या भागासाठी तीन गोष्टींची खूप गरज होती : (१) मराठीतील संतवाङ्मयापासून ललित वाङ्मयापर्यंत सखोल व्यासंग, (२) मराठीतील ऐतिहासिक आणि कायद्याचे दस्ताऐवज, वृत्तपत्रकारिता यांचे उत्तम ज्ञान, आणि (३) मुद्देसूद विनोदबुद्धी. वाचकाने विनोदबुद्धी स्वत:हून आणली तर यातील एकषष्ठमांश गरजा तरी भागतील.
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
*****************भाग ३**************************
आक्षेप : या शब्दांची व्यवस्था लावण्यासाठी काय प्रयोजन आहे? (पुढे चालू)
उत्तर (पुढे चालू) : आणखी प्रयोजने हवीत काय - वाटेल तेवढी घ्या! ही पुढची एक-एक करून सांगतो -
परप्रांतीयांचे मराठी, दुष्ट शब्द, निर्जीव शब्द, असंबद्ध बोलणे, इश्श, हारी पडलो आता, प्रायश्चित्त, अकार चरण युगुल, आम्हां घरी धन, जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी, चावुण्डराजें, चार स्थळे, कुणी हीस पाहोनि
(मुळात : असुर लोक मंत्र म्हणताना चुका करतात म्हणून त्यांचा यज्ञ फसतो.) परप्रांतीयांचे मराठी - हुबळीहून आलेली सून, विरहात म्हणे "आमचे नवरे गेले", पांचाळी पाचही संपले का? परप्रांतीयांना मराठीत आदरार्थक बोलण्याचे नियम, "गेले" एका विशिष्ट प्रकारे म्हटले की "वारले" असा अर्थ होतो, असे बारकावे कळत नाहीत. मराठी माणसाशी कामापुरते बोलायची मारामार, मनातले बोलून सांगणे कठीण जाते. मराठीभाषकांचे आपापसात असे होऊ नये. म्हणून भाषेतले बारकावे शिकावे.
दुष्ट शब्द - (मुळात : इंद्राला मारायला यज्ञ करून वृत्राला जन्माला घातला, पण यज्ञातला एक शब्द चुकल्यामुळे इंद्राने वृत्राला मारले.) आनंदीबाईने मुद्दामून ध चा मा केला काय, आणि रघुनाथरावाने चुकून केला काय, राजाज्ञेतील दुष्ट शब्दाने खून होणारच. अनवधानानेही महत्त्वाच्या ठिकाणी चुकीचा शब्द बोलला जाऊ नये. म्हणून शब्दांचे ज्ञान शिकावे.
निर्जीव शब्द - लेखी (मुळात वेद) शब्द वाचताना कुठे जोर द्यायचा, कुठे हेल द्यायचा ते माहीत नसले, तर वाचलेले शब्द सरदलेल्या काडीसारखे मुळीच पेट घेत नाहीत. लेखीचा प्रकट बोलीशी संबंध कळावा म्हणून व्याकरण शिकावे.
असंबद्ध बोलणे - सभांमध्ये लोकांना आपल्याबाजूने जिंकायचे असेल, तर चतुर लाघवी शब्दच तो विजय मिळवून देतात. असंबद्ध अपशब्द बोलणे पराजय देते. म्हणून शब्दांवर प्रभुत्व मिळवावे.
इश्श - बायकांच्यात इश्श, गडे, वगैरे म्हणतात. लहान बाळे एकएक अक्षर दोनदा बोलून अर्थ समजतात आणि बोलतात दुदू, शिशी, वगैरे. भाषेच्या या लकबी कुठे कोणाशी ठीक ते जाणले पाहिजे, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे. (मुळात : पुरुषांनी बायकी आणि बालिश लकबी वापरू नयेत असे उदाहरण.)
हारी पडलो आता - नागपुरात एकटी राहाणारी बाई एकटे असल्याची भीती दूर व्हावी म्हणून दुर्गेचे व्रत करते. ती देवीच्या आरतीत म्हणते "हारी पडलो आता संकट निवारी". हे एक तर कोरडे पाठांतर आहे, नाहीतर पुरुष कवीच्या दृष्टीतून विचार. दुसरी बाई म्हणते "हारी पडले आता संकट निवारी". ही बहुधा स्वत:च्या मनातले बोलते आहे. (मुळात एका विशिष्ट मंत्रातल्या बदलाबद्दल सांगितले आहे.)
प्रायश्चित्त : (मुळात चुकीचे शब्द बोलून पाप लागते, त्यासाठी सारस्वती नावाचे प्रायश्चित्त करावे लागते. नको ते, असे.) लिहिलेल्यात चूक झाली तर शुद्धीपत्र करून द्यावे लागते, व्यापाराच्या कागदपत्रात चूक झाली तर नुकसानभरपाई करावी लागते. त्या चुका होऊ नये, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.
अकार चरण युगुल - अकार चरण युगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें । (ज्ञानेश्वरी १.१९)
शब्दांत आणि ध्वनींमध्ये एक प्रकारचे गूढ आध्यात्मिक आकर्षण आपल्याला जाणवते. आपल्याला ध्वनींचे विश्लेषण करावेसे वाटते. म्हणून शब्दाच्या ध्वनींबद्दल शिकावे.
आम्हां घरी धन -
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
म्हणून शब्दांचे ज्ञान मिळवावे.
जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी -
जैसी पुष्पांमाजी पुष्पमोगरी । कीं परिमळामाजी कस्तूरी ॥ तैसी भाषांमाजी साजिरी । मराठी या ॥
म्हणजे बाकी भाषाही त्यांच्यात्यांच्या ठिकाणी सुंदर असोत, त्यांची अस्मिता ती त्यांची, मराठीची अस्मिता आणि खास सौंदर्य मराठीचे. कोणी बाकी भाषांमधील शब्दांचा अभ्यास करत असेल तर करो बाबडा. मराठीचाही अभ्यास झाला पाहिजे खास.
आक्षेप : बरे तर, पण सांगा की हे पद्य कोणी रचले?
उत्तर : फादर स्टीफन्स नावाच्या इंग्रज पाद्रींनी रचले. मूळ भाषा इंग्रजी, पोर्तुगीज, येत असून ते मराठी, कोकणी आणि कन्नड मध्ये प्रवीण झाले. इतक्या भाषांमध्ये त्यांना मराठीचे सौंदर्य जाणवले, हे विशेष.
आक्षेप : वाटेल त्या इंग्रज साहेबाचे स्वीकाराल काय? मग काय - मेकॉले लाटसाहेब म्हणे की हिंददेशातल्या सगळ्या व्हर्न्याक्युलर भाषा दरिद्री आणि ओबडधोबड आहेत - तेही मानून घ्या.
उत्तर : मेकॉले चे मत साम्राज्याच्या प्रौढीतून आलेले आहे. त्यास विचारात घेण्याची काही गरज नाही. पण मराठीचा सखोल व्यासंग असलेल्या परकीयाचे मत ग्राह्य असावे.
चावुण्डराजें - चावुण्डराजें करवियलें
गोम्मटेश्वराच्या पायापाशी हजारावर वर्षांपूर्वीचा हा शिलालेख आहे. आपल्या मराठी पूर्वजांची स्मृतिचिह्ने आपल्याला समजावीत, आणि आपली स्मृतिचिह्ने पुढच्या पिढ्यांना समजावीत, म्हणून शब्दांचे शास्त्र शिकावे.
चार स्थळे -
(चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः ।
गुहा त्रीणि निहिता नेङ्गयति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति ॥ ऋग्वेद १.१६४.४५)
वाणीची असतात चार म्हणुनी ज्ञाते स्थळे जाणती ।
पैकी तीन लपून आत, चवथी सुस्पष्ट जी बोलती ॥
वाणीचे चार टप्पे असतात. फक्त सिद्ध योग्यांना अवगत असते ती "परा", आपल्याला काही बोलायचे आहे त्या अर्थाची जाणीव "पश्यन्ती", तिचे शब्दरूपांशी संबंध साधणारी "मध्यमा". या तीन वाणी आतमध्ये लपलेल्या असतात, त्या दिसत नाहीत. फक्त चवथी "वैखरीच" कंठस्वराने बोलली जाते. हे नीट समजतात ते खरे ज्ञानी. म्हणून शब्द, अर्थ, वगैरे यांचा अभ्यास करावा.
कुणी हीस पाहोनि -
(उत त्वः पश्यन्न ददर्श वाचमुत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम् ।
उत त्वस्मै तन्वं विसस्रे जायेव पत्य उशती सुवासा: ॥ ऋग्वेद १०.७१.४)
कुणी हीस पाहोनि मुळी न पाही ।
दुजा वाणि ऐकोनि ऐकीत नाही ।
स्वामीस प्रकटून गूढार्थ राही ।
वस्त्रांस ढाळून कामातुरा ही ॥
जो तिच्याकडे नीट लक्ष देत नाही त्याला भाषा दिसून दिसत नाही, ऐकून ऐकू येत नाही. तिच्या स्वामीपुढे मात्र ती झाकणारी वस्त्रे सोडून आपले सौंदर्य दाखवण्यास आतुर असते. आपल्यापुढे तिचे सौंदर्य प्रकट व्हावे म्हणून तिच्यावर प्रभुत्व मिळवावे.
आक्षेप : ही सगळी प्रयोजने ज्याला व्याकरण नाहीतरी शिकायचे आहे त्याच्यासाठी ठीक आहेत. पण अक्षराला अक्षर लावून जमेल तितकी पुस्तके वाचणारे असतात (अक्षराला अक्षर जोडून वेद वाचणारे असतात), त्यांच्यासाठी प्रयोजने का नाही सांगत?
उत्तर : खरे आहे तुमचे म्हणणे. पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेची आधी शब्दरूपे शिकत, मग ग्रंथ वाचत. आजकाल मराठीत लोक पुस्तके बेधडक वाचतात. मग म्हणतात "बोली भाषा आम्ही लोकांत बोलून शिकलो, लेखी भाषा पुस्तके वाचून आम्हाला कळते, व्याकरणाचे काय काम? त्यांच्यासाठी व्याकरणाच्या आचार्यांनी केवळ मित्र होऊन म्हटले आहे, या शास्त्राचा अभ्यास करून ते रचण्याची आमची आपली ही प्रयोजने आहेत.
(विषय बदलण्यापूर्वी सारांश)
शब्द सांगितला. त्याचे स्वरूप सांगितले. प्रयोजने सांगितली.
(पुढचा भाग असा सुरू होईल :)
आक्षेप : आता शब्दांचे अनुशासन करायचे ते कसे करायचे?