आइन्स्टाइन यांचे व्याख्यान - काल आणि अवकाशाचा तात्त्विक पाया

(१९२१ साली आइन्स्टाईन यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात सापेक्षतासिद्धांतावर काही व्याख्याने दिलीत. पहिले व्याख्यान होते "सापेक्षतापूर्व भौतिकशास्त्रातील अवकाश आणि काल." पहिल्या व्याख्यानाच्या पहिल्या भागात त्यांनी त्यांच्या विज्ञानाबद्दलच्या तत्त्वज्ञानाचा सारांश दिला. तेवढा अनुवाद येथे देत आहे.)

सापेक्षतेच्या सिद्धांताचे अवकाश आणि कालाच्या सिद्धांताशी घनिष्ठ नाते आहे. म्हणून मी सुरुवातीला अवकाश आणि कालाबद्दलच्या आपल्या कल्पनांचा काय उगम आहे, याबाबत चर्चा करणार आहे. असे करून मी एक वादग्रस्त विषय हाताळणार आहे, हे मला माहीत आहे. मनोविज्ञान असो का निसर्गविज्ञान, सर्व विज्ञानाचे उद्दिष्ट्य हे असे असते : आपल्या अनुभवांची व्यवस्था लावून त्यांना एका तार्किक चौकटीत आणणे. तर मग अवकाश आणि कालाविषयीच्या आपल्या नेहमीच्या कल्पनांचा आपल्या अनुभवांच्या गुणधर्मांशी काय संबंध असतो?

कोणत्याही व्यक्तीचे अनुभव हे घटनांचा एक क्रम असल्याचे आपल्याला दिसते. या क्रमात एक-एक घटना आपल्या आठवणीत "आधी" आणि "नंतर" असतात, यापेक्षा अधिक त्यांचे विश्लेषण करता येत नाही. अशा प्रकारे, प्रत्येक व्यक्तीसाठी एक व्यक्तिनिष्ठ काळ असतो. या व्यक्तिनिष्ठ काळाचे मोजमाप करता येत नाही. अर्थात मी प्रत्येक घटनेशी एका आकड्याचा संबंध जोडू शकतो. तोही अशा प्रकारे की "नंतरच्या" घटनेचा आकडा "आधीच्या" घटनेच्या आकड्यापेक्षा अधिक असेल. पण हा घटना-आकडे संबध मुळातच अहेतुक असेल. या संबंधाची व्याख्या मी घड्याळाच्या द्वारे करू शकतो. घड्याळामध्ये घडणार्‍या घटनांच्या क्रमाची दुसर्‍या कुठल्या घटनाक्रमाशी तुलना करू शकतो. "घड्याळ" म्हणता आपल्याला काय समजते - अशी काही वस्तू जिच्यात घडणार्‍या घटना एक एक करून मोजल्या जाऊ शकतात. घड्याळाचे आणखीही काही गुणधर्म असतात, त्यांचा उल्लेख नंतर करू.

भाषा वापरून वेगवेगळ्या व्यक्ती काही प्रमाणात एकमेकांच्या अनुभवांची तुलना करू शकतात. वेगवेगळ्या व्यक्तींच्या काही संवेदना परस्पर जुळतात, आणि काही संवेदनांचा काहीच परस्परसंबंध जुळवता येत नाही, असे दिसून येते. ज्या संवेदना वेगवेगळ्या लोकांना सामान्य, म्हणजे एकसारख्या जाणवतात, त्यांना आपण व्यवहारात खर्‍या मानतो. त्या काही प्रमाणात व्यक्ति-निरपेक्ष असतात. नैसर्गिक विज्ञान, खास करून त्यांच्या पैकी मूलभूत असलेले भौतिकशास्त्र, अशा संवेदनांबद्दल आहे. भौतिक वस्तूंबद्दलची आपली समज, विशेष करून निश्चित आकार असलेल्या "ताठर" वस्तूंबद्दलची आपली समज, म्हणजे त्यातल्या त्यात न बदलणार्‍या संवेदनांचा एक संच होय. घड्याळ हीदेखील त्याच अर्थाने एक भौतिक वस्तू असते किंवा एक अनुभवसंच असते. तिच्यात एक अधिक गुणधर्म असतो - तिच्यामध्ये क्रमाने मोजल्या जाणार्‍या ज्या घटना असतात, त्या सर्व एकमेकांस समसमान मानल्या जाऊ शकतात.

