कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ६/७
भाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक
या सर्व प्रश्नांमध्ये कसले अनुमान केले जाऊ शकते, आणि वास्तविक कसली पडताळणी केली जाऊ शकते या दोहोंतला गोंधळ टाळणे ही एक मोठी कठिण गोष्ट असते. क्षणभर लक्षपूर्वक विचार करूया, भविष्य "निर्धारित" असण्याचे काय वेगवेगळे अर्थ असू शकतात? एका अर्थाने - आणि विज्ञानाच्या कायद्यांपासून स्वतंत्र असा हा अर्थ फार महत्त्वाचा आहे - या एका अर्थाने भविष्य हे निर्धारितच आहे : जे काय होईल ते होईल. भूतकाळ व्हायचा तो झालेला आहे, केवळ या तथ्यामुळे म्हणून आपण त्याच्याकडे निर्धारित म्हणून बघतो. स्मृती ही मागच्या दिशेने काम करते, पुढच्या दिशेने काम करत नाही. हा अपघात नसता, तर भविष्य व्हायचे ते होणार आहे, म्हणून आपण त्याच्याहीकडे निर्धारित म्हणून बघितले असते. "पण", कोणी सांगतात, "आपण भूतकाळ बदलू शकत नाही, आणि काही प्रमाणात भविष्यकाळ मात्र बदलू शकतो." या दृष्टिकोनाचा आधार म्हणजे कार्यकारणभावाबद्दलचे प्रमाद होत. आणि हेच प्रमाद काढून टाकण्याचा माझा उद्देश आहे. भूतकाळ बदलून आपण तो वेगळा करू शकत नाही खरे. पण हे फक्त "अंतर्विरोधाचा नकार" हा सिद्धांत (law of contradiction) लागू केलेले उदाहरण आहे. जर भूतकाळ काय आहे, हे माहीत असेल, तर तो वेगळा असावा अशी आशा करणे फोल आहे. परंतु भविष्यकाळही होईल त्यावेगळा करता येत नाही - हे सुद्धा "अंतर्विरोधाचा नकार" सिद्धांत लागू केलेले उदाहरणच आहे. भविष्यकाळातली घटना माहिती असेल - उदाहरणार्थ, भविष्यात होणारे ग्रहण - तर ती घटना वेगळी असावी अशी आशा करणे सुद्धा फोल आहे. भूतकाळासारखीच बाब.
"परंतु", कोणी पुढे सांगेल, "इच्छा नसती तर जसे भविष्य असते, त्यापेक्षा वेगळे भविष्य आपल्या इच्छेच्या ’कारणा’ने होऊ शकते. आणि आपल्या इच्छांचा भूतकाळावर असा कुठला परिणाम होऊ शकत नाही." परंतु ही सुद्धा केवळ व्याख्या-पुनरुक्ती (tautology) होय. परिणामाची व्याख्याच "कारणा"नंतरची घटना अशी असल्यामुळे अर्थातच आपल्या इच्छांचा भूतकाळावर परिणाम होणार नाही. पण त्याचा हा अर्थ नाही, की आपल्या वर्तमान इच्छा वेगळ्या असत्या तर भूतकाळ वेगळा नसता. आपल्या वर्तमान इच्छा भूतकाळावर अवलंबून आहेत हे स्पष्टच आहे, तस्मात भूतकाळ वेगळा असल्याशिवाय वर्तमान इच्छाही वेगळ्या असू शकल्या नसत्या. म्हणूनच जर आपल्या वर्तमान इच्छा वेगळ्या असत्या, तर भूतकाळ वेगळा असता. अर्थात भूतकाळ होता त्यापेक्षा वेगळा असू शकत नाही, आणि त्याच प्रमाणे आपल्या वर्तमान इच्छाही आहेत त्यापेक्षा वेगळ्या असू शकत नाहीत - हा सुद्धा केवळ अंतर्विरोधाच्या नकाराचा सिद्धांत आहे. तथ्ये केवळ अशी : (१) इच्छा सामान्यपणे अज्ञानमूलक असतात, म्हणून भविष्याबद्दल इच्छा या भूतकाळाबद्दलच्या इच्छांपेक्षा पुष्कळ असतात; (२) भविष्यासंबंधी इच्छा असली, तर ती इच्छा आणि इच्छेचे फलद्रूप होणे हे पुष्कळदा कामचलाऊ अलग व्यवस्था बनवतात. आपल्या भावनांमधला मुख्य फरक या एका अपघातामुळे उद्भवतो, की भूतकाळ स्मृतीतून माहिती असतो, पण भविष्यकाळ नव्हे.
माझ्या मते पूर्णनिर्धारणाचा विरोध करणार्या बर्गसन आणि प्रॅग्मॅटिस्ट तत्त्वज्ञांचे खंडन करण्यासाठी "निर्धारण" म्हणजे भविष्यकाळ होईल तसाच होईल, या अर्थाने पुरेसे खंडन होते. तरी बहुतेक लोक "भविष्य निर्धारित आहे वा नाही" म्हणतात, तेव्हा त्यांचा मथितार्थ वेगळा असतो. त्यांच्या मनात असे चित्र असते, की कुठल्याशा समीकरणाने भविष्य भूतकाळाचे फलन म्हणून दर्शवले जाऊ शकते, ही शक्यता सैद्धांतिक का असेना. परंतु या ठिकाणी आपल्यासमोर मोठी कठिण अडचण उभी राहाते - पूर्वनिर्धारणयुक्त व्यवस्थांबाबत आपण येथे जे म्हटले आहे, आणि अन्य लोकांनी जे म्हटले आहे त्यावर तिचे सावट येते.
जर का वाटेल तितक्या क्लिष्ट गुंतागुंतीची समीकरणे चालत असतील, आणि स्थिती जर मोजण्यायोग्य परिमाणांमध्ये सांगता येत असेल, तर तर कुठल्याही व्यवस्थेची विवक्षित आकालिक स्थिती ही पूर्णनिर्धारित असलीच पाहिजे. उदाहरणादाखल आपण एका जड-पिंडाचे स्थान विचारात घेऊया, जे ’क’ काळी त्याचे स्थान क्षक, यक, ज्ञक या निर्देशांकांनी (coordinatesनी) सांगता येते. मग ते पिंड कसे का मार्गक्रमण करेना, सैद्धांतिक दृष्ट्या f१, f२, f३ अशी कुठलीतरी फलने असलीच पाहिजेत :
क्षक = f१(क), यक = f२(क), ज्ञक = f३(क)
तस्मात सैद्धांतिक पातळीवर अवघ्या जड-विश्वाची ’क’ काळातली स्थिती ’क’चे फलन म्हणून दाखवता आलीच पाहिजे. म्हणजे या अर्थाने आपले विश्व पूर्णनिर्धारणयुक्त आहे. परंतु हे जर खरे असले, तर "विश्व पूर्णनिर्धारणयुक्त आहे" असे विधान माहितीशून्य आहे. हे शक्य आहे, की ही समीकरणे गणिती अर्थाने अक्षरशः अमर्याद क्लिष्टतेची असू शकतील, आणि कोणी ती कधी लिहू शकणार नाही, कधी समजू शकणार नाही. पण मानवी ज्ञानाचा दृष्टिकोन सोडल्यास ही बाब म्हणजे केवळ एक तपशील आहे. जर वरील विचार ठीक असेल, तर विश्वाच्या दृष्टीने विश्व हे पूर्णनिर्धारणयुक्त असलेच पाहिजे, नियमांच्या अमलाखाली असलेच पाहिजे.
मात्र असे अभिप्रेत नव्हते हे स्पष्ट आहे. वरील दृष्टिकोन आणि अभिप्रेत असलेल्या दृष्टिकोनामध्ये फरक येणेप्रमाणे दिसून येईल. जर आतापर्यंतच्या निरीक्षित तथ्यांशी सुसंगत असे कुठले समीकरण असेल - उदाहरणार्थ : गुरुत्वाकर्षणाचा कायदा - तर त्या निरीक्षणांशी सुसंगत अशी अगणित अन्य समीकरणे असतात. ही अन्य समीकरणे पहिल्या समीकरणापासून प्रायोगिक (सुसंगतीच्या) दृष्टीने भूतकाळात वेगळी करता येत नाहीत, पण भविष्यकाळात ही समीकरणे अधिकाधिक भिन्न होत जातील. म्हणून जरी आपण असे मानले की शाश्वत टिकणारे (persistent) कायदे असतात, तरी व्यस्त-वर्ग (inverse square) कायदा भविष्यात टिकून राहील असे मानण्यासाठी कुठलाही आधार नाही. आजवर या कायद्यापासून (प्रायोगिक रीत्या) भिन्न सांगता येत नाही असा कुठला कायदा टिकून राहाणारा असेल. आतापर्यंत लागू असलेला प्रत्येक कायदा भविष्यात लागू असेल, असे आपण म्हणू शकत नाही; का तर भूतकाळातल्या घटना एका कायद्याला अनुसरतील, तशा अन्य कायद्यांनाही अनुसरतील. आजपर्यंत फरक दिसत नाही, तरी भविष्यात अधिकाधिक भिन्नता दिसू लागेल. म्हणूनच प्रत्येक क्षणी त्या-त्या क्षणापर्यंत कधीच न मोडले गेलेले कायदे पहिल्यांदा मोडले जात असतात. वास्तवात विज्ञान काय करते - तथ्यांना सुसंगत असलेले सर्वात सुटसुटीत (सर्वात लघु-उपायाचे simplest) समीकरण निवडते. परंतु हे केवळ कार्यपद्धतीबाबतचे एक तत्त्व आहे, निसर्गाचा कायदा नव्हे. जर कालांतराने सर्वात सुटसुटीत समीकरण विसंगत झालेले दिसले, तर उरलेल्या समीकरणांपैकी सर्वात सुटसुटीत समीकरण निवडले जाते. यातून विज्ञानाचे कुठलेही स्वयंस्पष्ट मानले गेलेले तत्त्व (axiom) खोटे पडत नाही. आता आपल्यापाशी हे रोखठोक तथ्य राहाते, की विज्ञानाच्या कित्येक शाखांमध्ये बर्यापैकी सुटसुटीत कायदे लागू आहेत असे दिसून आलेले आहे. मात्र या तथ्याकरिता कुठला पूर्वगृहीत आधार (a priori ground) आहे असे म्हणता येत नाही, आणि हेच कायदे भविष्यात चालू राहातील या मताला वरील तथ्यामधून विगमनात्मक (inductive) आधारही मिळत नाही. का तर क्षणोक्षणी हल्लीपर्यंत लागू पडलेले कायदे खोटे पडलेले दिसून येतात. प्रगत विज्ञानशाखांमध्ये खोटे पडलेले कायदे टिकाऊ कायद्यांपेक्षा अधिक बोजड (less simple) आहेत, असे असेना का. प्रगत विज्ञानशाखांच्या स्थितीवरून अन्य विज्ञानशाखांच्या भविष्यकालीन स्थितीबद्दल विगमनात्मक निष्कर्ष काढणे देखील तर्कदुष्ट आहे. असेही असू शकेल की प्रगत विज्ञानांच्या अभ्यासवस्तूंनी (subject matterनी) त्यातल्या त्यात सोप्या, सहज सापडू शकणार्या नियमांना आजवर अनुसरलेले असेल, अन्य विज्ञानशाखांच्या अभ्यासवस्तूंनी असे केले नसेल, म्हणूनच "प्रगत" विज्ञानशाखा इतक्या "प्रगत" असतील.
आपण चिंतत असलेली अडचण पूर्णतः नसेल तर अंशतः तरी अशा प्रकारे बाजूला होऊ शकेल : काळ हे परिमाण या समीकरणांचा थेट (explicit) अवयव असू नये हे तत्त्व मानावे. सर्व यांत्रिक (mechanical) कायद्यांमध्ये त्वरण हे संरचनेचे फलन (function of configuration) असते, संरचना आणि काळ यांचे मिळून फलन नव्हे. काळाच्या निःसंदर्भत्वाचे हे तत्त्व सर्व वैज्ञानिक कायद्यांवर पसरवता येईल. वास्तवात "निसर्गाची नियमितता" याचा या प्रकारे अर्थ लावता येईल - कुठल्याही वैज्ञानिक कायद्यात फलनातील स्थानधारक (argument of function) म्हणून काळ येणार नाही, आल्यास कालांतर (lapse of time) हे कायद्याच्या समाकलित आकृतीत (integrated form) दिसेल, स्वतः काळ (absolute time) हा आपल्या समीकरणांमध्ये दिसू नये. ही अट आपली अडचण दूर करण्यास पुरेशी आहे की नाही, हे मला माहीत नाही; परंतु काही असो, अडचण खूपच कमी करते.
(पुढे चालू)
- - -
मूळ लेखाबाबत सर्व हक्क "बर्ट्रंड रसेल पीस फाउंडेशन"कडे आहेत. हे मराठी भाषांतर आणि आंतरजालावर होणारे प्रकाशन अनुमतिप्राप्त आहे.
Comments
अनुक्रमणिका आणि शुद्धिपत्र
येथे सर्व भागांचे दुवे दिले जातील. शिवाय जर काही चुका असतील तर त्यांचे शुद्धिपत्र दिले जाईल. शक्यतोवर या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, ही वाचकांना विनंती आहे.
अनुक्रमणिका
भाग १: प्रास्ताविक, कार्यकारणभाव आणि आवश्यकता, आवश्यकतेच्या व्याख्या
भाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर
भाग ३ : काही प्रचलित पण प्रामादिक उक्तींबाबत चर्चा
भाग ४ : कार्यकारणभावाऐवजी विज्ञानात कुठले कायदे असतात? ते मूलभूत असतात का?
भाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता
भाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक
भाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश
शुद्धिपत्र
काळाला विशेष महत्त्व
इथे लेखकाने काळाला विशेष स्थान दिल्याचं जाणवतं आहे. भूतकाळ माहित असणे व भविष्यकाळ माहित नसणे हा केवळ तांत्रिक फरक आहे, व सध्याच्या इच्छा भूतकाळ बदलू शकत नाही त्याचप्रमाणे त्या भविष्यकाळ बदलू शकणार नाही असा काहीसा तर्क दिसतो. हा असमाधानकारक वाटतो.
एकतर इच्छा ही भौतिक घटना आहे की नाही - जडातून मन निर्माण होतं की नाही - याप्रकारच्या प्रश्नांना, इच्छेला वेगळं, महत्त्वाचं स्थान देऊन उत्तर दिलं आहे. आपल्याला प्रतीत होणार्या इच्छा या विश्वनियमांच्या पलिकडल्या नियमांनी होत असतील तर त्याला काही अर्थ आहे. अथवा पाण्यावरच्या तरंगांनी जग बदलेल का असाच प्रश्न विचारण्यासारखं आहे. ही द्वैती विचारसरणी वापरून जगाविषयी निष्कर्ष काढायला त्रास होणारच.
दुसरं म्हणजे काळ, अवकाश व इतर मूलभूत राशींपैकी काळालाच वेगळं काढायचं हा आईन्स्टाईन पूर्व विचार झाला. रसेल अर्थातच त्याच सुमाराचा, त्यामुळे दोष देणं नाही, पण तरी कमतरता जाणवतेच.
प्रत्येक क्षणाला अगणित अगणित शक्य कायदे असतात, आणि त्यातले काही अगणित दर क्षणी गळतात हेही काळाला विशेष महत्त्व देण्यातून येतं असं वाटतं. चतुर्मितीय विश्व गृहित धरलं तर हे वैशिष्ट्य नष्ट होतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
काळाला विशेष महत्त्व नाही
असे नव्हे. कालमानाला (काळाच्या मोजमापाला) कुठलेही विशेष महत्त्व दिलेले नाही.
पूर्वापरत्वाला विशेष महत्त्व दिलेले आहे. पूर्वापरत्व हे सापेक्षतासिद्धांताने नष्ट होत नाही. ज्या प्रकारे पूर्वापरत्व टिकते, त्याची चर्चा आइन्स्टाइन यांनी प्रासादिक रीतीने केलेली आहे. ती येथे वाचावी :
आइन्स्टाइन यांचे व्याख्यान - काल आणि अवकाशाचा तात्त्विक पाया
हे पूर्वापरत्व कुठल्याही व्यवस्थेच्या "आधीचे" (तार्किक अर्थाने "प्रायर") असते, याचा बाध सापेक्षतावादाच्या व्यवस्थेत, त्यातून आलेल्या स्पेस-टाइम गणितात कुठेही होत नाही.
कालावकाशाच्या भूमिती गणिताने असे दिसते, की काही घटनांचा क्रम काही निरीक्षकांना वेगवेगळा दिसतो. मात्र जर एका घटनेमधून प्रकाशकिरण किंवा जड-पिंड दुसर्या घटनेपर्यंत पोचले तर ज्या घटनेतून प्रकाश/पिंड निघाले ती निरपेक्ष "आधी", आणि ज्या घटनेपर्यंत प्रकाश/पिंड पोचले, ती निरपेक्ष "नंतर". अशा प्रकारे आधी-नंतर क्रम केव्हा निरपेक्ष असतो ते सापेक्षतेच्या गणितातून आपल्याला कळते. (अशा घटनांमधील अंतराला "टाईम-लाइक इंटर्व्हल्स" म्हणतात.) वगैरे.
- - -
मात्र सापेक्षवादाचा विचार हा या ठिकाणी थोडासा अप्रस्तुत आहे. सापेक्षतावाद हा निरीक्षणे आणि त्यांच्यामधून विगमन, अशा प्रकारे मिळालेला आहे. रसेल यांच्या निबंधात सर्वत्र "गुरुत्वाकर्षणाचा व्यस्तवर्ग कायदा"च्या जागेवर "सामान्य सापेक्षवादातील गुरुत्वाकर्षणाचा कायदा" असे घातले तरी काहीही तार्किक फरक पडत नाही.
"निरीक्षणांची व्यवस्था लावण्यापूर्वीची गृहीतके कुठली?" असा विचार चालू आहे. निरीक्षणातून सापेक्षतावादासारखा सिद्धांत निघाला काय, आणि दुसरा कुठला सिद्धांत निघाला काय - त्या सर्वांची पूर्वतयारी गृहीतकांकडे हवी.
काळ, अवकाश
मान्य. पण इच्छा याच मुळात भौतिक घटना असल्याचा मुद्दा राहातोच.
हे पटत नाही. या विश्वात कार्यकारणभाव आहे की नाही हे निरीक्षणांशिवाय कसं ठरवणार? गृहीतकं पूर्णपणे पोकळीत कशी तयार करणार. त्यापेक्षा काही स्वरूपाची बूट-स्ट्रॅपिंग पद्धती हवी.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
निरीक्षणांनी कसे ठरवणार?
(इच्छेचा मुद्दा प्रतिसादात अगदी खाली आहे. त्यापूर्वी हा मुद्दा विचारात घेऊया.)
(नेमके काय पटत नाही ते कळलेले नाही. कार्यकारणभावाबद्दल रसेल काही वेगळे म्हणत आहेत काय? तुमच्या पुढील वाक्याने कदाचित त्याबद्दल संकेत मिळतो.)
मला असे वाटते की येथे उपन्यास (हायपोथेसिस) आणि गृहीतक (ऍक्सियम) या दोन कल्पनांमध्ये गल्लत होत असावी. उपन्यास पोकळीत तयार होत नाहीत, हे तर आहेच. गृहीतके पोकळीत तयार होतात की कशी तयार होतात हा मुद्दा संदिग्ध आहे. तर्कशास्त्राच्या दृष्टीने नि:संदर्भ आहे. परंतु याचे अधिक स्पष्टीकरण देणे जरुरीचे आहे. ते असे :
अस्तित्व-विधानाच्या संकल्पना असल्या, आणि निरीक्षणांच्या कसावर सिद्ध किंवा असिद्ध होणार असल्या तर त्यांना आपण उपन्यास (=हायपोथेसिस) म्हणतो. मात्र कसाबद्दलच बघू :- कुठल्या संभाव्य निरीक्षणाने उपन्यास 'सिद्ध' ठरवावा, आणि कुठल्या संभाव्य निरीक्षणाने उपन्यास 'असिद्ध' ठरवावा? याबद्दल काही संकल्पना निरीक्षणाच्या पूर्वीच नि:पक्षपाती परीक्षकाकडे असते. (इज द हायपोथेसिस टेस्टेबल? या प्रश्नाचे उत्तर निरीक्षणापूर्वी असले पाहिजे. अन्-टेस्टेबल हायपोथेसिस बाबत निरीक्षणे व्यर्थ असतात. वगैरे, वगैरे.) कसाच्या बद्दलची ही संकल्पना उपन्यास नसते. त्या निरीक्षणापुरती स्वयंस्पष्ट गृहीतक (ऍक्सियम) किंवा प्रतिपाद्य गृहीतक (पॉस्चुलेट) असते. संकल्पना निरीक्षणानंतर अबाधित राहाते - निरीक्षण काही का असेना.
उदाहरणार्थ हे बघा :
- - -
निरीक्षणापूर्वीची स्थिती
निरीक्षणासाठी परीक्षेचे वर्णन : झाडाझुडुपांवर प्रकाशमान ज्वाळा डोळ्यांना दिसल्या, उष्णता कातडीला जाणवली, नाका-तोंडाला जळकट-धुरकट वास-चव आली, कानाला धगधग-कडकड आवाज आला हे सर्व निरीक्षण एकत्र झाल्यास "येथे वणव्याची आग आहे" असे मानावे.
वरील वर्णन हे प्रतिपाद्य गृहीतक आहे.
उपन्यास : डोंगरावर वणव्याची आग आहे (किंवा नाही).
उपन्यास मात्र गृहीतक नाही, त्याच्या सत्यासत्यतेबाबर शंका आहे. उपन्यास निरीक्षणाने सिद्ध-असिद्ध करायचा आहे.
- - -
निरीक्षण
शक्यता १
डोंगरावर निरीक्षण करता ज्वाळा, उष्णता, वगैरे जाणवली.
शक्यता २
डोंगरावर निरीक्षण करता ज्वाळा, उष्णता, वगैरे नाही जाणवली.
- - -
निरीक्षणपश्चात् स्थिती
शक्यता १
उपन्यास स्वीकृत, आणि प्रतिपाद्य गृहीतक पूर्वीइतकेच शाबूत.
शक्यता २
उपन्यास बाद, आणि प्रतिपाद्य गृहीतक पूर्वीइतकेच शाबूत.
- - -
निरीक्षणामुळे प्रतिपाद्य गृहीतकात काहीच फरक पडलेला नाही. आणि प्रतिपाद्य गृहीतक नसते तर निरीक्षण काय करावे हेच कळले नसते. केलेल्या निरीक्षणाचा काय अर्थ लावायचा, हेदेखील कळले नसते.
- - -
आता तुम्ही म्हणाल की "वणवा-आग"ची व्याख्या या निरीक्षणाने बाद होत नाही. परंतु ती व्याख्या बनवण्यापूर्वी वणवा-आगीचा अनुभव आला असेलच. म्हणून ती व्याख्या बनली. आणि तेव्हाची निरीक्षणे वेगळी असती तर पूर्वीच्या काळी ही व्याख्या बाद झाली असती. असे म्हटल्यास तुमचे हे म्हणणे खरे आहे. मात्र वर मी दिलेली प्रक्रिया पुन्हा-पुन्हा वापरता येते. त्या पूर्वीच्या काळीचा उपन्यास काय होता? निरीक्षणाला न-बधणारे गृहीतक काय होते?
- - -
न-बधणारे गृहीतक : दृष्टी-श्रवण-घ्राण-रसन-ध्वनी यांना एकत्र अमुक-अमुक-अमुक-अमुक-अमुक संवेदना झाल्या तर त्या संवेदनांना सामावणारे एकक असते.
उपन्यास : झाडाझुडुपांवर प्रकाशमान ज्वाळा डोळ्यांना दिसल्या, उष्णता कातडीला जाणवली, नाका-तोंडाला जळकट-धुरकट वास-चव आली, कानाला धगधग-कडकड आवाज या सर्व संवेदना विशिष्ट परिस्थितीत एकत्र होतात. (एककाला सोयीचे नाव "वणव्याची आग".)
निरीक्षण : त्या परिस्थितीत दृष्टी-श्रवण-घ्राण-रसन-ध्वनी नोंदवायच्या.
निरीक्षणपश्चात् : " उपन्यास सिद्ध किंवा असिद्ध होतो, निरीक्षण असे-की-तसे असले म्हणून उपन्यासापूर्वीच्या गृहीतकाचे काहीही बिघडत नाही.
- - -
वरील गृहीतकही पूर्वी कधी निरीक्षण-आश्रित उपन्यास होता का? ... (इटरेशन करा...) बर्याच लोकांच्या मते काही थोडी गृहीतके शेवटी अशी येतात, जी निरीक्षणांनी तपासण्यापलीकडची असतात. माझ्या मते ती गृहीतके अशी :
(१) निरीक्षणे असतात.
(२) काही निरीक्षणांची व्यवस्था लावता येते.
(३) [माझे स्वतःचे आणखी एक गृहीतक आहे, शिवाय आइन्स्टाइन, रसेल यांनी असे गृहीतक मानलेले आहे] काही निरीक्षणे "वस्तुनिष्ठ" असतात - व्याख्या : ती निरीक्षणे "अनेकां"ची "जुळतात". माझ्या प्रतिपाद्य गृहीतकांबद्दल उपक्रमावरच पूर्वी चर्चा केलेली आहे. (दुवा).
आता चरम गृहीतके पोकळीत तयार झाली आहेत की नाहीत, याबद्दल माझा हट्ट नाही. (पोकळीत नाहीत, असे मला वाटते - यालाच बहुधा तुम्ही बूटस्ट्रॅपिंग म्हणता, पुढील फरक आहे का...). पण ती स्वयंस्पष्ट किंवा प्रतिपाद्य आहेत. मी पुढे केलेल्या निरीक्षणांमुळे त्यांना सत्य मानण्यात काहीही फरक पडत नाही. ही अंतिम गृहीतके "टेस्टेबल" नाहीत.
या निबंधात विचार चालू आहे की "कार्यकारणभाव" असे स्वयंस्पष्ट किंवा प्रतिपाद्य गृहीतक निरीक्षणापूर्वी असावे का? रसेल सांगतात की "नको". "कार्यकारणभाव" हा उपन्यास (हायपोथेसिस) असावा का? वाटल्यास जरूर. परीक्षण-योग्य व्याख्या करावी, आणि खुशाल निरीक्षणांवर तपासावी. काही बाबतीत विकलन समीकरणे (डिफरेन्शियल इक्वेशने) सापडतात, इतपतच मर्यादित अर्थाने "कार्यकारणभाव" रसेल यांना निरीक्षणांमुळे सापडलेला आहे. तुम्हाला त्यांचे नेमके कुठले तर्क पटलेले नाहीत?
- - -
- - -
हे प्रतिपाद्य/स्वयंस्पष्ट गृहीतक आहे, की उपन्यास आहे? द्वैत आहे की अद्वैत आहे याबद्दलसुद्धा माझे तुमच्यापाशी हेच कुतूहल आहे.
माझ्या स्वतःच्या दृष्टीने वरील वाक्य उपन्यास आहे. (निरीक्षणांनी सिद्ध/असिद्ध होण्यासारखा सुयोग्य उपन्यास आहे.) रसेल यांनी या प्रश्नाची चर्चा (येथील) भाग ५/७ मध्ये "psycho-physical parallelism" म्हणून केलेली आहे.
- - -
थिअरी, मेटाथिअरी...
इच्छा ही भौतिक घटना आहे की नाही व ती असल्यास तिला विशेष स्थान देण्यात काय गम्य आहे असा प्रश्न होता. वस्तुनिष्ठपणे निरीक्षकाच्या मेंदूत डोकावून त्याची निरीक्षण प्रक्रिया हीच भौतिक घटना असल्याचा विचार झालेला नाही असं वाटलं. हे अद्वैत प्रस्थापित झालं तर मांडणी खूप सोपी होईल असं वाटतं. ते निरिक्षणांनी होऊ शकेल असंही वाटतं.
"कार्यकारणभाव" ला मी गृहितकापेक्षा रूल ऑफ इन्फरन्स म्हणेन. (इथे, मूळ लेखात व वरील प्रतिसादांतही थिअरी व मेटाथिअरी यांच्या पातळ्या मिसळत आहेत असं वाटतं. प्रिन्किपिआ लिहिणार्याकडून थोडी अधिक रेखीव मांडणी अपेक्षित होती. असो.) तो आवश्यक आहे की नाही यावर विचार होणं रास्तच. तो मेटाथिअरीचं गृहितक म्हणून आवश्यक नाही हा मुद्दा पटतो.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
२. स्पष्टीकरण, १. अतिशय वेगळा प्रश्न
(आधी २) "रूल ऑफ इन्फरन्स" हा प्रकार थियरी मध्ये येतो की मेटाथियरीमध्ये? तत्त्वज्ञानाच्या या शाखेला ज्ञानशास्त्र ("एपिस्टेमॉलॉजी") म्हणतात, आणि मला वाटते की तो "मेटाथियरी"मध्ये यावा. भौतिकशास्त्राच्या कुठल्याही थियरीमध्ये (मेटाथियरी मध्ये नसलेले) कार्यकारणभाव हे प्रमाण (रूल ऑफ इन्फरन्स) कसे वापरतात? उदाहरण किंवा स्पष्टीकरण देऊ शकाल काय?
"थियरी आणि मेटाथियरी मध्ये घोटाळा होतो आहे" हे तुमचे निदान अचूक आहे. मात्र गोंधळ रसेल यांचा क्षणमात्रही होत नाही. रसेल यांनी "मेटाथियरी" शब्द वापरलेला नाही, खरे. मात्र त्यांची चर्चा कुठल्या विषयाबद्दल आहे, त्याबद्दल कुठलीही संदिग्धता नाही. "गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा सर्व शक्य सिद्धांतांपैकी केवळ एक वैज्ञानिक सिद्धांत आहे, आणि तो केवळ उदाहरणादाखल घेत आहे" हे रसेल यांनी पुन्हापुन्हा स्पष्ट केले आहे. वेगळा कुठला सिद्धांत असू शकतो, आणि तोही विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात सापडू शकला पाहिजे, अशी चर्चा आहे. म्हणजे तुम्ही ज्याला "मेटाथियरी" म्हणता, तोच विषय आहे. मेटाथियरीची चर्चा करताना उदाहरणादाखल थियरी येईल हे तर अपेक्षितच आहे.
"गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण कुठे सुरू होते, कुठे संपते; आणि मूळ "मेटा" विचारांचा धागा पुन्हा कसा पकडला जातो", याबाबत रसेल यांचे लिखाण तुम्हाला रेखीव भासलेले नाही का? मला मात्र उदाहरण कुठे सुरू होते आणि संपते त्या परिसीमा लिखाणात स्पष्ट जाणवतात. काही असो - ही साहित्यिक टीका आहे.
बाकी "अस्तित्वशास्त्र" आणि "ज्ञानशास्त्र" (ऑन्टॉलॉजी आणि एपिस्टेमॉलॉजी) या संज्ञा अधिक नेमक्या आहेत, या अवयवांनी बनलेले "तत्त्वज्ञान" हे "मेटाथियरी" आहे
- - -
"इच्छा ही भौतिक घटना" आणि "वस्तुनिष्ठपणे निरीक्षकाच्या मेंदूमध्ये बघणे" या दोन वेगवेगळ्या चर्चा आहेत.
"वस्तुनिष्ठपणे निरीक्षकाच्या मेंदूत बघणे" या प्रकाराच्या (तार्किकदृष्ट्या) आधी "निरीक्षणे आहेत" हे तत्त्व येते. "मेंदू आहे" या निरीक्षणाच्या आधी "निरीक्षणे असतात" हे तत्त्व येते. "वस्तुनिष्ठपणे" म्हणजे काय ते ठरवण्याआधी "निरीक्षणे असतात" हे तत्त्व येते.
तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने या बाबतीत बघणे म्हणजे "निरीक्षकाची व्यक्तिनिष्ठ निरीक्षणे" आणि "वस्तुनिष्ठता" यांच्यात समन्वय साधणे, होय. याबाबत "रिलेशन ऑफ सेन्स डेटा टु फिजिक्स" हा रसेल यांचा दीर्घनिबंध साधारण त्याच काळात प्रसिद्ध झाला.