प्लेटोचे गायनशिक्षणाबद्दलचे विचार
हा लेख C. D. C. Reeve यांच्या प्लेटो रिपब्लिक या इंग्रजी अनुवादावर आधारित आहे.
सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु. प्लेटोचा जन्म ख्रिस्तपूर्व ४२९ आणि मृत्यु ३४८/३४७. लहानपणीच त्याच्यावर ग्रीक (अथेन्स) राजकारणाचा प्रभाव पडला. तो राजकारणात पडला असताच परंतु, त्याच्या प्रिय गुरुचा - सॉक्रेटिसाचा - वध झाल्याचे कारण झाले आणि त्याने तो मार्ग सोडला. त्या काळात तो तत्वज्ञानाकडे वळला आणि त्याने "अ़कॅडेमी" हे विद्यापीठ काढले. त्याने "रिपब्लिक" लिहीले ते न्याय म्हणजे नक्की काय याचा उहापोह करायला. ते करीत असताना त्याने अनेक विषयांवर भाष्य केले. हे सर्व भाष्य तो रिपब्लिकमध्ये सॉक्रेटिसाच्या तोंडी घालतो. हे विचार त्याअर्थाने सॉक्रेटिसचे नाहीत, तर प्लेटोचे किंवा त्याच्यावर सॉक्रेटिसमुळे किंवा त्याच्या मृत्युनंतर जे संस्कार झाले असतील त्यामुळे तयार झालेले. पण सॉक्रेटिसच्या विचारांचा तरुणपणी जो परिणाम झाला असणार त्याचे पांग त्याने रिपब्लिकमध्ये सॉक्रेटिसला मध्यवर्ती पात्र करून फेडले. ही एक प्रकारची गुरुला श्रद्धांजलीच.
रिपब्लिक हा एक गुरु (किंवा एक सुजाण व्यक्ती) आणि शिष्य (थोडेसे अपरिपक्व विद्यार्थी/ क्वचित प्रसंगी विवादक) यांच्यातील संवाद आहे - आपल्या उपनिषदांमध्ये संवाद आहेत तश्यासारखाच. सुरुवात एका जत्रेनंतर सॉक्रेटिस घरी जायला निघतो, तेव्हा ओळखीचा मुलगा त्याला थांबवतो, आपल्या घरी घेऊन जातो आणि गप्पा सुरु होतात. त्या गप्पांतून हे विचार सॉक्रेटिसकरवी प्लेटो व्यक्त करतो. रिपब्लिकमध्ये सॉक्रेटिस स्वतःच सूत्रधार आहे आणि प्रमुख पात्रही. ह्या गप्पा सुरु होतात आणि अनेक विषयांना तोंड फुटते. आणि एकातून दुसरे असे विचार उत्पन्न होत जातात. यात गंमत अशी की सॉक्रेटिसच बर्याचदा प्रश्न विचारतो - ते असे की त्यातच उत्तर सामावलेले असेल आणि बाकीचे त्याला दुजोरा देतात किंवा कधी प्रश्न विचारतात. हे पुस्तक लिहिण्यासाठी ही अशी पद्धत प्लेटोने का निवडली असावी याची कल्पना नाही.
रिपब्लिक हे एका कल्पित शहराच्या व्यवस्थेचे वर्णन आहे. आता कोठेही जगायचे म्हटले की अन्न, वस्त्र, निवारा यांच्या गरजा आल्याच. म्हणजे अन्नधान्य पिकवणारे शेतकरी, घर बांधणारा वास्तुकार (गवंडी, अभियंता इ.), आणि वस्त्रे तयार करणारा (विणकर, शिंपी) हे आलेच. हे सर्व आपल्या बलुतेदारांसारखे. अश्या सर्वांच्या वेळाची / जबाबदार्यांची सुयोग्य वाटणी होऊन एक सुंदर, निरोगी शहर तयार होणार. पण मग लोकांची सुखाची कल्पना तेथे थांबणार नाही, आणि वाटचाल रोगीटपणाकडे सुरु होणार या वास्तवाची जाणीवही सॉक्रेटिस करून देतो. आणि शहर माणसांनी गजबजून जाणार. आता ते त्या शहराला लागणार्या गोष्टींसाठी पुरे पडणार नाही, तर तेव्हा क्षेत्रफळ वाढवण्याच्या मागे लागणार. त्याची साम्राज्य मोठे करण्याची आकांक्षा वाढत जाणार. तसेच त्याला विरोधक तयार होणार. आणि मग या शहराला रक्षकांची गरज निर्माण होणार. प्लेटोने हे सत्य स्विकारले आहे. येथे रक्षक म्हणजे शहरांची काळजी घेणारे. राज्याची सुव्यवस्था पाहणारे. थोडक्यात पोलिस, अधिकारी, आणि राज्यव्यवस्था बघणारे सर्वच. असे रक्षक एका दिवसात उत्पन्न होत नाहीत तर ते घडवावे लागतात.
मग हे रक्षक कसे पाहिजेत - तर प्लेटो म्हणतो कुत्र्यासारखे! यात कुत्र्यांचा सन्मान आहे, आणि रक्षकांचा अपमान नाही. प्लेटोने पुढच्याच वाक्यात कुत्र्यांना तत्वज्ञानी म्हटले आहे. ते सांगताना तो म्हणतो कुत्र्यांना कोण आपला आणि कोण परका हे कसे कळते? प्लेटोचे म्हणणे आहे की कुत्रे हे निसर्गतः हा भेद करू शकतात आणि असा भेद फक्त जे ज्ञानाचे भुकेले (प्रेमी) आहेत तेच हे करू शकतात. आणि तत्वज्ञान आणि ज्ञानाची ही भूक ह्या वेगळ्या गोष्टी नाहीत. त्यामुळे रक्षक असेच पाहिजेत जे आपले-परके हा भेद करू शकतील. अश्या रक्षकांना घडवणारे शिक्षणही तसेच पाहिजे.
रिपब्लिक मधील शिक्षणाबद्दलचे विचार जरी रक्षकांच्या शिक्षणावर केंद्रित केले असले तरी ते बर्याच अंशी आजच्या काळातही सर्वसामान्यांच्या शिक्षणालाही लागू होऊ शकतात. तर असे हे शिक्षण कधी सुरु व्हावे किंवा असे ह्याचे सविस्तर वर्णन प्लेटो करतो. यासाठी तो पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचाच आधार घेतो. तो म्हणतो शरिरासाठी शारिरीक शिक्षण हवे तर मनासाठी ("सोल" -आत्मा) गान (गायन) शिक्षण. या गायनात (musike) मध्ये काव्य, गोष्टी, आणि संगीत या सर्व कला अंतर्भूत आहेत. जेव्हा हा भाग मी वाचला तेव्हा पहिल्याप्रथम आश्चर्य वाटले. पण खरे तर त्यात नवल नाही. आपण लहान असताना आपल्या शिक्षणाची सुरुवात आई-आजींनी म्हटलेल्या बडबडगीतांनी होतेच. त्यातूनच बाळाला भाषेचे, गेयतेचे आकलन होऊ लागते. त्याच्या मनावर संस्कार होतात आणि प्लेटोला हेच म्हणायचे असावे. परंतु, प्लेटो आपल्याला सावधही करतो. या वयात सांगायच्या गोष्टी, गाणी नक्की काय असावीत हे काही नियमांप्रमाणे व्हावे हा त्याचा आग्रह आहे. हा आग्रह आत्ताचे बरेचसे आईवडिल देखील मान्य करतील असे वाटते. दूरदर्शन/ केबल वरील प्रत्येक लहान मुलांचा म्हणवला जाणारा कार्यक्रम ज्याप्रमाणे मुलांसाठी योग्य असतोच असे नाही आणि तो बघू न देणे हेच जसे काही वेळा हितकारक असते तसेच हे आहे. विशेषतः ज्यामुळे मुलांना यादवी किंवा तत्सम कलह यांची वर्णने ऐकायला मिळणार नाहीत असेच काव्य, गायन त्यात असावे हा त्याचा आग्रह होता. ह्यात गीक देवतांचा उल्लेख अनेकदा येतो. ज्यानी मुले घाबरणार नाहीत अश्याच गोष्टी असाव्यात असेही तो सांगतो. अश्या गोष्टी त्याने मुले जास्त भावूक आणि दुबळी होतील अशी त्याची समजूत होती. आईवडिलांविषयी आणि देवतांविषयी आदर आणि परस्परांमधील मैत्री वाढेल अश्याच गोष्टी या पुढील रक्षकांच्या शिक्षणात असाव्यात