आपली समज, किंवा समजांचा संच अमुकच काही असण्याचे समर्थन काय? तर त्यांनी आपल्या अनुभवांच्या संचाचे चित्रण करण्यास उपयोग होतो, इतकेच. यावेगळी त्या समजांना काही ग्राह्यता नाही. तत्त्ववेत्त्यांनी काही मूलभूत कल्पना आपल्या ताब्यातल्या अनुभव-प्रमाणाच्या आख्त्यारीतून काढून टाकल्या, "गृहीतका"च्या अनाकलनीय शिखरावर नेऊन ठेवल्या, त्यामुळे वैज्ञानिक विचारांच्या प्रगतीला अपाय झाला आहे, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. आता कोणी म्हणेल की कल्पनांचे विश्व काही प्रकारे मनाचा आविष्कार आहे. अनुभवांवरून तर्क करून त्या विश्वाचे अनुमान काढता येत नाही. आणि त्या कल्पनाविश्वाशिवाय विज्ञानच शक्य नाही. जरी हे सर्व दिसून आले म्हणा. तरी हे कल्पनांचे विश्व आपल्या अनुभवांपेक्षा स्वतंत्र नव्हे. जसे आपले कपडे आपल्या शरिराच्या आकारापेक्षा स्वतंत्र नाहीत. अवकाश आणि काल या कल्पनांच्या बाबतीत हे विशेषतः खरे ठरले आहे. भौतिकशास्त्रातील वैज्ञानिकांना या कल्पनांना "गृहीतका"च्या देवलोकातून खाली आणून ठीकठाक करून, वापरण्यालायक करण्यास तथ्यांनी भाग पाडले आहे.

आता आपण आपल्या अवकाशाबद्दलच्या कल्पनांकडे आणि अंदाजांकडे येऊ. येथेही आपल्या अनुभवांचा या कल्पनांशी काय संबंध आहे, त्याकडे काटेकोर लक्ष देणे आवश्यक आहे. प्वँकारेने त्याच्या "La Science et l'Hypothese" पुस्तकात वर्णन केले आहे, त्यावरून मला असे वाटते की त्याला सत्य स्पष्ट दिसले होते. ताठर वस्तूंपासून होणार्‍या संवेदनांमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला जाणवू शकतात. त्यांच्यापैकी सर्वात सुगम असतात ऐच्छिक रीत्या मागे-पुढे उलट-सुलट करता येणारे बदल. प्वँकारे त्यांना वस्तूचे "ठिकाण बदलणे" असे म्हणतो. वस्तूचे ठिकाण बदलत बदलत आपण दोन वस्तूंचा एकमेकांस स्पर्श घडवू शकतो. एकरूपतेचे (काँग्रुएन्सचे) सिद्धांत भूमितीत मूलभूत आहेत - ठिकाण बदलण्याच्या बाबतीत जे नियम लागू होतात त्यांच्याशी ते सिद्धांत निगडित आहेत. अवकाशाच्या कल्पनेसाठी हा पुढचा विचार आवश्यक आहे. 'अ' वस्तूच्या जवळ 'ब', 'क',... या वस्तू आणून त्यांचा एकमेकास स्पर्श करून मोठी-मोठी वस्तू तयार करता येते - 'अ' वस्तूचा विस्तार आपण अशा प्रकारे करू शकतो. ती 'क्ष' वस्तूला स्पर्श करेपर्यंत तिचा विस्तार करू शकतो. 'अ' वस्तूचा ज्या काही प्रकारे विस्तार केला जाऊ शकतो, त्या विस्तारांच्या संचाला आपण 'अ' वस्तूचे अवकाश म्हणू शकतो. मग त्या विस्ताराने पोचल्या जाऊ शकणार्‍या सर्व वस्तू त्या यादृच्छिक 'अ' वस्तूच्या अवकाशात असतात. या अर्थी, आपण 'अवकाश' नामक कुठल्या अमूर्त संदर्भरहित कल्पनेबद्दल बोलू शकत नाही. किंबहुना केवळ 'अ' वस्तूचे अवकाश असेच म्हणू शकतो. आपल्या रोजच्या आयुष्यात वस्तूंच्या स्थानाचा अंदाज करण्यात एकाच पृथ्वीच्या पृष्ठभागाची प्रबळ भूमिका असते, त्यामुळे अशी एक अमूर्त संदर्भरहित अवकाशाची कल्पना आपण करू लागलो आहोत. त्या कल्पनेचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येत नाही. या घातक चुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण केवळ 'संदर्भ-वस्तू' आणि 'संदर्भ-अवकाश' यांच्याबद्दलच बोलू. या कल्पनांमध्ये आणखी सुधारणा करायची गरज सामान्य सापेक्षतासिद्धांतापाशी पोचल्यावरच येते.

(व्याख्यानात पुढे आइनस्टाईन यूक्लिडची भूमिती आणि तिचा पुढचा अभ्यास पूर्णतः या कल्पनांमधून विकसित करून दाखवतात.)
*१९२२ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले हे व्याख्यान प्रत अधिकार मुक्त आहे.

Comments

सुरुवात

चांगली आहे. आपण जर यावर लेखमालिका लिहिलीत किंवा पुढील भाषणांचाही अनुवाद केलात, तर वाचायला आवडेल.

ताठर वस्तू याचा नीट उलगडा झाला नाही. स्थिर अशा अर्थाने हे अभिप्रेत होते का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ताठर=रिजिड

Rigid वस्तू ही कल्पना भौतिकशास्त्रात पुष्कळदा विचारात येते.

जर वस्तू रिजिड नसली तर ती मागे-पुढे उलट-सुलट हलवता येत नाही. ती वाकते. तिच्यापासून होणार्‍या संवेदनांचा संच पूर्वीसारखा राहत नाही. दुसर्‍या वस्तूला स्पर्श केल्यानंतरही अशा मऊ वस्तूला आपण ढकलत राहू शकतो - तिचा आकार बदलत जातो. त्यामुळे त्या वस्तूचा "विस्तार" किती हे कळत नाही.

रिजिड

रिजिड या शब्दाला ताठर हा प्रतिशब्द आवडला. अचल वा जड वस्तु या शब्दातील छटा थोडी वेगळी आहे. तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जडवाद पुस्तकात ही चर्चा असल्याचे पुसटसे स्मरते.
प्रकाश घाटपांडे

गंमत वाटली

रिजिड वस्तू याचा अर्थ आपण सामान्य रित्या त्या वस्तूच्या गुणधर्मांवरून (म्हणजे त्या वस्तूमधील दोन बिंदूंमधील अंतर न बदलणे अशाप्रमाणे) घेतो. त्यांच्यापासून होणार्‍या संवेदनांचा विचार करीत नाही.

" तत्त्ववेत्त्यांनी काही मूलभूत कल्पना आपल्या ताब्यातल्या अनुभव-प्रमाणाच्या आख्त्यारीतून काढून टाकल्या, "गृहीतका"च्या अनाकलनीय शिखरावर नेऊन ठेवल्या, त्यामुळे वैज्ञानिक विचारांच्या प्रगतीला अपाय झाला आहे, अशी माझी ठाम समजूत झाली आहे. "

ह्या संबंधी काही उदाहरणे देता येतील का?

खूप सुरेख अनुवाद.

उदाहरणे

आइन्स्टाइन यांनी येथे दोन दिली आहेत :
१. "काळ" असे काही एक गृहीत धरायचे असते
२. "अवकाश" असे काही एक गृहीत धरायचे असते

ही गृहीतके अनुभवाच्या आख्त्यारीतून काढल्यामुळे विचारांची प्रगती आडते.

मूलभूत फरक करणारी कुठलीही वैज्ञानिक प्रगती आठवा - आणि कुठलेसे अनावश्यक गृहीतक काढून टाकल्याचा प्रभाव दिसेल.

एक खेळ खेळूया.
१. तुम्ही एखाद्या प्रगतिशील वैज्ञानिक विचाराचे उदाहरण द्या. (वैज्ञानिक प्रगती म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती नव्हे, हे सांगणे नलगे.)
२. उपक्रमावरचे वाचक "कुठले अनावश्यक गृहीतक टाकले" ते शोधण्यास मदत करतील.
हा गृहपाठासारखा खेळ आपल्या सर्वांना उपयोगी पडेल.

या खेळीचे एक उदाहरण :
अणू असल्याबद्दलचे वैज्ञानिक विचार.
त्यागलेले गृहीतक : पदार्थाचा भाग पाडला तर भागाचे सर्व गुणधर्म (रंग, चव, वास, वगैरे) तसेच राहातात.
(दुसर्‍या शब्दांत) "कमी-अधिक राशीच्या पदार्थाचे न बदलणारे गुणधर्म" असे काही एक गृहीत धरायचे असते

हे गृहीतक काढून टाकले, आणि अनुभवाचे प्रमाण मानले, म्हणून अणू असल्याचा तर्क करता आला. ते गृहीतक होते तोवर विज्ञानाच्या प्रगतीला आडथळा होता.

वाचायला आवडेल.

आइन्स्टाईन यांच्या व्याख्यानांचा अनुवाद पुढेही (स्वैर,शब्दश:, रुपांतर ) वाचायला आवडेल.
सापेक्षतेच्या सिद्धांतावरील व्याख्याने आमच्या विज्ञानाच्या ज्ञानाच्या मर्यादा आम्हाला माहित जरी असल्या तरी ते हळू हळू समजेल असे वाटते.

अवांतर :- अनुवादासाठी आपण समजेल अशी सोप्पी मराठी भाषा वापरल्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो. :)

असेच म्हणतो.........

आइन्स्टाईन यांच्या व्याख्यानांचा अनुवाद पुढेही (स्वैर,शब्दश:, रुपांतर ) वाचायला आवडेल.
सापेक्षतेच्या सिद्धांतावरील व्याख्याने आमच्या विज्ञानाच्या ज्ञानाच्या मर्यादा आम्हाला माहित जरी असल्या तरी ते हळू हळू समजेल असे वाटते.
अवांतर :- अनुवादासाठी आपण समजेल अशी सोप्पी मराठी भाषा वापरल्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो. ;):):)

चांगला अनुवाद | मूळ भाषण

अनुवाद चांगला झाला आहे. आइनस्टाइनची विचारपद्धती आणि विचार स्पष्टपणे, सहजपणे मांडण्याची हातोटी पाहून थक्क व्हायला होते. नंदन यांनी म्हटल्याप्रमाणे याच्या पुढच्या भागांचाही अनुवाद करावा.

मूळ भाषण जालावर कुठे उपलब्ध आहे का?

प्रत-अधिकार!!!

१९२२ मधले प्रकाशन म्हणून मी या व्याख्यानांना प्रत-अधिकार मुक्त मानले. या व्याख्यानांवरचा प्रत अधिकार पुनर्नवीन करण्यात आला आहे असे दिसते.

येथे भाषांतरित केलेली तीनही पाने ऍमॅझॉन.कॉम च्या "मर्यादित पूर्वझलकी"मध्ये दिसतात. (मी मात्र माझ्या छापील प्रतीतून भाषांतर केले.)

पूर्ण पुस्तकाचे भाषांतर करण्याची माझी कुवत नाही. त्यामुळे प्रकाशकाकडून भाषांतराची अनुमती विकत घेण्याचा माझा मानस नाही. वरील ७०० शब्दांच्या भाषांतरासाठी मी आताच प्रकाशकाची अनुमती मागणार आहे.

येथे भाषांतरित केलेला भाग व्याख्यानाचा खूप छोटा भाग आहे. त्यावर येथे सांगोपांग चर्चा झाली, तर "योग्य वापर" तत्त्वाखाली आपण कायदेशीर बंधनात राहू असे मला वाटते. त्यामुळे काही काळ तरी उपक्रमाने हा लेख हटवू नये अशी माझी विनंती आहे.

अरेरे!

१९२२ मधले प्रकाशन म्हणून मी या व्याख्यानांना प्रत-अधिकार मुक्त मानले. या व्याख्यानांवरचा प्रत अधिकार पुनर्नवीन करण्यात आला आहे असे दिसते.

पूर्ण पुस्तकाचे भाषांतर करण्याची माझी कुवत नाही. त्यामुळे प्रकाशकाकडून भाषांतराची अनुमती विकत घेण्याचा माझा मानस नाही.

अरेरे! अरेरे! सार्‍या जगाला नवीन दिशा देणारी ही व्याख्यानेही प्रताधिकाराच्या कुलुपात बंद असावीत?! हा हन्त हन्त...!

या व्याख्यानांची एकूण किती पाने आहेत?

उत्तम!

उत्तम अनुवाद,सोपी भाषा ! नंदनच्या सूचनेचा विचार करून अजून भाषणांचे अनुवाद केलेत तर वाचायला नक्कीच आवडतील,
स्वाती

संवेदना


वेगवेगळ्या व्यक्तींच्या काही संवेदना परस्पर जुळतात, आणि काही संवेदनांचा काहीच परस्परसंबंध जुळवता येत नाही, असे दिसून येते


काही अनोळखी चेहरे प्रथमच पाहिले तरी दोन कानाखाली वाजव्यावात असे वाटणे वा काहींबाबत प्रथमदर्शनी च तुम्हाला अकारण जवळीक वाटणे वा अकारण सात्विक प्रेम आदर वगैरे वाटणे यात कुठले पुर्वग्रह दुषित असतात?

संवेदना

>> काही अनोळखी चेहरे प्रथमच पाहिले तरी दोन कानाखाली वाजव्यावात असे वाटणे वा काहींबाबत प्रथमदर्शनी च तुम्हाला अकारण जवळीक वाटणे वा
>> अकारण सात्विक प्रेम आदर वगैरे वाटणे यात कुठले पुर्वग्रह दुषित असतात?

कोणताही चेहरा प्रथमच पाहिला तरी तो तुम्हाला आधी पाहिलेल्या कोणासारखा तरी वाटण्याची शक्यता असते आणि त्यानुसार हा माणूस कसा असेल याचा (निराधार) अंदाज बांधून या व्यक्तीवर त्या व्यक्तीचे गुणदोष आरोपित केले जात असावेत.

संवेदनेबद्दलचा खालील परिच्छेद फारच आवडला. किती सोप्या आणि स्पष्ट शब्दात विश्लेषण केले आहे! वा!

भाषा वापरून वेगवेगळ्या व्यक्ती काही प्रमाणात एकमेकांच्या अनुभवांची तुलना करू शकतात. वेगवेगळ्या व्यक्तींच्या काही संवेदना परस्पर जुळतात, आणि काही संवेदनांचा काहीच परस्परसंबंध जुळवता येत नाही, असे दिसून येते. ज्या संवेदना वेगवेगळ्या लोकांना सामान्य, म्हणजे एकसारख्या जाणवतात, त्यांना आपण व्यवहारात खर्‍या मानतो. त्या काही प्रमाणात व्यक्ति-निरपेक्ष असतात. नैसर्गिक विज्ञान, खास करून त्यांच्या पैकी मूलभूत असलेले भौतिकशास्त्र, अशा संवेदनांबद्दल आहे. भौतिक वस्तूंबद्दलची आपली समज, विशेष करून निश्चित आकार असलेल्या "ताठर" वस्तूंबद्दलची आपली समज, म्हणजे त्यातल्या त्यात न बदलणार्‍या संवेदनांचा एक संच होय.

छान अनुवाद. आवडला

छान अनुवाद. आवडला. अजून असेच वाचायला नक्की आवडेल
काही ठिकाणी शब्दशः अनुवाद करण्या ऐवजी स्वैर अनुवाद करावा असे वाटून गेले.इंग्रजीत वाक्ये लांब असली तरी मराठीत लहान वाक्ये समजायला सोपी जातात असे मला वाटते

-ऋषिकेश

 
^ वर