ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा

खुलासा: खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही. लेख वाचून त्यावर वाद निर्माण झाल्यास त्यांची साधकबाधक चर्चा इतरत्र करावी. लेख परिपूर्ण आहे असा लेखिकेचा दावा नाही. वाचकांकडे खाली दिलेल्या मुद्द्यांवर भर टाकण्याजोगे अथवा योग्य माहितीच्या आधारे लेखातील मुद्दे खोडून काढण्यासारखे काही असेल तर ते येथे जरूर द्यावे.

“रुक मत जा"  या वाक्यातील विरोधाभास बहुधा सर्वांनाच माहित असावा. "रुक, मत जा" यातील रुक नंतर आलेला स्वल्पविराम थोडेसे थांबणे सुचवतो, पण तोच जर "रुक मत, " नंतर "जा" आला तर वाक्याचा अर्थ बदलून टाकतो. जर या वाक्यात स्वल्पविराम आलाच नाही तर मात्र वाक्य दोहोंपैकी कोणत्या हेतूने लिहिले आहे याचा उलगडा होणे कठिण होऊन बसते. याउलट, बोलणारा ज्या हेतूने हे वाक्य बोलतो/ उच्चारतो तो हेतू सहज स्पष्ट होतो.  विरामचिन्हांचा उपयोग होण्यापूर्वी मराठी, संस्कृतासारख्या भाषा योग्य रितीने कशा काय वाचल्या गेल्या असतील अशी शंका गेले अनेक दिवस डोक्यात घोळत होती.  वाचन करत असताना लेखनकलेबद्दल काही विशेष नजरेस पडले ते येथे संकलित केले आहे.

इतिहासात डोकावून पाहिले आणि पूर्वापार चालत आलेले आणि अद्यापही अस्तित्वात असलेले साहित्य कोणते असा विचार केला असता, ते साहित्य म्हणजे 'लोककथा आणि पौराणिक कथा' असा निष्कर्ष काढला जातो. लोककथा/ पौराणिक कथा या नेमक्या कोणत्या काळात निर्मिल्या गेल्या हे सांगणे कठिण असले तरी त्या आजतागायत ऐकल्या/ ऐकवल्या जातात आणि अद्यापही प्रसिद्ध आहेत. इथे जर प्राचीन लिखित साहित्याचा विचार केला तर बरेचसे प्राचीन साहित्य हे काळाच्या ओघात वाहून गेले आहे किंवा मागे पडले आहे. अनेकदा ते ज्या लिपीत लिहिले गेले ती लिपी बदलल्याने किंवा नष्ट झाल्याने अशा लिखाणाचा अचूक अर्थ काढणे हे एक मोठे कठिण काम होऊन बसते, परंतु मौखिक परंपरेतून चालत आलेल्या बर्‍याच प्राचीन कथा आणि गोष्टी फुलवून सांगण्याची कला आजतागायत आहे.

भारतात मौखिक परंपरा म्हणून सर्वप्रथम वेदांकडे पाहिले जाते.  वेद मौखिक का? पूर्वजांनी ते लिहून का ठेवले नाहीत? असा प्रश्न बरेचदा विचारला जातो. याचे अचूक उत्तर अद्याप सापडलेले नाही. अनेक तज्ज्ञांनी याबाबत अनेक मते मांडलेली दिसतात त्याप्रमाणे काही महत्त्वाची खाली दिली आहेत:

१. त्याकाळी लेखनकला अस्तित्वात नसावी किंवा अतिशय प्राथमिक स्वरूपाची असावी.
२. लेखनकला असावी फक्त ती साहित्यासाठी न वापरता, राज्यकारभारातील शिक्के किंवा इतर कामांसाठी वापरली जात असावी.
३. उपलब्ध अक्षरांत अचूक उच्चार लिहिणे अशक्य असल्याने आणि तसे लिहून चुकीचे उच्चार प्रचलित होऊन अयोग्य ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहचू नये म्हणून वेदांना मौखिक ठेवण्यात आले.
४. ज्ञान अनाधिकारी व्यक्तींच्या हाती जाऊ नये म्हणून.

बरेचदा चौथ्या मुद्द्याला अवास्तव महत्त्व दिल्याचे दिसून येते, तरीही बर्‍याच तज्ज्ञांच्या मते यांतील पहिला मुद्दा खरा मानला जातो कारण ऋग्वेदात लेखनाचा उल्लेख नाही असा निर्वाळा तज्ज्ञ देतात. (यावर वाद-प्रतिवाद आहेतच.) परंतु लेखनकला विकसित झाल्यावरही वेदांचे लेखन झालेले आढळत नाही हे येथे महत्त्वाचे वाटते. 

 महाभारताच्या सुरुवातीलाच येणारी व्यास आणि गणेश यांच्यातील कथाही येथे विचारात घेण्याजोगी आहे. व्यासांनी महाभारत लिहून काढण्याची गणेशाला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन गणेशाने सांगितले, “मी हे लेखन करेन परंतु माझी लेखणी एक क्षणही थांबता कामा नये.” यावर आपल्याला रचना करण्यास थोडी उसंत मिळावी या हेतूने व्यासांनी गणेशाला पुन्हा विनंती केली, “जेव्हा एखाद्या रचनेचा योग्य अर्थ लागणार नाही तोपर्यंत ती आपण लिहून काढू नये.” गणेशाला व्यासांच्या रचनेचा अर्थ लावताना वेळ लागलाच. या गोष्टीबाबत काही तज्ज्ञांचे मत असे की येथे केवळ अर्थ लावण्यापुरती ही कथा थांबत नसून, व्यासांच्या रचना इतक्या जटिल होत्या की त्यांचे उच्चार शब्दांत लिहिणे साक्षात गणेशालाही कठिण होते.

यापुढे जाऊन मला बहुतांश तज्ज्ञांत एकवाक्यता दिसली की प्राचीन भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे, पूर्वापार चालत आलेले अनेक विधी, वेद, मंत्र, रीती-रिवाज, सण, समजुती, खेळ, नृत्यप्रकार अशा अनेक प्रकारांतून कायम आहे याचे कारण मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ज्ञान देणे आणि हे पिढ्यान पिढ्या चालत आल्याने प्राचीन भारतीय संस्कृती आजही अस्तित्वात आहे. वेदांच्या उच्चारांबाबत प्रा. ग्रेगरी पोसेल यांची एक प्रतिक्रिया मला वाचायला मिळाली त्यातील काही भाग येथे नमूद करत आहे:

"भारतीय ब्राह्मणांनी वेद मुखोद्गत करण्याचे कार्य अतिशय गांभीर्याने केले आणि त्यात पिढ्यान् पिढ्या सारखीच अचूकता आणि उच्चार राखले. उच्चारातील साधर्म्य हा श्रद्धेचा भाग होता. एक विद्वान संस्कृतज्ज्ञ जे. ए. बी. वॅन ब्युटेनन यांच्या सांगण्याप्रमाणे १८व्या आणि १९व्या शतकात ज्या युरोपीयांनी संस्कृत शिकायला सुरुवात केली त्यांच्या लक्षात असे आले की भारतातील कोणत्याही भागांत गेले असता जे मंत्रोच्चार कानी पडत असे ते सारखेच होते. पॉंडेचरीपासून पेशावरपर्यंत आणि कलकत्त्यापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या ब्राह्मणांचा एकमेकांशी कधीही संपर्क येण्याची शक्यता नाही.

म्हणून मौखिक परंपराही इतरांपेक्षा वेगळी वाटते आणि आज लिखित स्वरूपात अस्तित्वात असलेले हे वेद प्राचीन मौखिक वेदांशी मिळते-जुळतेच असावेत असे वाटते.”

मौखिक ज्ञानसंवर्धनाला भारतीय संस्कृतीत असलेली ही मान्यता इतर संस्कृतीत दिसते का यावर तज्ज्ञ पुढील उदाहरण देतात.

सॉक्रेटिसबद्दल लिहिताना प्लेटो एके ठिकाणी एक सॉक्रेटियन प्रश्न उद्धृत करतो, “कोणते लक्षण लेखनाला योग्य किंवा अयोग्य ठरवते?” यावर सॉक्रेटिस सरळ उत्तर देण्याऐवजी एका इजिप्शियन पौराणिक कथेचे उदाहरण देतो.

थॉथ हा  कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे.

असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला.  आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.”

यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्‍या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ!  एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्‍या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”

पाश्चात्य इतिहासातील दोन महत्त्वाची महाकाव्ये इलियड आणि ओडिसी यांची निर्मिती होमर या आंधळ्या आणि निरक्षर कवीने केल्याचे सांगितले जाते आणि मौखिक ज्ञान प्रसार परंपरेतील तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इतर अनेक संस्कृतीतही जसे नेटिव इंडियन मौखिक ज्ञानाची परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली दिसते.

Comments

माहितीपूर्ण

मौखिक गोष्टी ठेवण्याचे समर्थन काही प्रमाणात पटले.
त्याकाळी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टींचा साठा जास्त करुन काव्ये/गद्य/कथा यापुरता मर्यादीत होता,गणिती मोठीमोठी सूत्रे,भौतिक/रसायन मधील आकड्यांनी बनलेले ज्ञान हे जास्त प्रमाणात नव्हते, म्हणून हा फंडा यशस्वीपणे चालला असावा असे वाटते.

मी शुद्धीचिकित्सा वापरते.

गमभन चा फंडा!

गणिती मोठीमोठी सूत्रे,भौतिक/रसायन मधील आकड्यांनी बनलेले ज्ञान हे जास्त प्रमाणात नव्हते, म्हणून हा फंडा यशस्वीपणे चालला असावा असे वाटते.

सदर लेखाचा विषय हा 'ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा' असा आहे. आपण गणिती मोठीमोठी सूत्रे, भौतिक/रसायन मधील आकड्यांनी बनलेले ज्ञान हे जास्त प्रमाणात नव्हते असे म्हटले आहे. आमच्या मते मौखिक परंपरेच्या फंड्याचे यशापयश ठरवताना गणिती मोठीमोठी सूत्रे, व भौतिक/रसायन मधील आकड्यांनी बनलेले ज्ञान, इतकीच ज्ञानाची व्याप्ती ध्यानात घेणे हे ज्ञान या विषयाबद्दल संकुचित तर ठरेलंच शिवाय अंमळ उथळही वाटेल.

'ज्ञान' या शब्दाची व्याप्ती ही गणिती मोठीमोठी सूत्रे, भौतिक/रसायन मधील आकड्यांनी बनलेल्या ज्ञानाच्या अलिकडे आणि पलिकडेही बरीच पसरलेली असावी असा आमचा अंदाज आहे! ;)

याच चर्चेदरम्यान श्रीमान 'तो' यांना प्रतिसाद देतांना आम्ही आई व मुलाचे उदाहरण दिल्याचे आठवते. (चूभूद्याघ्या!) तेच इथे पुनश्च एकदा उद्घृत करू इच्छितो. आई ही आपल्या मुलाला अनेक गोष्टी शिकवत असते. आई म्हणायला, बाबा म्हणायला, काका म्हणायला इत्यादी. 'आमच्या शोन्याचे डोळे कुठे आहेत?' 'आमच्या शोन्याचे कान कुठे आहेत?'' आणि मामा कुठाय रे मामा?';) असे अनेक प्रश्न आई किंवा घरचे इतर त्या लहानग्याला कौतुकाने विचारत असतात आणि तो शोन्या डोळे, कान त्याचे लहानसे हात लावून बरोब्बर दाखवत असतो! दहा माणसात बरोब्बर मामाकडे बोट दाखवतो आणि सगळं घर त्या निष्पापाच्या कौतुकात बुडून जातं! ;)

कुठून आलं हे ज्ञान त्या शोन्याला? कुठली सूत्र वाचून आलं, की आईने मौखिक परंपरेनुसार दिलेल्या शिकवणीतून? ;) म्हणूनच कुणी कितीही विद्वान असला तरी त्याचा 'प्रथम गुरू' हे त्याचे आईवडिलच होत, असे मानण्याची परंपरा पूर्वी तरी होती. हल्लीचा फंडा काय आहे ते आम्हाला माहीत नाही! ;)

पुढे तो शोन्या मोठा होतो, पोहायला शिकतो, विकिपिडियावगैरे वाचू लागतो, खिचडी बनवू लागतो, गणितातली नी मारे भौतिक रसायनातली सूत्रे लिहू लागतो हा पुढचा भाग! ;)

सांगायचा मुद्दा हा की मौखिक परंपरा हाच मुळात बेसिक फंडा आहे आणि कायम राहील! वाचिक किंवा लेखनिक फंडे हे त्यानंतर येणारे फंडे! जसजशी विज्ञानाची प्रगती होईल, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती होईल तसतसे आणिही नवेनवे फंडे येतील आणि सध्या वापरात असलेले फंडे कदाचित आउटडेटेडही ठरतील. अचल राहील तो मौखिक परंपरेचा बेसिक फंडा! कारण त्याची सुरवातच मुळी आ आईतला आणि ए ऍपलमधला हे शिकवण्यापासून पासून होते. त्याशिवाय कुणीच पुढे जाऊ शकत नाही!

असो! हे सर्व अर्थातच आमचे बेसिक फंडे! पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या! ;)

आपला,
(मौखिक परंपरेला पर्याय नसून ती कालातीत आहे मानणारा एक फंडामेन्टलिस्ट!) तात्या.

ता क - खाली आमची आम्ही 'गमभन वापरतो' अशी सही आहे. आज 'गमभन' खुप प्रगत आहे हे कौतुकास्पदच आहे, पण मुळात गमभनकारही लहानपणी आईवडिलांकडून मौखिक परंपरेनुसार गमभन बोलायला शिकले, गिरवायला शिकले! त्यांना 'ग' गणपतीतला असंच मौखिक परंपरेनुसार प्रथम शिकवलं गेलं असावं हे जाता जाता ध्यानात घ्यायला हरकत नाही! ;) कदाचित त्याच मौखिक परंपरेची जाण ठेवून गमभनकारांनी ह्या तंत्राला 'गमभन' हे कल्पक आणि उचित नांव दिले असावे असे मानून त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करायला हरकत नाही! ;)

आपला,
(आईकडून ग गणपतीतला, म मक्यातला, हे शिकण्यातलं मौखिकपरंपरेतलं अनादीअनंत कालमहत्व आजही जाणणारा!) तात्या.

ता क - मौखिक परंपरेबाबत 'फंडा' असा उल्लेख करून मौखिक परंपरेला उपहासात्मक रितीने दुय्यम स्थान दिल्यासारखे वाटले! (चूभूद्याघा!)

अर्थात, ' आओ सिखाऊ तुम्हे अंडे का फंडा' यासारखी काही गाणी ऐकून हल्लीच्या बोलीभाषेत तो शब्द रुढही झाला असावा हे आम्ही नाकारत नाही! आणि वाचिक(!) किंवा लिखित(!) भाषेपेक्षा बोलिभाषेवर (म्हणजे पुन्हा मौखिकच!) आमचे अधिक प्रेम आहे!

