विज्ञानाबाबत माझी पूर्वपीठिका
लहानपणी, कॉलेजमध्ये असताना, मला विज्ञानामध्ये गोडी वाटू लागली तेव्हा तत्त्वज्ञानाचे काही ग्रंथ वाचनात आले. पैकी पाश्चिमात्त्यांपैकी बर्ट्रंड रसेल असावा, आणि संस्कृतातील काही ऊहापोहात्मक पुस्तके असावीत. त्या लहान वयात उमेद फार असते आणि अवाजवी आत्मविश्वास असतो तर मी विज्ञानविषयक माझी पूर्वपीठिका एका "श्लोकरूपात" मांडायचे ठरवले.
वर्णनं नियमात् पूर्वम्
अनायासा हि भावना ।
स विचारी च तुल्यश्च
पूर्वग्रहा मम स्मृता: ॥
काव्य रचना जरा बालीश खचितच आहे. पण यातला बराचसा विचार अनेक वर्षे संशोधक म्हणून वावरल्यानंतर थोड्याच बदलाने टिकून आहे, म्हणून मला ती रचना अजून आठवते.
१. नियम सांगण्यापूर्वी वर्णन सांगणे आवश्यक अहे
२. ('अस्तित्व' साठी 'भावना' शब्दाचा जुनाट अर्थ मी वापरला हे हास्यास्पद आहे), अस्तित्व हे विनासायास असते
३. तो (अन्य कोणीतरी व्यक्ती) विचार करण्यास समर्थ आहे, आणि समजण्याची त्याची क्षमता (माझ्या) तुल्य आहे
- हे माझे पूर्वग्रह मी स्मरणात ठेवतो - हे मी कुठलेही प्रमाण नसता मानतो.
खरे म्हणजे "कुठलेच प्रमाण नाही" हे पूर्णपणे ठीक नाही. माझे आयुष्य तसे अल्पकालाचे आहे, आणि त्या थोडक्या वेळात काही उपयोगी ज्ञान मला मिळवायचे आहे, त्यामुळे "सोय" काय, हा कामचलाऊ (प्रॅग्मॅटिक) विचार लागू आहे. बघूया तुम्हाला माझे म्हणणे पटते का.
१. वर्णन हे नियमाच्या आधी असते म्हणजे काय? काही गोष्टी मला फार विचार न करता जाणवतात (म्हणजे "जाण" होते = ज्ञान होते). वेदना झाली की मी कळवळतो, शक्य झाल्यास वेदना देणार्या वस्तूपासून दूर जातो, तेही विचार न करता. म्हणजे त्या बाबतीत मला "नियम" करत बसण्यात वेळ खर्ची घालावा लागत नाही. माझ्या थोडक्या आयुष्यात जर "अमुक" करून प्रत्यक्ष वेदना झाली तर ती "अमुक केल्याने वेदना होणे असंभव आहे" या बाबावाक्यापेक्षा जास्त महत्त्वाची. म्हणजे "वेदना होते/होत नाही" हे वर्णन "वेदना होऊच शकत नाही/होऊच शकते" या नियमाच्या आधी यावे लागते. हीच गोष्ट सर्व संवेदनांबाबत. म्हणजे "या क्षणी उजेड पडला आहे/नाही" हे वर्णन आधी यावे, मग "या क्षणी उजेड पडूच शकत नाही/शकतोच" हा नियम नंतर यावा.
हा विचार आधी कधी झाला आहे काय? अर्थातच, खूपच ठिकाणी, आणि याहीपेक्षा चांगल्या रीतीने. पैकी एक सांगतो. गौतमाच्या न्यायसूत्रात पहिले आहे :
प्रत्यक्ष-अनुमान-उपमान-शब्दा: प्रमाणानि । न्या. सू. १.१
ही चार प्रमाणे सर्वात ठोस ते सर्वात कमी ठोस या उतरत्या श्रेणीत लावली आहेत.
(अ) प्रत्यक्ष : म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियाने ज्ञान होणे की स्थिती 'अमुक' आहे (ज्याला मी लहानपणी श्लोकात 'वर्णन' म्हटले) उदाहरणार्थ "मला डोंगरावर आगीच्या ज्वाळा दिसत आहेत."
(आ) अनुमान : "अशा सर्वच परिस्थितींत 'अमुक' असते" या सामान्य नियमावरून "याही विशेष परिस्थितीत 'अमुक' आहे." असा विशेष निष्कर्ष काढणे. उदाहरणार्थ : जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे आग असते. मला डोंगरावर धूर दिसत आहे. म्हणजे डोंगरावर आग आहे. (ज्याला मी लहानपणी श्लोकात 'नियम' म्हटले.)
(इ) उपमान : "वेगळ्या परिस्थितीत 'अमुक' बघितलेले आहे" या नियमावरून "इथे काही साम्य असू शकेल, म्हणून इथेही 'अमुक' स्थिती असू शकेल." उदाहरणार्थ : काल शेजारच्या गावाजवळ वणवा पेटला, परवा पलीकडच्या गावाजवळ वणवा पेटला. पूर्ण जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे हे साम्य आहे, म्हणजे आज जिल्ह्यात कुठेतरी वणवा पेटला आहे. (हाही एका प्रकारचा 'नियम' आहे, याचा मी लहानपणच्या श्लोकात विचारच केला नव्हता.)
(ई) शब्द : विश्वासू व्यक्तीने सांगितलेला शब्द. म्हणजे आपल्या वडलांनी सांगितले की आज डोंगरावर वणवा पेटला आहे, म्हणून मी मानतो की डोंगरावर वणवा पेटलेला आहे. (याचा मी पुढे वेगळ्याच तर्हेने विचार करतो.)
पण संशोधन करायला लागल्यापासून मला "उपमाना"चे महत्त्व कळले आणि मी "वर्णनम् नियमात् पूर्वम्"ला थोडे बदलले आहे. कारण शुद्ध वर्णन करणे शक्य नसते. ज्ञानेंद्रियांना रोज हजारोंनी संवेदना होत असतात. त्यापैकी कुठल्या लक्षात राहाव्यात? शिवाय कोट्यवधी संवेदना शक्य असतात, पण कर्मेंद्रियांच्या मर्यादेमुळे केवळ हजारोंनी संवेदनाच ज्ञानेंद्रियांपर्यंत पोचतात. जर या क्षणी माझी मान उत्तरेकडे वळलेली असेल, तर दक्षिणेकडून येणार्या प्रकाशाची संवेदना माझ्या डोळ्यांकडे कशी पोचेल? म्हणजे कर्मेंद्रियांना काय चालना द्यायची, आणि ज्ञानेंद्रियांना मिळणार्या हजारो संवेदनांपैकी कुठल्या लक्षात ठेवायच्या यासाठी आधी एक ढोबळ नियम लागतो. म्हणजे वर्णन आणि नियमाच्या उत्तरोत्तर पायर्या असतात.
खूप ढोबळ वर्णन -> खूप ढोबळ नियम -> कमी ढोबळ वर्णन -> कमी ढोबळ नियम -> सूक्ष्म वर्णन -> आणखी नीट केलेले नियम ->->->
असे उजवा-डावा पाय एक-एक करून पुढे टाकून जायचे.
२. अस्तित्व हे विनासायास असते, म्हणजे काय?
कधीकधी "अशी एक अमुक वस्तू का आहे?" आणि "तीच अमुक वस्तू का नाही?" यापैकी कुठला प्रश्न सरस (विचारण्यालायक) आहे त्याचा सहज निर्णय होऊ शकतो. उदाहरणार्थ : शाळेतून बाळ येतो, तर "बाळा, आज तुझ्या डोक्यावर टेंगूळ का आहे?" हा प्रश्न "बाळा, आज तुझ्या डोक्यावर टेंगूळ का नाही?" पेक्षा विचारण्यालायक असतो, कारण आपल्या अनुभवात बहुतेक दिवशी बाळाच्या डोक्यावर टेंगूळ नसते. तसेच "बाळा, आज तुझ्या खांद्यावर दफ्तर का नाही?" हा प्रश्न "बाळा, आज तुझ्या खांद्यावर दफ्तर का आहे?" पेक्षा अधिक विचारण्यालायक असतो, कारण बहुतेक दिवशी आपल्या अनुभवात घरी येताना बाळाच्या खांद्यावर दफ्तर असते.
कधीकधी "अमुक का आहे?" आणि "तीच अमुक वस्तू का नाही?" यापैकी कुठला प्रश्न सरस (विचारण्यालायक) आहे त्याचा सहज निर्णय होऊ शकत नाही. म्हणजे "गणपतीपुळ्याच्या पश्चिमेला समुद्र का आहे?" आणि "पुळ्याच्या पश्चिमेला समुद्र का नाही?" यात कुठलाही प्रश्न जास्त सरस नाही. गावाचे नाव कुठलेतरी"पुळे" असले की सामान्यपणे पश्चिमेला समुद्र असतो/नसतो याबाबत आपला काहीच अनुभव नाही. पैकी कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे याच्यात फार वेळ खर्च होईल, आणि सगळ्या प्रश्नांबाबत असेच केले तर माझे आयुष्य काहीच न शिकता संपून जाईल. अशा स्थितीत माझ्या मते कामचलाऊ प्रश्नच बदलावा "पुळ्याच्या पश्चिमेला समुद्र आहे काय?" उत्तर : "होय." जे आहे ते आहे. ते विनासायास आहे. त्याला "का आहे" असा प्रश्न विचारण्यात वेळ खर्ची का घाला? मच्छीमारी करायला आपली होडी सरळ पश्चिमेच्या समुद्राकडे नेऊन कामाला लागावे. "पश्चिमेलाच का?" असा प्रश्न विचारत बसलो तर आज एकही मासा जाळ्यात सापडणार नाही.
माझे हे तत्त्व जरा विचार केले तर नास्तिकवादी वाटण्याची शक्यता आहे. पण आणखी थोडा विचार केला तर तसे वाटू नये. मला माझे काही मित्र विचारतात की "हे चराचर जगत् का अस्तित्वात आहे?" (त्यांचे अपेक्षित उत्तर आहे की चराचर सृष्टीचा निर्माता ईश्वर/प्रभू/ब्रह्म/आदिमाया/आकाशातला बाप आहे.) माझा याबाबतीत विचार हा की कुठला प्रश्न विचारण्याजोगा आहे :
"हे चराचर जगत् का अस्तित्वात आहे?" की
"हे चराचर जगत् का अस्तित्वात नाही?"
जर जग अस्तित्वात नसण्याचा आपला सामान्य अनुभव असेल (बाळूला साधारणपणे टेंगूळ नसते तसे) आणि आता अवचीत ते अस्तित्वात जाणवले, तर पहिला प्रश्न विचारण्यास अधिक चालना मिळते.
जर जग अस्तित्वात असल्याचा आपला सामान्य अनुभव असेल (बाळूकडे साधारणपणे दफ्तर असते तसे), आणि आज जग अस्तित्वात नसल्याचे जाणवले तर दुसरा प्रश्न विचारण्यास अधिक चालना मिळते.
पण कुठलाच प्रश्न अधिक विचारण्याजोगा आहे असे मला दिसत नाही. मग त्यावर माझे अल्प आयुष्य खर्च का करा? मग मी विचारतो - "जग अस्तित्वात आहे काय?" "होय." मग आहे तर विनासायास आहे, आणि जगात जे काय करायचे असते (मच्छीमारी, श्वासोत्छ्वास, परोपकार वगैरे) ते लगेच करायला घेऊ या.
जे लोक जगाच्या अस्तित्वाचे कारण या एकाच युक्तिवादावर देवाचे अस्तित्व मानतात, त्यांना माझा विचार नास्तिकवाद वाटण्याची शक्यता आहे. पण तो तसा नाही. देवाच्या/आदिमायेच्या/आकाशातल्या बापाच्या अस्तित्वा/नास्तित्वाबद्दल येथे माझे कुठलेच मत मी प्रकट केलेले नाही. केवळ म्हणतो आहे, की हा युक्तिवाद माझ्या तोकड्या आयुष्यात मला पटण्यासारखा नाही. "तोकडे आयुष्य" असे का म्हटले? कारण जर माझे आयुष्य अनेक युगांचे असते, आणि अनेक प्रलय मी बघितले असते, तर कदाचीत "सामान्य अनुभवाप्रमाणे जग अस्तित्वात नसते, आणि या क्षणी अवचीत ते अस्तित्वात आहे," असे मला जाणवले असते. मग जसे "बाळाला आज टेंगूळ का?" असे मी विचारतो, तसे "या क्षणी जग अस्तित्वात का?" असे विचारले असते. तुम्ही पहिल्या पायरीवर थांबून मला नास्तिक म्हणा, किंवा दुसर्या पायरीवर जाऊन "हा विशिष्ट युक्तिवाद अल्पायुषाच्या मर्यादेमुळे न पटलेला" असे म्हणा. तुमची मर्जी.
३. तो (अन्य कोणीतरी व्यक्ती) विचार करण्यास समर्थ आहे, आणि समजण्याची त्याची क्षमता (माझ्या) तुल्य आहे
हेदेखील केवळ एक कामचलाऊ तत्त्व आहे. कारण हे शक्य आहे की जगात खरा विचार करू शकणारा केवळ मी आहे, आणि बाकी सर्व लोक एक तर स्वप्नातल्या बाहुल्या आहेत, किंवा हाडामांसाचे यंत्रमानव आहेत (इंग्रजीत या विचाराला सोलिप्सिझम म्हणतात). मग लोकांशी विचारपूर्वक बोलण्यात काय अर्थ? तरी लोकांशी विचारपूर्वक बोलायला मला आवडते - तेही विचारक्षम आहेत असे म्हणणे मला त्यामुळे सोयीचे वाटते. इतकेच नाही, ते सरासरी माझ्याइतपतच विचारक्षम आहेत असे मानून बर्याच कामचलाऊ गोष्टी साध्य होतात. म्हणजे "अशा परिस्थितीत मी रागावलो असतो, म्हणजे त्याच प्रकारे आज साहेब माझ्यावर पेटणार!", "माझ्यासाठी कोणी 'अमुक' केले तर मला खूप आनंद होईल, मग समोरच्या माणसासाठी तसे आपण केले तर ते माणूस खुश होईल..." असे कितीतरी रोजच्या जीवनातले कामचलाऊ निर्णय पटापट घेता येतात. या कामचलाऊ तत्त्वाला मी "विज्ञानाचे गृहीतक" म्हणून का मानतो? कारण विज्ञानात एखादी कल्पना "सत्य" आहे असे मला वाटले, तरी जोपर्यंत आपल्या क्षेत्रातल्या दुसर्या कोणाला ती मी पटवून देऊ शकत नाही, तोपर्यंत ती कल्पना चुकली असल्याची दाट शंका माझ्या मनात असते. दुसर्याला कल्पना पटवता येणे हे माझ्या लेखी कल्पना जाणण्याइतकेच पायाभूत आहे.
आश्चर्य म्हणजे या निव्वळ कामचलाऊ तत्त्वाची माझ्या ईश्वरविषयक विवेचनातही लुडबुड होते. कारण लोक हे जसे माझ्याइतके तसेच एकमेकांइतकेच कल्पना धारण करायला सक्षम असतात, असे मानणे मला अपरिहार्य आहे. मग हे जे हुशार हुशार लोक एकमेकांना आपापल्या धर्माचे तपशील अक्षरशः सत्य आहेत म्हणून समजावून सांगायचा प्रयत्न करतात, आणि ते एकमेकांना पटवून देऊ शकत नाहीत, तर ते तपशील अक्षरशः सत्य नाहीत अशी दाट शंका माझ्या मनात येते. कोणी म्हणेल की बुवा, तुमच्या विज्ञानातल्या क्लिष्ट कल्पना एकमेकांना समजावून सांगायला तुम्हा वैज्ञानिकांना दहा-दहा वर्षे लागतात, तसेच ईश्वरविषयक गहन तपशील एकमेकांना समजावून सांगायला वेगवेगळ्या पंथातल्या लोकांना खूप वेळ लागेल. तर मी म्हणतो की ती दहा-दहा वर्षे गेलीत तरी बेहत्तर, जोपर्यंत वैज्ञानिक एकमेकांना कल्पना पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत मी त्या मानत नाही. तसेच ईश्वरविषयक तपशील लोक एकमेकांना पटवून देऊ शकत नाहीत तोवर शेकडो वर्षे मी त्यांच्यापैकी कुठलेच तपशील "सत्य" म्हणून मानणार नाही. माझे आयुष्य अल्प असल्यामुळे या आयुष्यात कुठलेच ईश्वरविषयक तपशील "सत्य" म्हणून मानून घ्यायचे माझे भाग्य बहुधा नाही. अवांतर : एकमेकांना पटवून द्यायला लोकांना इतका वेळ का लागतो याबद्दल मला आश्चर्य वाटते. झोप/जेवण/व्यवसाय याच्यात दिवसातला जवळजवळ सर्व वेळ खर्च करूनसुद्धा वीस-तीस वर्षांपर्यंत बर्याचशा वैदिक किंवा ख्रिस्ती (किंवा दुसर्या कुठल्या विचारसरणीच्या) माणसाला आपले ईश्वरविषयक तपशील तंतोतंत सत्य म्हणून पटलेले असतात. त्यामुळे या बाबतीत खूप लोकांची ग्रहणशक्ती माझ्यापेक्षा खूपच वेगवान आहे हे सिद्धच आहे. मग आणखी वीस-तीस वर्षांत ते एकमेकांना का बरे पटवून देऊ शकत नाहीत? या बाबतीत गती असलेल्या लोकांनी एकमेकांना पटवून काहीतरी ठरवले की मी माझी अल्प मती त्यांच्यापैकी कोणा शिष्यवत्सल गुरूकडे नेईन आणि दीक्षा घेऊन सत्य ते तपशील शिकून घेईन.
सारांश : वर सांगितलेली गृहीतके म्हणजे सिद्धांत नाहीत. पण त्यांना सिद्ध करायचा मी काहीच प्रयत्न करत नाही, ती जशीच्या तशी वापरतो, म्हणून त्यांना "पूर्वग्रह" म्हटले तर ठीकच आहे. पण ती माझ्या अल्प आयुष्यात कामचलाऊ आहेत. त्यांच्यावेगळे सर्व जे मी "ज्ञान" मानतो त्याच्याविरुद्ध सामान्य प्रमाणे दिलीत तर मी मत बदलायला तयार आहे. पण ही गृहीतके खोडण्यासाठी मात्र मला फारच मोठी ठोस प्रमाणे लागतील.
Comments
विचार करायला लावणारा लेख
धनंजय, लेख विचार करायला लावणारा आहे. दुसऱ्या मुद्द्यासंदर्भात न्यूटन आणि आईनस्टाईनचे उदाहरण द्यावेसे वाटले. (विषयांतर वाटल्यास क्षमस्व.) न्यूटनचे गतिविषयक नियम आईनस्टाईनने अपुरे (किंवा साऱ्याच केसेसमध्ये खरे नसणारे, जसे निरीक्षक स्थिर नसेल तर) जरी सिद्ध केले असले तरी आपले दैनंदिन जग अद्यापही न्यूटनच्या नियमांतच बसते. रोजच्या जीवनात 'अस्तित्व हे विनासायास असते' म्हणूनच पुढे जावे लागते.
महाभारतातील यक्षाने युधिष्ठिराला विचारलेला 'जगातले सर्वात मोठे आश्चर्य कोणते?' हा प्रश्न प्रसिद्ध आहे. 'आपल्या सभोवती रोज अनेक माणसे मरताहेत हे दिसत असूनही माणूस आपण अमर्त्य असल्यासारखा वागतो' हे त्याचे उत्तर खरे असले तरी रोजच्या जगण्यात ते सत्य डोळ्याआड केल्याशिवाय, अस्तित्व विनासायास स्वीकारल्याशिवाय निभाव लागणार नाही. [या परिच्छेदाचा तुमच्या मुद्द्याशी थोडा संबंध आहे, असे वाटते. अगदीच विषयांतर वाटल्यास, कृपया हा भाग सोडून द्यावा.]
एकमेकांना पटवून द्यायला लोकांना इतका वेळ का लागतो, याचं उत्तर काही अंशी डिल्बर्टकार स्कॉट ऍडम्सच्या अनुदिनीवरील या लेखात सापडेल.
दोन्ही मुद्दे संबंधित
तुमचे दोन्ही मुद्दे लेखाच्या संबंधानेच आहेत हे पटते, पण माझ्या दृष्टीने अर्थ मात्र वेगळा!
आइनस्टाइनच्या नियमांमध्ये निसर्गातला एक "जादूचा" प्रयास कमी होतो - तो म्हणजे न्यूटनचे अनाकलनीय गुरुत्वाकर्षण. "ऑल धिस स्पूकी ऍक्शन ऍट् अ डिस्टन्स" - सूर्य पृथ्वीपासून इतका दूर असून तिच्यावर लगेच परिणाम करतो ही भुताटकी! ही भुताटकी म्हणजे एक प्रकारचा प्रयासच असतो. आइन्स्टाइनच्या गणिताप्रमाणे पृथ्वी ही केवळ भूमितीमुळे त्या विशिष्ट आकाराच्या पंथाने जात असते. ही एक 'जिओडेसिक' सरळ रेषा असते. आणि सरळ रेषेत जाण्यासारखा 'विनासायास' प्रकार नाही. भुताटकी काहीच नाही. याला गंमत म्हणून रसेल "लॉ ऑफ कॉस्मिक लेझिनेस्" म्हणतो. (वैश्विक आळसाचा कायदा - माझ्या भाषेत वैश्विक 'विनासायासतेचा' कायदा म्हणू!) त्याच प्रकारे न्यूटनने केप्लरच्या गणितातला एक जादूचा प्रयास काढून टाकला. म्हणजे उत्तरोत्तर गणिते कागदावर सोडवायला कठिण होत गेली तरी आपल्याला समजलेले निसर्गाचे वर्तन/वर्णन अधिकाधिक 'विनासायास' होत गेले. न्यूटनचे नियम हे आइन्स्टाइनच्या गणिताचे विशेष परिस्थितीतील सोपे केलेले नियम (स्पेशल केस सिंप्लिफिकेशन) आहेत. त्यामुळे, जिथे जिथे तसे सुलभीकरण वापरून फार फरक पडत नाही, तिथे "गणित कागदावर सोडवायला सोयीचे जावे" म्हणून वापरायला काहीच हरकत नाही. कारण आपण "न्यूटनचे गणित" म्हणतो ते थोड्या फरकाने "आइन्स्टाइनचेच गणित" असते. (म्हणजे अमेरिकेत कर भरताना मिळकतीचा डॉलर आकडा जुळला तर कायद्याच्या दृष्टीने पुरे असते, कारण सेंट्स चा हिशोब लावला नाही तरी सरकारचा खूप मोठा तोटा होत नाही.) जिथे सुलभीकरणाने खूप मोठी तफावत येईल (म्हणजे लिमलेटच्या गोळ्यांच्या किरकोळ व्यापार्याने चिल्लरचा हिशोब ठेवला नाही तर खूपच मोठी तफावत येऊ शकेल तसे) तिथे गणित क्लिष्ट असले तरी सुलभीकरण न करता आइन्स्टाइन सांगतो तसेच पूर्ण तपशिलांसकट मांडावे लागते.
यक्षप्रश्नाबद्दल माझा विचार वेगळा आहे. जे लोक आपण मर्त्य नाही असे समजून वागतात, ते म्हणू शकतात की आम्ही अनेक मन्वंतरे जगू, आणि "दीर्घकालात नेहमीची परिस्थिती काय" याबद्दल आम्हाला सम्यक् ज्ञान होईल. मग नेहमीपेक्षा वेगळे काय त्याचे निरीक्षण होताच "असे का?" म्हणून प्रश्न विचारू. अमर्त्य लोक अशा प्रकारे प्रत्येक वस्तूबद्दल "असे का" किंवा "असे का नाही" हा प्रश्न विचारू शकतील. ते कशालाच 'विनासायास' मानणार नाही. आपण मर्त्य आहोत, आणि अनेक मन्वंतरे काय, शंभर वर्षे सुद्धा जगणार नाहीत, असे समजल्यावर, ज्या गोष्टींबद्दल अनंतकाळापर्यंत "नेहमीची परिस्थिती काय" ते कळणे आपल्याला अशक्य आहे, त्यांच्या बाबतीत अस्तित्व 'विनासायास' मानून घेऊ. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नेहमी काय/बदललेल्या काय ते चटकन समजते (बाळाला कपाळाला दररोज टेंगूळ नसते, पण आज आहे) तिथे मर्त्य/अमर्त्य समजणारे दोघेही कारणमीमांसा शोधतील.
विनासायास
शास्त्रात लॉ ऑफ इकॉनॉमी असा काहिसा एक मुलभूत नियम आहे. यात कमीत कमी गृहीतकात व सोप्यात सोप्या स्पष्टीकरणात येणार्या प्रत्ययांचे वर्णन करणे अपेक्षित आहे. याच कसोटीवर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम खरा उतरतो. युरेनस (की प्लूटो?) वर जाईपर्यंत त्याचे साधारण सूत्र सार्या क्लिष्ट हालचालींचे स्प्ष्टीकरण देण्यास पुरेसे होते.
ओकॅमचा रेझर
>यात कमीत कमी गृहीतकात व सोप्यात सोप्या स्पष्टीकरणात येणार्या प्रत्ययांचे वर्णन करणे अपेक्षित आहे.
याला ओकॅमचा रेझर असे म्हणतात. कमीत कमी गृहीतकांचा वापर करून कुठल्याही गोष्टीचे स्पष्टीकरण मांडता यायला हवे.
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
आपल्याकडे "लघु-उपाय"
ऑकम्स रेझर तत्त्वाच्या समांतर आपल्याकडे न्यायशास्त्रात "गुरु-उपायापेक्षा लघु-उपाय श्रेयस्कर" असे तत्त्व आहे.
त्यामुळे जुन्या शास्त्रातल्या चर्चांमध्ये अशी वाक्ये येतात - अमुक प्रमेयाच्या सिद्धतेसाठी दोन उपाय आहेत खरे, पण तुमच्या म्हणण्यानुसार सिद्धता केली तर गौरवदोष येतो, आमच्यानुसार सिद्धता केली तर लाघव आहे.
वा. बा. भागवतगुरुजींनी गौरव=बोजडपणा, लाघव=सुटसुटीतपणा अशी मराठी भाषांतरे केली आहेत. तसे भाषांतर मला पटते.
गंडभिरुंडासन
नमस्कार,
अर्धा लेख वाचल्यावरच माझ्या मेंदूने अचानक गंडभिरुंडासन घातले आहे. माझ्या मेंदूने असे का केले हा प्रश्न विचारण्यालायक आहे पण त्याचे उत्तर देण्यालायक नाही. कारण मी मंदबुद्धी आहे असे मला उगीच सर्वांसमक्ष सांगावे लागेल :) हा ! माझ्या मेंदूने आसन सोडले का? हा प्रश्न आणि उत्तर देण्यालायक आहे. (ह.घ्या.)
(पूर्ण लेख वाचून प्रतिसाद देईनच :)
--लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)
वा
धनंजय महोदय,
आपण खरेच विद्वान आहात. आपण समजणे, विचार करणे, आणि सहानुभूत (कॉन्टंप्लेट) होणे या क्रियांचा फार बारकाईने अभ्यास करुन त्यांचे विवेचन केले आहे.
लहान वयात असा विचार करायला सुरुवात करुन मोठ्या वयापर्यंत त्यावर काम करीत राहणे ही खरेच संशोधक वृत्ती आहे आणि त्याबद्दल आपले कौतूक वाटले. आपले अभिनंदन करावेसे वाटते.
आपल्या मतांबद्दल येथील विद्वान लोक बोलतीलच. मी ते वाचून समजून घेण्यात आनंद मानीन.
काही जणांनी आपली तत्त्वे इतर काही जणांना समजावून सांगितल्या नंतर ती अक्षरशः खरी ठरतील म्हणजे ती सत्य आहेत असे ठरेल ही आपली आशा अथवा आपले हे मत मला तरी भाबडे वाटते. ते सत्य असेल आणि दुसर्या समुहाला न पटता सुद्धा तुम्हाला पटले तर ते जास्त उत्तम. कारण सत्य हे स्वतः सिद्ध असते. त्याला अजून सिद्धतेची गरज नसते. मग दुसर्या समुहाला आज पटो वा कालांतराने.
पण माझ्या या मताच्या विरुद्ध आणि तुमच्या मताच्या बाजूनेच अनेक विद्वान आपला कौल देतील हे निश्चित. कारण आपल्याला सत्यच समजले आहे की नाही हे सामान्य माणूस कसे पडताळणार? त्यासाठी विचार, अभ्यास, कृती, अनुभव, प्रचिती हे महत्वाचे. आणि आमच्या सारख्या मंदबुद्धी असणार्यांसाठी विचार, अभ्यास उपयोगी नाहीत त्यामुळे प्रमाण वाक्य (विवेकानंद म्हणतात ते आप्त वाक्य) जास्त उपयोगी.
मागे एकदा एका विद्वानाचे भारतीय अध्यात्माच्या बाबतीतले विचार वाचत होतो. ते स्वतः (लॉजीक) तर्कशास्त्र शिकवणारे प्रध्यापक होते. त्यांचे सुद्धा मत तुमच्या मता सारखेच होते. जर भारतीय दार्शनिकांना एका तर्हेचे अनुभव येतात , त्यांना ज्ञान सनातन आहे असे वाटते, तर या कल्पना, अनुभव वैश्विक (युनिवर्सल- म्हणजे स्थळ-काळ गृहित धरुन) असले पाहिजेत आणि जर ते तसे नसतील तर ते सत्य ठरत नाहीत असे त्यांचे मत असल्याने त्यांनी ग्रीक, आणि इतर युरोपिय तत्वज्ञांचे ग्रंथ वाचले. आणि त्यात सुद्धा त्यांना 'सनातन ज्ञान' असे उल्लेख आणि इतर काही साम्ये सापडली आणि त्यांचे समाधान झाले. इत्यादी.
मला वरील विषयातले जे समजले ते मांडले.
-- लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)
माझ्या "अवांतर" मधील थोडासा तर्कदोष
मोठ्या खुबीने शोधून काढलात :-)
जर सत्य आहे तर लोक एकमेकांना पटवू शकतील = जर लोकांनी एकमेकांना पटवले नाही तर ते सत्य नसावे. हा मूळ तार्किक पाया.
त्यातून गंमत म्हणून अवांतर मध्ये घेतलेले 'उलट' तर्कदुष्ट आहे :
जर लोकांनी एकमेकांना पटवले तर ते सत्य असावे.
"अवांतर" मधील वाक्ये अशी वाचावीत.
जर लोकांनी एकमेकांना पटवले तर ते सत्य किंवा असत्य असू शकते, पण एकमेकांना न-पटवू-शकणारी अनेक धादांत असत्ये बाजूला पडली असतील. त्यामुळे सत्यासत्य पडताळण्यासाठी पर्याय, आता आहेत त्या मानाने मोजके होतील, आणि माझी टाईम मॅनेजमेंटची सोय होईल.
आपल्याला कुठला एक स्रोत पटला म्हणजे पुरे हा ठोकताळा ठीक आहे, पण मंदबुद्धीमुळे म्हणा, या क्षणी तपशीलवार कोणाचेच म्हणणे पटत नाही. म्हणून हुशार लोक एकमेकांना जर पटवू शकले असे दिसले, तर त्यांच्याकडून शिकवण घेण्याचा प्रयत्न करीन असे म्हणतो.
तर्कदोष
मी तर्कदोष शोधून काढला नाही. तर्कदोष आहे असे ही मला म्हणायचे नाही. वेगळा दृष्टीकोन इतकेच.
पण तर्क लढवणे, आपण स्वतःची बुद्धी आणि वेळ खर्चेणे यावर आपण जो विचार केला आणि वागणे ठरवले तसे अनेक जण म्हणजे आडणी लोक सुद्धा सहजतेने म्हणजे सहज प्रेरणेने करीत असतात असे वाटते. वर कोणी तरी म्हणालेच आहे ना की ते नेणिवेत असणारच तुम्ही ते जाणिवेत आणले. ही प्रतिभा आहे हेच खरे.
सलाम !
--लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)
विचारप्रवर्तक
नंदनशी सहमत आहे. लेख विचारप्रवर्तक आहे. माझ्या मते हा विषय विज्ञानाकडून तत्वज्ञानाकडे झुकणारा आहे.
पहिला मुद्दा रोचक आहे. या मुद्यातील शेवटचा नियम आपण बहुतेककरून पाळतो. प्रश्न असा आहे की हा नियम जाणिवेत असतो की नेणिवेत? अचानक गाडी समोर आली म्हणून अपघात झाला किंवा शेवटच्या क्षणी बाजूला झालो म्हणून अपघात टळला. ह्या दोन गोष्टींमध्ये ज्ञानेंद्रियांनी नियम पाळला किंवा नाही? की त्यांचे नियम वेगवेगळे आहेत?
दुसर्या मुद्याबाबत आईनस्टाईनच्या संदर्भातील प्रतिसाद वाचला. त्यापुढची पायरी जिथे निसर्गातील जादूचा प्रयास कमी झालेला नाही (खरे तर वाढला आहे) ती म्हणजे क्वान्टम ग्रॅव्हिटी. विश्वामध्ये चार प्रकारची बले आहेत, विद्युतचुंबकीय बल, गुरुत्वाकर्षणाचे बल, आणि वीक व स्ट्राँग अशी दोन न्युक्लिअर बले. सध्या अस्तित्वात असलेल्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये यापैकी विद्युतचुंबकीय आणि न्युक्लिअर ही बले समाविष्ट आहेत, पण गुरूत्वाकर्षणाचे बल अजूनही या मॉडेलनुसार सिद्ध करता येत नाही. अर्थात आपल्या रोजच्या अस्तित्वापासून हे प्रश्न खूप लांब आहेत, त्यामुळे अस्तित्व हे विनासायास असते हे सिद्ध होते.
तिसरा मुद्दा तत्वज्ञांच्या विशेष आवडीचा आहे. जग अस्तित्वात आहे याचा पुरावा काय? की मॅट्रिक्सप्रमाणे उपक्रमही एक सिम्युलेशन आहे आणि माझ्या सभोवतालचे उपक्रमी त्या सिम्युलेशनचे भाग आहेत? याच्या पुढची पायरी म्हणजे मी जेव्हा लाल म्हणतो तेव्हा माझ्या मनात लाल रंगाची एक छटा असते. पण तुमच्या मनातील लाल रंगाची छटा वेगळी असू शकते. आणि रंग तर फार सोपी गोष्ट आहे. इतर अनुभवांचे काय? म्हणून मी जेव्हा एखाद्याला म्हणतो, "मला माहित आहे तुम्हाला काय वाटतय ते," तेव्हा मी माझ्या अनुभवसारणीत तुम्ही सांगितलेला अनुभव बसवत असतो.
डॅनिश तत्वज्ञ सोरेन क्युकगार्ड यांचे तत्वज्ञान सत्याच्या कल्पनेवर आधारलेले आहे. क्युकगार्ड यांच्या मते सत्य सापेक्ष असू असते. यात बरेच प्रकार येतात. अशा गोष्टी की ज्यांची सत्यता पडताळून पहाणे शक्य नाही, उदा. देव किंवा धर्म. क्युकगार्ड स्वत: ख्रिस्तधर्माचे कठोर पालन करत असत. त्यांच्या मते देवाच्या अस्तित्वासाठी तुम्हाला लीप ऑफ फेथ घ्यावीच लागते. याशिवाय सापेक्ष सत्यामध्ये इतरही गोष्टी येतात. समजा मी एखाद्या मित्राला वचन दिले की उद्या मी त्याला हवे असणारे पुस्तक घेऊन येईन. हे उद्याचे वचन आहे, पण आज ते सत्य आहे की असत्य हे आपण ठरवू शकत नाही. त्यासाठी उद्या उजाडावा लागेल आणि मी त्याला खरेच पुस्तक देतो की नाही हे बघावे लागेल. अर्थात ही क्षुल्लक बाब झाली. क्युकगार्ड यांच्या मते सापेक्ष सत्यामध्ये इतर गंभीर गोष्टीही येतात. यातली एक म्हणजे मॉरल व्हॅल्युज. प्रत्येकजण त्याच्या किंवा तिच्या व्हॅल्युजनुसार जगत असतो. पण मी अमुक एक व्हॅल्यु का निवडायची याला काही सिद्धता नसते. आपण जी निवड करतो ती संपूर्णपणे सापेक्ष असते. क्युकगार्ड यांच्या मते निरपेक्ष सत्यापेक्षा सापेक्ष सत्ये आपल्या दृष्टीने अधिक महत्वाची असतात.