असे त्याचे विचार आहेत. त्याने वस्तूंच्या, लोकांच्या आवाजांच्या नकला करणे, हशे पिकवतील अश्या गोष्टी सांगणे यावर बरीच टीका केली आहे. (सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मात्र अश्या व्यवस्थेत गळचेपी होणार हे निश्चित). लहानपणीच भ्रष्टाचाराशी ओळख होऊ नये म्हणून भेटींनी देव किंवा राजे प्रसन्न होतात असे सांगू नये असेही प्लेटो म्हणतो. वाचेला (speech) ताल (rhythm) आणि मेळ (harmony) याची जोड मिळावी, कारण तेच आत्म्याचे प्रकटीकरण करतात असे त्याचे म्हणणे आहे. ताल आणि मेळ हे आत्म्यावर खोलवर परिणाम करतात. हे गायन पारंपारिक पद्धतीनेच (established order) व्हावे, त्यात नवीन बदल नकोत असे त्याचे स्पष्ट सांगणे आहे. त्याने अश्या बदलांचा थेट संबंध हा राज्यातील नियम आणि कायद्यांशी लावला आहे आणि अश्या बदलांपासून सावध रहावे असाही इषारा दिला आहे. वेदांमधल्या मौखिक परंपरा -(अधिक माहितीसाठी http://mr.upakram.org/node/286) त्यातही शुद्ध उच्चार, पद्धती वरील भर ह्यामागेही असेच काही विचार मागे असतील किंवा कसे याचा विचार जरूर व्हावा. अर्थात हे म्हणत असताना कोणत्या जगाचा कोणावर प्रभाव पडला याबद्दल काही म्हणायचे नाही.
गानशिक्षण जर योग्य तर्हेने दिले गेले तरच अभिरुचीसंपन्न व्यक्ती तयार होतील हा त्याचा ग्रह होता. जर एखाद्याला असे योग्य शिक्षण मिळाले तर ती व्यक्ती कोणती गोष्ट योग्य नाही याचाही सुयोग्य विचार करेल; जे हीन आहे, अभिरुचीशून्य आहे ते टाकून देईल असे त्याचे म्हणणे होते. मर्यादा, धैर्य, दातृत्व, उत्तम संस्कार आणि ह्यासर्वांचे विरोधी असलेले विकार, आणि त्यांची रोजच्या लहान-मोठ्या गोष्टीत पडणारी प्रतिबिंबे ह्याचे योग्य ज्ञान अश्या रक्षकाला असले पाहिजे; अशी प्रतिबिंबे कशिदाकारी, वास्तुकला यातही पडत असल्याने अश्याही कलांचे केवळ योग्य संस्करण आणि प्रदर्शन झाले पाहिजे व एकंदरीतच जी मुले पुढे शहराचे रक्षक होणार अश्या मुलांच्या डोळ्यांवर आणि कानांवर उत्तम संस्कार झाले पाहिजेत असेच त्याचे म्हणणे होते. शेवटचे आणि महत्त्वाचे प्लेटो बजावतो ते असे की जे शिक्षक असे ज्ञान देतात त्यांनी विद्यार्थ्यांवर केवळ पुत्रवत प्रेम केले पाहिजे त्यात कोणत्याही वासना नकोत. एकदा असे शिक्षण दिले गेले की मुलाचा पुढील शारिरीक शिक्षणाचा पाया तयार झाला. निरोगी मन तयार झाले की मग बलसंवर्धन. परंतु प्लेटो परत परत बजावतो की नुसते बलसंवर्धन केले तर ते पुरेसे नाही. त्याला आत्मिक पाया भक्कम हवा.
काळाप्रमाणे प्लेटोचे शिक्षणाविषयीचे आणि राज्यव्यवस्थेबद्दलचे विचार जरी "आयडियलिस्टिक" म्हणून मागे पडले असले (माझ्या एका ग्रीक सहकारी स्त्रीच्या म्हणण्याप्रमाणे) तरी आजचे अमेरिकेतले आणि एकंदरीतच युरोपीय पद्धतीचे (पाश्चिमात्य) शिक्षण कसे याच पायावर आजही टिकून आहे याची उदाहरणे जर पाश्चिमात्य शाळांचा आणि कॉलेजांचा पाठ्यक्रम पाहिला असता दिसून येतात. या अभ्यास पद्धतीत आजही बालवाडीपासून गाण्याचे / वादनाचे शिक्षण दिले जाते. तसेच कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास महाविद्यालयातही शास्त्र आणि वाणिज्य असे विषय घेतले तरी चालू राहतो. पाश्चिमात्यांनी नव्या शिक्षणपद्धती मात्र स्विकारल्या दिसतात - अभिव्यक्तीस्वातंत्र्यासहित - परंतु मूळ गाभा मात्र तोच आहे. आपल्याकडेही सुरुवात चांगलीच होते पण नंतर मात्र हिंदी चित्रपटातील बरी-वाईट गाणी हेच मुलांवर संस्कार करताना दिसतात - अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळून. सध्याच्या भारतीय शिक्षणपद्धतीत - विशेषतः महाविद्यालयात गेल्यावर विद्यार्थ्यांचा कलेशी असलेला संबंध तुटलेला दिसतो.
आपल्याकडे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांवर लहानपणापासून उत्तम संस्कार केले. त्यांच्या शिक्षणात प्राचीन काव्यांचा, गोष्टींचा ( रामायण/महाभारत) अभ्यास, आणि भालाफेक इत्यादीचा समावेश होता असे म्हणतात. इतरही राजे रजवाडे यांनाही अश्याच कमीजास्त पद्धतीने शिक्षण दिले जात असावे. पण त्याचे परिमाण आणि निकष हे वेगवेगळे असल्याने त्याचा कमीजास्त उपयोग होत असावा. आपल्याकडच्या सध्याच्या शिक्षणाचा विचार आणि पुढचे बदल हे चांगल्या भारतीय परंपरांचा आणि इतरत्र यशस्वी झालेल्या नव्या जुन्या उपायांचा विचार करून व्हावा असे वाटते.
Comments
संगीतातले पदवीधर आणि नारायणराव बालगंधर्व! ;)
आपण लहान असताना आपल्या शिक्षणाची सुरुवात आई-आजींनी म्हटलेल्या बडबडगीतांनी होतेच. त्यातूनच बाळाला भाषेचे, गेयतेचे आकलन होऊ लागते.
आम्ही प्लेटो वाचलेला नाही, परंतु त्यांचे आमचे विचार जुळतात असे दिसते!;)
'मैखिक परंपरा" या चर्चेदरम्यान आम्हीही काहिश्या याच अर्थाच्या (नॉट एक्सॅट्ली) एकदोन प्रतिक्रिया दिल्या आहेत!
वाचेला (speech) ताल (rhythm) आणि मेळ (harmony) याची जोड मिळावी, कारण तेच आत्म्याचे प्रकटीकरण करतात असे त्याचे म्हणणे आहे. ताल आणि मेळ हे आत्म्यावर खोलवर परिणाम करतात. हे गायन पारंपारिक पद्धतीनेच (established order) व्हावे, त्यात नवीन बदल नकोत असे त्याचे स्पष्ट सांगणे आहे.
क्या बात है! वरील विधानाशी आपण पूर्णतः सहमत आहोत.
या अभ्यास पद्धतीत आजही बालवाडीपासून गाण्याचे / वादनाचे शिक्षण दिले जाते.
परक्या देशांबद्दल आम्हाला ठाऊक नाही, परंतु भारतातही आज अनेक शाळांतून गायन हा विषय असतो. परंतु हा विषय अधिकारी व्यक्तिकडूनच शिकवला गेला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. केवळ सिलॅबसमध्ये विषय आहे, म्हणून कुठला तरी शिक्षक केवळ नोकरीचा एक भाग म्हणून मुलांना सारेगम शिकवतो, असं होऊ नये असं अम्हाला वाटतं. अन्यथा त्या विद्यार्थ्यांमधून संगिताचे पदवीधर अनेक तयार होतील परंतु भास्करबुवा बखले किंवा नारायणराव बालगंधर्व तयार होणार नाहीत असे आम्हाला वाटते!
लेख बाकी छान आहे, बोले तो.. माहितीपूर्ण आहे!
आपला,
(ऑर्थोडॉक्स! ) तात्या.
सुंदर लेख
लेख फारच आवडला. सॉक्रेटिसने (म्हणजेच प्लेटोने?) रक्षकांच्या निमित्ताने सांगितलेले संस्कारांचे* महत्त्व पटण्यासारखे आहे. अनेक छोट्याछोट्या गोष्टींचा बारकाईने केलेला अभ्यास आवडला.
* 'संस्कार' - भावी आयुष्यावर परिणाम करणारे बालपणातील अनेकविध अनुभव/प्रसंग/शिक्षण या व्यापक अर्थाने.
सुरेख
चित्रा,
लेख आवडला. अतिशय मुद्देसूद वाटला. असे आणखी लेख वाचायला आवडतील.
मुलांना काय सांगावे आणि काय सांगणे टाळावे याबाबत प्लेटोचे विचार पटले.
गायन/ वादन हे विशेषतः ग्रुप ऍक्टिविटी म्हणून शिकवले गेल्यानेही मुलांचा एकत्र गाणे वाजवणे, एकमेकांना पूरक गाणे - वाजवणे आणि त्यातील आनंद घेणे यासर्वांशी परिचय होतो. हे सर्व मुले आवडीने करतात असे दिसते.
रक्षकांबद्दलही प्लेटोचे विचार आवडले.
सॉक्रेटिसचा खटला आणि पुढे वध या सर्व गोष्टींमुळे आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून प्लेटो बरेचदा आपले स्वतःचे विचार सॉक्रेटिसच्या तोंडी घालत असे, असे म्हटले जाते.
छान
रिपब्लिकची प्रश्नोत्तराची शैली खासच आहे.
त्याने वस्तूंच्या, लोकांच्या आवाजांच्या नकला करणे, हशे पिकवतील अश्या गोष्टी सांगणे यावर बरीच टीका केली आहे. (सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मात्र अश्या व्यवस्थेत गळचेपी होणार हे निश्चित). लहानपणीच भ्रष्टाचाराशी ओळख होऊ नये म्हणून भेटींनी देव किंवा राजे प्रसन्न होतात असे सांगू नये असेही प्लेटो म्हणतो.
लहानग्यांना काय ऐकवावे व ऐकवू नये यबद्दलची प्लेटोची मते रोचक आहेत.
रिपब्लिक बद्दल आणखी लिहा, वाचायला आवडेल.
रिपब्लिक
वरील लिंक वाचली - सुरुवात केली आहे
अशीच सोक्रेटिसच्या विचारांची / लिखाणाची एखादी लिंक आहे का?
सॉक्रेटिस (दुवा)
प्लेटोच्याच नावाने सुरू केलेला स्टॅनफोर्डचा हा (त्याच्या माहितीनुसार) तत्वज्ञानाबद्दलचा सर्वात समृद्ध ज्ञानकोष आहे. यात सॉक्रेटिसच्या विचारा/लिखाणाबद्दल अधिक माहिती इथे मिळेल.
छान
लेख आवडला. बर्याच सूक्ष्म गोष्टींचा सखोल विचार केला आहे. विशेषतः लहानमुलांना काय शिकवावे आणि काय शिकवू नये. रक्षकांबाबतची मते विचार प्रवर्तक आहेत. शेवटी म्हटल्याप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीवर ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्यामुळे त्यांची पाळेमुळे याच पायावर आधारलेली दिसून येतात. तत्कालीन ग्रीक संस्कृतीमध्ये होऊन गेलेल्या लेखक/तत्वज्ञांचा प्रभाव पुढच्या सर्व पिढ्यांवर पडला. (त्याचप्रमाणे साहित्य, मानसशास्त्र यांच्यावर ग्रीक मायथॉलॉजीचा प्रभाव पडला.)