शिवाय ' आओ सिखाऊ तुम्हे अंडे का फंडा ' म्हणजे पुन्हा मौखिक परंपरेतली शिकवणी आलीच की! आता बोला... ;))

आपला,
(कोकणातला!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

विपर्यास

माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. 'मौखिक परंपरेचे' महत्व आम्ही अजिबात नाकारत नाही. पण 'फक्त मौखिक परंपरेवर सर्वकाही व्यक्त' आजच्या सूत्रांच्या जगात होऊ शकणार नाही(अथवा इंटीग्रेशन डिफ्रन्सिएशन लिमीट वेव्ह इक्वेशन चे एक मोठे गणित व्यक्त करायला एक महाकाव्य या दराने बरीच महाकाव्ये म्हणावी(व पाठ करावी) लागतील.)
गरज पडल्यास 'ओन्ली' चा आग्रह टाळून 'ऑल्सो' कडे समंजस वाटचाल हा आमचा मुद्दा आहे.
'फंडा' या शब्दात उपहास आहे हा शोध आम्हाला नवीन. 'फंडामेंटल' चे वेळबचावू लघुरुप असेच आम्ही समजत होतो आणि आहोत. 'फंडामेंटल' हा शब्द उपहासाने वापरला जात नाही, अनेक ठिकाणी तो सन्मानाने वापरला जातो.(असे शास्त्रीय पुस्तकांतून कळते.) आता गोविंदाला 'अंडे का फंडा' गाणे म्हणून या शब्दाचा उपहास कर वा अर्थ बदल असे आम्ही सांगितले नव्हते.


.
शुद्धीचिकित्सा वापरा हो!

ओन्ली ते ऑल्सो..

गरज पडल्यास 'ओन्ली' चा आग्रह टाळून 'ऑल्सो' कडे समंजस वाटचाल हा आमचा मुद्दा आहे.

आपल्या पूर्वीच्या प्रतिसादात हा मुद्दा निदान आम्हाला तरी कुठेच स्पष्ट झाला नव्हता. आता झाला, धन्यवाद!

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

छान/आश्चर्य

विषय आणि लेख दोन्हीही आवडले. अनुताईंनी म्हटल्याप्रमाणे कथा/माहिती/प्रसंग जतन करण्यासाठी मौखिक परंपरा अगदी उपयोगी आहे. पण वेदादी जतन करताना त्यातील शब्दनशब्द तसाच्या तसा ठेवणे आवश्यक होते. पिढ्यानपिढ्या चालत येणार्‍या गोष्टींमध्ये काही माहिती विसरली जाते तर काही माहितीची भर घातली जाते, शब्दांचेही अपभ्रंश होतात. अश्या सर्व प्रसंगांतून जाऊनही वेदांची संहिता जशीच्या तशी टिकून राहिली हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.

इजिप्शियन कथा मस्त आहे. अमुनला त्यावेळी जे दिसले (ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील) ते आपण आता अनुभवत आहोत :)

वेदांची संहिता टिकून राहिली याचे कारण

याबाबत मी श्री. दिगम्भा यांना काही माहिती विचारली होती. त्यांनी निरोपातून मला खालील विचार कळवले. ते निश्चितच वाचण्याजोगे आहेत. ते येथे टाकत आहे. हेच प्रश्न मी यनावाला, वरदा आणि इतर काहींनाही विचारले होते. त्यांनी त्यांच्यापरीने केलेल्या सहकार्याबाबत मी आभारी आहे.

दिगम्भा: वेदकाली लेखनाचे ज्ञान नसावे अशीच माझी समजूत होती/आहे. निदान ते म्हणताना त्यातील उदात्त/अनुदात्त, इ. स्वर लिहिण्याचे सर्वमान्य कन्व्हेन्शन तरी निश्चित झाले नसावे. या परिस्थितीत वेदांमध्ये अक्षराचा/कानामात्रेचा/स्वराचा देखील फरक होऊ नये यासाठी वेगवेगळ्या शाखांच्या ब्राह्मणांना वेद वेगवेगळ्या पद्धतीने म्हणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असावे. काहींना सुलट, काहींना उलट, काहींना पहिले तिसरे पाचवे अक्षर वगैरे पद्धतीने म्हणणे शिकवले गेले त्यात हल्लीच्या माहितीशास्त्रानुसार संदेशात मुद्दाम ठेवलेल्या रिडन्डन्सीप्रमाणे याचे कार्य झाले असावे असे मला वाटते. मी वाचल्याप्रमाणे आता उपलब्ध असलेल्या वेदांत व हजारो वर्षांपूर्वीच्या वेदांत अक्षराचादेखील फरक नाही हे (विविध शाखांतील ब्राह्मणांचे वेदपाठ एकत्र करून) तपासून पाहून निश्चित करता येऊ शकते.

हे जाहिर टाकण्यासाठी दिगम्भांची पूर्वपरवानगी घेतलेली नाही परंतु त्यांची हरकत नसावी असे वाटते.

आणखी कारणे

श्रीमान दिगम्भा यांनी बरीच उत्तम माहिती दिलेली आहे. वेदांचे स्वरूप टिकून राहण्यात पुढील गोष्टींचाही हात आहे असे वाटते.

१. वेदांतील ऋचा विशिष्ट छंदात गुंफलेल्या असल्याने एखादे अक्षर कमीजास्त होणे वगैरे गोष्टी टाळता आल्या. छंदबद्ध रचनेत एखादे अक्षर वगळले किंवा वाढले की कानाला लगेच खटकते.
२. आवाजात चढउतार करून शब्द एका विशिष्ट प्रकारानेच उच्चारण्याची एक पद्धत वापरल्याने सामुहिकपणे मोठ्या आवाजात पठण करणे शक्य झाले. (कोणत्याही गद्य लेखाचे सामुहिक वाचन करण्याचा प्रयत्न करून पाहा. उच्चाराचे, थांबण्याचे नियम नसल्याने आजिबात ताळमेळ लागणार नाही)
३. "काहींना सुलट, काहींना उलट, काहींना पहिले तिसरे पाचवे अक्षर वगैरे पद्धतीने म्हणणे शिकवले गेले त्यात हल्लीच्या माहितीशास्त्रानुसार संदेशात मुद्दाम ठेवलेल्या रिडन्डन्सीप्रमाणे याचे कार्य झाले असावे असे मला वाटते." हे दिगम्भा यांचे म्हणणे अगदी महत्त्वाचे आहे. कारण काही अक्षरे बदलूनही ऋचा छंदबद्ध राहू शकते. (शंकराची आरती कोणत्याही आडगावातल्या देवळात ऐका. "व्याघ्रांबर फणिवरधर" ह्या कडव्यातील शब्द, उच्चार बदलूनही चालीत म्हटली जाते. इथे त्यांच्या भक्तिभावाचा उपहास करण्याचा उद्देश नाही पण फक्त छंदबद्ध आहे म्हणून अचूक आहे असे म्हणता येत नाही हे दाखवायचे आहे.) परंतु या विलक्षण युक्तीमुळे वेदांतील अक्षरेही 'अक्षर' राहिली.

- अमृतांशु

खरंय.

मी स्वतः दीक्षा घेऊन रूद्रपठण शिकलो. सुदैवाने शिक्षिका, परांजपे आई, खूप छान शिकवत असत.
रुद्राचा अर्थ तर मला अजूनही समजला नाहीये, पण ज्या पद्धतीने ते म्हणायचे असते त्याचे नियम फार कडकपणे त्या आमच्याकडून घोटून घेत असत. स्वरोच्चार, कोणत्या शब्दात कोणत्या अक्षरावर जोर द्यायचा यांचे अतिशय कडक नियम आहेत. पुरुषसूक्त म्हणताना देखील असाच प्रत्यय येतो.
उदा: अथर्वशीर्ष म्हणतांना "ॐ गं गणपतये नमः" याचा उच्चार करतांना देखील ओंग् असा करायचा, ओम् असा नाही हे देखील त्याच नियमांना धरून.
मला वाटते असे नियम अतिशय कडकपणे पाळल्यामुळेच ते प्राचीन वाङमय अगदी तसेच टिकुन राहिलेले असावे.
मुमुक्षु

छानच

फारच सुंदर आणि अभ्यासपुर्ण लेख आहे. पुढे लिहीलात तर बरिच माहिती मिळेल आम्हाला...


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

अमुनचे भाकित मार्मिक

लेख आवडला पण फार लहान भासला.
अमुनचे लेखनकलेच्या परिणामांविषयीचे भाकित अत्यंत मर्मभेदी आणि वास्तवदर्शक वाटले. पुढे विचार करता असे वाटून गेले की ही कथा सॉक्रेटिसाच्या मनातूनच निर्माण झालेली असेल काय? कारण तो तर निश्चित कुठल्याही गोष्टीच्या अति खोलात जाणारा इसम होता.
देवांच्या तोंडी इतके बारकाईचे विचार आलेले कधी पाहिले नाहीत (अपवाद फक्त जी. एं. च्या मिथ्यकथांतील देव! आणखी एक म्हणजे गीता सांगणारा कृष्ण - तोही अपवादच म्हणा).

- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

फार छान

प्रियाली,
विषय आणि लेख अतिशय सुंदर.
सर्वांचे प्रतिसाद सुद्धा माहितीपूर्ण.

वेदांचे अक्षर अन् अक्षर आज पर्यंत जसेच्या तसे आले आहे हे ऐकून अतीशय आश्चर्य आणि आनंद झाला. हजारो वर्षांच्या परकीय वरवंट्याखाली राहूनसुद्धा हे सर्व या तर्‍हेने टिकले तर. मी असे ऐकले होते की पहिल्या मुघली स्वारीत तक्षशीला-नालंदा यांसारखी विद्यापीठे जाळून टाकली गेली आणि त्यातील ग्रंथ पाणी तापवणे इत्यादी जीवनावश्यक सोयींसाठी वापरले गेले होते. या सारख्या स्थितीत वेद, पुराणे, गीता आणि बरेच काही या मौखिक परंपरेने जतन केले गेले असेल तर ते एक सुखद आश्चर्यच.

अमुनचे लेखनकलेच्या परिणामांविषयीचे भाकित अत्यंत मर्मभेदी आणि वास्तवदर्शक वाटले. (दिगम्भांशी सहमत)

-- (पाठांतर शून्य) लिखाळ.

संगीत आणि मौखिक परंपरा!

वेदांबदल वगैरे आम्ही काही जाणत नाही, कारण तो आमच्या बुद्धीपलिकडचा भाग आहे. या विषयाच्या अनुषंगाने आम्ही संगीत कलेबद्दल काही भाष्य करणे पसंत करू.

हजारो वर्षे पुरातन असलेली आमची हिंदुस्थानी रागदारी संगीतकला ही केवळ अन् केवळ मौखिक परंपरेमुळेच आजतागायत टिकून आहे. आम्ही याला ' गुरू-शिष्य परंपरा ' असे म्हणतो.

लिखित स्वरुपात संगीतकलेवर अगाध लिखाण उपलब्ध आहे, परंतु मैफलीत गाण्याकरता पूर्वीही त्याचा उपयोग शून्य होता आणि आजही शून्यच आहे. लिखित स्वरुपातील संगीतकला ही फक्त संगीतकलेची फॉर्मल पदवी घेण्यार्‍यांकरता उपयोगी आहे.

एकंदरीतच मौखिक परंपरेला पर्याय नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. नाहीतर केवळ संगीतकलेवरील पुस्तके वाचून कुणीही गवई झाला असता, किंवा वैद्यकशास्त्रावरील पुस्तके वाचून कुणीही डॉक्टर झाला असता!

शेवटी तालीम, किंवा संथा हीच केव्हाही सर्वाधिक महत्वाची! संगीतातील एखादी बंदिश किंवा एखादा राग हा गुरुसमोर बसूनच शिकावा लागतो तरच तो मैफलीत उत्तम तर्‍हेने गाता येतो!

असो, एकंदरीत लेखाचा विषय आगळावेगळा वाटला आणि आवडला. लेखिकेच्या व्यासंगाला आम्ही प्रणाम करतो. फक्त लेखातली भाषा काहीशी बोजड वाटली. ती थोडी सहजसोपी असायला हवी होती असे आमचे प्रांजळ मत आहे.

तात्या.

मौखिक ज्ञानाच्या मर्यादा

या संदर्भात एके ठिकाणी सी. रामचंद्रांनी सांगितलेली गोष्ट आठवते.

संगीतकार सी. रामचंद्र उमेदवारीच्या काळात बुजुर्ग संगीतकार मीरसाहेबांकडे असिस्टंट होते. त्यांची आठवण सांगताना सी. रामचंद्र म्हणाले " मीरसाहेबांना गाण्याचे नोटेशन लिहीता येत नव्हते. त्यामुळे बनवलेली चाल लक्षात रहायची नाही. म्हणून त्यांना नोटेशन लिहीता येणारा असिस्टंट हवा होता. "

केवळ मौखिक ज्ञान हे अपुरे आहे असे या गोष्टीवरून वाटते.

राधिका

खुलासा..

मीरसाहेबांना गाण्याचे नोटेशन लिहीता येत नव्हते. त्यामुळे बनवलेली चाल लक्षात रहायची नाही.

शक्य आहे. बनवलेली चाल लक्षात राहण्याकरता तिचे नोटेशन लिहून ठेवायचा फायदा आम्हीही जाणतो, पण ती एक सोय झाली.

पण मुळात मीरसाहेबांना ती चाल सुचली कशी, थोडक्यात तिची निर्मिती कशी झाली हा प्रश्न आहे. याची दोन कारणे असावीत -

१) मीरसाहेबांची प्रतिभा.
२) मीरसाहेबांची प्रतिभा आणि त्यांच्या कानावर झालेले इतरांच्या संगीताचे संस्कार.

हे संस्कार त्यांच्यावर मैखिक ज्ञानामुळेच झाले असावेत असे वाटते! कारण संगिताचे संस्कार हे संगीत ऐकून होतात, वाचून नव्हे असा आमचा समज आहे! ;)

संगीताच्या श्रवणभक्तिमुळे झालेले संस्कार हे कलाकाराच्या मूळ प्रतिभेला पोषक ठरतात असं आमचे बुजूर्ग सांगतात! 'संगीताची चिक्कार नोटेशन्स वाचत जा, त्यामुळे चांगलं संगीत येईल' असं सांगणारी आणि त्यानुसार शिष्य घडवणारी कुणी बुजूर्ग व्यक्ति निदान आमच्यातरी पाहण्यात नाही! ;)

संगीतक्षेत्रात एखाद्या कलाकाराकडून संगिताचा अविष्कार होण्याकरता श्रवणभक्तिही खूप आवश्यक आहे, असेही आमचे बुजूर्ग सांगतात!

मीरसाहेबांना दुसर्‍या एखाद्या चालीचे लिखित स्वरुपातील नोटेशन वाचून एखादी नवी चाल सुचली असेल असे आम्हाला तरी वाटत नाही! ;)

संगीताचा ज्ञानप्रसार हा मुद्दा जरी इथे ध्यानात घेतला तरीसुद्धा एखाद्याला मीरसहेबांची ती चाल ऐकावीच लागेल, तिचं नोटेशन वाचून चालणार नाही!

केवळ नोटेशन वाचून कुणी खटके, मुरक्या, बेहलावा, स्वरलगाव, इत्यादी सांगितिक गोष्टीं शिकला असेल असं आम्हाला तरी वाटत नाही! ;)

आपण काय बरं चाल केली होती, हे कदाचित संगीतकाराला मागाहून आठवत नाही हे सहज शक्य आहे. त्याकरता त्याच्या व्यक्तिगत(!) सोयीकरता त्या चालीचे नोटेशन लिहून ठेवल्याने नक्कीच फायदा होतो हे आम्हीही नाकारत नाही! केवळ मीरसाहेबच नव्हेत, तर याप्रकारे एखादी अवचित सुचलेली चाल स्वतःच्या सोयीकरता पटकन नोट करून ठेवण्याची पद्धत अनेक संगितकार अवलंबतात. त्यात काहीच विशेष नाही!

प्रश्न आहे तो अविष्काराचा! प्रश्न आहे तो निर्मितीचा! त्याकरता मूळ प्रतिभा आणि श्रवणभक्तिने झालेले संस्कार याच गोष्टी आवश्यक आहेत असे आम्हाला वाटते!

आपला,
(थोडंफार संगीत शिकलेला!) तात्या.

छान

एका वेगळ्या विषयावरचा लेख वाचायला मिळाला. आवडला. फक्त थोडा abrupt वाटला. सुरुवातीला प्रियाली यांनी भरलेला दम आवडला.
सर्व प्रतिसाद देखिल छान.
विशेषतः संगीताबद्दल विसोबा यांनी लिहिलेला प्रतिसाद

सुंदर लेख

अतिशय माहितीपूर्ण आहे.



मराठी टंकलेखनासाठी वापरा.

लेख आवडला

वेगळ्या विषयावरचा लेख आवडला. लेखातील दुव्यांमधून आणि प्रतिसादांमधून बरीच महिती मिळाली. वेद मौखिक का याचे उत्तर क्रमांक एक किंवा चार असावे असे वाटते. लेखनकलेचा भारतात उगम कधी झाला ते बघितल्यास तारखा जुळतात का ते बघता येऊ शकते. अर्थात वेदांबद्दलही निश्चित तारीख मिळणे अवघड आहे. आपल्या समाजरचनेमुळे क्रमांक चारची शक्यता जास्त वाटते. (महाभारतामध्ये कर्णाला शिकवायला कोणी गुरू तयार नव्हता ते आठवले.) याच्याशी निगडीत अजून एक प्रश्न म्हणजे मौखिक परंपरा नष्ट कधी झाली? आणि विरामचिन्हांचा वापर आपण कधीपासून करायला लागलो? दुव्यामध्ये प्रा. पोसेल यांचे हडप्पा संस्कॄतीवरील जाडजूड पुस्तक पाहिले, त्यातून माहिती मिळू शकेल.

इतर संस्कृतींबद्दल विचार करताना एक मनोरंजक उदाहरण आठवले. दक्षिण अमेरिकेतील इंका संस्कृतीमध्ये लेखनाऐवजी दोर्‍यांना गाठी मारून माहिती साठवण्याची 'खिपू' नावाची पद्धत होती. वेगवेगळ्या रंगाचे दोरे आणि त्यांची वेगवेगळी बंधने वापरून बराच विदा साठवता येत असे. अजूनही या गाठी वाचायच्या कशा त्याचा शोध लागलेला नाही.

अवांतर : रे ब्रॅडबरीचे फॅरनहाईट ४५१ नावाचे पुस्तक आहे. (या तपमानाला कागद जळतो.) लोकांवर बंधने आणण्यासाठी आणि त्यांचे विचारस्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी पुस्तकांवर बंदी आणली जाते आणि सर्व पुस्तके जाळून टाकण्यात येतात. याला विरोध करणारी मंडळी (बुक पीपल)जगातील अजरामर साहित्य नष्ट होऊअ नये म्हणून आपापल्या आवडीची पुस्तके पाठ करतात.

असे अजून लेख वाचायला आवडतील.
राजेंद्र

छान.

लेख आवडला.इथे वाद करायचा नसल्यामुळे वादग्रस्त विधाने असूनही लेख उत्तम आहे.असे म्हणून थांबतो.शशांकच्या मताशी सहमत.

आवडला

प्रियाली,

लेख नेहमी सारखाच उत्तम आहे.
चित्रा

क्रियेविण वाचाळता... विषयांतर आहे.

सॉक्रेटिस ची कथा आवडली.

वेदांच्या मैखिक प्रसाराच्या उदाहरणाला 'ज्ञान'प्रसार म्हणता येईल असे वाटत नाही. (वेदांत काय ज्ञान आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे!)
'वेदांचे अस्खलित उच्चारण' हीच या प्रसाराच्या उपयुक्ततेची परीसीमा असेल तर मौखिक प्रसाराचे यश मानता येईल.

जसे वेद 'वाचल्याने' वेद कळतातच असे नाही, तसेच ते मुखोद्गत असल्याने वा शुद्ध उच्चारल्याने त्यातील अर्थ कळेल असे नाही.

त्याच्या लेखी या लेखाचे शीर्षक 'मौखिक संस्कृती संगोपनाचे ज्ञान' आहे.

याला माहितीचा/संस्कृतीचा प्रसार म्हणता येईल. लिखित प्रचार (सध्या) तुलनेने सोपा व अधिक स्पष्ट असल्याने अशा मौखिक प्रचाराचे कौतुक वाटण्यासारखे आहे. याविषयी, हे असे का केले गेले असावे, असे करायचे ठरल्यावर ते जसेच्या तसे व्हावे यासाठी काय उपाय योजना केल्यागेल्या याबद्दलची लेखातील/प्रतिसादातील माहिती रोचक आहे.

तात्या,

त्याला 'खिचडी कशी करायची' हे मुखोद्गत आहे, मौखिक गुरुशिष्यपरंपरेने त्याला ते ऐकवले गेले आहे. यामुळे त्याला 'फक्कड/जन्क्शन' खिचडी बनवता येईल?

'गायकी' ही मौखिक कला असल्याने, मौखिक ज्ञानप्रसाराला पर्याय नाही :) पण पोहोणे वाचून जमणार नसेल तर पोहोण्याची पद्धत मुखोद्गत असल्याने ही जमणार नाही. याउलट शास्त्र/तत्वज्ञाना सारखी क्षेत्रे काही केवळ कागदावर केलेल्या काळ्यापांढर्‍याचा ज्ञानप्रसारासाठी उपयोग करून घेण्यास समर्थ आहेत. ज्ञानप्रसाराचे सर्वोत्तम माध्यम ज्ञानाच्या स्वरूपावर अवलंबून आहे.

(तेवढाच ज्ञानप्रसारात) तो

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

वैदिक

लेख छानच आहे.
आवडला

पण,
वैदिक
असे नाव यांत असल्याने प्रतिसाद द्यावा की नाही या विषयी साशंक होतो नि आहे.
परत सर्किट म्हणणार, पहा वैदिक म्हणाल्यावर कसा गुंडोपंत आला पळत इथे!

आपला
(मौखिक) गुंडोपंत

कारण

प्रियाली यांनी सुरु केलेला समुदायाबद्दल (ज्याच्या अंतर्गत वरील लेख आहे) त्या म्हणतात -
"आपली आणि इतरांचीपाळेमुळे खणून काढण्याची आवड असणार्‍यांचा हा समुदाय"
त्यातही वरील लेख खालील वर्गीकरणात बसतो..
"आपल्या आणि परकीय इतिहास आणि पौराणिक कथांतील साम्यस्थळे "

वेदांच्या मौखिक परंपरेबद्दल समर्थन करण्यासाठी असे लिहीले नसावे असा माझा कयास आहे..

चित्रा

कारणे

वैदिक साहित्याला जपण्यासाठी जी मौखिक परंपरा वापरण्यात आली, त्याच्या समर्थनासाठी, सॉक्रेटिस, प्लेटो, अमुन, थॉथ, अशा परदेशी विद्वानांची/देवांची विधाने लेखिकेला का द्यावीशी वाटलेली असतील बरे?

याची अचूक कारणे चित्रा यांनी दिली आहेतच, त्यांचे धन्यवाद. समुदायाचे सदस्यत्व असते तर समुदायात कशाप्रकारचे लेखन अपेक्षित आहे याची आपल्याला कल्पना आली असती, लेख काळजीपूर्वक वाचला असता तर लेखातील सुरुवातीचे वाक्य 'लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही.' हे ही वाचायला मिळाले असते आणि हे समर्थन इ. नाही हे लक्षात आले असते तसेच लेखनप्रकार 'विरंगुळा' असे ही, पण आपण समुदायसदस्य नसल्याने आणि कदाचित सदर विषयात रुची नसल्याने आणि या पूर्वीच लेख आपल्याला कळला का याबाबत आपण साशंक असल्याचे म्हटल्याने ती कल्पना आपल्याला आली नसावी. जेव्हा एखादा लेख कळला की नाही या बाबत संदिग्धता असेल तेव्हा तेथे वाद उद्भवावा अशी आपली अपेक्षा किंवा हेतू नसावाच, कदाचित. :)

असो, तो तसा असल्यास उपक्रमावरच बाजूलाच चर्चा सुरु करावी. कृपया, येथे नको कारण हा लेख प्रतिसादातून मूळ विषयात भर घालावी अशा हेतूने लिहिला आहे आणि चर्चा सुरु झाली की विषयांतरे होत राहतात.

या समुदायातील पूर्वीचे लेख वाचले असतील, जसे, ग्रामदैवत, अप्सरा किंवा खूब लडी मर्दानी तर परदेशी विद्वान/ देव यांची उदा./विधाने का वापरली असा प्रश्न ही आपल्याला पडला नसता.

असो. हा लेख मौखिक परंपरेचे किंवा सॉक्रेटिसच्या विचारांचे समर्थन करण्यासाठी लिहिलेला नाही. जसे विचार आपल्या पूर्वजांच्या मनात आले तसेच ते इतर संस्कृतीतील लोकांच्या मनात आले असावेत काय हे जाणून त्याची पाळेमुळे हाती लागतील का हे शोधण्यासाठी लिहिला आहे.

' त्या ' ला उत्तर..

तात्या,
त्याला 'खिचडी कशी करायची' हे मुखोद्गत आहे, मौखिक गुरुशिष्यपरंपरेने त्याला ते ऐकवले गेले आहे. यामुळे त्याला 'फक्कड/जन्क्शन' खिचडी बनवता येईल?

नाही येणार! त्याकरता 'त्या' ला खिचडी बनवणार्‍याच्या शेजारी ओट्यापाशी उभं राहून खिचडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच करावे लागेल व ऑनलाईन शिकावे लागेल! अर्थात तेव्हासुद्धा 'त्या'ला शिकवणार्‍याच्या मौखिक सूचनांचाच फायदा होईल!

आणि अमूक अमूक दिसणार्‍या पदार्थाला खिचडी म्हणतात हेदेखील लहानपणीच्या 'त्या'ने आईकडून मौखिक परंपरेनुसारच शिकले असावे! ;)

'गायकी' ही मौखिक कला असल्याने, मौखिक ज्ञानप्रसाराला पर्याय नाही :)

हे तर निर्विवादच आहे असे आम्ही म्हटलेलेच आहे! पुस्तकं वाचून गाणं शिकणार्‍यांचं गाणं किती भयानक असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे! ;)

पण पोहोणे वाचून जमणार नसेल तर पोहोण्याची पद्धत मुखोद्गत असल्याने ही जमणार नाही.

खरंय, नाही जमणार. पण पोहणे शिकवणार्‍याने ऐन वेळेस पाण्यात दिलेल्या मौखिक सूचनांचाच फायदा पोहणे शिकणार्‍याला होईल! पुस्तकं वाचून पोहणं शिकणारा चक्क बुडून मरेल व पढंतमूर्ख ठरेल! ;)

अ)शास्त्र/तत्वज्ञाना सारखी क्षेत्रे काही केवळ कागदावर केलेल्या काळ्यापांढर्‍याचा ज्ञानप्रसारासाठी उपयोग करून घेण्यास समर्थ आहेत.

काहीसा सहमत!

ब) ज्ञानप्रसाराचे सर्वोत्तम माध्यम ज्ञानाच्या स्वरूपावर अवलंबून आहे.

हे बरेचसे पटण्याजोगे.

अ आणि ब या दोन्ही विधानात विसंगती आहे असे वाटते! ;)

मूळात माणूस ' आई ' म्हणायला शिकतो तोच मुळी मौखिक परंपरेमुळे! कारण खुद्द् त्याची आईच त्याला 'म्हण, आ...ई' असं अत्यंत लोभसवाण्या रितीने शिकवते! ;)

कारण शेवटी मौखिक परंपरा म्हणजे एकाने केलेले भाष्य आणि एकाने केलेले श्रवण! भाष्य व श्रवण या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यात प्रथम आल्या आणि मग लिहिणे व वाचन आले. त्यामुळे मौखिक परंपरेला कुठल्याही युगात पर्याय नाही असे आम्हाला वाटते!

आपला,
(मौखिक परंपरेवर ठाम विश्वास असलेला!*) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

अर्थ

शास्त्र/तत्वज्ञाना सारखी क्षेत्रे काही केवळ कागदावर केलेल्या काळ्यापांढर्‍याचा ज्ञानप्रसारासाठी उपयोग करून घेण्यास समर्थ आहेत.

याचा कृपया अर्थ स्पष्ट करून सांगू शकाल का?

-चित्रा

अर्थ

गटेनबर्ग ने १४ व्या शतकात लावलेल्या मुद्रणयंत्राच्या (मुद्रण कला याही आधी वेगवेळ्या स्वरूपात/प्रमाणात अस्तित्वात होती.) शोधाने ज्ञानप्रसारात अमुलाग्र बदल केले. एक व्याख्याता त्याच्या अयुर्मयादेत जितक्या श्रोत्यांना एखादी गोष्ट सांगू शकेल तीच आता तो शेकडे/हजारो/लाखो लोकांपर्यंत (काळ व वेळेच्या मर्यादेच्या बाहेर जात) पोहोचवू शकत होता.

जगातल्या वेगवेगळ्या सहस्त्रकात/शतकात जन्मलेल्या तत्वज्ञांची मते/दर्शने आज आपल्याला केवळ काळ्यावरच्या पांढर्‍यातूनच (छापील शद्बांतून) समजतात. (यातील काहींचा काही शतके प्रवास मौखिक परंपरेनेच झाला.) अशा तत्वज्ञांचे विचार जाणणे/समजणे म्हणजे कालप्रवास करून त्याचे दर्शन/भेट घेतल्यासारखेच नाही का?

याच मुद्रणकलेचा पुढे पुढे शास्त्रांनी आरेखनाच्या/आकृत्यांच्या स्वरूपात, संगितकारांनी नोट्स च्या स्वरूपात, धर्मप्रसारकांनी बायबलच्या प्रतींच्या स्वरूपात (हे आजवर सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक आहे.), विचारवंतांनी पुस्तकांच्या मासिकांच्या, समाजकारणींनी/राजकारणींनी वृत्तपत्रांच्या स्वरूपात वापर आपल्या माहितीच्या/ज्ञानाच्या/दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी केला.

आपल्याला आजवर मिळालेल्या ज्ञानाच्या, आपल्या मतांवर प्रभाव टाकणार्‍या विचारसरणींच्या, आपणास मिळणार्‍या माहितीच्या स्रोतांवर नजर टाकताच यामागचे छापील अक्षरांचे महत्व स्पष्ट होईल.

गेल्या काही दशकातील घडामोडी पाहता, या पुढील ज्ञानप्रसार डिजीटलाईज्ड (चित्रफिती, ध्वनीफिती, ई-पुस्तके) असेल असे मानावयास हरकत नाही.(ज्ञानसंवर्धनातील याचे योगदान उघड आहेच) तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर ही माध्यमेदेखील सर्वसामान्यांना उपलब्ध होताच ज्ञानाचा प्रसार आणखी झपाट्याने होईल अशी आशा वाटते.

तळटीपः वैद्यकशास्त्र घरबसल्या पुस्तक वाचून समजणार नाही पण गणित/तत्वज्ञान/आज्ञावली लेखन या बद्दल हे शक्य असे वाटते. पुन्हा हे ज्ञानाच्या स्वरुपावर व (सध्या) ज्ञानशाखेच्या मुद्रणानुकूलनावर अवलंबून आहे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

हो पण,

पण गणित/तत्वज्ञान/आज्ञावली लेखन या बद्दल हे शक्य असे वाटते.

हो पण त्याकरताही,

"५"- ह्याला 'पाच' असे म्हणतात असे लहनपणी मौखिक परंपरेनुसार शिकलेले असावे लागेल! तेव्हा आपण म्हणता त्याप्रमाणे कदाचित नक्कीच शिकता येईल, पण त्यात मौखिक परंपराही in built असेल! ;)

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

मुकबधीर

मुकबधीरांना गणित समजत नाही असे आपणांस वाटते का?

(मती बधीर झालेला) तो.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

मती भ्रष्ट! ;)

मुकबधीरांना गणित समजत नाही असे आपणांस वाटते का?

मुळीच वाटत नाही. पण इथेही त्यांना त्यांच्या लहानपणी आईवडिलांकडून खाणाखुणांनी किंवा इतर उपायानी ते शिकवले गेले असावे असे वाटते. However, आम्ही या बाबतीत काही अधिक भाष्य करू शकू असे वाटत नाही. कारण ते मूकबधीर असल्यामुळे तिथे मौखिक परंपरा लागू होत नाही. सबब, 'मूकबधीरांचे ज्ञानग्रहण आणि मौखिक परंपरा' यांचा संबंध जोडून भाष्य करण्यास आम्ही असमर्थ आहोत!

So enjoy for the time being, you have been given a break! ;))

(मती बधीर झालेला) तो.

झाली ना मती बधीर! चला, बरं झालं! ;)
आम्हाला आमच्या मिसळपाव डॉट कॉम करता मती बधीर झालेली मंडळीच हवी आहेत! So, करणार ना आम्हाला मिसळपाव हे संकेतस्थळ उभारण्याकरता मदत? ;)

आपला,
(मती भ्रष्ट झालेला!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

वेदांत काय ज्ञान आहे.

वेदांच्या मैखिक प्रसाराच्या उदाहरणाला 'ज्ञान'प्रसार म्हणता येईल असे वाटत नाही. (वेदांत काय ज्ञान आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे!)

ज्ञान या शब्दाचा अर्थ knowledge in general असा असेल तर वेदांतही ज्ञान असू शकेल. तसेही वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो अशी माझी कल्पना आहे. अर्थातच, वेदांवर या पुढे बोलण्यास मी पात्र नाही, तेव्हा काही विचार इतरांच्या मुखातून.

मॅक्स म्युल्लरने एकदा म्हटल्याप्रमाणे ती एक निरर्थक बडबड आहे. लिखाळांनी दिलेल्या माहितीपटाच्या दुव्यातही म्युल्लरची काही वाक्ये दिली आहेत.

या उलट, नासदिय सूक्तात येणारे

न असत् आसीत् नो सत् आसीत् तदानीम्
न् आसीत् रजः नो व्योम परः यत् |

सारखी पदे विश्वोत्पत्तीबद्दल सांगतात असे काही तज्ज्ञांचे मत आहे. वेदांत ज्ञान आहे किंवा नाही हा जगात देव आहे किंवा नाही प्रमाणेच प्रश्न असावा.

चू. भू. द्या. घ्या.

(तेवढाच ज्ञानप्रसारात) तो

(तेवढाच ज्ञानप्रसारात) तो
हा हा..मस्त ! आमची सुद्धा अनेक ठिकाणी म्हणूनच हजेरी असते असे कानात सांगतो :)
-- (मौखिक ज्ञानप्रसारावर विश्वास बसलेला) लिखाळ.

उत्तम

उत्तम लेख. कुराणाच्या प्रसाराबाबतदेखील मौखिक परंपरेचा मोठा हातभार लागला असे वाचल्याचे आठवते.

आभार/ उत्तरे

लेख वाचणार्‍या सर्वांचे आणि आवडला असे लिहिणार्‍या प्रतिसादकर्त्यांचे विशेष आभार. :)

काही प्रश्नांची उत्तरे उपप्रतिसादाच्या रुपांत दिली आहेत बाकीची येथे देते.

अनु,

त्याकाळी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टींचा साठा जास्त करुन काव्ये/गद्य/कथा यापुरता मर्यादीत होता,गणिती मोठीमोठी सूत्रे,भौतिक/रसायन मधील आकड्यांनी बनलेले ज्ञान हे जास्त प्रमाणात नव्हते, म्हणून हा फंडा यशस्वीपणे चालला असावा असे वाटते.

खरे आहे. विचार हे तत्कालिन उपलब्ध साधने, ज्ञान, संशोधन इ. वर आधारित असल्याने जसे लेखनकला विकसीत नसेल वगैरे तेव्हा मौखिक परंपरा जपणे हाच उत्तम उपाय आहे असे वाटले असावे.

शशांक,

पिढ्यानपिढ्या चालत येणार्‍या गोष्टींमध्ये काही माहिती विसरली जाते तर काही माहितीची भर घातली जाते, शब्दांचेही अपभ्रंश होतात. अश्या सर्व प्रसंगांतून जाऊनही वेदांची संहिता जशीच्या तशी टिकून राहिली हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.

हो हे तर होतेच. जसे, वाल्मिकि रामायणात येणार्‍या अनेक गोष्टी पुढे बदलल्या जाऊन त्याला वेगळेच स्वरुप देण्यात आलेले दिसते. उदा. शबरीची उष्टी बोरे रामाने खाल्ली अशी कथा माझ्या मते वाल्मिकि रामायणात नाही. उलट शबरीही तपस्विनी, योगिनी होती आणि रामाच्या दर्शनानंतर आपला देह ठेवण्याची तिची इच्छा होती असे वाचायला मिळते. तिचा आणि रामाचा संवाद वाचता येतो त्यावरून ती केवळ जंगली भिल्लिण नव्हती हे ही लक्षात येते. कदाचित, म्हणूनच वेद काही निवडक व्यक्तींना शिकवले असावेत.

दिगम्भा,

देवांच्या तोंडी इतके बारकाईचे विचार आलेले कधी पाहिले नाहीत

हे विचार सॉक्रेटिसच्या मनातून प्रकट झाले की सॉक्रेटिसबद्दल लिहिणार्‍या प्लेटोच्या हे कळणे कठिण आहे कारण स्वतः प्लेटोचा मौखिक ज्ञानप्रसारावर विश्वास होता.

लिखाळपंत,

मी असे ऐकले होते की पहिल्या मुघली स्वारीत तक्षशीला-नालंदा यांसारखी विद्यापीठे जाळून टाकली गेली आणि त्यातील ग्रंथ पाणी तापवणे इत्यादी जीवनावश्यक सोयींसाठी वापरले गेले होते.

विजयाच्या मदात शत्रूची संपन्नता, कलाकृती या सर्वांना चूड लावणे ही फार जुनी परंपरा झाली. जगात इतरत्रही स्वतःला उच्चभ्रू मानणार्‍या संस्कृतींनी हेच केले आहे.

अवांतरः तक्षशिला-नालंदा म्हणजे कांदिवली-बोरिवली आहेत का? असा टग्यादादांनी मागे विचारलेला प्रश्न येथे आठवला. :))) मला नक्की आठवत नाही (तपासावे लागेल) परंतु भारतात सुमारे ६ प्रसिद्ध विद्यापीठे होती.

तात्या,

तुमच्या सर्व प्रतिसांदांबद्दल अनेक आभार. अनुताईंनी म्हटल्याप्रमाणे तेथे त्यांच्या वाक्याचा थोडा विपर्यास झाला असे मलाही वाटते परंतु तुमचा प्रतिसाद आवडला.

आवडाबाई,

फक्त थोडा abrupt वाटला.

लेख त्रोटक वाटला कारण त्यातील काही मुद्दे लेखनकले विषयी होतात, ते वेगळे लिहिता येतील. तसेही नेटावर लेखांची व्याप्ती थोडी कमी ठेवावी असा अनुभव आला आहे.

सुरुवातीला प्रियाली यांनी भरलेला दम आवडला.

दम भरुनही विपर्यास, पाश्चात्य विद्वानांची समर्थने, मूक-बधिर, मतीभ्रष्ट इ. वाचायला मिळेल, दम भरला नसता तर काय काय वाचायला मिळाले असते याची कल्पना करा. (सर्वांनी ह्. घ्या.)

राजेंद्र,

महाभारतामध्ये कर्णाला शिकवायला कोणी गुरू तयार नव्हता ते आठवले.

रामायणापेक्षा महाभारतात जातीव्यवस्था थोडी अधिक पाळली गेली असावी असे वाटते, तरी कर्णाच्या गोष्टीबद्दल साशंक आहे कारण कर्णाला अर्जुनाच्या वरचढ होण्यासाठी उत्तम गुरुची आवश्यकता होती. परशुराम क्षत्रियांना शिकवणार नाहीत हे माहित असूनही तो गुरुशी खोटे बोलला. परशुराम साक्षात जमदग्नी पुत्र, त्यांचा राग त्याला शापावाटे सहन करणे क्रमप्राप्तच होते.

विरामचिन्हांचा उपयोग अर्थातच ब्रिटिश काळापासून.

अवांतरः सध्या मला हिंदी चित्रपटातील एक संपूर्ण गाणेही पाठ होत नाही. लोक पुस्तकेच्या पुस्तके कशी काय पाठ करतात देव जाणे.

नंदन,

कुराणाच्या प्रसाराबाबतदेखील मौखिक परंपरेचा मोठा हातभार लागला असे वाचल्याचे आठवते.

जगातील सर्वच धर्म मौखिक प्रचाराने प्रसारित झाले असावेत असे वाटते. (तशी मला सर्वच धर्मांची माहिती नाही, उगीच माझा कयास.)

एक शन्का

(आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”)

मौखिक परम्परेमध्येदेखिल नुसते पाठान्तर करणारे असतीलच की, ज्याना सर्व काही मुखोदगद असेल पण विषय कळला नसेल

रास्त शंका/ संदर्भ

मौखिक परम्परेमध्येदेखिल नुसते पाठान्तर करणारे असतीलच की, ज्याना सर्व काही मुखोदगद असेल पण विषय कळला नसेल

ही शंका अद्याप कोणीच कशी काढली नाही असा प्रश्न मला पडला होता. :) वरील लेख जेव्हा मी प्रथमतः वाचले तेव्हा हा विचार माझ्याही मनात आला होता. परंतु ज्या विद्येचा येथे उहापोह आहे तिचा काळ हजारो वर्षांपूर्वीचा आहे. त्याकाळी गुरुगृही जाऊन या विद्येचे वर्षानुवर्षे रीतसर शिक्षण घ्यावे लागत होते आणि त्यात केवळ पाठांतर चालत नव्हते, तर अर्थासह उच्चार, आचार आणि इतर अनेक गोष्टींवर भर दिला जात असे. (हे सर्व आता ज्या प्रकारे सुरु आहे म्हणजे सत्यनारायणाची पूजा सांगायला गुरुजी येतात आणि काय बडबडतात हे त्यांना तरी कळते का हा प्रश्न आपल्याला पडतो याच्याशी लावू नये.)

केवळ पाठांतर करणारे, गुरुने शिकवूनही ढ राहिलेले विद्यार्थी वगैरे जसे आता असतात तसे तेव्हाही असावेतच. :)

अवांतरः

वरील लेखाचा संदर्भ ग्रॅहम हॅनकॉक यांच्या "अंडरवर्ल्डः ...." या पुस्तकातील आहेत. या पुस्तकाचा दुवा उपक्रमावर पूर्वी एकदा दिला होता. लेखाच्या शेवटी संदर्भ लिहिण्याचे राहून गेले. नंतर मीच विसरून गेले, आता आठवले म्हणून येथे देत आहे.

धन्यवाद

प्रियाली यान्स

प्रतीसादाबद्दल धन्यवाद

आजकाल शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासात नेमके हेच चालले आहे. कित्येक मुलाना विषय कळला नसताना सुद्धा परीक्षेत मात्र बरेच मार्क मिळलेले असतात.

नविन युगात विषय कळण्यापेक्षा जास्तीत जास्त मार्क कसे मिळ्वता येतील तेच पाहीले जाते.

कित्येक मुलाना विषय कळला असुन सुद्धा फक्त उत्तरात आपले म्हणणे मान्ड्ण्याची कला अवगत नसल्यामुळे मार्क मिळत नाहीत.

उत्क्रांती

विषादयोग या डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या गीतेवरील पुस्तकामध्ये मौखिक परंपरेबद्दल उल्लेख आढळला. मूळ उतारा ज्युलियन हक्सले यांच्या Initiation of Psychosocial Evolution या पुस्तकामधून घेतला आहे. त्याचा डॉ. नाडकर्णी यांनी केलेला अनुवाद खालिलप्रमाणे :

उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये माणसाच्या जाणिवांची मांडणी अशा टप्प्याला आली, जिथे अनुभव कोठाराचे मनातल्या मनात राहणे अशक्य झाले आणि तो एकत्रित अनुभव पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला जाऊ लागला. हेच मौखिक प्रंपरेचे मूळ होते. लिखित स्वरूपातील ग्रंथ ही त्यात भर होती.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर