पाणी

गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या युनाटेड नेशन्स मधे एक पाण्यावरचे प्रदर्शन बघण्याचा योग आला होता. तसे प्रदर्शन साधे होते. पण त्यातील छायाचित्रे आणि माहीती थोडक्यात पण प्रश्नाची जाणीव करून देणारी होती. येथील वाचकांना आवडेल असे वाटल्याने थोडक्यात लिहीत आहे. प्रदर्शनाची चित्रे त्यावेळेस बरोबर असलेल्या कॅमेराने काढल्याने काही मर्यादा समजून घ्याव्यात ही विनंती.पुढचे वर्ष (२००८) हे युनायटे नेशन्स "जागतीक सांडपाणी वर्ष" ( सॅनिटेशन इयर) म्हणून जागृकता निर्माण करण्यासाठी वापरणार आहे. येथे जास्त खोलात न जाता काही ठळक माहीती देत आहे. लिहीण्यासारखे बरेच काही असले तरी, या माहीती वरून कल्पना येईल. जगाबद्दलच्या माहीती बरोबर जेथे शक्य आहे तिथे भारताबद्दल पण माहीती देत आहे.


 1. जागतीक स्तरावर १८% लोकांना (१.१ अब्ज) पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. भारतासाठी हा आकडा पण १८ % च आहे. (२००० साल)

 2. जागतीक स्तराववर ४२% लोकांना (२.२ अब्ज) सांडपाण्याची व्यवस्था अजूनही नाही आहे. भारताच्या बाबतीत हा आकडा फक्त शहरी भागापुरताच मिळू शकला आणि त्यात ४५% लोकांसाठी अजूनही सुविधा नाही. (२००० साल)

 3. अनियोजीत शहरीकरण, (मानवी कारणांमुळे) पर्यावरणीय असमतोल, दुर्बळ संस्थांत्मक (इन्स्टीट्यूशनलायझेशन) पाया, इत्यादी गोष्टींमुळे पाण्याशी संबंधीत अपघात होऊन लक्षावधी सामान्य माणसांना तोंड द्यावे लागते. - २६ जुलैची मुंबई, बांग्लादेशात घडणार्‍या घटना, ब्रम्हपुत्रेचे पूर ही काही भारतीय संदर्भातील उदाहरणे आहेत.

 4. ९०% सांडपाणि आणि ७०% औद्योगीक प्रदुषित पाणी हे विकसनशील देशांमधे सरळ नद्यांमधे तसेच सोडण्यात येते. (गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधू कावेरी - सर्वच मैल्या झाल्या आहेत...) - परीणाम अर्थातच पिण्याचे पाणि कमी होणे. अजून उदाहरणे असतीलच, पण सांगलीकरांना विचारा आज कृष्णा काठची काय अवस्था साखरकारखान्यांच्य मळीने केली आह ते...

 5. आंतर्सीमा वाद - २६९ नद्यांच्या प्रदेशात विभिन्न राष्ट्राराष्ट्रांमधे वाद आहेत. भारताबद्दल बोलायचे तर -  भारत-चीन, भारत पाकीस्तान, भारत-बांग्लादेश असे वाद चालले आहेत. कावेरी सारखे अंतर्गत वाद जगभर अनेक असतील. पंजाबच्या प्रश्नाचे एक कारण हे सतलज पाणी वाटप हे होते.

 6. बाजूच्या छायाचित्रात नीट लिहीलेले नाही, पण अजून एका "प्रेझेंटेशन" मधे ऐकले होते की अफ्रिकेत अनेक मुलींचे शिक्षण थांबण्याचे एक कारण हे त्यांचा पाणी आणण्यासाठी उपयोग हे आहे...

कच्च्यामालापासून ते उत्पादन वापर आणि निर्मूलन करे पर्यंतचा विचार केल्यास नेहेमीच्या वापरांना लागणारे पाण्याचे प्रमाण आणि म्हणून पाण्याचे पर्यायाने महत्त्व समजते:


 1. १ कप कॉफी - २८० लिटर्स (७४ गॅलन्स)

 2. १ मायक्रोचीप - ३२ लिटर्स (८.५ गॅलन्स)

 3. १ बर्गर - २४०० लिटर्स (६३४ गॅलन्स)

 4. १ ब्रेड स्लाईस - ४० लिटर्स (१०.६ गॅलन्स)

 5. १ ग्लास वाईन - १२० लिटर्स (३२ गॅलन्स)

 6. १ पेपर (ए४) - १० लिटर्स (२.६ गॅलन्स)

 7. १ कॉटन टिशर्ट - ४१०० लिटर्स (१०८३ गॅलन्स)

 8. १ टोमॅटो - १३ लीटर्स (३.४ गॅलन्स)

 9. लेदरचे बूट - ८००० लिटर्स (२११४ गॅलन्स)


पाण्याचे जगातले दुर्भिक्ष ह्या चित्रात दिसू शकते.  लाल रंग हा दुर्भिक्ष दाखवतो. भारतात काही भागत हे सहज दिसून येते.

पाण्याच्या बाटल्यांचा होणार्‍या कचर्‍याचे हे चित्र बरेच काही सांगून जाते. या चित्रात नसलेली काही माहीती. भारतात बॉटल्ड वॉटर का प्यावे लागते हे थोडेफार तरी समजू शकते. पण अमेरिकेसारख्या देशात काही कारणे सोडल्यास (उ.दा. लांबच्या प्रवासात ड्राईव्ह करताना, विमानात, इत्यादी) बॉटल्ड वॉटरची काही गरज नाही. अमेरिकन कायद्याप्रमाणे बॉटल्ड वॉटर आणि नळाचे पाणी ह्यात पिण्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही. तरी देखील मार्केटींग व्यवस्थित केल्याने बॉटल्ड वॉटर जास्त प्यायले जाते. अमेरिकेतील ४०% बॉटल्ड वॉटर हे टॅप वॉटर "बॉटल" मधे घालून दिलेले असते. बरेचसे फिजी सारख्या दूरच्या देशातून पण येते. तसे आल्याने लागणारे इंधन खर्च अधीक असतो आणि पर्यायाने प्रदुषणाला मदत होतेच, पण स्थानीक लोकांच्या तोंडचे पाणी "लिटरली" पळवले जाते!  तरीपण फक्त अमेरिकेत ३० अब्ज पाण्याच्या बाटल्या वर्षभरात वापरल्या जातात! (पोलंड स्प्रिंग सारखे वॉटर फाउंटन्स वेगळे!). यातील बर्‍याचशा बाटल्या १००% रिसायक्लींग होत नसल्याने कचर्‍यात जातात आणि हजारो वर्षे लँडफिलमधे राहतात. तिथेच त्यातील विषारी रसायने झिरपून जमिनीत जातात आणि परत जमिनीतील पाण्याचे स्त्रोत खराब करतात!

या चित्रात अफ्रिकेमधे सबसहारन भागात ७०० हून अधिक बसवलेले "प्ले पंप" दिसतात. मुले एकीकडे त्या "मेरी गो राऊंड" सारख्या दिसणार्‍या चक्रावर खेळत आहेत त्यामुळे जमिनीतील पाणी पंपासारखी प्रतिक्रीया घडून काढले जात आहे!


शेवटचे हे चित्र आता बरेच प्रसिद्ध झाले आहे. पोलर बेअर जे उत्तर / दक्षीण ध्रुवांच्या बर्फाळ प्रदेशात राहते, त्याला "ग्लोबल वार्मिंग" मुळे वितळणार्‍या बर्फाच्या पाण्याशी सामना करावा लागत आहे.

यात अशुद्ध पाणी निर्माण करत असलेली रोगराई हा मुद्दा तरी आलेला नाही.  सुरवातीस म्हणल्याप्रमाणे ही अगदी मर्यादीत माहीती आहे. पण जीवनातील एक गोष्ट जी निदान येथे येणारे बहुतेक करून सर्वच जण "टेकन फॉर ग्रँटेड" करतात अर्थातच या लेख/चर्चे संदर्भात "पाणी", हे दैनंदीन जीवनात वापरयला मिळणे हे एका अर्थी चांगले नशीब आहे असेच म्हणावे लागेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

त्यापेक्षा...

(आज सकाळपासून मी २८० * ६ लिटर पाणी वापरले, कॉफीमुळे.)

त्यापेक्षा वाईन प्यायला असतात तर कमी पाणी वापरले गेले असते!!

भूगर्भातील पाणी

खेड्यात जागोजागी दिसणार्‍या हातपंपांच्या ऐवजी जर असे प्ले पंप बसवलेत तर धमाल येईल !!

नक्कीच चांगले होईल. मुले खेळतीलही आणि पाणि कमी काढले जाईल (हा मात्र माझा, होप अगेन्स्ट होप!)

आपल्याकडे या संदर्भात असलेला प्रश्न एका अर्थी अजूनच भिषण आहे. लोकं वाटेल तितके पाणि भूगर्भातून उपसतात. परीणामी पाण्याची पातळी खाली जाते. ती जाग खाडी अथवा समुद्रातील पाणि हळू हळू भरून काढते. परीणामी जमीन क्षारयुक्त/खारी होवून नापीक होवू लागते. नदी जवळच्या भागात नदिचे पाणी शिरूनही आणि उपसलेले पाणि शेतात वाटेल तसे वापरून वॉटर लॉगिंग होऊन कजमिन खराब होते. पण या गोष्टी अदृश्य असतात, एकदम घडत नाहीत, थोडक्यात स्लो पॉयझनींग असते, परीणामी लोकांना त्याचे गांभिर्य कळत नाही. पण नंतर जमिनी नापीक होतात तेंव्हा वेळ निघून गेलेली असते...

खरे का?

पण अमेरिकेसारख्या देशात काही कारणे सोडल्यास (उ.दा. लांबच्या प्रवासात ड्राईव्ह करताना, विमानात, इत्यादी) बॉटल्ड वॉटरची काही गरज नाही. अमेरिकन कायद्याप्रमाणे बॉटल्ड वॉटर आणि नळाचे पाणी ह्यात पिण्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही.

हे खरे का? कारण नळाच्या पाण्याच्या आणि बॉटल्ड पाण्याच्या चवीत खूप फरक आढळतो.

आणि, अमेरिकेतील ४०% बॉटल्ड वॉटर हे टॅप वॉटर "बॉटल" मधे घालून दिलेले असते

हे जर खरे असेल तर ती फसवणूकच नाही का?

पाणि - बाटलीतले आणि नळाचे

हे खरे का? कारण नळाच्या पाण्याच्या आणि बॉटल्ड पाण्याच्या चवीत खूप फरक आढळतो.

अमेरिकेपुरते बोलायचे तर बाटलीतील पाणी हे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन सर्टीफाय करते. त्यांचे नियम हे एन्व्हॉयर्नमेंटल प्रोटेक्षन एजन्सी शी त्यांनी मिळते जुळते केले आहेत (इपिए नळाचे पाणी - आणि सेफ ड्रिंकींग वॉटर ऍक्ट पहाते).

पाण्याची चव ही वेगवेगळ्या ठिकाणि वेगवेगळी असते. (म्हणूनच तर १२ गावचे पाणी प्यालय म्हणतात!). नळाचे पाणि पण जागोजागी चवीस वेगळे वाटते. त्यामुळे त्यात नवल ते काहीच नाही.

आणि, अमेरिकेतील ४०% बॉटल्ड वॉटर हे टॅप वॉटर "बॉटल" मधे घालून दिलेले असते. हे जर खरे असेल तर ती फसवणूकच नाही का?

ही जुलै २००७ मधील बातमी वाचा: Pepsi says Aquafina is tap water

तसेच हा नॅशनल जिओग्राफिकचा लेख पहा...

हो,

अमिरेकेत तसेच युरोपातल्या पुढारलेल्या देशांत नळाचे पाणि अन बाटलीतले पाणि सारखेच असते. काल एक जुने "मनी" मासिक चाळताना त्यात ही माहिती वाचली.

आवांतार: मनी मासिकात खर्च वाचयावचे खूप साधे पण नामी उपाय सांगितलेले असतात. नळाचे पाणि प्या, ८९ पेक्षा जास्त ग्रेडचे गॆसोलिन वापरु नका, वगैरे. मी मागच्या पाच वर्षात साधरण हजार डॊलर ९३ ग्रेडच्या मागे लागून व्यर्थ घालवल्याचे माझ्या लक्षात आले. ८९ वाले गॆसोलिन भरले असते तर कारच्या इंजिनाचे हजार डॊलरचे नुकसान झाले नसते अन हे पैसेही गेले नसते. :(

आपला,
(दिवाळखोर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

खरेच की...

पण का कुणास ठाऊक नळाच्या पाण्याने केलेल्या चहा/कॉफीला विकतच्या पाण्याने केलेली चव काही येत नाही. याचे कारण कदाचित मानसिकतेत असावे.

धन्यवाद..

कॉफी नव्हे पण चहा प्यायला. चव थोडी वेगळी वाटलीच पण anyway, I will get over it.

तुमची कोल्ड कॉफीदेखील करून् बघीन १-२ दिवसात..

जगभर

अफ्रिकेत अनेक मुलींचे शिक्षण थांबण्याचे एक कारण हे त्यांचा पाणी आणण्यासाठी उपयोग हे आहे...

आफ्रिकेत असे नव्हे जगात बर्‍याच ठिकाणी. किंबहुना मुलींनी पाणी आणणे ही जगभरची रीत आहे, त्याचा त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होतो हे वरून लक्षात येत नाही.

धरणे - छोटी आणि मोठी

सरदार सरोवर प्रसंगी जो वाद-विवाद झाला त्यात एक मुद्दा छोटी-छोटी अनेक धरणे विरुद्ध एक महाकाय धरण असा होता. मोठे धरण लवकर गाळाने भरते शिवाय त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करावी लागते. त्यात मानवी विस्थापनाबरोबरच कित्येक एकर सुपिक जमीन आणि झाडा-झुडुपांचा नाश होतो. त्यामुळे नफ्या-तोट्याचे गणित मांडले तर ते फारसे लाभदायक ठरत नाही, असे प्रदिपादित करण्यात आले होते.

यात कितपत तथ्य आहे?

सरदास सरोवर

...त्यात मानवी विस्थापनाबरोबरच कित्येक एकर सुपिक जमीन आणि झाडा-झुडुपांचा नाश होतो....यात कितपत तथ्य आहे?

तथ्य असणारच. सरदार सरोवरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत दोन्ही बाजूने बोलणे शक्य होऊ शकेल. मी या विशिष्ठ प्रकल्पाबाबत तेव्हढा अभ्यास केलेला नाही. पण एकंदरीतच आवक्याबाहेर जाईल इतका मोठा प्रकल्प करू नये असे वाटते. विकास (डेव्हलपमेंट) आणि नैसर्गीक संरक्षण (कॉन्झर्वेशन) या बाबत नेहेमीच वाद होतात आणि मला वाटते की दोन्ही कडून टोकाची भुमीका घेतली जाते. दोन्ही बाजूने तडजोड होणे महत्वाचे आहे. कुठल्याही प्रकल्पाच्या बाबतीत एक गोष्ट नक्कीच आहे की थोडे तरी नैसर्गीक साधनसंपत्ती ही लयाला जाणार. महत्वाचे काय ठेवावे की एखादी जात समूळ नष्टच होत नाही आहे ना ते.

सरदार सरोवरासारख्या प्रकल्पांच्या बाबतीत झाडाझुडपांप्रमाणेच (त्याहूनही अधीक) विस्थापितांचे हाल होणार नाहीत ते आणि त्यांना योग्य मोबदला मिळवून देणे हे पहाणे आहे. कोयना प्रकल्पामधील काही विस्थापितांना आजतागायत मोबदला मिळाला नाही असे म्हणले जाते. अशी इतरत्रही उदाहरणे असतील, पण त्यावरून शिकून त्याची काळजी घेणे हे आता या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्यांनी करावे. कारण नाहीतर ते सुप्रिम कोर्टात पण हरले आहेत. त्यामुळे निदान या बाबत तरी ते वॉच डॉग ची भुमिका बाळगून काही यश (आणि पूण्य/सदीच्छा) पदरात पाडून घेऊ शकतील असे वाटते.

मोठी धरणे = नुकसान

मोठ्या धरणांनी त्या-त्या नद्यांच्या परिसरातली "इकोसिस्टम" पूर्णपणे उध्वस्त होते. हजारो वर्षे अखंड वाहत्या असणा-या नद्यांची पात्रे उघडी पडल्याने तेथे निर्माण झालेल्या अनेक दुर्मिळ वृक्ष, वेली, किटक, प्राणि यांचा समूळ नायनाट होतो हे संशोधकांनी सिद्ध केलं आहे. जगातल्या हजारो मोठाल्या नद्यातली आता केवळ एकच नदी शिल्लक आहे जी अजूनही अखंड वाहते. तिचे नाव विसरलो पण ती तिबेट-चीन-म्यानमार अशी वाहते.

आपला,
(पर्यावरणवादी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

उत्तम लेख

डोळे उघडावेत असा लेख!
शहरी माणसे ग्रामीण लोकांचे पाणी शोषण करूनच जगत आहेत यात शंका नाही.
कोयनेचे पैसे कधीच मिळाले नाहीत. कोयना धरणाने अनेक कुटूंबांना आयुष्यातून उठवले आहे. याचा संदर्भ
पुलं च्या ती फुलराणी मध्ये ही एका संवादात आला आहे.
फुलराणी ही कोयना धरणा मुळे विस्थापीत होवून मुंबईत येते.
णासे उदाहरण असल्यावर मग सरदार सरोवराचे मिळतील ही शक्यता तरी आहे का?
इतके वाद झाल्यावर सरकारी स्तरावर काही हालचाल झाली. केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न करून सरकार ने हे धरण लोटले आहे.
संपुर्ण परिस्थितीचे तोटे लक्षात आल्यावर वल्डबॅकेनेही आपले हात काढून घेतले होते. (हात पोळलेला प्रकल्प असल्याने वल्डबॅकेच्या स्थळावर याविषयी अतिशय त्रोटक माहिती मिळते!)

मेधा पाटकरांनी यासाठी आंतरराष्ट्रीय कँपेन उभारले होते किंवा लागले होते. त्यांनी कल्पकतेने आंतरजालाचा उपयोग योग्यरीतीने स्थानीक प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी केला होता/आहे. (हे एक लोकल टु ग्लोबल चे आंतरराष्ट्रीय उदाहरण म्हणूनही गाजले) हे पहा
या स्थळावर आजवरचे सर्व लढे आहेतच. www.narmada.org/sardarsarovar.html
शिवाय यातील अरुंधती रॉय ने लिहिलेला दीर्घ निबंध निश्चितपणे वाचनीय आहे. वेळ देवून वाचा... यात बरेच काही आहे.
आपला धरणांविषयी चा आपला दृष्टीकोन बदलण्याची ताकद असलेला हा लेख आहे. मोठा असल्याने हवे तर प्रिंट काढून वाचा!

याचा पुढील भाग म्हणजे, इंटरनॅशनल रिव्हर्स नेटवर्क
internationalrivers.org ही नद्यांच्या संवर्धनासाठी स्थापन झालेली चळवळी संघटना.
असो,
हे वाचून असे वाटले की आता प्रत्येक प्रॉडक्टवर ' एकुण किती पाणी वापरले जाते आहे' याचा तक्ता देणे सक्तीचे असावे.

आपला
चळवळ्या
गुंडोपंत

आणखी एक् मुद्दा...

घराच्या प्रत्येक नळाला येणारा प्रत्येक थेंब हा "पिण्यायोग्य" पाण्याच्या असावा असा एकंदरीत संकेत दिसतो. परंतु ते कितपत योग्य आणि व्यवहार्य आहे?

घरात येणार्‍या एकूण् पाण्यापैकी किती टक्के पाणी आपण पिण्यासाठी (अधिक स्वयंपाकासाठी) वापरतो? आणि किती टक्के पाणी इतर गोष्टींसाठी (स्नान, मल-मूत्र विसर्जन, कपडे धूणे, भांडी घासणे, बागकाम इ.) वापरतो याचा कोणी अभ्यास केला आहे काय्?

जर प्रत्यक्ष पिण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचे प्रमाण फारच कमी असेल तर शासनाने सर्वच्यासर्व पाणी "पिण्यायोग्य" करण्यासाठी अवाढव्य खर्च करण्याची आवश्यकता आहे काय?

व्यवहार्य आणि गरजेचे

घराच्या प्रत्येक नळाला येणारा प्रत्येक थेंब हा "पिण्यायोग्य" पाण्याच्या असावा असा एकंदरीत संकेत दिसतो. परंतु ते कितपत योग्य आणि व्यवहार्य आहे?

तसे असणे अपरीहार्य आहे.

घरात येणार्‍या एकूण् पाण्यापैकी किती टक्के पाणी आपण पिण्यासाठी (अधिक स्वयंपाकासाठी) वापरतो? आणि किती टक्के पाणी इतर गोष्टींसाठी (स्नान, मल-मूत्र विसर्जन, कपडे धूणे, भांडी घासणे, बागकाम इ.) वापरतो याचा कोणी अभ्यास केला आहे काय्?

असे अभ्यास झाले आहेत. त्याबद्दल अधिक माहीती जालावर मिळाल्यास देईनच. पण येथे हा कॅल्क्यूलेटर पहा...वर्ल्ड रिसोअर्स इन्स्टीट्यूटच्या पानावर पण माहीती मिळू शकेल पण नोंदणि करावी लागते.

आता आपल्या वरील विधानासंदर्भातः नळाने येणारे पाणी कशासाठी, कोण कधी वापरेल यावर बंधन कसे घालू शकणार आहात? शिवाय सार्वजानीक आरोग्याच्या अंतर्गत पाणी वापरले जाते तसे सेकंडरी उपयोगासाठी वापरले जाते. पिण्यासाठी, स्वैयंपाकासाठी, अंघोळ आणि प्रार्तविधी, धुणे, भांडी घासणे या साठी शुद्ध पाणि नक्कीच लागते. जर टॉयलेट मधे पाण्याऐवजी टॉयलेट पेपर्स वापरले जात असतील तर फ्लश साठी सेकंडरी पाणी वापरता येऊ शकते. अथवा टॉयलेटचे पाणी सोडल्यास इतर सर्व पाणि कमितकमी शुद्ध करून बागकामासाठी वगैरे वापरता येते. पण हे कोणास योग्य आहे तर मोठ्या कंपन्यांना आणि मोठ्या हाउअमंग काँप्लेक्सना. व्यक्तिगत ठिकाणि असे करणे व्यवहार्य ठरत नाही.

शुद्ध पाणी नसल्यास होणारे आजार लेखाच्या शेवटी म्हणल्याप्रमाणे लेखात लिहीलेले नाहीत, पण ते बर्‍याच प्रकारचे होऊ शकतात - त्यात कॉलरा, काविळ इथपासून अनेक आहेत. त्यामुळे शुद्ध पाणी मिळणे हा केवळ सामाजीक हक्क नसून समाजस्वास्थ्य आणि देशाच्या राज्याच्या/विशिष्ठ प्रदेशाच्या आर्थीक जडणघडणीला असलेली नितांत गरज आहे. त्याला लागणारा हा खर्च हा तो न केल्यामुळे बिघणार्‍या समाजस्वास्थास परत मुळपदावर आणण्यासाठी लागणार्‍या खर्चापेक्षा आणि ताणापेक्षा कमीच असतो.

नळाचे पाणी सर्व कामांसाठी

शहरात राहणारा प्रत्येकजण नळाचे पाणीच सर्व कामांकरिता वापरतो. कारण इथे विहिरी, तलाव नाहीत. पावसाचे पाणी फारतर बागेकरता वापरता येईल. केवळ चोवीस तास पाण्याचा पुरवठा नसल्याने पाणी साठवावे लागते आणि त्यातले ताजे, पिण्या-स्वयंपाकासाठी आणि बाकीचे, टाकीत चढवलेले, इतर कामांसाठी.
रोज बाटलीतले पाणी पिण्यासाठी वापरणारी माणसे फक्त आमदार-खासदार आणि विमानप्रवासी.
टॉयलेटसाठी कागद वापरणे म्हणजे पर्यावरणाचा निष्कारण नाश करणे आहे. खरे पर्यावरणवादी हात पुसायला उपाहारगृहात मेजावर ठेवलेले कागदी रुमाल वापरत नाहीत. अनेक ठिकाणी मांडीवर ठेवण्यासाठी आणि त्यानंतर हात-तोंड पुसण्यासाठी कापडी हातपुसणी दिलेली असतात. नसतील तर खिसा/पर्समधून सुती रुमाल काढून त्याने हात पुसतात.--वाचक्‍नवी

थेंबे थेंबे + मुलांसाठी

नमस्कार सुनील,

तुमच्या प्रश्नासाठी जालावर काल योग्य दुवा शोधत असताना मला एक युएसजीएस (US Geological Services) च्या "water science for schools" या पानाचा दुवा लागला. युएसजीएस ही खूप मान्यवर सरकारी संस्था आहे आणि कामानिमित्ताने त्यांची माहीती वाचली होती/वापरली होती. पण ही माहीती पण मुलांना (विशेष करून अमेरिकेतील कारण बरेच संदर्भ अमेरिकन आहेत) खूप चांगली आहे.

त्यात नळ थोडासा (दुरूस्ती अभावी) गळत राहीला तर काय बिघडले हे समजावून सांगण्यासाठी कॅल्क्यूलेटर आहे. त्याचा वापर केला आणि सेकंदाला एक थेंब पडला तर काय होईल हे पाहीले तर किती पाणि वाया जाते यावर खालील उत्तर मिळाले:
७ गॅलन्स (२८ लिट्रस) पाणी / दिवस
५५ अंघोळीचे (अमेरिकन अंघोळीचे!) पाणी/ वर्ष
२,७७७ गॅलन्स पाणि/ वर्षाला.

तसेच इपीए च्या मुलांच्या पानावर हा वॉटरसायकल समजावून सांगणारा फ्लॅश असलेला दुवा मिळाला तो पहाण्यासारखा आहे!

दुव्यांबद्दल धन्यवाद..

अत्यंत माहितीपूर्ण.

माझ्या प्रश्नाचे मूळ होते ते शहरी भागात विनाकारण वाया जाणार्‍या पाण्यासंदर्भात. एक urinal करून साखळी ओढली तर दहा एक लिटर तरी (पिण्यायोग्य) पाणी गटारात जाते. आणि त्याच वेळेस एखाद्या ग्रामीण भागात एक हंडा पाण्यासाठी लोक मैलभर पायपीट करतात. नाही का?

वॉट्रलेस युरीनल

माझ्या प्रश्नाचे मूळ होते ते शहरी भागात विनाकारण वाया जाणार्‍या पाण्यासंदर्भात. एक urinal करून साखळी ओढली तर दहा एक लिटर तरी (पिण्यायोग्य) पाणी गटारात जाते. आणि त्याच वेळेस एखाद्या ग्रामीण भागात एक हंडा पाण्यासाठी लोक मैलभर पायपीट करतात. नाही का?

याबाबत एक मजेशीर उत्पादन सध्या अमेरिकेत प्रसिद्ध झाले आहे, त्याला वॉट्रलेस युरीनल म्हणतात.

पण त्यामधे मग फिल्ट्र वापरावा लागतो जो साधारणपणे ९००० वेळा वापर झाल्यावर कचरा होतो. पण ९००० ते २५००० गॅलन्सच्या दरम्यान पाणी वाचते. आपल्याकडे (भारतात) हे अजून शक्य होईल असे वाटत नाही. तसे ते अमेरिकेत पण "ग्रीन बिल्डीग" वगैरे सोडल्यास दिसणार नाही. (आयकीआ मधे असतात).

बाकी फ्लश करणे हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. रिसायकल्ड पाणि वापरता येऊ शकते पण त्यासाठी तशी यंत्रणा लागते. त्यासाठी खर्च करायची तयारी लागेल. खेड्यात पाणि नसण्याचा आणि शहरात पाणि वापरण्याचा कायमच संबंध नसतो. धरणांजवळच्या गावांसाठी अर्थातच असतो. पाण्याचे नियोजन आणि योग्य वापर तशीच राजकीय इच्छा शक्ती असेल तर खेड्यात पण पाणि भरपूर येऊ शकते. फलटण हे पुर्वी संस्थान असले तरी अगदी खेडेच होते. पण (स्वातंत्र्यपूर्व काळातच) तेथे संस्थानीक निंबाळकरांच्या पुढाकाराने कालवे खणले गेले नंतर तेच काम राजकीय इच्छाशक्तीने पुढे गेले आणि गावाचा कायापालट झाला.

थोडे अवांतरः मी माझ्या आधीच्या एका खाजगी कामात एका टेक्साटाईल (पोलरटेक/एल एल बीन साठी तयार करणार्‍या) कंपनीचा एका कामासाठी अशी सिस्टीम तयार केली होती. ज्यात प्रॉडक्शनमधे वापरलेले पाणि ९०-९५% परत वापरता येयचे. शिवाय काही केमिकल्स त्यात राहायची आणि पाणि बर्‍यापैकी कोमट मिळत असल्याने थंडप्रदेशात उर्जा बचत पण होऊ शकायची...

पाण्याऐवजी हवेचा झोत

यावरून विमानांत असतात तसे थोडे पाणी आणि बाकी पाण्याऐवजी अतिशय जोरात हवेचा झोत फवारणारे कमोड/युरिनलही उपयुक्त ठरावेत. फिल्टरची गरज नाही

हवेचा झोत

हवेचा झोत जोरदार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विजेच्या निर्मितीसाठी कदाचित आपण वाचवू पाहतोय त्यापेक्षा जास्त पाणी व इतर संसाधने लागतील.
-- आजानुकर्ण

लेख आवडला

पाण्याचे महत्त्व पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने चांगले समजावलेत.

असे म्हणतात, की पुढच्या शतकातल्या महायुद्धाचे कारण असेल पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्याची कमतरता, आणि त्यावरून होणारे भांडण तंटे. त्यामुळे जल-संसाधनाचा हा प्रश्न केवळ रक्त सुकवणारच नाही तर स्फोटक होऊन रक्त सांडेलही, अशी काळजी करावी लागेल.

पाणी - पिण्याचे पाणी

एका बाजूला एकदम भीषण चित्र उभे रहाते. सर्वांनी तारतम्याने वापरायचा विषय आहे. भारताला तर दुसर्‍या हरीत क्रांति बरोबर, जलक्रांतीची पण गरज आहे. एक सर्वमान्य जलनीती ( व त्याची अंमलबजावणी )झालीच पाहीजे जसे पावसाच्या पाण्याचा योग्य वापर/ उपयोग करून घेणे, औद्योगीक व प्रदुषित पाण्यावर योग्य प्रक्रिया, वॉटर रिसायकल, शेतीसाठी उत्तमोत्तम सिंचन पद्धती, तसेच सार्वजनिक जागी पाण्याचा अपव्यय टाळणे इ.

पण असेही वाटते की जगात इतके पाणी आहे की तशी कधिच कोणाची गैरसोय होऊ नये.

हवेतून पाणी बनवते असे तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे, समुद्राच्या पाण्यातुन पिण्याचे पाणी करता येऊ शकते..

एकंदरीत पाणी हा विषय प्रचंड महत्वाचा आहे त्यात वाद नाही.

धन्यवाद

सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

नद्यांच्या जोडणीच्या योजना (Interbasin Water Transfers) कितपत यशस्वी ठरतील ? त्या न राबविण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच एक कारण आहे का आणखी काही ?

नद्यांची जोडणी

नद्यांची जोडणी हा प्रकल्प व्यवहार्य नाही असे वाटते. यासाठी लागणारी जमीन आणण्यासाठी परत अनेक विस्थापने अपेक्षित आहेत. व ते सगळे पाहता हा प्रकल्प व्यवहार्य नाही . (इती.मेधा पाटकर)

त्यापेक्षा स्थानीक पातळीवर व्यवस्थापनाचे अखिल भारतीय धोरण ठरवणे आवश्य्क आहे.

आपला
गुंडोपंत

लेख वाचलात का?

अरुंधती चा लेख वाचलात का?
ते आधी सांगा...

आपला
गुंडोपंत पाटकर रॉय

यु हॅव नो रिव्हर्स नेटवर्क, गेट ओव्हर इट

विषयांतर नको!

ही घ्या लिंक विषयांतर नको!
"ग्रेटर कॉमन गुड"
http://www.narmada.org/gcg/gcg.html

पण लेख शांतपणे पूर्ण वाचायचा... हवे तर प्रिन्ट काढून!

आपला
गुंडोपंत रॉय

हट

अरे हट!
कोण कुठले तुम्ही... आमची जमिन आमच्याच पाण्याखाली खालून आमच्याच पारंपारिक जमिनीवरून हाकलणारे?
भले आम्ही आमचे सगळे सोडायचे नि तुमच्या राजेंद्र परसाद झोपडपटीत येवून रहायचे... तुमचीच भांडी घासायची...आन् तुम्ही काय सोडणार त्या बदल्यात आं? काय सोडणार ???
तुम्ही तर साधी बिलं पण भरणार नाय पाण्याची वेळेवर... आम्हाला हाकलतायेत आमच्याच जमीनीवरून....

आपला
गुंडोपंत पाणीवाले

बिलं भरायला

बिलं भरायला नळ कधी बसवले इथे तुम्ही?
आम्ही १० -१० किलोमिटरा वरनं पाणी आनतो.

आपले पदर मोड करून परत जे
लोकं आम्हाला मदत करायला येतात त्यांना काही बाही बोलता काय?

आदिवाष्यांना पोसायला ते काही तुम्च्या घरी आले नाहीयेत् जेवायला...

उलट तुम्हीच त्यांच्या घरी जावून
त्यांच्याच जगायच्या जमीनी मागताय...

आपला
गुंडोपंत आमटे

तेच तर म्हणतोय!

तेच तर म्हणतोय!...
तसेच राहु द्या...
तं बदलायला निघाले...

आता म्हण्ता तसेच राहु द्या... मग आधी म्या काय बंबलत हुतो म्हने?????

आपला
गुंडोपंत

हा हा हा

पंत आणि सर्किटरावांची चांगलीच जुंपलेली दिसतेय. शेवत मात्र अनपेक्षित झाला... "एक चुतुर नार" मधल्या महमुद सारखे सर्किटराव अचानक खिडकीतून खाली पाडले की काय?

आपला,
(प्रेक्षक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

चालतेच!

हे चालतेच हो!
कधी आम्ही खिडकीतून पडतो नि कधी ते...
(फक्त यावेळी ते अचानक 'शब्दात सापडले' इतकेच! असे फार क्वचित घडते! ;))
मुद्यात धरणे अवघड असते सर्किटला! नको तो मुद्दा, नको त्या वेळी काढून चाट मारून खाली पाडण्यात वाकबगार आहे तो.

जाऊ द्या!!! या भानगडीत नार पळाली हे मात्र खरे! ;)))))

आपला
गुंडोपंत

अरूंधती रॉय

अरुंधती बाईंना ह्या लेखामध्ये माझे एक आवडते लेखक रामचंद्र गुहा यांनी कसे झोडले आहे ते पहा. या बाईंमुळे नर्मदा आंदोलनाला फायदा झाला की तोटा हा संशोधनाचा विषय होईल.
विशेष म्हणजे गुहासाहेबांचा हा लेख ग्रेटर कॉमन गुड ला प्रतिक्रिया म्हणूनच लिहिला गेला आहे.

-आजानुकर्ण गुहा.

-- आजानुकर्ण

असे तर

असे तर अनेक आक्षेप आले आहेत.
पण या लेखातला आक्षेप हा बराचसा व्यक्तिगत वाटतो आहे. अरूंधतीने कसे परत ललीत लेखना कडे वळणे योग्य वगैरे वगैरे अनाहुत सल्ले. (याच लेव्हल वर जायचे तर असा सल्ला देण्या आधी गुहांनी स्व्तः काय सामाजिक कार्य केले आहे ते ही तपासावे लागेल. इतरांची उदाहरणे काय कामाची?)

पण गुहांनाही रॉयच्या संपुर्ण लेखाचे निराकरण करता आलेले नाही. हे सत्य आहे!
हा लेख जर त्या लेखा ला उत्तर म्हणून लिहिला असेल तर धन्य आहे त्या गुहांची, कारण त्यात मुळ लेखातले;
विस्थापन,
पाण्याचे खास भागालाच होणारे वितरण,
काही विषेश भागांचा फायदा

हे मुद्दे खोडून काढता आलेले नाहीत.
त्याच बरोबर व्यक्तिगत मात्र बरेच आरोप दिसत आहेत. कोण सुप्रिम कोर्टाचा वकील न.ब. आ. ला काय सल्ला तीच्या विषयी देतो वगैरे वगैरे रॉय ने याला काय उत्तर दिले कुणास ठाऊक पण वाचले पाहिजे असे मात्र वाटून गेले!

नाटो चा मुद्दा हा 'या लेखातला' नाही. हा नंतरचा उल्लेख आहे.

तसेच अरुंधती तीच्या आयुष्यात काय करते, काय बोलते, लिहिते याविषयी मी चकार शब्द ही काढलेला नाही. मी निव्वळ पाणी प्रश्न व विस्थापन आणि त्याचे व्यापक स्वरूप समजावे किंवा दुसरी बाजूही या निमित्ताने विचारात यावी या हेतु ने हा लेख येथे दिला आहे. आपले दिलेला दुवा मात्र तसा दिसत नाही हे नमुद करावेसे वाटते आहे.

आपला
गुंडोपंत

बुडवा हो आमच्या गावांना

गुंडोपंत,

आपण आम्हा आदिवाशांच्या गावांवर आमच्या पेक्षा जास्त प्रेम करत असे दिसते. आहो आम्ही पिढ्यान-पिढ्या अन्न-पाण्यविना त्या रुक्ष भागांमध्ये मरत होतो तेव्हा नाही कोणि अरुंधती/मेघा आली आमच्याकडे. गावात काही खरे नाही म्हणून बाहेर पडलेले आमच्यासारखे आनंदाने जगत आहेत. गावावर प्रेम करणारे अन बाहेर जाऊन कामाचा कंटाळा असल्याने प्रेमाचा आव आणणारे, सगळेच गावांत उपाशी पडलेत. एकमेकाच्या अर्ध्याभाकरी चोरण्यात त्यांना धन्यता वाटते. म्हणून मला वाटते १०० गावांचा विकास होणार असतील तर अगोदर मेलेली आमची दहा गावे बुडू द्या हो खुशाल...

आपला,
(आदिवासी म्हणून जन्मलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

खरे आहे!

आपला मुद्दा तर सर्व मान्य आहे.
ज्यांना जायचेच आहे त्यांना कोण थांबवणार...?
पण ज्यांना जायचे नाहीये त्यांचा आहे.

त्यांना हुसकण्याचे काय कारण आहे?

आपला
गुंडोपंत

नद्यांची जोडणी

नद्यांच्या जोडणीच्या प्रकल्पासंबंधी मी माहीती करून घेण्याचा प्रयत्न केला. पण हवी तशी मिळाली नाही (आणि मी पण प्रयत्न फार पुढे रेटले नाहीत). पण अशा प्रकल्पाच्या बाबतीत मी अनेक कारणांमुळे संदिग्ध आहे. पहीली गोष्ट म्हणजे भौगोलीक रचना आणि निसर्ग यात मोठा मानवी हस्तक्षेप. दुसरे म्हणजे किती जण त्यात विस्थापित होणार आणि बदललेल्या पर्यवरणीय अवस्थेत त्याचे फायदे/तोटे यांचे गणित (मॉडेलींग) नक्की काय आहे? या बाबत विशेष माहीती मुक्तपणे मिळत नाही. कम्युनिस्ट रशियाने (८०च्या दशकात) अशीच व्होल्वो का कुठलीशी नदी फिरवून सैबेरीयात नेण्याचे टूम काढले होते ते आठवते. (जालावर संदर्भ मिळाल्यास कळवीन). पण नंतर ते तेव्हढेच अचानक शांत झाले. का याचा अभ्यास आपल्या लोकांनी केला पाहीजे असे वाटते.

मध्यंतरी कुणाशी तरी बोलत असताना कळलेल्या माहीतीनुसार सरकारने पण मूळ योजना (न बोलता) बासनात गुंडाळली म्हणजे ती राष्ट्रीय पातळीवर (नॅशनल गारलँड स्कीम) न होता ती आता प्रादेशिक पातळीवर प्रादेशिक नद्या/कालवे जोडून करण्याचे चालले आहे असे ऐकले. ते जर खरे असेल तर ते जास्त योग्य होईल असे वाटते.

धन्यवाद

युपी -बिहार

या राज्यांमधील नद्यांचे पाणी जोडण्याची योजना तेव्हढी आकार घेते आहे (अर्थातच मंद गतीने). एकूण तुम्ही म्हण्टल्याप्रमाणे , हा प्रकार डी-सेन्ट्रलाइझ्ड् पद्धतीने हाताळला जातो आहेसे दिसते (तेरा तू देख ! तत्वावर)

पावसाचे पाणी

उत्तम लेख. याबाबत बर्‍याच गोष्टी भारतातही चालू आहेत .. आपणही यात भाग घेऊ शकतो.
उदा.: मुंबईत आमच्या सोसायटीने पावसाचे पाणी जमिनी खालच्या टाकीत साठवायला सुरवात केली आहे. मुंबई महापालिकेकडून अश्या पर्जन्यटाकीसाठी निधी मिळतो. सोसायटीची बाग, गाड्या धुणे इ. स्वच्छतेच्या/अप्राशनार्थ कामांसाठी सोसायटी त्याचा उपयोग करते
ता.क. सार्वजनिक सौर दिव्यांसाठीही महापालिकेकडून सोसायट्यांना निधी मिळतो

उत्साहवर्धक

उदा.: मुंबईत आमच्या सोसायटीने पावसाचे पाणी जमिनी खालच्या टाकीत साठवायला सुरवात केली आहे. मुंबई महापालिकेकडून अश्या पर्जन्यटाकीसाठी निधी मिळतो. सोसायटीची बाग, गाड्या धुणे इ. स्वच्छतेच्या/अप्राशनार्थ कामांसाठी सोसायटी त्याचा उपयोग करते. ता.क. सार्वजनिक सौर दिव्यांसाठीही महापालिकेकडून सोसायट्यांना निधी मिळतो

ही नक्कीच चांगली बातमी आहे.

अमेरिकन एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्षन एजन्सी (इपीए) या सर्वोच्च पर्यावरणीय अधिकारी संस्थेत लोकशिक्षणाला भर देण्याकडे कल असतो. त्यांच्याकडून एकदा मला स्थानीक वॉटरशेडच्या अभ्यासासाठी आणि लोकशिक्षणासाठी अनुदान मिळाले होते. तेंव्हा येथील लोकांच्या विचारातील एक समजलेला भाग म्हणजे "to educate people/public to take informed decisions". हा "informed decisions" घेणे हा भाग आपल्याकडे रूळू लागला पाहीजे. नाहीतर कधी कधी चुकीच्या गोष्टी कोणीतरी करायला लागते आणि एकाची टोपी पडली म्हणून इतरांच्या अशी अवस्था होते. अर्थात आपण दिलेल्या उदाहरणात तसे दिसत नाही, पण जेंव्हा कुठलेही सरकार जास्त मधे यायला लागते तेंव्हा तशी काळजी वाटते की चांगल्या चाललेल्या कामाला कोणी गालबोट लावू नये...

लेख

आवडला. याबाबत व्यक्तीशः मला काय करता येईल हा विचार करते आहे.
काही काळाच्या पानगळीनंतर हल्ली उपक्रमाला आलेला हा सकस लेखनाचा बहर असाच राहो या सदिच्छा.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

पाणी आणि सांडपाणी

सर्वात पहिला: लेख चांगला आणि फारच चांगल्या विषयावर आहे.

पाणी:
लहानपणापासुन पडलेला एक प्रश्नः पृथ्वीचा जास्तीत जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला असताना नेहमी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष का असते? कदाचित पाणी म्हणावे तेवढे सिरियसली घेतलेले दिसत नाही. ठरवले तर पाण्याचे योग्य व्यवस्थापन होउ शकते हे मात्र खरे. अलिकडे भारतात अनेक ठिकाणी दिसणारे रेन वॉटर हार्वेस्टींग हे एक चांगले उदाहरण आहे.

सांडपाणी: भारतापुरते बोलायचे झाले तर नद्यांच्या पाण्यात सांडपाणी मिसळुन आहे ते वापरण्यालायक पाणी सुद्धा आम्ही लोक खराब करतो आहे. यावर उपाय नक्किच असणार आहेत. जागोजागी सांडपाण्यावरुन उर्जा निर्मितीचे प्रकल्प केल्यास हे प्रश्न सोडवता येतील का? सांडपाण्यावर प्रयोग करणारी एखादी संस्था भारतात अथवा भारता बाहेर आहे का? काय माहित, उद्या पाण्यापेक्षा सांडपाण्याला जास्त महत्व येइल.

इतर प्रतिसादांवर प्रतिसादः
भारतात स्वतःला सामाजिक म्हणवणारे नेते मंडळी हल्ली चित्रपटात सुद्धा काम करतात असे वाचले आहे. लोकांच्या हक्कासाठी भांडणे हे काहि मर्यादे पर्यंत समजुन घेउ शकतो. पण जिथे सामाजिक प्रश्न त्याचे सर्व तोडगे आमच्याकडे अथवा लोकांच्या भावना पेटवायला आम्ही पुढे येतोच हे अनेकदा दिसुन येते. असे कितीसे प्रश्न या नेत्यांनी सोडवले आहेत? शेवटी लोकप्रतिनीधी होउन योग्य तो कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यालाच आम्ही खरे सामाजिक नेते म्हणु, असेल एवढा दम तर स्वतः एक राजकिय पक्ष काढुन सत्तेत येउन हे प्रश्न कायमचे सोडवुन दाखवावेत. स्वतःचे महत्व वाढवुन उपोषणाचे राजकिय स्टंट आता थांबवले गेले पाहिजेत.

बाकि नद्यांचे प्रदुषण हा एक चर्चेचा मुद्दा होउ शकेल. गणेश विसर्जनामुळे प्रदुषण होते म्हणुन पुढे येणारे अनिसचे लोक, बाकिचे सगळे दिवस मात्र नद्यांच्या प्रदुषणाला मान्यता देताना दिसतात.

मराठीत लिहा. वापरा.

हाण तिच्या****

गणेश विसर्जनामुळे प्रदुषण होते म्हणुन पुढे येणारे अनिसचे लोक, बाकिचे सगळे दिवस मात्र नद्यांच्या प्रदुषणाला मान्यता देताना दिसतात.

अगदी बरोबर.

यावर सुद्धा तेच उपाय

नि:पक्षपाती निवडणुका व्हायला हव्यात म्हणुन निवडणुकीच्या काळातच उपोषण करुन स्टंट करुन सहानुभुतीची लाट आणतील हे लोक आणि विजयी होतील. निवडणुका राहिल्या दुर. समाजाची एवढी काळजी असेल तर सामान्यांना त्यांच्या हक्कांची, त्यांच्यासाठी केल्या गेलेल्या कायद्यांची आणि या सोबतच त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करुन द्या म्हणाव.

माझ्या डोळ्यासमोर दिसणारे एक चित्रः
पुणेकरांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि पुण्यात सार्वजनीक वाहतुक व्यवस्था चोख व्हावी, दुचाक्यांची संख्य कमी व्हावी आणि त्यामुळे होणारे प्रदुषण कमी व्हावे म्हणुन मेधा पाटकर, रॉय आणि अण्णा हजारे आणि असेच इतर सामाजिक नेते सारस बागेत आमरण उपोषणाला बसले आहेत. क्या ऐसा हो सकता है?

मराठीत लिहा. वापरा.

काय मारलात

वा सर्किटराव! काय पण मारलात...

जोवर डॉलराधिष्ठित एन जी ओ संस्थांना भारतातील मध्यमवर्गीयांच्या जपणुकीसाठी डॉलर मिळत नाहीत, तोवर हे शक्य नाही !

भारतीय मध्यमवर्गीयांची नागडी चित्रे जोवर येथे टेलिव्हिजनवर दिसत नाहीत, त्यांना असल्या सुविध्हांची लालूच दाखवून ख्रिश्चन करण्याची संधी जोवर उपलब्ध होत नाही, तोवर त्या समस्यांच्या निवारणासाठी एन जी ओ संस्थांना डॉलर कोण देणार ?

आपला,
(मध्यमवर्गीय) भास्कर
आम्ही येथे वसतो.

लेख आवडला!

लेख उत्कृष्ट आहे. आवडला! वरचे प्रतिसाद वाचून अधिक काय लिहावे असा प्रश्न पडला. :) काही सुचल्यास नंतर लिहिते.

गंभीर

उत्तम लेख. विषय गंभीर आहे. मागे एकदा बीबीसीवर याच विषयावर माहितीपट पाहिला होता. आपण रोज वापरत असलेल्या वस्तूंसाठी इतके पाणी लागते हे माहिती नव्हते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हे वाचा.

मानवाने प्रगतीच्या नावाखाली केलेल्या अनेक उद्योगांमुळे पृथ्वीची किती हानी होते ते कळण्यासाठी http://www.loksatta.com/daily/20071214/vishesh.htm हा लेख वाचा. मग सरदार सरोवर, आणि अशाच अतिविशाल धरणामुळे फायद्यापेक्षा तोटाच कसा होतो यासाठी अनेकांनी अभ्यास करून लिहिलेले ग्रंथ वाचावेसे वाटतील. प्रत्येक प्रकल्प उभारताना पर्यावरणाची किती हानी होणार आहे, कुणाचा फायदा आणि कुणाचे नुकसान होणार आहे, ते नुकसान पैशाने नाही तर सर्व अर्थाने भरून देता येण्यासारखे आहे की नाही, बुडणार्‍या प्रत्येक जागेवरच्या मातीची, झाडाची किंमत, मिळणारा प्राणवायू, पक्षी , वन्य प्राणी, जलचर यांची किंमत काढून हिशोब केला तर मला नाही वाटत की एकतरी मोठे धरण फायदेशीर ठरेल. --वाचक्‍नवी

 
^ वर