भूस्थिरवादाचा पुरस्कार (भाग २)
मागच्या भागात एका घटनेची चर्चा केली. त्यासारखीच दुसरी घटना येथे देतो. तिच्यावर विचार करून "भौतिक सत्य काय" याबद्दल चर्चा करावी.
----
पीएमटीचे बसचालक गाडी फार "रफ" हाकतात हे आपण ऐकले असेलच. तरी कधीकधी बसने प्रवास करणे सोयीचे असते. माझा मित्र "बढ्या" (बलदंड "ढ" मुलगा) आणि मी स्वारगेटहून कोंढव्याला जात होतो. (त्याची मोटारसायकल तिथून आणायची होती. पण त्याची कथा पुन्हा कधी.) गर्दी फार नव्हती पण दोघांनाही उभेच राहावे लागले होते.
स्वारगेटहून येणारा बाबूराव सणस रस्ता पूलगेटवरून पुढे सोलापूरच्या दिशेने जातो. बसवाल्याने वेगात उजवीकडे गाडी कोंढव्याच्या रस्त्याकडे घुमवली. क्षणात मी एका पोक्त बाईंच्या मांडीवरून कसाबसा उठायचा प्रयत्न करत होतो. उठलो. थोड्या वेळाने बसमधून आम्ही उतरलो.
बढ्या म्हणाला, "स्कॉलर, माफी मागायला हवी होती..."
मी म्हटले, "अरे, त्या बाई पेंगत होत्या, गडबडीत जागल्या... सुचलं नसेल त्यांना माझी माफी मागायचं."
बढ्याचा चेहरा अवाक! "नाही... मला म्हणायचं होतं... तू माफी मागायचीस... तूच नाही का जाऊन आदळलास त्या बिचार्या बाईंच्या मांडीवर???"
"बढ्या, बढ्या, उलट काय म्हणतोस. त्याच आल्या माझ्या वाटेत..."
बढ्याला सगळे काही हळूहळू समजावून द्यावे लागते.
"पूलगेटला आपली गाडी सोलापूरच्या दिशेने जात होती ना?" -"हो"
"मग त्यानंतर त्याच वेगाने मी सोलापूरच्या दिशेनेच जात राहिलो" -"?"
"अरे बाबा, आपण फिजिक्सच्या वर्गात शिकलेलो ते इतक्यात विसरलास?" -"हं, हं..."
"मग त्या बाई पेंगत-पेंगत जोरात कोंढव्याच्या दिशेला जायला लागल्या आणि काहीही लक्ष न देता माझ्या सरळसोट वाटेत आल्या, नाही का?" - "हं, हं..."
"मग चूक त्यांची, तर माफी त्यांनी नाही का मागायची?" - "पण..."
"असो, रे. त्यांनी माफी मागितली नाही, तरी मी माफ केले त्यांना. आपली मावशी मानली" - "अरे पण..."
"पण एक विचारतो, बढ्या. तूसुद्धा तर सोलापूरच्या वाटेने सरळसोट जात होता. तुझ्या डावीकडे बसलेली ती छोकरी या बाईंसारखीच जोरात तुझ्या वाटेत आली, ते मी बघितले... पण तू बरा नाही पडलास तिच्यावर?"
बढ्याला वाचा फुटली, "थोबाड रंगलं असतं तिच्या अंगावर पडलो असतो तर! माझा झोक जातो आहे असे जाणवलं, आणि मी दांडी घट्ट धरली."
"बढ्या, बढ्या... तुझा झोक कसा जाणार? तू सरळमार्गाने जात होतास. बस, आणि या बायकाच वाकड्यात मुसंडी मारत होत्या..."
बढ्या थोडा विचारमग्न झाला. मग पुन्हा म्हणाला, "तरी त्या बाईंची तू माफी मागायला हवीच होती..."
एकेका मठ्ठ माणसाला अगदी साधे भौतिकशास्त्र कळायला इतके कठिण का जावे, हे मोठेच कोडे आहे.
तर उपक्रमी हो, तुम्ही सांगा. बढ्याची साथ देणार का तुम्ही - म्हणे की मी जाऊन बाईंच्या अंगावर पडलो, आणि मी माफी मागायला पाहिजे? माफी म्हणजे तोंडची स्वस्त वाफ, तरी पण माझे म्हणणे खरे आहे, आणि हा तत्त्वाचा मामला आहे. मी साळसूदपणे एका वेगाने, एका दिशेने चाललो होतो, बाईंनी त्यांच्या गतीची दिशा बदलली आणि त्या माझ्या वाटेत आल्या. माफी त्यांनी मागायची होती.
मामला तुमच्या हातात आहे. द्या निर्णय.
Comments
नायक्याचे बरळणे आणि फिताफ्लोदर्न्लेक्टचे सुप्रसिद्ध वचन
बढ्याची बाईक घेऊन आम्ही कॉलेजला गेलो.
आमची चर्चा कॉलेजपर्यंत चालू राहिली. बढ्याला मी भौतिकशास्त्र समजावून सांगत होतो आणि बढ्या मात्र 'माफी, माफी' असे बरळत होता. काय करणार? जुनी सवय!
तितक्यात आमच्या वर्गातला एक 'मान'वर 'स्-कॉलर' टपकला. नाऐके त्याचे नाव. नावाप्रमाणेच कुणाचेच न ऐकण्याचा दुर्गुण त्याच्यात ठासून भरलेला होता. शिवाय कुठेही आपले बाकदार नाक खुपसायची घाणेरडी सवय त्याला होतीच.
नायक्या आमच्या चर्चेत घुसून म्हणतो कसा,"काय झाले बढ्या?"
बढ्याने मग त्याच्या कंटाळवाण्या आवाजात त्याला इत्थंभूत माहिती दिली.
त्यासरशी तो विजयी स्वरात मला म्हणाला,"बढ्या म्हणतो तेच बरोबर आहे. माफी तूच मागितली पाहिजेस. "
"ते कसे ?", मी त्याला न जुमानता म्हणालो.बढ्या "माफी, माफी", असे पुन्हा बरळला.काय करणार? जुनी सवय!
नायक्या म्हणाला,"ती तरूण मुलगी, ती मावशी, तू, बढ्या, बसमधले सर्व प्रवासी, ड्रायव्हर आणि कंडक्टर सर्वजण बसमध्ये होतात. म्हणजे बसच्या सीटवर, बसच्या उभ्या रहण्याच्या जागेत.बसच्या एकूण वस्तुमानात तुमच्याही वस्तुमानाची भर होती. पर्यायाने तुम्ही सर्वजण बसच होता. बसच्या संदर्भचौकटीत घट्ट रोवले गेलेले होता. त्यामुळे बसवर कार्य करणारी सर्व बले तुम्हा सर्वांवरही कार्य करत होतीच.
ज्यावेळी बस सोलापूरचा रस्ता सोडून वेगाने कोंढव्याकडे वळली त्यावेळी बसवरील प्रत्येक गोष्टीला एकूण बसबाह्य जगाच्या संदर्भचौकटीत सारखेच त्वरण प्राप्त झाले. अर्थात त्यांच्या वेगवेगळ्या वस्तुमानाप्रमाणे त्यांच्यावर वेगवेगळे बल कार्य करत होते हे स्पष्टच आहे. खरेतर तुझ्यापेक्षा या बढ्यावर आणि त्या स्थूल मावशीवर जास्त बल लागले होते. कारण त्यांचे वस्तुमान तुझ्यापेक्षा जास्त आहे. तरीही तू पडलास. बढ्या पडला नाही. कारण त्याने वरची दांडी घट्ट पकडली आणि त्याच्या हातातील विरुद्ध दिशेच्या खेचबलाने त्याच्या शरीरावरील बलाचा यशस्वी सामना केला. मावशी सीटवरून पडली नाही. कारण तिचा पार्श्वभाग आणि सीट यांच्यातील घर्षणबलाने विरुद्ध दिशेने बाह्य बलाला नेस्तनाबूत केले. पण तू मात्र पडलास. कारण नेहमी स्वतःच्या तंद्रीत असतोस तू. बस वळली तेव्हाही कसला तरी विचार करत असशील. अरे, झटकन एक पाय लांबवून पुढच्या पायाच्या दबाव बलाने त्या बाह्य बलाचा सामना केला असतास, तर तूही पडला नसतास. काय, समजले का? उगीच त्या बढ्याला तुझ्या अर्धवट ज्ञानाने पकवू नकोस."
असे म्हणून नाऐके परत आपली मान वर करून कॉलर ताठ करत निघून गेला.
नायक्याचे उद्गार बढ्याला मुळीच समजले नाहीत.तो "माफी, माफी", असे पुन्हा बरळला.काय करणार? जुनी सवय!
मी मात्र नायक्याला काय समर्पक उत्तर द्यावे या विचारात गढून गेलो.
असे काही झाले की मग मी नेहमी तत्वज्ञानी होतो.
'पूर्ण आणि अंतिम सत्य काय?' हे कधी कुणाला कळले आहे काय?
"मुदलात 'सत्य म्हणजे काय?' हेच कुणाला कळलेले नाही " असे थोर मेसापोटेमियन विचारवंत फिताफ्लोदर्न्लेक्ट याने इ.स. पूर्व ७५६४ मध्ये म्हणून ठेवलेले तुमच्यापैकी तत्वज्ञान आणि इतिहास यांच्यात तज्ञ असलेल्या लोकांना आठवत असेलच. (नाही आठवत? लगेच गूगल सर्चकडे धावण्याची गरज नाही. गूगलला हे नाव माहीत नाही. त्याचा संदर्भ मी माझ्या पुढच्या लेखात देईनच. किंवा माझ्या संकेतस्थळाला भेट द्या - लॉगस्पॉट (डॉट) फशीव (डॉट) मॅड.)
हेच फिताफ्लोदर्न्लेक्टचे सुप्रसिद्ध वचन पुढच्यावेळी मी नायक्याच्या तोंडावर फेकणार आहे. पुन्हा सापडू दे तर खरा.
(त्याला भौतिकशास्त्रातले कळत असले तरी इतिहास आणि तत्वज्ञानातले फारसे कळत नाही असे मला वाटते.)
तसा मी त्याला मुळीच सोडणार नाही हे नक्की !!!
(ह.घ्या.हे.सां.न. ल.)
ह ह पु वा.
ह ह पु वा.
प्रकाश घाटपांडे
मस्त
हसून मुरकुंडी.
या नाटकास "नायक्या" पात्र बहाल केले. मी ते पुन्हा वापरणार.
चर्चेत रंगत आणलीत. नायक्या मुद्द्याला हात घालतो, पण थोडासा गडबड करतो.
असे तो जेव्हा म्हणतो, ते तंतोतंत बरोबर नाही. जर बसमधील प्रत्येक वस्तू कोंढव्याच्या दिशेने वळली असती, तर प्रत्येक गोष्टीला एकूण बसबाह्य जगाच्या संदर्भचौकटीत सारखेच त्वरण प्राप्त झाले. पण "मी" कोंढव्याच्या दिशेला वळलो नाही...
"मी"ला कोंढव्याच्या दिशेने त्वरण प्राप्त झाले नाही, न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे "मी" आधीच्याच वेगाने, आधीच्याच दिशेने जात राहिलो = (मावशीला धडकेपर्यंत कुठलेच त्वरण नाही.)
इथपावेतोवर नायक्याने माझीच साथ द्यायला हवी होती. कारण माझे कुठले त्वरणच नव्हते तर माझ्यावर बल कुठले असू शकणार?
नायक्या बाह्यजगाच्या चौकटीतून मग न सांगता एकदम बसच्या चौकटीत येतो, आणि माझ्यावर, बढ्यावर, मावशीवर, छोकरीवर कुठलेतरी बाह्यबल (सेंट्रिफ्यूगल फोर्स?) असल्याबद्दल बोलतो. आणि त्याचा विरोध बढ्याने दांडी धरून, बाईंना बैठकीच्या घर्षणाने प्राप्त होतो. पण पूर्ण विरोध झाला तर त्वरण कसे होऊ शकेल? आणि पहिले तर नायक्या म्हणतो की सर्वांना त्वरण प्राप्त झाले. हा विरोधाभास विचारांत चालणार नाही.
बाह्यजगाच्या चौकटीतच नायक्याने बोलायचे झाले असते तर असे : मावशीला सीटच्या घर्षणाने, बढ्याला दांडीच्या खेचबलाने कोंढव्याच्या दिशेने बल लावले गेले. त्याच्या विरोधी कुठलेच बल नव्हते (बाह्यबल नामक काही नसतेच). म्हणून बढ्याला, मावशीला, कोंढव्याच्या दिशेने त्वरण प्राप्त झाले.
नायक्याचे बोलणे माझ्या बाजूचे होते - त्याने सुरुवातीलाच मान्य केले की ज्या-ज्या वस्तू कोंढव्याच्या दिशेने वळल्या त्यांना-त्यांना त्वरण प्राप्त झाले होते. मग कुठलेसे "बाह्यबल" कल्पून तो बढ्याच्या बाजूला गेला. त्याने असे करणे म्हणजे केवळ पक्षपात.
{नायक्याने बढ्याच्या बाजूने विशद करण्यासाठीचा मुद्दा असा : बसच्या आतमध्ये बसलेल्या लोकांना एकमेकांवर कोसळायचे नसेल तर त्यांना सोलापूरशी काही देणेघेणे नाही. ज्या वस्तू सीटच्या सीटवर राहातात, त्या स्थिर असतात = त्यांचे कुठलेच त्वरण नाही. उदाहरणार्थ - मावशीबाई. ज्या वस्तू मधल्या वाटेतल्या मधल्या वाटेत राहातात, त्याही स्थिर असतात. उदाहरणार्थ - बढ्या. ज्या वस्तू आधी मधल्या वाटेत असतात, मग सीटवर असतात, त्या हलल्या असे आपल्याला दिसते, त्यांच्यावर कुठले त्वरण असल्याचे दिसते. उदाहरणार्थ - "स्कॉलर". बसमधील सर्व वस्तूंवर त्यांच्या वस्तुमानानुसार "बाह्यबल" नावाचे बल असते ("वजन" नामक बलासारखेच). जर स्थिर राहायचे असेल तर दांडी घट्ट धरून उलट्या दिशेला "खेचबल" निर्माण करावे लागते [बढ्या], किंवा उलट्या दिशेने घर्षणबल असावे लागते [मावशीबाई]. सार्वत्रिक असलेल्या "वजन" बलाविरुद्ध काहीतरी तरतूद करावी, असे आपल्याला लहानपणापासून शिक्षण मिळते. कोलमडू नये म्हणून वृद्ध काठी वापरतात. त्याच प्रकारे या बसमध्ये सर्वांवर कार्य करणार्या या "बाह्य"बलाविरुद्ध सभ्य लोक काही तरतूद करतात. बाईंनी "घर्षण पुरेसे आहे" अशी खात्री करून ती तरतूद केली. बढ्याने दांडी घट्ट पकडून तशी तरतूद केली. मी तशी तरतूद न करणे हा असभ्यपणा. म्हणून "बाह्यबला"ने मला त्वरण प्राप्त झाले. असभ्यपणे मी बाईंवर आदळलो. म्हणून मी माफी मागायला हवी होती.}
या विचारवंताच्या बोलण्याचीच आपण येथे चर्चा करत आहोत.
