कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग २/७

भाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर

दुसरी व्याख्या आपला फारसा वेळ घेणार नाही - दोन मुद्द्यांमुळे. पहिला - ही व्याख्या मानसशास्त्रीय आहे : कारणत्वाच्या संदर्भात खुद्द त्या प्रक्रियेशी आपले कर्तव्य आहे, प्रक्रियेबद्दलच्या जाणिवेशी किंवा विचारांशी नव्हे. दुसरा मुद्दा असा - ही व्याख्या वर्तुळाकृती आहे : एक प्रक्रिया दुसर्‍या प्रक्रियेच्या "परिणामस्वरूप होते" असे म्हणताना आडमार्गाने व्याख्या करायची ती कारणसंकल्पना पुन्हा व्याख्येत शिरलेली आहे.

तिसरी व्याख्या सर्वांपैकी नेमकी आहे; तिच्या स्पष्टतेत काहीएक कमतरता नाही. परंतु व्याख्येत प्रतिपादलेल्या काल-अनंतर्यामुळे (temporal contiguityमुळे) मोठी अडचण येते. कालक्रम सूक्ष्मातिसूक्ष्म (compact) असल्यामुळे कुठलेही दोन आकालिक बिंदू (instant) जोडलेले नसतात. त्यामुळे कारण किंवा कार्य, किंवा दोन्ही, व्याख्येनुसार मोजण्याइतक्या काळापर्यंत टिकणारे असले पाहिजेत. व्याख्येच्या शब्दांमुळे असे असलेच पाहिजे हे स्पष्ट होते. पण आपण आता द्विधेत पडतो : जर "कारण" स्वत:हून बदल असणारी अशी प्रक्रिया असेल, (आणि कारणत्व ही वैश्विक व्याप्तीची संकल्पना असेल), तर कारण-प्रक्रियेच्या अंतर्गत आदला भाग आणि पुढल्या भाग यांच्यामध्ये कार्यकारणभावाचा संबंध मानणे भाग पडेल. शिवाय कारण-प्रक्रियेतील अंतिम भागच कार्याच्या संबंधात सुसंदर्भ मानावा लागेल. आदला भाग कार्याला कालक्रमात जोडलेला नसल्यामुळे या व्याख्येमुळेच बाद होतो. असे करता-करता कारण-प्रक्रियेचे कालमान आपल्याला सारखे-सारखे घटवावे लागेल. आणि कालमान कितीका कमी केले, तरी त्याचा "आदला" असा भाग कार्यापासून विभक्त राहीलच. खर्‍या कारणापर्यंत कधी पोचणारच नाही. लक्षात असू द्या की व्याख्येनुसार एकापेक्षा अधिक कारणे असण्यास जागा ठेवलेली नाही. आता "कारण" ही प्रक्रिया नसून न-बदलणारी स्थिरस्थिती असल्यास काय म्हणावे? एक तर अशा प्रकारचे कुठले कारण निसर्गात सापडत नाही. दुसरे म्हणजे (वांझ तार्किक शक्यता सोडली तर) ही परिस्थिती इतकी विचित्र आहे, की ती अग्राह्य आहे : हे कारण काही काळापर्यंत निवांतपणे अस्तित्व सांभाळल्यानंतर अचानक जणू स्फोट होऊन कार्यात कसे काय परावर्तित व्हावे? हा बदल आधीही होऊ शकतो. किंवा नंतरपर्यंत कार्य न होता स्थिती स्थिर राहू शकते. कारण आणि कार्य कालक्रमात एकमेकांना जोडलेले आहेत ही कल्पना या द्विधेमुळे नष्ट होते. जर का कारणे आणि कार्ये अशी काही असतीलच, तर ती कुठल्या मोजण्याइतपत ಕ कालांतराने होत असावीत - आपण पहिल्या व्याखेचाही असाच अन्वय लावला होता.

बॉल्डविनच्या पहिल्या व्याख्येशी सारभूत समसमान व्याख्या अन्य तत्त्वज्ञांनी दिलेली आहे. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो :-

"कार्यकारणभावाचा सिद्धांत समजणे हा विगमन पद्धतीच्या (induction, inductive) विज्ञानाचा मुख्य आधारस्तंभ आहे. हे नेहमीचे ओळखीचे सत्य आहे. निसर्गातल्या प्रत्येक तथ्यात आणि त्याच्या आधीच्या कुठल्यातरी तथ्यातला पूर्व-परक्रम कधीच बदलत नाही, असे आपले निरीक्षण असते." (तळटीप २)

बर्गसनला सम्यक् समजलेले आहे, की तत्त्वज्ञ सांगतात तो कार्यकारणभावाचा सिद्धांत काडीमोलाचा आहे. तरीही तो असेच समजतो, की तो विज्ञानात वापरतात. म्हणून तो सांगतो :-

"आता [वैज्ञानिकांचा] असा वाद आहे की या [कार्यकारणभावाच्या] सिद्धांताचा अर्थ असा आहे, की प्रत्येक घटित (phenomenon) त्याच्या परिस्थितीमुळे पूर्णनिर्धारित (determined) असते. वेगळ्या शब्दात सांगायचे, तर कारणे समसमान असली तर कार्ये समसमान असतात."(तळटीप ३)

आणि पुन्हा इथे :-

"आपल्याला भौतिक घटिते जाणवतात, आणि ही घटिते कायदे अनुसरतात. याचा अर्थ असा : (१) पूर्वी जाणलेली अ, ब, क, ड ही घटिते त्याच आकारात पुन्हा घडू शकतात; (२) 'प' असे कुठले विवक्षित घटित अ, ब, क, ड घडल्याच्या परिस्थितीत उद्भवले होते, आणि त्याच विवक्षित परिस्थितीत जर उद्भवले होते - पुन्हा ती परिस्थिती प्रस्तुत होता ते 'प' घटित पुन्हा घडेलच."(तळटीप ४)

बर्गसनचा विज्ञानावर हल्ला आहे, त्याचा मोठा भाग "विज्ञान असे तत्त्व वापरते" यावर आधारलेला आहे. तथ्य असे, की विज्ञान असे कुठले तत्त्व वापरत नाही. परंतु तत्त्वज्ञ - बर्गसनसुद्धा - विज्ञानाबद्दल आपले दृष्टिकोन एकमेकांकडून घेतात, विज्ञानामधून नव्हे. हे तत्त्व काय आहे, याबद्दल तत्त्वज्ञांमध्ये - वेगवेगळ्या पंथातल्या तत्त्वज्ञांमध्येही - एकमत दिसते. मात्र लगेच काही अडचणी उभ्या राहातात. आताकरिता मी कारणांच्या अनेकत्वाचा प्रश्न सोडून देतो; त्याहून गंभीर प्रश्न विचारात घेणे आहे. सिद्धांताच्या वरील पद्धतीच्या प्रतिपादनामुळे आपल्यापुढे दत्त म्हणून ठाकणारे दोन प्रश्न असे :
(१) "घटना"चा अर्थ काय?
(२) कारण आणि कार्य यांच्या मधील कालांतर किती मोठे असू शकते?

(१) सिद्धांताच्या या प्रतिपादनातली "घटना" ही पुन्हापुन्हा घडू शकणारी कुठली बाब आहे, हे स्पष्ट आहे. नाहीतर सिद्धांत क्षुल्लक (trivial) होईल. म्हणून"घटना" म्हणजे विवक्षित तथ्य नव्हे, अनेक विवक्षित उदाहरणे असलेले कुठले तरी सामान्यरूप आहे. म्हणूनच असेही, की ही "घटना" अवघ्या विश्वाच्या स्थितीपेक्षा मर्यादित असली पाहिजे - विश्वाची अवघी स्थिती पुन्हा तशीच घडेल, हे संभवनीय नाही. "घटना" शब्दाच्या अर्थातून निघणारी उदाहरणे : आगपेटीवर काडी ओढणे, किंवा तिकीट-यंत्रात नाणे टाकणे, अशी काही असावीत. अशी घटना सुद्धा जर का कधी पुन्हा घडायची असेल, तर तिची व्याख्या करताना नेमकेपणाचा अतिरेक होता कामा नये : म्हणजे काडी ओढताना नेमका किती दाब दिला, किंवा यंत्रात टाकलेल्या नाण्याचे तापमान काय होते हे घटनेच्या व्याख्येत नको. इतके बारकावे सुसंदर्भ मानू लागलो, तर अशी घटना फार फार तर एकदाच घडेल, आणि सिद्धांतामधली माहिती संपुष्टात येईल. मग "घटना" म्हणजे बर्‍यापैकी रुंद असे सामान्यरूप आहे, त्या सामान्यरूपाची विवक्षित उदाहरणे वेळोवेळी सापडावीत.

(२) आपल्यासमोरचा पुढचा प्रश्न आहे कालांतराचा. तत्त्वज्ञांना कारण आणि कार्य एकमेकांना निरवकाश जोडलेले (contiguous) वाटतात, यात शंका नाही. परंतु आधी स्पष्ट केल्याप्रमाणे हे शक्य नाही. अनंतविभक्त (अगण्यतम, infinitessimal) असे कुठले कालांतर नसल्यामुळे कारण आणि कार्य यांच्या मध्ये मोजण्याइतपत ಕ इतके कालांतर असले पाहिजे. मात्र यातून लगेच अनुल्लंघनीय आडथळे उभे राहातात. हे ’ಕ’ कालांतर आपण किती का सूक्ष्म केले, कार्याचा प्रतिबंध करणारे काही त्या काळात घडू शकते. मी यंत्रात नाणे टाकतो, पण यंत्रामधून तिकीट काढण्यापूर्वी भूकंप होतो, आणि माझे भाकीत हुकते. अपेक्षित कार्य होईल याची शाश्वती हवी असेल, तर आजूबाजूला (environmentमध्ये) कार्याचा प्रतिबंध करणारे काही नाही, हे आपणास ठाऊक हवे. मात्र याचा अर्थ असा, की तथाकथित "कारण" हे स्वत:हून कार्य निश्चित करायला पुरेसे नाही. आणि एकदा का आपण आजूबाजूचे हिशोबात घ्यायला लागू, ते पुन्हा कधी घडण्याची संभवनीयता कमीकमी होत जाते. शेवटी आजूबाजूचे म्हणून सर्व काही हिशोबात घेतले की परिस्थिती पुन्हा घडण्याची संभवनीयता जवळजवळ शून्य होते.

या सर्व अडचणी आहेत खर्‍या, पण अर्थातच हे कबूल केले पाहिजे, की रोजव्यवहारात अनेक घटनाक्रम बर्‍यापैकी अवलंबून राहावे, इतक्या नेमाने (regularity) घडतात. या नेमाच्या क्रमांमुळे तथाकथित कार्यकारणभावाचा सिद्धांत सुचला असेल. जेव्हा हे क्रम बारगळतात, तेव्हा असा विचार होतो, की क्रम अधिक चांगल्या रीतीने समजला, तर तो कधीच चुकणार नाही.

अमुक वस्तुमानाचा दगड अमुक वेगापेक्षा अधिक अमुक जाडीच्या काचेच्या लादीवर आदळता काच तुटेलच, ही बाब निरपवाद असेलही. अशा नेमाने घडणार्‍या क्रमांचे निरीक्षण, त्यात थोडे अपवाद का असेनात, विज्ञानाच्या बाल्यावस्थेत उपयोगी असते - यास माझा प्रतिवाद नाही. उदाहरणार्थ : हवेत अधाराशिवाय असलेले पिंड खाली पडते - हे निरीक्षण गुरुत्वाकर्षणाच्या कायद्याकडे जाणारा एक टप्पा होता. "या प्रकारे निरपवाद नेमाने घडणारे क्रम असतात असे विज्ञानात गृहीत धरलेले असते, आणि ते नेम शोधणे हे विज्ञानाचे ध्येय आहे," या उक्तीचा प्रतिवाद मी करतो आहे.

"घटना" संकल्पनेची व्याख्या थोडी ढोबळ असल्यामुळेच हे नेमाचे क्रम दिसतात, हे आपण बघितले आहे. "पिंडे खाली पडतात" हे एक ढोबळ गुणवाचक (qualitative) वचन आहे; विज्ञानाला जाणायचे असते, की पिंडे किती वेगाने खाली पडतात. हे पिंडाच्या आकारावर, आणि हवेच्या घनतेवर अवलंबून असते. पोकळीत खाली पडण्याचा वेग जवळजवळ नियमित असतो, हे खरे आहे. जेथवर गॅलिलेओ तपासू शकला त्याला पोकळीतले खाली पडणे पूर्णपणे नियमित दिसून आले. पण पुढे असे समजून आले, की अक्षांशामुळे फरक पडतो, आणि समुद्रसपाटीपासूनच्या उंचीमुळे फरक पडतो. सैद्धांतिक पातळीवर सूर्यचंद्रांच्या स्थितीमुळे फरक पडलाच पाहिजे. थोडक्यात पुढे पडणार्‍या विज्ञानाच्या प्रत्येक पावलाने आपण प्रथम पाहिलेल्या ढोबळ नियमिततेपासून दूर जातो. आदल्या आणि पुढल्या घटनांचे अधिकाधिक सूक्ष्म भेद आपण ओळखतो, आणि कुठल्या "आदल्या" घटना सुसंदर्भ आहेत हे ओळखू येऊ लागते तसे, त्यांचे वलय वाढत जाते.

म्हणजे "तेच कारण तर तेच कार्य" हे जे तत्त्व तत्त्वज्ञांच्या कल्पनेत विज्ञानाचा जीव-की-प्राण आहे, ते तत्त्व पुरते निरुपयोगी आहे. पुढची घटना बर्‍यापैकी नेमकेपणाने वर्तवता येण्याचे गणित करण्यासाठी पर्याप्त पूर्वघटना देता, पूर्वपरिस्थिती इतकी गुंतागुंतीची होते, की तशी परिस्थिती पुन्हा कधी उद्भवणे असंभवनीय होते. म्हणूनच, असे कुठले तत्त्व विज्ञान वापरत असते, तर विज्ञान वांझ राहिले असते.

(पुढे चालू)
- - -
तळटीप २: Logic, Bk. III, Chap. V, section 2
तळटीप ३: Time and Free Will, p. 199
तळटीप ४: Time and Free Will, p. 202
- - -
मूळ लेखाबाबत सर्व हक्क "बर्ट्रंड रसेल पीस फाउंडेशन"कडे आहेत. हे मराठी भाषांतर आणि आंतरजालावर होणारे प्रकाशन अनुमतिप्राप्त आहे.

Comments

अनुक्रमणिका आणि शुद्धिपत्र

येथे सर्व भागांचे दुवे दिले जातील. शिवाय जर काही चुका असतील तर त्यांचे शुद्धिपत्र दिले जाईल. शक्यतोवर या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, ही वाचकांना विनंती आहे.

अनुक्रमणिका
भाग १: प्रास्ताविक, कार्यकारणभाव आणि आवश्यकता, आवश्यकतेच्या व्याख्या
भाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर
भाग ३ : काही प्रचलित पण प्रामादिक उक्तींबाबत चर्चा
भाग ४ : कार्यकारणभावाऐवजी विज्ञानात कुठले कायदे असतात? ते मूलभूत असतात का?
भाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता
भाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक
भाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश

शुद्धिपत्र

 
^ वर