भूस्थिरवादाचा पुरस्कार

येथेच गुरुत्वाकर्षणाबद्दल चर्चा चालू आहे, तिथे "खरा" आणि मिथ्या="स्यूडो" या शब्दांबाबत चर्चा होत आहे (दुवा). त्यानिमित्ताने ही चर्चा आहे.

पूर्वी भूमध्य-भूस्थिर खगोलशास्त्राची चलती होती. त्यानंतर कोपेर्निकस या खगोलशास्त्रज्ञाने असे सुचवले की सूर्य हा विश्वाचा मध्यबिंदू आहे. हे विधान सत्याच्या अधिक जवळ गेलेले आहे असे आपण मानतो.

पण आता आपण जाणतो की सूर्य हा आकाशगंगेच्या मध्यबिंदूभोवती साधारणपणे २१५ किमी/सेकंद या वेगाने फिरतो आहे. पृथ्वी त्याच बिंदूभोवती एका नागमोड्या मार्गाने साधारणपणे २१५ किमी/सेकंद वेगाने फिरत आहे. (२००-२३० किमी/सेकंद, नागमोड्या वळणांमुळे.) मार्गक्रमण साधारण असे :

~~~~~~~~~~ आणि ∩∩∩∩∩∩∩∩∩∩∩∩
यांच्या मधली काही स्थिती. (चिह्ने जोडावीत, तशी जोडून मला टंकता आली नाहीत. त्या नागमोडी रेषेचा मोठा गोल मानावा. त्याची वक्रता मला टंकता आली नाही.)

या इतक्या क्षुल्लक फरकाने भूमध्य-भूस्थिर खगोलशास्त्र आणि सूर्यमध्य-सूर्यस्थिर खगोलशास्त्र जवळजवळ एकमेकांइतकीच मिथ्या आहेत, असे मानावे लागेल. इतकेच काय सूर्यमध्य-सूर्यस्थिर खगोलशास्त्राप्रमाणे पृथ्वी गोलाकार प्रदक्षिणा करते, आणि हे पूर्णपणे असत्य आहे. मग सूर्यमध्य-सूर्यस्थिर खगोलशास्त्र हे आपण भूमध्य-भूस्थिर खगोलशास्त्राच्या मानाने खरे का मानतो? हा विषय चर्चा करण्यालायक आहे.

आता ही कथा बघूया :

पहाटे ६ वाजता फटफटले. गंपूची आई उठून कामास लागली. नऊ वाजेस्तोवर उन्हाचा कवडसा गंपूच्या उशीवर पडला. आळशी गंपूने पांघरूण डोक्यावर ओढले. तेवढ्यात आई आत आली. ती रागावली. "अरे गंपू, सूर्य इतका वर आला, तरी तू एक इंच जागचा हलला नाहीस!" गंपूने आळोखेपिळोखे दिले. "किती... वाजले???" "गधड्या, नऊ वाजलेत, सहा वाजल्यापासून राबतेय्, स्वयंपाक झाला माझा सगळा!" (तिने रागाने "गधड्या" म्हटले, तरी ती तशी प्रेमळ आहे, बरे का!) गंपू वरमला. "आई, गेल्या तीन तासात मी पृथ्वीबरोबर सव्वातीन लाख किलोमीटर प्रवास केला आहे. मग असं कसं म्हणतेस की हललोच नाही?" शिवाय मनातच गंपू म्हणाला "शेजघरातून स्वयंपाकघर आहे १० मीटर. गेल्या तीन तासात आईही ३,२१,७३२.०१ किमी इतकीच हलली आहे, आणि मी ३,२१,७३२ किमी. इतक्या क्षुल्लक अधिक येरझार्‍याबाबत तिने इतकी फुशारकी का मारावी." (साखरझोप मोडल्यामुळे हा दुष्ट विचार बरे का... गंपू तसा आईचा फार मान राखतो.)
आई आणखीनच पेटली, "वा रे वा. गेले १२ तास त्याच तिकडे अंथरुणात घोरतो आहेस. ऊठ! नाहीतर सव्वातीन धम्मकलाडू घालते. चांदण्या दिसतील त्यांच्याबरोबर जा आणखी सव्वातीन लाख किलोमीटर!!!"
त्याचे असे आहे, की रागावून आई सूर्यमध्य-सूर्यस्थिर खगोलशास्त्र पूर्ण विसरली असली पाहिजे. पण बाबा मात्र शाळेत खगोलशास्त्र शिकवतात. त्यांनी संवाद ऐकला. त्यांनी मात्र आत येऊन आईलाच साथ दिली. बखोटीला धरून गंपूला उठवले. (बाबाही तसे प्रेमळ आहेत, पण त्यांना कचेरीत जायची घाई होती.) हे का बरे असावे?

बाबा आणि आई दोघे भूमध्य-भूस्थिर खगोलशास्त्राचा पुरस्कार करत आहेत काय? जे धादांत असत्य आहे ते मुलाला जागे करण्याच्या उद्देशाने सत्य का मानावे?

(टीप : येथे हे भूमध्य-भूस्थिर खगोलशास्त्र अभिप्रेत नाही.)

Comments

खो खो खो

जे धादांत असत्य आहे ते मुलाला जागे करण्याच्या उद्देशाने सत्य का मानावे?

जे सत्य आहे ते चलाख युक्तिवादाने असत्य होणार नाही.

धनंजयाची मांडणी एकलव्याला आवडली.

थोडं थोडं समजत आहे.

धनंजय,
आपली भुस्थिराबाबतची कथा समजली त्यावरुन प्रास्ताविक समजुन घेण्याचा प्रयत्न केला.
पण जरा जडच चालले आहे. :)


अवांतर : आपण कशाकशाचा अभ्यास करता ते लक्षात येत नाही, आपल्या मेंदुतील विचारांना समजून घेण्याची पातळी आमच्यात कधी येईल कोणास ठाऊक ? ( ह. घ्या. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो ना !

बिरुटेसरांच्या प्रतिसादाशी सहमत आहे :)
-- लिखाळ.

सापेक्षता आणि शक्तीव्यय

सापेक्षता आणि शक्तीव्यय या दोन सत्यांमध्ये उत्तर लपलेले आहे.

लेख नाही, चर्चेचा विषय

कोडेही नाही :-)

१. (आई-बाबांचा त्रागा बाजूला सोडा) सूर्य वर येतो=हलतो, जो मुलगा अंथरुणावर पडून असतो तो हलत नाही. हे असे सत्य आहे असे मानून रोजची कार्ये आईबाबा करतात. तुम्हाला त्यांचे वागणे योग्य वाटते का? तुम्हीही असेच वागता का? (माझ्यापुरते उत्तर - मी गंपूच्या आईबाबांसारखाच वागतो.)

२. तुम्ही "सूर्याभोवती पृथ्वी फिरते, स्वतःभोवती पृथ्वी फिरते" अशी "सत्ये" मानता का? (जर होय, तर) असे कधीपासून मानू लागलात? जर कोणी तुम्हाला ही गोष्ट सांगितली तर ती तुम्हाला का पटली? हे "सत्य" जाणल्यामुळे तुमच्या वागण्यात काही फरक पडला का?

३. वागण्यात फरक पडत नाही, किंवा त्या विचारांची गैरसोय वाटते त्यावेळी त्या "सत्या"बद्दल तुमच्या मनात काय भावना असते?

-- वरील सर्व गंपूच्या कथेच्या संदर्भात --

-- खालील सर्व आकाशगंगेच्या संदर्भात --
(हे रोजच्या वागण्याबाबत नाही. "तुम्हाला काय सत्य आहे असे वाटते" याबद्दल आहे.)

१. शाळेत बहुधा कोणीतरी तुम्हाला सांगितले की पृथ्वी स्वतःभोवती, आणि सूर्याभोवती फिरते. त्याच प्रकारे कॉलेजमध्ये कोणी तुम्हाला सांगितले असेल की सूर्य आकाशगंगेच्या मध्यबिंदूभोवती फिरतो. पृथ्वीही नागमोड्या मार्गाने त्याच बिंदूभोवती फिरते. हे कळल्यानंतर "पृथ्वी सूर्याभोवती फिरते" या शाळेत शिकलेल्या कल्पनेचे तुमच्या मनात काय स्थान राहाते?

उत्तरे

१. गंपूच्या आईबाबांच्या दृष्टिकोनातून गंपूने काहीच हालचाल केली नाही हे खरेच वाटते. या आणि अश्या रोजच्या व्यवहारात भूमध्य-भूस्थिरवाद 'पुरेसा', सोयीचा आहे किंवा हा वाद मानल्याने काहीच नुकसान होत नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या गोष्टीचा (याला सत्य म्हणावे की असत्य असा पुढे प्रश्न आहे म्हणून 'गोष्ट' असे म्हटले. सूर्य स्थिर नसल्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याचा प्रयत्न करते असे म्हणता येईल का?) अथवा माहितीचा रोजच्या व्यवहारात उपयोग नाही. (गंपूसारख्या लोकांना आळसाला आयतीच कारणे मिळण्याव्यतिरिक्त ;) भूमध्य-भूस्थिरवाद दैनंदिन व्यवहारात सोयीचा म्हणून अ(र्ध?)सत्य का असेना लोक वापरत असतील तर चांगलेच आहे.

२. सूर्याभोवती आणि स्वतःभोवती पृथ्वी फिरते असे शाळेत शिकलो. मास्तरांनी शिकवले आणि पुस्तकातही तसेच लिहिले असल्याने खरे असावे असे वाटले. हे समजल्याने वागण्यात काही विशेष फरक पडला नाही; कारण भूमध्य-भूस्थिरवाद सोयीचा.

३. हा प्रश्न अवघड आहे. ज्या सत्याने आपल्या वागण्यात दैनंदिन व्यवहारात फरक पडत नाही असे 'निरुपद्रवी' सत्य बर्‍याचदा दुर्लक्षले जाते फक्त विषय निघाल्यास त्याची आठवण येते. एखाद्या सत्याची 'गैरसोय' वाटणे हा माझ्यामते 'पर्सेप्शन' चा मामला आहे.

१. त्यावेळी तसे शिकवले हे चांगलेच झाले असे वाटते. त्यामुळे बर्‍याच साध्या गोष्टींची (दिवस/रात्र, उत्तरायण, दक्षिणायन इ) उकल करणे सोपे झाले.

थोडक्यात व्यक्तिच्या पात्रतेप्रमाणे किंवा ग्रहणक्षमतेप्रमाणे असत्य-अर्धसत्य-सत्य असा मार्ग घेत असावेत.

सोय

सोय हे भौतिकशास्त्रातले महत्त्वाचे तत्त्व मानण्यास हरकत नाही.

विशिष्ट परिस्थितीत भूमध्य-भूस्थिरवाद सोयीचा आहे, असे एकमेकांत ठरवणे गरजेच असते, असे गंपूच्या आईवडलांच्या वागण्यावरून (पर्यायाने माझ्या वागण्यावरून, किंवा नवीन यांच्या वागण्यावरून) वाटते.

मास्तरांनी सांगितले/पुस्तकात होते म्हणून पटले; असे काही माझ्या बाबतीतही झाले. जर नवीन यांचे शेवटचे उत्तर (जे मलाही पटते) ते जर पटण्याचे कारण असते तर बरे वाटले असते : की सूर्यमध्य कल्पनेने आयने वगैरे कळायला सोपी जातात, ती सोय होते, म्हणून सूर्यमध्य कल्पना पटली...

शाळेत विद्यार्थ्यांना समजावून सांगायला शिक्षकांना वेळ नसतो, याबाबत थोडे वाईट वाटते.

हे मात्र पटले नाही :
व्यक्तिच्या पात्रतेप्रमाणे किंवा ग्रहणक्षमतेप्रमाणे असत्य-अर्धसत्य-सत्य असा मार्ग घेत असावेत.
माझ्या स्वर्गवासी आजीच्या बुद्धिमत्तेची स्तुती आमच्या घराण्यात पुष्कळ होते. त्यामुळे तिच्यापेक्षा वरील दर्जाचे सत्य कळण्याची माझ्यापाशी ग्रहणशक्ती किंवा बुद्धीची पात्रता आहे असे म्हणण्याचे मी धारिष्ट्य करणार नाही. बहुतेक आकाशगंगा-मध्य कल्पना तिच्या मृत्यूपर्यंत तिला माहीत नव्हती. (माझी आजी सोडा, आर्यभट्ट किंवा ब्रह्मगुप्त हे प्राचीन ज्योतिषशास्त्री घ्या - त्यांना आकाशगंगा-मध्य कल्पना माहीत नव्हती.) या सर्व बुद्धिमान लोकांपेक्षा माझी कुवत कमी आहे, यात फारशी शंका नाही. या लोकांना भूमध्य-भूस्थिर कल्पनेवेगळी कल्पना कधी सोयीची वाटण्याचा प्रसंग आला नाही, असे म्हणणे अधिक योग्य ठरावे.

ग्रहणक्षमता

>> व्यक्तिच्या पात्रतेप्रमाणे किंवा ग्रहणक्षमतेप्रमाणे असत्य-अर्धसत्य-सत्य असा मार्ग घेत असावेत.

या वाक्यात मला अपेक्षित असलेला अर्थ निसंदिग्धपणे व्यक्त झाला नाही, क्षमस्व. मला असे म्हणायचे आहे की जेंव्हा माध्यमिक शाळेत ही गोष्ट शिकवली गेली तेव्हा सूर्यमध्य-सूर्यस्थिर कल्पनेचा आधार घेऊनच शिकवली गेली त्यामुळे आधी माहीत नसलेल्या अनेक गोष्टी जसे दिवस-रात्र कसे होतात, सूर्योदयाची जागा का बदलते, सूर्यग्रहण/चंद्रग्रहण कसे होते इ. इ. अनेक गोष्टी समजणे सोपे गेले. (आमच्या शाळेत सूर्यमालेचे त्रिमित मॉडेल नसल्याने ही संकल्पना बर्‍याच मुलांना समजली नाही हेही खरे) त्यावेळची 'माझी ग्रहणक्षमता' जेवढी होती त्यामानाने असे शिकवले हे चांगलेच झाले असे मला वाटते. म्हणजे सूर्यही दुसर्‍याच कोणत्या बिंदूभोवती फिरतो इ. त्यावेळी सांगितले असते तर कदाचित ते माझ्या डोक्यावरून गेले असते आणि ज्या काही संकल्पना 'हे' न सांगितल्याने मला कळल्या त्या कदाचित कळल्या नसत्या. माझी ग्रहणक्षमता आणि क्लिष्ट विषय समजून घेण्याची पात्रता वयानुसार वाढली असे मानले (!:)) तर शिक्षणाचा हा प्रवास योग्यच होता असे मला वाटते.

सूर्य आणि पृथ्वी

>>....पृथ्वीही नागमोड्या मार्गाने त्याच बिंदूभोवती फिरते.<< म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरतच नाही? तिच्या सा‍इन कर्व्ह सारख्या कक्षेत सूर्य कुठे असतो? का सूर्याचा वेग अत्यंत कमी असल्याने तो वर्षभरात 'त्या' बिंदूभोवती फिरत असला तरी ,पृथ्वीच्या तुलनेने फारसा सरकत नाही? म्हणून त्याला आपण स्थिर समजतो?-वाचक्‍नवी

"म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरतच नाही?"चे उत्तर तुम्ही द्यावे

आणि हे कोडे नाही, आपल्या व्याख्यांबद्दल विचारांची चर्चा आहे.

सूर्य त्या बिंदूभोवती ~२१५ किमी/सेकंद वेगाने फिरतो.

"सूर्य स्थिर मानल्यास" पृथ्वी सूर्याच्याभोवती ~१५-२० किमी/सेकंद वेगाने फिरते.
"सूर्य स्थिर मानल्यास/न मानल्यास" हा चर्चाविषय असाल्यामुळे या वरील लाल अक्षरांतील वाक्याचा तुम्ही कसा अर्थ लावाल, न लावाल कोणास ठाऊक.

पण ~२१५ किमी/सेकंद आणि ~१५ किमी/सेकंद आकड्यांनी तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात काही मदत व्हावी असे वाटते. (पृथ्वीची त्रिज्या ~१५ लाख किमी आहे. वर्षानंतर पृथ्वी आधी होती त्यापेक्षा ~१लाख किमी दूर वेगळ्या ठिकाणी असते. हे सर्व आकाशगंगेचा मध्य स्थिर मानून - तोही स्थिर नाही हे लक्षात असावे. पण हा तात्विक मुद्दा लक्षात यावा.)

टीप : नागमोडी रेषा साईनवेव्ह सारखी नसते. त्या वक्ररेषा सायक्लॉइड/ट्रोकॉइडशी अधिक साधर्म्य राखतात (उदा: एपिसायक्लॉइड, हायपोसायक्लॉइड, एपिट्रोकॉइड, हायपोट्रोकॉइड, पण नेमक्या यांपैकी कुठल्याच नाहीत). या दुव्यांवर, विकीपीडियावर चलत चित्रे आहेत, ती सुंदर आहेत. "भोवती" शब्दाची व्याख्या करण्यास, "पृथ्वी सूर्याभोवती फिरतच नाही?"चे उत्तर तुमच्या मनात येण्यास, उपयोगी पडावीत.

साक्लॉइड/ट्रोकॉइड आकार काढून सुंदर भौमितिक चित्रे काढण्याची साधने "स्पायरोग्राफ" ही पुण्याला रस्त्यावर विकत असल्याचे आठवते.

पृथ्वीचा मार्ग

>> नागमोडी रेषा साईनवेव्ह सारखी नसते. त्या वक्ररेषा सायक्लॉइड/ट्रोकॉइडशी अधिक साधर्म्य राखतात (उदा: एपिसायक्लॉइड, हायपोसायक्लॉइड,
>> एपिट्रोकॉइड, हायपोट्रोकॉइड, पण नेमक्या यांपैकी कुठल्याच नाहीत).

पण पृथ्वीचा 'मार्ग' रेखाटण्याचे प्रयत्न झाले आहेत का?

>> "म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरतच नाही?"चे उत्तर तुम्ही द्यावे

सूर्यमध्य-सूर्यस्थिर वादाप्रमाणे एका वर्षात नसली तरी 'कधीतरी' (काही अधिक वेळानंतर) पृथ्वी एक 'प्रदक्षिणा' करत असावी असे वाटते. बरोबर की चूक ते सांगावे.

हा चर्चा प्रस्ताव आणि त्यावर झालेली चर्चा भन्नाट आहे! :)

पृथ्वीचा मार्ग

रेखाटणे सहज शक्य आहे. (कल्पनेत!)
एका मोठ्या गोल काढायचा आणि त्या रेषेचा आधार घेऊन नागमोडी रेषा काढायची.

प्रमाणे (प्रोपोर्शन) नीट ठेवायची असतील तर :
आता तो मोठा गोल १ किमी त्रिज्येचा काढा, त्यारेषेच्या आधाराने (तिच्याभोवती पिंगा घालत) दुसरी रेषा काढा (पिंग्याची आतबाहेर रुंदी १ मायक्रॉन आत, १ मायक्रॉन बाहेर). आता चांगल्या तासलेल्या पेन्सिलच्या शिशाची रुंदी १०० मायक्रॉन असते. त्यामुळे तो "पिंगा" तुम्ही कसा चिताराल त्याबद्दल साशंक आहे.

प्रोपोर्शन कमी जास्त झाली तर चालेल तर या दुव्यावर जा. येथील फ्लॅश प्रणाली अशा प्रकारची चित्रे काढते. त्यात १५०, १०, ३० असे आकडे भरा, आणि "स्टार्ट"वर टिचकी मारा.

(प्रोपोर्शन हवे असेल तर १० कोटी, १, १० असे आकडे द्यावे लागले असते. ते या प्रणालीच्या कुवतीबाहेर आहे.)

आता काही म्हटले तरी ही चकली द्विमिती आहे! त्रिमितीत "इमृती" किंवा गोल वाकवलेल्या कॉर्कस्क्र्यूची आठवण थोडीशी यावी.

तोड्याची जिलबी

ज्याला तुम्ही इमृती म्हटलंय् तिला आम्ही तोड्याची जिलबी म्हणतो. -वाचक्‍नवी

वर्ष

सूर्यमध्य-सूर्यस्थिर वादाप्रमाणे एका वर्षात नसली तरी 'कधीतरी' (काही अधिक वेळानंतर) पृथ्वी एक 'प्रदक्षिणा' करत असावी असे वाटते. बरोबर की चूक ते सांगावे.

या सूर्यमध्य-सूर्यस्थिर वादाप्रमाणे बरोबर एका वर्षात पृथ्वी एक 'प्रदक्षिणा' करते. कमी नाही, अधिक नाही.

सूर्य आणि पृथ्वींचे वेग

सूर्याचा 'त्या' बिंदूभोवती फिरण्याच्या मार्गाची लांबी, ते अंतर्वतुळ असल्याने, पृथ्वीपेक्षा कमीच असणार. शिवाय पृथ्वीचा मार्ग नागमोडी. दोघांच्या रेषीय वेगात फारसा फरक नाही. सूर्याचा कोनीय वेग जास्त असणार. जवळजवळ पृथ्वीच्या कोनीय वेगाइतका. त्यामुळे पृथ्वी सतत सूर्याच्या आजूबाजूला असणार. सूर्य स्वत:भोवती फिरत नसेल, तर तिला सूर्याची पाठ कधीच दिसणार नाही. त्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही हेच सत्य! (दोघांच्या कक्षांच्या लांब्या माहीत नसल्याने जास्त खोलात शिरता येत नाही.)
या माहितीमधला पृथ्वीचा मार्ग नागमोडी हीच माहिती अगदी नवीन. शिवाय, पृथ्वी स्वत:भोवती फिरताना भोवर्‍याप्रमाणे डोलते हे विचारात घेतले, तर ती सूर्याच्या आजूबाजूला स्वच्छंदे बागडत असते, म्हणजे पिंगा घालते, पण फेर धरत नाही हेच खरे. बरोबर? की आणखी काही दुरुस्ती?--वाचक्‍नवी

वा वा!

तर ती सूर्याच्या आजूबाजूला स्वच्छंदे बागडत असते, म्हणजे पिंगा घालते, पण फेर धरत नाही हेच खरे.

वा वा! काय छान शब्दांत सांगितलेत. एकदम डोळ्यासमोरच उभे राहिले. :)

मिथ्या/मित्या

'एकदा नदीत हात बुडवल्यावर तुम्ही त्या नदीत पुन्हा हात बिडवू शकत नाही, कारण नंतर ती नदी ती नदी राहात नाही नि तो हात, तो हात.' असे शारंगपाणी नामक व्यक्तीने मटामधील एका लेखात लिहील्याचे वाचकांच्या पत्रव्यवहारात वाचल्याचे स्मरते. (वाचकाने अर्थातच अशी निरर्थक विधाने छापू नयेत स्वरूपाची मागणी केली होती. सारेच मिथ्या आहे म्हटल्याने, 'खर्‍या' सत्याची परीक्षा उत्तरोत्तर कठीण होत जाते.)

स्थिरता ही तुमच्या संदर्भचौकटीनुसार ठरते. कालगणना, दिशा व हालचाल देखील सापेक्षच.

ज्याप्रमाणे रेषाखंडाची लांबी तुम्ही तो कुढल्या दिशेने पाहता यावरून ठरते, तशीच पृथ्वीची हालचाल.

पृथ्वीवरून पाहताना ती स्थिर, सौरमालिके पुरते पाहता सूर्याभोवती, आकाशगंगगेसंदर्भात नागमोडी वर्तुळाकार भासते. यातील कुठलेही अनुमान चूक/बरोबर आहे असे नव्हे तर त्याचे सत्य त्या संदर्भ चौकटीपूरते मर्यादित आहे इतकेच. तत्वत: एकच असणार्‍या नागमोडी वळणे किंवा वर्तुळाकार भ्रमण याची संदर्भचौकट मात्र भिन्न आहे. एकच सत्य वेगवेगळ्या प्रकारे चित्रित करण्यासारखे. जशी मिती (व त्यांची संख्या) बदलेल त्याप्रमाणे आकलन व अनुमान बदलणे सहाजिक आहे.

'थोडे पुढे जावून' काळाचा विचार करता कुठलीच वस्तू एखाद्या गोष्टी भेवती फेर धरू शकत नाही. (कारण ती पूर्व पदावर जाऊ शकत नाही.:))

अवांतरः फेर/पिंगा रूपक आवडले. आईनस्टाईन बाबांनी अशाच 'संदर्भात' 'रेल्वमधील पिंग-पॉंग' चे उदाहरण वापरले आहे असे वाटते.'

संदर्भचौकट आणि सत्य

थेट मुळाशी गेलात.

पण काही भाग समजण्यासाठी आणखी विशद करा.

तुम्ही म्हणता :

...सत्य त्या संदर्भ चौकटीपूरते मर्यादित आहे.

(म्हणजे जितक्या संदर्भचौकटी तितकी त्या बाबतीत सत्ये.)

(तुम्ही "कुठलेही अनुमान चूक/बरोबर आहे असे नव्हे...त्याचे सत्य...मर्यादित..." असे शब्द वापरले आहेत. या "अनुमान" प्रकारात काही खास गोम आहे काय? असेल तर ती समजवावी.)

पण पुढे तुम्ही म्हणता की :

एकच सत्य वेगवेगळ्या प्रकारे चित्रित करण्यासारखे.(अधोरेखन माझे)

त्यावरून असे वाटते, की मुळात एकच सत्य आहे. ते व्यक्त करता येते का? कारण व्यक्त करणार्‍यालाही संदर्भचौकट असते.

आणखी एक प्रश्न :
संदर्भचौकटींमधे तरतमभाव असतो काय? या प्रसंगात गंपूची संदर्भचौकट वापरावी की आईची संदर्भचौकट वापरावी? - कारण , यातील कुठलेही अनुमान चूक/बरोबर आहे असे नव्हे तर त्याचे सत्य त्या संदर्भ चौकटीपूरते मर्यादित आहे. अमुक प्रसंगात यांतली कुठली संदर्भचौकट उजवी असा निर्णय करण्यास काही निकष आहेत काय? (निकष आहेत असे मानू - कारण खगोलशास्त्र शिकवणार्‍या बाबांनी आईच्या चौकटीच्या बाजूने कौल दिला... निकष नसल्याचे मत असल्यास तेही समजावून सांगा) या निकषांचे विज्ञानात किंवा तत्त्वज्ञानात काही महत्त्व आहे का?

'सत्य'

'सत्य त्या संदर्भ चौकटीपूरते मर्यादित आहे'. मध्ये सत्य अवतरण चिन्हात आहे असे समजावे. अनुमान मध्ये देखील कुठली खास गोम नाही.

एकच सत्य वेगवेगळ्या प्रकारे चित्रित करण्यासारखे.

इथे 'सत्य' चा अर्थ 'हालचाल' अपेक्षित होता. म्हणजे माहीत असलेल्या सार्‍या मित्यांचा वापर करत सर्व अनुमानांचा त्या-त्या मित्यांच्या मर्यादेसकट उकल करू शकणारी हालचाल.

आपण उल्लेखलेल्या प्रसंगात आईची संदर्भ चौकट योग्य आहे. गंपूने मांडलेली चौकट खोटी नसली तरी देखील आळस वा उशीरा उठण्यासारख्या संदर्भात ती गैरलागू आहे.

अवांतर - हे म्हणजे पहिल्या मजल्यावर राहणार्‍याने तळमजल्यावरच्याला मी तुझ्या दुप्पट उंचीवर राहतो म्हणण्यासारखे व तळमजल्यावरच्या ने दोन्हीची समुद्रसपाटीपासूनची उंची दाखवत 'तुझी उंची किती (अधिक) तो बोलतोस किती' म्हटल्यासारखे आहे.

अवांतर पण मनोरंजक

हे थोडे अवांतर वाटू शकेल. लहानपणापासून आपण ज्या जगात वाढतो त्याचे कन्वेन्शन्स आपल्या डोक्यात इतके फिट्ट् असतात की वेगळा विचार अशक्य वाटतो*. याचे एक उदाहरण म्हणजे उलटे नकाशे जे इथे बघता येतील. आपले नेहेमीचे नकाशे आणि हे नकाशे यात तांत्रिक दृष्ट्या काहीच फरक नाही कारण वर आणि खाली हे सापेक्ष आहे. पण हे नकाशे बघताना आपले कंडीशनिंग किती पक्के आहे याचा मनोरंजक पुरावा मिळतो.

*पुंजभौतिकीच्या संकल्पना आत्मसात करण्यामागे हा एक मोठा अडथळा असतो. क्रिकेटचा चेंडू आणि इलेक्ट्रॉन यांच्या वागण्यामध्ये मूलभूत फरक आहे हे आपल्या मनाला पटायला तयार नसते.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

एक पुरवणी/बारीकसा बदल

आधी राजेंद्र म्हणतात तसे :

पुंजभौतिकीच्या संकल्पना आत्मसात करण्यामागे हा एक मोठा अडथळा असतो. क्रिकेटचा चेंडू आणि इलेक्ट्रॉन यांच्या वागण्यामध्ये (मूलभूत- हा शब्द मी खोडला) फरक आहे हे आपल्या मनाला पटायला तयार नसते.

पण काही तास इलेक्ट्रॉनचे नेहमीच्या अपेक्षेवेगळ्या वागण्याबद्दल वाचल्यानंतर,
क्रिकेटचा चेंडू आणि इलेक्ट्रॉन यांच्या वागण्यामध्ये मूलभूत (- हा शब्द मी पुन्हा जोडला) फरक नाही हे आपल्या मनाला पटायला तयार नसते. पुंजभौतिकीच्या संकल्पना आत्मसात करण्यामागे हा एक मोठा अडथळा असतो.

लक्षात यावे : या दोन वस्तूंच्या वागण्यात मूलभूत (पुंजभौतिकी) फरक नाही. पण एकाच्या वागण्याचे तपशील आपल्या रोज-ओळखीचे आहेत, आणि दुसर्‍याच्या वागण्याचे तपशील रोज-ओळखीचे नाहीत.

तुमचा मुद्दा अवांतर नाही. या बाबतीत आणखी (पण मूळ "भूस्थिर/सत्य" चर्चेशी धागेदोरे बांधत) लिहावे, अशी विनंती.

या लेखमालेचा उद्देश

मागे नवीन यांनी लिहिलेल्या गुरुत्वाकर्षणाविषयीच्या लेखात मी एक अवांतर मुद्दा प्रस्तुत केला होता की केंद्राद्धावकबल (बाह्यबल, सेंट्रिफ्यूगल फोर्स) हे विशिष्ट संदर्भचौकटीत (या फिरत्या चौकटीला चौकट १, म्हणूया) खरे असते, आणि विशिष्ट संदर्भचौकटीत (या स्थिर चौकटीला चौकट २, म्हणूया) खरे नसते. ती अवांतर चर्चा तिथे वाहावत जाऊ नये म्हणून ही वेगळी लेखमाला लिहायला घेतली.

अ.) कोणाला वाटले असेल की बाह्यबल हे मिथ्याबलच आहे, कारण चौकट २ ही चौकट १ पेक्षा खरी आहे. मी जर "फिरत्या चौकट १ मध्ये खरे" म्हणत राहिलो तर तो केवळ हेकेखोरपणा मानला जाऊ शकेल. तो हेकेखोरपणा नसून नेहमीसारखा तुमच्यासारखाच व्यवहार आहे, हे मला या लेखमालेत दाखवायचे आहे.

आ.) उलट काही लोक चौकट १ आणि चौकट २ या दोन्ही/तीन्ही/शेकडोही चौकटी ग्राह्य आहेत असे समजतात, आणि सापेक्षतावादानंतर, पुंजभौतिकीनंतर सगळेच विचार "खरे म्हणजे" अर्थहीन आहेत, असे काही बोलतात. मी चौकट २ आणि चौकट १ मध्ये कुठली निवडावी यासाठी "सोय" हा निकष दिला होता. (कारण चौकट १ मध्ये गणिते सोडवायला=विचार करायला सोपे जाते.) "सोय" ही एक विज्ञानातली (=तथ्याबाबत विचारातली) एक मूलभूत कल्पना आहे, हे आपण पुष्कळदा मान्य करत नाही. त्यामुळे "सर्वच अंततोगत्वा अर्थहीन" असे मानणारे लोक "सोयी"ला इतके महत्त्व देतो म्हणून मला तर्कापुढे भित्रा असे मानू लागतील. तुमच्या-आमच्या- व्यवहारातील उदाहरण देऊन मी हे दाखवू इच्छितो, की "सोय" या गोष्टीला मूलभूत महत्त्व आहे, ज्याच्याविना आपली विचारशक्तीच कुंठित होईल.

इ.) याचा विचार करायचा म्हणजे कुठल्याही महत्त्वाच्या शब्दाचे असे व्हायला नको की तुमच्या मनात एक अर्थ, आणि माझ्या मनात दुसरा अर्थ आहे. तुमच्या अर्थाशी माझा अर्थ जुळवून घेण्यास मी तयार आहे - फक्त तो मला सांगावा. या चर्चेतून मला हे दाखवायचे आहे, की "सत्य" हा शब्द रोजवापरात आपण कमीतकमी दोन अर्थांनी वापरतो, जे एकमेकांशी विसंगत आहेत. रोजवापरात बहुतेक वेळा संदर्भामुळे या द्व्यर्थाने काहीही आडत नाही. पण या विशिष्ट वैज्ञानिक/तत्त्वज्ञानाच्या चर्चेत दोन विसंगत अर्थातील गोंधळामुळे विचारधारेचा विपर्यास होतो. हे दोन अर्थ लक्षात घेऊन या चर्चेत एक अर्थ निवडावा (दुसर्‍या अर्थासाठी वेगळा शब्द निवडावा.) असे केल्यामुळे विचाराच्या धाग्यांचा गुंता होणार नाही. दोन अर्थांची गल्लत होऊन आपल्या रोजव्यवहारात एखादे वेळेस होणारी गडबड चित्रित करून मुळात हे दोन अर्थ जाणून घेण्याचा काही फायदा आहे, हे मला वाचकांना पटवायचे होते.

ई.) वरील अ-ते-इ यांच्यामध्ये वाचकांशी एकमत झाल्यावर मग चर्चा करणार की मी बाह्यबलाला खरे का म्हटले. "मिती कमी होते" म्हणून बाह्यबल, हा तर्कटपणा आहे की फुका फुगलेली शब्दबंबाळ क्लिष्टता? असा विचार कोणाच्या मनात आला, तर त्याचे निराकरण व्हावे.

सवड मिळेल तशी, वरच्या अभ्यासू आणि विचारी प्रतिसादांमधून संदर्भ घेत, मी माझे मत स्पष्टपणे मांडेन. मुद्दे अ-आ हे वर नवीन, राजेंद्र आणि तो. यांनी जवळजवळ सोडवले आहेत. त्यांचा एकत्रित गोषवारा देईन. मुद्दा इ. थोडा क्लिष्ट आहे. लेखमालेच्या भाग २ मध्ये विसुनाना आणि प्रकाश घाटपांडे यांनी या मुद्द्याला अत्यंत विचारी स्पर्श केला आहे, पण त्यातून स्पष्ट बोध अजून कळत नाही. त्या विषयावरची माझी मते त्या ठिकाणी लिहीन. तिसर्‍या भागात मी मुद्दा ई बद्दल लिहीन. मुद्दे अ-इ बाबत संवाद झाला नाही तर मुद्दा ई पटणे दुरापरस्त.

ही "फुकाची शब्दबंबाळ क्लिष्टता" नाही, तर ही आपली रोजव्यवहारातली तत्त्वे आहेत, फक्त नेमकेपणासाठी नेहमीपेक्षा काटेकोर शब्दयोजना आहे, हे या लेखमालेतून आपण एकमेकांना पटवू, अशी माझी आशा आहे.

ट्रोकॉइडबद्दल उपचर्चा माझ्या मूळ उद्देशापासून वेगळ्या दिशेला गेली, पण मोठी गमतीदार होती, असे मला वाटते.

पुढील प्रतिसादातून स्पष्ट होणार आहे का?

>> की "सत्य" हा शब्द रोजवापरात आपण कमीतकमी दोन अर्थांनी वापरतो, जे एकमेकांशी विसंगत आहेत.

हे तुमच्या पुढील प्रतिसादातून स्पष्ट होणार आहे का?

गुंतागुंतीचा मुद्दा

"दोन अर्थ" हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. येथे तो सुरू करण्याऐवजी भाग २ मध्ये लिहीन. तिथे विसुनाना यांनी काही तत्त्वे सांगितली आहेत. त्यांच्यातून परस्परविसंगतीची व्यवस्था लावली की कमीतकमी दोन वेगळे अर्थ निघतात.

या भागात अ-आ मुद्देच हळूहळू माझ्या दृष्टीने चर्चेत आणेन.

अ. फिरती चौकटही खरी

वरती अनेकांनी थेट किंवा वेगळ्या शब्दांत आई-बाबांच्या फिरत्या चौकटीला दुजोरा दिला आहे. व्यवहारात ती वापरतो, असे त्यातून दिसते. यात इतकी अधिक सोय असते, की दुसरी कुठलीतरी चौकट गंपूच्या उदाहरणात हास्यास्पद आहे.

त्यामुळे सोय असल्यास फिरत्या चौकटीतून निरीक्षण करणे, म्हणजे माझा हेकेखोरपणा मानू नये. आपण सर्वच हे करत असतो.

सुंदर विवेचन

धनंजयांचे विवेचन व योग्य वेगाने/टप्प्याटप्प्याने विषयाला हात घालण्याची पद्धत हे दोन्ही आवडले. असेच चालूद्या.
लेखमाला पूर्ण होईल तेव्हा त्याचे एकत्रित पुस्तकसुद्धा बनवावे.

- दिगम्भा

आ. सोय हे महत्त्वाचे तत्त्व आहे

"सोय" म्हणजे काय? माझी एकट्याची सोय की "आपली" (माझी+तुमची) सोय?

असा विचार करताना एक महत्त्वाचा प्रश्न येतो - "तुम्ही" असे कोणी सोय असलेली एकके आहेत काय?

लेखमालेच्या भाग २ मध्ये एका प्रतिसादात विसुनाना म्हणतात -
"जे मला पटेल तेच सत्य आणि जे मी करीन तेच योग्य"
(ते पुढे या वाक्याचा काही प्रमाणात वेगळा संदर्भ देतात, तो पुढे देईन.)

याचा असा काही अर्थ काढता येतो की सत्य पटू शकणारा मी एकटा असलो तरी पुरे. (अन्य कोणी असो वा नसो - कारण त्यांना काय पटले, त्याच्याशी माझ्या सत्याचे देणेघेणे नाही.) या विचारसरणीची थोडीफार टोकाची स्थिती म्हणजे "मी या जगात एकटाच विचारी आहे आणखी काहीही नाही", आणि अति-टोकाची स्थिती म्हणजे "जगात फक्त माझे विचारच आहेत, आणि बाकी काहीच नाही." या विचारसरणींना असिद्ध करणे अशक्य आहे. त्या मी मानणार नाही, असे माझे गृहीतक आहे.
ते गृहीतक "३. अन्य कोणीतरी व्यक्ती विचार करण्यास समर्थ आहे, आणि समजण्याची त्याची क्षमता (माझ्या) तुल्य आहे" मी अन्यत्र विशद केले आहे. वाटल्यास तशी माझी श्रद्धा आहे असे म्हणा.

"मी एकटाच विचारक्षम आहे" असे मला वाटत नाही, हे तुम्हाला पटावे, म्हणून काही संकेत देतो.
१. मी तुमच्याशी संवाद साधू बघत आहे. माझ्या लेखनावरून "तुम्ही विचार करून प्रतिसाद देत असला पाहिजे", अशी माझी भावना आहे, असे तुम्हाला पटते का?
२. जो व्यक्ती स्वतःला विश्वात एकटा आहे असे मानतो, त्याला "संवाद" साधायची इच्छा व्हावी, म्हणजे अर्थ लागत नाही.
३. हे शक्य आहे, की मी एकटाच आहे, आणि हा प्रतिसाद स्वतःशी गुणगुणत आहे, आणि माझ्या मते, येणारे प्रतिसाद यंत्रमानव स्वयंचालितपणे लिहीत आहेत, आणि, हा विश्वात माझा एकट्याचा खेळ आहे... पण असा माझा विचार तुम्हाला माझ्या लेखनातून जाणवतो का?
बहुतेक थोड्या विचाराअंती तुम्ही मानाल की "मी विश्वात एकटा आहे" अशी माझी कल्पना नाही.
त्याच प्रकारे, तुमचे लेखन आणि प्रतिसाद वाचून मी मानतो की तुम्हीही स्वतःला "विश्वात एकटा/एकटी" मानत नाहीत.
याबाबत तुमचे वेगळे मत असेल तर तुम्ही म्या यंत्रमानवाला का सांगणार म्हणा? :-)

तर हे गृहीतक मानूया की जगात अन्य व्यक्ती विचारक्षम आहेत, म्हणजे आपापली सोय बघणार्‍या व्यक्ती आहेत.
इतकेच काय मी सुरुवातीला विसूनानांचे एक वाक्य अर्धे तोडले आणि उद्धृत केले, त्याचा पुढचा भाग असा :
- प्रत्येक 'मी'चे असेच !
म्हणजे मला असे वाटते, की विसूनानांच्या मते, त्यांच्याव्यतिरिक्त अन्य विचारक्षम "मी" आहेत. आणि हे बहुतेक लोकांच्या व्यवहाराला धरूनच आहे.
लक्षात असू द्यावे, की वर लाल अक्षरात लिहिलेले वाक्य सिद्धता नसून एक गृहीतक आहे. ते गृहीतक न मानल्यास मला फार कठिण जाईल, इतकेच काय त्यासाठी समर्थन देत आहे.

समजा की अनेक विचारक्षम व्यक्ती विश्वात असले तरी प्रत्येकाचे सत्य वेगळे असण्यास काय प्रत्यवाय आहे? जसे विसूनाना म्हणतात :
"जे मला पटेल तेच सत्य आणि जे मी करीन तेच योग्य" - प्रत्येक 'मी'चे असेच !
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला थोडा अवधी द्यावा कारण अजून "सत्य" शब्दाचा अर्थ आपल्या चर्चेत धूसर आहे. "नवीन" आणि "तो." यांचे असे मत दिसते की एकच सत्य आहे. "तो." म्हणतात :
'सत्य त्या संदर्भ चौकटीपूरते मर्यादित आहे'. मध्ये सत्य अवतरण चिन्हात आहे असे समजावे.
म्हणजे अवतरण चिह्नाशिवायचे सत्य मर्यादित नसते, असे त्यांचे मत आहे.

त्यामुळे मी वेगळा मुद्दा हाताळू इच्छितो :
अनेक विचारक्षम व्यक्ती विश्वात असले तरी प्रत्येकाने एकमेकांकडे, एकमेकांच्या विचाराकडे दुर्लक्ष करण्यास काय प्रत्यवाय आहे?
येथे गंपूची कथा (आणि वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिसादांनी त्यात भरलेला रंग) उपयोगी ठरावी. गंपूला आईकडे, आणि आईच्या संदर्भचौकटीकडे दुर्लक्ष करता येत नाही. बाबा गंपूला बखोटीला धरून उठवतात. व्यवहारात अशा प्रकारची उदाहरणे शेकड्याने आपल्या रोज-अनुभवात येतात. त्यामुळे एकमेकांच्या विचारांकडे लक्ष द्यावे लागते, त्यातून व्यवहार साधतो, याविषयी तुमचे मत माझ्यासारखेच असावे.

असे शक्य आहे, की विचारक्षम व्यक्ती हजारोनी आहेत, त्यांचे कुठल्याही बाबतीत विचार हजारोनी आहेत, त्यामुळे त्यांची मते, विचार, संदर्भचौकट समजली तरीही अतर्क्य आहे. पण व्यवहारात आपल्याला असे दिसत नाही. बाबांना आईची संदर्भचौकट समजली. शिवाय, "तो." वगैरेंनी आईबाबांचीच बाजू घेतली. त्यामुळे आपली नसलेली संदर्भचौकट (=अन्याचा विचार, मत) हे सर्व तर्क्य असले पाहिजे. असाच आपला व्यवहार आहे.

भाग २ मध्ये विसुनानांचे आणि माझे असे बोलणे झाले :

विसुनाना: ... (मे़जॉरिटीप्रमाणे) सत्य मानले जाणार.
धनंजय : (या वाक्यात) अनेक लोक जे मानण्यात एकत्र येतात, त्याबद्दल (विसुनानांनी) विचार केला आहे. त्यामुळे एकमेकांचे मत एकमेकांशी पडताळून बघण्याचा सत्याशी संबंध दिसतो. हे एक महत्त्वाचे तत्त्व सांगितले.

म्हणजे असे काहीतरी आपल्या विचारांच्यापेक्षा वेगळे आहे, जे वेगवेगळ्या लोकांच्या डोळ्यातून बघितले जाते. जरी ते वेगवेगळे बघितले जाते, तरी एकमेक एकमेकांना सांगतो, तेव्हा एकमेकांचे म्हणणे आपणांस तर्क्य वाटते. या असे काहीतरीला आपण "वस्तू" म्हणू शकू. आणि "असे काहीतरी आहे" या तत्त्वाला वस्तुनिष्ठतेचे तत्त्व म्हणू.

गंपूच्या उदाहरणावरून दिसते की वस्तुनिष्ठतेचे तत्त्व मानले नाही तर आपला रोजव्यवहार ठप्प होईल.

वरच्या लाल अक्षरात लिहिलेले गृहीतक मानले नाही, तर वस्तुनिष्ठता मानण्याची काहीही गरज नाही, हे सांगणे नलगे. कारण गंपूची कथा आणि सगळाच रोज-व्यवहार "एकट्या" मीचे स्वप्नरंजन होय.

वस्तुनिष्ठता मानतो ती केवळ व्यवहारातल्या सोयीसाठी. आणि एकमेकांशी अनुभवांची पडताळणी करतो तेही रोजव्यवहाराच्या सोयीसाठी. वस्तुनिष्ठता ही "एकट्या" तार्किकदृष्ट्या अपरिहार्य नाही. म्हणून "सोय" हे या सत्यशोधनातले मोठे पायाभूत तत्त्व आहे, असा या चर्चेतून माझा निष्कर्ष आहे.

सोय = स्वार्थ

स्वार्थ= स्व + अर्थ. 'स्व' म्हणजे कोणत्याही सजीवातील नष्ट न होण्याची प्रवृत्तीने (जाणीवेने) एकत्र आलेल्या मूलद्रव्यांचा समूह.
'नष्ट न होणे' हा पराकोटीचा स्वार्थ.तो अत्यंत स्वाभाविक.
त्याहीपेक्षा कमी पातळीवर पेशी/मूलद्रव्यसमूहाला कमीत कमी त्रास/ कष्ट होतील यासाठी जे जे करावे लागेल ते योग्य.
यात फक्त 'पुनरुत्पादन आणि संवर्धन' या समूहाला नष्ट न होऊ देणार्‍या क्रियांमधील कष्टांना आपोआप सूट.
'टर्मिनेटर'च्या भाषेत कोणत्याही सजीवाला 'फंडामेंटल डायरेक्टीव्हज' (पायाभूत दिशानिर्देश) असे :
१. तुझ्यातील मुलद्रव्यसमूह अनैसर्गिकरित्या नष्ट होऊ देऊ नये.
२. त्यासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी कृतीस योग्य आणि न लागणार्‍या गोष्टी कृतीस अयोग्य आहेत.
३. तुझ्यातील हा मूलद्रव्य समूह नैसर्गिकरित्या नष्ट होण्याआधी त्याचे शक्य तितके जास्तीत जास्त पुनरुत्पादन करावे.
४. जर आपल्याला वाढण्यास मदत होत असेल तर अन्य मुलद्रव्यसमूहांना वाढण्यास मदत करावी. (परंतु हा निर्देश यापूर्वीच्या निर्देशांच्या आड येत असेल तर या क्र.४ निर्देशाकडे दुर्लक्ष करावे.)

या चार निर्देशांमुळे उत्क्राती झाली आणि सजीवसृष्टी विकसित होत गेली. पैकी क्र. १ हाच निर्देश प्रमुख. नंतरचे त्याला केवळ पूरक.
चौथ्या निर्देशामुळे समूहजीवन आणि सहजीवन सुरू झाले.

परंतु उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर पोचल्यावर निर्माण झालेल्या मानवाच्या सुपिक 'मेंदू'मुळे त्याला 'सबकॉन्शसली' दुसर्‍या आणि चौथ्या निर्देशातला विरोधाभास 'दिसला'. ('सत्य' ही संकल्पना फक्त मानवांमध्ये/ मेंदूची वाढ झालेल्या वानरांमध्ये असावी असे मानायला हरकत नाही.) सत्य- असत्य, नीति-अनिती या संकल्पना दुसर्‍या आणि चौथ्या निर्देशांतील विरोधाभासामुळे निर्माण झाल्या.सत्य-असत्य ही संकल्पना मुळात अशी स्वार्थावर उभारलेली आहे.

("सत्य" शब्दाचा अर्थ आपल्या चर्चेत धूसर आहे.- याच अर्थाने.)
अध्यात्मातले/ तत्वज्ञानातले 'सत्य' (नितिमत्ता) स्वार्थावर अशासाठी की (स्मुलियनप्रमाणे माझेही मत) -
मुळात 'फ्री विल' मुळे (निर्देश क्र. १) मिळालेली (निर्देश क्र. २) सूट आणि बरोबर आलेली (निर्देश क्र.४) जबाबदारी यांच्या कात्रीत सापडलेल्या मेंदूने शेवटी दुसरा निर्देश महत्वाचा आहे हे मान्य केले. परंतु त्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक संघर्षामुळे आणि अधःपतनाच्या जाणीवेमुळे निर्माण होणार्‍या 'मूलद्रव्यसमूहविनाशक' (पाल्पिटेशन्, हायपरटेन्शन इ.) परिणामांमुळे निर्देश क्र.१ व २ दोन्ही आक्रमित होतात. त्यामुळे जास्टीत जास्त शक्य तितके निर्देश क्र.४ चे पालन केले असता मूलद्रव्यसमुहाचा फायदा होतो.
परंतु तसे नसेल तर तो मोडायला हरकत नाही.
घिसेपिटे उदाहरण : 'नरो वा कुंजरो वा'.फक्त पायाचा आंगठा गळून पडेल.

दुसरा अर्थ: भौतिक 'सत्य'
(संदर्भचौकट) - वरील निर्देश क्र. ४ प्रमाणे समुहाचा विकास व्हावा म्हणून विज्ञान/शास्त्र निर्माण झाले. (त्यामुळे समुहाला धोका आहे असे आढळले की त्याला विरोध होत असतो. उदा. अल्टर्नेटिंग करंट हा डायरेक्ट करंटच्या तुलनेने धोकादायक आहे असे खोटे प्रसिद्ध करून एडिसनने टेस्लाला मागे सारले होते. अणुध्वम अथवा तत्सम विस्फोटकांमुळे सर्व सजीवसृष्टी नष्ट होईल असा धोका असल्याने त्याला विरोध होतो. जनुकीय तंत्रज्ञानाने बनवलेल्या नव्या सजीवसमुहांमुळे होणार्‍या परिणामांची कल्पना नसल्याने धोकादायक म्हणून त्याला विरोध होतो. इ.इ.)
परंतु लागलेले शोध हे जर कोणतीही क्रिया करण्यासाठी मूलद्रव्यसमूहाकडून जास्त ऊर्जा घेत असतील (पर्यायाने निर्देश क्र. २ चे उल्लंघन करत असतील तर-) आणि कमी ऊर्जेचे शोषण करणारी पर्यायी व्यवस्था असेल तर अशी व्यवस्था स्विकारली जाते. (हीच ती संदर्भचौकट!)
म्हणून न्यूटनच्या विश्वातील सूत्रे एखाद्या प्रश्नाची उकल करण्यासाठी त्या मूलद्रव्यसमूहाला पुरेशी असतील तर तो आईनस्टाईनच्या विश्वातील (जास्त गुंतागुंतीची आणि जास्त ऊर्जा वापरणारी) सूत्रे वापरण्याचे टाळेल. हाच तो स्वार्थ किंवा सोय!

मला वाटते इतके विश्लेषण पुरेसे आहे.

फारच पुढची पायरी!

विसुनानांचे विचार एकदम पुढच्या टप्प्यावर गेलेले आहेत! पण तिथे पोचण्याचा मार्ग फार दुष्कर आहे. आणि आपण सर्व तिथे पोचूच असे नाही.

इथे "सत्य काय", "पृथ्वी स्थिर आहे की नाही" अशा गोष्टीच ठरलेल्या नाहीत. तेव्हा "प्राणी मूलद्रव्यांपासून बनलेले असतात" याविषयी अनेक शंका चर्चा करणार्‍यांमध्ये येऊ शकतील. गंपूच्या कथेसारखी मी मूलद्रव्य-विरोधी कथा सहज लिहू शकतो. गंपू जव्हेर्‍याच्या दुकानात जाऊन हिरा कोळशाच्या भावाने विकत घ्यायचा प्रयत्न करतो, "मूलद्रव्य एकच आहे" सांगतो, वगैरे...

त्यामुळे टर्मिनेटरच्या चार निर्देशांपर्यंत पोचण्यापर्यंतची माहितीची देवाणघेवाण या चर्चेत झालेली नाही.

पण तुमचे विचार समर्पक आहेत, अवांतर नाहीत, पण या क्षणी मी त्यांना माझ्या उत्तरात गोवणे फारच कठिण आहे.

सत्य शब्दाच्या तिसर्‍या अर्थापाशी तुम्ही गेलात! भौतिक संदर्भातच "सत्य" शब्दाचा अर्थ धूसर आहे. कारण आपल्या चर्चेतले काही जण म्हणत आहेत की भौतिकाबद्दल सत्य विचार करणार्‍याच्या मनात आहे, तर काही म्हणतात की ते सर्वांसाठी एकच आहे. तुमचे हेसुद्धा विवेचन संदर्भात योग्यच आहे, पण फार पुढच्या पायरीवरचे आहे. नैतिकतेच्या विचारापर्यंत मी या छोट्या लेखमालेत पोचेन की नाही, हे सांगता येत नाही.

सोय=स्वार्थ हा पटण्यासारखा अर्थ आहे.