मी+जुना (पण अपक्षपाती) नायक्या एका बाजूला, बढ्या आणि नवा {महिरपी} नायक्या दुसर्या बाजूला. आम्ही तथ्ये वेगवेगळी सांगतो - असे असता "सत्य" काय? फिताफ्लोदर्न्लेक्ट म्हणतो की सत्य काय ते कुणालाच कळलेले नाही. पण "बाईंची माफी मागणे" की "त्यांना माफ करणे" हे तर मला आता व्यवहारात लवकर ठरवायचे आहे. फिताफ्लोदर्न्लेक्ट याच्या प्रश्नाचे ऐतिहासिक उत्तर कोणालातरी देता येईल त्याची वाट बघता येत नाही. ऐतिहासिक उत्तर मिळेपर्यंत कामचलाऊ उत्तर काय द्यावे?
कामचलाऊ उत्तर
ऐतिहासिक उत्तर मिळेपर्यंत कामचलाऊ उत्तर काय द्यावे?
उत्तर - "जे मला पटेल तेच सत्य आणि जे मी करीन तेच योग्य" - प्रत्येक 'मी'चे असेच !
असे हात टेकवू नका...
याबाबत तुम्ही सांगोपांग विचार करत आहात म्हणून मला आनंद होत आहे. इतक्यात कृपया विचार आवरते घेऊ नका.
उत्तर - "जे मला पटेल तेच सत्य आणि जे मी करीन तेच योग्य" - प्रत्येक 'मी'चे असेच !
असे म्हणले तर आयुष्य फार खडतर होईल हो. आपल्या अनुभवातून यावेगळे उत्तर द्या. कथेस ही पुरवणी :
पोक्त बाईंशेजारी समजा तिचा मुलगा बसला होता. तो रास्त प्रकारे मातृभक्त होता. थोड्याच वेळापूर्वी मंडईत त्या रास्त-भक्तीचा प्रत्यय आला होता. मंडईत एका मारकुट्या बैलाने आईला ढुशी मारण्याचा प्रयत्न केला. तर मातृभक्त मुलाने त्या बैलाला हाड करून ढकलून दूर केले. पण मग त्याच बैलाच्या ताज्या शेणात आईचा पाय पडला आणि भरला. मुलाने त्याबद्दल बैलाला मुळीच काही हटकले नाही. म्हणजे कोणी आईवर आले तर पुत्र त्याचे तोंड रंगवायला कमी करणार नाही. पण आईचेच जर त्याच्या मते चुकले असेल तर तोंडबिंड रंगवणार नाही. अशा प्रकारची "रास्त मातृभक्ती".
या मातृभक्त मुलाने "स्कॉलर" पात्र+आई यांची धडक झाल्यानंतर काय विचार करावा - काय रास्त विचार करावा? कारण "जे मला पटेल तेच सत्य आणि जे मी करीन तेच योग्य" हे तत्त्व भविष्यात काय करेल तो पर्याय निवडण्यापूर्वी मुळीच उपयोगी पडत नाही.
(खरे तर ही पुरवणी देण्याची जरूर नव्हती. या दिशेनेही तुम्ही विचार करावा म्हणून छोकरी/तोंड रंगवण्याचा उल्लेख कथेत घातला होता. पण कथा वाढवण्यातही रंगत आहे.)
पळपुटेपणा नाही
हेच माझे स्पष्ट मत आहे.
सत्य म्हणजे काय? हेच जिथे नक्की माहित नही आणि सत्याबद्दल अनेक व्याख्या प्रचलीत आहेत, तिथे सत्य केवळ 'भौतिकशास्त्र' विषयापुरते मर्यादित रहात नाही.
उदा. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातले अंतर क्ष किमी आहे हे विधान निखालस सत्य नाही. (हे सिद्ध करायची गरज नाही.)
वेगाबद्दल तेच. विस्थापनाबद्दल तेच. (अवकाशातील सर्व आकाशगंगा त्वरणाने एकमेकांपासून दूर जात आहेत. पण प्रकाशाच्या वेगापर्यंत त्या पोहोचू शकणार नाहीत. हे एक गृहितक आहे. जोवर तेवढा वेग येत नाही तोवर ते सत्य आहे हे कसे म्हणणार? अभय अष्टेकर म्हणतात की सिंग्युलॅरिटीपलिकडेही विश्व आहे. पण सत्य काय?असो आणि वगैरे... )
तेव्हा मला जे समजेल, उमजेल, पटेल तेच सत्य असे मानण्यात काहीच चूक नाही.
प्रत्येकाचे सत्य हे त्याच्या बौद्धीक वकुबावर अवलंबून असणार!
जरा ताणायचे म्हटले तर जगात ८० ते १२० आय क्यू ची माणसे जास्त आढळतात. या (मिडिऑकर) माणसांना जे सत्य आहे असे भासते ते (मे़जॉरिटीप्रमाणे) सत्य मानले जाणार.
आता तुम्ही म्हणाल हा वेगळा मुद्दा झाला. मी विषय भरकटवतो आहे. पण सत्य या विषयावर जे बोलेल ते खरेच आहे (किंवा खोटेही!).
तेव्हा कीस काढायचा तर काढू शकतो. पण मला जे कळले आणि पटले आहे ते इतकेच की - "जे मला पटेल तेच सत्य आणि जे मी करीन तेच योग्य"
विषय भरकटला नाही - योग्यच वळण
सत्याबद्दल अनेक व्याख्या प्रचलीत आहेत, तिथे सत्य केवळ 'भौतिकशास्त्र' विषयापुरते मर्यादित रहात नाही.
याच वेगवेगळ्या व्याख्यांबद्दल तुम्ही लिहावे. व्याख्या कुठल्याही शास्त्रातल्या द्याव्यात, उदाहरणे भौतिकशास्त्राला (किंवा सामान्य जीवनातील सामान्य क्रियांना) लागू ठेवलीत म्हणजे झाले.
तुम्ही काही महत्त्वाची विधाने केली आहेत - त्यांचा मी काढलेला अर्थ योग्य आहे काय?
(१) उदा. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातले अंतर क्ष किमी आहे हे विधान निखालस सत्य नाही. (हे सिद्ध करायची गरज नाही.)
याचा अर्थ "क्ष" पेक्षा थोडे कमी किंवा थोडे जास्त आहे, असा संदर्भ आहे काय. येथे सत्य म्हणजे नेमका आकडा, "आदमासे" आकडा सत्य नव्हे, असे एक तत्त्व कळते.
(२) जोवर तेवढा (=प्रकाशाएवढा) वेग येत नाही तोवर ते सत्य आहे हे कसे म्हणणार?
यातून बहुधा असे तत्त्व कळते की जी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवली जाते, ती सत्य. (हे तत्त्व वरील तत्त्वापेक्षा वेगळे आहे, तरी महत्त्वाचे आहे.)
(३) प्रत्येकाचे सत्य हे त्याच्या बौद्धीक वकुबावर अवलंबून असणार!
वेगवेगळी व्यक्तिगत सत्ये असतात, असे तत्त्व या वाक्यात अंतर्भूत आहे. हे तत्त्व (१)शी विसंगत आहे, पण (२) शी विसंगत नाही. तरी (२) पेक्षा वेगळे आहे.
(४) ...(मेजॉरिटीप्रमाणे) सत्य मानले जाणार.
लोक सत्य "मानतात" हे तत्त्व या वाक्यातून प्रकाशित होते. म्हणजे सत्य हे असण्या-नसण्याशी संबंधित नसून मानण्या-न मानण्याशी संबंधित आहे. हे तत्त्व वरील तीन्ही तत्त्वांपेक्षा वेगळे आहे, पण महत्त्वाचे आहे.
(५) ... (मे़जॉरिटीप्रमाणे) सत्य मानले जाणार.
येथे अनेक लोक जे मानण्यात एकत्र येतात, त्याबद्दल विचार केला आहे. त्यामुळे एकमेकांचे मत एकमेकांशी पडताळून बघण्याचा सत्याशी संबंध दिसतो. हे एक महत्त्वाचे तत्त्व सांगितले.
तेव्हा कीस काढायचा तर काढू शकतो.
अहो, कीस न काढताच तुम्ही मला उपयोगी अशी पाच तत्त्वे सांगितली आहेत. (अर्थात माझे वाचन तुम्हाला पटले तर.) तीच सुटीसुटी सांगा वाटले तर. तुम्ही माझे वाचन योग्य/अयोग्य असा निर्वाळा दिला तर मग या वेगवेगळ्या तत्त्वांची सांगड कशी घालता येईल हा विचार करता येईल.
प्रश्नच नाही.
परवा प्रवासात 'डू यू नो?' अथवा तत्सम सदरातील माहिती वाचत असता या चर्चेची सातत्याने आठवण येत होती. त्यातली माहिती खरोखर आहे काय? असा मनात विचार येत होता.
व्यक्ती, स्थल आणि काल सापेक्षता हे सत्याचे अंगभूत गुणधर्म आहेत.
तुमचे वाचन योग्यच आहे. माझ्या अघळपघळ लिखाणातून तुम्ही पाच तत्वे शोधलीत.
ती तत्वे दिसताना वेगवेगळी दिसत असली तरी मुळात एकच आहेत. 'एकम् सत...' प्रमाणे :)
पुन्हा एकदा - 'सत्य हे संपूर्णपणे व्यक्तीसापेक्ष आहे.'
पंचज्ञानेंद्रियांनी मेंदूपर्यंत पोचवलेल्या (चूक किंवा बरोबर) माहितीवर त्या व्यक्तीच्या पूर्वानुभवांनी (सत्य म्हणून स्विकारलेल्या ठोकताळ्यात (पॅटर्न रेकग्निशन)) संस्कार करून जे फलित उरते तेच सत्य होय!
(उदा. एखाद्या अर्भकास शिकवताना आईला 'बाबा' असे म्हणतात म्हणून शिकवले तर ते आईला 'बाबा' म्हणूनच हाक मारेल. (कारण कोणताच पूर्वसंस्कार नाही.) पण एखाद्या मोठ्या मुलाला आईला बाबा असे म्हणतात म्हणून सांगितले तर तो ते मानणार नाही.)
काही वेळेला मेंदू स्वतःच चुकीची माहिती निर्माण करतो. (किंचित उदा. स्वप्न.) परंतु वेळ येताच ती माहिती खोटी आहे हे समजून मेंदूकडूनच ती त्यागलीही जाते.
पण ती असत्य नाही असे जेव्हा वाटते (उदा. भास) तेव्हा मेंदू तिला सत्य-असत्य या सीमेवर ठेवतो.
त्यापलिकडे जेंव्हा ती सत्यच आहे असे वाटते (उदा. वेड) तेव्हा मेंदू ज्ञानेंद्रियांच्या संवेदनाही विकृत संस्कार करून स्विकारतो.
समाजाच्या नजरेतून एखादा माणूस वेडा असला तर त्या माणसाच्या नजरेतून सारे जग वेडे असते.
समाजाने स्विकारलेले 'सत्य' आणि व्यक्तीने स्विकारलेले 'सत्य' यात तफावत असू शकते.
पुन्हा एकदा अघळपघळ विचार!
असो.
मी कोणी विचारवंत नाही. ही चर्चा वाचणार्या अनेकांना हे सारे स्वाभाविक (त्यात काय विशेष?) वाटत असेल.
विसुनाना
विसुनाना,
आपले म्हणणे आवडले.
तसेच त्याचे धनंजयाने वेगवेगळ्या तत्वात केलेले रुपांतरही वाचायला रोचक वाटले.
सत्य म्हणजे काय? हेच जिथे नक्की माहित नही आणि सत्याबद्दल अनेक व्याख्या प्रचलीत आहेत, तिथे सत्य केवळ 'भौतिकशास्त्र' विषयापुरते मर्यादित रहात नाही.
हे अगदी पटले. हे सत्याचे प्रमाणीकरण शक्यच नाही.
तेव्हा मला जे समजेल, उमजेल, पटेल तेच सत्य असे मानण्यात काहीच चूक नाही.
प्रत्येकाचे सत्य हे त्याच्या बौद्धीक वकुबावर अवलंबून असणार!
क्या बात है विसुनाना. सही बोललात. पण हा बुद्धीचा वकुब ओळखण्याच्या पद्धतीमध्येही खुप भेदाभेद आहेत असे ऐकून आहोत. म्हणजे ज्याला आपण आय क्यु म्हणता तोच मुळात सत्य आहे की नाही हा पण एक प्रश्नच आहे.
पण तो जर सत्य आहे असे मानले तर आम्ही मे़जॉरिटी मध्ये नाही!
आता विचारा, कसे काय बॉ?
सोपंय! कारण आम्ही नेहेमीच ८०च्यापण खाली
हा हा हा!!!! ;)))
आपला
गुंडोपंत
'खरे' सत्य काय?
>> मी साळसूदपणे एका वेगाने, एका दिशेने चाललो होतो, बाईंनी त्यांच्या गतीची दिशा बदलली आणि त्या माझ्या वाटेत आल्या. माफी त्यांनी मागायची होती.
माफी ड्रायव्हरने मागावी. बाईंना हे वळण 'अँटिसिपेट' करणे शक्य नव्हते कारण त्या पेंगत होत्या :)
'खरे' सत्य काय हे कळत नाही हेच खरे! हे असे 'नेति नेति' मार्गाने शिकणे इंटरेष्टिंग आहे पण या मूलभूत कल्पना समजावून सांगणारा एखादा लेख लिहिल्यास पुढच्या चर्चांमध्ये रंग, रस भरू शकेल असे वाटते. बाकी तुम्ही दिलेला प्रसंग आणि त्यावर नाऐक्याचे उत्तर भारी आहे! :)
मूलभूत कल्पना
याबाबतच्या मूलभूत कल्पना तत्त्वज्ञानातल्या आहेत, आणि खरेच त्यांच्याबद्दल कोणाचे मतैक्य नाही.
याबाबत माझी भूमिका "विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका" या लेखात विशद केलेली आहे.
माझ्या मते एक मूलभूत तत्त्व असे :
अस्तित्व हे विनासायास असते - (याचे स्पष्टीकरण समजण्यास वरील दुव्यावरचा लेख वाचावा.)
त्या लेखाच्या प्रसंगात मोठी रोचक चर्चा झाली, पण ती "ईश्वर म्हणजे सत्य म्हणजे काय?" या महत्त्वाच्या विचारांवर केंद्रित झाली. शिवाय माझ्या/दुसर्यांच्या वैयक्तिक विचारांवर घुटमळली. येथे मला ते टाळायचे आहे. (विषय टाळायचा नाही - तो त्या दुव्यावर वाटल्यास पुढे चालवावा...)
या ठिकाणी ही चर्चा करायची आहे की "तुमच्या-माझ्या अनुभवात आणि वागण्यात सत्य म्हणजे काय?" चर्चा भौतिकशास्त्रातच मर्यादित ठेवायची आहे. शक्यतोवर हा निष्कर्ष काढायचा आहे, की चर्चा करणार्यांच्या वागण्यात आणि माझ्या म्हणण्यात काहीच फरक नाही - मग, भौतिकशास्त्रापुरता तरी, तंटा काय आहे? नाहीतर हा निष्कर्ष काढायचा आहे, की तुमच्या वागण्यात आणि माझ्या वागण्यात मूलभूत फरक आहे, त्यामुळे "भौतिक सत्य" या कल्पनेचा मी पुनर्विचार करणे हेच योग्य आहे.
त्यामुळे येथे उद्दिष्ट आहे की चर्चा करणार्यांनी चर्चेतून मला बुद्धी द्यावी - मूलभूत कल्पना वादग्रस्त असल्याकारणाने त्या समजावणारा लेख तितकाच वादग्रस्त असेल. पण या चर्चेतून मात्र "वादे वादे जायते तत्त्वबोधः" असा मलाही फायदा होऊ शकेल.
माझे खरे वागणे "मी" या पात्राच्या विपरीत, बढ्या जसे वागायला सांगतो तसे आहे. हे वेगळे सांगायची गरज नसावी. "मी" पात्राची फजिती करून लेखक म्हणून तसे सुचवले आहे.
त्रिकालाबाधित सत्य
एखादे सत्य त्रिकालाबाधित असु शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
चालू द्यात चालू द्यात
प्रकाश घाटपांडे
चुकी "मी"चीच आहे!
"मी" पात्र, बढ्या, ती बाई, छोकरी, ड्रायव्हर आणि इतर सर्व जण बस मध्येच बसलेले/उभे होते. याचा अर्थ हे सर्व जण बसचेच (एक) भाग म्हणून तरी बससहच प्रवास करीत होते. [ उदा. पृथ्वी वरील सर्व माणसे जरी त्यांचे स्वत:च (पायी) मार्गक्रमण करत असले तरी ते पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीसहच प्ररिभ्रमण करीत असतात. यामुळे तरी ते पृथ्वीचाच् एक भाग असतात. समजा काही कारणास्तव जर पृथ्वीची परिभ्रमणाची दिशा बदलली, तर त्यामुळे जरी पृथ्वीमध्ये असलेले माणसे त्यांचे स्वत:चे मार्गक्रमण करीत असली तरी ते पृथ्वीच्या परिभ्रमण दिशेत आलेल्या बदलापुढे अतिशय न्युनतम असेल (~असणारच नाही!). त्यामुळे पृथ्वीवरील त्या माण्सांची गती/दिशा आदी भौतिकी गोष्टी या पृथ्वीच्या सापेक्ष असतीलच.. हे तर सर्वांना मान्य असेलच! ] बसमधील सर्व प्रवासी बससह सोलापूरच्या दिशेने प्रवास करीत आहेत. पण ड्रायव्हरच्या डोक्यात काय होते, कोणास ठाऊक, त्याने त्याची मंशा बदलली आणि बस वेगात उजवीकडे गाडी कोंढव्याच्या रस्त्याकडे घुमवली. त्याच्या हातात गाडीचे स्टिअरिंग होते व त्याला नेमके माहित होते की बस उजव्या बाजूला वेगात वळणार आहे म्हणून. त्यामुळे तो ड्रायव्हर आधीच सावध झाला होता.
त्याची (ड्रायव्हरची) कशाशीच कसलीही धडक झाली नाही पण त्याच्या डाव्या हातावर (स्टिअरिंगशी होत चाललेल्या सेन्ट्रिफ्युगल फोर्समुळे) आणि डाव्या पृष्ठभागावर (शीटाशी होणार्या घर्षणामुळे) अनुक्रमे बाह्यगामी आणि उर्ध्वपाती बल लागू झाले होते. त्याचप्रमाणे वळण घेतांना बससोबत आणि बसमध्ये बसलेल्या इतर प्रवाशांसोबतही हेच घडले. (त्यात "मी" सुद्धा आहेच.) त्यामुळे सर्व जण सोलापूरला जात असतांना बस एकदम उजव्या बाजूला वळल्याने, सगळेच बसच्या वळण्याच्या केंद्रबिंदूपासून सेंट्रीफ्युगल फोर्समुळे बाहेर ढकलले गेले. पण ते बसमध्ये बसले/उभे असल्याने बसच्या भिंती(?) आणि काचा तोडून त्यांना बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे बसच्या भिंतींनी त्या बसलेल्या बाईवर आणि त्या छोकरीवर विरूद्ध अंतर्गामी बल अप्लाय केले. त्यामुळे ते टॉर्क म्हणून वापरले गेले असे आपण म्हणू शकतो. ती बाई व छोकरी जरा शारिरीक कष्टाने काही क्षणांत सोलापूरकडे न जाता बससह कोंधव्याला जाऊ लागल्या. "बढ्या"च्या बाबतीतही असेच घडले. तो उभा होता, बस गिरकी घेताच त्याने आपले हात बसच्या छताला असलेल्या दांड्याला पक्के धरून ठेवले, त्यामुळे तो सोलापूर जात असतांनाच बस फिरली तेव्हा त्याच्या हातांवर सेण्ट्रीफ्युगल फोर्समुळे ताण आला. तरीपण जरासे शारिरीक कष्ट घेऊन व थोडीशी सामाजिक बांधिलकी राखत (छोकरीवर जाऊन धडकला असता तर चांगलाच चेपला असता त्याला बसमधील इतर प्रवाशांनी! ह्म्म्, "मी" ने काय केले असते, ते देवच जाणो! ;) ) बढ्याने स्वत:ला सावरले. आता राहिला प्रश्न तो "मी"चा...! आधी सांगितल्याप्रमाणे "मी" हासुद्धा इतर प्रवाशांप्रमाणेच (बसलेल्या/उभ्या) बसचा एक भाग आहे. बस जेव्हा सोलापूरकडे चालली होती, तेव्हा "मीसुद्धा" बसच्याच वेगाने/दिशेने सोलापूरकडे मार्गक्रमण करीत होता. लगेच वेगात बस सोलापूर रस्त्यावरून कोंधव्याच्या दिशेने जाण्यासाठी ड्रायव्हरने उजवीकडे घुमवली. याक्षणी, बसने, ड्रायव्हरने, त्या बाईने, सुंदर छोकरीने आणि बढ्याने काय व कशी प्रतिक्रिया दिली ते आपण आधी बघितलेच! "मी" आणि "बढ्या" हे दोघे उभे असल्या कारणाने दोघांच्या प्रतिक्रियेत काहीतरी साम्य असायलाच हवे. ते आहेही... बढ्या सुद्धा त्या छोकरीला धडकला असता, पण त्याने स्वतःला सावरले. पण "मी" त्याच्या तंद्रीत दिसत आहे. मला तरी वाटते की, बस वळण घेत असतांना "मी" दिवसाढवळ्या स्वप्ने रंगवत होता. त्यामुळेच त्याला स्वत:ला सावरण्याचे भान राहिले नसावे. असो. धडकला ना, हरकत नाही, सर्वांसोबतच असे प्रसंग कधी-ना-कधी घडतच असतात. पण मला येथे एक गोष्ट खटकली. भौतिकीची वरील सर्व माहिती असतांनाही "मी" आपल्या वेडगळ बोलण्याच्या शैलीने आपली चूक नव्हतीच असे प्रतिपादत आहे. तुम्हाला तरी वरील प्रसंगावरून त्याची चूक नव्हतीच असे वाटते का? दिवसाढवळ्या रस्त्याने स्वप्ने पाहणारा जर एखाद्याला धडकला तर चूक कोणाची बरे?.... असो.. चूक मान्य करायची सोडून "मी" स्वत:च्या नजरेच्या संदर्भ-चौकटीचा रेफरन्स देऊन तोच कसा बरोबर आहे, हे अमानुषपणे बढ्यावर लादण्याचा अन्यायकारक व भौतिकीशी विसंगत असा निरर्थक असा प्रयत्न करीत आहे, असे मला वाटते.
येथे तरी "मी" च्या नजरेच्या संदर्भ चौकटीमधून पाहता, विसूनानांच्या "जे मला पटेल तेच सत्य आणि जे मी करीन तेच योग्य" या गोष्टीच्या, "मी" नांदी गेलेला दिसतो...
चूक "मी"चीच आहे... त्याने गुण्या-गोविंदाने ती मान्य करावी, अन्यथा पोलिसांचा नंबर तीन अंकीच आहे, दाबायला जास्त वेळ लागणार नाही!!! ;-)
- विशाल तेलंग्रे
मराठी मंड्ळी.कॉम
सुरुवात...
लेखमालेचा तिसरा भाग - "सेंट्रिफ्यूगल फोर्स"
लेखमालेचा तिसरा भाग "सेंट्रिफ्यूगल फोर्स" वाचावा.
वरील प्रतिसादातील तुमचे विचार पुढे चालवता येतील.