यावर अजून वाचायला आवडेल (विशेषतः प्लेटोचे virtue बाबत विचार.)
राजेंद्र
आभार
तात्या, शशांक, प्रियाली, तो, आवडाबाई, राजेन्द्र सर्वांचे प्रोत्साहनाबद्दल आभार. प्लेटोबद्दल अजून लिहायचे आहे. ते लिहीनच. राजेन्द्र म्हणतात तसे virtue बद्दलही लिहीन.
तात्या:
"लेख बाकी छान आहे, बोले तो.. माहितीपूर्ण आहे! " :०)
आपले - परंतु भारतातही आज अनेक शाळांतून गायन हा विषय असतो. परंतु हा विषय अधिकारी व्यक्तिकडूनच शिकवला गेला पाहिजे असा आमचा आग्रह आहे - हे म्हणणे पटले. गायन हा एक मोठा संस्कार आहे. तो असा वेडावाकड्या पद्धतीने होऊ नये.
प्रियाली:
सॉक्रेटिसचा खटला आणि पुढे वध या सर्व गोष्टींमुळे आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून प्लेटो बरेचदा आपले स्वतःचे विचार सॉक्रेटिसच्या तोंडी घालत असे, असे म्हटले जाते. - ही माहिती नवीन मिळाली. हे शक्य असेल कारण त्याच्या मनावर सॉक्रेटिसला मारण्याचा खोल परिणाम झाला होता असे म्हणतात.
पुन्हा एकदा, सर्वांची प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
चित्रा
छान
लेख छान आहे. मुद्देसूद आणि प्लेटोच्या मतांचा चांगला परिचय करुन देणारा आहे.
तो याने दिलेला दुवा पाहून वाचन करावे म्हणतो.
असे लेख अजून यावेत अशी विनंती.
--लिखाळ.
दासबोध
विनोद आवडणार्या टवाळांची आठवण झाली.
लेख आवडला. संगीत हा सर्व मानवांमधला दुवा आहे. संगीताच्या परिणामाने भावनिक (की भावनाशील?) होणे ही माणसाची सहजप्रेरणा आहे. (तसेच आणखी काही प्राण्यांची, जीवांचीही!)
सहमत!
संगीत हा सर्व मानवांमधला दुवा आहे. संगीताच्या परिणामाने भावनिक (की भावनाशील?) होणे ही माणसाची सहजप्रेरणा आहे. (तसेच आणखी काही प्राण्यांची, जीवांचीही!)
उत्तर देण्याचा प्रयत्न
शिक्षण पारंपरिक पद्धतीने व्हावे असे सांगण्यात पारंपरिक पद्धती टिकवून ठेवणे हे मूळ कारण आहे का?
समाजपद्धतीत सातत्य रहावे, हा प्लेटोचा छुपा उद्देश दिसतो.
मूळ कारण फक्त पारंपरिक पद्धती टिकवून ठेवणे आहे असे वाटत नाही. शिवाय हे तो फक्त गायन कलेच्या शिक्षणाबद्दल बोलतो आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्लेटोच्या एकंदरीतच विचारात एखाद्या व्यक्तीपेक्षा समाजाला जास्त महत्व आहे. आणि म्हणूनच कदाचित त्याचे विचार आता मागे पडले असतील. परंतु म्हणून त्याचे गायन कलेच्या शिक्षणाचे विचार कुचकामी ठरत नाहीत. किंबहुना आजचे संशोधक गायन हे मुलांच्या उत्तम वाढीसाठी मदत करते असे म्हणतात. यात चांगले गायन / काव्य आपण अध्याहृत धरतो. तशाही काही गोष्टी कालातीत बर्या किंवा वाईट असतात. त्या तशाच राहिल्या म्हणून बिघडत नाही.
समाजपद्धतीत सातत्य रहावे हा त्याचा हेतू छुपा नाही, उघडच आहे. समाजपद्धतीत सातत्य रहावे हा उद्देश आजही सर्वत्र दिसून येतो. विशेषतः जेथे बाहेरून लोक अधिक येतात तेथे - जसे अमेरिकेत- अशा व्यवस्थेला नवीन असलेल्या लोकांना प्रशिक्षण देत सामावून घेण्याचे किंवा त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न होताना दिसतात. ह्या प्रत्येक गोष्टीमागे प्रत्येक वेळी फार निरागस उद्देश असतात असे समजण्याचे कारण नाही - तो आपली व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. असे उद्देश जेथे दिसत नाहीत तेथे एकतर पारंपारिक व्यवस्थाच नाही किंवा असली तर खिळखिळी /दुर्बळ झाली आहे असे म्हणावे लागेल. अगदी घराघरातून आपण व्यवस्थेला चिकटून राहण्याची उदाहरणे बघतो. जर अचानक तुमच्या घरात येऊन दुसरे लोक तुमच्या घराची व्यवस्था कशी असावी याचे नियंत्रण करू लागले तर ते जसे घरच्यांना आवडणार नाही तसे हे आहे.
रक्षकांचे शिक्षण इतरांपेक्षा वेगळे नसावे का ?समाजात सर्वच घटक कुत्रे झालेत, (वरील लेखाप्रमाणेच कुत्र्यांचा अर्थ घ्यावा) तर आपल्याला हवी असलेली आदर्श समाजरचना घडवता येईल का ?
कुत्रे म्हणजे जे ज्ञानाचे भुकेले आहेत असे. तर समाजाचे सर्वच घटक हे ज्ञानाचे भुकेले असावे असे वाटणे साहजिक आहे. त्या अर्थाने सर्वांचे शिक्षण या तत्वाप्रमाणे सारखेच असावे. हाच सामाजिक न्याय पण आहे.
प्रत्येक पिढीचे आदर्श वेगळे असतात. त्यामुळे आदर्श समाजरचना म्हणजे काय हे कोणी सांगावे? पण जर समाजाचा प्रत्येक घटक उत्तम काम करू लागला, आपापल्या क्षेत्रातले ज्ञान मिळवू लागला तर आदर्श नाही पण निदान त्या दिशेने वाटचाल करणारा समाज घडायला कठीण नाही.
सर्वत्रच
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळेस वाचल्याचे आठवते की जी पहीली तुकडी सुवर्ण मंदीराहच्या आवारात गेली त्यांना (राजकीय, सैनीकी नव्हे) सुचना होती की शस्त्रे खाली ठेवून् आत बसलेल्या अतिरेक्यांना शांतपणे बाहेर येण्याबाबत् आवाहन करायचे. त्यांनी तसेच केले आणि त्याचा जो होयला पाहीजे तोच परीणाम झाला - समोरून गोळयांचा वर्षाव झाला आणि पहील्या तुकडीचे (निष्कारण) बलीदान झाले....
असो, हे (वरील) जरा विषयांतर् होते. चित्राने जे म्हणले आहे त्याप्रमाणे मूळ गाभा हा प्लेटोच्या रिपब्लीकचा आहे. न पे़क्षा प्लेटोच काय पण अमेरीकेत खरी लोकशाही तरी आहे का (राष्ट्राध्यक्ष पातळीवर) हा एक् मोठा वेगळ्या चर्चेचा विषय होईल...
मुद्दा चांगला आहे,
पण मी प्राथमिक (शालेय) शिक्षणासंबंधी बोलत आहे. शालेय शिक्षण हे बरेचसे या पायावर उभे आहे तसेच तेच महाविद्यालयांतही चालू राहते असे मी म्हटले आहे ते जर आपल्याला चुकीचे वाटले तर तसे जरूर सांगावे. मला वाटते ते असे की आपण भारतात जेव्हा शास्त्र/ अभियांत्रिकी शाखांमध्ये शिकतो तेव्हा आपला थेट संबंध एकंदरीतच humanities किंवा arts शी संपवला जातो. त्याआधीही शाळा देखील (गायन/ वादन) सहसा जास्त शिकवत नाहीत, बर्याच शाळांत तर हे विषय ऐच्छिक म्हणूनही शिकवले जात नाहीत. कारणे काही असोत. त्याचे परिणाम हे मुलांच्या सर्वांगीण वाढीवर होत असतात असे म्हणायला आपली हरकत नसावी. आपल्याला ह्याउलट माहिती असल्यास जरूर कळवावी.
असो. सर्वांचे प्रतिसादांबद्दल आभार.
चित्रा
सुंदर.
सुंदर लेख. अतिशय आवडला. प्लेटोवर अजूनही वाचायला आवडेल.
-ईश्वरी.
काही वाटलेली साम्ये..
लेख आवडला. असे वाटते की कसे शिकवावे/संस्कार करावेत् या मुलभूत गोष्टी आहेत. पाश्चात्यांवर प्लेटोचा पगडा असेल पण भारतातही असे संघटनांमधे आणि शाळामधे दिसून येते:
इतकेच कशाला निदान मला माझ्या शाळेतील आठवते - आमच्याकडून सुरवातीला याकुंन्दे ... ही सरस्वतीची प्रार्थना, वंदे मातरम (की जन गण मन - एक् सुरू होताना तर् एक् शाळा सुटायच्या वेळी, क्रम आठवत नाही..), मग कधी कधी गीताईचा बारावा अध्याय तर कधी कोलंबसाचे गर्वगीत वगैरे म्हणायला लावायचे - एकूण् पाच-सात मिनिटांमधे बरेच् काही, ज्यात संगीत आणि अर्थपूर्ण गाणि अथवा पाठांतरे असायचे...
असेच माहीतीपुर्ण लेख लिहीत जा!
राष्ट्रगीत व राष्ट्रगान
राष्ट्रगीत (जन गण मन) कार्यक्रमाच्या सुरुवातीला तर राष्ट्रगान (वंदे मातरम) कार्यक्रमाच्या शेवटी म्हणण्याचा प्रघात आहे. आपल्या शाळेतही हे असेच असावे.
गायन-वादन आणि सौंदर्यशास्त्र
चित्रा,
या सुरेख लेखासाठी आपले अभिनंदन!
जे जे उत्तम उदात्त उन्नत याची ओळख होण्यासाठी गायन-वादन हे बालपणापासूनच शिकवावे असे प्लेटोचे विचार सौंदर्यशास्त्रासही लागू होतात. उत्तम आणि भव्य कलाकृती (जसे कोणार्कचे सूर्यमंदिर) यांची ओळख लहानपणीच करून दिल्यास वाढत्या वयाप्रमाणे बाळकांची मनेही परिपक्व होतील असे वाटते. याबाबत अधिक जाणून घ्यायला आवडेल.
शैलेश
अपवाद..
उत्तम आणि भव्य कलाकृती (जसे कोणार्कचे सूर्यमंदिर) यांची ओळख लहानपणीच करून दिल्यास वाढत्या वयाप्रमाणे बाळकांची मनेही परिपक्व होतील असे वाटते.
खजुराहो येथील उत्तम आणि भव्य कलाकृती याला अपवाद ठराव्यात! लहान बाळकांना (?) याची ओळख करून दिल्यास बोले तो...
प्रॉब्लेम होऊ शकेल! ;)
क्या बोलता है शैलेश?
आपला,
(चावट!) तात्या.
अपवाद?
खजुराहो अपवाद ? म्हणजे आपण (व शैलेशरावांनी देखील) कोणार्क ला भेट दिलेली दिसत नाही.
शक्यतो..
म्हणजे आपण (व शैलेशरावांनी देखील) कोणार्क ला भेट दिलेली दिसत नाही.
नाही. आम्ही (म्हणजे निदान मी तरी. शैलेशरावांचे माहीत नाही! ;) शक्यतोवर जिवंत शिल्पांना अधिक भेटी देतो! ;)
असो..
आपला,
(शिल्पा शेट्टी प्रेमी!) तात्या.