ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण ३ - फेंग शुई! वास्तूशास्त्राला चिनी चॅलेंज

फेंग शुई! वास्तूशास्त्राला चिनी चॅलेंज

''कमाल आहे फेंग शुई माहीत नाही?`` बहुतेक त्याला 'व्यर्थ आहे जीवन` असं म्हणायचं असावं. पण अज्ञानाची कीव करण्याची संधी मिळाली हे काय थोडं झालं का? जागतिकीकरणाच्या लाटेत केवळ वस्तुंची देवाणघेवाण झाली नाही तर त्याच्याशी निगडीत असलेल्या कल्पना वा माहिती व तंत्रज्ञानाची पण आयात निर्यात झाली. अन्यथा त्या वस्तुंची उपयोगिता जर माहिती झाली नाही तर ग्राहक ती कसा घेणार? दिवाणखान्याची शोभा वाढवणाऱ्या पवनघंटी, हसऱ्या बुद्धाच्या मूर्ती, चिनी बदकांची जोडी, ड्रॅगॉनचे डोके असलेला कासव, फिनिक्स, तीन पायांचा बेडूक, चिनी लिपीच्या नाण्यांची माळ, फिश टॅंक या चित्रमय वस्तू हा केवळ उच्च अभिरुचीच्या वास्तूसौंदर्यशास्त्राचा भाग आहे हा माझा समज ही त्या अज्ञानाचा भाग होता. पूर्वी गांधीजींच्या तीन माकडांची चित्रे दिवाणखान्यात किंवा एखाद्या दुकानात असायची त्याऐवजी आता चिनी चेहऱ्याच्या विरळ अधोदिशी दाढीमिशा असलेल्या तीन माणसांच्या चित्रवस्तू दिसू लागल्या. एकमेकात गुंतलेले चौकोनांचे भौमितिक चित्र वाटणारे कशीदाकाम, स्फटिकांचा गोळा दिवाणखान्यात टांगले जाऊ लागले. देवळाच्या प्रवेशद्वाराजवळची संगमरवरी कासवे छोटे पितळी रुप घेऊन दिवाणखान्यात आली. म्हणजेच थोडक्यात आपल्या घराची फेंग शुई झाली.
फेंग शुई म्हणजे काय?
चिनी खाद्य हे 'चायनीज् फूड` म्हणून अल्पवधीत लोकप्रिय का झाले? भारतात काय विविध पाककलाकृती संपल्या की काय? एरवी झुरळांच लोणचं, भरल्या वांग्यासारखा भरला साप, बेडकाची तंगडी फ्राय अशा कल्पना असलेलं चायनीज फूड भारतात वेगळचं रुप घेउन आलं आणि रसिक खादाडांच्या पोटाचा कब्जा घेतला. रुचीचा आस्वाद ही सुद्धा एक संपन्न होणारी प्रक्रिया आहे. सुरवातीला गोमूत्रासारखी लागणारी बिअर ही नंतर अमृतासमान वाटायला लागते. कारण तशी ती वाटली नाही तर गाढवाला गुळाची चव काय? हा शिक्का बसायची भीती. त्यामुळे तुमच्या चवीत आपोआप बदल होत असतो. तसं चायनीज फूडला तोंड वेंगाडणारी लोक आपोआप लाळ गाळू लागली आणि चायनीच रेस्टॉरंटची संख्या वाढली.
फेंग शुईच तसचं झालं.फेंग शुई ही एक चिनी व्यक्ती आहे इथपासून ते तो एक धर्म वा पंथ आहे इथपर्यंत अनेक समज लोकांमध्ये आहेत. फेंग शुई म्हणजे चिनी वास्तू शास्त्र. फेंग शुई चा शब्दश: अर्थ हवा आणि पाणी. फेंग शुई हे पर्यायी विज्ञान आहे असे फेंग शुई तज्ज्ञ सांगतात. ते पाच हजार वर्षांचे जुने आहे. फेंग शुई हे वास्तूतील उर्जेच्या संतुलनाचे काम करते. एखाद्या तिखट पदार्थाचा तिखटपणा कमी करण्यासाठी आपण जसे लिंबू पिळतो तसे त्या वास्तुत उर्जेचा प्रभाव कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळया वस्तूंचा वापर करुन ती उर्जा आपल्याला अनुकूल करुन घ्यायची अशी ती कल्पना आहे. ज्या प्रमाणे शेतकरी आपल्या शेतीची मशागत करुन भरघोस पीक काढतो त्याप्रमाणे फेंग शुई तज्ज्ञ वास्तूच्या उर्जेची मशागत करुन घरधन्याला समृद्धीचा लाभ करुन देतात. फेंग शुई च्या तत्वानुसार यिन आणि यांग या दोन मूलभूत शक्ती स्त्री आणि पुरुष या सारख्या असून त्यांच्या संयोगातून 'ची` ही उर्जा तयार होते. आपल्याकडच्या प्राण या घटकासारखी. याचाच आधार फेंग शुई मध्ये घेतला आहे. फेंग शुई ला चिनी ज्योतिषशास्त्राची जोड आहे. ते भाग्य व कर्म याचाही विचार करतं. त्यातं अंत:प्रेरणेचाही भाग आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने कोणतीही एक गोष्ट फेंग शुई नुसार सर्वाना सारखी नसते.

वास्तू शास्त्र म्हणजे इंडियन फेंग शुई
आपल्या कडचे वास्तूशास्त्र कमी पडले की काय त्यामुळे त्यामुळे फेंगशुई ची गरज पडावी? असा सवाल काही देशाभिमानी जरुर करतात. आमचंही वास्तूशास्त्र तितकच प्राचीन आहे. इथं प्राचीनता कुठंतरी अस्सलपणाशी निगडीत आहे. स्कॉच जेवढी जुनी तेवढी अस्सल.जितकं प्राचीन तितकं ते विश्वासार्ह. आधुनिकतेचा पुरस्कार हा जसा अहंकाराचा भाग असू शकतो तसाच प्राचीनतेचा वारसा हा सुद्धा असू शकतो. मोहेंजोदडो व हडप्पा संस्कृतीचे उत्खननाचे अवशेष हा उत्कृष्ठ नागरी रचनेचा नमुना आहे. म्हणजे बघा आमची संस्कृती त्याकाळातही किती पुढारलेली होती. चिनी बॅबिलीऑन, ईजिप्शियन, ग्रीक, खाल्डियन या ही प्राचीन होत्या. इथं प्राचीनतेच्या अहमअहमिकेचा मुद्दा नसून सद्यस्थितीतील उपयुक्ततेचा आहे.
आपल्याकडे वास्तूशास्त्र हे एवढं प्राचीन असून ही अचानक या आठ-दहा वर्षात कसं काय उदयास आलं? त्या अगोदर त्याचा बोलबाला का नव्हता? नवीन मार्केटिंग मॅनेजमेंटने वस्तुच्या मार्केटिंग चा केवळ अभ्यास न करता ती वापरणाऱ्या ग्राहकाची संस्कृती, मानसिकता, समाजव्यवस्था अशा अनेक घटकांचा अभ्यास करुन परंपरागत मार्केटिंग न करता आधुनिक तंत्रप्रणाली वापरण्यास सुरवात केली. कोंदट वास्तूत मन प्रसन्न रहाणार नाही हे सांगायला कोणत्याही वास्तू तज्ज्ञाची गरज नाही. मोकळी हवा, स्वच्छ प्रकाश या गोष्टी मनाच्या प्रसन्नतेत भर टाकतात. वास्तूरचनेचा तुमच्या मनोव्यापाराशी संबंध आहे हे एकदा सिद्ध झाले की पुढे शुभाशुभत्व, यशापयश, आरोग्य, उत्कर्ष वगैरे गोष्टींशी जोडला गेलेला संबंध हा मान्य करण्यास अडचण येत नाही. आपल्या अपयशात,संकटात वास्तूचा काही संबंध तर नाही ना? वास्तूत योग्य ते अनुरुप बदल करुन जर आपल्या अडचणी दूर होत असतील तर करुन बघायला काय हरकत आहे ही मानसिकता हेच वास्तुशास्त्राचे मोठे यश. शिवाय त्याला आता समाजात प्रतिष्ठाही मिळू लागली आहे. पूर्वी दारु पिणाऱ्या माणसाला तो कर्तृत्ववान असला तरी समाजात प्रतिष्ठा नसे. आता त्याच्या दारु पिण्यलाही प्रतिष्ठा, ग्लॅमर मिळाले आहे. वास्तूशास्त्राचेही असेच झाले आहे. उच्चशिक्षित व नवश्रीमंत वर्गाला आपला वास्तूशास्त्रावरचा विश्वास ही अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हटल्यास त्याला ते कसे आवडेल? त्यामुळे वास्तूशास्त्राला प्राचीनतेची, वास्तूसौंदर्यशास्त्राची, वैज्ञानिक परिभाषेची, प्रयोगशीलतेची, अध्यात्माची, संस्कृतीची, समाजमान्यतेची, जोड दिली. सुशिक्षित नवश्रीमंत वर्गाला वास्तूशास्त्र हे अदृष्टाच्या भीतीचा बागूलबुवा करुन स्वीकारायला लावायच्या ऐवजी जर त्याला "ग्लॅमर" दिलं तर त्याला ही "भीती "पण "एन्जॉय" करता येईल. वास्तूशास्त्र हे प्रतिकूल परिस्थितीत वापरावे असे थोडेच आहे. प्रतिकूल परिस्थिती येऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून ही वापरता येते.त्यातूनही वास्तूत अनुरुप बदल करुन ही जर अनुकूल बदल झाला नाही तर ते वास्तूशास्त्राचे अपयश नसून तो तुमच्या पूर्वसंचिताचा भाग आहे हे मानायला आपली तयारी होते.

फेंग शुईचा बोलबाला कशासाठी?
एखादा धार्मिक विधी जर शास्त्रवत करायचा झाल्यास त्यात सहसामुग्री ते नियम पालन यात अनेक व्यावहारिक अडचणी यायच्या. खेडेगावात ग्रामजोशी पूजा घालताना रेशीम वस्त्र, अत्तर, चंदन, बदाम अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्याकडे करु लागला तर कसे जमायचे? कारभारणीला जर मम, आत्मना, स्मृतीश्रुती, पुरोणोक्त, फलप्राप्त्यर्थम् असे जर म्हणायला सांगितले तर ते परिस्थितीशी कसे बर सुसंगत होईल? मग ''काका! घ्या चालतं करुन!`` साहजिकच त्यावर तोडगे निघाले. सुपारी कारभारनीचं काम करु लागली. धूतलेलं कापडं पीतांबराच काम करू लागला. खारीक खोबर चालायला लागलं. असे धूप दीप नैवेद्यांना विविध पर्याय निघाले. कायद्यात जर "पळवाटा " सापडतात तर धार्मिक विधीत का बरं "तोडगे "निघू नये? कालपरत्वे तोडगेच अधिक सामर्थ्यशाली व्हायला लागले. वास्तूशास्त्रानुसार बदल करण्यासाठी तोडफोड करावी लागण्या ऐवजी जर तोडगे निघाले तर कुणाला नको आहेत? फेंगशुईने नेमके हेच केलं.दक्षिणाभिमुख घराची धास्ती अजिबात नको! फेंग शुई मध्ये दक्षिण दिशा ही चक्क शुभ आहे.ती मानमर्यादा व प्रतिष्ठा वाढविणारी आहे. आग्नेय दिशा ही भारतीय वास्तूशास्त्रापमाणे अग्निची आहे तर फेंग शुई प्रमाणे ती संपत्तीची असून लाकूड या तत्वाची आहे.त्यामुळे फेंग शुई प्रमाणे तोडगे केल्यास ते भारतीय वास्तूशास्त्राच्या नेमके विरोधात जातात. काही तोडग्यांमध्ये मात्र समान धागे आहेत. उदाहराणार्थ घोडयाचा नाल प्रवेशद्धाराजवळ लावणे, फुटका आरसा न वापरणे, केरसुनी कोपऱ्यात न दिसेल अशी ठेवणे वगैरे वगैरे. फेंग शुई मध्ये नीटनेटकेपणा, स्वच्छता, सुशोभीकरण, शांतता यांना फार महत्व आहे. घरात लग्न जुळण्यात अडचणी येत असतील तर चिनी बदकाची जोडी, डबल हॅपीनेस सिम्बॉल, फिनिक्स पक्षाची जोडी यांची चित्रे व चित्रवस्तु घरात ठेवा. वंशवृद्धी साठी ड्रॅगन आणि फिनिक्स यांच एकत्रित चित्र, मुले अंगावर खेळवणारा हसरा बुद्ध यांची चित्रकृती घरात ठेवा. असे अनेक छोटे छोटे तोडगे फेंग शुई मध्ये आहेत. यातील चित्र वस्तुंच्या किमती ही २०० ते ५०० रूपयांपर्यंत असून त्या बाजारात सहज उपलब्ध आहेत. वास्तू शास्त्रानुसार वास्तू शास्त्रशुद्ध करुन घेण्यासाठी मूलभूत बांधकामात बदल करावे लागू शकतात. तर फेंग शुई मध्ये वस्तुंची रचना ही योग्य दिशेला करुन चांगल्या वाईट उर्जेचे संतुलन केले जाते. अडचणीत आलेल्या माणसाला तोडगे करणे हेच जर फार अडचणीचे असेल तर तो करणार नाही. जे व्हायचं ते होईल अशी 'रिस्क' घ्यायला नाईलाजाने तो तयार होतो. पण त्याला नुकसानाच्या मानाने तुलनेने कमी खर्चाचे तोडगे जर उपलब्ध करुन दिले तर तो 'प्रयत्नांचा भाग` म्हणून करण्यास प्रवृत्त होतो. फेग शुई मध्ये 'अर्थ लक` व 'हेवन लक` अशी संकल्पना आहे. हेवन लक म्हणजे तुमचे भाग्यसंचित. हे घेऊन जे लोक आलेले असतात त्यांचा गाडा सुरळीत चाललेला असतो. पण ज्यांचं तसं नसतं त्यांना अर्थ लक म्हणजे वास्तूद्वारे प्राप्त झालेले भाग्य. हे बदलणं आपल्या कक्षेत बसतं. फेंग शुई म्हणजे ते भाग्य अनुकूल करुन घेण्याचा प्रयत्न हा पर्याय रहातो. ही गाजराची पुंगी असते. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. माणसाला विविधता हवी असते. ती तो प्रयत्नांमध्ये पण शोधतो. क्रिकेटला जी लोकप्रियता मिळाली त्यात ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी ही विविधता उपयोगाला आली. पाच दिवसांचे कसोटी सामने ग्लॅमर ची झालर असली तरी लोकांना कंटाळवाणे वाटू लागले होते. मग ही कोंडी फुटली आणि वन डे सामने, डे-नाईट सामने आले. तसे भारतीय वास्तू शास्त्र हे लोकांना कंटाळवाणे व महागडे वाटू लागले होते. काहीतरी शॉर्ट कट पाहिजे होता. फेंग शुईने ती कोंडी फोडली.
भारतीय वास्तू शास्त्र ही काही बदल करुन लोकांच्या समोर वास्तुज्योतिषाच्या रुपात पुढे आले. एखादी वास्तू सर्वांसाठी कशी शुभ असेल? त्या व्यक्तिचे पत्रिकेत जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर त्याने कितीही वास्तूशास्त्रानुसार बांधकाम केले तरी वास्तुसौख्य कसे मिळेल? आडातच जर नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे वास्तुज्योतिषी पुढे आले आणि म्हणू लागले की आम्ही लोकांना विनाकारण खर्चात पाडत नाही. आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो आणि ज्योतिषही जाणतो. आम्ही तोडफोड न करावयाला लावता योग्य ते तोडगे सुचवू भारतीय वास्तूशास्त्र काही भोंदू वास्तूशास्त्रींमुळे बदनाम झाले आहे. ज्योतिष आणि वास्तूशास्त्र हे स्टेशनरी व कटलरी, किराणा व भुसार, एसटीडी आयएसडी व झेरॉक्स, शेती व कुक्कुटपालन यासारखे एकमेकांना पूरक असे व्यवहार्य व्यवसाय आहेत. त्यामुळे ज्योतिषी कम फेंग शुई तज्ज्ञ हे आपल्याला दिसतात.
जागतिकीकरणाच्या लाटेवर आरुढ होऊन फेंग शुई भारतात आले तसे इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथं ही फोफावले रेस्टॉरंट, बॅंका, व्यापारी संकुल या ठिकाणचे ही फेंग शुई करण झाले. फेंग शुईच्या भरपूर वेबसाईट नेटवर आहेत. शिकागोला फेंग शुईच प्रशिक्षण देणारी संस्था आहे. त्यांच्या सेमीनार च्या फी ३०० डॉलर पासून ९०० डॉलरपर्यंत आहेत. भोंदू फेंग शुई तज्ज्ञांपासून सावध रहा असा जनहितार्थ इशारा देणाऱ्या जाहिराती आहेत. अर्थात भोंदू कुठला व खरा कुठला हे ओळखण्यासाठी आपल्याला काही किंमत मोजावी लागते. फेंग शुई विरुद्ध वास्तूशास्त्र अशीही जुगलबंदी पहायला मिळते. मागणी तसा पुरवठा या न्यायाने कुणाला वास्तूशास्त्र पाहिजे असेल तर वास्तू शास्त्र, कुणाला फेंग शुई पाहिजे असेल तर फेंग शुई असा पुरवठा करणारे कन्सलटंटही एकाच ठिकाणी भेटतात. ग्राहक देवो भव । शेवटी उद्दीष्ट तर सारखं आहे ' वास्तुसौख्य` !

पूर्व प्रसिद्धी :- 'अनुभव` सप्टेम्बर २००१

Comments

वास्तुशास्त्राचा फायदा

वास्तुशास्त्राचे प्रस्थ गेल्या ७-८ वर्षात बोकाळले आहे. वास्तुव्यवसायीकांनी (सर्वात मोठा वर्ग Builders आणि Architects) याचे (पुण्यात; बाकीच्या गावांचे माहीत नाही) कटाक्षाने पालन करायला साधारण पणे गेल्या ५-६ वर्षात सुरुवात केली (उदा. दक्षीणमुखी घर). त्यामुळे जर वास्तुशास्त्रीय त्रुटी असलेले एखादे घर जर घरमालक/एजंट/बिल्डर फक्त ४-५ वर्ष जुने आहे असे सांगु लागला तर तो खोटं बोलतो आहे असं समजण्यास पुष्कळ वाव आहे.

पुण्यातील वास्तु ज्योतिष- प्रतिक्रिया

पुण्यातील वास्तुज्योतिषा बद्दल पुण्यातीलच ज्येष्ठ ज्योतिशी व दा. भट यांची प्रतिक्रिया बघा
http://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_18.html थोडे कष्ट पडतील मोठे करुन वाचावे लागेल. ब्लॉगरच्या कृपेने.
प्रकाश घाटपांडे

लेख आवडला.

फेंग शुईच्या फ्याडाबद्दलची माहिती आवडली.

वास्तुशास्त्राचे वेड इतके पराकोटीचे आहे की घराची दिशा सोडा पण बेडरूम, बाथरूम, मोरी आणि संडास कोणत्या दिशांना असावेत याबद्दलही दावे केले जातात.

असो, तर अशा पद्धतीचे वेड बाळगणार्‍या आणि घरातील प्रत्येक खोली जागेवर नसणार्‍यांना आता फेंग शुई भेटवस्तू द्यायला हवी. तेवढाच भेट काय द्यावी हा प्रश्न सुटला. ;-) ह. घ्या.

अवांतरः

वास्तुशास्त्र आणि फेंगशुई हा प्रकार भूत पळवणे या गोष्टीसारखा वाटला. म्हणजे घरात देवाचा फोटो, मूर्ती असली की भूत येत नाही, पण मग ते भूत ख्रिश्चनाचे असेल तर? किंवा हॉलिवूडपटात क्रॉस दाखवून भुताला पळवण्याचे प्रकार केले जातात पण ते भूत हिंदूचे असले तर? असे प्रश्न हमखास पडतात. यालाही काही उपाय असतात का?

सर्वेपिसुखिनः संतु

पर्याय १-
>(शेवटी ज्यानेत्याने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे; परधर्मो भयावहः, कसे?)

(म्हणजे ज्याला वास्तुशास्त्र पाहिजे त्याला वास्तुशास्त्र, ज्याला फेंगशुई पाहिजे त्याला फेंगशुई प्रत्येकाने आपापल्या शास्त्राप्रमाणे वागावे . कसें?)
पर्याय २-

(शेवटी सर्वदेवनमस्कारा: केशवं प्रति गच्छति, हेच खरे!**)

(कुठलही शास्त्र असो ईप्सित काय तर वास्तुसौख्य, हेच खरे!**)

प्रकाश घाटपांडे

 
^ वर