कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ३/७

भाग ३ : काही प्रचलित पण असयुक्तिक उक्तींबाबत चर्चा

या ऊहापोहाचे महत्त्व काय? अंशतः महत्त्व असे, की यातून विज्ञानाच्या कार्यपद्धतीचे अधिक तथ्यात्मक वर्णन मिळेल. अंशतः महत्त्व हे, की या प्रकारच्या कारण संकल्पनेमुळे उद्भवणारी मानवी इच्छेची चुकीची उपमा, आणि तिच्यातून फळणारे चुकीचे युक्तिवाद दूर व्हावेत. त्या हेतूने तत्त्वज्ञानाच्या इतिहासात मोठा भाग घेतलेली काही तत्त्वे मी उदाहरणादाखल विचारात घेणार आहे.

(१) "कार्य आणि कारण यांचे एकमेकांशी साम्य असते." हे तत्त्व occasionalism मध्ये केंद्रभूत होते, पण अजूनही पूर्णपणे विझलेले नाही. (अनुवादकाची टीप : या पंथात प्रत्येक घटना देवाच्या विवक्षित इच्छेने होते असा मूलभूत विचार असतो) अजूनही असे मानले जाते, की जर पूर्वी काही मानसिक पदार्थ नसेल, तर तशा विश्वात मन उद्भवू शकणार नाही. या विचाराचा आधार हाच की मन आणि जडपदार्थ इतके वेगळे असतात, की मनाचे कारण जड पदार्थांमध्ये असू शकत नाही. आणखी विवक्षित उदाहरण असे - आपल्यामधील ज्या तथाकथित उदात्त प्रवृत्ती आहेत, त्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या तशाच उदात्त तत्त्वातून उद्भवू शकतात. नाहीतर त्या अतर्क्य आहेत, असे मानले जाते. हे सर्व दृष्टिकोन कार्यकारणभावाच्या सिद्धांताची अतिसुलभीकृत आवृत्ती मानण्यातून येतात. जर "कारण" आणि "कार्य" यांना काही अर्थ दिलाच, तर विज्ञानातून असे दिसते, की त्या गोष्टी फारच असमान असतात - "कारण" हे अवघ्या विश्वाच्या दोन स्थिती असतात, आणि "कार्य" ही विवक्षित घटना असते.

(२) "कारण हे इच्छेसारखे असते, का तर कारण आणि कार्यामध्ये समजून येईल असा संबंध (intelligible nexus) असतो." मला वाटते की हे तत्त्व कित्येक तत्त्वज्ञांच्या कल्पनांमध्ये भिनलेले असते, पण अशा रीतीने उघड सांगितल्यास ते त्याचा नकार देतील. मन हे जड पदार्थांमधून उत्पन्न होणार नाही, या आधीच्या दृष्टिकोनात हे तत्त्वसुद्धा कार्यरत असावे. "समजून यावा असा संबंध" म्हणजे काय हे मला नीट कळत नाही : त्याचा अर्थ "कल्पनाशक्तीला ओळखीचा वाटणारा संबंध" असा काही असावा. मनोनिर्धाराने केलेली कृती आणि त्या कृतीचे फल यांच्यामधला संबंध "समजून यावा असा" असला, तर याच अर्थाने. नाहीतर त्या संबंधात समजून यावे, असे काही विशेष नाही. या प्रकारचा संबंध तथाकथित कार्यकारणभावाच्या सिद्धांताच्या "घटनां"च्या मध्येच दिसून येऊ शकतो. कार्यकारणभावाच्या ऐवजी विज्ञानात जे कायदे दिसतात, त्यांच्या अन्वये दोन घटनांमध्ये असा संबंध शोधायला जागाच राहिलेली नाही.

(३) "कारण हे कार्यास घडण्याची सक्ती करते, कार्य मात्र त्या प्रकारे कारणास घडण्याची सक्ती करत नाही." ही समजूत पूर्वनिर्धारिततेच्या (determinismच्या) नावडीत कार्यरत असलेली दिसते. परंतु वास्तविक ही समजूत वरील दुसर्‍या तत्त्वाशी निगडित आहे. आणि ते तत्त्व त्यागले की हे तत्त्वही कोसळते. ’सक्ती’ची व्याख्या आपण अशी करू शकतो : "जर परिस्थितीमुळे ’अ’ला इच्छेविरुद्ध काही करावे लागते, किंवा इच्छा असून काही करता येत नाही, तर परिस्थितीच्या कारणाने होणार्‍या कार्याची ’अ’वर सक्ती होते." या व्याख्येत "कारण" शब्दाचीसुद्धा कुठलीतरी व्याख्या सापडली आहे, हे अध्याहृत आहे - या मुद्द्यापाशी मी परत येईन. सध्या मला इतकेच स्पष्ट करायचे आहे, की ’सक्ती’ ही संकल्पना गुंतागुंतीची आहे, आणि तीत इच्छेची आडवणूक अध्याहृत आहे. जोवर व्यक्ती इच्छेप्रमाणे करतो, तोवर कुठलीच सक्ती नाही. पूर्वघटनांच्या गणितातून त्याच्या इच्छा किती का निर्धारित असेनात. आणि इच्छेचा संदर्भ नाही तर सक्तीचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच सामान्यतया कारणाने कार्याची सक्ती होते, असे म्हणण्याने दिशाभूल होते.
याच तत्त्वाची एक संदिग्ध आवृत्ती "सक्ती"च्या ठिकाणी "निर्धारण" (determine) असा शब्द वापरते. असे म्हणतात की कारणाने कार्य ज्या प्रकारे निर्धारित होते, त्या प्रकारे कार्य कारणाला निर्धारित करत नाही. "निर्धारित करणे" म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नाही. मला माहीत असलेला नेमका सुस्पष्ट अर्थ असा - गणितातील अनेकास-एक संबंध (one-many relation) किंवा फलन (function) संबंध. समजा आपण मानले की कारणे अनेक असू शकतात, पण कार्य एकच असते. म्हणजे जर अमुक कारण असले, तर तमुक कार्य असतेच, पण जर तमुक कार्य असले, तर कारण अनेक पर्यायांपैकी कुठलेही एक असू शकते. असे असल्यास, आपण या अर्थाने म्हणू शकतो की कारणाने कार्य निर्धारित होते, पण कार्याने कारण निर्धारित होत नाही. मात्र कारणांचे अनेकत्व कसे येते? यासाठी कार्याची संकल्पना ढोबळ आणि मर्यादित व्याप्तीची ठेवावी लागते, आणि कारणाची संकल्पना नेमकी आणि मोठ्या व्याप्तीची ठेवावी लागते. अनेक पूर्वघटिते मनुष्याच्या मृत्यूचे "कारण" होऊ शकतात, कारण मृत्यू ही संकल्पना ढोबळ आणि मर्यादित व्याप्तीची आहे. परंतु आपण उलट मार्ग चोखळला, आणि "कारण" म्हणून विवक्षित विषप्राशन निवडले, आणि "कार्य" म्हणून पाच मिनिटांच्या नंतर जगातील सर्व परिस्थिती निवडली, तर आपल्याला कारणांच्या ऐवजी कार्यांचे अनेकत्व मिळेल. अशा प्रकारे कारण आणि कार्य यांच्यामधली तथाकथित असंमिती (lack of symmetry) केवळ मृगजळ आहे.

(४) "जेव्हा कारणाचे अस्तित्व संपते तेव्हा ते क्रिया चालवू शकत नाही, का तर ज्याचे अस्तित्व संपले ते नसतेच." ही एक सामान्य उक्ती आहे, आणि त्याहूनही सामान्य अनुक्त पूर्वग्रह आहे. बर्गसनची "durée" (कालांतर) ही संकल्पना आकर्षक असण्यामागे हे तत्त्व आहे, असे मला वाटते. ज्या अर्थी भूतकाळ आता परिणाम करत आहे, त्याअर्थी तो अजून कुठल्यातरी तर्‍हेने अवशिष्ट असला पाहिजे, ही ती संकल्पना होय. कारणे "क्रिया चालवतात" ही समजूत या उक्तीमधील चूक आहे. इच्छाप्रयासाच्या (volition) बाबतीतच "क्रिया चालवणे" ही संकल्पना लागू आहे, वेगळ्या कुठल्या बाबतीत नाही : संकल्पाप्रमाणे कार्य होते तेव्हा इच्छाप्रयास "क्रिया चालवतो" असे म्हणतात. जाणीवपूर्वक म्हणा, नेणिवेने म्हणा, कारणाची इच्छाप्रयासाशी सरमिसळ केल्यामुळे कारण "क्रिया चालवते" अशी समजूत होते. आपण पाहिलेच आहे, की कारण हे कार्यापासून काही कालांतराने विभागलेले असते, आणि कारण संपुष्टात आल्यानंतरच कार्यास करणीभूत होते.
इच्छाप्रयास "क्रिया चालवण्याच्या" वरील व्याख्येबद्दल कोणी आक्षेप घेईल की इच्छाप्रयास कारणत्वाने कार्य घडवतो, तेव्हाच तो क्रिया चालवतो. जेव्हा ते कार्य आपोआप इच्छाप्रयासानंतर घडते, तेव्हा इच्छाप्रयास क्रिया चालवत नाही. इच्छाप्रयास "क्रिया चालवण्याचा" हाच सामान्य अर्थ आहे, हे निश्चित. पण यात कारणाची व्याख्याच वेगळी आहे (अनुवादकाची टीप : कारणानंतर कार्य होते आणि होतेच अशी काही व्याख्या आपण आधी बघितली). आणि आपण ज्या व्याख्येचे खंडन करण्यात गुंतलेलो आहोत, ती सोडून ही वेगळी व्याख्या आपल्याला सध्या स्वीकारता येत नाही. (अनुवादकाची टीप : वेगळीच व्याख्या स्वीकारली, तर खंडन न करताच विषय बदलला, असे होईल.) आपल्या व्याख्येने आपण म्हणू, की इच्छाप्रयास "क्रिया चालवतो" ते केव्हा - आदमासे समान परिस्थितीमध्ये आदमासे समान इच्छाप्रयास केल्यास त्यानंतर संकल्पित कार्य होण्याचा कुठला कायदा असेल, तर इच्छाप्रयास क्रिया चालवतो. परंतु हा खूपच धूसर विचार आहे, आणि आपण अजून चर्चेत न घेतलेल्या अनेक संकल्पनांचा यात शिरकाव होतो. या ठिकाणी आपण महत्त्वाचे लक्ष देण्यालायक काय तर हे - मी प्रतिपादन केल्याप्रमाणे जर आपण नेहमीची "कारण" संकल्पना त्यागली, तर ही नेहमीची "क्रिया चालवणे" संकल्पना आपल्यासाठी बंद होते.

(५) "कारण ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणावेगळ्या ठिकाणी कार्य चालवू शकत नाही." ही उक्ती फारच मोठ्या क्षेत्रात पसरलेली आहे. न्यूटनविरुद्ध हा मोठा आक्षेप होता, आणि अजूनही ही उक्ती "दूरवरील क्रियां"बद्दल पूर्वदूषितग्रहाचा स्रोत बनून राहिलेली आहे. या उक्तीमधून तत्त्वज्ञानात काय-काय आले - अल्पकालिक क्रियांचा (transient actionचा) नकार, तिथून अद्वैत (monism) आणि तिथून लाइब्नित्सचा विश्वकणवाद (monadism). याच्या समांतर कालविषयक जोडणीबद्दलची जी उक्ती आहे, ही तशीच आहे. कारणे "क्रिया चालवतात", म्हणजे कुठल्यातरी संदिग्ध प्रकारे आपल्या इच्छाप्रयासांसारखी आहेत, यावर या उक्त्या आधारित आहेत. आणि काळाच्या जोडणीसारखेच ठिकाणाच्या जोडणीबद्दल या उक्तीमधून येणारे निष्कर्ष पूर्णतः निराधार आहेत.

(पुढे चालू)
- - -
मूळ लेखाबाबत सर्व हक्क "बर्ट्रंड रसेल पीस फाउंडेशन"कडे आहेत. हे मराठी भाषांतर आणि आंतरजालावर होणारे प्रकाशन अनुमतिप्राप्त आहे.

Comments

अनुक्रमणिका आणि शुद्धिपत्र

येथे सर्व भागांचे दुवे दिले जातील. शिवाय जर काही चुका असतील तर त्यांचे शुद्धिपत्र दिले जाईल. शक्यतोवर या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, ही वाचकांना विनंती आहे.

अनुक्रमणिका
भाग १: प्रास्ताविक, कार्यकारणभाव आणि आवश्यकता, आवश्यकतेच्या व्याख्या
भाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर
भाग ३ : काही प्रचलित पण प्रामादिक उक्तींबाबत चर्चा
भाग ४ : कार्यकारणभावाऐवजी विज्ञानात कुठले कायदे असतात? ते मूलभूत असतात का?
भाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता
भाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक
भाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश

शुद्धिपत्र

वाचतो आहे

पूर्णपणे समजलं नाही, पुन्हा एकदा वाचेन. मात्र वेगवेगळ्या पातळीवरच्या किंवा स्केलवरच्या घटनांचा (कार्यं व कारणं) विचार केल्यामुळे खूप वैचारिक गोंधळ झाल्याचं जाणवतंय. पण १. व २. प्रकारची विचार करण्याची पद्धत आपल्याला अनेक वेळा वैचारिक मांडणीतून जाणवते. कधी कधी १. प्रकारची कारणपरंपरा हे अनुत्तर किंवा चक्रीय उत्तर वाटतं. उदा. पेशींमध्ये काही जीवद्रव असल्यामुळे त्या सजीव असतात. किंवा मेंदूमध्ये एक लपलेला स्व असतो...

कार्य व कारण संकल्पनाच नष्ट कराव्याशा का वाटल्या असाव्यात याची थोडी कल्पना येतेय.

भौतिक घटना या तर केवळ असतात... आपण जर उलटी फिरवलेली फिल्म बघितली तर (कमी शक्यतेशिवाय) काहीच 'चुकीचं' दिसणार नाही. यानेच कार्य व कारण कल्पनांना तडा जात नाही का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर