ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण २ - नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष

नाडी-ज्योतिष आणि फलज्योतिष

नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही. आम्ही नाडी ज्योतिषाकडे या बाबत विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही. प्रत्यक्षात असे दिसते की ताडपट्टीवर कोरुन ठेवलेल्या भाकितांचा संग्रह म्हणजेच नाडी ज्योतिष!
तुमची जन्म-तारीख, वेळ व ठिकाण इतक्या गोष्टी घेऊन पारंपारिक ज्योतिषी कुंडली बनवतो आणि तिच्यावरून फलज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमचे भविष्य सांगतो. नाडी-ज्योतिषी सुद्धा अगदी हेच करीत असतो, पण आव मात्र असा आणतो की तुमचे भविष्य पाच हजार वर्षापूर्वी कुणा एका त्रिकालज्ञानी महर्षींनी नाडी-पट्टीवर कोरून ठेवलेले आहे आणि तो ते फक्त वाचून दाखवत आहे. तो प्रथम तुमची नाडी-पट्टी शोधण्याचे नाटक करतो आणि नंतर पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो. ही या नाडी-ज्योतिषाची खासीयत व वेगळेपण आहे. दुसरा फरक असा आहे की जन्मकुंडलीवरून तुमचे नाव, तुमच्या आईबापांची नावे, तुमच्या मुलांची संख्या, त्यांची नावे, असली माहिती पारंपारिक ज्योतिष्याला सांगता येत नाही पण नाडी-ज्योतिषी मात्र असा दावा करतो की अशा प्रकारची माहिती नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेली असते, इतकेच नव्हे तर तुमच्या जन्मकुंडलीचा तपशील सुद्धा तुमच्या पट्टीत लिहिलेला असतो असेही तो सांगतो. नाडीज्योतिषाचे हे दावे कसे खोटे आहेत ते आम्ही पुढील विवेचनात दाखवणार आहोत.
कूट लिपीचा अडथळा.
नाडी-ज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, तामीळ भाषेच्या प्राचीन गुप्त किंवा कूट लिपीत पट्ट्या लिहिलेल्या असतात असे नाडीवाले लोक म्हणतात. मराठी माणसाच्या दृष्टीने हे म्हणजे आवाळूवर गळू व्हावे तसे आहे. तो मजकूर खुद्द तामिळी लोकांना सुद्धा जिथे वाचता येत नाही तिथे मराठी लोकांना तो काय कळणार! त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते. नाडी-पट्टीवरील मजकूर नाडी-ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे. नाडी-पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे, किंवा तुमची जन्मरास आणि लग्न-रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची ? जर काही मार्गाने तुम्हाला तशी खात्री करून घेता आली तर मग तुम्ही नाडी-भविष्यावर खुशाल विश्वास ठेवा असे आम्ही म्हणतो.
पट्टी शोधण्याचे नाटक.
तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करतांना नाडीज्योतिषी तुम्हाला अनेक सूचक प्रश्न विचारत जातो व भराभर पट्ट्या उलटत जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला दोन मुले आहेत ना ? पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा आहे ना ? तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल ? पण हे लक्षात घ्या की हे प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा तुमची पट्टी अजून त्याला सापडायचीच असते. तो हे जे सूचक प्रश्न विचारत असतो ते केवळ त्याच्या व्यवहार-चातुर्यामुळे विचारत असतो,--तुमची पट्टी वाचून विचारत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पट्टीत हे तपशील खरोखरीच आहेत की नाहीत ते तुम्हाला कधीच समजणार नाही.
नाडीकेंद्रात तुमच्या अंगठयाचा ठसा घेतल्यावर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण इतक्या गोष्टी नाडीज्योतिषी तुम्हाला सुरुवातीलाच विचारून घेतो. संबंधित वर्षाचे पंचांग त्याच्या हाताशी असतेच. जन्मतारखेवरून तुमची रास व नक्षत्र आणि जन्मवेळेवरून तुमची लग्नरास त्याला लगेच कळते. आता असे पहा की, या इतक्या सर्व गोष्टी जर तुमच्या नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेल्या असतील तर अमुक एक पट्टी तुमचीच आहे किंवा नाही हे सांगणे त्याला अगदीच सोपे नाही का ? तुमची पट्टी ओळखण्यासाठी आणखी खाणाखुणांची खरे तर त्याला काहीही आवश्यकता नाही. अगदी एकसारखी संपूर्ण नावे असलेली अनेक माणसे असू शकतात हे जरी खरे असले तरी जन्मतारीख-वेळ-ठिकाण एकच असलेली व नावेही सारखीच असलेली माणसे सापडणे अशक्यप्राय आहे. शिवाय, अंगठयाच्या ठशाचे शास्त्रीय वर्णन पट्टीत लिहिलेले असते असेही नाडीवाले लोक सांगतात, म्हणजे तीही आणखी एक व्यवच्छेदक खूण त्याला उपलब्ध असते. सांगायचा मुद्दा हा की एवंगुणविशिष्ट अशा त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती अस्तित्वात असणे अशक्य आहे, म्हणून तिची पट्टीही एकमेवाद्वितीय असणार. पण, गंमत अशी की, इतक्या सगळया खाणाखुणा हाताशी असूनही तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करीत असलेला नाडी-ज्योतिषी पट्टी शोधण्याच्या मिषाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो व त्यातून तुमच्या तोंडूनच तुमच्याबद्दलची पुष्कळशी माहिती काढून घेतो. किंबहुना तोच त्याचा खरा उद्देश असतो. पुरेशी माहिती हातात आली की तुमची पट्टी सापडली असे तो म्हणतो, नाहीतर पट्टी सापडत नाही असे म्हणतो. वास्तविक, त्याच्या दृष्टीने कुठलीही पट्टी तुमची पट्टी ठरू शकते. म्हणून तर अगदी मोजक्या पट्ट्यांच्या भांडवलावर हा धंदा वर्षानुवर्षे चालू शकतो. या धंद्यातली खरी मख्खी हीच आहे.
नावे शोधण्याची युक्ती.
तुमच्या आईचे नाव काय? असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे, त्याचे आद्याक्षर य र ल व यापैकी आहे का, ते नाव देवीचे आहे का, असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो. भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत! जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते ? सरळ नावे वाचली नसती का ? तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो. हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे. ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो ! पट्टीत नावे असणे अशक्य का आहे ते पुढील चर्चेवरून कळेल :-
व्यक्ती-गणिक तयार भाकित-पट्ट्या -- एक थोतांड.
व्यक्तीचे पूर्ण नाव व तिच्या जन्मकुंडलीची माहिती जिच्यावर लिहिलेली आहे अशी एखादी नाडीपट्टी जर खरोखरीच अस्तित्वात असेल तर ती पट्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच निरुपयोगी होईल कारण तिचा पुन: उपयोग कुणालाही होणार नसतो. आमच्या विवेचनातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे, का ते सांगतो. नाडीज्योतिषाचा उगम किमान ५००० वर्षांपूर्वी झाला असे नाडीवाले लोक सांगतात म्हणून गेल्या पाच हजार वर्षात निकामी झालेल्या पट्ट्यांची संख्या किती होते याचा जरा अंदाज करून पाहू. सन १९०१ या वर्षात अगस्त्य नाडीच्या सर्व ठिकाणच्या शाखात मिळून दररोज सुमारे ५० लोक आपापल्या पट्ट्यांचे वाचन करून घेऊन गेले असे समजू. म्हणजे त्या एका वर्षात सुमारे १८००० लोक त्यांच्या पट्ट्या पाहून गेले. आज त्यांच्यापैकी कुणीही माणूस हयात नसेल. म्हणजे इतक्या पट्ट्या आता निकामी झाल्या आहेत. हाच हिशोब सन १९०० च्या आधीच्या प्रत्येक वर्षाला लावला तर ५००० वर्षांच्या काळात पाच हजार गुणिले १८००० म्हणजे ९ कोटी पट्टया आजवर निकामी झाल्या आहेत. आणि शिवाय, आजपासून पुढे जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत त्यांचा हिशोब वेगळाच केला पाहिजे! म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी ९ कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे. आता यापुढची गंमत पहा. प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी-पट्ट्या असतात व एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेवलेले असते, याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी-पट्ट्या असतात, अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती-पत्रकावरून दिसते. ते खरे असेल तर, ९ कोटी गुणिले १६ म्हणजे १ अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या, आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात! म्हणजे, त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती ? दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम! स्वत: महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते व त्यांचे पन्नास-एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे. धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण, ज्यांनी वेदाध्ययन व यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली! याचा इत्यर्थ इतकाच की व्यक्तीचा नामनिर्देश व जन्मकुंडलीचा निर्देश केलेल्या भाकित-पट्ट्या हे एक थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवणारे एकतर भोळसट आहेत किंवा चलाख आहेत.
विंग कमांडर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. ( आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात, ओकांना असल्या शंका येतच नाहीत. येणार कशा ? अंधश्रद्धा एकदा मानगुटीस बसली की शहाणासुर्ता माणूससुद्धा कसा मॅड होतो त्याचे हे उदाहरण पहा: बोध अंधश्रद्धेचा पृष्ठ १२१ वर ते म्हणतात "या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदर्शन होत राहील यात शंका नाही. "
( म्हणजे मग मजकुराबरोबर नावेही बदलत असली पाहिजेत? ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो: पट्ट्या मोजक्याच असतात, त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या जातात, तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही. हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे! आता आणखी काय पाहिजे ?

नाडी-पट्टीत जन्मकुंडलीचा निर्देश असणे अशक्य.
जन्मकुंडलीचा निर्देश का अशक्य आहे ते आम्ही आकडेवारीच्या मदतीने वर दाखवले. आमच्या या म्हणण्याची शहानिशा अप्रत्यक्ष मार्गानेही करता येते. तो मार्ग असा : तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण या बाबी नाडी-ज्योतिष्याला तुमच्या तोंडून काढून घेता येत नाहीत. जर तुम्ही म्हणालात की बाकी सगळी माहिती मी देतो पण जन्मवेळ सांगत नाही, तर तो उघडपणे म्हणू शकत नाही की जन्मवेळ दिली नाहीत तर तुमची पट्टी सापडणार नाही. कारण, त्याचा दावा असा असतो की अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने किंवा कुंडलीच्या मदतीने तो तुमची नाडीपट्टी शोधणार आहे. जन्मवेळ नाही म्हटल्यावर नाडीवाल्याची गाडी अडते, कारण जन्मवेळेशिवाय त्याला तुमची कुंडली बनवता येत नाही, आणि कुंडलीशिवाय भाकिते सांगता येत नाहीत. म्हणून अशा वेळी तो थोडेफार प्रश्न विचारल्याचे नाटक करून सन्माननीय माघार घेतो - म्हणजेच पट्टी सापडत नाही असे सांगतो. इथे काय घडते ते पहा. तुमच्या अंगठ्याचा ठसा तुम्ही दिलेला असतोच, आणि शिवाय तुमचे नाव, वडलांचे नाव व जन्मतारीख हेही सांगितलेले असते, फक्त जन्मवेळ लपवलेली असते. तुम्हाला अनेक प्रश्न विचारून तुमच्याकडून तुमचे वैयक्तिक तपशील त्याने मिळवलेले असतात. तेवढ्या माहितीवरून त्याला खरे तर पट्टी सापडायला हवी. पण ती सापडत नाही असे तो म्हणतो त्याचे खरे कारण हेच की जन्मवेळ माहीत नसल्यामुळे त्याला कुंडली बनवता येत नाही व भाकीत वर्तवता येत नाही. पट्टी सापडत नाही असे सांगण्यात त्याचा दुसराही एक हेतु असतो तो असा की तुमच्या पट्टीतला कुंडलीचा तपशील सांगण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही, व त्यामुळे पट्टीत कुंडलीचा काहीही तपशील नसतो हे त्याचे बिंग फुटणार नाही. परंतु ही युक्ती जर तो अशा प्रत्येक प्रसंगी वापरील तर अप्रत्यक्षपणे हेच सिद्ध होईल की पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो. आम्ही अनेकदा हा प्रयोग केला आहे व अनुभव घेतला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनीही हा प्रयोग करून पहावा. वस्तुस्थिती अशी आहे की, नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो. ज्यांना नावाबाबत प्रयोग करायचा असेल त्यांनी जन्मवेळ सुद्धा सांगावी. तुमच्याा आईचे नांव पट्टीत लिहिलेले आहे असा दावा नाडी ज्योतिषी करतो. म्हणून जेव्हा तो तुमच्या आईचे नांव किती अक्षरी आहे, वगैरे प्रश्न विचारु लागेल तेव्हा त्याला सांगावे की, मी या प्रश्नांची उत्तरे देणार नाही. ते नांव पट्टीत असेल तर त्याने ते वाचून दाखवावे.
पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो असे आम्ही म्हणण्याचे दुसरे कारण असे आहे की, नाडीपट्टीतली भाकिते महर्षींनी अंतर्ज्ञानाने लिहिली असे जर नाडीवाले म्हणतात तर भाकिते वर्तवण्यासाठी जन्मकुंडल्यांची महर्षींना काहीच गरज नव्हती हे ओघानेच आले. म्हणजे, नाडीपट्टीत कुंडल्यांची माहिती असण्याचे काहीच सबळ कारण दिसत नाही.
तिसरे कारण असे की, नाडीवाल्यांची भाकिते कुंडलीतल्या १२ स्थानानुसार वर्तवलेली असतात असे त्यांच्या माहिती-पत्रकातच म्हटलेले आहे. अशा पद्धतीचे फलज्योतिष महर्षींच्या काळात म्हणजे ५००० वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हते, मेषादि १२ राशीही तेव्हा प्रचारात नव्हत्या हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या कुंडलीचा तपशील पट्टीत असणे शक्य नाही. या तीन कारणांमुळे पट्टीत कुंडलीचा तपशील असतो हा नाडी-ज्योतिष्यांचा दावा खोटा ठरतो.
इथे एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे: तुम्ही जन्मतारीख बिनचूक सांगून जन्मवेळ अंदाजे सांगितलीत तरी ढोबळ मानाची कुंडली नाडी-ज्योतिषी बनवील व तिच्यावर वेळ भागवून नेईल. जन्मठिकाण ही बाब ढोबळ कुंडलीत कमी महत्वाची असते.
मग लोक खोटे बोलतात काय?
नाडीकेन्द्रात आपल्याला काय काय अनुभव आले याचे रसभरीत वर्णन करताना लोक नकळत खोटे बोलतात व अतिशयोक्ती करतात असे अनुभव आम्हाला आले आहेत. ''आम्ही नुसता अंगठा दिला, बाकी काही माहिती दिली नाही. तरी सुद्धा ही माहिती पट्टीत आली!`` असे कौतुकाने सांगतात. परंतु नाडीवाल्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना या बाबतची पुष्कळशी माहिती त्यांनी दिलेली असते हे त्यांना आठवतही नाही. परंतु त्यांच्या सोबत गेलेल्या माणसांना आम्ही खोदून प्रश्न विचारले असता आम्हाला असे आढळून आले की तशी माहिती नाडीवाल्याने आडवळणाने प्रश्न विचारून त्यांच्याकडून काढून घेतलेली होती.
धूळफेक करणारा प्रचार.
नाडीज्योतिष हा एक चमत्कार आहे असा प्रचार काही लोक करीत असतात. लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा हे नगदी पीक आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. ते पीक जोपासणे व वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. अशा प्रचारावर सूज्ञ वाचकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

सारांश :- नाडी-पट्टीत व्यक्तींची नावे व जन्मकुंडलीचा तपशील असणे शक्य नाही हे आम्ही दाखवले. नाडी-ज्योतिषी स्वत:च भाकिते वर्तवतात व ती महर्षींच्या नावावर खपवतात हेही आम्ही दाखवले. अर्थात्, या सर्व गोष्टी अप्रत्यक्ष रितीने परिस्थितीजन्य पुराव्यावरून व तर्काचा उपयोग करून सिद्ध होतात. नाडीज्योतिषाला कूट लिपीची तटबंदी आणि 'नाडी पट्टी सापडत नाही` ही पळवाट उपलब्ध असल्यामुळे त्याच्याविरुद्ध थेट पुरावे देणे शक्य होत नाही. नाडी-ज्योतिषाची भाकिते किती खरी ठरतात व किती खोटी ठरतात, हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे.

Comments

मग लोक खोटे बोलतात काय?

मग लोक खोटे बोलतात काय?
या प्रश्नाशी संबंधीत एक कथा मायबोलीच्या दिवाळी अंकात वाचली. मला वाटते कथा वाचल्यानंतर जास्त काही बोलण्याची गरज राहणार नाही.

वा!

वा महेशराव मस्त कथा दिलित. :) धन्यु!

एक अनुभव

धन्यवाद महेश राव,
आपण दिलेली लिंक मला आवडली. सातारा चे एक बीसएन एल चे अधिकारी श्री. ओंकार पाटील हे मद्रास प्रांतात गेले होते, त्यांनी नाडी ज्योतिषावर चा "नाडी परिक्षा" हा लेख "किस्त्रीम " च्या १९९६ च्या दिवाळी अंकात लिहिला होता. त्यानंतर त्याचा सामावेश "प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा" या अंनिस संपादित पुस्तकात झाला आहे. त्यात त्यांनी हळूच पॉकेट रेकॉर्डर वापरुन रेकॉर्डिंग केल्याने किती प्रश्न विचारले , कसे विचारले याचे ते वृत्तांत कथन आहे. वाचनीय आहे.
प्रकाश घाटपांडे

नाडी ग्रंथभविष्य चक्राऊन टाकणाराचमत्कार अमान्यकरणाऱ्यांना़ उत्तर

सहज सर्फींग करताना या साईटवर नोंद केली . त्यात नाडी भविष्यावर श्री. प्रकाश घाटपांडे यांचा लेख वाचला.
१. त्यात माझे नाव आले असल्याने काही माहिती देत आहे.
२. नाडी भविष्य ग्रंथात(नवी आवृत्ती ४चौथी - १जाने २००८) व्यक्तीचे नाव कसे कोरून लिहिलेले असते त्याचे लेखी, फोटोसह उदाहरण माझ्या - नाडी ग्रंथ भविष्य - या पुस्तकात दिलेले आहे.
३. कार्बन १४ टेस्ट करून नाडीपट्टी चे वय कसे, कुठे, कोणी शोधले. त्याचा काय निकाल लागला तोही त्या पुस्तकात केलेला आहे.
४. या शिवाय भारतातील सर्वेसर्वा विज्ञानवादी व सर्व निरीस्वरवाद्यांचे वैचारिक गुरू बी.प्रेमानंद यांनी खोटेपणा करून तरीही नाडीपट्टीतूल भविष्य कसे खरे आले यावर यांच्याशी इंडियन स्केप्टिकच्या अंकातून १९९६ साली रिसबुडांनी घेतलेल्या खणखणीत वैचारिक आक्षेपांना प्रेमानंदानी दिलेल्या थातुर मातुर उत्तरांचा खरपुस समाचार पुण्याच्या एका नाडी केंद्राच्या संचालकाने घेतला व त्यांना पाठवलेल्या पत्राला अद्याप काही उत्तर नव्हे नुसती पोच देण्याचे सौजन्यही दाखवले गेले नाही. इंटियूशनने केलेले भविष्य कथन पर्यायाने नाडी भविष्य अचुक येते (जी इंटियूशन नाडी महर्षींना येत नसून ती नाडी वाचकांना येते असे त्यांना वाटते अशी तेच नोंद करतात). हा त्यांच्याच एका पुस्तकात केलेला दावा निरीश्वर वादी मान्य करत नाहीत. तरीही काही कारणाने नकळत झालेल्या व्यक्तिगत अपमानामुळे त्यांनी नाडी भविष्याशी साधलेले वैर अनाकलनीय आहे.
५. नाडी ग्रंथ भविष्यावर नाडीप्रेमींचे एक अधिवेशन १४ ऑक्टोबर रोजी पुण्यात भरवले गेले. त्याला ४०० पेक्षा जास्त नाडी ग्रंथ प्रेमी उपस्थित होते.
६. त्याचा अहवाल व त्यावेळी चर्चा झालेले विषय, व गौरव चिन्ह याची माहिती त्या पुस्तकात दिलेली आहे.
७. पुस्तक गरजूंना पुण्यातील पुस्तकालयात मिळू शकेल.
८. श्री. ओंकार पाटलांनी नाडी भविष्यावर खास तयार केलेल्या लेखाला बोध अंधश्रद्धेचा या पुस्तकातून व नंतरच्या पत्रव्यवहाराला प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या विज्ञान अणि अंधश्रद्धा व नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विज्ञान आणि चमत्कार या पुस्तकातून समर्पकपणे उत्तर देण्यात आले आहे. तरी ही तेच तेच आरोप करून नाडी भविष्याचे गूढ आपणांस कळले असल्याचा दावा करून ते खोटे व फसवे असल्याचा आरोप वरचेवर केला जातो. त्यांच्या पठडीतील विचारधारेच्या लोकांना व प्रसिद्धी माध्यमांना तो मान्य करायला सोपा असल्याने त्यावर चर्चा करण्याचे टाळले जाते वा हेटाळणी करून दुर्लक्षिले जाते. जे लोक आपल्या वैचारिक बांधिलकी मुळे नाडी भविष्याची सत्यता पडताळून पाहू शकत नाहीत, पाहिले तरी खरे असल्याचे खिलाडूपणे मान्य करू इच्छित नाहीत किंवा आमचे विचार मांडलेली पुस्तके वाचू इच्छित नाही त अशा विज्ञानवादी अंधश्रद्धांच्या वाटेला न जाणे योग्य. म्हणून यापुढे नाडी ग्रंथ भविष्याला अकारण नावे ठेऊन, प्रत्यक्ष अनुभव न घेता किंवा तोंड देखले घेण्याचे नाटक करून व तर्काने खोटे ठरवणाऱ्यांना उत्तर द्यायचे नाही कारण त्यामुळे वेळेचा व श्रमांचा अपव्यय होतो. हे लक्षात आल्याने यावर माझ्याकडून परत लेखन करण्याची इच्छा नाही.
या प्रतिसादाला नव्हे सुसंवादाला वाचून सु्द्धा कोणी देखील तर्कवादी आजही नाडी भविष्यावरील पुस्तकांच्या वाटेला गेले नाहीत तर नवल नाही.
ज्यांनी नाडी भविष्याचा अनुभव घेऊन,आपले नाव असल्याची खात्री पाहून केली आहे अशा नाडी ग्रंथ प्रेमींनी यापुढे नाडी भविष्यावर आक्षेप घेणाऱ्याशी सुसंवाद साधावा. कोणाचे काही विरोधी विचार असतील तर त्यांना परस्पर उत्तर द्यावे.

शशिकांत ओक. विंग कमांडर (निवृत्त)
ए -4/ 404, गंगा हॅमलेट हौसिंग सोसायटी विमान नगर, पुणे.
मो - 9881901049.

हे सगळं ठिक पण...

हे सगळं ठिक आहे. पण श्री घाटपांडे यांनी काहि अत्यंत व्यावहारिक प्रश्न विचारले आहेत जे बुद्धी असणार्‍या व ती निरपेक्षतेने वापरणार्‍या कोणालाही पडावेत.
त्याची उत्तरे तुम्ही सोयिस्करपणे टाळली आहेत.

त्याच बरोबर माझे काहि प्रश्न:

ज्यांनी नाडी भविष्याचा अनुभव घेऊन,आपले नाव असल्याची खात्री पाहून केली आहे अशा नाडी ग्रंथ प्रेमींनी यापुढे नाडी भविष्यावर आक्षेप घेणाऱ्याशी सुसंवाद साधावा

१. मला आत्तपर्यंत आपले नाव असल्याची खात्री केलेला कोणीही भेटलेला नाही
२. कृपया ही लिपि आणि ती कशी वाचावी हे जगजाहिर कराल काय्?
३. या नाड्या जालावर उपलब्ध का करत नाहि? म्हणजे ज्याचे तो खात्री करू शकतो
४. ज्योतिष हे खुले आम चर्चिले जाते. त्याची दोन्ही अंगे प्रकाशात आहेत. त्यामुळे ते मानणे अथवा न मानणे हा वैयक्तिक प्रश्न बनतो. परंतू नाडी विद्या ही अंधारी खोका आहे (ब्लॅक बॉक्स) त्यामुळे याची सत्यासत्यता तर्कशास्त्राने कशी पडताळावी. की फक्त तुम्ही म्हणता किंवा अनुभवी म्हणतात म्हणून विश्वास ठेवावा. (उदा. द्यायचं तर ज्योति:शास्त्रात चंद्राची गती वगैरे तुम्ही पडताळून बघु शकता. पण हे दिव्यदृष्टीचे नाटक कसे पडताळावे?)

(विषयांतर टाळणारा) ऋषिकेश

माझा अनुभव

सहजच एकदा एका पुस्तक प्रदर्शनात गेलो होतो. तिथं शशिकांत ओकांचं नाडीग्रंथावरचं परिचय-पुस्तक पाहिलं. उत्सुकता म्हणून विकत घेतलं. पुस्तकात या भविष्यकथनाचे स्पष्ट पुरावे दिले होते. पुढची पायरी म्हणून मी केंद्रावर गेलो.

तिथं या विषयावर आणखी माहिती मिळाली. प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी या विषयाला अनुमोदन दिल्याचं आणि केलेल्या प्रयोगांचं वृत्तही तिथल्या भिंतीवर चिकटवलेलं होतं.

काही खटकलेल्या गोष्टी म्हणजे -

१. 'तुम्ही स्वत:ची कोणतीही माहिती नाडी वाचकास द्यायची नाही' अशी स्पष्ट सूचना तिथं लिहिलेली असताना नाडी वाचक (पट्टी शोधताना) मात्र घाटपांड्यांनी लिहिलेल्यासारखे प्रश्न विचारत होता.

२. हे भविष्य सांगण्यासाठी त्यांनी घेतलेली रक्कम जरा जास्तच वाटली. ऋषीमुनींनी मिळवलेल्या ज्ञानाचा मांडलेला व्यापार पटला नाही.

३. भविष्यकाळात येणार्‍या संकटांबद्दल घाबरवून सोडून ती टाळण्यासाठी पूजा करण्याच्या मिषाने केलेला भरपूर पैसे उकळण्याचा प्रयत्न खटकला.

काही पटलेल्या गोष्टी -

१. मी हे भविष्य मागील वर्षी बघितलं होतं. आणि त्यांनी या कालावधीबद्दल केलेलं भविष्य बर्‍याच अंशी खरं ठरलं आहे.

२. मी प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात माहिती दिलेली नसताना माझ्याबाबत काही गोष्टी त्यांनी आश्चर्यकारकरीत्या सांगितल्या.

नाडीग्रंथभविष्याबद्दल मला पूर्ण आदर आहे. हे एक शास्त्र आहे यावर माझा विश्वास आहे. कदाचित् ओकांनी सांगितलेली माहिते शंभर टक्के खरी असू शकेल. ओकांनी मी वर लिहिलेल्या मला खटकलेल्या गोष्टींचे निरसन केल्यास बरं होईल.

निष्क्रियतेमुळं धोका

म्हणून यापुढे नाडी ग्रंथ भविष्याला अकारण नावे ठेऊन, प्रत्यक्ष अनुभव न घेता किंवा तोंड देखले घेण्याचे नाटक करून व तर्काने खोटे ठरवणाऱ्यांना उत्तर द्यायचे नाही कारण त्यामुळे वेळेचा व श्रमांचा अपव्यय होतो. हे लक्षात आल्याने यावर माझ्याकडून परत लेखन करण्याची इच्छा नाही.

टीकाकारांच्या सक्रियतेमुळं नाही, पण अभ्यासकांच्या निष्क्रियतेमुळं नक्कीच धोका आहे.

नाडी ज्योतिष्य-फल ज्योतिष्य

Vishwas Kalyankar

मी होशीयारपूर् ला असतांना तेथील भ्रुगुसंहिता बद्दल ऐकले होते तेथील भ्रुगुसंहिता भारतात प्रसिध्द् आहे. नंतर मुबईच्या श्री ढवळे यांनी १९८० मध्ये भ्रुगु-संहिता खंड प्रसिध्द केला होता तो माझ्या संग्रही आहे.नंतर श्रीलंकेचा एक नाडी ज्योतिषी जो आस्टेलियात स्थाईक आहे त्याच्याशी इन्टरर्नेट द्वारे संपर्क झाला. त्याने जे फलीत पाठवले ते ७० टक्के मला बरोबर् वाटले. तेंव्हा एखाद्या शास्त्रा बद्दल् एकदम टोकाचे विधान करणे किंवा त्याचे अस्तित्वच नाकारणे मला संयुक्तिक वाटत नाही. व्यक्ती जेंव्हा कोंडीत सापडतो तेंव्हा त्याला त्यातुन धीर देउन बाहेर काढण्याचे काम ज्योतीषी करत असतो आणी त्यात तो बर्याच अंशी यशस्वी होतो. हेच मला महत्वाचे वाटते. उपायां संबंधी च्या कर्मकांडावर मात्र माझा विश्वास नाही.

नाडी ग्रंथ - एक अभ्यास

http://mr.upakram.org/node/992 या संदर्भात उल्लेखलेले नाडी ग्रंथ एक अभ्यास हे शांताराम आठवले यांचे पुस्तक बरीच माहिती देणारे आहे. आजही ते उपलब्ध आहे.
प्रकाश घाटपांडे

ताडपट्ट्याचा सखोल अभ्यास-मजकुराची शहानिशा-त्यातील सत्यता मांडावी

प्राणेश म्हणतात,

प्रकाशराव तुम्ही फक्त तुमच्या अनुभवाने सर्व ग्र्न्थावरच जो आरोप केला आहे तो साफ खोटा आहे.

प्रश्न असा आहे की प्रकाशरावांनी नाडीग्रंथांच्या ताडपट्ट्याचा सखोल अभ्यास करून त्यातील मजकुराची शहानिशा केली असेल तर त्यातील सत्यता वाचकांसमोर मांडावी अशी विनंती.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

मझा अनुभव्

नाडी ग्रंथ ज्योतिष १० पैकी ८ जण हे फसवणारे असतात त्यामुळे प्रकाश घाटपांडे या सारख्या लीकांचा गैरसमज होणे स्वाभाविक आहे. मात्र आपण ज्या ज्योतिष कडून या सर्व अनुभवांची माहिती सांगितली ते किती खरे आहेत याची पडताळणी आपण केलीत का?
पुण्यामध्ये विश्रांतवाडी येथील नाडी ग्रंथ सोडून सर्व ग्रंथ हे साफ खोटे आहेत.
जन्मवेळ आणि तारीख यावरून तुम्ही कुंडली २ मिनिटाच्या आत संगणक चा वापर करून काढू शकता, मात्र या नाडी ग्रंथ मध्ये तुमचे भूतकाळ अतिशय विस्तारीतपणे कसा काय बरं असू शकतो? आणि तेही काहीही नविचारता ? आईचे नाव वडिलांचे नाव तर्क वितरका वापरून कोणीही सांगू शकेल पण काही बाबी जसे कि आई चे शिक्षण वडिलांचे शिक्षण, आईला किती भाऊ आहेत आणि कोण घटस्पोतीत आहे? कोणाचा मृत्यू झाला आहे का? आणि झाला असेल तर कधी? मुला असतील तर त्यांचे शिक्षण काय आहे? ते नोकरी करतात का? करतात तर ते कशात? शिक्षणा मध्ये अडथळे कधी आले होते किवा कधी येतील? अशा अनंत बाबी आहेत कि काहीही न सांगता हे नाडी वाचक आपल्याला आपल्याबद्दल माहिती सांगतात. आणि या सुर्व बाबी जाणून घेण्याआधी कुठल्याही प्रकारची अप्पोइन्त्मेन्त मी घेतली नव्हती, त्यामुळी तिसऱ्या कुणाकडून माहिती काढण्याचा प्रश्नच येत नाही.
प्रकाशराव तुम्ही फक्त तुमच्या अनुभवाने सर्व ग्र्न्थावरच जो आरोप केला आहे तो साफ खोटा आहे. तुम्ही लोक वृत्तपत्र, टी व्ही, अश्या माध्यमांवर भोंदू लोकाच्या ज्या जाहिराती येतात त्याला फसतात आणि जगाच्या नावांनी खडे फोडत बसतात, त्यापेक्षा आपण किती सखोल माहिती घेऊन हि टीका करत याची चाचपणी आपण करावी.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे बुद्धिवादी - बी. प्रेमानंद

मित्र हो,
आपणांस माहित आहे की स्व. बी. प्रेमानंद हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे बुद्धिवादी संस्थाचालक होते. त्यांनी अनेक ठिकाणी लाखो रुपयांची आव्हाने देऊन, साहसी कृत्ये करुन अनेक खोटेपणा करणाऱ्यांची बुरखेफाड केली असे त्यांच्या लेखातून वाचायला मिळते.
त्यांच्या त्या निर्भयपणाचा मला आदर आहे.
म्हणूनच त्यांनी ज्या नाडी केंद्रवाल्यांने आत बसून त्यांच्यासाठी असलेल्या ताडपट्यावर लेखन केले असे वाटत होते त्यांना रेड हँडेड पकडायचे काम करायला हवे होते अशी कोणीही अपेक्षा करेल.
त्यांनी तेव्हाच नव्हे तर नंतरही कधी पुन्हा त्या किंवा अन्य नाडीकेंद्रात जाऊन ताडपट्यालेखन करताना पकडून त्यांची बुरखेफाड का केली नाही हा प्रश्न माझ्याप्रमाणे, कै. रिसबुडांना ही पडतो. म्हणून *रिसबुड बी. प्रेमानंदांना तमिल वाचायाला येते असे वाटून एका नाडीपट्टीच्या फोटोतील लेखन (तरी) वाचावे म्हणून तो पाठवायचे मान्य करतात. पण पाठवत नाहीत. अशी तक्रार प्रेमानंद आपल्या लेखात करतात. पण ज्या तमिळनाडूत ते वास्तव्य करून होते त्या राज्यात अनेक नाडी केंद्रे होती. आहेत तेथील नाडीकेंद्रवाल्यांना कायमचा धडा शिकवायची संधी असताना ते पुन्हा जायचे टाळतात. अशा अग्रणी बुद्धिवादी व्यक्तीने नाडीवाल्यांना रेड हँडेड का पकडले नाही असे विचारले गेले नाही तरच नवल...

बी प्रेमानंदांनी एका नाडीकेंद्रातील अनुभव लिहिलेल्या लेखाला उद्देशून रिसबुडांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवरील लेखावर हा धागा आधारित आहे. (Indian-skeptic. Nov 96 p 29-34)
* कै. मा. श्री. रिसबुडांचा परिचय पुर्वी श्री. प्रकाश घाटपांड्यांनी करून दिला आहे.
... "नाडी ग्रंथांमधील कथनांचा विशेष अभ्यास विचार करणारा तरुण हवा आहे अशी खंत कै. मा. श्री. रिसबुडांनी मला एकदा लिहून व बोलून दाखवली होती" ....

प्रकाटाआ

प्रतिसाद काढून टाकला आहे

त्यावर प्रत्यावाद आत्ताच करत नाही

मित्र हो,
धनंजयांच्या सांगण्यावरून वरील धाग्याच्या खाली तो नेला.
ठीक आहे. मी त्यावर प्रत्यावाद आत्ताच करत नाही.
धाग्यातील आशयावर आपले विचार व्यक्त केलेले आवडले असते.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

लेखन निरर्थक आहे

रेड हँडेड पकडण्यासाठी बलाची आवश्यकता असू शकते.

यात सर्व आले.

मित्र हो,

नाडीकेंद्रवाल्यांना कायमचा धडा शिकवायची संधी असताना उपक्रमी तेथे जायचे टाळतात.

यात सर्व आले.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

ह्यॅ

कोणती संधी कोणी, कधी, कोठे दिली?

बी. प्रेमानदानी केले नाही ते आता तरी कोणी करावे

मित्र हो,
प्राणेश यांच्या २०-८-२००८ मधील प्रतिक्रियेत त्यांना

काही खटकलेल्या गोष्टी म्हणजे - त्यावर माझे निळ्या रंगात उत्तर

१. 'तुम्ही स्वत:ची कोणतीही माहिती नाडी वाचकास द्यायची नाही' अशी स्पष्ट सूचना तिथं लिहिलेली असताना नाडी वाचक (पट्टी शोधताना) मात्र घाटपांड्यांनी लिहिलेल्यासारखे प्रश्न विचारत होता.
याचा अर्थ असा की नाडीकेंद्रात पट्टीवाचना आधी आपणहून माहिती कोणालाही देऊन नका. विवक्षित पट्टी शोधायसाठी त्यापट्टीतील मजकूर आपल्याशी जुळतो का यासाठी आपणांस फक्त हो किंवा नाही असे म्हणून सहकार्य करायचे असते. त्यातील काही माहिती जरूर नाडीवाचकाला कळते पण नाडीपट्टीतील मजकूर जुळवायची ती पद्धती आहे. नाडीपट्टी जुळली की त्यात जे काही लिहिलेले असते ते एका वहीत उतरवून दिले जाते. त्याचा अभ्यास करता येतो. विरोधक असा अभ्यास न करता युक्तीने माहितीकाढून तीच परत सांगतात असा कांगावा करतात.
२. हे भविष्य सांगण्यासाठी त्यांनी घेतलेली रक्कम जरा जास्तच वाटली. ऋषीमुनींनी मिळवलेल्या ज्ञानाचा मांडलेला व्यापार पटला नाही. भविष्य कथन ऐकायला पैसे पडतात. ती रक्कम जादा असे वाटत तर तेथे न जावे. आजकालच्या जागेच्या किंमती, जेवणखाणाचे, राहण्याचे वेळोवेळी प्रवासखर्चाचे व त्यांच्यावर आधारलेले कुटुंबाचे पोट याचा मेळ पाहता त्यांनी किती पैसे घ्यायचे ठरवले जाते. कुठलेही ज्ञान फुकट मिळावे अशी अपेक्षा ठेवली पाहिजे काय?
३. भविष्यकाळात येणार्‍या संकटांबद्दल घाबरवून सोडून ती टाळण्यासाठी पूजा करण्याच्या मिषाने केलेला भरपूर पैसे उकळण्याचा प्रयत्न खटकला. तो खर्च करा किंवा नाही हे सर्वस्वी आपल्या हाती आहे.

खालील प्रतिक्रियेतून नाडी ग्रंथांतील मजकुराबद्द्लचे माझा मनोज००७ यांचे मत अनेकांना नाडीवाले थापेबाजी करतात यावर बरेच भाष्य करून जाते.

नाडी ग्रंथ मध्ये तुमचे भूतकाळ अतिशय विस्तारीतपणे कसा काय बरं असू शकतो? आणि तेही काहीही नविचारता ? आईचे नाव वडिलांचे नाव तर्क वितरका वापरून कोणीही सांगू शकेल पण काही बाबी जसे कि आई चे शिक्षण वडिलांचे शिक्षण, आईला किती भाऊ आहेत आणि कोण घटस्पोतीत आहे? कोणाचा मृत्यू झाला आहे का? आणि झाला असेल तर कधी? मुला असतील तर त्यांचे शिक्षण काय आहे? ते नोकरी करतात का? करतात तर ते कशात? शिक्षणा मध्ये अडथळे कधी आले होते किवा कधी येतील? अशा अनंत बाबी आहेत कि काहीही न सांगता हे नाडी वाचक आपल्याला आपल्याबद्दल माहिती सांगतात. आणि या सुर्व बाबी जाणून घेण्याआधी कुठल्याही प्रकारची अप्पोइन्त्मेन्त मी घेतली नव्हती, त्यामुळी तिसऱ्या कुणाकडून माहिती काढण्याचा प्रश्नच येत नाही.

प्रकाशराव तुम्ही फक्त तुमच्या अनुभवाने सर्व ग्र्न्थावरच जो आरोप केला आहे तो साफ खोटा आहे.

प्रश्न असा आहे की प्रकाशरावांनी नाडीग्रंथांच्या ताडपट्ट्याचा सखोल अभ्यास करून त्यातील मजकुराची शहानिशा केली असेल तर त्यातील सत्यता वाचकांसमोर मांडावी अशी विनंती.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

 
^ वर