कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ५/७

भाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता

अवघ्या विज्ञानात आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांमध्ये भेद केला पाहिजे. पहिला प्रकार : जे कायदे आदमासे बरोबर (approximate) असतात, आणि प्रयोगांनी पडताळता येतात. दुसरा प्रकार : जे कायदे तंतोतंत बरोबर (exact) असू शकतील पण प्रयोगांनी पडताळता येत नाहीत. उदाहरणार्थ : गुरुत्वाकर्षणाचा कायदा सूर्यमालेच्या संदर्भात लागू केल्यास, दूरवरच्या तार्‍यांकडे दुर्लक्ष केल्यासच प्रयोगांनी पडताळता येतो. पण असे केल्यास तो कायदा फक्त आदमासे सत्य आहे असे आपण मानतो. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा कायदा तंतोतंत बरोबर आहे, असा आपला विश्वास आहे, पण त्याची प्रायोगिक पडताळणी आपल्याला करता येत नाही. "तुलनात्मक अलग व्यवस्था" (relatively isolated system) म्हणून ज्या असतात, त्यांच्याबाबतीत हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. या व्यवस्थांची व्याख्या अशी केली जाऊ शकते :-
एका विशिष्ट कालमर्यादेत, काही ठराविक प्रमादाच्या (assigned margin of errorच्या) आत, जर एखाद्या व्यवस्थेने त्याच-त्या तर्‍हेने वर्तन केले, उर्वरित विश्व कुठल्याही का स्थितीत असेना, तर त्या काळात ती व्यवस्था तुलनात्मक अलग म्हणावी.
जर उर्वरित विश्वाच्या काही विवक्षित स्थितींमध्ये प्रस्तुत व्यवस्थेमध्ये ठरवलेल्या प्रमाद-प्रमाणापेक्षा अधिक फरक होणे शक्य असेल, पण उर्वरित विश्वाची तशी परिस्थिती वास्तवात नाही असे म्हणण्यास पुष्कळ तार्किक आधार आहे, तशा व्यवस्थेला "कामचलाऊ अलग" (practically isolated) म्हणता येते.
काटेकोरपणे बोलायचे झाल्यास व्यवस्था कुठल्या पैलूने तुलनात्मक अलग आहे त्याची विवक्षा केली (specify) पाहिजे. उदाहरणार्थ : खाली पडणार्‍या पिंडांच्या संदर्भात पृथ्वी ही तुलनात्मक रीत्या अलग आहे, पण भरती-ओहटीच्या संदर्भात नव्हे. अर्थकारणाच्या संदर्भात ती कामचलाऊ रीतीने अलग आहे, पण जेव्हन्स म्हणतो तसा आर्थिक संकटांचा सूर्यावरील डागांच्या चक्राशी संबंध असता, तर ती व्यवस्था या बाबतीत कामचलाऊ रीतीनेही अलग नव्हे.

असे जाणवेल की व्यवस्था अलग आहे की नाही याची पूर्वसिद्धता करणे अशक्य आहे. व्यवस्थेचे निरीक्षण करता ढोबळ नियमितता दिसल्यानंतर "व्यवस्था अलग आहे" असा कयास केला जाईल. जर पूर्ण विश्वासाठी सर्व कायदे ठाऊक असते, तर त्यांच्यापासून अमुक व्यवस्थेच्या अलगपणाचा निष्कर्ष काढता आला असता. उदाहरणार्थ वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांत लागू केल्यास, सूर्यमालेच्या जवळ मोठ्या वस्तुमानाची पिंडे नाहीत हे बघता, सूर्यमाला कामचलाऊ अलग आहे, असे अनुमान करता येते. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे, की वैज्ञानिक कायद्यांचा शोध लावायची शक्यता हवी म्हणूनच केवळ अलग व्यवस्था महत्त्वाच्या असतात. विज्ञानाच्या तयार इमारतीत त्यांचे कुठलेही सैद्धांतिक महत्त्व नाही.

तत्त्वज्ञ मूलभूत म्हणतात तो ’अ’ घटना ’ब’ घटनेचे कारण असण्याचा मामला वास्तवात कामचलाऊ अलग व्यवस्थेचे सर्वात सुलभीकृत उदाहरण आहे. सर्वसमावेशक वैज्ञानिक कायद्यांच्या अन्वये अशी परिस्थिती कधी होऊ शकते : एखाद्या कालखंडात जेव्हाजेव्हा ’अ’ घटना घडते, त्याच्यानंतर ’ब’ घटना घडते; असे असल्यास त्या कालखंडात ’अ’ आणि ’ब’ यांची मिळून कामचलाऊ रीतीने अलग अशी व्यवस्था बनते. पण असे झालेले आढळले, तर योगायोगाने खजिना सापडल्यासारखे आहे (piece of good fortune); काही विशेष परिस्थितीमुळे असे होते - विश्वाचे कायदे आहे तेच असते, पण उर्वरित विश्वाची स्थिती वेगळी असती, तर तसे आढळले नसते.

कारणत्वाचा सारभूत उपयोग असा सांगितला जातो - यामुळे भूतकाळामधून भविष्यकाळाबद्दल भाकिते करण्याची शक्यता हातात येते. सामान्यीकरण असे की कुठल्याही विवक्षित काळातल्या घटनांमधून अन्य अविवक्षित काळातली भाकिते करण्याची शक्यता हातात येते. असा निष्कर्ष शक्य असलेल्या व्यवस्थेला "पूर्णनिर्धारणयुक्त" (deterministic) म्हणता येते. पूर्णनिर्धारणयुक्त व्यवस्थेची व्याख्या आपण येणेप्रकारे करू शकू :-
जर व्यवस्थेसंबंधित विवक्षित (क, क,..., क) काळांसाठी (घ, घ, ..., घ) असे विवक्षित आत्त (data) असेल, आणि ’क’ काळाच्या स स्थितीबद्दल असा कुठलाही फलन-संबंध असेल -
= f(घ, क, घ, क, ...घ, क, क)
तर तशा व्यवस्थेला "पूर्णनिर्धारणयुक्त" (deterministic) म्हणता येते.
जर ’क’ची किंमत फक्त विवक्षित कालखंडातली घेतल्यासच हे फलन लागू असेल आणि त्या कालखंडाबाहेर ते समीकरण सत्य नसेल, तर ती व्यवस्था "त्या विवक्षित कालखंडात पूर्णनिर्धारित" म्हणता येईल. जर अवघे विश्व म्हणजे अशी व्यवस्था असेल, तर विश्वाबाबत पूर्णनिर्धारण सत्य आहे, अन्यथा नाही. जर अशा पूर्णनिर्धारणयुक्त व्यवस्थेचा कुठला भाग घेतला, तर त्या भागाला मी येथे "पूर्वनिर्धारित" (determined) म्हणेन. आणि कुठल्याही पूर्वनिर्धारणयुक्त व्यवस्थेचा भाग नसला, तर त्याला मी "लहरी" (capricious) म्हणेन.

, घ,..., घ घटनांना या व्यवस्थेतले "निर्धारक" (determinants) म्हणेन. असे जाणवेल, की जर व्यवस्थेत एक निर्धारकांचा संच असेल तर सामान्यतया (in general) त्यात अनेक निर्धारक असतील. ग्रहांच्या गतीचे उदाहरण घेतल्यास दोन वेगवेगळ्या विवक्षित काळांमधील सूर्यमालेच्या संरचना या निर्धारक होत.

स्पष्टीकरणासाठी दुसरे उदाहरण म्हणून आपण मानस-भौतिक सामांतर्याचा (psycho-physical parallelismचा) उपन्यास (hypothesis) घेऊया. उदाहरणचित्रापुरते आपण असे मानूया की मेंदूची विवक्षित स्थिती मनाच्या विवक्षित स्थितीशी, आणि मनाची स्थिती मेंदूच्या स्थितीशीही नेहमीच जुळते (correspond). अर्थात तो एकास-एक संबंध (one-one relation) असतो. असे असल्यास त्या स्थिती परस्परांची फलने होत. आणि आपण असेही मानू - हे तर जवळजवळ निश्चितच आहे - की मेंदूच्या विवक्षित स्थितीशी अवघ्या जडविश्वाची एक विवक्षित स्थिती जुळते. असे का, तर मेंदूची तंतोतंत जशीच्या तशी स्थिती पुन्हापुन्हा असणे अतिशय असंभाव्य आहे. म्हणून विवक्षित व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा अवघ्या जडविश्वाच्या स्थितीशी एकास-एक संबंध आहे. तस्मात, जर जडविश्वाच्या ’न’ स्थिती मिळून जडविश्वाच्या निर्धारक असतील, तर विवक्षित व्यक्तीच्या मनाच्या ’न’ स्थिती मिळून अवघ्या जडविश्वाच्या निर्धारक असतील. अर्थात हा निष्कर्ष मानस-भौतिक सामांतर्य मानल्यास आहे, हे सांगणे नलगे.

मन आणि जडपदार्थ यांच्याविषयी तत्त्वचर्चा करणार्‍यांचा जो एक तार्किक गोंधळ होतो, त्या संदर्भात वरील उदाहरणचित्र महत्त्वाचे आहे. असे कित्येकदा समजले जाते की मेंदूची स्थिती माहिती असल्यास त्यातून जर मनाची स्थिती निर्धारित होत असती, आणि जडपदार्थांचे विश्व जर एक पूर्णनिर्धारणयुक्त व्यवस्था असले, तर मन जडपदार्थांच्या कुठल्या "अमला"खाली (is subject) असते, आणि जडपदार्थ मात्र मनाच्या तशा "अमला"खाली नसते. मात्र जर मनाची स्थिती माहीत असली, तर त्यातून मेंदूची स्थितीसुद्धा निर्धारितच होत असते. आणि मनाचा जडपदार्थांशी जो काय अंमलसंबंध आहे, तोच उलट्या दिशेने जडपदार्थांचा मनाशी अंमलसंबंध असणार, हे सत्य आहे. सैद्धांतिक पातळीवर जडपदार्थांचा उल्लेख न करता मनाचा पूर्ण इतिहास आपण नोंदवू शकतो, आणि त्यानंतर असा निष्कर्ष काढू शकतो की जडविश्व त्याच्याशी जुळलेला इतिहास प्राप्त झाले. आता हे खरे आहे, की मेंदू-मनाच्या स्थितींचा संबंध अनेकास-एक असला, तर मन हे मेंदूवर एका दिशेने आधारित असेल. आणि उलट बर्गसन मानतो तसा हा मेंदू-मनाच्या स्थितींचा संबंध एकास-अनेक असा असला, तर मेंदू हा मनावर एका दिशेने आधारित असेल. काही का असेना, हे आधारित असणे तर्कशास्त्रीय अर्थाने आहे. लोकांना आपोआप वाटते की असा आधार असल्यास त्यामुळे जे आपण करू इच्छितो, ते न करण्याची आपल्यावर बळजबरी होईल, तो या तर्कशास्त्रीय आधाराचा अर्थ नव्हे.

आणखी एक स्पष्टीकरणात्मक उदाहरण म्हणून यांत्रिकता (mechanism) आणि हेतुसाधकता (teleology) या दोहोंची बाब घेऊया. ज्या व्यवस्थेत निर्धारकांचा संच पूर्णपणे जडपदार्थांचा असतो, ती "यांत्रिक" व्यवस्था होय. उदाहरणार्थ : निर्धारक संचात जडपदार्थांच्या पिंडांच्या वेगवेगळ्या काळांतल्या स्थिती असल्या तर. आपल्याला माहीत असलेले मन-जडपदार्थांचे जे जग आहे, ती अशी यांत्रिक व्यवस्था आहे की नाही? हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. वादाचा एक पक्ष म्हणून आपण मानूया की जग एक यांत्रिक व्यवस्था आहे. माझे असे प्रतिपादन आहे, की या मानण्यातून "विश्व हेतुसाधक आहे की नाही" या प्रश्नावर काहीएक प्रकाश पडत नाही. "हेतुसाधक" म्हणजे नेमके काय याची व्याख्या करणे कठिण आहे, पण कुठलीही व्याख्या निवडली तरी आपल्या वादासाठी फारसा फरक पडत नाही. ढोबळमानाने ज्या व्यवस्थेमधील हेतू सत्यात उतरतात - म्हणजेच गहन किंवा उदात्त किंवा मूलभूत किंवा सर्वसमावेशक किंवा अशाच कुठल्या गुणांनी युक्त असलेल्या इच्छा सत्यात उतरतात - ती व्यवस्था हेतुसाधक असते. आता जर विश्व यांत्रिक असण्याची बाब वास्तविक असली तर या अर्थाने हेतुसाधकतेच्या प्रश्नावर कुठल्याही बाजूने दबाव पडत नाही. सर्व इच्छा फलित होतात अशा प्रकारच्या यांत्रिक व्यवस्थाही असू शकतात, आणि सर्व इच्छांची आडवणूक होते, अशा प्रकारची यांत्रिक व्यवस्थाही असू शकते. जर "जग हेतुसाधक आहे की नाही?" या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल, तर जग यांत्रिक आहे असे सिद्ध करून किंवा असिद्ध करून त्याचे उत्तर मिळत नाही. आणि जग हेतुसाधक असावे अशी मनोकामना असली, तर तेवढ्यासाठी जगाच्या यांत्रिक असण्याचा विरोध करण्यास आधार नाही.

(पुढे चालू)
- - -

मूळ लेखाबाबत सर्व हक्क "बर्ट्रंड रसेल पीस फाउंडेशन"कडे आहेत. हे मराठी भाषांतर आणि आंतरजालावर होणारे प्रकाशन अनुमतिप्राप्त आहे.

Comments

अनुक्रमणिका आणि शुद्धिपत्र

येथे सर्व भागांचे दुवे दिले जातील. शिवाय जर काही चुका असतील तर त्यांचे शुद्धिपत्र दिले जाईल. शक्यतोवर या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, ही वाचकांना विनंती आहे.

अनुक्रमणिका
भाग १: प्रास्ताविक, कार्यकारणभाव आणि आवश्यकता, आवश्यकतेच्या व्याख्या
भाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर
भाग ३ : काही प्रचलित पण प्रामादिक उक्तींबाबत चर्चा
भाग ४ : कार्यकारणभावाऐवजी विज्ञानात कुठले कायदे असतात? ते मूलभूत असतात का?
भाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता
भाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक
भाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश

शुद्धिपत्र

 
^ वर