ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण १- फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण

फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण

फलज्योतिषातला वैज्ञानिक मुलामा असलेला भाग लोकांच्यासमोर आला की मती कुंठीत होते. म्हणूनच हा विषय समजून घेण्यास सुलभ व्हावे यासाठी आपण चार टप्प्यात त्याची चिकित्सा करू.
टप्पा पहिला:-
फलज्योतिषाची मूळ संकल्पना काय आहे:- ग्रह व तारे यांच्या अंगी काहीतरी गूढ असे गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मांचे प्रभाव पृथ्वीवर येतात, जन्माला येत असलेल्या बालकावर पडतात, आणि त्यामुळे बालकाच्या एकूण आयुष्याची रूपरेखा ठरते, अशी या शास्त्राची संकल्पना आहे. म्हणजे भावी आयुष्यातील घटना या एखाद्या चित्रपटाच्या रीळाप्रमाणे अगोदरच चित्रित झालेल्या असतात. ही संकल्पनाच ज्यांना मान्य नसेल त्यांनी पुढचे विवेचन वाचायची जरूर नाही, कारण त्यांच्या दृष्टीने हे शास्त्र भ्रामक आहे असे इथेच ठरते. पण आपण ही संकल्पना वादापुरती का होईना मान्य करून पुढे जायचे आहे.
टप्पा दुसरा:-
आता पुढचा प्रश्न असा की ग्रहांचे गूढ प्रभाव पृथ्वीपर्यंतचा प्रवास कोणत्या स्वरूपात करतात ? प्रकाशकिरणांच्या ( म्हणजेच उर्जा-लहरींच्या ) स्वरूपात, की गुरुत्वाकर्षणाच्या स्वरूपात, की चुंबकीय आकर्षणाच्या स्वरूपात ? वाचकांचा काय तर्क चालतो? इथे एक गोष्ट वाचकांनी ध्यानात ठेवावी ती ही की, या शास्त्रात राहू व केतू या काल्पनिक बिंदूंना ग्रह मानलेले आहे व त्यांना इतर ग्रहाएवढेच महत्व दिलेले आहे. त्यांच्या अंगीसुद्धा गूढ गुणधर्म आहेत असे हे शास्त्र मानते. पण त्यांच्या बाबतीत अडचण अशी आहे की काल्पनिक बिंदूमध्ये उर्जालहरी, गुरुत्वाकर्षण, किंवा चुंबकीय आकर्षण यापैकी कोणतेही तत्व असणे अशक्य आहे, आणि या तीन तत्वाव्यतिरिक्त चौथे तत्व ( जे दूर अंतरावर प्रभाव टाकू शकेल असे ) भौतिक शास्त्राला ठाउक नाही. मग राहू-केतूंचे प्रभाव पृथ्वीवर कोणत्या स्वरूपात येतात? त्यांच्यासाठी कोणते तत्व लागू करायचे? या राहू-केतूंना वगळून तर बिलकुल चालणार नाही. मग काय करायचे? राहू-केतूसह सर्व नवग्रहांसाठी एकच असे काही तरी समान तत्व लागू असले पाहिजे, हे तर कोणीही मान्य करील. इथे भौतिक विज्ञानातले कुठलेही तत्व कामी येणार नाही ही महत्वाची गोष्ट वाचकांनी ध्यानात घ्यावी. म्हणून शेवटी अपरिहार्यपणे असे गृहीत धरावे लागते की विज्ञानाला ठाउक नसलेल्या अशा काही गूढ प्रकारच्या तरंग-लहरींच्या द्वारे ग्रहांचे प्रभाव पृथ्वीवर येतात! राहू-केतूंनाही हे तत्व लागू करण्यात काही प्रत्यवाय येत नाही! ज्यांना या गृहीतकृत्यावर विश्वास ठेवायचा नसेल त्यांनी इथेच थांबावे, पुढचे विवेचन त्यांच्यासाठी नाही! ज्यांची या गृहीतावर विश्वास ठेवायची तयारी असेल त्यांनी एक खूणगाठ मनाशी बांधावी की, इथे फलज्योतिषाने भौतिक विज्ञानाशी फारकत घेतली आहे. तरीपण आपण असा विचार करू की भौतिक विज्ञानाच्या कक्षेत न येणारी अशी काही रहस्ये या दुनियेत असू शकतील! म्हणून 'जे विज्ञानास मान्य नाही ते सगळे खोटे,` अशी अतिरेकी भूमिका न घेता वादापुरते का होईना, 'ग्रहांच्यापासून गूढ अशा ज्योतिषीय प्रभाव-लहरी इतर उर्जालहरींच्या प्रमाणेच सरळ रेषेत पृथ्वीकडे येत असतात`, असे गृहीत धरून आपण पुढे जायचे आहे. जाता जाता इथे एका गोष्टीचा उल्लेख करतो. अंतरिक्षातून येणारे कॉस्मिक किरण, विद्युच्चुंबकीय लहरी, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण, इत्यादि वैज्ञानिक शब्दांचा वापर लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ज्योतिष-समर्थकांनी केला आहे. फलज्योतिषाशी त्यांचा काहीही संबंध नाही. पुढच्या टप्प्यात ही गोष्ट आणखी स्पष्ट होईल.
टप्पा तिसरा:-
फलज्योतिषाचे यापुढील गृहीतकृत्य मान्य करणे मात्र फार अवघड आहे. हे शास्त्र असे गृहीत धरते की, मुलाच्या जन्मवेळी ग्रह आकाशात कुठेही असोत, त्या सर्वांच्या प्रभावलहरी एकाच क्षणी मुलावर पडतात व आपापले परिणाम त्याच्यावर करतात. जे ग्रह त्यावेळी डोक्यावरच्या आकाशात म्हणजे उदित गोलार्धात असतील त्यांच्या प्रभावलहरी मुलावर पडतात हे सहज समजण्यासारखे आहे, पण जे ग्रह त्यावेळी मावळून जाउन पृथ्वीच्या आड गेलेले असतात म्हणजे अनुदित गोलार्धात असतात त्यांच्या प्रभावलहरी त्या मुलापर्यंत कोणत्या मार्गाने जाउन पाहोचतात ? त्यांना पृथ्वीच्या पोटातून आरपार जाउनच मुलापर्यंत पोहोचणे त्यांना भाग आहे, दुसरा मार्ग नाही, ही गोष्ट ध्यानात घ्यावी. पृथ्वीचा गर्भ प्रचंड आकाराचा आणि धगधगत्या लाव्हा रसाने भरलेला असतो, त्यातून हजारो मैलांचा प्रवास निर्वेधपणे करू शकणाऱ्या गूढ लहरी खरोखरीच अस्तित्वात असतील का? ( भौतिक शास्त्राला अशा कोणत्याही लहरी माहीत नाहीत.) या प्रभावलहरींचे स्वरूप गूढ आहे, त्यांना भौतिक शास्त्राचे नियम लागू नाहीत, असे एकदा मान्य केल्यावर मग त्या प्रभावलहरी पृथ्वीच्या पोटातून आरपार कशा जातात हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! अर्थात् ज्यांना ही भन्नाट कल्पना पटणार नाही त्यांनी इथेच थांबावे हे बरे, कारण फलज्योतिषाचा भ्रामकपणा शोधायला त्यांना आणखी पुढे यायची जरुरी नाही.
टप्पा चौथा:-
वरील गृहीतकृत्याची अपरिहार्य परिणती काय होते ते सांगतो: पृथ्वीच्या पोटातून आरपार जाउ शकणाऱ्या या प्रभावलहरी पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर एकाच वेळी कुठेही पोहोचू शकतात, असे हे शास्त्र मानते. याचाच अर्थ असा होतो की प्रत्येक ग्रह एकाच वेळी पृथ्वीच्या पाठीवरील सर्व ठिकाणी, कुठेही, आपला प्रभाव टाकू शकतो. वाचकांनी ही वस्तुस्थिति खास करून ध्यानात घ्यावी. 'एकाच वेळी जगात निरनिराळया ठिकाणी जेवढी म्हणून मुले जन्माला येतात तेवढया सर्व मुलांच्या कुंडल्यात कोणत्यातरी एका स्थानात-म्हणजे घरात- तो ग्रह हजर असतो, आणि त्याच्या प्रभावाचे परिणाम प्रत्येक मुलावर होतात,` हा या वस्तुस्थितीचा अर्थ आहे. हे परिणाम अर्थातच प्रत्येक ठिकाणी निराळे असतात अशी या शास्त्रावी धारणा आहे, आणि ही धारणाच या शास्त्राचे 'वर्मस्थान` आहे. त्याच्यावर आजपर्यंत कोणी घाव घातलेला नाही. हे शास्त्र खोटे आहे असे का म्हणावे लागते ते या वर्माचे विश्लेषण केले म्हणजे कळते, म्हणून त्याचे विश्लेषण आपण पुढे केले आहे.
आधीच्या तीन टप्प्यात जी गृहीते आपण वादापुरती का होईना पण मान्य केली पण आता इथे जे गृहीतकृत्य ज्योतिष-प्रवक्त्यांना अभिप्रेत आहे ते वेगळ्या प्रकारचे आहे: 'अचेतन जडवस्तूंनी बनलेल्या ग्रहांच्या अंगी इच्छाशक्ति आणि दैवी कार्यशक्ति असते (कारकत्व), तिच्यामुळे ते वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळे परिणाम करू शकतात ( फलित) ` असे ते गृहीतकृत्य आहे. ज्यांची श्रद्धा आंधळी आहे त्यांना ते मान्य होईल पण ज्यांची श्रद्धा 'डोळस` आहे त्यांनाही ते मान्य होणार नाही, आणि बुद्धीवादी लोकांना तर ते गृहीतकृत्य हास्यास्पदच वाटेल.
वरील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही ज्योतिष-प्रवक्ते पृथ्वीच्या गोल आकाराचा आधार घेउ पहातात. फलज्योतिषाला भौतिक विज्ञानाचा आधार आहे असे सांगण्याची त्यांना फार हौस असते. पण पृथ्वीचा गोल आकार हा एक भौतिक घटक आहे, तो काही गूढ किंवा दैवी घटक नव्हे, त्याचे परिणाम भौतिक नियमांना अनुसरूनच होणार, तिथे गूढ परिणामांना थारा नाही ह्या गोष्टीकडे ते डोळेझाक करतात. ते कसा युक्तिवाद करतात ते पहा. ते म्हणतात, ''पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे सूर्याचे किरण जसे कुठे सौम्य तर कुठे तीव्र असतात, सर्व ठिकाणी ते सारखे नसतात, तसेच या गोल आकारामुळे त्याचे फलज्योतिषीय प्रभावही सर्व ठिकाणी सारखे पडत नाहीत, वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांचे पडतात.`` हा युक्तिवाद कसा फसवा आहे ते पहा:- पृथ्वीच्या गोल आकाराच्या अडथळ्यामुळे सूर्याच्या प्रकाशलहरी तिच्या अर्ध्या भागावर पोहोचूच शकत नाहीत हे आपल्याला माहीत आहे, पण त्याच्या ज्योतिषीय प्रभावलहरी मात्र या गोल आकाराच्या अडथळ्याला न जुमानता एकाच वेळी पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पोहोचू शकतात असे हे ज्योतिष-प्रवक्ते मानतात. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्योतिषीय प्रभावलहरींवर पृथ्वीच्या गोल आकाराचा भौतिक परिणाम काहीही होत नाही. अर्थातच ज्योतिष-प्रवक्त्यांचा वरील युक्तिवाद खोटा ठरतो.
सांगायचा मुद्दा असा आहे की, ग्रह-प्रभावांचे फलज्योतिषीय परिणाम प्रत्येक ठिकाणावर वेगळे होण्याला निसर्गातले कोणतेही कारण जबाबदार असल्याचे दिसत नाही. ग्रहांच्या गूढ गुणधर्मांचाही इथे काही संबंध दिसत नाही कारण ग्रहांच्या प्रभावलहरी एकदा पृथ्वीकडे जायला निघाल्यानंतर त्यांच्या परिणामात फेरफार करणे हे ग्रहांना अशक्य आहे. साधी तर्कबुद्धी वापरणारा कोणीही मनुष्य असेच म्हणेल की ''ग्रहांचे परिणाम स्थानानुसार वेगवेगळे होतात``, ही समजूतच मुळी खोटी असली पाहिजे. ग्रहांच्या प्रभावांचे परिणाम एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणावर निरनिराळे कसे होतात या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर असे आहे की असे काहीही घडत नसते, आणि घडणे शक्यही नसते! हे केवळ एक भ्रामक कल्पनारंजन आहे..या खोट्या समजुतीवर पुढचे सगळे शास्त्र आधारलेले असल्यामुळे ते शास्त्र खरे असणे अशक्य आहे म्हणजेच ते खोटे आहे.
अर्थात् ज्योतिषांच्या चरितार्थासाठी आणि लोकांच्या भविष्य जाणण्याच्या उत्कंठेपायी हे शास्त्र (?) असेच चालू राहील, पण जे वाचक आपली कॉमनसेन्स वापरू शकतात त्यांना हे शास्त्र खोटे का आहे याची कल्पना हे चार टप्पे वाचल्यावर यावी.

Comments

चालू द्या

वाचत आहेच.

अतिशय मुद्देसुद..

अतिशय मुद्देसुद.. प्रकरण १ले आवडले
-ऋषिकेश

आवडले

मुद्दे अतिशय व्यवस्थित मांडले आहेत, परामर्श घेण्याची पद्धत आवडली.

प्रभावी विवेचन

प्रकाशराव,
या अतिशय प्रभावी विवेचनाबद्दल आपले अभिनंदन! या प्रभावी युक्तिवादांवर ज्योतिषांकडे उत्तरे असण्याची तीळमात्र शक्यता नाही. फलज्योतिष हे एक थोतांड आहे हे जणू साधार सिद्ध केले आहे. या आणि अश्या युक्तिवादांच्या बळावर न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सर्वसामान्यांची उघडउघड फसवणूक थांबवता येणे शक्य आहे काय?
आपला
(डोळस) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

जनहित याचिका

अश्या युक्तिवादांच्या बळावर न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सर्वसामान्यांची उघडउघड फसवणूक थांबवता येणे शक्य आहे काय?

भाग २ प्रकरण ४ युजीसी आणी फलज्योतिष मध्ये काही माहिती आहे . लेखमाला पुस्तकातील प्रकरणा
http://mr.upakram.org/node/276#comment-3384 नुसार चालू असल्याने थोडी वाट पहावी लागेल.
प्रकाश घाटपांडे

जनहित याचिका - माझे मत

या आणि अश्या युक्तिवादांच्या बळावर न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सर्वसामान्यांची उघडउघड फसवणूक थांबवता येणे शक्य आहे काय?

कदाचित होय. परंतु, लोकशिक्षण (जे घाटपांडे करीतच आहेत) जास्त महत्वाचे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हो, पण

सुनीलराव,

तुम्ही म्हणता तसे लोकशिक्षण महत्त्वाचे आहे हे खरेच पण कायद्याने ज्योतिषाचा 'धंदा' उघडपणे करण्यावर बंदी आली तर जनमानसावर प्रचंड प्रभाव पडेल असे वाटते. निदान या याचिकेच्या निमित्ताने सर्व माध्यमातून यावर साधकबाधक चर्चा तरी होईल.

आपला
(सूचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

 
^ वर