नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही. आम्ही नाडी ज्योतिषाकडे या बाबत विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही. प्रत्यक्षात असे दिसते की ताडपट्टीवर कोरुन ठेवलेल्या भाकितांचा संग्रह म्हणजेच नाडी ज्योतिष!
तुमची जन्म-तारीख, वेळ व ठिकाण इतक्या गोष्टी घेऊन पारंपारिक ज्योतिषी कुंडली बनवतो आणि तिच्यावरून फलज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमचे भविष्य सांगतो. नाडी-ज्योतिषी सुद्धा अगदी हेच करीत असतो, पण आव मात्र असा आणतो की तुमचे भविष्य पाच हजार वर्षापूर्वी कुणा एका त्रिकालज्ञानी महर्षींनी नाडी-पट्टीवर कोरून ठेवलेले आहे आणि तो ते फक्त वाचून दाखवत आहे. तो प्रथम तुमची नाडी-पट्टी शोधण्याचे नाटक करतो आणि नंतर पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो. ही या नाडी-ज्योतिषाची खासीयत व वेगळेपण आहे. दुसरा फरक असा आहे की जन्मकुंडलीवरून तुमचे नाव, तुमच्या आईबापांची नावे, तुमच्या मुलांची संख्या, त्यांची नावे, असली माहिती पारंपारिक ज्योतिष्याला सांगता येत नाही पण नाडी-ज्योतिषी मात्र असा दावा करतो की अशा प्रकारची माहिती नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेली असते, इतकेच नव्हे तर तुमच्या जन्मकुंडलीचा तपशील सुद्धा तुमच्या पट्टीत लिहिलेला असतो असेही तो सांगतो. नाडीज्योतिषाचे हे दावे कसे खोटे आहेत ते आम्ही पुढील विवेचनात दाखवणार आहोत.
कूट लिपीचा अडथळा.
नाडी-ज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, तामीळ भाषेच्या प्राचीन गुप्त किंवा कूट लिपीत पट्ट्या लिहिलेल्या असतात असे नाडीवाले लोक म्हणतात. मराठी माणसाच्या दृष्टीने हे म्हणजे आवाळूवर गळू व्हावे तसे आहे. तो मजकूर खुद्द तामिळी लोकांना सुद्धा जिथे वाचता येत नाही तिथे मराठी लोकांना तो काय कळणार! त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते. नाडी-पट्टीवरील मजकूर नाडी-ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे. नाडी-पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे, किंवा तुमची जन्मरास आणि लग्न-रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची ? जर काही मार्गाने तुम्हाला तशी खात्री करून घेता आली तर मग तुम्ही नाडी-भविष्यावर खुशाल विश्वास ठेवा असे आम्ही म्हणतो.
पट्टी शोधण्याचे नाटक.
तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करतांना नाडीज्योतिषी तुम्हाला अनेक सूचक प्रश्न विचारत जातो व भराभर पट्ट्या उलटत जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला दोन मुले आहेत ना ? पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा आहे ना ? तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल ? पण हे लक्षात घ्या की हे प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा तुमची पट्टी अजून त्याला सापडायचीच असते. तो हे जे सूचक प्रश्न विचारत असतो ते केवळ त्याच्या व्यवहार-चातुर्यामुळे विचारत असतो,--तुमची पट्टी वाचून विचारत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पट्टीत हे तपशील खरोखरीच आहेत की नाहीत ते तुम्हाला कधीच समजणार नाही.
नाडीकेंद्रात तुमच्या अंगठयाचा ठसा घेतल्यावर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण इतक्या गोष्टी नाडीज्योतिषी तुम्हाला सुरुवातीलाच विचारून घेतो. संबंधित वर्षाचे पंचांग त्याच्या हाताशी असतेच. जन्मतारखेवरून तुमची रास व नक्षत्र आणि जन्मवेळेवरून तुमची लग्नरास त्याला लगेच कळते. आता असे पहा की, या इतक्या सर्व गोष्टी जर तुमच्या नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेल्या असतील तर अमुक एक पट्टी तुमचीच आहे किंवा नाही हे सांगणे त्याला अगदीच सोपे नाही का ? तुमची पट्टी ओळखण्यासाठी आणखी खाणाखुणांची खरे तर त्याला काहीही आवश्यकता नाही. अगदी एकसारखी संपूर्ण नावे असलेली अनेक माणसे असू शकतात हे जरी खरे असले तरी जन्मतारीख-वेळ-ठिकाण एकच असलेली व नावेही सारखीच असलेली माणसे सापडणे अशक्यप्राय आहे. शिवाय, अंगठयाच्या ठशाचे शास्त्रीय वर्णन पट्टीत लिहिलेले असते असेही नाडीवाले लोक सांगतात, म्हणजे तीही आणखी एक व्यवच्छेदक खूण त्याला उपलब्ध असते. सांगायचा मुद्दा हा की एवंगुणविशिष्ट अशा त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती अस्तित्वात असणे अशक्य आहे, म्हणून तिची पट्टीही एकमेवाद्वितीय असणार. पण, गंमत अशी की, इतक्या सगळया खाणाखुणा हाताशी असूनही तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करीत असलेला नाडी-ज्योतिषी पट्टी शोधण्याच्या मिषाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो व त्यातून तुमच्या तोंडूनच तुमच्याबद्दलची पुष्कळशी माहिती काढून घेतो. किंबहुना तोच त्याचा खरा उद्देश असतो. पुरेशी माहिती हातात आली की तुमची पट्टी सापडली असे तो म्हणतो, नाहीतर पट्टी सापडत नाही असे म्हणतो. वास्तविक, त्याच्या दृष्टीने कुठलीही पट्टी तुमची पट्टी ठरू शकते. म्हणून तर अगदी मोजक्या पट्ट्यांच्या भांडवलावर हा धंदा वर्षानुवर्षे चालू शकतो. या धंद्यातली खरी मख्खी हीच आहे.
नावे शोधण्याची युक्ती.
तुमच्या आईचे नाव काय? असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे, त्याचे आद्याक्षर य र ल व यापैकी आहे का, ते नाव देवीचे आहे का, असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो. भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत! जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते ? सरळ नावे वाचली नसती का ? तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो. हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे. ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो ! पट्टीत नावे असणे अशक्य का आहे ते पुढील चर्चेवरून कळेल :-
व्यक्ती-गणिक तयार भाकित-पट्ट्या -- एक थोतांड.
व्यक्तीचे पूर्ण नाव व तिच्या जन्मकुंडलीची माहिती जिच्यावर लिहिलेली आहे अशी एखादी नाडीपट्टी जर खरोखरीच अस्तित्वात असेल तर ती पट्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच निरुपयोगी होईल कारण तिचा पुन: उपयोग कुणालाही होणार नसतो. आमच्या विवेचनातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे, का ते सांगतो. नाडीज्योतिषाचा उगम किमान ५००० वर्षांपूर्वी झाला असे नाडीवाले लोक सांगतात म्हणून गेल्या पाच हजार वर्षात निकामी झालेल्या पट्ट्यांची संख्या किती होते याचा जरा अंदाज करून पाहू. सन १९०१ या वर्षात अगस्त्य नाडीच्या सर्व ठिकाणच्या शाखात मिळून दररोज सुमारे ५० लोक आपापल्या पट्ट्यांचे वाचन करून घेऊन गेले असे समजू. म्हणजे त्या एका वर्षात सुमारे १८००० लोक त्यांच्या पट्ट्या पाहून गेले. आज त्यांच्यापैकी कुणीही माणूस हयात नसेल. म्हणजे इतक्या पट्ट्या आता निकामी झाल्या आहेत. हाच हिशोब सन १९०० च्या आधीच्या प्रत्येक वर्षाला लावला तर ५००० वर्षांच्या काळात पाच हजार गुणिले १८००० म्हणजे ९ कोटी पट्टया आजवर निकामी झाल्या आहेत. आणि शिवाय, आजपासून पुढे जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत त्यांचा हिशोब वेगळाच केला पाहिजे! म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी ९ कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे. आता यापुढची गंमत पहा. प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी-पट्ट्या असतात व एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेवलेले असते, याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी-पट्ट्या असतात, अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती-पत्रकावरून दिसते. ते खरे असेल तर, ९ कोटी गुणिले १६ म्हणजे १ अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या, आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात! म्हणजे, त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती ? दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम! स्वत: महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते व त्यांचे पन्नास-एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे. धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण, ज्यांनी वेदाध्ययन व यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली! याचा इत्यर्थ इतकाच की व्यक्तीचा नामनिर्देश व जन्मकुंडलीचा निर्देश केलेल्या भाकित-पट्ट्या हे एक थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवणारे एकतर भोळसट आहेत किंवा चलाख आहेत.
विंग कमांडर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. ( आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात, ओकांना असल्या शंका येतच नाहीत. येणार कशा ? अंधश्रद्धा एकदा मानगुटीस बसली की शहाणासुर्ता माणूससुद्धा कसा मॅड होतो त्याचे हे उदाहरण पहा: बोध अंधश्रद्धेचा पृष्ठ १२१ वर ते म्हणतात "या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदर्शन होत राहील यात शंका नाही. "
( म्हणजे मग मजकुराबरोबर नावेही बदलत असली पाहिजेत? ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो: पट्ट्या मोजक्याच असतात, त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या जातात, तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही. हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे! आता आणखी काय पाहिजे ?
नाडी-पट्टीत जन्मकुंडलीचा निर्देश असणे अशक्य.
जन्मकुंडलीचा निर्देश का अशक्य आहे ते आम्ही आकडेवारीच्या मदतीने वर दाखवले. आमच्या या म्हणण्याची शहानिशा अप्रत्यक्ष मार्गानेही करता येते. तो मार्ग असा : तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण या बाबी नाडी-ज्योतिष्याला तुमच्या तोंडून काढून घेता येत नाहीत. जर तुम्ही म्हणालात की बाकी सगळी माहिती मी देतो पण जन्मवेळ सांगत नाही, तर तो उघडपणे म्हणू शकत नाही की जन्मवेळ दिली नाहीत तर तुमची पट्टी सापडणार नाही. कारण, त्याचा दावा असा असतो की अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने किंवा कुंडलीच्या मदतीने तो तुमची नाडीपट्टी शोधणार आहे. जन्मवेळ नाही म्हटल्यावर नाडीवाल्याची गाडी अडते, कारण जन्मवेळेशिवाय त्याला तुमची कुंडली बनवता येत नाही, आणि कुंडलीशिवाय भाकिते सांगता येत नाहीत. म्हणून अशा वेळी तो थोडेफार प्रश्न विचारल्याचे नाटक करून सन्माननीय माघार घेतो - म्हणजेच पट्टी सापडत नाही असे सांगतो. इथे काय घडते ते पहा. तुमच्या अंगठ्याचा ठसा तुम्ही दिलेला असतोच, आणि शिवाय तुमचे नाव, वडलांचे नाव व जन्मतारीख हेही सांगितलेले असते, फक्त जन्मवेळ लपवलेली असते. तुम्हाला अनेक प्रश्न विचारून तुमच्याकडून तुमचे वैयक्तिक तपशील त्याने मिळवलेले असतात. तेवढ्या माहितीवरून त्याला खरे तर पट्टी सापडायला हवी. पण ती सापडत नाही असे तो म्हणतो त्याचे खरे कारण हेच की जन्मवेळ माहीत नसल्यामुळे त्याला कुंडली बनवता येत नाही व भाकीत वर्तवता येत नाही. पट्टी सापडत नाही असे सांगण्यात त्याचा दुसराही एक हेतु असतो तो असा की तुमच्या पट्टीतला कुंडलीचा तपशील सांगण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही, व त्यामुळे पट्टीत कुंडलीचा काहीही तपशील नसतो हे त्याचे बिंग फुटणार नाही. परंतु ही युक्ती जर तो अशा प्रत्येक प्रसंगी वापरील तर अप्रत्यक्षपणे हेच सिद्ध होईल की पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो. आम्ही अनेकदा हा प्रयोग केला आहे व अनुभव घेतला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनीही हा प्रयोग करून पहावा. वस्तुस्थिती अशी आहे की, नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो. ज्यांना नावाबाबत प्रयोग करायचा असेल त्यांनी जन्मवेळ सुद्धा सांगावी. तुमच्याा आईचे नांव पट्टीत लिहिलेले आहे असा दावा नाडी ज्योतिषी करतो. म्हणून जेव्हा तो तुमच्या आईचे नांव किती अक्षरी आहे, वगैरे प्रश्न विचारु लागेल तेव्हा त्याला सांगावे की, मी या प्रश्नांची उत्तरे देणार नाही. ते नांव पट्टीत असेल तर त्याने ते वाचून दाखवावे.
पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो असे आम्ही म्हणण्याचे दुसरे कारण असे आहे की, नाडीपट्टीतली भाकिते महर्षींनी अंतर्ज्ञानाने लिहिली असे जर नाडीवाले म्हणतात तर भाकिते वर्तवण्यासाठी जन्मकुंडल्यांची महर्षींना काहीच गरज नव्हती हे ओघानेच आले. म्हणजे, नाडीपट्टीत कुंडल्यांची माहिती असण्याचे काहीच सबळ कारण दिसत नाही.
तिसरे कारण असे की, नाडीवाल्यांची भाकिते कुंडलीतल्या १२ स्थानानुसार वर्तवलेली असतात असे त्यांच्या माहिती-पत्रकातच म्हटलेले आहे. अशा पद्धतीचे फलज्योतिष महर्षींच्या काळात म्हणजे ५००० वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हते, मेषादि १२ राशीही तेव्हा प्रचारात नव्हत्या हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या कुंडलीचा तपशील पट्टीत असणे शक्य नाही. या तीन कारणांमुळे पट्टीत कुंडलीचा तपशील असतो हा नाडी-ज्योतिष्यांचा दावा खोटा ठरतो.
इथे एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे: तुम्ही जन्मतारीख बिनचूक सांगून जन्मवेळ अंदाजे सांगितलीत तरी ढोबळ मानाची कुंडली नाडी-ज्योतिषी बनवील व तिच्यावर वेळ भागवून नेईल. जन्मठिकाण ही बाब ढोबळ कुंडलीत कमी महत्वाची असते.
मग लोक खोटे बोलतात काय?
नाडीकेन्द्रात आपल्याला काय काय अनुभव आले याचे रसभरीत वर्णन करताना लोक नकळत खोटे बोलतात व अतिशयोक्ती करतात असे अनुभव आम्हाला आले आहेत. ''आम्ही नुसता अंगठा दिला, बाकी काही माहिती दिली नाही. तरी सुद्धा ही माहिती पट्टीत आली!`` असे कौतुकाने सांगतात. परंतु नाडीवाल्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना या बाबतची पुष्कळशी माहिती त्यांनी दिलेली असते हे त्यांना आठवतही नाही. परंतु त्यांच्या सोबत गेलेल्या माणसांना आम्ही खोदून प्रश्न विचारले असता आम्हाला असे आढळून आले की तशी माहिती नाडीवाल्याने आडवळणाने प्रश्न विचारून त्यांच्याकडून काढून घेतलेली होती.
धूळफेक करणारा प्रचार.
नाडीज्योतिष हा एक चमत्कार आहे असा प्रचार काही लोक करीत असतात. लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा हे नगदी पीक आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. ते पीक जोपासणे व वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. अशा प्रचारावर सूज्ञ वाचकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.
सारांश :- नाडी-पट्टीत व्यक्तींची नावे व जन्मकुंडलीचा तपशील असणे शक्य नाही हे आम्ही दाखवले. नाडी-ज्योतिषी स्वत:च भाकिते वर्तवतात व ती महर्षींच्या नावावर खपवतात हेही आम्ही दाखवले. अर्थात्, या सर्व गोष्टी अप्रत्यक्ष रितीने परिस्थितीजन्य पुराव्यावरून व तर्काचा उपयोग करून सिद्ध होतात. नाडीज्योतिषाला कूट लिपीची तटबंदी आणि 'नाडी पट्टी सापडत नाही` ही पळवाट उपलब्ध असल्यामुळे त्याच्याविरुद्ध थेट पुरावे देणे शक्य होत नाही. नाडी-ज्योतिषाची भाकिते किती खरी ठरतात व किती खोटी ठरतात, हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे.