नोबेल शांतता पुरस्कार्
मिळणार, मिळणार असे ऐकता ऐकता, आज अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष ऍल गोर यांना नोबेलशांतता पुरस्कार जाहीर झाला.
त्याच बरोबर इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत येत असलेल्या जगभरच्या सुमारे ३००० शास्त्रज्ञांच्या संघटनेला देखील हे बक्षीस देण्यात आले आहे. भारतीय म्हणून आनंदाची गोष्ट ही की या संघटनेचे प्रमुख डॉ. राजेंद्र पचौरी हे आहेत. याच शास्त्रज्ञांच्या मधील टिमने या वर्षी जाहीर केलेल्या मोठ्या अहवालाप्रमाणे , "पर्यावरण बदल" ही एक निव्वळ शक्यता आहे असे न उरता ती एक वस्तुस्थिती झाली आहे.
दरवर्षी दिले जाणारे हे पारीतोषिक हे बर्याचदा राजकारण असते. उदाहरणार्थः हेन्री किसिंजर सारखा अमेरिकेचा व्हिएटनामच्या युद्धाच्या वेळचा सेक्रेटरी ऑफ स्टेट, यासर यासर अराफत आणि इस्रायलचे शिमॉन पेरीस, ही पटकन आठवू शकणारी ठळक उदाहरणे. मला व्यक्तिगत मदर तेरेसांना मिळालेल्या पारितोषिकात पण राजकारण दिसते.
मात्र गेल्या वर्षी हेच पारीतोषीक सर्वात प्रथम वेगळ्याच माणसाला मिळाले त्याचे नाव आहे: महंमद युनुस. हे वर्ल्डबँकेतील "बँकर" आणि इकॉनॉमिस्ट. स्वतःच्या देशात - बांग्लादेशात ७२-७३ च्या दुष्काळानंतर त्यांनी मायक्रोफायनान्स (बचतगट?) हा प्रकार चालू केला. त्यातून "ग्रामीण बँक" निघाली. आज हा एक मोठा उद्योग झाला असून त्यामुळे अनेक गरीबांना स्वतःच्या पायावर उभे राहायची संधी मिळाली आहे. त्यांचे बोलणे ऐकले आहे आणि निदान त्यावरून तरी निगर्वी माणूस वाटला होता.
या वेळचे पारीतोषीक हे मी सकाळी जेंव्हा आधी गोर यांचे नाव वाचले तेंव्हा पण आधी राजकीयच वाटले. पण जेंव्हा त्यांना आणि आयपीसीसीला विभागून दिल्याचे लक्षात आले तेंव्हा त्यात राजकीय हेतू कमी असल्यासारखे वाटले.
रिडीफ मधील बातमीत दिसणारा डॉ. पचौरींच्या हावभावातील आनंद हा जितका शास्त्रज्ञ आणि गैरराजकीय व्यक्ती म्हणून समजण्यासारखा आहे तितकेच बक्षिस मिळाल्याचे समजल्यावर, गोर यांनी (निदान) आत्ता पर्यंत दाखवलेला संयम हा राजकीय व्यक्तीसाठी विरळा वाटेल असा आहे. २००० च्या निवडणूकीत शेवटी पराभव स्विकारताना स्वतःचे दु:ख लपवू न शकणारा हा माणूस नंतर मात्र त्या पराभवाच्या भकासपणातून स्वतःला सावरून बाहेर आला आणि पर्यावरण बदल हा स्वतःच्या आधीपासून च्या आवडीच्या विषयावर नजर वळवली (त्यांनी या विषयावर उपराष्ट्राध्यक्ष होण्या आधीपण पुस्तक लिहीले होते). नंतर त्यावरच माहीतीपट काढला आणि शिवाय "करंट टिव्ही" म्हणून पण नवीन वाहीनी चालू केली - माहीतीपटाला ऑस्कर तर वाहीनीस एमी ही दोन्ही क्षेत्रातील (अमेरिएकेतील) सर्वोच्च बक्षिसे मिळाली. त्यांचे सर्व विचार कदाचीत जसेच्या तसे पटणार नाहीत पण विशेष करून गेल्या सात वर्षातील त्यां्ची जिद्द ही पहाण्यासारखी आहे इतके मात्र नक्की वाटते.
बाकी हा सर्व नजीकचा अमेरिकन भूतकाळ बघताना आता वाटते की २००० साल हे गोरना, गोर यांच्या सार्वजानीक यशासंदर्भात आणि स्वत:च्या अपयशासंदर्भात २००७ हे बुशना आणि बुश यांची राजवट ही समस्त अमेरिकेला आणि काही अंशी उर्वरीत जगाला एक "इनक्नव्हीनियंट ट्रूथ" ठरली आहे.
Comments
यावेळचे नोबेल
हो, आपण म्हणता तसे यावेळच्या नोबेल पारितोषिकांमध्ये राजकारण कमी वाटते आहे. तसेच मणुष्य सेवेच्या पुढे जाऊन (पर्यावरणाच्या माध्यमातून) समस्त वसुधेची सेवा करणार्यांना नोबेल दिले गेल्याने निश्चितच हर्ष वाटतो आहे.
मिळणार, मिळणार असे ऐकता ऐकता
-- हे नोबेल देणारी समिती सगळी नावे गुप्त ठेवते असे म्हणतात. मग यावेळी ही बातमी अगोदरच बाहेर कशी आली हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
मला व्यक्तिगत मदर तेरेसांना मिळालेल्या पारितोषिकात पण राजकारण दिसते.
-- अगदी खरे. मदर तेरेसांपेक्षा जास्त भरीव कामे केलेले समाजधुरीन वगळून त्यांचेच नाव कसे समोर आले? खरे तर मदर तेरेसांचे समाजकार्य हे सरसकट गरजूंसाठी नव्हते/नाही. गरजू लोक त्यांच्याकडे गेली आणि अमिष दाखवून धर्मांतराचे प्रयत्न झाले नाहीत असे होत नव्हते/नाही.
खरे तर महात्मा गांधींचे नाव नोबेल विजेत्यांत नसल्याने नोबेल पुरस्कारच तसे दुबळे वाटतात.
आपला,
(पर्यावरण-प्रेमी) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥
हम्म
प्रत्येक पुरस्काराच्या निवडीमध्ये कधीतरी राजकारण असतेच. तरीही या निवडीत राजकीय हेतू कमी वाटतो याच्याशी सहमत आहे.
अवांतर : अल गोर राष्ट्राध्यक्ष झाले नाहीत हे अमेरिकेचे (आणि जगाचे) दुर्दैव म्हणायला हवे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
अवांतर :
अवांतर : अल गोर राष्ट्राध्यक्ष झाले नाहीत हे अमेरिकेचे (आणि जगाचे) दुर्दैव म्हणायला हवे.
सर्व प्रतिसादांना धन्यवाद. वरील प्रतिक्रीयेबाबत एक म्हणावेसे वाटते: जर-तर ची गोष्ट असली तरी आणि गोर साहेबांबद्दल मला आदर असला तरी म्हणावेसे वाटते की ते जर राष्ट्राध्यक्ष झाले असते तर ते भारताच्या नजीकच्या - (शॉर्ट टर्म) फायद्याचे झाले नसते, असे कुठेतरी वाटते.
खूप आनंद झाला !
केशव
पर्यावरणासाठी काम करणार्या , ग्लोबल वॉर्मींग ह्या अत्यंत निकडीच्या आणि चिंतनिय विषयाला वाहून घेतलेल्या एका माणसाला ह्या वर्षाचे शांततेचे नोबेल पारीतोषीक मिळाल्याने ह्या गोष्टीकडे जग आता तरी गांभिर्याने पाहील असे समजायला हरकत नाही.
या पारीतोषीकाने आनंद झाला.
असेच
असेच मलाही वाटते. समयोचित सुंदर लेख !
मान्य
रिडीफ मधील बातमीत दिसणारा डॉ. पचौरींच्या हावभावातील आनंद ...गोर यांनी (निदान) आत्ता पर्यंत दाखवलेला संयम हा राजकीय व्यक्तीसाठी विरळा वाटेल असा आहे. २००० च्या निवडणूकीत ...स्वतःला सावरून बाहेर आला आणि पर्यावरण बदल हा स्वतःच्या आधीपासून च्या आवडीच्या विषयावर नजर वळवली (त्यांनी या विषयावर उपराष्ट्राध्यक्ष होण्या आधीपण......पण विशेष करून गेल्या सात वर्षातील त्यां्ची जिद्द ही पहाण्यासारखी आहे इतके मात्र नक्की वाटते.
पूर्ण सहमत. ऍल गोर यांनी ह्या विषयावर (अवेरनेस) नक्कीच खूप मोठे काम केले आहे. प्रसारमाध्यमांनी देखील चक्क प्रसिद्धी देण्यात आखडता हात न घेता, हा विषय येऊ दिला. कितीतरी लोकांनी याविषयावर काम केले पण तेवढे फूटेज नाही मिळाले. (भारतात कदाचित शाहरूक/यश-राज फिल्मस्, बालाजी टेलेव्हीजन, बच्चन, तेंडूलकर यांनी ते काम तितक्याच मेहनीतीने केले. तरच कदाचित लोकांना समज येईल)
>>जेंव्हा त्यांना आणि आयपीसीसीला विभागून दिल्याचे लक्षात आले तेंव्हा त्यात राजकीय हेतू कमी असल्यासारखे वाटले.
नक्कीच तसे वाटते.
बाकी अल गोर यांच्या (डेमोक्रटस्) निवडीने भारताचा फायदा कि तोटा...जोवर दुसर्यांकडून होणार्या फायद्यावरच भारत विसंबून रहाणार असेल तर वाट बघा होतोय महासत्ता (शिवाय बुश सत्तेत असल्याचा कितपत फायदा करून घेतोय बघतोच आहोत :-))..आपल्या हातात आहे त्या गोष्टी केल्या तरि बराच पल्ला मारता येईल.
मुद्याची गोष्ट!
बाकी अल गोर यांच्या (डेमोक्रटस्) निवडीने भारताचा फायदा कि तोटा...जोवर दुसर्यांकडून होणार्या फायद्यावरच भारत विसंबून रहाणार असेल तर वाट बघा होतोय महासत्ता (शिवाय बुश सत्तेत असल्याचा कितपत फायदा करून घेतोय बघतोच आहोत :-))..आपल्या हातात आहे त्या गोष्टी केल्या तरि बराच पल्ला मारता येईल.
एकदम मुद्याची गोष्ट बोललात! पण भारताचा फायदा/तोटा हा मी केवळ व्यापारी कारणांवरून म्हणत होतो. आपल्या महासत्ता होण्याच्या स्वप्नासंदर्भात नाही. गोर हे एकतर डेमोक्रॅट आहेत आणि दुसरे म्हणजे पर्यावरणवादी. परीणामी त्यांनी स्वतःच्या देशातील कामे वाचवायचा जास्त प्रयत्न केला असता आणि बाहेर कामे देत असताना त्याबद्दल कामगार कायदा सुधारणा, पर्यावरण सुधारणा इत्यादी अटी तयार करण्याचा (निदान) प्रयत्न केला असता. अर्थात होणारा तोटा हा अमेरिकन सरकारची कंत्राटे मिळण्यापुरताच मर्यादीत झाला असता हे ही सत्य आहे.