ह्यातील बरेच मुद्दे एक्झिस्टेंशिअलिझ्म या तत्वज्ञानाखाली येतात.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सापेक्ष/अवांतर
>प्रत्येकजण त्याच्या किंवा तिच्या व्हॅल्युजनुसार जगत असतो. पण मी अमुक एक व्हॅल्यु का निवडायची याला काही सिद्धता नसते. आपण जी निवड करतो ती संपूर्णपणे सापेक्ष असते.
नैतिक मुल्यांच्या जनुकांशी संबंध असण्याची शक्यता आहे (संस्कृतीच्या तुलनेत) असे अलिकडची संशोधने पाहताना वाटले. (नेचर विरुद्ध नर्चर वगैरे..)
सहमत
>नैतिक मुल्यांच्या जनुकांशी संबंध असण्याची शक्यता आहे (संस्कृतीच्या तुलनेत) असे अलिकडची संशोधने पाहताना वाटले. (नेचर विरुद्ध नर्चर वगैरे..)
हा मुद्दा फारच रोचक आहे. यावर स्वतंत्र चर्चा/लेख होउ शकेल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सहमत
हा मुद्दा फारच रोचक आहे. यावर स्वतंत्र चर्चा/लेख होउ शकेल.
हेच म्हण'तो'
--लिखाळ.
वैज्ञानिक पूर्वपीठिका
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. सर्किट लिहितात :"आम्हा सामान्य माणसांची दमछाक होते हो अर्ध्या लेखापर्यंत येताना. असं करा ना प्लीज, की ह्या लेखाचे तीन भाग करा. एकेका मुद्याला जरा जास्त वेळ द्या."
त्यांच्या या मताशी मी सहमत आहे.स्टीफन हॉकिंग यांचे " ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम " वाचताना पहिले प्रकरण (अवर पिक्चर ऑफ द युनिव्हर्स ) थोडे फार समजते. पुढे आपल्याला काही कळते आहे असे भासते.शेवटी काहीच कळले नाही एवढेच समजते.
सहमत
>स्टीफन हॉकिंग यांचे " ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम " वाचताना पहिले प्रकरण (अवर पिक्चर ऑफ द युनिव्हर्स ) थोडे फार समजते. पुढे आपल्याला काही कळते आहे असे भासते.शेवटी >काहीच कळले नाही एवढेच समजते.
बर्याच अंशी सहमत आहे. पुस्तक आकलनाच्या दृष्टीने तितके सहज नाही असे मला वाटते. पुस्तकाच्या खपामध्ये हॉकिंग्ज यांच्या प्रसिद्धीचा मोठा वाटा आहे.*
*हे माझे मत आहे. हॉकिंग्ज एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्या विषयी मत व्यक्त करण्याची माझी योग्यता नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. हे मत फक्त एक सामान्य वाचक म्हणून त्यांच्या पुस्तकाच्या संदर्भात मांडले आहे. गैरसमज नसावा.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
आकलन
>पुस्तक आकलनाच्या दृष्टीने तितके सहज नाही असे मला वाटते.
या सारख्या विषयावर जितके आकलनीय पुस्तक लिहीता येईल तितके हे आहे असे वाटते. अर्थात पुन्हा पुन्हा वाचताना अर्थ बदलत जातो हा भाग वेगळा ;)
सहमत
त्याच्याशी सहमत आहे. याचे एक कारण म्हणजे सापेक्षता किंवा कॉस्मॉलॉजी यांच्यासारखे विषय गणिताचा आधार न घेता समजावून सांगणे महाकठीण काम आहे. यासंबंधी वाचलेल्या हकीकतीनुसार हॉकिंग्ज यांना त्यांच्या प्रकाशकाने सांगितले होते की पुस्तकात तुम्ही जितकी समीकरणे टाकाल त्यानुसार त्याचा खप निम्मा होईल. माझ्या आठवणीप्रमाणे पुस्तकात एकच समीकरण आहे, E = mc^2
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
सहमत - तीन भाग पाहिजेत
मला वाटते की फार लांब असल्यामुळे लेख उगाच विद्वत्ताप्रचुर भासतो. तसा मूळ लेखात खूप विचार-मसाला नाही.
तीन मुद्द्यांसाठी तीन भाग वेगवेगळे केलेत तर वाचायला सुलभ जाईल. असे करता येईल का म्हणून उपक्रम व्यवस्थापनाला विचारून बघतो.
लिखाळ, नंदन आणि राजेंद्र यांच्या प्रतिसादांतून खूप नवीन माहिती कळण्यासारखी आहे. तशा प्रतिसादांसाठी पडद्यावर जागा (स्क्रीन स्पेस) ठेवण्यासाठीही तीन भाग केले असते तर सोयीचे गेले असते.
या लेखात ~१६०० शब्द आहेत. एका दुव्यावरील लेखात शब्द ~५०० पेक्षा अधिक नको असा ठोकताळा मानायला हरकत नाही.
माझे दोन पैसे
मला वाटतं आपला ठोकताळा बरोबर नाही हे आपणही जाणता.
माफ करा पण हा लेख सर्वसामान्यांना कळावा असा आहे का? याचे उत्तर स्पष्ट शब्दांत नाही असे आहे. हे लिखाळ, नंदन आणि राजेंद्र यांच्या तुटपुंज्या प्रतिसादांवरून दिसते. लेखाला २-४ प्रतिसाद अधिक येतील पण ती संख्या उपक्रमाच्या १/८ सदस्यांइतकीही नसेल हे खात्रीलायकरित्या म्हणता येते.
पुन्हा तोच प्रश्नः हा लेख सर्वसामान्यांना कळावा असा आहे का? याचे उत्तर नाही हेच आहे परंतु त्यावर तुम्ही म्हटले की तो सर्वसामान्यांना कळण्यापेक्षा विषयांत रुची असणार्या आणि तो समजण्याची पात्रता असणार्या लोकांसाठीच आहे तर लेखाची लांबी यापेक्षा अधिक असली तरी ते समजावून घेतील. (जसा लिखाळांनी घेतला.)
प्रश्नाचे उत्तर नाही असेच असून तुम्हाला वाटत असेल की हा लेख अनेकांना समजावा तर तो वेगळ्या रितीने मांडणे शक्य होईल का पाहावे. केवळ लेखाची लांबी आकलनाला बाधा आणते असे नसावे हे आपणही जाणता. मांडणी, वापरलेली उदाहरणे, वाक्यरचना, शब्दयोजना हे देखील महत्त्वाचे मुद्दे असावेत. मला स्वतःला प्रश्नोत्तरांच्या स्वरूपापेक्षा वेगळी मांडणी वाचायला आवडेल.
असो. मला लेख बर्यापैकी कळला. सलग वाचला तेव्हा वाचून कंटाळा आला. स्प.म.रा. न.* प्रश्न तीन भाग करून वाचले, तेव्हा समजले परंतु विषय नवा नसूनही (नवा नसून म्हणजे रोजच्या व्यवहारातील असल्याने) पहिल्यांदाच त्यावर विचार केल्याने प्रतिसाद काय द्यावा हे कळले नाही म्हणून माझे दोन पैसे खरडले.
चू. भू. दे. घे.
* स्पष्ट मत राग नसावा.
विज्ञानाबाबत माझी (ही) पूर्वपीठिका
च्यामारी ,
काय हे विद्वत्ताप्रचूर लेख हो!
वर्णन नियम, कल्पना प्रेरणा, वेदना, गणपतीपुळे,
होडी, मासेमारी, अनुमान उपमान सूक्ष्म, अतिसूक्ष्म आयुष्य अस्तीत्व, सिद्धांत, तत्व नास्तीक, इश्वर, प्रलय, युक्तीवाद पुर्वग्रह, सारांश आणी पटवा पटवी...
बापरे! दमूनच गेलो वाचता-वाचता.
हे सगळे वाचून माझ्या (आधीच अतिसूक्ष्म अस्तीत्व असलेल्या) मेंदूची पार बारीक पिठी पडली आहे.
आता हे वाचून मी माझी पिठीका बनवून टाकली -
विज्ञान = वि-ज्ञान
म्हणजे जे आपल्या डोक्यात नसलेल्या ज्ञानाच्या विरुद्ध बाजूला जे जाते आहे ते! ;)
आपला
तुळतूळीत मेंदूवर कोणतीही सुरकूती नसणारा, अज्ञानिक, डोमेस्टीक, कन्व्हेंशनल, ईश्वरवादी, रोज पेपरमध्ये ज्योतिष पाहणारा, आजचा 'दिवस कसा काढायचा' असा परवडेल इतकाच माफक प्रश्न पडणारा.
गुंडोपंत
विज्ञान तुमच्या ज्ञानाच्या विरुद्ध नाही हो!
> म्हणजे जे आपल्या डोक्यात नसलेल्या ज्ञानाच्या विरुद्ध बाजूला जे जाते आहे ते! ;)
लेख फार लांब झाला आहे हे मान्य. पण त्यातली तत्त्वे तुमच्या सामान्य वागणुकीच्या विपरीत आहेत का?
१. लेख वाचून डोके दुखते म्हणून तुम्ही दवाखान्यात गेलात समजा. डॉक्टर म्हणाल्या की : "लेख वाचून डोके दुखू शकत नाही असा डॉक्टरी नियम/शास्त्र आहे. त्यामुळे तुमचे डोके दुखत नाहीच आहे." तर तुमचे "डोके दुखते" हे वर्णन खरे मानाल, की डॉक्टरी नियम? माझ्या मते तुम्ही स्वतःचे वर्णन खरे मानावे. हे तत्त्व मी विज्ञानातल्या वर्णना/नियमांना लागू करतो.
२. तुम्ही दररोज नेहमीच्या गोष्टींची कारणे शोधता की अनपेक्षित गोष्टींची? मग दररोज उठल्या उठल्या नखशिखांत "माझ्या पायांना नखे का?", "माझे पाय का दुखत नाहीत?", ..., ते "मला डोळे दोनच का?", असे प्रश्न विचारायचा अतिप्रसंग येईल. मग "आज माझे डोके का दुखत आहे? = लेख वाचल्यामुळे" हे अनपेक्षित डोकेदुखीचे कारण शोधायला तुम्हाला दिवसात वेळ कधी मिळणार? माझ्या मते तुम्ही व्यवहारात नेहमीच्या नाही तर नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टींचीच कारणे शोधत असणार. हे तत्त्व मी विज्ञानातल्या "विचारण्यालायक" प्रश्नांना लागू करतो.
३. अमुक मुद्दा धनंजय गुंडोपंतांना समजावून सांगू शकत नाहीत. यामुळे जर धनंजयने मानले की गुंडोपंत विचार करण्यास असमर्थ आहेत, तर ती चूक होईल. गुंडोपंतांना वेळ आहे/नाही असे बघून त्यांना पुन्हा वेगळ्या प्रकारे सांगता येईल का असे बघितले पाहिजे. गुंडोपंतांना वेळ नसेल तर कमीतकमी शेजारच्या धोंडोपंतांना पटवून देता आला पाहिजे. पंतांनी नीट लक्ष देऊनही, जर तो मुद्दा धनंजय त्यांना पटवू शकला नाही, तर तो मुद्दा चूक असेल, असे धनंजयने पुन्हा बघायला पाहिजे. हेच व्यावहारिक तत्त्व ना? हे तत्त्व मी विज्ञानातल्या मुद्द्यांना लागू करतो.
वा
वा ! व्यवहारातील उदाहरणे देउन तुम्ही गहन विषय फार सुलभ करुन टाकता.
अवांतर : मी विज्ञान शिकत असताना माझ्या एका विचारी मोठ्या (सिनिअर) विद्यार्थी मित्राने मला असाच एक् मह्त्वाचा धडा दिला होता. त्याचे मला नित्य स्मरण असते. भूशास्त्रात अनेक असे सिद्धांत आहेत की जे प्रथम दर्शनी अशक्य वाटतात. जसे नदी खनन करुन दरी निर्माण करते. मी असे कसे होईल असे शक्य नाही असे म्हणून एकदा काही प्रतिवाद करत होतो. तर तो मित्र मला म्हणाला की तुझे म्हणणे खरे सुद्धा असू शकते आणि त्या शस्त्रज्ञांचे म्हणणे खोटे असू शकते पण प्रथम ते त्यांच्या २०-३० वर्षांच्या अभ्यासाने या निश्कर्षाप्रत कसे आले ते अभ्यास. मग त्यात खोट आहे का ते पहा. कारण अनेकांनी अनेक वर्षे अभ्यास करुन जे सिद्ध केले आहे ते पूर्ण मूर्खपणाचे असेल असे नाही. म्हणजे थोडक्यात प्रमाण वाक्य मान. ते पचव. मग तुझे डोके काय म्हणते पहा.
सतत का? आणि कसे? असे विचारित बसलो तर जगणे आणि पुढे जाणे मुष्किल ठरु शकते. तेव्हा पासून माझे डोके जरा शांत होउन योग्य दिशेने जाउ लागले.
--लिखाळ.
मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)
खांदा
पूर्वजांच्या खांद्यावर चढूनच जगाकडे पाहावे लागेल. स्वतः सारे पाहावे एवढी आपली उंची नाही :)
बरोबर
बरोबर..
--लिखाळ.
चांगला लेख
लेख आवडला.
राधिका
गृहपाठ
तुमची भूमिका कळली असे भासते आहे (पटवून देता आले तर खरी कल्पना नाहीतर चुकलेली असू शकते! म्हणून हा पुढचा उपद्व्याप.).
तुमच्या तीन नियमांसकट अजून ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या अश्या असे वाटते -
१. माझा वेळ कमी आहे, त्यात कसले ज्ञान प्राप्त करून घ्यायचे किंवा तो वेळ कसा घालवायचा हे "मी " ठरवणार.
२. कल्पना दुसर्याला पटवून देता आली पाहिजे, नाहीतर ती कल्पना चुकली असू शकते.
३. लोक एकमेकांना आपापली गृहितके /कल्पना पटवून द्यायचा व्यर्थ प्रयत्न करतात (त्यात वे़ळही घालवतात). (यातच "ईश्वर" ही कल्पना असावी).
४. जग आहे म्हणून ईश्वर आहे असे मी मान्य करणार नाही. तर त्यासाठी मला शब्द, उपमाने, अनुमाने, आणि प्रत्यक्ष असे क्रमाक्रमाने पुरावे लागतील. (पैकी ईश्वर संदर्भात शब्द आणि उपमान उपलब्ध असावेत). अनुमाने आणि प्रत्यक्ष पुरावे नसल्याने आणि कोणाला मला हे पुरावे देता येणार नसल्याने मी माझ्या वेळाचा (माझ्या मते) सदुपयोग करीन आणि ठरवेन की हा प्रश्न विचारायची गरज मला भासत नाही.
५. नियमांच्या आधी वर्णन हवे (म्हणजे ईश्वर आहे हे म्हणण्याआधी ईश्वर कसा दिसतो), अस्तिस्त्व हे विनासायास असते (जमीन आहे ती आहे - किंवा मला तिचे अस्तित्व दिसते. ते विनासायास आहे. ईश्वर दिसायला/ मिळायला कष्ट करावे लागत असल्यास तो नसण्याचीही शक्यता आहे), आणि अन्य व्यक्ती विचार करू शकतात (म्हणजे मला त्यांना माझे मत पटवता येऊ शकते, इच्छा असल्यास, किंवा त्यात वेळ न घालवण्याचा निर्णयही माझा असू शकतो. आणि त्यांनाही तसेच स्वातंत्र्य आहे - त्यांना विचार करता येत असल्याने.)
असो. वरील लिखाण शंकराचार्यांच्या विविध चर्चांमधील उल्लेखांवरून उद्भवले आहे असे वाटते. हे आपले अनुमान आहे, प्रत्यक्ष तुमचा शब्द ऐकला नाही. तुमचे लिखाण वाचायला आवडते हे खरे (ते कॉम्प्लिकेटेड वाटत असले तरी).
काही अंशी बरोबर समजली पण काही ठळक फरक
तुम्हाला समजलेली माझी भूमिका काही अंश बरोबर आहे. काही ठळक फरक आहेत म्हणून सांगतो.
> १. माझा वेळ कमी आहे, त्यात कसले ज्ञान प्राप्त करून घ्यायचे
> किंवा तो वेळ कसा घालवायचा हे "मी " ठरवणार.
म्हणजे अगदी तसे नाही की "मी" ठरवणार. ज्या प्रश्नाला उत्तर मिळण्याची शक्यता आहे, त्याविषयी दुसरा कोणी माझ्या मनात जरूर रस उत्पन्न करू शकेल. पण "परिस्थिती अशा कारणामुळे आहे" हा नियम सांगण्यापूर्वी; "परिस्थिती अशी आहे" असे वर्णन असल्यास बरे. मग रस निर्माण व्हायची शक्यता अधिक आहे.
याच्या बाबतीत आपल्या शास्त्रात आणखी एक "संदेह" म्हणून कल्पना आहे (ती मी लेखात सांगितलेली नाही.) या विषयाबाबत काय संदेह आहे? काय दुमत/तिमत/... आहे? पैकी एक किंवा दुसरे/तिसरे/... मत खरे असल्याने काय फरक पडणार आहे? अशा प्रकारे कोणी बोलता बोलता माझ्या मनात कुठल्याही विषयाबाबत रस उत्पन्न करू शकेल. उदाहरणार्थ, काही लोक म्हणतात की कुठल्यातरी विवक्षित देवावर विश्वास ठेवला की मनुष्य हिंसाचार करीत नाही. याने माझ्या संभाव्य वेदना कमी होऊ शकतात. अशा प्रश्नात मला जरूर रस वाटेल. शिवाय "हिंसाचार कमी करतात" या प्रमेयाचे संशोधन करणे अशक्य नाही.
> २. कल्पना दुसर्याला पटवून देता आली पाहिजे, नाहीतर ती कल्पना
> चुकली असू शकते.
हे माझे मत आहे, बरोबर.
> ३. लोक एकमेकांना आपापली गृहितके /कल्पना पटवून द्यायचा व्यर्थ
> प्रयत्न करतात (त्यात वे़ळही घालवतात). (यातच "ईश्वर" ही कल्पना असावी).
नाही. असे माझे मत नाही. माझ्या कल्पनांची सत्यता पडताळून पाहायला मी त्या कल्पना लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो. लोकही तसे करतात यात आनंदच आहे.
> ४अ. जग आहे म्हणून ईश्वर आहे असे मी मान्य करणार नाही.
> तर त्यासाठी मला शब्द, उपमाने, अनुमाने, आणि प्रत्यक्ष असे
> क्रमाक्रमाने पुरावे लागतील.
> (पैकी ईश्वर संदर्भात शब्द आणि उपमान उपलब्ध असावेत).
क्रमाक्रमानेच नाहीत. शब्द/उपमान आधी आले तरी चालेल.
> ४आ. अनुमाने आणि प्रत्यक्ष पुरावे नसल्याने आणि कोणाला मला हे पुरावे
> देता येणार नसल्याने मी माझ्या वेळाचा (माझ्या मते) सदुपयोग करीन
> आणि ठरवेन की हा प्रश्न विचारायची गरज मला भासत नाही.
नाही. असे माझे मत नाही. "आंधळा सूक्ष्मयांत्रिक" (ब्लाइंड वॉचमेकर) या उपमानाचा मी उत्साहाने अभ्यास केला. म्हणजे घड्याळासारखे सूक्ष्म घटकांचे यंत्र सापडले तर आपण कोणी कुशल यांत्रिक बनवणारा असल्याचा कयास करतो. ते उपमान घेऊन निसर्गाबद्दल विचार करून ईश्वर "बनवणारा" म्हणून सांगतात. ते उपमान काहींना पटते, काहींना पटत नाही, पण त्याबद्दल इथे विस्तार करत नाही. उगाच नाही गौतमांनी "ठोस"च्या यादीत उपमानाला क्रमांक ३ वर टाकले. "विश्वासू माणसाचा शब्द" ऐकण्यास मी आतुर आहे. पण "विश्वासू माणूस" कोण आहे? त्याच्यासाठी आपल्या विचारवंतांनी फारच कठोर कस ठरवलेला आहे. विश्वासू माणूस तो ज्याने स्वतः बाकी (प्रत्यक्ष वगैरे) प्रमाणांनी सत्याची परीक्षा केली आहे, आणि जो राग-लोभ वगैरे भावनांनीही सत्यापेक्षा वेगळे बोलणार नाही. असे एक तर कोणीच नाही किंवा खूपच आहेत. त्या मानाने शब्द स्वीकारण्यासाठी मी सोपा निकष निवडला आहे. जेव्हा या विषयात रस असलेले हुशार लोक एकमेकांना ईश्वराबद्दलच्या आपल्या कल्पना तपशीलवार पटवतील त्यांपैकी जी गुरू ठरेल ती माझी गुरू. कारण तिने "प्रत्यक्ष वगैरे प्रमाणांनी सत्याची परीक्षा केली आहे", आणि ती "राग-लोभ वगैरे भावनांनीही सत्यापेक्षा वेगळे बोलणार नाही" हे त्या बाकी हुशार लोकांनी परीक्षण केलेच असणार. मी त्याचा फायदा घेईन.
> ५. नियमांच्या आधी वर्णन हवे (म्हणजे ईश्वर आहे हे म्हणण्याआधी ईश्वर कसा दिसतो),
हे बरोबर. "दिसतो" असे अगदी तसेच नाही. पण दुसर्या कुठल्या शब्दाच्या अर्थापेक्षा या शब्दाचा अर्थ कसा वेगळा आहे ते वर्णन असल्यास बरे. म्हणजे नुसते "आदरणीय तेजस्वी वस्तू" म्हटले तर "आई" किंवा "सूर्य" हे त्याच वर्णनात बसतात. आणि "आई" हीच "ईश्वर" असेल तर उगाच शब्दाला शब्द का वाढवा? "आई" अस्तित्वात आहे हे मला तसेही माहीत आहे. त्यामुळे नवीन शब्दाची परिभाषा होण्याइतपत चांगले वर्णन असावे. परिभाषा इतकीही मोघम किंवा बुचकळ्यात पाडणारी नसावी की पुढे काहीच कळणार नाही. "सर्वत्र सर्वकाळ असणारी वस्तू" म्हटले की तीत माझे हल्लीचे अज्ञान ही आलेच. परिभाषेत इतका परस्परविरोधी विचार सुरुवातीलाच नको.
> अस्तिस्त्व हे विनासायास असते (जमीन आहे ती आहे - किंवा मला तिचे अस्तित्व दिसते.
> ते विनासायास आहे.
बरोबर.
> ईश्वर दिसायला/ मिळायला कष्ट करावे लागत असल्यास तो नसण्याचीही शक्यता आहे),
हे मात्र माझे मत मुळीच नाही. कष्टसाध्य सत्यांची मला बर्यापैकी आवड आहे. पण इथे संदेह काय आहे? ईश्वराबद्दल तपशील मी समजले नाहीत तर काय फरक पडणार आहे? याबद्दल "विश्वासू" लोक अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. "आकाशातला बाप" नावाच्या पुरुषाला "येशू" नावाचा एकुलता एक मुलगा होता, आणि यावेगळ्या कोणाचीही पूजा करता कामा नये हे तपशील मी खरे म्हणून जाणले तर मला पंख फडफडत उडणार्या देवदूतांच्या स्वर्गात जाता येईल. हे सत्य समजले नाही तर नरकाच्या आगीत अनंत काळ होरपळावे लागेल. असे असले तर हे कष्टसाध्य सत्य समजून घ्यायला मी खूप प्रयत्न करीन. पण अन्य "विश्वासू" लोक म्हणतात की माझ्या पितरांचे विधिवत् तर्पण केले नाही (ही येशूच्या बापावेगळ्या देवाची पूजा आहे) तर माझ्या पूर्वजांच्या पाच पिढ्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. माझे आई-वडील आजोबा-आजी मला खूप प्रिय असल्यामुळे हा तपशील खरा असल्याचे जाणून घ्यायला मला खूपच महत्त्वाचे आहे. पण इथे दोन्ही "विश्वासू" गुरूंचे शब्द मला एकाच वेळी मानून घ्यायला कठिण जाते आहे. त्या सगळ्या गुरूंनी एकमेकांना पटवून दिले तर माझी सोय लागेल, की कोणाचा शब्द मानू.
स्वर्ग/नरक आणि आत्म्याची शांती या महत्त्वाच्या गोष्टी वादग्रस्त म्हणून बाजूला ठेवल्या, तर देव आहे/नाही असे असल्यामुळे काय फरक पडणार आहे. (उदाहरणार्थ "जगात शांती नांदेल". पण तसे तर प्रत्यक्षात दिसत नाही. म्हणून दुसरे कारण लागेल.) मी सत्य जाणून दुसरा कुठला फरक पडणार असेल, तो मला कळला तर वरील गुरूंचे एकमत होण्या आधी सुद्धा या सत्याचा पाठपुरावा करायला मी तयार आहे.
आभार
३. तुमचे बरोबर आहे, मी लिहीताना त्याचे सार्वत्रिकीकरण केले. मला तुमच्या ईश्वरविषयक संकल्पना असे काहीसे म्हणायचे होते.
स्वर्ग/नरक आणि आत्म्याची शांती या महत्त्वाच्या गोष्टी वादग्रस्त म्हणून बाजूला ठेवल्या, तर देव आहे/नाही असे असल्यामुळे काय फरक पडणार आहे. किंवा ईश्वराबद्दल तपशील मी समजले नाहीत तर काय फरक पडणार आहे? उदाहरणार्थ "जगात शांती नांदेल". पण तसे तर प्रत्यक्षात दिसत नाही. म्हणून दुसरे कारण लागेल.
बरोबर. फक्त "देव आहे/नाही असे असल्यामुळे काय फरक पडणार आहे" हे "देव आहे/नाही असे असल्यामुळे मला काय फरक पडणार आहे" असे पाहिजे असे वाटते. कारण तुमच्या नजरेतून जगात शांती नांदणे कदाचित महत्त्वाचे असेल तर दुसर्याच्या नजरेतून देव असणे हे लहान मुलाला आई-वडिल असण्यासारखे आश्वासक असू शकेल आणि त्यासाठी तो ईश्वराचे अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असेल. असो. (हे कदाचित तर्कदुष्ट असू शकेल, पण ते असावे).
विस्तृत स्पष्टीकरणाबद्दल आभार. लेख आवडला.
अर्थात लेख "वाचायला" सोपा केल्यास कळायलाही सोपा जाईल. शब्द आणि उदाहरणे सोपी आहेत पण तरी हे पहा मला प्रत्येक गोष्टीचा उमज पडला नाही.
तर्कदुष्ट नाही
> तर दुसर्याच्या नजरेतून देव असणे हे लहान मुलाला आई-वडिल
>असण्यासारखे आश्वासक असू शकेल आणि त्यासाठी तो ईश्वराचे
> अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असेल.
> (हे कदाचित तर्कदुष्ट असू शकेल, पण ते असावे).
मला तुमचा हा विचार तर्कदुष्ट वाटत नाही. म्हणजे संदेह हा की "जगण्यास आश्वासन मिळते असे एक ईश्वरतत्त्व मानावे, आणि न मानल्यास आश्वासन मिळत नाही." हा प्रश्न जरूर (आत्म)संशोधन करण्यासारखा आहे.
हक्स्ले या वैज्ञानिकाचे लहान मूल वारले त्यावेळी चार्ल्स किंग्स्ले या धर्मोपदेशकाने अत्यंत मित्रत्वाने त्याला असे जिव्हाळ्याचे पत्र पाठवले, की त्या मृत बालकाचा आत्मा अमर आहे असे मानल्यास विरही बापाला काही दिलासा मिळेल. त्याला २३ सप्टेंबर १८६० तारखेला हक्स्ले यांनी एक फार मैत्रीपूर्ण आणि विचारपूर्ण उत्तर पाठवले होते. अशा प्रकारचा विचार जरूर व्हावा.
अवांतर : पण हे आश्वासक तत्त्व, भौतिक जग निर्माण करणारे तत्त्व, आणि समाजाला संतुलित ठेवणारे तत्त्व, ही तीनही एकच आहे असे मानणे कदाचित तर्कदुष्ट असू शकेल. म्हणजे, त्याचा नीट विचार करून तर्क सांगावा लागेल - सांगितल्यास "ती तीनही तत्त्वे एकच" हे देखील तर्कशुद्ध असू शकेल.
दुव्याबद्दल आभार
हक्स्ले चे पत्र वाचले. विचार करायला लावणारे आहे. सबळ पुरावे असल्याखेरीज ईश्वराच्या अस्तित्त्वावर विश्वास ठेवायची त्याला गरज वाटत नाही असे काहीसे त्याने म्हटले आहे असे वाटते.
पण मला असे म्हणायचे होते की प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे तो प्रश्न काय विचारायचे ते ठरवणार. ईश्वर म्हणजे काय हे समजून घेण्यात वेळ जातो असे कोणाला वाटेल तर कोणाला तोच महत्त्वाचा प्रश्न वाटू शकतो. बुद्धी (जगात वावरण्याची रीत शिकवणारी सतत बदलणारी मेंदूतील कार्यप्रणाली म्हणू या हवे तर) च्या अस्तित्वावर ती डोळ्यांनी दिसत नसतानाही आपण विश्वास ठेवतो. त्या विश्वासावर आपण पुढचे शिकतो. विचार करता येतच नाही म्हटल्यास (उलटा विश्वास ठेवल्यास) गाडी तिथेच अडते. त्यामुळे पुढचे बरोबर चूक कुठचेच विचार करता येत नाहीत. बुद्धीच्या अस्तित्त्वावर आपण जशी ती दिसत नसतानाही विश्वास ठेवतो तसेच हे जगाच्या निर्मात्याच्या (तत्त्वाच्या) अस्तित्त्वावर लोक विश्वास ठेवत असावेत. ते कसे आहे हे माहिती नसले तरी.
अवांतरः ह्याचा अर्थ मला ईश्वराची जी संकल्पना न्याय निवाडा करणारा वगैरे प्रकारे बहुतेक धर्मांमध्ये आहे तशीच ती मान्य आहे असा नाही. पण जे काही जग मला दिसते त्याची मला माझ्यापुरती हवी तशी संगती लावण्याचा मूलभूत अधिकार माझ्या अस्तित्वामुळे मला आहेच यावर माझा विश्वास आहे.
कधी कोणाच्या खांद्यावर चढायचे आणि कधी नाही हे मला त्या त्या वेळी झालेल्या बुद्धीप्रमाणे मी ठरवणार.
बुद्धीप्राण्यवाद
पण "विश्वासू माणूस" कोण आहे? त्याच्यासाठी आपल्या विचारवंतांनी फारच कठोर कस ठरवलेला आहे. विश्वासू माणूस तो ज्याने स्वतः बाकी (प्रत्यक्ष वगैरे) प्रमाणांनी सत्याची परीक्षा केली आहे, आणि जो राग-लोभ वगैरे भावनांनीही सत्यापेक्षा वेगळे बोलणार नाही. असे एक तर कोणीच नाही किंवा खूपच आहेत. त्या मानाने शब्द स्वीकारण्यासाठी मी सोपा निकष निवडला आहे. जेव्हा या विषयात रस असलेले हुशार लोक एकमेकांना ईश्वराबद्दलच्या आपल्या कल्पना तपशीलवार पटवतील त्यांपैकी जी गुरू ठरेल ती माझी गुरू. कारण तिने "प्रत्यक्ष वगैरे प्रमाणांनी सत्याची परीक्षा केली आहे", आणि ती "राग-लोभ वगैरे भावनांनीही सत्यापेक्षा वेगळे बोलणार नाही" हे त्या बाकी हुशार लोकांनी परीक्षण केलेच असणार. मी त्याचा फायदा घेईन.
वाह् वा ! मी पण हेच म्हणतो !
सर्व गोष्टी मीच पडताळून पाहत बसलो तर या जन्मात जे मिळवायचे आहे ते मिळवायला वेळच मिळणार नाही. आपण शाळेत जातो तेव्हा आपल्या शिक्षकांना आपल्या पेक्षा जास्त येते हे गृहित धरतो. कारण शिक्षकांना काम देणे, शाळा चालवणे या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रक्रियेवर आपले पालक विश्वास ठेवतात आणि त्याच प्रमाणे पिढ्यानपिढ्या आपण ही. नाहितर प्रत्येक शिक्षकाला तो वर्गात आल्यावर त्याचे डिग्री सर्टिफिकेट मागणे आणि त्याची परिक्षा घेणे हे उद्योग आपल्याला करायला लागतील आणि आपल्याला त्याच्या पेक्षा कमी ज्ञान आहे हे जर खरे असेल तर आपण त्याची परिक्षा कशी घेणार? (हाच व्याघात !)
यातून सुटण्यासाठी ... हे त्या बाकी हुशार लोकांनी परीक्षण केलेच असणार. मी त्याचा फायदा घेईन. ... हेच योग्य. आणि आता बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे काय आणि तो अश्या प्रसंगी कसा काम करतो हे मला जाणून घ्ययचे आहे. म्हणजे मी ज्यांना हुशार म्हणेन ते हुशार असे गृहित धरुन पुढची वाटचाल करणे आले. मग असे असता विचारी माणून अलगद अंधश्रद्ध होउन जाईल की काय अशी भीति वाटत आहे.
--लिखाळ.
मला जे समजले आहे ते समजले आहे का तेच समजेनासे झाले आहे.
लेखाचे स्थान
या लिखाणाला आजचा सुधारक मध्ये मानाचे स्थान मिळेल. बघा येथे त्याविषयी थोडेसे.
आमची विज्ञान विषयक मतांची पुर्वपीठीका फक्त एवढीच आहे.
१) निरिक्षण २) अनुमान ३) प्रयोग ४) निष्कर्ष
प्रकाश घाटपांडे
लेखाचे स्थान
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे लिहितात: "या लिखाणाला आजचा सुधारक मध्ये मानाचे स्थान मिळेल." हे खरेच आहे. किंबहुना श्री. धनंजय यांच्या कोणत्याही वैचारिक लेखनाला "आजचा सुधारक" मधे स्थान मिळावे. या मासिकातील लेखनाची काठिण्यपातळी (आकलनाच्या दृष्टीने) "...पूर्वपीठिका " या लेखा सारखीच असते. मला तर एकेका लेखाचे तीनदा वाचन करावे लागते.
...श्री. प्रकाश घाटपांडे यांनी या मासिकासाठी दुवा दिला. पण त्यात पत्ता दिसला नाही. तो पुढील प्रमाणे:
पत्ता: संपादक, आजचा सुधारक
मोहनी भवन,धरमपेठ नागपूर ४४००१०.
(सद्ध्या श्री. प्र.ब. कुलकर्णी हे कार्यकारी संपादक आहेत.)
एन्थ्रोपी?
>"पश्चिमेलाच का?" असा प्रश्न विचारत बसलो तर आज एकही मासा जाळ्यात सापडणार नाही.
याला उत्तर आहे की "तुम्ही हा असा प्रश्न विचारू शकावा म्हणून:) " अन्यथा हा प्रश्न "पूर्व का?" असा असला असता.
हे विश्व 'असेच' का आहे? याचे उत्तर हे यापेक्षा जराही वेगळे असते तर हा प्रश्न विचारायला तुम्ही इथे नसता हे असू शकते :)
या तत्वाने देखील बरेच प्रश्न निकालात काढता येतात.
वीक अँथ्रोपी
बरोबर आहे. त्यातल्या त्यात "वीक अँथ्रोपिक" विचारधारा.
अनेक पर्यायी विश्वे असू शकतात पण त्या अनेक पर्यायांपैकी ज्याच्यात मी आहे, तिथे पुळ्याच्या पश्चिमेला समुद्र आहे, ही "वीक अँथ्रोपिक" विचारधारा.
माझ्या असल्यामुळे हे एकच विश्व आहे तसे आहे, असे म्हटले तर "स्ट्राँग अँथ्रोपिक" विचारधारा. ही "मी एकटाच महत्त्वाचा" कडे फार झुकते, आणि माझ्या तिसर्या गृहीतकाच्या दृष्टीने मला कठिण जाते.
याच विश्वात पुळ्याच्या पूर्वेला कधीकधी आणि पश्चिमेला कधीकधी समुद्र दिसू लागला, तर खरेच "आज होडी कुठे नेऊ" असा संदेह उद्भवेल, आणि "आज समुद्र पश्चिमेला का?" हा प्रश्न विचारायला मला चालना मिळेल. "काल मी प्रश्न विचारायला होतो त्यामुळे तो पूर्वेला होता, आज मी प्रश्न विचारायला असल्यामुळे तो पश्चिमेला आहे" इतकाही मी वीक अँथ्रोपीला वाहिलेलो नाही.
तत्वज्ञान
हा लेख वाचताना एक अतिशय जवळच्यांमधील संवाद आठवला: एका विद्यार्थ्यांमधे प्रिय असलेल्या प्राध्यापकाची बायको त्याचे घरातील बोलणे ऐकून म्हणायची की, "तुम्ही सोप्या गोष्टी अवघड करून सांगता!". असो यात काही आपल्यावर टिका करायचा उद्देश नाही, किंबहुना आपले वाचायला (जरी कधी कधी समजले नाही तरी) आवडते!
हा लेख वाचताना जरी "कवीला नक्की काय म्हणायचे आहे?" (हा वाक्प्रचार आहे) असा प्रश्न पडला असला तरी जे काही वाटले त्यावर आधारीत काही लिहावेसे वाटले ते लिहीतो: संदर्भ केवळ शेवटच्या दोन परिच्छेदांपुरता मर्यादीत ठेवतो: आधी म्हणल्याप्रमाणे आपणास जे काही म्हणायचे आहे त्याच्याशी संदर्भ वाटला नाही तर तसे कृपया सांगावे:
तरी देखील सुरवातीस विज्ञानाच्या अथवा भौतिक जगणाच्या संदर्भात बोलायचे झाले तर उदाहरणे देतो: मेडीसीनमधील डॉक्टर नसलेला कितीही विद्वान असला तरी जेंव्हा त्याला बरे नसते तेंव्हा त्याला त्याच्या डॉक्टरच्या ज्ञानवरच विश्वास ठेवावा लागतो, कारण संशय घेतला तर तोच बळी पडणार असतो! बाकी अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण अनुभुती घेतली नसली तरी केवळ ऐकीव माहीतीवर ग्राह्य धरतो. उ.दा. अणू-रेणू हे काही मी माझ्या डोळ्यांनी पाहीले नाहीत, पण त्यांचे अस्तित्व मी मान्य करतो, वगैरे...
तेंव्हा, सर्व प्रथम ईश्वराच्या बाबतीतील जी काही चर्चा आहे त्यात मला वाटते त्याप्रमाणे दोन भाग सहज होऊ शकतातः एक म्हणजे पारंपारीक कल्पना म्हणजे "देव" या अर्थाने. त्यात हिंदूचे ३३ कोटी, मुसलमानांचा अल्ला, ख्रिश्चनांचा आकाशातला बाप (आणि त्याचा मुलगा) वगैरेंशी संदर्भात होऊ शकेल. तर दुसरे पूर्णपणे तत्वज्ञान आणि अध्यात्माशी संबंधीत होऊ शकेल. पहील्या बाबतीतील चर्चेच्या संदंर्भात आपण जे काही नियम/ग्रूहीतके मांडली ती योग्य वाटतात पण दुसर्या म्हणजे अध्यात्मिक संदर्भात मात्र गोष्ट ही विज्ञानाप्रमाणेच वेगवेगळ्या पायर्यांवर वेगवेगळी ठरू शकणारी वाटू शकते. त्यामुळे त्या विषयात सर्व जाणीवेच्या एकाच पातळीवर समजणे अयोग्य ठरू शकेल. मी केवळ भारतीय आहे म्हणून नाही, केवळ हिंदू आहे म्हणून नाही पण जेंव्हा हिंदू अध्यात्म/तत्वज्ञान म्हणून आपण विचार करू लागतो तेंव्हा ते याचा विचार करताना पूर्णत्वास पोचल्यासारखे मला वाटते. ह्या तत्वज्ञानात मनुष्याचे दोन प्रमुख प्रकाराने फरक सांगीतले आहेत - एक म्हणजे ज्ञानी अथवा अज्ञानी आणि दुसरा म्हणजे प्रकृतीप्रमाणे - सात्वीक, राजसीक आणि तामसीक. ह्या सर्वांच्या पर्म्यूटेशन-काँबिनेशनप्रमाणे प्रत्येकाची समज वेगळी होऊ शकते. उ.दा. चांगदेवासारख्या "आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ समजल्या जाणार्या" महापुरूषाला त्याचे कोरे पत्र पाहून मुक्ताबाईसारखी चिमुरडी "इतकी वर्षे तपस्या करून कोरा तो कोराच" हे म्हणू शकली, आणि पुढे त्याला ज्ञानेश्वरांनी दिलेले उत्तर न समजल्यावर पण त्यांचा अहंकार गळून गेल्यावर स्वतःचे शिष्यत्व देऊ शकली...
विवेकानंदपण नरेंद्र असताना देव शोधत होते. कोणीच समाधानकारक उत्तरे देऊ शकत नव्हते. पण शेवटी त्यांच्याच ब्रिटीश प्राध्यापकाने त्यांना रामकृष्णांकडे पाठवले. बरं हे रामकृष्ण तरी कोण? तर ज्यांनी सर्व धर्मात जाऊन त्यांचा अभ्यास केला आणि मग समाधान कारक उत्तरे फक्त हिंदू तत्वज्ञानातच भरली आहेत असे स्वतःपुरते समजून (इतरांना सांगायला गेले नाहीत की हेच बरोबर!) परत दक्षिणेश्वरास पुजार्याचे काम करत होते. नरेंद्र भेटायला गेल्यावर त्यांचे दोन उद्गार सर्व काही सांगून गेले. पहील्यांदा कधिही ओ़ळख नसलेल्या या मुलास " किती वेळ लावलास?" म्हणून विचारणे आणि त्याने "तुम्ही देव पाहीला आहे का?" या प्रश्नास निर्विवाद छाती ठोकपणे उत्तर देणे की "हो पाहीला आहे, जितके स्पष्ट मी तुला आत्ता पाहत आहे तितकाच स्पष्ट मी पाहीला आहे". अर्थातच नरेंद्रला ते पटले नव्हते आणि त्याने आपल्या ह्या गुरूस स्वत:च्या पद्धतीने तावून सुलाखून काढून मगच गुरू केले....
अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण सांगण्याचे मूळे इतकेच की आपण् आध्यात्मिक ज्ञानाच्या पातळीवर कोठे आहोत, हे समजून गुरूकडून पुढच्या टप्प्यावर जाणे आणि असेच मार्गक्रमण करत राहणे हे आपले तत्वज्ञान आहे. ते रामालापण चुकले नाही आणि काही अंशी कृष्णाला पण चुकले नाही.. ह्या प्रत्येक पातळीवर आपल्यास जी सुरवात करावी लागते ती विश्वासाने, अविश्वासाने नव्हे तसेच श्रद्धेने, अंधश्रद्धेने नव्हे. आणि या भागात - सत्व-रज-तम या तीन मानवी प्रकृतींवर प्रत्येकाची वेगवेगळी वाटचाल होते. त्यासंदर्भात गीतेतील काही श्लोक गीताईच्या रूपात सांगतो:
जसा स्वभाव जो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे
श्रद्धेचा घडला जीव, जशी श्रद्धा तसाची तो || अध्याय १७, श्लोक ३||
अथवा
श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध
ज्ञानाने शिघ्र तो पावे शांती शेवटची मग ||
नसे ज्ञान नसे श्रद्धा, संशयी नासला पुरा
न हा लोक न तो लोक, न पावे सुख संशयी || (अध्याय ४, श्लोक ३८-३९)
थोडक्यात काय जेंव्हा ईश्वर या संकल्पनेची चर्चा होते तेंव्हा त्यात पण अनुभुती आणि ज्ञान या आधारांवर एस एस सी, बॅचलर्स, मास्टर्स आणि पिएचडीज् असतात (हे शब्द शब्दशः घेऊ नयेत!) इतकेच म्हणावेसे वाटते.
संशयवाद
इथेच संशयवादी वेगळ्या नजरेने बघायला लागतो. पण आता खाली बघा.
||
हा सावधपणा श्रद्धेला छेद देतो, मग तिथे संशयवादाच जन्म होत नाही काय?
दुसर्या ओळीत चिकित्सक वृत्तीतून झालेल्या ज्ञानलालसेची शांती तर नव्हे? आता खाली बघा
आता इथे पुन्हा संशयवादी (skeptic) श्रद्धाळू लोकांच्या नजतेतून उतरतो.
मग या दोन्ही टोकांची मोट बांधणारा हा विवेकवादी (Rational) असतो असे श्रद्धाळू म्हणतात. पण असे त्यांनी म्हटले कि त्या विवेकवाद्याला पुन्हा बाकीचे संशयवादी श्रद्धाळू म्हणतात.
प्रकाश घाटपांडे
अप्रत्यक्ष सिद्धांत
अप्रत्यक्ष सिद्धांत - इनडायरेक्ट प्रूफ
ह्या प्रत्येक पातळीवर आपल्यास जी सुरवात करावी लागते ती विश्वासाने, अविश्वासाने नव्हे तसेच श्रद्धेने, अंधश्रद्धेने नव्हे.
विश्वास आणि श्रद्धेने करणे - म्हणजे - असे म्हणणे की, "कदाचीत हे असे असू शकते, पण मला काही शंका येत आहेत त्याचे निरसन केले पाहीजे, प्रश्न विचारले पाहीजेत वगैरे." - सुरवात पॉझीटीव्ह ऍझम्प्शनने बरोबर ठरेल अथवा नाही त्यावर त्या व्यक्तीचा सिद्धांत ( इनडायरेक्ट प्रूफ). पण या वर्तनात समजून घेण्याचा प्रयत्न असतो.
अविश्वासाने म्हणणे म्हणजे, समजून घेयचा प्रयत्न देखील न करता चूक समजून बोलणे आणि आपल्याला जे काही माहीती आहे ते अंतिम सत्य (जो कुठला विषय असेल त्या संदर्भात) मानणे. कधी कधी विषय हे वेगवेगळ्या पातळीवरचे असतात. तत्वज्ञानात तर ते असतातच असे मला वाटते. समोरच्याला जे वाटते ते असू शकते का हे त्याचे म्हणणे समजून घेतल्याशिवाय त्यावर टिका टिपण्णी करणे हा अविश्वास.
अंधश्रद्धेने म्हणजे, "माझा बाबा (बुवा या अर्थाने) म्हणतोय म्हणजे ते खरेच् असणार, किंबहूना तेच खरे बाकी खोटे. मग (असेच काहीतरी तयार केलेले उदाहरण) गीतेत श्रीकृष्ण म्हणाले की, "कोणाचा न करी द्वेष, दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणे सोशी, सुखदु:खे क्षमा बळे" की मी तसेच वागणार, पण लक्षात काय घेयचे नाही की याचा शब्दार्थ पण कृष्णाने कुठे कोणाला आणि काय करण्यास सांगताना सांगीतला आहे, ते. आम्ही जीवनातले युद्ध लढायला न जाता फक्त कोणी पुढारी मेले की त्यांचा सार्वजनीक शोक करण्यासाठी म्हणून गीतापठणाचा उपयोग करणार!
हा सावधपणा श्रद्धेला छेद देतो, मग तिथे संशयवादाच जन्म होत नाही काय?
नाही होत. कारण वर सांगीतलेला फरक. पण संशय आणि सावधपणा यात अगदी पुसटशी सीमारेषा आहे. ते अनुभवाने आणि प्रॅक्टीसनेच कळू शकते की आपण कोणच्या बाजूस आहोत ते.
आता इथे पुन्हा संशयवादी (skeptic) श्रद्धाळू लोकांच्या नजतेतून उतरतो. मग या दोन्ही टोकांची मोट बांधणारा हा विवेकवादी (Rational) असतो असे श्रद्धाळू म्हणतात. पण असे त्यांनी म्हटले कि त्या विवेकवाद्याला पुन्हा बाकीचे संशयवादी श्रद्धाळू म्हणतात.
हे दोन्ही बाजूंनी होण्याचे कारण एकच असते की जेंव्हा फक्त "मीच (किंवा माझे तत्वज्ञानच) बरोबर असे म्हणणे - मग जी कुठली बाजू असेल ती होते तेंव्हा असा संघर्ष होतो.
थोडे अवांतरः हिंदू तत्वज्ञानाच्या बाबतीत (धर्म म्हणला की अर्थ वेगळा होतो) वैशिष्ठ्य असे की हे ते "ऑल्सो" म्हणते तर बाकी इतर धार्मिक तत्वज्ञानांमधे "ओन्ली" असते. पण गंमत अशी आहे की ह्या विशाल/मोकळ्या हिंदू तत्वज्ञानात जे गणंग तयार झाले ते मात्र स्वतःचे "ओन्ली" तयार करतात आणि सगळे लफडे चालू होते... हा हजारो वर्षाचा प्रश्न आहे. थोडक्यात मानवी स्वभाव हे त्याचे मूळ आहे म्हणून तो कुठे जाणार नाही!
अजून थोडे अवांतर (विनोद) जरा उलटे उदाहरण: वरील प्रतिक्रीयेत माझे म्हणणे इतके की मीच खरा असे असू नये. म्हणजे हा "च" प्रॉब्लेम करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस त्याच्या नेत्यांची मागणी होती की "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे" . महाराष्ट्रापेक्षा नेहेरू मोठे असे म्हणणार्या यशवंतराव चव्हाणांनी या नेत्यांना प्रश्न विचारला की इतकी इरीशिरीची भाषा का? झालच पाहीजे असे म्हणायचे कारण काय "च' नसला तर काय बिघडले? अत्र्यांनी तात्काळ उत्तर दिले की "चव्हाणा"ला "च" काढला तर नुसती "व्हाण (वहाण)" राहते हे समजून बोला!
भौतिक पतिसाद
याबद्दल थोडी काळजी वाटली शिवाय मुद्दे लहान असल्यामुळे प्रतिसाद देणे सोपे जाईल. बाकी प्रतिसाद वेगळा देईन.
तुम्ही अपघाताच्या वेळची आपत्कालीन सेवा म्हणत आहात काय? त्यावेळी कदाचीत डॉक्टरावर तडकाफडकी विश्वास ठेवण्याची वेळ येऊ शकेल. लोकशाही देशांत आपत्कालीन दवाखान्यांची चोख देखरेख करण्यास सरकारला भाग पाडण्याची जबाबदारी एक सजग नागरिक म्हणून तुमची-माझी आहे. आज, अपघात होण्यापूर्वी जबाबदारी आहे. म्हणजे त्यावेळी आपण वेळेअभावी "विश्वास" ठेवत असलो, तरी आपला प्रतिनिधी सजग मैत्रीपूर्ण सावधानी राखत असणार.
आपत्काल नसला तर डॉक्टर ही आपली मैत्रीपूर्ण सल्लागार असली पाहिजे. तिने आपल्याला उपलब्ध पर्याय, आणि प्रत्येक पर्यायाचे फायदे/तोटे सांगायला पाहिजे. पैकी एक पर्याय "काहीच केले नाही तर" असा असलाच पाहिजे. शेवटी निर्णय ज्याचे शरीर त्याच्याकडे सोपवायला पाहिजे. तुमच्या अनुभवात असे होत नसेल, तर विकासराव, डॉक्टर बदला! आपत्काल नसूनही पेशंटवर निर्णय लादणे हे डॉक्टरीच्या दृष्टीने अनैतिक आहे.
एखादी गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांनी पहावी लागत नाही. अनुमान आणि उपमानही केले जाऊ शकते. पण तुम्ही इथे ते केले नाहीत असे म्हणूया, कारण तुम्ही ते ऐकीव माहितीवर ग्राह्य धरत आहात, असे म्हणता. "विश्वासू माणसाचा शब्द" हेही प्रमाण मला मान्य आहे, असे मी लेखात लिहिले आहे, शिवाय पुढे "विश्वासू माणूस" कोण ते सांगितले आहे. पण तरी तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला म्हणून मी काहीतरी अर्थ लावून तुम्हाला उत्तर द्यायचा आता प्रयत्न करतो. मुद्द्याचा रोख वेगळा असला तर सांगावे. तुम्ही अणू-रेणू "मानता" म्हणजे नेमके काय विचार करता हे नीट कळत नाही आहे. अणू-रेणू मानल्या न मानल्यामुळे तुम्हाला काही फरक पडतो का? फरक पडत नसला तरी तुम्ही जर अणू-रेणू मानाल तर तो एका रम्य परीकथेतील तुमचा साहित्यिक आनंद आहे. पण फरक पडत असेल म्हणा : उदाहरणार्थ तुमच्या गावात एक रसायन-कारखाना आहे आणि तिथल्या प्रक्रिया ठीक चालल्या नाहीत तर गावावर आपत्ती ओढवेल, किंवा रसायन-कारखान्यात तुम्ही शेअर-समभाग घेतले आहेत आणि तिथल्या प्रक्रिया नीट चालल्या नाहीत तर तुमचा आर्थिक तोटा होईल, वगैरे. मग अणू-रेणू मानल्याने त्या रासायनिक प्रक्रियांविषयी अचूक गणिते मांडता येतात/नाही येत यात तुम्हाला रस आहे. ती गणिते चुकीची निघालीत, रासायनिक प्रक्रिया फसल्या, तर माझ्या मते तुम्ही अणू-रेणू मुळीच मानू नयेत. तरी तुम्ही जर अणू-रेणू मानाल तर तो अंधविश्वास आहे. (इथे तुम्ही स्वतः ती गणिते करत नाहीत असे गृहीत धरले आहे. कारण स्वतः गणिते करत असता तर अनुमानाने अणू-रेणू मानण्यालायक आहेत ते तुम्ही ऐकीव माहितीशिवाय सांगू शकला असता.)
भौतिक, विश्वास, संशय
...तुमच्या अनुभवात असे होत नसेल, तर विकासराव, डॉक्टर बदला! आपत्काल नसूनही पेशंटवर निर्णय लादणे हे डॉक्टरीच्या दृष्टीने अनैतिक आहे.
डॉक्टरसंबंधातील माझे वक्तव्य हे केवळ उदाहरण होते. यात आपण वर उल्लेखलेल्या पद्धतीत मला अनुभव नाही. परंतू माझा सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की आपले भौतिक ज्ञानाचे जे काही विश्व असते त्या मर्यादांच्या बाहेरील गोष्टींवर आपण कुणावर तरी अवलंबून राहतच असतो. जसे डॉक्टरचे तसेच इंजीनियरचे. आता पहा की ४० वर्षे जुना पूल हा वाहनांसाठी "सेफ" आहे असे मिनिसोटामधे सांगीतले होते. ते सांगणारे तज्ञ होते, त्यांनी सर्वप्रकारची गणिते करून त्यांचे निदान केले होते. त्यावरच विश्वास ठेवून सर्व काही चालले होते. मग तरी पण जर पूल पडला तर मग काय ते शास्त्रीय ज्ञान खोटे समजायचे का? आणि या पुढे त्या शास्त्रावर विश्वासच ठेवायचा नाही का? किंवा त्याहूनही अधिक म्हणजे त्यातील ज्ञानी माणसावर संशय घेयचा?
मग अणू-रेणू मानल्याने त्या रासायनिक प्रक्रियांविषयी अचूक गणिते मांडता येतात/नाही येत यात तुम्हाला रस आहे. ती गणिते चुकीची निघालीत, रासायनिक प्रक्रिया फसल्या, तर माझ्या मते तुम्ही अणू-रेणू मुळीच मानू नयेत. तरी तुम्ही जर अणू-रेणू मानाल तर तो अंधविश्वास आहे. (इथे तुम्ही स्वतः ती गणिते करत नाहीत असे गृहीत धरले आहे. कारण स्वतः गणिते करत असता तर अनुमानाने अणू-रेणू मानण्यालायक आहेत ते तुम्ही ऐकीव माहितीशिवाय सांगू शकला असता.)
हे पण मी एक उदाहरण म्हणून दिले होते. की माझ्या सामान्य नजरेला अणू-रेणू दिसत नाहीत. म्हणून शास्त्रज्ञांनी जे गणिते करून आणि यांत्रीक दिव्यचक्षूंनी पाहीले त्यावर विश्वास ठेवणे योग्य आहे. पण तसेच जर कोणी, "अणू-रणीया तोकडा, तुका आकाशा एव्हढा" ऐकून म्हणाला की तुकारामाला पण अणू-रेणू दिसले - पण ते अंतःचक्षूंनी तर त्यात त्याची अंधश्रद्धा होते का? (हा केवळ वादासाठी मुद्दा आहे, तुकारामाला काय दिसले होते हे मला माहीत नाही, त्यावर विचार करत नाही पण त्याच वेळीस "तुका झालासे कळस" या उक्तीमधे उधृत केल्याप्रमाणे तो ज्ञानी असावा असे त्याचे थोडेफार वाचले-ऐकले त्यावरून वाटते, हे ही नक्कीच)
असो. आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मला आपला हा लेख विज्ञानापेक्षा तत्वज्ञानावर (ते ही धार्मीक तत्वज्ञानावर , अध्यात्मिक का ते माहीत नाही) असे वाटले. त्यामुळे त्या अनुषंगाने लिहीले होते/आहे.
मिनेसोटा येथील पूल
होय, ते शास्त्रीय ज्ञान खोटे समजायचे. पण याबाबत तर्कशास्त्र नीट जाणावे. त्या गणितात एक तरी खोट होती, गणितातली प्रत्येक पायरी चुकली होती असे नव्हे. हे संशोधताना चुकलेली पायरी मूलभूत होती असे कळल्यास, ते संपूर्ण ज्ञान खोटे. गणिताची शेवटचीच पायरी चुकली असल्याचे सापडल्यास शेवटचीच पायरी चुकीची.
नाही ठेवायचा. जसेच्या तसे वापरले तर ते शास्त्र कुचकामी आहे ते पडलेल्या पुलाने सिद्धच केले आहे.
एक्स्पर्ट वरती नेहमीच मैत्रीपूर्ण संशय ठेवायचा असतो. मिनेसोटाच्या पुलासारखेच "ट्रस" बांधकामाचे, खूप रहदारी असलेले काही पूल आमच्या मेरीलँड राज्यात आहेत. त्यांच्याविषयी कुचकामी गणिते मांडून केलेले जुने रिपोर्ट बाद केलेच पाहिजेत. गणित ठीक करून नवीन रिपोर्ट मागवलाच पाहिजे.
तुमचा पहिला विचार ठीक होता. हा लेख "फिलॉसॉफी ऑफ सायन्स"= "विज्ञानाचे तत्त्वज्ञान" या विषयावर आहे. विज्ञान आणि धर्म आणि अध्यात्म या सर्वांत "तथ्याचे सम्यक् ज्ञान" हा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही या दिशेने विवेचन केले, पण लेखातील तत्त्वांस/वाक्यांस संबंध जोडून सांगितला, तर ते लेखाच्या विषयाला धरूनच आहे.
व्याख्याने उपलब्ध
२००५ मध्ये आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल टिचिंग कंपनीने आइनस्टाइन आणि सापेक्षता सिद्धांत यावर दोन व्याख्याने मोफत उपलब्ध केली आहेत. या विषयात रस असणार्यांना याचा लाभ घेता येईल.
(पानावर ही व्याख्याने ३१ डिसेंबर २००५ पर्यंतच उपलब्ध आहेत असे लिहीले आहे, पण ती अजूनही चालू आहेत. :) )
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre