना "श्री गणेशाय नमः, ओ ना मा सि धं" असे लिहायला शिकवत. हे जैन धर्माशी संबंधित नसून
"ॐ नामासि त्वं" (गणेशा, तू ॐ नावाचा आहेस, किंवा तुझे नाव ॐ आहे - हा अनुवाद इतरांसाठी, विद्वानांसाठी नाही ) या उक्तीचा लोकप्रचलित अपभ्रंश आहे. (अंधुकसे वाटते आहे की हे नी. शं नवरे यांच्या एखाद्या पुस्तकात दिले असावे.)
खरे म्हणजे माझ्या लहानपणी देखील हे ओनामासिधं आमच्या कुटुंबात तरी प्रचलित नव्हते व मला ते कधीही शिकवले गेले नाही. पण कदाचित् अन्य अल्पशिक्षित वर्गात ते तेव्हाही प्रचलित असेल कारण बाहेरील कोणाकडून तरी ते ऐकिवात आले.

"ओनामा" हा शब्द धनंजयांच्या भाषांतरात आलेला पाहून, मूळ ग्रंथात हा शब्द कसा असू शकेल असे वाटून थोडासा चमकलो. आता असे वाटते आहे की हे कशाचे तरी मराठी भांषांतर म्हणून त्यांनी वापरले असावे.

- दिगम्भा

निरुक्त

पातंजल महाभाष्य हातात पडायचा योग कधी आला नव्हता. पण निरुक्त अनेकदा चाळून पाहिले होते. त्यात वेदवाङ्‌मयात येणार्‍या शब्दांची अशीच चर्चा असायची. इतका काथ्याकूट वाचून जीव अगदी वैतागून जायचा. श्री. धनंजय यांनी किचकट विषय सोपा करून दाखवण्याची करामत केली आहे. पुढील भाग इतक्याच आसुशीने वाचले जातील यात शंकाच नाही. ----वाचक्‍नवी

काथ्याकूट

भाष्यात या पहिल्या प्रकरणात मुळात काय महत्त्वाचे आहे ते सांगितले आहे. ते सोपे आणि रसाळ आहे. तरी विचारपूर्ण आहे. (ही लेखमाला तिथवरच नेण्याचा विचार आहे!) पुढचा भाग बहुतेक संस्कृताला, आणि त्यातल्या त्यात पाणिनींच्या पुस्तकालाच लागू पडतो, म्हणून तो हाताळणार नाही. ती चर्चा खूप तपशीलवार होते, मग जो पाणिनींच्या व्याकरणाचा विद्यार्थी नाही, त्याच्यासाठी ती नकोशी होते. पण प्रस्तावना वाचल्यामुळे, पतंजली मातृभाषा सहज बोलणार्‍याचा अनादर करत नाहीत हे आपल्याला माहिती असते.

वैद्यकाच्या पुस्तकांतही अशी प्रस्तावना लिहिणे भाग पाडले पाहिजे. प्रत्येक शिकाऊ वैद्याला हे कळले पाहिजे, की आरोग्याचे सार आपल्या शास्त्रीय गुंतागुंतीत नाही, तर सर्व लोकांच्या आरोग्यात आणि सुखात आहे. वैद्य नसलेल्याला यकृत काय आणि प्लीहा काय ते माहीत नसते. तरी आपले दुखणे बरे झाले की नाही ते उत्तम कळते. ते मुळात महत्त्वाचे. मग पुढे "यकृताचे दुहेरी रक्ताभिसरण" वगैरे किचकट तपशील वैद्याला शिकावे लागणारच आहे. त्याबद्दल वैद्य-गुरूंची मतभेद-भांडणे होतीलही. होतीलच. ते त्याच्या ठिकाणी ठीकच आहे, महत्त्वाचेही आहे. पण ते शिकतानाही नम्रता नसली, तर येणारी वैद्यकातली अहंमन्यता, हा दुसर्‍या चर्चेसाठी विषय!

वैद्यकातली अहंमन्यता

आवांतर:
तर येणारी वैद्यकातली अहंमन्यता, हा दुसर्‍या चर्चेसाठी विषय!

सहमत आहे!

हे अहंमन्यतेचे शिक्षण मेडिकल कॉलेजमधेच मिळत असावे असे वाटते!!
आणी असा 'भाव मिळाला नाही' की मग हे डॉक्टर्स कसे चवताळल्यासारखे ताळ तंत्र सोडतात हे तर आपण अनेकदा पाहतोच.

(कोण पेशंट??? ते आमच्या मुळे आहेत हो...) ;)

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

प्रस्तावना

वैद्यकाच्या पुस्तकांतही अशी प्रस्तावना लिहिणे भाग पाडले पाहिजे. प्रत्येक शिकाऊ वैद्याला हे कळले पाहिजे, की आरोग्याचे सार आपल्या शास्त्रीय गुंतागुंतीत नाही, तर सर्व लोकांच्या आरोग्यात आणि सुखात आहे.
शंभर टक्के सहमत.
तुमची या लेखमालेची प्रस्तावनाच इतकी सुरेख आहे की पुन्हापुन्हा वाचावीशी वाटते. अधूनमधून पेरलेल्या उक्ती म्हणजे गाळीव रत्‍नेच!--वाचक्‍नवी

सहमत

तुमची या लेखमालेची प्रस्तावनाच इतकी सुरेख आहे की पुन्हापुन्हा वाचावीशी वाटते. अधूनमधून पेरलेल्या उक्ती म्हणजे गाळीव रत्‍नेच!

वाचक्नवींच्या या विधानाशी शतशः सहमत आहे. आपल्या या ज्ञानयज्ञाच्या पूर्ततेसाठी शुभकामना व्यक्त करतो. आपली ही लेखमालिका संग्रहणीय आणि पुनः पुन्हा वाचण्यासारखी असेल यात संशय नाही

आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

छान

अत्यंत चांगला उपक्रम आहे. पहिला भागही खूप छान झाला आहे.

"बोली आणि लेखी शब्द" या ठिकाणी लौकिक आणि वैदिक शब्द असे आहेसे वाटते. आपण केलेले भाषांतर प्रथमदर्शनी खटकले असले, तरी आणखी विचार केला असता आपले भाषांतरच आजच्या काळाला अधिक सुसंगत असल्याचे वाटले. त्यासाठी दिलेली उदाहरणे व त्यांची निवड सुद्धा फारच आवडली. त्याबद्दल अभिनंदन.

एक शंका-
ज्याने पदार्थाचा बोध होतो त्या ध्वनीला शब्द असे म्हणतात.
येथे ध्वनी या शब्दाचा मूळ शब्द कोणता? कृपया या प्रश्नाचे पूर्णच मूळ उत्तर द्याल का?

या उपक्रमासाठी शुभेच्छा!
राधिका

मुळातही ध्वनीच

मूलपाठ्य :

> अथवा प्रतीतपदार्थको लोके ध्वनि: शब्दः उच्यते
> तद् यथा शब्दं कुरु, मा शब्दं कार्षी:, शब्दकार्ययं माणवकः इति, ध्वनिं कुर्वन्नेव उच्यते । तस्माद् ध्वनि: शब्दः |

या एका वाक्यात माझा अनुवाद साधारण शब्दास-शब्द लावून आहे म्हणून पुन्हा देत नाही. (उदाहरणे वेगळी : "शब्द करू नकोस" चा मराठीत नीट अर्थ लागत नाही, कारण आपण असे बोलत नाही.)

मुळातले पाठ्य समोर ठेवायला सांगून अशी लाज काढू नका हो. या वाक्यात नाही, पण बाकी ठिकाणी मी बहुतेक गोषवारा/सारांश दिलेला आहे. दुसर्‍या भागापासून पुढे सुरुवातीच्या "रंगसंगतीत" तसे स्पष्ट सांगितले आहे, पण इथे सांगितले नाही, कारण लेखाचे संपादन करता येत नाही. शिवाय या पहिल्या भागात लाल रंगाच्या अक्षरांचे जवळजवळ भाषांतरच झालेले आहे, म्हणून सुरुवातीचे "रंगसंगती" वाक्य काही खूप चुकलेले नाही. तरी पतंजलींचा बैल डोळे मिचकावतो, माझा फुरफुरतो; पतंजलींची आकृती कापून कापली जात नाही, माझी फोडून फिटत नाही. त्या दिवशी बैल कापून ओघळणारे रक्त माझ्या मनाला शाहारे देऊन गेले, म्हणून मनातल्या मनात मी पोळ्यातला मातीचा बैल फोडला.

मराठीतले महामहोपाध्याय अभ्यंकरांचे महाभाष्याचे भाषांतर इतके मानदंड ठरले आहे, की हिंदी वगैरे बोलणारे अन्यभाषक अभ्यासक ते वाचण्यापुरते मराठी शिकतात. त्या प्रकांडपंडिताच्यापुढे मी काय दिवे लावणार आहे! त्या भाषांतराची प्रत माझ्यापाशी नाही. पण उपक्रमींपैकी जे कोणी पुण्यात आहेत ते पुणे विध्यापीठाच्या किंवा टिमविच्या ग्रंथालयात जाऊन ते भाषांतर खुद्द वाचू शकतात.

मग माझा हा खटाटोप का? तरी या लेखमालेची प्रयोजने सांगतो.
मूळचे पाठ्य (आणि अभ्यंकरांचे भाषांतर) हे उदाहरणांमुळे फक्त संस्कृतलाच लागू पडते. पण त्यात सांगितलेल्या कल्पना कुठल्याही एका भाषेपेक्षा मोठ्या आहेत. त्यातली दृष्टी मोठी वैज्ञानिक आहे. म्हणून त्यातील कल्पनांचा फक्त सारांश (जमल्यास शब्दशः) देऊन, आधुनिक काळाला, आणि मराठीला ते विचार कसे लागू करता येतील याबद्दलची माझी मते देत आहे. जिथेजिथे मूळपाठ्याशी मोठी फारकत होते, तिथे तशीतशी टिप्पणी दिली आहे - कारण काही काही कल्पना आधुनिक करायला माझी जाण किंवा कल्पनाशक्तीची भरारी कमी पडते.

एक मजेदार विचारप्रवर्तक लेख म्हणून तुम्ही तो वाचावा. त्यातल्या चुका, विशेषकरून मराठीतल्या जरूर सांगा. हा लेख मुद्दामून उपक्रमाच्या "संस्कृत" समुदायात घातला नाही. कारण संस्कृतातली सगळी उदाहरणे काढूनच टाकलेली आहेत. पण तरी "संस्कृती" एक विषय म्हणून निवडला, कारण असा वैज्ञानिक विचार करायची भारतात संस्कृती आहे, असेही या लेखांतून सांगायचे आहे.

पुढे कौंडभट्ट नावाच्या पंडिताने महाभाष्याला "फणि-भाषित-भाषाब्धि" म्हणजे "शेषावतार पतंजलींनी सांगितलेला भाष्याचा सागर" असे म्हटले आहे. तो सागर खरेच जिंकायचा असेल, तर म.म. अभ्यंकरांसारखा जाणकार कप्तान बरोबर घ्या. मी शंख कानाशी धरून सागराचा आवाज ऐकू येतो का? असे म्हणतो आहे. त्याने तुमचे खर्‍या सागराचे दर्शन, श्रवण करायची इच्छा झाली, तर माझ्या शंभर चुका झाल्या असल्या तरी मी लेख सफल झाल्याच्या फुशारक्या सांगत हिंडेन.

बाप रे

मुळातले पाठ्य समोर ठेवायला सांगून अशी लाज काढू नका हो.

आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे. आपल्या भाषांतरातल्या चुका काढणं हा माझा उद्देश मुळीच नाही.
गेल्यावर्षी काही अभ्यासानिमित्त मी याच आह्निकातल्या नेमक्या याच भागाची सांगड एका पाश्चिमात्त्य विचारप्रवाहाशी घालून प्रोजेक्ट केला होता. त्यात शब्द कशाला म्हणतात ध्वनीला की आणखी कशाला हा मुद्दा कळीचा होता. तेव्हा मी वाचलेल्या प्रतीत 'ध्वनी'ला शब्द म्हणतात असे मला दिसले नव्हते. कदाचित मी चुकीचे वाचले असेल, किंवा जे वाचायला हवे ते वाचले नसेल. आपला लेख वाचताना मला माझी चूक जाणवली. परंतू त्याची आधी शहानिशा करावी म्हणून विचारले. कृपया गैरसमज नसावा.
मोठमोठ्या ग्रंथांची भाषांतरे करण्याचा अधिकार फक्त पुस्तके प्रकाशित करून प्रसिद्ध पावलेल्या व्यक्तींनाच नसतो. वेगवेगळ्या क्षेत्रांतील परंतू तरीही संस्कृताचा अभ्यास व्यासंग व आवड असलेल्यांनी एकाच ग्रंथाची भाषांतरे केली, तरी प्रत्येक भाषांतरातून काहीतरी नवेच गवसते. जसे आपल्या भाषांतरामुळे या आह्निकाचे आजच्या काळाशी सुसंगत असे दर्शन घडते आहे. तेव्हा त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.
पुन्हा एकदा- कृपया गैरसमज नसावा.
माझ्या या प्रश्नामुळे आपण दुखावले जाल हा विचारच डोक्यात आला नाही. आता पुढच्यावेळपासून प्रश्न विचारण्यापूर्वी विचार करत जाईन. :)
राधिका

छान माहिती

तुम्ही भाषाविज्ञानाचा अभ्यास करून चांगली माहिती देता. व्यनिने आणि उघड्या चर्चेत, दोन्ही ठिकाणी मर्माचे प्रश्न विचारा, माहिती द्या. गैरसमज काहीच नाही. ह. घ्या. :-)

 
^ वर