पण येथे मी तो "सोय"-शब्द या मर्यादित अर्थाने वापरला आहे की "विचार/व्यवहार कुंठित न होवोत".

आपल्या पूर्वजांच्या विचारक्षमतेला मान देणे

"सत्य-असत्याच्या" निर्णयासाठी तुमचे व्यावहारिक विचार काय? हे कळण्यासाठी या ठिकाणी मी चर्चा सुरू केली.

आपण सर्वांनी शाळेत सूर्यमध्यवाद शिकला. तो गंपू आणि त्याच्या आईबाबांच्या उदाहरणात उपयोगी पडत नाही .(कारण ते सत्य मानल्यास आपण गंपूच्या बाजूने अव्यवहार्य निर्णय देऊ.) सूर्यमध्यवाद व्यवहारात काय, पुस्तकांतही "सत्य" नसावा. कारण आजकाल आपण म्हणतो की सूर्य आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरतो. सर्वांनी शाळेत शिकलेला हा सूर्यमध्य "सिद्धांत" हा व्यवहारातल्या "सत्य-असत्या"च्या निर्णयासाठी निरुपयोगी आहे, हे तुम्हाला पटले असावे.

तर फार थोड्यांनी शिकलेला पुंजभौतिकी सिद्धांत, सापेक्षसिद्धांत, मूलद्रव्यसिद्धांत, हे सर्व व्यवहारात "सत्य-असत्य" निर्णय करताना कसे उपयोगी ठरावेत?

वर मी माझ्या दिवंगत आजीचा उल्लेख केला आहे, जी अर्धशिक्षित होती, पण कमालीची हुशार होती. तुमच्या ओळखीचे, तुमच्या पूर्वजांपैकीही असे शेकडो लोक असतील. या लोकांनाही व्यवहारात "सत्य-असत्या"ची पारख होती. माझ्या आजी सारखेच त्यांना पुंजभौतिकी सिद्धांत, सापेक्षसिद्धांत, मूलद्रव्यसिद्धांत हे सर्व माहीत नसावेत. त्यामुळे "सत्य-असत्या"ची पारख करण्यास या सिद्धांतांचे ज्ञान आवश्यक नसावे. हे तुम्हाला पटावे.

मला "पुंजभौतिकी", "सापेक्षतावाद" या संज्ञा माहीत आहेत म्हणजे मी माझ्या आजीपेक्षा हुशार होत नाही. उलट तिच्याशी बोलून या सर्वांशिवाय ती व्यवहारात "सत्य-असत्य" कसे जोखत असे हे जाणण्याची मला जिज्ञासा आहे. माझ्या आजीशी संवादातून काही मिळवायचे तर "पुंजभौतिकी", "सापेक्षतावाद" या गोष्टींचा प्रमाण म्हणून उल्लेख न आला तर बरा. जे पुढे कधीतरी आपल्याला पटेल असे प्रमेय म्हणून उल्लेख आला तर ठीक.

जर मी माझ्या [दिवंगत] आजीला असा मान दिला नाही, तर माझी नात, [जी अजून जन्मलीही नाही :-)] ती मला मान कसा देईल? मला म्हणेल "आजोबा, 'ठठ्ठ्खट्तंगा'चा सिद्धांत अमुक म्हणतो म्हणून अमुक-तमुक, तुला तर खरे-खोटे काहीच कळत नाही, कसा रे तू बुद्दू!" तो काय तो सिद्धांत ती तिच्या शाळेत शिकली असेल, मला मात्र माहीत नसेल.

येथे "माझी दिवंगत आजी" केवळ उदाहरण म्हणून दिलेली आहे. माझ्या शेजारी राहाणारा सफाई-कामगार असाच हुशार आहे, असू शकेल. त्यालाही "सत्य-असत्य" जोखायची "काही जाण" आहे, पण "पुंजभौतिकी" बद्दल तो शिकलेला नाही. त्याच्याशी मला संवाद साधता आला पाहिजे. (त्याला कंटाळा आला तर तो संवाद साधणार नाही, हे ठीक. तो दयाळू असेल, त्याची भूमिका मला समजावण्यात त्याला रस असेल, असे समजा. मी त्याला अमान्य अशा तांत्रिक संज्ञा वापरल्या, तर त्यामुळे तो माझे प्रश्न-प्रतिसाद मानणारच नाही. त्याच्या अनुभ-ज्ञानाचा प्रकाश संवादावर पाडण्यास तो नकार देईल. तोटा माझाच होईल.) येथे केलेली चर्चा खूप वेगवेगळ्या लोकांना पूर्णपणे मान्य होऊ शकेल अशी इच्छा आहे. ती "द्विकालाबाधित" असावी. (द्विकाल म्हणजे भूत आणि वर्तमानकाळ.) त्यामुळे शब्दांचे बदलणारे अर्थ जाणून महत्त्वाच्या शब्दांच्या व्याख्या देणे कळीचे आहे.

म्हणून "सत्य-असत्य" कसे ठरवले जाते, याचा विचार करताना कुठल्याही विशिष्ट शास्त्रातील तांत्रिक संज्ञा-परिभाषा प्रमाण म्हणून येऊ नयेत. असे शब्दांत बोलायची आपल्याला सवय नाही, त्यामुळे सोपे शब्द सापडणे कठिण जात आहे. तुम्ही हे समजून घ्यावे. पण ही पारख आपण व्यवहारात लीलया करत असतो. त्यामुळे शब्द ठरवल्यानंतर या कल्पना आकळण्यास कठिण जाऊ नये.

बहीणाबाई

आपला वरील प्रतिसाद आणि विशेष करून आजीचा उल्लेख ऐकल्यावर मला बहीणाबाईंच्या ओळी आठवल्या (संपूर्ण कविता माहीत नाही): त्यात त्या सुर्याचे वर्णन करताना म्हणतात की "उगवला नारायण... नवरत्नांच जानवं तुझ्या डाव्या भूजेवरी" यातील ही जानव्याची ओळ जरा आश्चर्यकारक आहे: एक म्हणजे अशी "अडाणी" बाई नवग्रह सूर्याभोवती फिरताहेत असे म्हणते, आणि जी फिरायची दिशा आहे ती पण "डाव्या भूजेवरी" म्हणत सांगत आहे. हे कसे काय शक्य झाले?

सावरकरांनी पण तुरूंगात जगन्नाथाचा रथ ही कविता लिहीली (तेंव्हा त्यांना विज्ञाननिष्ठ असल्यामुळे ग्रहमालेबद्दल कल्पना होती असे म्हणू शकू) त्यात त्यांच्या ओळी होत्या : "या सूर्यशतांच्या किती मशाली जळती, मधुनीच शतावधी चंद्रज्योती या उडती, सळसळत बाण हे धूमकेतूचे सुटती..." थोडक्यात विश्वाच्या व्यापकत्वाची कल्पना होती .

जर कधी काळी आपल्या पूर्वजांना ज्ञान होते असे गृहीत धरले आणि मधल्याकाळात ते सार्वजनीकरीत्या कुठल्याही कारणाने लुप्त झाले असले तरी ज्याला "जेनेटीक मेमरी" म्हणतात तसे ते कुठेतरी आपल्यामधे असते असे वाटते. एखादी बहीणाबाई असते जिची अशी "मेमरी" जागृत होते.

अवांतरः जेनेटीक नाही पण सामाजीक स्मरणशक्तीचे एक मजेशीर उदाहरण कायम दिसते. एखाद्या रस्त्यावरून जोरात गाड्या जात असतात. अथवा एखादा सिग्नल बरेच चालक तोडतात. मग तेथे पोलीसांच्या गाड्या पहारा द्यायला लागतात आणि पकडून तिकीटे देयला लागतात. वास्तवीक ते काही १०% लोकांनापण तिकीटे देत नसतील आणि सर्व चालक काही एकमेकांशी बोलत नाहीत अथवा ओळखत नसतात तरी देखील वाहतूक हळू हळू सुरळीत आणि नियमबद्ध होते.

 
^ वर