गुरुत्वाकर्षणाची ग्रॅव्हिटी

ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींना आपण 'टेकन फॉर ग्रँटेड' घेतो त्यापैकी गुरुत्त्वाकर्षण एक आहे. गुरुत्वाकर्षणाला असे टेकन फॉर ग्रँटेड घेतले जाण्याला दोन प्रमुख कारणे आहेत, पहिले असे की गुरुत्वाकर्षण नेहमीच 'असते' आणि दुसरे म्हणजे त्यात बदल होत नाही. पण जर का या गुरुत्वाकर्षणात काही कारणाने बदल झाला तर अनेक दुर्धर परिणाम होतील कारण बर्‍याच गोष्टी सध्याच्या गुरुत्वाकर्षणाला गृहित धरून 'डिजाइन' केल्या आहेत.

गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या गोष्टीमधील आकर्षण. दोन क्रिकेटचे चेंडू एका टेबलावर जवळजवळ ठेवले तर ते दोन्ही चेंडू एकमेकांना खेचत असतात फक्त चेंडूचे वस्तुमान कमी असल्याने (म्हणजे पृथ्वी वगैरेच्या तुलनेत) हे खेचण्याचे बल अतिशय कमी असते. त्यामुळे ढोबळमानाने आपण असे म्हणू शकतो की पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बदलत नाही कारण पृथ्वीचे वस्तुमान बदलत नाही. त्यामुळे गुरुत्वाकर्षणात जाणवण्याइतपत बदल होण्यासाठी पृथ्वीच्या वस्तुमानात मोठा बदल व्हावा लागेल.

गुरुत्वाकर्षण नाहीसे झाले तर?

गुरुत्वाकर्षण नाहीसे होण्याची शक्यता कितीही कमी असली तरी जर कदाचित गुरुत्वाकर्षण नाहीसे झाले तर काय होईल? जे काही होईल ते निश्चितच चांगले असणार नाही. बर्‍याच वस्तू 'खाली' राहण्यासाठी गुरुत्वाकर्षण जबाबदार असते; गाड्या, माणसे, सामान, टेबल-खुर्च्या, कागद, पेन इ. इ. अनेक. कोणतीही वस्तू जी खाली चिकटवलेली नाही आहे; अचानक तिला खाली राहण्याचे काहीच कारण उरणार नाही. टेबल, खुर्च्या इ. या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टींना गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीशी बांधून ठेवले आहे, हवा आणि पाणी! गुरुत्वाकर्षण नसेल तर वातावरणातील हवेला पृथ्वीभोवती घुटमळत राहण्याचे काही कारण उरणार नाही आणि ती अवकाशात विरून जाईल. याच कारणाने चंद्राभोवती वातावरण नाही कारण वातावरणाला धरून ठेवण्याइतपत गुरुत्वाकर्षण नाही. वातावरणाशिवाय सजीव जगू शकणार नाहीत आणि वातावरण नसेल तर पृथ्वीवरील पाण्याचीही वाफ होऊन ते अंतराळात विरून जाईल. थोडक्यात गुरुत्वाकर्षण नाहीसे झाले तर फार काळ जगता येण्याची शक्यता अगदीच धूसर आहे.

गुरुत्वाकर्षण दुप्पट झाले तर?

गुरुत्वाकर्षणाची शक्ती जर अचानक दुप्पट तीव्र झाली तर ही अवस्थाही फारशी चांगली असणार नाही कारण प्रत्येक वस्तू आता आहे त्यापेक्षा दुप्पट जड होईल. इमारती, घरे, पूल, टेबल-खुर्च्यांचे पाय 'नॉर्मल' गुरुत्वाकर्षणाला अनुसरून तयार केलेले असतात. यांच्यावरील वजन दुप्पट केले तर यातील बहुसंख्य मोडून पडतील. झाडांवर, रोपांवर परिणाम होईल. वीज वाहून नेणार्‍या तारांवर परिणाम होईल. हवेचा दाब दुप्पट झाल्याने हवामानातही बदल होईल.

गुरुत्वाकर्षण आपल्या विश्वाचा किती महत्त्वाचा भाग आहे पाहा. गुरुत्वाकर्षणाशिवाय आपले जगणे अशक्यप्राय आहे आणि यात होणार्‍या कोणत्याही बदलाचा संपूर्ण मानवजातीवर आणि तिच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकेल.

http://science.howstuffworks.com/what-if-zero-gravity.htm या लेखाचा स्वैर अनुवाद.


१ - "टेकन फॉर ग्रँटेड घेणे' हा बोलीभाषेत चालून जाणारा वाक्प्रचार

गुरुत्वाकर्षण नाहीसे झाले किंवा दुप्पट झाले तर या लेखात उल्लेखलेल्या परिणामांशिवाय काय काय परिणाम होऊ शकतील?
यानिमित्ताने गुरुत्वाकर्षणाविषयी कोणतीही विशेष माहिती तुमच्याकडे असेल तर द्यावी.

Comments

औट-ऑफ-द्-बॉक्स शक्यता

> गुरुत्वाकर्षण नाहीसे झाले किंवा दुप्पट झाले तर या लेखात उल्लेखलेल्या परिणामांशिवाय काय काय परिणाम होऊ शकतील?

यामध्ये वाइल्ड, औट-ऑफ-द्-बॉक्स शक्यता दिल्या तरी चालतील ;)

सुपरम्यान

गुरुत्वाकर्षण नाहीसे किंवा कमी झाले तर आपण सुपरम्यान (म्हणजे मी सुप्परवुमन) होऊ. ;-)

लेख आवडला. असे छोटेखानी पण माहितीपूर्ण लेख आवडतात, मुलांनाही सहज वाचून दाखवण्यासारखे आहेत.

छान लेख

मुलांना वाचून दाखवण्यासारखा +१.

(तात्त्विक दृष्टीने बघितल्यास वस्तुमान आणि गुरुत्वाकर्षणाचा संबंध पटण्यासारखा नाही, फारच "जादूचा" आहे. वस्तुमान/गुरुत्व हे कुठल्या वस्तूला अंतर्गत असते, आणि गुरुत्वाकर्षण बाहेर असते असे मानल्यामुळे ही "जादू" उद्भवते. सामान्य सापेक्षतासिद्धांतामुळे ही जादू मानावी लागत नाही. त्यात वस्तुमान=गुरुत्व=वस्तू आजूबाजूची भूमिती बदलण्याचे प्रमाण. त्या विचारसरणीत "गुरुत्वाकर्षण नाहिसे झाले तर..."="भूमिती नाहिशी झाली तर..." वगैरे विचार उद्भवूच शकत नाहीत. या दिशेने हा लेख गेला नाही, तरी तो फार चांगला आहे. येथे आपल्याला जाणीव होते की कुठलीच महत्त्वाची गोष्ट "टेकन फॉर ग्रँटेड" घेऊ नये. अशाच विचारांचा पुढचा टप्पा म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या या विशिष्ट चौकटीला धुडकावणे.)

धन्यवाद, आणखी लिहा

धन्यवाद धनंजय. सापेक्षतावाद (कॉलेजात शिकूनही किंवा कदाचित कॉलेजात असल्यामुळेच) काही मूलभूत गोष्टी वगळता कळत नाही :प
कृपया यावर अधिक लिहावे, लेख किंवा लेखमालिका. अर्थात वेळेच्या उपलब्धतेनुसारच.

बालों को सवारे सनसिल्क!

गुरूत्वाकर्षण नसताना सनसिल्क कसा वापरायचा? इथे पहा :-)
माझ्या अंदाजाने बाई शेवटी पाण्याची बाटली वापरतात. कृपया महिला उपक्रमींनी मार्गदर्शन करावे. :p

नंदनबाबूंच्या म्हणण्यानुसार चित्रफीत बघताना ब्याकग्राउंडला हे गाणे ऐकावे.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

का बरे?

"गाड्या, माणसे, सामान, टेबल-खुर्च्या, कागद, पेन इ. इ. अनेक. कोणतीही वस्तू जी खाली चिकटवलेली नाही आहे; अचानक तिला खाली राहण्याचे काहीच कारण उरणार नाही."
हे वाक्य पटायला जरा "जड" जाते आहे. खाली राहण्याचे जसे कारण नाही तसेच खाली राहण्याचेदेखील कारण दिसत नाही, मग न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणे या सर्व वस्तू आहेत तिथेच/तशाच राहणार नाहीत का?
(हे आपले अक्याडेमिक् आर्ग्युमेंट हं, बाकी लेख चागलाच आहे.)

- दिगम्भा

बरोबर!, शंका

> खाली राहण्याचे जसे कारण नाही तसेच खाली न राहण्याचेदेखील कारण दिसत नाही

अगदी बरोबर! पण कोणत्याही कारणाने 'वर' गेली की आपोआप 'खाली' येणार नाही.
एक मूर्ख शंका : पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने सेंट्रिफ्यूगल फोर्सने सगळ्याच 'न चिकटवलेल्या' गोष्टी अंतराळात जातील का?

शंका समाधान

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने सेंट्रिफ्यूगल फोर्सने सगळ्याच 'न चिकटवलेल्या' गोष्टी अंतराळात जातील का?

पृथ्वीच्या भ्रमणामुळे वस्तूवर कार्यरत असलेला सेंट्रिफ्युगल फोर्स हा वस्तूच्या वजनाच्या (म्हणजे वस्तूवरील गुरुत्वीय बलाच्या) ०.३ टक्के एवढाच असतो हे गणिताने दाखवता येते. हे किती कमी असते त्याची कल्पना खालील उदाहरणावरून येईल. १०० किलोग्राम् वजन असणार्‍या वस्तूवर सें. फो. ३०० ग्राम वजनाएवढा असतो.

काल्पनिक बल?

महाविद्यालयात असे शिकल्याचे आठवते की तो तथाकथित सेंट्रिफ्यूगल् फोर्स् (केंद्रप्रतिसारी बल?) हा काल्पनिक असतो व फक्त सेंट्रिपीटल् फोर्स् हाच खरा असतो.
सेंफ्यूफो च्या स्वरूपात जे आपल्याला जाणवते ते फक्त स्पर्शरेषीय गतीला झालेला विरोध असतो असे वाटते. पण फंडाझ् ही गोष्ट (सन्माननीय अपवाद वगळता) सगळ्यांचीच अस्पष्ट असते हे मान्य करतो.
तेव्हा ज्यांचे फंडाझ् सुस्पष्ट असतील त्यांनी खरी परिस्थिती समजावून सांगावी.

- दिगम्भा

काल्पनिक बल

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. दिगम्भा लिहितातः"महाविद्यालयात असे शिकल्याचे आठवते की तो तथाकथित सेंट्रिफ्यूगल् फोर्स् (केंद्रप्रतिसारी बल?) हा काल्पनिक असतो व फक्त सेंट्रिपीटल् फोर्स् हाच खरा असतो."
सेंट्रिफ्यूगल फोर्सच्या तत्त्वाचे हे अगदी यथायोग्य आकलन आहे. ज्या प्राध्यापकांनी हे शिकविले त्यांना, तसेच हे स्मरणात ठेवणारे श्री. दिगम्भा यांना आदरपूर्वक प्रणाम. सेंट्रिफ्यूगल फोर्स हा स्यूडो ( खोटा, काल्पनिक) फोर्स आहे हे भल्याभल्यांना पटत नाही. कायनेटिक्स ऑफ कर्विलीनिअर मोशन या भागावरील प्रश्न सोडवताना या काल्पनिक बलाचा उपयोग होतो. तिथे याला डी. अलेंबर्ट बल असेही म्हणतात.
सेंट्रिपेटल (केंद्रगामी ) बल प्रत्यक्षात असते. त्याविना वक्ररेषीय गती असंभव होय.

कल्पनिक बल

सें.फ्यु. फोर्स् हा स्यूडो फोर्स् असला तरी त्याची राशी (magnitude) सें.पी. फोर्स् एवढीच असते. मला वाटतं Normal Reaction हाही एक असाच स्यूडोफोर्स् आहे ज्यामुळे टेबलावर ठेवलेल्या वस्तूवर गुरुत्वीय बल कार्यरत असूनही ती टेबलाचा पृष्ठभाग फोडून खाली पडत नाही. बरोबर आहे का?

बरोबर नाही

खाली बघावे.

गोल फिरणार्‍या वस्तूच्या मार्गाच्या वक्रत्वाकडे (सोयीसाठी) दुर्लक्ष केले, तर सेंट्रिफ्युगल बल हे सेंट्रिपीटल बलाइतकेच खरे. (हे गणित द्विमिती आहे. या विचारप्रवाहात ते स्यूडो बलही नाही.)
(वेगळ्या सोयीसाठी) वक्रत्वाकडे दुर्लक्ष न केल्यास, सेंट्रिफ्युगल फोर्स अस्तित्वातच नाही (म्हणजे त्याची राशी ० आहे, असे म्हटले तरी चालेल. हे गणित त्रिमिती आहे).
वरील दोन विचारप्रवाहांत बलाची वेगवेगळी राशी दिसल्यास एखाद्या बलाला स्यूडो-बल म्हणण्याचा प्रघात असावा.

टेबलावर ठेवलेल्या (टेबल न फोडणार्‍या) वस्तूवरचा रिऍक्शन बल हे स्युडो बल नसते. ते सामान्य ओळखीतले विद्युच्चुंबकीय* (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) बल असते.

*वस्तू टेबल फोडून खाली पडत नाही कारण टेबल "टणक" असते. "टणक" म्हणजे त्यातील अणुरेणू एकमेकांना घट्ट धरून राहातात (विद्युच्चुंबकीय बलाने) आणि दुसर्‍या कुठल्याही अणुरेणूंना आपल्या कक्षेत येऊ देत नाहीत (विद्युच्चुंबकीय बलाने). [पुढील प्रतिसादाच्या निमित्ताने स्पष्टीकरण.]

नॉर्मल रीऍक्शन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. शरद कोर्डे लिहितात :"सें.फ्यु. फोर्स् हा स्यूडो फोर्स् असला तरी त्याची राशी (magnitude) सें.पी. फोर्स् एवढीच असते "

हे बरोबर आहे. मात्र : ''मला वाटतं Normal Reaction हाही एक असाच स्यूडोफोर्स् आहे" हे बरोबर नाही. नॉर्मल रीऍक्शन हा खराखुरा भौतिक (फिजिकल) फोर्स आहे. हा फोर्स टेबलावरील वस्तूवर ऊर्ध्व दिशेने (व्हर्टिकली अप) कार्यरत असतो. हे बल (फोर्स) आणि वस्तूला खाली ओढणारे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल ही ई॑क्वल, अपोझिट, कोलीनिअर बले वस्तूला स्थिर (इक्विलिब्रियम मधे)ठेवतात.
नॉर्मल रीऍक्शन हे विद्युत्चुंबकीय बल नव्हे.
२/ सेंट्रिफ्यूगल फोर्स (सी.एफ्.) हा स्यूडो फोर्सच आहे. ही संकल्पना कायनेटिक्स
ऑफ कर्व्हिलीनियर मोशन या विभागात येते. सी.एफ्. चा मॅग्निट्युड सी.पी एवढाच मानतात. (सी. पी.=MxV**2/R ...R=त्रिज्या). सरळ रेषीय मार्ग असेल तर R-->infinity.so C.P.=0.
३/मी नम्रपणे सांगू इच्छितो की या विषयाचे मला सम्यक आकलन आहे. मात्र पृथीच्या पृष्ठभागावर आणि जवळच्या आसमंतात फिरणार्‍या वस्तूंचे डायनॅमिक्स इथे अभिप्रेत आहे. तसेच त्यांची गती प्रकाशाच्या गतीच्या तुलनेत नगण्य आहे.

गुरुत्वाकर्षण आणि सेंट्रिफ्यूगल बले एकाच प्रकारे काल्पनिक

वक्ररेषेत वस्तूचे मार्गक्रमण दिसता आपण कुठलेसे "बल" अशी कल्पना करतो. वस्तूच्या मार्गाची रेषा "वक्र" आहे की "सरळ" हे बघणार्‍याच्या सापेक्ष असते. बघणारा क्रमांक १ जर "वक्र" रेषेत प्रवास करत असेल (क्रमांक २च्या बघणार्‍याच्या सापेक्ष), तर सरळ रेषेत जाणारी वस्तू ("सरळ" बघणारा क्र २च्या सापेक्ष), हिच्यावर कुठलेसे बल कार्यरत आहे, असे बघणारा क्र १ ला कल्पावे लागते. (येथे कुठलाही वेग प्रकाशाच्या वेगाजवळचा मानण्याची आवश्यकता नाही. हळू वेगही चालेल. क्र १ बघणारा वक्र प्रवास करताना स्वतःला कुठल्याही प्रकारची मितीची संदर्भचौकट [frame of reference] मानूच कसा शकतो? घर्षणामुळे. म्हणून आपण पृथ्वीबरोबर हजारो किलोमीटर ताशी वक्ररेषेत उडत असलो तरी स्वतःच्या डोळ्यांना बर्‍यापैकी स्थिर मानतो.)

मुळात कुठली रेषा सरळ/वक्र आहे, ही भूमितीची बाब आहे, आणि यूक्लिडच्या भूमितीची काही गृहीतके पटण्यासारखी नाहीत. त्यामुळे यूक्लिडच्या मते "वक्र" रेषेत मार्गक्रमण करणार्‍या वस्तूबाबत आपण कुठलेसे बल कल्पू लागलो, तर ती कल्पना अनावश्यक ठरते. भौमितिक गृहीतक सुधारले तर ते बल कल्पण्याची गरज पडतच नाही. कारण ती रेषा मुळी वक्र नाही असे आपल्या लक्षात येते.

या सर्व कल्पना विवक्षित कामाकरिता, प्रसंगाकरिता गणिताच्या सोयीसाठी असतात. त्या कल्पितच असतात, म्हणून काही त्या टाकाऊ नसतात.

१. पृथ्वीवरच्या बघणार्‍याला, जर पृथ्वीचे मार्गक्रमण जवळजवळ सरळरेषेत आहे असे मानणे सोयीचे असेल (रेषेची गोलाई इतकी थोडी वक्र आहे, ती एक-दोन दिवसात मोजणे गैरसोयीचे आहे), तर पृथ्वी-सूर्याच्या बाबतीत दोन बले कल्पावी लागतील (अ) "सेंट्रिपीटल" गुरुत्वाकर्षण (आ) सेंट्रिफ्यूगल बल. दोन्ही तितकीच कल्पित, तितकीच खरी बले.
२. सूर्यावर स्थित बघणार्‍याला पृत्वीचे मार्गक्रमण यूक्लिडच्या भूमितीप्रमाणे वक्र असल्याचे जाणवेल, त्याला त्या वक्रत्वाचा हिशोब लावण्यासाठी एक बल कल्पावे लागेल, (अ) सेंट्रिपिटल गुरुत्वाकर्षण. ते जितके कल्पित, तितकेच खरे. पृथ्वीबाबत दुसरे कुठले बल कल्पिण्याची आवश्यकता नाही.
३. स्पेस-टाईमची बिगर-युक्लिडीय गृहीतके मानल्यास कुठूनही पृथ्वीच्या मार्गक्रमणाची रेषा सरळ आहे असे जाणवेल. कुठलेच बल कल्पिण्याची आवश्यकता नाही. तर्कशास्त्राच्या दृष्टीने हेच सर्वात लाघवाचे.

आता तुम्ही स्वतःला परिच्छेद २ मधला बघणारा मानले, तर परिच्छेद १ मधल्या बघणार्‍याला निव्वळ कल्पित बले मानणारा म्हणून हिणवू शकता, हे खरे. तसेच परिच्छेद ३ मधून इतक दोघांना हिणवू शकू. पण तसे करण्यापूर्वी कोणाची काय सोय याकडे लक्ष दिल्यास बरे.

सारांश :
मोटारसायकल चालकाने स्वतःच्या सोयीसाठी सेंट्रिफ्यूगल बल मानण्यास, त्याप्रकारे गणिते सोडवण्यास, मोटरसायकल वळवताना आतल्या बाजुला झुकण्यास काहीही हरकत नाही. जर सेंट्रिफ्यूगल बल मानून मोटारसायकल चालवली, आणि लुढकून पडण्यापासून वाचली, तर ते सेंट्रिफ्यूगल बल "निव्वळ कल्पित" म्हणून हिणवणे गैरसोयीचे आहे.*

*मोटारसायकल किती कलावी हे गणित करताना सी.एफ्. मानला तर गणित द्विमितीत सहज करता येते ("वर-खाली" आणि "आत-बाहेर" या दोन मिती). हे सोपे समीकरण यनावालांनी वर दिलेले आहे. सी.एफ्. मानला नाही तर ते गणित त्रिमितीत करावे लागते ("वर-खाली" "उत्तर-दक्षिण" आणि "पूर्व-पश्चिम" या तीन मिती), आणि आकडेमोड थोडी कठिण जाते. याचे समीकरण लिहायचा जरूर प्रयत्न करावा, म्हणजे त्याचा तुलनेने पसारा जाणवेल.

येथे सापेक्षता सिद्धांत (प्रकाशाचा वेग) वगैरे वापरलेला नाही. द्विमितीत हा फोर्स स्यूडो का मानावा? त्याचे परिणाम तर स्पष्ट दिसून येतात. त्रिमितीत अर्थात तो स्यूडो आहे, पण त्रिमितीतले काही फोर्स चतुर्मितीत स्यूडो आहेत (प्रमुख उदाहरण - गुरुत्वाकर्षण). तरी सामान्य गणिते जोपर्यंत सोपी आहेत तोवर त्रिमितीत गुरुत्वाकर्षण "खरे" मानण्यास काहीच हरकत नाही - प्रकाशाच्या वेगापेक्षा खूप हळू, वगैरे प्रसंगी. तसेच गणिते जोपर्यंत सोपी आहेत, तोपर्यंत द्विमितीत सी.एफ्. "खरा" मानण्यास काहीच हरकत नाही.

"त्रिमिती हीच खरी" असा विचार सोयीचा नाही (कारण मग द्विमितीतली सोपी गणिते आपण सोडवण्यास नकार देऊ), आणि इष्टही नाही (कारण चतुर्मितीत आपल्या त्रिमिती कल्पना "स्यूडो" आहे असे कळले की मनाला पटत नाही).

सेंट्रिफ्यूगल् फोर्स् ची उचलबांगडी

अलिकड्च्या भौतिक शास्त्राच्या पुस्तकामधून सेंट्रिफ्यूगल् फोर्स् पार गायब झाला आहे. पण त्यामुळे उपग्रहातील वजनरहित अवस्था सोप्या शब्दात कशी पटवून द्यायची असा प्रश्न पडतो. सेंट्रिपेटल फ़ोर्स गुरुत्त्वाकर्शणामुळे यानाला कक्षेत ठेवतो. यान व आतील माणसे सतत एकाच त्वरणाने ’पडत’ असतात. त्यामुळे माणसे तरंगत राहतात. हे उत्तर भौतिक शास्त्राच्या विद्यार्थ्याला कळेल पण कॉमन माणसाला कसे शिकवणार?
जडत्त्वाची कल्पना वापरून हे स्पष्ट करता येइल का? चांगले उत्तर असल्यास कळवा
गौरी दाभोळकर

:)

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने सेंट्रिफ्यूगल फोर्सने सगळ्याच 'न चिकटवलेल्या' गोष्टी अंतराळात जातील का?

गुरुत्वाकर्षण नष्ट झाल्यावर पृथ्वी फिरेल का? (स्वतःभोवतीही आणि सूर्याभोवतीही) का ब्रेक लागल्याप्रमाणे अचानक थांबेल आणि मग बघायलाच नको.. कारण नंतर काय होईल हे सांगणार कोणाला?

बाकी लेख आवडला.. :)

-ऋषिकेश

ब्रेक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. ॠषीकेश लिहितात : "गुरुत्वाकर्षण नष्ट झाल्यावर पृथ्वी फिरेल का? (स्वतःभोवतीही आणि सूर्याभोवतीही) का ब्रेक लागल्याप्रमाणे अचानक थांबेल आणि मग बघायलाच नको.. कारण नंतर काय होईल हे सांगणार कोणाला?"

पृथ्वी सूर्या भोवती फिरणार नाही. स्पर्शरेषेच्या दिशेने सरळ अनंत अवकाशात जात राहील. मात्र स्वतःभोवती फिरत राहील. या विषयी कोणताताही संदेह नसावा.

