व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १

पतंजलींच्या व्याकरण महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. प्रस्तावनेत "शब्द म्हणजे काय?" "त्यांची व्यवस्था का म्हणून लावायची?" "नियम आणि अपवाद हा काय प्रकार आहे?" "नियम बरोबर सांगितलेत की चूक ते कशावरून?" वगैरे प्रश्नोत्तरे आली आहेत. हे प्रश्न उपक्रमावर अन्य ठिकाणी उद्भवले आहेत. हे प्रश्न संस्कृतासाठी विशेष नाहीत. म्हणून त्यांचे "मराठीकरण" मी येथे देत आहे. या लेखाची रचना पुष्कळ प्रमाणात मूळ भाष्यासारखीच आहे. मुळातले वेदांतले दाखले संस्कृतासाठी ठीक आहेत. त्यांच्या ठिकाणी जमेल तर मराठी दाखले दिले आहेत. उदाहरणे सगळी मराठीच आहेत. काहीकाही दृष्टांत त्या काळच्या समाजाला लागू आहेत (म्हणजे यज्ञ बिनचूक करण्याचे महत्त्व, वगैरे). साधारण तशाच प्रकारचे मुद्दे, पण आजकालच्या समाजाला लागू पडतील असे मांडले आहेत.

रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी

***************************************************
ओनामा शब्द-अनुशासनाचा हा
ओनामा हा शब्द येथे सुरुवात या अर्थी वापरला गेला आहे. आणि सुरुवातीचा मंगल शब्द म्हणून वापरला गेला आहे. शब्दांच्या अनुशासनाच्या म्हणजे व्यवस्था लावणार्‍या शास्त्राचा प्रस्ताव येथे सुरू करत आहे.

आक्षेप : कोणते हे शब्द?
उत्तर :
बोली आणि लेखी शब्द. (मुळात लोकवापरातले आणि वेदातले शब्द) बोली - बैल, घोडं, मोटार. लेखी - ओम् नमो जी आद्या, हृदयाची स्फूर्ती, आम्ही भारताचे नागरिक, वगैरे.

आक्षेप : "बैल" याच्यात शब्द कुठला?
(आक्षेप चालू) हे जे शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेले, तेच का?
आक्षेप-विरोध : नाही, ती पदार्थ वस्तू आहे.

आक्षेप चालू : मग हे जे हलते, डुलते, फुरफुरते आहे, तो शब्द आहे काय?
आक्षेप-विरोध : नाही, तिला क्रिया म्हणतात.

आक्षेप चालू : मग हे जे पांढरे, काळे, करडे, तांबूस आहे, ते शब्द आहे काय?
आक्षेप-विरोध : नाही, त्याला गुण म्हणतात.

आक्षेप चालू : मग यामध्ये जे तोडून तुटत नाही फोडून फिटत नाही, आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकसारखे दिसते, तो शब्द काय?
आक्षेप-विरोध : नाही, त्याला आकृती म्हणतात.

आक्षेप सारांश : तर मग शब्द म्हणजे आहे तरी काय?
उत्तर : ज्याचा उच्चार केला की शिंग, वशिंड, शेपूट वगैरे असलेल्या जनावाराचा बोध होतो, तो शब्द. किंवा, ज्याने पदार्थाचा बोध होतो त्या ध्वनीला शब्द असे म्हणतात. लोक म्हणतातच ना
- काहीतरी शब्द बोल, त्याला शब्द फुटेना, आमचा बाळ शब्द बोलतो, वगैरे. हे सगळे ध्वनी केल्याबद्दलच. तसला ध्वनी म्हणजे शब्द.

(पुढच्या वेळी येथपासून सुरू करेन :)
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे?