पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा-प्रो.जयंत नारळीकर्

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...

सप्टेंबर-ऑक्‍टोबर १९७५ मधली गोष्ट. "द ह्यूमनिस्ट' नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ........
"मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही... आजकालच्या अनिश्‍चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्‍यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भविष्ये आपल्या हातात आहेत, तारकांच्या नाही.'

पत्रकावर सही करणारे विविध विषयांतले शास्त्रज्ञ होते. त्यांत नोबेल पारितोषिकविजेतेही होते. ही मंडळी सहसा एका व्यासपीठावर दिसत नाही; पण वरील पत्रकासाठी एकत्र येणे त्यांना आवश्‍यक वाटले, ही गोष्ट महत्त्वाची.

आपण जर एखादे पाश्‍चात्त्य वृत्तपत्र पाहिले, तर त्यात तारका-भविष्याला वाहिलेला कॉलम असतो; परंतु युरोप आणि अमेरिकेत दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर मी असे म्हणू शकतो, की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्‍वास ठेवणारे थोडे-थोडकेच असतील. कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.

मला या नादाचा फायदा कसा झाला, ते सांगतो! काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की "वेटिंग लिस्ट' असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. ""इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी?'' माझ्या पत्नीने विचारले. ""त्या "बुक' झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.'' दुकानदार म्हणाला. ""मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता!'' माझी कन्या म्हणाली. ""आमची तयारी आहे,'' दुकानदार म्हणाला. ""पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे?'' दुकानदाराने मुलीऐवजी आईला विचारले. तिने अनुमोदन दिले आणि स्कूटीचे पैसे भरून ती विकत आणली. अर्थात या "धाडसी' कारवाईमुळे आम्हाला आकाशातल्या कोणाचा कोप सहन करावा लागला नाही.

"फलज्योतिष हे विज्ञान आहे का?' हा प्रश्‍न मला पुष्कळदा विचारला जातो. त्यापाठोपाठ अशी टीकाही ऐकायला मिळते, की फलज्योतिषाचा अभ्यास व तपासणी न करता शास्त्रज्ञ त्याला "अवैज्ञानिक' ठरवून मोकळे होतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. विज्ञानाचा किताब मिळवायला त्या विषयाला काही पथ्ये पाळावी लागतात. त्या विषयाची मूळ गृहीतके स्पष्ट मांडावी लागतात. त्यांच्यावर आधारलेला डोलारा कसा उभा केला जातो, ती कार्यपद्धती निःसंदिग्धपणे मांडायला हवी व शेवटी प्रत्यक्ष निरीक्षणातून खरे, खोटे तपासता येईल, असे भाकीत करावे लागते. भाकीत खरे ठरले का खोटे, हे तपासण्याचे संख्याशास्त्राचे नियम आहेत. उदाहरणार्थ, नाणेफेकीत "हेड' वर, का "टेल' वर, हे बरोबर भाकीत करता येते, हा दावा तपासून पाहायला एका नाणेफेकीने ठरवणे योग्य होणार नाही... शंभर वेळा नाणे फेकून आलेल्या निष्कर्षांना संख्याशास्त्राचे निकष लावून ठरवावे. कुंडल्या जुळवून केलेले विवाह कुंडल्या न जुळणाऱ्या असताना केलेल्या विवाहांपेक्षा अधिक यशस्वी, सुखी असतात का, हे तपासायला शेकडो जोडप्यांचे सॅम्पल तपासायला पाहिजे. अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले.

फलज्योतिषाची कार्यपद्धती, मूळ गृहीतके आणि भाकिते यांबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. एकदा मी काही प्रख्यात फलज्योतिषांनी तत्कालीन राजकारण्यांबद्दल केलेल्या चुकीच्या भाकितांचा गोषवारा एका चर्चेत मांडला असता, येथील फलज्योतिषी म्हणाले, की भाकीत चुकले, कारण ते चांगले फलज्योतिषी नसावेत. अशा वेळी मला भारतीय क्रिकेट टीमच्या पराजयानंतर टीकाकारांच्या सल्ल्यांची आठवण होते. त्यांच्या मते, ज्यांना खेळवले गेले नाही, त्यांना घेतले असते तर निकाल वेगळा झाला असता.

पुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले, असा इतिहास आहे. सूर्यसिद्धान्तातला एक श्‍लोक त्या बाबतीत बोलका आहे. त्यात सूर्यदेव मयासुराला सांगतो ः "तुला या विषयाची (फलज्योतिष) सविस्तर माहिती हवी असेल तर रोमला (म्हणजे ग्रीक-रोमन प्रदेशात) जा. तेथे मी यवनाच्या रूपात ही माहिती देईन.' "यवन' शब्दाचा वापर परदेशी, बहुधा ग्रीक, अशा अर्थी होतो. म्हणजे आपली ही अंधश्रद्धा मूळ भारतीय नसून "इंपोर्टेड' आहे!

खुद्द ग्रीकांमध्ये ही अंधश्रद्धा कशी आली? आकाशातल्या तारकांचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर त्यांना आढळून आले, की आकाशातल्या तारामंडळाच्या पार्श्‍वभूमीवर काही तारका अनियमितपणे मागे-पुढे जात आहेत. त्यांच्या या स्वैरगतीमुळे ग्रीकांनी त्या तारकांना "प्लॅनेट' म्हणजे "भटके' हे नाव दिले. त्यांच्यापैकी वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी या स्वैरगतीमागे काहीतरी नियम असेल, तो शोधायचा प्रयत्न केला; पण बहुसंख्य लोकांनी या स्वैर फिरण्याचा अर्थ "या भटक्‍यांमध्ये काही तरी खास शक्ती आहे ज्यामुळे ते मनमाने फिरतात,' असा लावला. त्यातून पुढे जाऊन असाही समज करून घेतला, की हे ग्रह आपल्या शक्तीचा वापर मानवाचे भवितव्य ठरवण्यात करतात.

पण कालांतराने ग्रह असे का फिरतात, याचे उत्तर विज्ञानाने दिले. ऍरिस्टार्कस, आर्यभट, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन अशा मालिकेतून अखेर गुरुत्वाकर्षण हे मूलभूत बळ ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते, हे सिद्ध झाले. म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोडला. आज अंतराळ युगाला प्रारंभ होऊन अर्धशतक उलटले. मानवाने चंद्रावर पदार्पण केले. मंगळावर याने उतरवली. इतर ग्रहांजवळ अंतराळयाने पाठवून त्यांचे जवळून दर्शन घेतले. दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते. यावरून मानवाची कर्तबगारी तर दिसतेच; पण त्याचबरोबर ग्रहांच्या गतीमागे कसलेही रहस्य राहिले नाही, याचीदेखील कल्पना येते. ही कर्तबगारी दाखवणारा मानव पराधीन खचित नाही.

ही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे.

- जयंत नारळीकर
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

लेखनविषय: दुवे:

Comments

इंपोर्टेड अंधश्रद्धा

हे नामकरण आवडले.

कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.

भारत एकमेव की काय माहित नाही पण अगदी वरच्या क्रमांकात नक्कीच असावा.

परंतु सूर्य सिद्धांतात खरेच असे लिहीले आहे का याबाबत अधिक शहानिशा करून घ्यायला आवडेल कारण यवन हा शब्द आशिया मायनरमधील आयोनिया या प्रांतावरून आलेला आहे. येथे अर्थातच तत्कालिन ग्रीक राज्य होते परंतु रोमचा त्याच्याशी काही संबंध नाही आणि भूगोल बघायला गेले तर रोम तसे दूरही आहे.

बाकी, लेख वाचून सचिन तेंडूलकरने सर्पदोष दूर करण्यासाठी केलेल्या नागबळी विधीची आठवण झाली. विश्वचषकात त्याचा फायदा झाला नाही कारण त्याने तो संपूर्ण ७ दिवस करणे भाग होते तसे केले नाही म्हणून फायदा झाला नाही म्हणे. (अशी काहीनाकाही उत्तरे अगदी तयार असतातच म्हणा.)

सचिनच्या नागबळी विधीचा वृत्तांत आणि प्रकाशचित्रे येथे मिळतील.
http://karthikr.wordpress.com/2006/06/04/sachin-at-kukke-subramanya/

उत्तम लेख!

नारळीकर साहेबांचा सदर लेख आजच्याच वर्तमानपत्रातून माझ्याही वाचनात आला. लेख अतिशय उत्तम आहे. नारळीकर साहेबांना आपला सलाम!

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

छान लेख

फारच छान लेख. विद्वत्तेसोबतच नारळीकरांची लिखाणाची शैली पण वखाणण्याजोगी आहे.. सर्वसामान्यांना सहज कळेल अश्या भाषेत स्पष्ट विचार मांडले आहेत. आमच्या पर्यंत हे विचार पोहोचवल्या बद्दल घाटपांडे साहेबांचे आभार... आपणा दिलेल्या दुव्यावरील नारळीकरांनी लिहिलेले आपल्या पुस्तकाचे परिक्षण सुद्धा फार आवडले.. पुढच्या भारत भेटित आपले पुस्तक देखिल वाचेन.
-वरूण
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी संकेथळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

पितृपक्ष

पितृपक्षात सोन्याचे भाव कमी असतात म्हणून पितृपक्षात लग्नाचे सोने खरेदी करणार्‍यांचा 'ट्रेंड' सुरु होत आहे. त्यात मनाची समजूत म्हणून खरेदी व पैसे भाव कमी असताना दिले जातात व दागिने पितृपक्ष संपल्यावर 'कलेक्ट' केले जातात.
एक 'मानसिक आधार' म्हणून या गोष्टींकडे बर्‍याचदा पाहिले जाते असे वाटते. (हा प्रतिसाद लिहित असताना माझ्या बोटात गुरुची अंगठी आहे आणि मीही माझी गाडी अक्षय्य तृतीयेलाच घेतली आहे. 'का आहे' हे पटवता आले नाही तरी माझा मुहूर्तांवर आणि ग्रहांवर विश्वास असावा असा अंदाज आहे.)
(गोंधळलेली)अनु

मी शुद्धीचिकित्सा वापरते.

छान

छान लेख. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. भारतात किती गोष्टी मूहूर्त ठरवून होतात हे लक्षात घेतले तर थक्क व्हायला होते.

सुंदर लेख

लेख सुंदर आहे. ग्रहांविषयी आणि त्यांच्या परिणामाविषयी अश्या मान्यता का बनल्या आसाव्यात याचे सुंदर स्पष्टीकरण वाचायला मिळाले.

पुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले,

खरे आहे. पण ग्रहांची शांती, पूजा, जप वगैरेना या इंपोर्टेड अंधश्रद्धेचे भारतीयीकरण म्हणता येईल.

छान लेख

लेख आवडला. इथे दिल्याबद्दल आभार.
ग्रहांच्या अंधश्रद्धा आपण इम्पोर्ट करून, संस्कार करून एक्स्पोर्टही करतो आहोत.

छान

हा लेख येथे दिल्याबद्दल आभार. लेख आवडला. इम्पोर्टेड श्रद्धेबद्दल वाचून गंमत वाटली. फलज्योतिषामध्ये का? ह्या प्रश्नाचे उत्तर कुणालाच माहिती नसते. एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये प्रवेश करता झाला की त्याचा पृथ्वीवरच्या एकाद्या राशीच्या एखाद्या माणसावर परिणाम करत असेल तर तो का होतो ह्याचे पटण्यासारखे कारण फलज्योतिष कधीच देऊ शकत नाही. त्यामुळे फलज्योतिषाचे निष्कर्ष हे केवळ कोरिलेशनने काढल्यासारखे वाटतात.

नाही हो!

बाप रे!

इतका मोठा माणूस. त्यांचे हे विचार, बरोबरच असले पाहिजेत हो.
शिवाय त्यांचे डोळे दिपवणारे संशोधन, त्या डिग्र्या, पदव्या नि पदकं!

तरी पण या लेखातला एक छोटासा भाग 'जरासा अंधश्रद्ध' आहे असे मला वाटले.

"दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते."

दर वेळी खरे नाही हो!
(चॅलेंजर दुर्घटना, सुनिता चावला चा मृत्यू, २००३ मध्ये मंगळावर बिगल यान नष्ट अशी अनेक उदाहरणे आहेत.)

मला असे वाटते, याचा अर्थ लेखक स्वतःच्या मता विषयी इतका ठाम झाला आहे की, त्याला वास्तवाचेही भान सुटले आहे की काय अशी शंका यावी!

"ग्रहच माझे जे काय करायचे ते करतील" असे मानणे

आणी

" ग्रह चिखल मातीचे गोळे ते काय करणार " असे मानणे

या दोन्हीही अंधश्रद्धाच आहे असे आम्हाला वाटते. या शिवाय,

""की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्वास ठेवणारे थोडे-थोडकेच असतील"

हे गृहीतक नाही का? या वर कुठे केले आहे संशोधन? इतरांचे दाखले मागायचे, आणि आपले मात्र निव्वळ अंदाज? असं कसं?

"अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले."

कोणता प्रयोग कधी झाला? कोणी केला? कधी केला कशात प्रसिद्ध झाला? काही तर संदर्भ आम्हा गरीबांना द्याल की नाही?

आणि ज्योतिष 'हे ग्रीकांकडून आले म्हणून त्याज्य' आहे हा कसला युक्तिवाद? असं तर अनेक गोष्टी सोडाव्या लागतील, (शर्ट आणि पँट सकट ते पण आपले नाही म्हणून). आणी मुळात ज्योतिष हे इजिप्त (मोकळे आकाश आणि दिशांचा मेळ) मधून आले असण्याचे शक्यता जास्त वाटते.) फार तर असं म्हणा की ज्योतिष सिद्ध झालेलं नाही. पण प्रत्येकच गोष्ट नव्या युगातही सिद्ध कुठे झाली आहे? अनेक गृहीतके आहेतच की.

असो,

पोलिस दलात किंवा अमेरिकेत, युनिव्हर्सिटीत नोकरी, हुशारी व स्वार्थाच्या बळावर मिळवलेले यश, त्याबरोबर आलेले स्थैर्य, हे सगळ्यांनाच मिळत नाही हो. आणि असं स्थैर्य भोगून लोकांना शहाणपण शिकवणं सोपंच असतं!

आमच्या सारख्यांना या लांबच्या हुशार माणसांपेक्षा हे ग्रह तारेच जवळचे वाटतात. कारण जेव्हा अत्यंत निराशा जनक परिस्थितीतून जाताना त्याच्याच सोबतीची उब मनाला मिळाली. (ज्याचं जळतं त्याला कळतं) 'माझे पण दिवस बदलणार आहेत', ही आशा आयुष्याच्या अनेक वळणावर प्रयत्नांना बळ देऊन, सुखरूपतेने पोहोचवण्यात यशस्वी झाली. (मी तर म्हणेन की प्रत्येक ज्योतिष्याला सायकॉलॉजी हा विषय पण शिकवला जावा.)

मी मानतो की, ८०% प्रयत्न करावेत २०% नशिबावर सोडावे. ज्योतिष्याचा सल्ला जरूर घ्यावा. पण तेच सगळे काही आहे आणि घडायचे ते घडेल आपोआप असे मानू नये. मनी पाणिनी ची कथा आठवावी आणि प्रयत्नांवरही जोर देणे आवश्यक आहे लक्षात ठेवावे.

हे आपले आले मनी ते लिहिले बुवा. तात्या म्हणतात तसे ईंपल्सिव का काय ते!

छोट्या तोंडी मोठा घास घेतला असेल तर माफ करा...

चू.भू.द्या. घ्या.

आपला

गुंडोपंत

हे आम्ही कधी नि कुठे म्हणलो आहोत?

आपण आणि आपले गुरुदेव "आपल्या वेदांत ह्याचा उल्लेख आहे" अशी खोटी विधाने करतात, तेव्हा ते वेदातून आले म्हणून ग्राह्य, असा युक्तिवाद करता ना ?

हे आम्ही कधी नि कुठे म्हणलो आहोत?
मी कधी वेदांचा पुरस्कार केला बुवा?
आमचे गुरुदेव कोण?
आपला कोणी गुरुदेव बिरुदेव नाही. मीच माझा गुरु आहे.
उगाच संतापून वड्याचं वांग्यावर् काढायची बात नच्छो!

आणी माझ्या लिखाणाला कोणाचीही प्रस्तावना लागत नाही! ;)
आपला
(स्वयंघोषित गुरु) गुंडोपंत

गुंडोपंतांना प्रतिसाद

आमच्या सारख्यांना या लांबच्या हुशार माणसांपेक्षा हे ग्रह तारेच जवळचे वाटतात. कारण जेव्हा अत्यंत निराशा जनक परिस्थितीतून जाताना त्याच्याच सोबतीची उब मनाला मिळाली. (ज्याचं जळतं त्याला कळतं) 'माझे पण दिवस बदलणार आहेत', ही आशा आयुष्याच्या अनेक वळणावर प्रयत्नांना बळ देऊन, सुखरूपतेने पोहोचवण्यात यशस्वी झाली. (मी तर म्हणेन की प्रत्येक ज्योतिष्याला सायकॉलॉजी हा विषय पण शिकवला जावा.)

आपल्या सारख्यांचा प्रतिसाद आम्हास खूप महत्वाचा वाटतो. माझे ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद पुस्तक मनोविकास प्रकाशनाने नव्याने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे
प्रा. जयंत नारळीकरांनी १३ एप्रिल २००३ मध्ये लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत
परीक्षण लिहिले आहे. ते www.faljyotishachikitsa.blogspot.com वर उपलब्ध आहे.
हे पुस्तक सर्वसामान्यांनी चिकित्सकाच्या चष्म्यातून , चिकित्सकांनी
सर्वसामान्यांच्या चष्म्यातून आणी ज्योतिषांनी अंतर्मुख होवून वाचावे असे
आहे. या पुस्तकात फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाइट काय?
या प्रष्नात त्याचा उहापोह केला आहे.
आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी आपणास सांगू इच्छितो कि माझा स्वतःचा प्रवास हा जातक(ज्योतिषाकडे विचारायला जाणारा पृच्छक),ज्योतिष अभ्यासक,समर्थक,ज्योतिषी,संशयवादी,चिकित्सक अशा टप्प्यात झाला आहे.
१८७५ साली विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या 'निबंधमालेत' देखिल फलज्योतिषाची चिकित्सा केलेली आढळून येते.

कोणता प्रयोग कधी झाला? कोणी केला? कधी केला कशात प्रसिद्ध झाला? काही तर संदर्भ आम्हा गरीबांना द्याल की नाही?

हे गृहीतक नाही का? या वर कुठे केले आहे संशोधन? इतरांचे दाखले मागायचे, आणि आपले मात्र निव्वळ अंदाज? असं कसं?

माझ्या पुस्तकात याचे संदर्भ आहेत

पोलिस दलात किंवा अमेरिकेत, युनिव्हर्सिटीत नोकरी, हुशारी व स्वार्थाच्या बळावर मिळवलेले यश, त्याबरोबर आलेले स्थैर्य, हे सगळ्यांनाच मिळत नाही हो. आणि असं स्थैर्य भोगून लोकांना शहाणपण शिकवणं सोपंच असतं!

याचे प्रयोजन समजले नाही. व्यक्तिगत टिप्पणी असेल तर् मी व्यक्तिशः पोलिस दलातील बिनतारी विभागाच्या रेडिओ यांत्रिक (technian) [ सहायक पोलिस उपनिरिक्षक (अभियांत्रिकि) बिनतारी संदेश विभाग ] या व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत सामान्य व कनिष्ठ पदावरुन साडेबावीस वर्षाच्या सेवेनंतर् ३१ मार्च २००७ ला स्वेच्छानिवृत्त झालो आहे. पण् तो माझा केवळ पोटापाण्याचा भाग होता.

आणि ज्योतिष 'हे ग्रीकांकडून आले म्हणून त्याज्य' आहे हा कसला युक्तिवाद? असं तर अनेक गोष्टी सोडाव्या लागतील, (शर्ट आणि पँट सकट ते पण आपले नाही म्हणून). आणी मुळात ज्योतिष हे इजिप्त (मोकळे आकाश आणि दिशांचा मेळ) मधून आले असण्याचे शक्यता जास्त वाटते.) फार तर असं म्हणा की ज्योतिष सिद्ध झालेलं नाही. पण प्रत्येकच गोष्ट नव्या युगातही सिद्ध कुठे झाली आहे? अनेक गृहीतके आहेतच की.

माझ्या पुस्तकातील "विज्ञान तरी कुठे परिपूर्ण आहे मग ज्योतिष कसे परिपूर्ण असेल?" या प्रश्णाशी निगडीत आहे. असे सर्वसामान्यांच्या मनातील ६७ छोटे मोठे प्रश्न घेतले आहेत.

व्यक्तिगत टिप्पणी नाही!

व्यक्तिगत टिप्पणी नाही,
याला योगायोग समजा!
हवे तर सर्किट राव योगायोग कसे होतात आणी हा आत्ताच का झाला
याचे संगणकावर योग पण काढून देतील असे वाटते.
आपला
(सं-योगी)गुंडोपंत

खरचं की राव!

खरंच की राव!
किती सोपे करून सांगितले पहा बरे तुम्ही!
तर सामान्य मुलांनो, दोन घटना परस्पर पूरक झाल्या त्या कोणत्या सांगा पाहू आता पटकन!
आपला
(अतियोगी) गुंड्या!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

१८९३ सालतील एक पुस्तक

फलज्योतिषाचे विडंबन करणारे शामभट्ट् व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत ही चिंतामण मोरेश्वर् आपटे यांची कादंबरी वाचण्यासारखी आहे
http://faljyotishachikitsa.blogspot.com/ वर त्याचे चित्र आहे

छान लेख

महोदय,
लेख आवडला.
'आपणची तारी आपणची मारी आपण उद्धारी आपणेया' हे तुकाराम महाराजांचे वचन आठवले.

आवांतर : मी काही दिवसांपूर्वी उपक्रमावर 'शनीची दशा' या धोंडोपंतांच्या लेखात त्यांना एक प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर काही मिळाले नाही. आपला ज्यातिषशास्त्राचा अभ्यास आहे म्हणून तोच प्रश्न येथे पुन्हा विचारतो आणि उत्तर द्यावे अशी विनंती करतो.
ज्योतिषशास्त्रा प्रमाणे, मनुष्य जन्मास आल्यावर कुंडलीच्या रुपाने त्याच्या संपूर्ण आयुष्याचा आलेख, प्रवासाचा नकाशा उपलब्ध होतो. निष्णात अभ्यासक योग्य ते निरिक्षण करुन भविष्य वर्तवतात. पण अनेकदा असे जाणवते की ते निश्चित भविष्य सांगत नसून सल्ला देत असतात.
जसे की, पुढील महिन्यात वाहनामुळे अपघाताचा संभव आहे!, असा योग असेल तर ज्योतिषी असे सांगून थांबत नाही तर तो पुढे सांगतो की वाहन चालवणे प्रवास करणे टाळा. ( एक उदाहरण म्हणूनच याकडे पाहू. उदाहरण देताना ते स्पष्ट नसेल तरी कृपया आशय लक्षात घ्यावा ही विनंती.)
या मध्ये दोन शक्यता जाणवतात,
१. त्याचा स्वतःच्या सांगण्यावर कमी विश्वास आहे. कारण विश्वास ठाम असेल तर तो असे म्हणेल की 'अपघात होणार'. बस्स.
२. अथवा अपघाताचा योग असला तरी तो काही प्रयत्नांनी टळू शकतो.
मला दुसर्‍या मुद्दयाविषयी जरा माहिती घ्याविशी वाटते.
जर प्रयत्नाने योग टळणार असेल तर मग ज्योतिषशास्त्राची नक्की भूमिका काय?
प्रसिद्ध ज्योतिर्विद ऍलन लिओ असे म्हणतो (असे मी ऐकले आहे :) की स्टार्स इन्क्लाईन बट डु नॉट कंपेल. म्हणजेच ग्रहयोग हे मनुष्यास कृत्य करण्यास भाग पाडत नाहित तर ते तिकडे ढकलून पाहतात.
म्हणजे जे घडणार आहे असे पत्रिकेत दिसते त्यातील बदल हे नेहमी मनुष्याच्या हस्तक्षेपावर अवलंबून आहेत का? जर तसे असेल तर मग तो हस्तक्षेप कसा होणार, आणि त्यानंतर त्याचे परिणाम काय असणार हे सुद्धा कुंडली पाहून आधिच समजेल. (समजले पाहिजे). म्हणजे हस्तक्षेपाने तो योग फळ देणार अथवा नाही हे सुद्धा अधिच समजणार असल्याने हस्तक्षेपाकडे कर्तृत्व जातच नाही.
यावर आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे.

-- (सांगितले गेलेले भविष्य योग्य न ठरण्याचाच योग पत्रिकेत असलेला) लिखाळ

कुठे गायब झाले आहेत.

धोंडपंत कुठेतरी गायब झाले आहेत!
ते बहुदा 'मंद लोचन नक्षत्रावर' हरवले असावेत त्यामूळे सापडायला उशीर होत असावा.
आम्ही पण त्यांना एक प्रश्न विचारला होता, त्याचेही उत्तर न देता ते या मायाजालातून गुप्त झाले आहेत!
असो,
(इंद्रजाल वाला) गुंड्या!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

लिखाळ यांना प्रतिक्रिया

यदृच्छेशिवाय झाडाचे पान देखिल हलत नाही अस मानणारा एक पंथ आहे.तसेच प्रयत्नाला वाव आहे पण तो वासराला दोर बांधल्यानंतर् त्याच्या त्रिज्येतील परिघापर्यंतच असे मानणारा पन् वर्ग आहे.
चुकला तर् ज्योतिषी चुकला कारण् तो माणूस आहे आणि बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर् आलं कारण ते शास्त्र आहे अशी मांडणी केली जाते.

प्रसिद्ध ज्योतिर्विद ऍलन लिओ असे म्हणतो (असे मी ऐकले आहे :) की स्टार्स इन्क्लाईन बट डु नॉट कंपेल. म्हणजेच ग्रहयोग हे मनुष्यास कृत्य करण्यास भाग पाडत नाहित तर ते तिकडे ढकलून पाहतात.

ग्रह कारक की सूचक असा तो विषय आहे.

आपल्या बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे मझ्या पुस्तकात मिळतील असा विश्वास वाटतो.आपण ते जरुर वाचावे.
मला टायपिन्ग येत नाही त्यामुळे मला लिखाणाच्या मर्यादा पडतात्.

आभार

महोदय,
प्रतिसादाबद्दल आभार.

आपल्या बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे मझ्या पुस्तकात मिळतील असा विश्वास वाटतो.आपण ते जरुर वाचावे.
जरुर प्रयत्न करीन.

मला टायपिन्ग येत नाही त्यामुळे मला लिखाणाच्या मर्यादा पडतात्.
सरावाने ते जमेलच. आपण आपल्या मतांविषयी इथे टंकित केले तर उपक्रमावर येणार्यांना ते वाचता येईल आणि चर्चा होवु शकेल. आपले पुस्तक भारताबाहेरील अनेकांना उपलब्ध होणे आणि वाचणे अवघड असू शकते. तसेच पुस्तक वाचून मग पुन्हा उपक्रमावर येवुन चर्चा करणे सुद्धा सहज आहे असे वाटत नाही. मनात आले ते लिहिले. राग नसावा.
--लिखाळ.

पटले

तसेच पुस्तक वाचून मग पुन्हा उपक्रमावर येवुन चर्चा करणे सुद्धा सहज आहे असे वाटत नाही.
हे पटले बुवा!

(आळशी) गुंड्या

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण मी समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

पटले

तसेच पुस्तक वाचून मग पुन्हा उपक्रमावर येवुन चर्चा करणे सुद्धा सहज आहे असे वाटत नाही.
हे पटले बुवा!

(आळशी) गुंड्या

मला देखिल पटले , पटण्यासारखेच आहे. सहज् उपलब्ध असेल तर वाचले जाते.अन्यथा दुर्लक्षित होते.

छान चाललीय चर्चा!

अनेक तज्ञ मंडळींनी मते दिली आहेत. असाच एक उहापोह इथे पहा.

ग्रह, नक्षत्रे यांच्या भ्रमणाचा एका माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो किंवा नाही या बाबतीत सकारात्मक वा नकारात्मक असे नक्की कांही संशोधन झाले आहे काय? असेल तर त्याचा विदा आणि निष्कर्ष महाजालावर कोठे उपलब्ध आहेत?इथे तसे काही मिळेल असे वाटते.

तसेच हा परिणाम सर्व जिवंत प्राणी आणि वनस्पती यांवरही होतो काय? असाही प्रश्न फलज्योतिषवाद्यांना विचारावा वाटतो.

फलज्योतिष खरे की खोटे याबद्दल निश्चितपणे काही बोलता येईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही असे मला वाटते. विज्ञानाच्या आजच्या निकषांवर पडताळून पहाण्याइतपतही अजून अनेक प्रश्नांचे संशोधन झालेले नाही.

विज्ञानवादी हायजेनबर्गच्या 'अनिश्चिततेच्या सिद्धांता' बद्दल काय म्हणतात? जर विज्ञानच कोणत्याही निष्कर्षावर आणि निकषांवर ठाम नसेल तर फलज्योतिषाबाबत काय बोलावे?

तेंव्हा सत्य हे काही तिसरेच असावे - म्हणजे फलज्योतिष आणि विज्ञान - दोन्हीही अपूर्ण आहेत -असे काहीसे.

दोन्हीही अपूर्ण

तेंव्हा सत्य हे काही तिसरेच असावे - म्हणजे फलज्योतिष आणि विज्ञान - दोन्हीही अपूर्ण आहेत -असे काहीसे.


हे पटते आहे..

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी..प्रश्नोत्तरातून् सुसंवाद

भाग १
कुंडली पंचांग राशी नक्षत्रे

१) फलज्योतिष म्हणजे काय़?
२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?
३) जन्मकुंडली म्हणजे काय?
४) जन्मरास म्हणजे काय?जन्मनक्षत्र म्हणजे काय?
५)नावावरुन रास कशी काढतात?
६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?
७) अमावास्या अशुभ दिवस आहे काय?
८) अमावस्या, पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तप्रवाह जास्त होतो हे कितपत सत्य आहे?
९) अमावस्या पोर्णिमेला वेडाचे झटके,अपघातचे प्रमाण जास्त का असते?
१०) हिंदू धर्मात पावसाळ्यात जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो. असा अनुभव येतो.मग नक्षत्रे व मोसमी पाउस यांचा संबंध आहे का?
११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातील सगळी गणिते बदलली का?
१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?
१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?

काही सामान्य शंका
१४) साडेसाती काय प्रकार आहे?
१५) कालसर्प योग म्हणजे काय?
१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?
१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
१८)ग्रहदशा अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?
२०) काही ज्योतिषी आयुष्यातील घटना अचूक सांगतात ते कसे?
२१) हिरोशिमा व नागासाकि शहरात अणुबॉंब पडला त्यावेळी लाखो लोक मेले, विमान अपघात. रेल्वे दुर्घटना वा भुकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्युयोग होता असे म्हणायचे का?
२२) ज्योतिषांवर दुटप्पीपणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरच दुटप्पी आहेत का?
२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतिके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत, डोळ्यांनान दिसणा-या परमेश्वराचे प्रतिक हवे म्हणून माणूस मुर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो.तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले?
२४) ग्रहाची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?
२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?

विवाह, पत्रिका आणि ज्योतिष

२७)पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?
२८)विवाह जुळण्याचे वेळी पत्रिका बघावी का?
२९)मंगळदोष म्हणजे काय?
३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?
३१) मृत्यूषडाष्ट्क काय आहे?
३२) मुहूर्त पाहणे योग्य कि अयोग्य?
३३) गुरुबळ कशासाठी पहातात?
३४) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांती करावयास का सांगतात?
३५) मूळ नक्षत्र सास-यास वाइट,आश्लेशा नक्षत्र सासूस वाइट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?
३६) सिंहस्थात विवाह करु नये असे का म्हणतात?
३७) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?

फलज्योतिषाच्या विविध पद्ध्ती
३८) मेदनिय ज्योतिष हा काय प्रकर आहे?
३९) राजकिय भाकिते कशी वर्तवली जातात?
४०) भुकंपाचे भाकित वर्तवता येणे शक्य आहे काय?
४१)भृगूसंहिता हा काय प्रकार आहे?भृगूसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?
४२) नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का?
४३) दक्षिण भारतात केवळ तुमच्या अंगठ्याच्या ठशावरुन तुमचे नाव,तुमच्या बायकोचे नाव,तुमची कुंडली तुमचा वर्तमान काळ,भूत, भविष्य सर्व काही प्राचीन ऋषींनी लिहिलेल्या ताडपट्ट्यावर सापडती ते कसे? याविषयी विंग कमांडर शशीकांत ओक यांनी 'नाडी भविष्य एक चक्रावून टाकणारा चमत्कार' व 'बोध अंधश्रदधेचा' या पुस्तकात स्वतः अनुभव घेउन लिहिले आहे. ते काय खोटे?
४४) नॉस्त्रॅडॅमस ने जगाच्या महत्वाच्या घडामोडींचे भाकिते पुर्वीच वर्तवून ठेवली आहेत. त्यात भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून जगभरात बलशाली राष्ट्र होइल असे म्हटले आहे.ते खरे आहे काय?
४५) लोकमान्य टिळक यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असून त्यांचा त्यावर विश्वास होता असे म्हणतात ते खरे का?
४६) वास्तू ज्योतिष काय प्रकार आहे?

फल ज्योतिष शास्त्र? प्रवाद, समजुती
४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?
४८) हे गोकॅलिन चे संशोधन नेमके काय आहे?
४९) चंद्र सूर्याचा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून भरती ओहोटी हा दृष्य परिणाम होतोच ना! मग त्याचप्रमाणे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण, चुंबकिय आकर्षण अशा शक्तींचा परिणाम आपल्यावर कशावरुन होत नसेल?
५०) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित आहे का?
५१) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित नाही तर वैद्न्यानिकांनी त्याविरोधी ठोस भुमिका का घेतली नाही?
५२) जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे नियतकालिके राशी भविष्य का छापतात?
५३) आमचा फलज्योतिषाचा अभ्यास नाही,तरी पण हे शास्त्र भ्रामक आहे हे आम्हास कसे कळावे?
५४) राजकारणी, सिनेनट व्यावसयिक हे ज्योतिषाचा सल्ला घेतातच की?
५५) लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरोपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?
५६) फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाइट काय?
५७) मग ज्योतिषाकडे जाणा-या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?
५८) दोन तज्न्य डॉक्टरांची तरी कुठे एकसारखी मते असतात मग दोन ज्योतिषांची भाकिते सारखीच असली पाहिजेत असा आग्रह का
५९) विद्न्यान तरी कुठे परिपूर्ण आहे? मग ज्योतिषशास्त्र तरी कसे परिपूर्ण असेल?
६०) फल ज्योतिष विद्न्यान नसेना का पण उपयुक्त तर आहे?
६१) अहो ज्योतिष विषय विद्यापीठात सुद्धा शिकवला जातो ते काय उगीच का?
६२) परदेशातील फलज्योतिषसंशोधनाची उदाहरणे नेहमीच उगाळली जातात मग आपल्या कडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?
६३) आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना काय आव्हाने दिली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?

भाग दोन
स्फुट लेखन

फल ज्योतिषः एक प्राथमिक चिकित्सक दृष्टिकोण
नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष
फेंग शुई! वास्तुशास्त्राला चिनी चॅलेंज
यूजीसी आणि फलज्योतिष
फलज्योतिषचिकित्सेविषयी एरिक रेग यांनी संकलीत केलेले पाश्चिमात्य विचार
आखिल भारतीय ज्योतिषसंमेलन, सोलापूर २००१ च्या निमित्ताने

लिहीत रहा

प्रकाशराव, लिहीत रहा. टंकलेखन काय, हळूहळू जमेलच. वाटल्यास टंकलेखन सहायकाची मदत घ्या. वरील प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडतील. टीका होईल, क्वचित जहरी, वैयक्तिकही. पण संयम न सोडता लिहीत रहा.
शुभेच्छा.
ऐहिक

जाहिरात-प्रत्तुत्तर्

श्री. प्रकाश घाटपांडे ह्यांनी अनेकदा अनेक मराठी संकेतस्थळांवरून आणि अनुदिन्यांवरून आपल्या (एकमेव) पुस्तकाची जाहिरात करण्याचे अनेक प्रयत्न केलेले आहेत. ह्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा द्यावा का?

जाहिरात शब्द किती बदनाम झालय ना! विषयाच्या अनुषंगाने एखाद्या पुस्तकाची उपयुक्तता व उपल्ब्धता चर्चापटलावर् जाहीररीत्या मांडणे यात काही गैर् आहे असे मला वाटत् नाही.जर् ही माहीती मी लोकांना दिलीच नाही तर् लोकांना समजणार कसे? कुणासाठी ही माहिती नवीन असेल तर् कुणासाठी ती पुनरावृत्ती असेल. गप्पा मारताना एखादा विषय् निघाल्यावर् आपण त्या विषयाच्या संदर्भात एखादा सिनेमा वा पुस्तक वा संस्था याची माहिती आपल्या मित्राला देतो तेव्हा आपण काय त्या गोष्टीची जाहिरात करत् असतो का? उपयुक्तता हा मुद्दा सापेक्ष आहे पण तो उपलब्धतेच्या नंतरचा आहे. तो वाचकांनी ठरवायचा आहे. हे पुस्तक नारळीकरांच्या परिक्षणानंतर् अचानक प्रकाशझोतात आलं. (तोपर्यंत ते फक्त समविचारी लोकांपर्यंतच पोचल होतं. म्हणजे परस्परं प्रशंसंति. ज्या लोकांपर्यंत पोचण्याची गरज् होती त्यांच्यापर्यंत ते पोचतच नव्हतं) लेबल चा परीणाम समाजात किती मोठा असतो हे या निमित्तने दिसून आले. मनोविकास प्रकाशनाने हे त्या नंतर् प्रकाशित केले. तो पर्यंत मी पदर्मोड करूनच् म्हणजे स्वत : प्रकाशित करुन लोकांपर्यंत पोचवले होते.( ही आमचीच खाज) एखादी गोष्ट् ही एखाद्यासाठी कचरा असेल तर ती दुस-यासाठी संपत्ती असेल. ज्ञानाचा अहंकार् (खरं तर् माज) असणारे अनेक विद्वान आहेत. तो दर्प त्यांच्या वागण्या-बोलण्यातून-लिहिण्यातून दिसत् असतो. तो सामान्य लोकांपासून फटकून वागतो. प्रत्येक जण माझे विचार कसे समतोल आहेत,हे अभिनिवेशाने [तसा अभिनिवेश नसल्यचा आव आणून]सांगतो.जेव्हा आपले विचार दुस-यांना पटत नाहीत त्यावेळी तो समोरच्या माणसाच्या 'आकलनाच्या मर्यादा' बुद्धीचा तोकडेपणा' 'बौद्धिक दिवाळखोरी' इ. विशेषणे लावून, समजून घेण्यासाठी सुद्धा बौद्धिक पात्रता लागते असे म्हणून आपला अहंकार कुरवाळत बसतो. ते स्वाभाविक आहे. पण चालायचच व्यक्ती तितक्या प्रकृती असतात्. ना गुणी गुणीनम् वेत्ती । गुणी गुणीषु मत्सरी । गुणीच गुणरागीच । विरलः सरलो जनः
पण त्यामुळे इतर् लोकही म्हणू लागले तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी,तुमचा अहंकार तुमच्यापाशी.लोकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. आता राहिला प्रश्न पाठिंब्याचा. सर्किटरावांना जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच ते पाठिंबा देतील तो पर्यंत देणार् नाहीत.त्यासाठी त्यांना पुस्तक मात्र वाचावे लागेल.

परंतु त्यांनी (मराठी दुकानदारांसारखे) तत्व पुढे मांडून, नाही ! नाही !! नाही !!! असे, त्रिवार सांगितले आहे. तरी देखील श्री. घाटपांड्यांच्या (एकमेव) पुस्तकाची जाहिरात ते स्वतः करीत आहेत, आणि संपादक किंवा उपसंपादक काहीही कृती करीत नाहीत!

वरील पार्श्वभूमीवर् या जाहिरातीतून मला काय किंवा संपादकांना काय् आर्थिक लाभ मिळणार आहे हे मला अद्याप समजले नाही. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी मी तोटाच सहन केला आहे. यंदा कर्तव्य आहे हे माझे दुसरे पुस्तक् मी अधिक तोटा सहन् करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे.मला त्यातले अर्थकारण मला अजून तरी फारसे समजत् नाही. लेखक् म्हणजे वितरण करण्याची क्षमता नसलेला उत्पादक, पुस्तक म्हणजे माल, प्रकाशक ,दुकानदार म्हणजे विक्रेता आणि वाचक म्हणजे गि-हाईक असं गणित मात्र दिसून येत. उपक्रमने ही पुस्तक विनामूल्य अपलोड केली तरी माझी हरकत असणार नाही.
आपला
(सात्विक) प्रकाश घाटपांडे
ता.क. जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत ज्योतीष या ना त्या स्वरूपात टिकून राहणार आहे हेच आमचे भाकित

झकास!

वा सर्किटराव,
आजवर आपण जे काही लिहिले, त्याच्या शेवटी आपल्या पुस्तकाची जाहिरात, आणि नारळीकरांनी आपल्या पुस्तकावर लिहिलेला लेख, ह्याव्यतिरीक्त आपण आजवर काहीही लिहिलेले नाही.

हेच म्हणतो मी
(आणी आता मी मी पणा पूरे करा!)
आपला निरोप स्पष्टच आहे. सगळे नीट एकत्र पाहिल्यावर मलाही फसवणूक झाल्या सारखेच वाटले!
मात्र माझा लेख का गायब झाला असावा हे मात्र काही कळले नाहिये. प्रशासकांपैकी कुणाचे तरी 'जवळचे संबंध' लेखकाशी असले पाहिजेत. असे जाणवले. आधी मला वाटले की मीच धांदरट पणा करून घालवला की काय म्हणून परत् सुद्धा टाकला. पण तो लगेच नाहिसा झाला.
असो.

हे हा.घ.तों.बो. म्हणजे काय हो?

आपला
(जरासा बावळट) गुंड्या

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

हा.घ.तों.बो.

हातांची घडी तोंडावर बोट.

योगायोग

योगायोगाविषयी माझे जेष्ठ् स्नेही श्री माधव रिसबूड म्हणत् "समोरच्या बिल्डिंगमध्ये रहाणा-या प्रेयसीला नेत्रपल्ल्वी करून खुणवायचे आणि बागेत भेटल्यावर् इतरांना म्हणायचे योगायोग" ज्योतिषाचे यश हे योगायोगावरच असते. दीड हजार वर्षांपुर्वी च्या भट्ट नारायण् लिखित 'वेणीसंहार्' नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे ते म्हणजे ..
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम्।
फलंति काकतालियं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।
ग्रहांच्या गती, स्वप्न,शकुन,नवस हे काकतालिय न्यायाने फळतात,शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.

अरे?

अरे हे काय?

ता.क. जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत ज्योतीष या ना त्या स्वरूपात टिकून राहणार आहे हेच आमचे भाकित

(हे तर आमचे म्हणणे होते...)
म्हणजे वादाचा मुद्दाच निकाली निघाला की राव!
हे बरय! फार शेकलं की म्हणायचं 'मी कुठे त्यातला?'
काय पावरबाज आहात हो तुम्ही सर्किटराव!?!

(आणी तुमचा या निरोपाचा, मूळ निरोप आम्हाला दिसलाच नाही हो, प्रशासकांनी खाल्ला की चष्मा बदलावा!?)
असो!

(छद्मीपणाने हसणारा नि हलकट) गुंड्या!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

ज्योतिष व मानसशास्त्र

मी तर म्हणेन की प्रत्येक ज्योतिष्याला सायकॉलॉजी हा विषय पण शिकवला जावा.

पंत, त्यांना शिक्षण द्यायची गरज नाही. कारण मनाच्या अंतर्भागात दडून बसलेल्या, स्वतःविषयी कमीपणा वाटणार्‍या लोकांच्या मानसिकतेचा ज्योतिषी लोक फायदा घेत असतात. त्यांना आणखी काय मानसशास्त्र शिकवावे ?

या संबंधी पं. महादेव शास्त्री जोशी यांचे "आत्मपुराण " पुस्तक वाचण्यासारखे आहे. वैदिक परंपरेतून धर्मशास्त्र,ज्योतिष शिकलेले शास्त्रीबुवा.पणजीला त्यांनी ज्योतिष कार्यालय् थाटले. पण त्यांची वाणी खरी उतरत नसे. मग त्यांनी तिथल्याच एका ज्येष्ठ जाणत्या ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. त्यांनी शास्त्रीबुवांना सांगितले ,"अहो तुम्ही ग्रंथाधारे सांगितलेत कि मेलात. आशां कालवती कुर्यात . पृच्छकाकडूनच माहिती काढायची आणि त्याला आशेच्या घोड्यावर् पाठवून द्यायचे. दुसरे सूत्र कालं विघ्नेन योजयेत । काळ हा संकटांवरचा उत्तम उपाय आहे." शास्त्रीबुवांनी ठरवलं किती काळ स्वतःला आणि लोकांना फसवत् राहू? ते गाशा गुंडाळून गावी परत् आले.

नारळीकरांच्या लेखावरील ही वाचकांचे पत्रे काय मानसिकता दाखवतात?

Dainika Sakal 17/5/2007

उक्ती-कृतीमध्ये विसंगती का?
"पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा' हा डॉ. नारळीकरांचा लेख वाचला. वाटले
की, आता या विषयापुरत्यातरी आपल्या मनातील शंका, प्रश्‍न संपतील. पण
पुन्हा आमच्यातील अर्जुन तसाच द्वंद्वावस्थेत उभाच! सामान्यांचे असेच
असते. मतामतांच्या गलबल्यात त्याला ठोस भूमिका घेता येत नाही. आणि याला
कारण म्हणजे त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या उक्ती व कृतीमधील
महदंतर नसले तरी लक्षवेधी विसंगती. डॉ. नारळीकरांच्या अजोड
कर्तृत्वाविषयी अत्यंत आदर व सार्थ अभिमान व्यक्त करून ते प्रश्‍न
सर्वांपुढे ठेवतो. काही वर्षांपूर्वी पुण्यात परम महासंगणकाची
प्रतिष्ठापना करण्याचा सोहळा मोठ्या उत्साहाने व श्रद्धेनेही पार
पडल्याचे पुष्कळांच्या स्मरणात असेल. त्या समारंभासाठीचा मुहूर्त
निवडला होता नेमका गुढी पाडव्याचा. ग्रहताऱ्यांचा प्रभाव न मानणाऱ्या
विज्ञाननिष्ठांना त्याच्या आदल्या दिवशीची अमावस्या अथवा लगतचा इतर
कोणताही सोईस्कर दिवस का चालला नाही?

काही विज्ञानानिष्ठांनी अंधश्रद्धानिर्मूलन करण्याचा विडाच उचललेला
दिसतो. खरोखरीच अपेक्षित व स्वागतार्ह अशीच ही गोष्ट आहे. पण
उत्साहाच्या भरात त्याचाच एक भाग म्हणून ते व्यासपीठावरून
ज्योतिषशास्त्र कसे भाकड आहे, हे मोठ्या अभिनिवेशाने सांगताना दिसतात.
आपल्या व्यक्तिगत जीवनातील महत्त्वाचे प्रसंग साजरे करताना हीच मंडळी
पंचांगाचा आधार घेतात. सर्वच दिवस व रात्री सारख्याच शुभाशुभ म्हणणारे
काही विज्ञानवादी स्वतःच्या अथवा आपल्या मुलामुलींच्या विवाहप्रसंगी
मुहूर्त का पाहतात? मुलामुलींच्या जन्मपत्रिका का तपासतात? जगातील
सर्वच धर्म, संप्रदाय, समाज या ना त्या रूपाने या विश्‍वशक्तीला मानतात
व त्यातच आपले पूर्णत्व शोधतात. ही प्रक्रिया सनातन आहे व तशीच राहणार.
चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवले त्या विज्ञानाच्या महत्तम विजय
प्रसंगीही त्याने प्रथमतः त्या विश्‍वशक्तीचे आभार मानले. म्हणून सर्व
विज्ञानवंतांना आम्हा सामान्यातिसामान्यांची हात जोडून विनंती, की
आमच्या श्रद्धाविषयावर सरधोपटपणे प्रहार न करता, त्यांतील
अंधश्रद्धांचे फोलपट खुबीने बाजूला करा, आमचे ज्ञान नेहमीच तोकडे
राहणार, म्हणून आमच्या श्रद्धा विवेकपूर्णतेने अधिक बळकट करा, की
ज्यामुळे आम्हाला समाधानाचा- शांतीचा मार्ग सापडेल. त्यासाठी तुम्ही
आमचे आचरणशील "आदर्श' व्हा.

- रमेश वा. दिवटे, पुणे.
---------------------------------------------
प्रबोधनाची गरज
"पराधीन नाही जगती..' हा जयंत नारळीकर यांचा सडेतोड लेख समाजाच्या
डोळ्यांत अंजन घालणारा आहे. प्रगतिपथावरील राज्य व राष्ट्र म्हणवून
घेणाऱ्या महाराष्ट्र व भारताला ज्योतिषावरील फाजील विश्‍वास,
अंधश्रद्धा यांचा जबरदस्त विळखा पडलेला आहे. सुशिक्षित यातून सुटले
नाहीत; मग अडाण्यांची काय कथा? त्यात मंत्री, पुढारी, नामवंत खेळाडू,
नट व इतर प्रतिष्ठित ज्यांना समाज आदर्श मानतो, ज्यांच्या प्रत्येक
कृतीत रस घेतो, त्यांनीच अशा गोष्टींना खतपाणी घातल्यावर "आधीच
उल्हास...' अशीच स्थिती होणार! धावांसाठी नारायण नागबळी करणे, सामना
जिंकावा म्हणून यज्ञ करणे, मंगळशांतीसाठी झाडाशी लग्न लावणे, विद्वान
मंत्र्यांनी कार्यालय अशुभ म्हणून त्यात प्रवेश करायला "का कू' करणे
किंवा बदलून मागणे, निवडणूक प्रचारापूर्वी वाजतगाजत देवदर्शन करणे, अशा
गोष्टी सर्रास चालू आहेत व त्यांना वारेमाप प्रसिद्धी पण मिळत आहे.
रामदास, तुकाराम या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी वैज्ञानिक सत्ये
ठणकावून सांगून बुवाबाजीच्या मागे न लागण्याचा कळकळीचा उपदेश जसा
समाजाला केला आहे, तसाच तो गाडगे बाबा, तुकडोजी महाराज या संतांनी पण
केला आहे. हे लाभाविण प्रीती करणारे कळवळ्याच्या जातीचे, खरे संत होते.
आज मात्र शेकडो बुवा, बाया, लोकांना भविष्याच्या, मनःशातींच्या नादी
लावून माया जमवीत आहेत. भावनेला शास्त्रकाट्याची कसोटी लावण्याची
आवश्‍यकता आहे. म्हणून शालेय शिक्षणापासूनच नारळीकरांसारख्याचा
बुद्धिवादी दृष्टिकोन विद्यार्थ्यांसमोर ठेवला पाहिजे व थोतांडाच्या
लायकीच्या गोष्टींपासून त्यांना काळजीपूर्वक दूर ठेवले पाहिजे. भविष्य
बघू नका; ते प्रयत्न, कष्ट करून घडवा, अशी शिकवण दिली पाहिजे समाजाचे
पण प्रबोधन केले पाहिजे.

- डॉ. शुभांगी कालेकर, पुणे.
---------------------------------------------
कर्मकांडाचे वाढते थोतांड
"पराधीन नाही पुत्र मानवाचा!' हे डॉ. जयंत नारळीकरांना पुनःपुन्हा
आम्हा फलज्योतिष अन्‌ तत्सम कर्मकांडे मानणाऱ्या मानवांना समजून
सांगावे लागते, तेव्हा आम्ही खरेच माकडाचे मानव झालोत का, असा प्रश्‍न
उभा राहतो. प्रश्‍नाचे उत्तर असे, की आम्ही अजून माकडेच आहोत. आणि या
माकडांना नाचवणारा माकडांचा खेळ त्यांच्या आयुष्याशी खेळणारा समाजातील
एक उच्च वर्ग हेतुतः हजारो वर्षे खेळत आला आहे. आम्ही माकडे
नारळीकरांचे ऐकणार नाही; पण भोंदू बाबा, महाराज, गळ्यात रुद्राक्षाचा
माळा घालणाऱ्यांवर विश्‍वास ठेवणार! खरे तर या विश्‍वात राहण्याच्या ते
लायकीचेच नव्हेत. हे मी आशिक्षितांबद्दल म्हणत नाही. ते तर बोलून चालून
अडाणी, अंध श्रद्धाळूच! मी बोलतोय ते शिक्षित, सुशिक्षितांविषयी- मग ते
कोणत्याही जाती- धर्माचे असेनात का! आज समाजात नवनवीन सण साजरे
करण्यामागे हेतुतः समाजाला देवभोळेपणा, कर्मकांडे यांत अडकविण्याची
जोरदार प्रक्रिया सुरू आहे. बुवा, महंत, महाराज यांचे प्रस्थ वाढत आहे,
पेशवाईच्या काळातही ""काय गळ्यात घालून तुळशी लाकडे ही काय भवाला दूर
करतील माकडे,'' असे परखडपणे शाहीर राम जोशी यांनी बजावले होते.

- चंद्रकांत बोराटे, पुणे.
---------------------------------------------
विज्ञान व अध्यात्म
डॉ. जयंत नारळीकर यांचा दैववादापेक्षा विज्ञानावर आधारित
शास्त्राप्रमाणे वाटचाल करणे हितावह असल्याचे सांगणारा लेख निश्‍चितच
विचारांना चालना देणारा आहे; परंतु सध्याच्या विज्ञानयुगात सर्व
क्षेत्रांत प्रगती करणाऱ्या अमेरिकेसारख्या देशात सर्व सुखे
मिळाल्यानंतरही तरुणांमध्ये नैराश्‍य निर्माण होऊन आत्महत्यांचे प्रमाण
वाढले आहे. तेव्हा केवळ वैज्ञानिक अभ्यास करून भौतिक सुखामागे
लागण्यापेक्षा त्याला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन सुखी व समाधानी होऊ
शकेल. अर्थात अंधश्रद्धेचा अतिरेक करून कर्मकांडांना महत्त्व देणे
अयोग्य आहे. त्याचप्रमाणे विज्ञानामुळे सुखासीन जीवनाच्या आहारी जाणे
हानिकारक ठरू शकेल. यासाठी विज्ञान व अध्यात्म यांचा समतोल टिकवून
स्थितप्रज्ञ वृत्तीने जीवन जगणे लाभकारक ठरेल.
- प्र. द. काळुसकर, पुणे.
---------------------------------------------
मार्गदर्शक शास्त्र
ज्योतिष हे एक अदभुत आणि निःसंशय शास्त्र असूनही विज्ञाननिष्ठ माणसे हे
सत्य नाकारण्याचा जेव्हा आटापिटा करतात, तेव्हा त्यातून त्यांना काय
मिळवायचे असते आणि कोणते समाजहित साधायचे असते, तेच कळत नाही.
ग्रह-तारे म्हणजे दगडधोंडे, असे म्हटले तरी प्रत्येक ग्रहातून विशिष्ट
प्रकारचे किरण, चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण बाहेर पडत असून, त्याचेच
विविध परिणाम मानवावर होत असावेत, असे फार तर वैज्ञानिक भाषेत म्हणता
येईल. ज्योतिषशास्त्र वेदांतले नसून ते ग्रीक बॅबिलोनियन प्रभावाखाली
भारतात आले, हे श्री. नारळीकरांचे विधान स्वीकारले, तर ज्योतिष हे
अत्यंत प्राचीन आणि जगभर पसरलेले शास्त्र आहे, हेच सिद्ध होते.
वैज्ञानिकांची याने ठरल्या वेळी एखाद्या ग्रहावर अचूक पोचत असली तरी
ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी अमुक ग्रह किंवा नक्षत्र ठराविक राशीत
किती वाजता उदय पावेल व किती वाजता अस्तंगत होईल, कोणते सूर्यग्रहण
किंवा चंद्रग्रहण कुठे, कधी दिसेल, हे किती तरी वर्षे अगोदर गणिताच्या
साह्याने अचूक सांगितलेले असते. व तेही कोणत्याही साधनाशिवाय व
खर्चाशिवाय, हे अधिकच कौतुकास्पद नाही काय? वैज्ञानिकांनी उपकरणांसह व
अब्जावधी रुपये खर्च करून काढलेले निष्कर्ष डळमळीतच असतात. अमुक
ग्रहावर पाणी आहे काय? पृथ्वीबाहेर सजीव वस्ती आहे काय? हे सिद्ध
करायला वैज्ञानिकांना आणखी किती वर्षे व किती अब्ज रुपयांचा खर्च
लागेल, ते त्यांनाच माहीत. वस्तुतः प्राचीन ज्योतिषशास्त्र ही खगोल
शास्त्राचीच एक महत्त्वाची शाखा असल्याने, आजच्या वैज्ञानिकांनी अवकाश
मोहिमेत ज्योतिषशास्त्रासारख्या बहुमोल शास्त्राचा उपयोग, एक
मार्गदर्शक व पूरक शास्त्र म्हणून करून घेतला, तर तो त्यांना व मानव
प्रगतीला खूप उपकारक ठरू शकेल. दुसरे म्हणजे विज्ञाननिष्ठ, इहवादनिष्ठ,
ईश्‍वराला रिटायर करणारे असे अनेक प
्रकारचे बुद्धिमंत प्राचीन बहुमोल शास्त्र मान्यता, संस्कृती, धारणा
यांच्यावर आपापल्या नास्तिकतेच्या कुऱ्हाडी चालवण्यासाठी उत्साहाने
सज्ज असलेले दिसतात. अशा वेळी प्रत्येकाने आपल्याला मान्य असलेल्या
श्रद्धा, निश्‍चयपूर्वक बळकट करणे फार आवश्‍यक होत आहे.

- वामन पुरोहित, पुणे.
---------------------------------------------
शाळांमधून लावण्याजोगा लेख
"पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा'.... हा महत्त्वपूर्ण लेख प्रसिद्ध
केल्याबद्दल अभिनंदन. भारतीय धार्मिक ग्रंथ, वेद, रामायण, महाभारतात
हजारो लग्न व यज्ञाचे वर्णन आहे; परंतु एकदाही ज्योतिष, मुहूर्त
इत्यादींचा उल्लेख नाही, असे जाणकार सांगतात. श्रीकृष्णाने रुक्‍मिणीचे
हरण करून तिच्याशी पंचांग न पाहता विवाह केला. असे असताना आज केवळ
अंधश्रद्धेमुळे पंचांग, तथा जन्मकुंडलीस अति महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाजात वावरताना लक्षात येते, की पत्रिकेच्या अट्टहासापायी अनेक वधू-वर
पालक चांगली अनुरूप व योग्य स्थळे हातची दवडतात. त्याचे कारण त्यांची
पत्रिकेवर असणारी अंधश्रद्धा. विविध वाहिन्यांवरील मालिका, पत्रिकेचे
समर्थन करणारी भाषणे यामुळे पत्रिकावाद्यांची अंधश्रद्धा आणखीच मजबूत
होते. अशा वातावरणात जयंत नारळीकर यांचा लेख प्रबोधनच करतो. अब्राहम
लिंकनचे हेडमास्तरांना पत्र जसे पोस्टरच्या आकारात विविध शाळांच्या
भिंतीवर दिसते, तसेच हा लेख शाळा, कॉलेजांमधून लावला पाहिजे.

- फुलचंद सांकला, पुणे.

अवांतर - काय दिवस आले आहेत?

- जयंत नारळीकर
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

कंसात दिलेली पुरवणी वाचून कमाल वाटली! काय पण् दिवस आले आहेत?

अवांतर

(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

कंसात दिलेली पुरवणी वाचून कमाल वाटली! काय पण् दिवस आले आहेत?

सदर लेख हा दै.सकाळ मध्ये प्रकाशित झाला होता.कंसात टीप देणे हा संपादकिय संस्कार आहे. तशी प्रथा आहे.
प्रकाश घाटपांडे

अवांतर

लग्न मुहूर्त पाहून केली जातात आणि लग्नाचे वाढदिवस तारखे प्रमाणे साजरे का करतात?

ह्म्म्म्

छान विषय.. याविषयी या लेखापेक्षा अधिक विस्ताराने आणि पटेल असं "आकाशाशी जडले नाते" या पुस्तकात संपूर्ण वेगळा चॅप्टर् (नेमका यावेळी मराठी शब्द आठवत नाही आहे :प्) आहे. फार सोप्या पद्धतीने त्यांनी हा मुद्दा सिद्ध केला आहे की ज्योतिष हे शास्त्र नव्हे.

'शरद उपाध्ये' (ते यात किती अथॉरिटी (मराठी?) आहेत कोणी ठरवावे पण लोकप्रसिद्ध नक्कीच आहेत) यांच्या कार्यक्रमातही ज्योतिष हे शास्त्र नसून "तर्कशास्त्राचा कल्पनाविलास' आहे असा आश्चर्याचा सुखद धक्का ऐकावयास मिळाला

पण, जरी हे असलं तरी, ज्योतिषाचं समाजातील अस्तित्व हे सत्य आहे. त्याचा वापर जर योग्य प्रकारे केला गेला तर समाजोन्नती होऊ शकते. उदा द्यायचं झालं तर एखाद्या ज्योतिषाने सांगितलं.. की तुमच्या मुलीची कुंडली अशी झाली आहे, की तिचं लग्न तीला किमान बॅचलर डिग्री मिळाल्या बिगर होणार नाही (आणि झालच तर तिच्या नवऱ्याचं काहि खरं नाही).. तर त्य मुलीचे पालक झक मारत तीला शिकू देतील. जर एखाद्या प्रसिद्ध बाबाने घोषणा केली की मी जर तुमच्या गावात यायला हवं असेल तर त्या गावातले सगळे गुत्ते मी येण्याआधी ६ महिने बंद राहिले पाहिजेत.. काय फ़रक पडेल गावात!!

तर ज्योतिष खरं आहे का खोटं आहे यावर वाद घालण्यापेक्षा त्याचं (दुर्दैवी) अस्तित्व मान्य करून त्याचा उपयोग समाजोन्नतीसाठी करता येईल का हे पहावं

ऋषिकेश

चॅप्टर

प्रकरण!! आत्ता आठवला शब्द एकदाचा.. तेच् म्हंटलं आत्ता तोंडावर होता.. असो वाक्य ""आकाशाशी जडले नाते" या पुस्तकात यावर संपूर्ण स्वतंत्र प्रकरण आहे. फार सोप्या पद्धतीने त्यांनी हा मुद्दा सिद्ध केला आहे की ज्योतिष हे शास्त्र नव्हे." असे वाचावे

आम्ही तेच करतो


तर ज्योतिष खरं आहे का खोटं आहे यावर वाद घालण्यापेक्षा त्याचं (दुर्दैवी) अस्तित्व मान्य करून त्याचा उपयोग समाजोन्नतीसाठी करता येईल का हे पहावं


फक्त "त्याचा उयोग" ऐवजी " त्याची चिकित्सा" एवढा बदल आहे. http://mr.upakram.org/tracker/582 येथे विषयावरील मनोगत कदाचित वाचले असेल

प्रकाश घाटपांडे

लेख आवडला

जयत नारळीकराचा लेख उत्तम . वीचाराला चालना देणारा.

 
^ वर