शिवाय तिचे घटक इतस्ततः विखुरतील

गुरुत्वाकर्षणाशिवाय फिरणारी पृथ्वी एकसंध राहाणार नाही. तिचे वेगवेगळे घटक (सध्याच्या त्यांच्या वेगाने) अवकाशात जात राहातील. त्या घटकांचे वेग वेगवेगळे असल्याकारणाने पृथ्वी एकसंध राहाणार नाही. (गुरुत्वाकर्षणामुळेच ते भाग सध्या एकत्र प्रवास करताना दिसतात.) विषुववृत्तापाशी पृथ्वीच्या पृष्ठाचा वेग साधारणपणे अर्धा किमी प्रतिसेकंद "पूर्वेकडे" आहे. गुरुत्वाकर्षण संपताच एका सेकंदात कन्याकुमारी येथील धूळ "पूर्वेकडे" मेषराशीच्या दिशेने आणि मेक्सिकोमधली धूळ "पूर्वेकडे" तूळराशीच्या दिशेने (उलट्या-उलट्या दिशांनी) साधारणपणे (परस्परसापेक्ष) अर्धा+अर्धा=एक किमी दूर उडेल. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरचे हिमकण मात्र एकाच दिशेने, एकाच वेगाने जातील. अशा प्रकारे पृथ्वी ही आकार वाढणारी धुळीची तबकडी अवकाशात भरकटत जाईल. विषुववृत्त आडव्यात सर्वाधिक फुटेल पण ध्रुव उभ्यात फुटणार नाहीत, म्हणून "तबकडी"... (अणुरेणूंचा संच असलेले एकसंध "क्रिस्टल" असलेले धूलिकण गुरुत्वाकर्षणाशिवायही बहुधा एकसंधच राहातील.) त्या सर्व धूलिकणांचा मिळून अँग्युलर मोमेंटमचा हिशोब तंतोतंत पहिल्याइतपतच राहील, याबाबत शंका नाही. (या बाबीस "पृथ्वी स्वतःभोवती फिरत राहील" असे म्हणू शकतो.) त्याच प्रमाणे "सूर्यमाला" हीसुद्धा एक विरळ धूळ-तबकडी होईल. तिच्यातील सर्व धूलिकणांचा मिळून अँग्युलर मोमेंटमचा हिशोब तंतोतंत पहिल्याइतपतच राहील, याबाबत शंका नाही. (या बाबीस "सूर्यमाला स्वतःभोवती फिरत राहील" असे आपण म्हणू शकतो.)

गुरुत्वाकर्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. नवीन यांचा प्रश्न आहे: "गुरुत्वाकर्षण नाहीसे झाले तर?"
याचा अर्थ " पृथ्वी आणि तिच्यावरील कोणतीही वस्तू यां मधील गुरुत्वाकर्षण " असा सर्वांनी घेतलेला दिसतो.गुरुत्वाकर्षण हे वैश्विक तत्त्व आहे. ते नाहीसे झाले तर अखिल विश्वातून नाहीसे होणार.
पृथ्वी आपल्या कक्षेत फिरते त्याचे कारण म्हणजे सूर्याचे तिच्यावरील गुरुत्वाकर्षण बल. या केंद्रगामी बलामुळे पृथ्वी सूर्या भोवती फिरते. ते बल नाहीसे झाले तर ती स्पर्शरेषेच्या दिशेत सरळ मार्गाने अनंत अवकाशात सूर्या पासून दूर दूर जात राहील. काही क्षणांतच पृथ्वी वरील सर्व जीवन संपून जाईल.
श्री. दिगम्भा लिहितात त्याप्रमाणे पृथ्वी वरील सर्व वस्तू न्यूटनच्या पहिल्या नियमाचे पालन करतील.

द्विमिती-स्यूडो, त्रिमिती-नॉन् स्यूडो यावर एक स्वतंत्र लेख हवा

वर आलेली यनावाला व धनंजय यांच्यामधील सें.फ्यू.फो. या विषयावरील चर्चा अत्यंत रोचक वाटते आहे पण ती तितकीच क्लिष्ट/उच्च पातळीवरची झाली आहे. त्यांचे बोलणे त्यांना समजले पण आम्हाला नीट कळले नाही.
आम्हा सामान्य बुद्धीच्या पण शास्त्रजिज्ञासू लोकांसाठी या दोघांपैकी कोणीतरी यावर एक सोप्या भाषेत "सम्यक् आकलन" करून देणारा स्वतंत्र लेख लिहावा अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे.
वाटल्यास शिरस्त्याप्रमाणे यनांनी लिहून धनंजयांनी त्यावर आपली "टीका" (संस्कृत अर्थाने)द्यावी.
कृपया यासाठी थोडा वेळ काढाच.
- दिगम्भा

माझे प्रतिसाद तितकेसे स्पष्ट लिहिलेले नाहीत

तर्कांची मांडणी गचाळ आहे. म्हणून समजण्यास क्लिष्ट आहेत.

यनावालांचे म्हणणे हे, की (इनर्शियल संदर्भबिंदूंच्या चौकटीत हे अध्याहृत) से.फ्यू.फो. स्यूडो आहे. माझे म्हणणे हे की इनर्शियल चौकटीत से.फ्यू.फो मुळी अनुभवासच येत नाही. केवळ इनर्शियल चौकटीच वापरण्यालायक आहेत, सत्य आहेत, असे मानल्यास ही दोन वाक्ये समानार्थी होतात. दोघांच्या म्हणण्यात एकवाक्यता आहे. पण हा केवळ शाब्दिक फरक नाही तर तात्विक फरक आहे, असे मी पटवू इच्छितो.

नॉन-इनर्शियल (?) फ्रेम ऑफ रेफरन्स (संदर्भबिंदूंची चौकट) असणे कधीकधी सोयीचे असते, आणि सोय ही फार महत्वाची असते अशी चर्चा मी सुरू केलेली आहे (भूस्थिरवादाचा पुरस्कार).
(हे लेख अजून लिहिलेले नाहीत-) तिथपासून पुढे गोलाकार गतीत अशी चौकट वापरल्यास काय सोय होते असे दाखवीन. (गोलाकार सिमेट्री असल्यास गणिताची एक मिती कमी होते.) अशी चौकट न वापरल्यास, इनर्शियल फ्रेम वापरल्यास काय फायदा ते सांगेन (मिती कमी होणार नाही, पण गोलाकार सिमेट्री नसली, मोटारसायकल लंबवर्तुळात जात असली, तरीही एकाच प्रकारे गणित सोडवता येते.)
नॉन-इनर्शियल चौकटीत से.फ्यू.बल "खरेच" असते कारण ते अनुभवास येते. ती चौकट मोडणे सोयीचे असले, इनर्शियल चौकट वापरली, तर ते बल मुळात अनुभवास येतच नाही, मग ते खरे की खोटे म्हणण्याची वेळ कधी येणार?
असे वेगवेगळे सुटसुटीत चर्चाविषय लिहिण्याचा मनसुबा आहे.

अजून एक

व्यस्त असल्याने लवकर पिंक टाकू शकलो नाही.... "गुरूत्वाकर्षणाच्या ग्रॅव्हीटी" पेक्षा "हिंदूत्वाकर्षणाच्या ग्रॅव्हीटी"मधे इंटरेष्ट असल्यामुळे नाही :-)

मला एक शाळेत असताना विचारलेला प्रश्न आठवला (जो येथे अनेकांना माहीत असेल) : जर पृथ्वीला एक केंद्रामधून जाणारे आरपार भोक पाडले आणि त्यातून एखादा गोळा/वस्तू एका बाजूने टाकली तर ती दुसर्‍या बाजूला पोचेल का?

अर्थात नाही.

तो गोळा किंवा वस्तू पृथ्वीगोलाच्या केंद्रस्थानापाशी पोहोचेल आणि स्थिरावेल..वाचक्‍नवी

लोलक (पेंड्युलम)

लोलकाचे मार्गक्रमण आणि तुमचा प्रश्न हा एकच विषय आहे, हे पहिल्यांदा "फिजिक्स फॉर एंटरटेनमेंट" पुस्तकात वाचले. गंमत वाटली.

घर्षण (आणि हवेचे द्रवघर्षण) या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास लोलक ज्या उंचीवरून सोडाल त्याच उंचीवर [याबाजूला, आणि त्याबाजूला] परतपरत पोचेल. तसेच या भुयारात टाकलेल्या वस्तूबद्दल. दुसर्‍या बाजूला पोचेल, मग उलट येत या बाजूला, असे मागे-पुढे करत राहील.

घर्षण हिशोबात घेतल्यास लोलक प्रत्येक वेळेला कमी उंचीपर्यंत जाईल आणि शेवटी मध्यभागी स्थिरावेल. (वाचक्नवी वरील प्रतिसादात बहुधा या चरमस्थितीबद्दल सांगतात.)

बरोबर

पृथ्वीला आरपार पाडलेल्या भोकांत टाकलेली वस्तू लोलकाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रभोवती दोलायमान गतींत राहील.

 
^ वर