स्वाध्यायींचा 'मनुष्य गौरव दिन'

पांडुरंगशास्त्री आठवले.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही. कधी तरी 'जय-योगेश्वर' म्हणुन कोणी तरी स्वाध्यायी आपल्याला भेटलाच असेल. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते आणि तत्वज्ञ अशी ज्यांची ओळख ते पांडुरंग शास्त्री आठवले यांना . रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, गांधी पुरस्कार, टिळक पुरस्कार, पद्मभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी परिवार जगभर मनुष्य गौरवदिन म्हणून साजरा करतात. त्यांच्या कार्याची धावती ओळख करुन देण्याचा हा एक प्रयत्न.

पांडुरंग शास्त्री आठवलेंसारखी माणसे समाजाचे नुसते भुषण नसतात त्यांच्या सारख्यांच्या कार्यामुळे समाजाला एक आगळा अर्थ प्राप्त होतो. त्यांच्यामुळेच समाजात आशेचा किरण दिसतो, आणि म्हणुनच स्वाध्यायाची ध्वजा लाखो स्वाध्यायी परिवार देश-विदेशात मिरवतांना दिसतात.

पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० ला रोहे या कोकणातील गावी झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी 'मनुष्य गौरव दिन' म्हणुन साजरा करतात. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृतच्या व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्रजी साहित्याचा अभ्यास पांडूरंग शास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतेल प्रमुख लेखकांचे, प्रसिद्ध ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे,स्मृती, पुराणे यावर चिंतन केले.

श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबा मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worshipa & way of thinaking याचा विचार सतत दिला. त्यांचे तेजस्वी विचार ऐकण्यासाठी डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते, व्यापारी, मालक, मजूर, कारागीर, कलाकार, कर्मचारी, कोट्याधीश, विद्यार्थी शिक्षक, समाजसेवक, राजकारणी, अर्थतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विद्वान, अज्ञानी, तरुण, वृद्ध , स्त्रिया, पुरुष आपापले प्रापंचीक झगे बाजूला ठेवून मांडीला-मांडी लावून भावपूर्ण अभिवादन करुन एकमेकांना भेटत असतात.

'स्वाध्याय' हा पंथ नाही, पक्ष नाही, गट नाही, संप्रदाय नाही किंवा धर्म नाही. 'स्वाध्याय' ही एक संस्थादेखील नाही.

मग स्वाध्याय आहे तरी आहे काय ?

स्वाध्याय' ही एक प्रवृत्ती आहे; चळवळ किंवा आंदोलन नाही. वृत्तीला मुख्य श्रेष्ठ बनवते आणि मनुष्याला श्रेष्ठाचा भगवंताचा बनवते, तिचे नाव प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे प्रभूचे काम करण्याची प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे धर्म व संस्कृती समजावणारा खरा दृष्टीकोण.

'स्वाध्याय' म्हणजे समजूतदारपणा. स्वाध्याय म्हणजे विवेक. स्वाध्याय म्हणजे ध्येय-आदरनिष्ठा. स्वाध्याय म्हणजे जीवन निष्ठा. स्वाध्याय म्हणजे कर्तव्यपरायणता. स्वाध्याय म्हणजे प्रभुप्रेम . स्वाध्याय म्हणजे 'स्व' चा अभ्यास 'स्व' म्हणजे शरिरात असलेले चैतन्यतत्त्व, त्याला चिकटलेला अहम व इच्छा. 'स्वतःचा 'स्व' ओळखणे, दुस-याच्या 'स्व' बद्दल आदर बाळगणे आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे 'स्वाध्याय'

कोणत्याही प्रक्रारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता स्वाध्यायाचे कार्य चालते. स्वाध्यायाच्या कार्यासाठी पांडुरंगशास्त्रींनी

१) ऐकणे २) भेटणे ३) विचार करणे आणि ४) सोडणे या चतु:सूत्रीची बैठक तयार केली. यच्चयावत मानवमात्राचा आत्मविकास साधण्याचा ध्येयातून स्वाध्याची निर्मिती झाली आहे. जीवनातील श्रेष्ठतम संबंध जो प्रभू-प्रेम त्याची प्राप्ती करण्याचे ध्येय समोर ठेवून स्वाध्याची पायाभरणी केली. आपल्या प्रवचनाद्वारे त्यांनी एका विचारसरणीचा श्रोतावर्ग तयार केला. तो श्रोतावर्ग जाणतो की साधुत्वाची निर्मिती झाल्याशिवाय आत्मविकास साधणार नाही. ' वसुधैव कुटुंबक' ची वृत्तीची जोपासणा करण्याचा प्रयत्न त्यांचा विचार करतो. कोणत्याही लाभाशिवाय आठवड्यातून एकदा भेटणे.विकासाच्या बाबतीत जे काही ऐकायचे असेल त्याचा विचार करायचा. स्वाध्यायात बसल्यावर व्यवहारी वृत्ती, स्थिती, अधिकार, स्थान विसरुन जायचे त्यामुळे सर्व एका पित्याची लेकरे आहोत ही भावना वाढीस लागते.

स्वाध्याय करुन काय फायदा काय ? असा प्रश्न विचारला जाणे शक्य आहे.

स्वाध्यायाच्या दिव्य दृष्टीकोणातून क्षणभंगूर नश्वर असा कोणताही फायदा स्वाध्यायीला नको असतो. स्वाध्याने सर्वांना आशा, स्फूर्ती, व धैर्य मिळते. स्वतःचा जीवन विकास होईलच असा दृढ आशावाद निर्माण होत. ' सुखदु:खे समे कृत्वा...'' या गीता मंत्राद्वारे स्वाध्यायींना सतत स्फुर्ती मिळते. 'केलेले फुकट जात नाही ' हा दृढ विश्वास असल्यामुळे त्यांचे अखंड धैर्य अधिकच वाढते.

स्वाध्याय काय करतो; १)स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीत आत्मगौरव निर्माण करतो. २) स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीला कृतीशील बनवतो. ३) स्वाध्याय मानवा-मानवातील भेदभाव दूर करतो. जात, वर्ण, संप्रदाय किंवा पंथ यांना महत्त्व न देता, सर्व एकाच पित्याची लेकरे आहेत आणि आपल्या रक्ताच्या संबधापेक्षा उच्च असा रक्त बनवणराचा संबंध आहे याचा अनुभव आणून देतो जगात जन्मलेली कोणतीही व्यक्ती हीन नाही, अस्पृश्य नाही् हे समजावते. ४) स्वाध्याय माणसामधे कार्यात्सोव वाढवितो. स्वाध्यायी माणूस एकांताता चित्त एकाग्र करुन भक्तीद्वारे आंतरिक विकास साधतो आणि समूहात पिरुन कर्मयोग करुन बहिर्भक्तिद्वारे स्वतःचा जीवन विकास साधतो. ५) स्वाध्याय भक्तीचे खरे ज्ञान देते.भक्ती ही केवळ कृती नाही तर ती एक वृत्ती आहे. याची जाणीव स्वाध्यायाने येते. ६) स्वाध्याय ऐक्य भावना दृढ करतो, सर्व स्वाध्यायी एकाच परिवारातील समजतो आमचे एक दैवी कुटूंब आहे.

त्याचबरोबर स्वाध्यायाद्वारे येणारी गुण-संपत्ती कोणती. १) कृतज्ञता: कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय केलेल्या कामाची प्रेमाची कदर करणे म्हणजे व त्यासाठी काही तरी करीत राहण्याची वृती म्हणजे कृतज्ञता. भगवंताबद्दल, संस्कृतीबद्दल, गुरुबद्दल, आई-वडिलांबद्दल, कुटूंब, समाज आणि राष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मानवाचे कर्तव्य आहे.

२) अस्मिता : मी आहे याचे भान असले पाहिजे. मी करु शकतो,बनू शकतो, बनवू शकतो, बदलवू शकतो, उभे करु शकतो,प्राप्त करु शकतो, यावृत्तीचे भान म्हणजे अस्मिता. मी मोठा आहे, तसाच दुसराही लहान नाही. तुच्छ नाही याचे नाव अस्मिता.

३)तेजिस्विता: जो बापूडा नाही, दीन बनत नाही, लाचारी करीत नाही आणि बिचारा राहात नाही तो खरा तेजस्वी.
४)भावपूर्णता: मानवजीवनाचा दोन तृतीयांश भाग भावाने भरले आहे. एक तृतीयांश भाग भोगाचा आहे. 'भावपूर्णता' हे विकसित मानवाचे द्योतक आहे. आपले भावजीव समृद्ध करणे आणि दुस-याचे भावजीवन पुष्ट करणे हे भगवंताचे कार्य आहे.

५) समर्पण : सुगंधी बनलेले जीवन प्रभुचरणी समर्पण करणे.

स्वाध्यायाचे फलीत म्हणजे स्वयंशासित , प्रभुप्रेमी, आत्मश्रद्धावान, पुरुषार्थप्रिय, शास्त्रविचार जाणणारा, संस्कृतीप्रेमी, जीवन लाभलेला समाज स्वाध्यायींना तयार करायचा आहे. जेथे कृतीपेक्षा वृत्तीला, वस्तूपेक्षा विचाराला, भोगापेक्षा भावाला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, व्यक्तीपेक्षा संघाला, सभ्यतेपेक्षा संस्कृतीला, परिणामापेक्षा प्रयत्नाला, शक्तीपेक्षा सत्त्वाला. तर्कापेक्षा तत्त्वाला, आणि धनापेक्षा धर्माला प्रतिष्ठा असेल असा समाज स्वाध्यायींना बनवायचा आहे. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीत राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमान आशेचा किरण् आहेत'' आयुष्यच बदलून गेले असे सांगणारे अगदी कोळी,माळी,अदिवासी,उच्चविद्याविभुषीत, अशिक्षीत, कितीतरी विविध जातीजमातींची माणसे बंधुभावाने या परिवारात दिसतील, ते या परिवाराचे मोठे यश मानले पाहिजे.

स्वाध्यायी परिवाराचे विविध प्रयोग आहेत. तत्त्वज्ञान विद्यापीठातून (ठाणे) पारंपारिक शिक्षणाबरोबर संस्कृती, वेदांचा अभ्यास याचे शिक्षण इथे दिले जाते. मत्स्यगंधा प्रयोग, योगेश्वर कृषी, अमृतालयम, भक्तीफेरी, बालसंस्कार केंद्र, युवा केंद्र, भगिणी केंद्र, प्रवचन केंद्र, अशा विविध प्रयोगांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे कार्य चालते. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २००३ मधे वयाच्या ८४ वर्षी निधन झाल्यानंतर स्वाध्यायींचे कार्य (मानस कन्या ) धनश्री तळवळकर (दीदी) स्वाध्यायींबरोबर अहोरात्र पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचाराला,कार्याला घरा-घरात घेऊन जात आहे, आणि त्यांच्या कार्याला वैश्विक बनवत आहेत. त्यांच्या कार्याला स्वाध्यायी प्रेमी म्हणून आम्हीही वंदन करतो.

संदर्भ : १. एष पन्था एतत्कर्म : पृ. क्र. ६ प्रकाशक : सद्विचार दर्शन निर्मल निकेतन, २ डॉ. भाजेकर लेन, मुंबई.
(पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनावरुन संपादित केलेली मराठी भाषेत पन्नास किंवा अधिक पुस्तके आहेत.)

संदर्भ २. शासनपुरस्कृत मनुवादी पांडुरंगशास्त्री आठवले : पृ.क्र. ३.शेषराव मोरे, सुगावा प्रकाशन, ५६२ सदाशिव पेठ, चित्रशाळा बिल्डिंग पुणे.
३)पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारीत सुंदर कादंबरी : देह झाला चंदनाचा : लेखक राजेंद्र खेर, विहंग प्रकाशन, पुणे.
४) लोकसत्तात त्यांच्या कार्याविषयीचा एक सुंदर लेख 'तव चाहा परिणाम होगा दादाजी '

स्वाध्याय विचारांवर टीका करणारी पुस्तके ( टीकेसाठी टीका अशी पुस्तके आहेत, तरी वाचकांनी वाचायला हवी )
१) विचार कलह : शेषराव मोरे, संगत प्रकाशन, नांदेड
२) शासनपुरस्कृत मनुवादी पांडुरंगशास्त्री आठवले, शेषराव मोरे.

Comments

स्वागत.

प्राध्यापक साहेबांची शैली आवडली. सर्वसाधरणपणे एकच बाजू मांडण्याचा प्रघात असतो. प्रा. साहेबांनी विरोधी पुस्तकाचे संदर्भ जोडून खरा साध्यायी प्रत्येक गोष्टीकडे साध्याय म्हणूनच कसा पाहत असतो याचा वस्तुपाठच दिला आहे.

आपला समाज इतका सुस्त आहे की अनेक महामानव येतात आणि जातात, समाज आहे तेथेच राहतो.

हिंदु समाजाने अश्या अनेक नररत्नांना जन्म दिला आणि अश्या अनेक महामानवांनी आपापल्या परीने खरा हिंदु धर्म विशद करण्याचा यथायोग्य प्रयत्न केला.

मनुष्यगौरव दिनाबद्दल शास्त्रींजीना आमचा प्रणाम.

हमम...

पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही.

तुम्ही नीट शोधले नाही असो.

कधी तरी 'जय-योगेश्वर' म्हणुन कोणी तरी स्वाध्यायी आपल्याला भेटलाच असेल.

नाही बुवा.

सध्याच्या इतर संत माहात्म्यांपेक्षा यांचे वेगळेपण काय आहे?

कुजकट

मला वाटते तसे नसेलही,
पण हा प्रतिसाद मला कुजकट वाटतो आहे.
उद्या फ्रांसिस दिब्रिटो वर लेख आल्यावर हेच लोक गोडवे गायला कमी करणार नाहीत. तो कसा जगप्रसिद्ध आहे हे ओरडत फिरतील.
किंवा सुवार्ता कसे चांगले मासिक आहे हे ओरडून सांगायला कमी करणार नाहीत.

आपला
(धर्मांतर विरोधाची कावीळ झालेला)
गुंडोपंत

हमम...

सदर परिवाराविषयी मला विशेष माहिती नाही त्यामुळे यांचे वेगळेपण जाणून घेण्याच्या इच्छेने वरील प्रश्न विचारला आहे. कदाचित 'जय योगेश्वर' म्हणणारे कोणी न भेटल्याने असेल! लेखात दिलेले मुद्दे श्री श्री रविशंकर, सत्य साई बाबा, (काही दिवसांपूर्वीपर्यंत तरी) आसाराम बापू इ. सर्व वर्तमानकालीन बाबालोकांना लागू होतील (म्हणजे त्यांचे भक्त तसे म्हणतील) त्यामुळे सदर महाराजांचे वेगळेपण काही आहे का असे विचारण्यात काही गैर नाही. तुम्हाला उत्तर द्यायचे नसेल किंवा तसा विशेष काही फरक नसेल तर राहू दे.

अवांतर - सुवार्ता मासिक कोणाचे आहे? आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे?

स्वाध्याय

फारा वर्षांपूर्वी गोव्यातील अगदी लहान खेड्यांत या स्वाध्यायींबरोबर जायची संधी मिळाली होती. त्या लहान खेडेगावात दोन दिवस राहणेही झाले होते. तेथील खेळीमेळीचे, आपुलकीचे, कोणताही बडेजाव, भेदभाव न राखता बंधुभावाचे वातावरण अतिशय प्रसन्न करणारे होते. लोक अशाप्रकारे एकत्र येऊन आपला विकास साधत असतील (आणि तेथील वातावरण पाहून माझी हीच धारणा झाली. ) तर ते स्पृहणीय आहे. आठवले यांनी आपल्या हयातीत उत्तम कार्य केले असे वाटते.

तसेच, येथे पांडुरंगशास्री आठवले यांचे फुलांच्या आसनांवर विराजमान होताना, एखाद्या देवासारखी बडदास्त ठेवलेले फोटो बर्‍यापैकी खटकले होते. परंतु ही भक्तांची न टाळता येण्यासारखी श्रद्धा असण्याची शक्यता आहे.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचे भारतीय संस्कृतीबाबतचे सर्वच विचार मला पटतात असे नाही पण ती वाचनीय होती आणि उद्बोधकही. अशी बरीच पुस्तके मी खरेदी केली होती. सर्व भारतात सुखरुप आहेत. ;-)

श्री. पांडुरंगशास्त्र्यांसारखेच इतर पूजनीय

बिरुटे सर,
सुरेख लेख. आपण वर्तमान काळातल्या इतर पूजनीय व्यक्तींचा व त्यांच्या काऱ्याचा असाच परिचय करून दिला तर
नक्कीच सर्वांना आवडेल.
शरद

परिचय

आपण वर्तमान काळातल्या इतर पूजनीय व्यक्तींचा व त्यांच्या काऱ्याचा असाच परिचय करून दिला तर
नक्कीच सर्वांना आवडेल.

आजच्या काळात प्रमोदराव आणि घाटपांडेसाहेब यांनी करून दिलेल्या परिचयाची अधिक गरज आहे असे मला वाटते.

----

लेख आवडला.

पांडुरंग शास्त्री आणि त्यांच्या कामाची उत्तम प्रकारे ओळख करून दिली आहे. लेख प्रेरणादायक वाटला.

लेख आवडला...

लेख आवडला.

पांडूरंगशास्त्री यांनी गीतेचे सार म्हणून तयार केलेले एक वाक्य लक्षात आहे, आत्मसात करण्यासारखे आहे...(आठवणीवर आधारीत... "माझ्या हिंदी" बद्दल् क्षमस्व ;) )

"किये बीना कुछ मिलता नही, मुफ्त मे लुंगा नही |
किया हुवा व्यर्थ जाता नही, कभी निराश बनुंगा नही |
कार्य करने की शक्ती तुझमे है, लघूग्रंथी रखुंगा नही |
कार्य करता जा, पुकारता जा, मदद तैय्यार है.... विश्वास गवाउंगा नही |

छान

माझा स्वाध्यायींशी पहिला परिचय झाला तो एका मित्राच्या घरात. ९-१०वीत असताना. तो नेहेमी बाहेर निघताना एक मंत्र पुटपुटत असे. मी काय बोलतोस असे विचारल्यावर

विवादे विशादे प्रमादे प्रवासे
जलेचानले पर्वते शत्रुमध्ये
अरेण्ये शरण्ये सदा मांप्रवादी
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेकां भवामि

ह्या ओळी सांगितल्या.. मला फार आवडल्या.. म्हटलं कुठे शिकलास? तो म्हणाला "स्वाध्यायाला जातो ना तिथे.. "
त्याच्याबरोबर मी तिथे गेलो पण तिथे (त्या केंद्रात असेल कल्पना नाहि)पूर्णवेळ पोथ्यापठणच चालू असे.. या श्लोकासारखेच सुंदर श्लोक असत पण माझा पिंड हातात एखादी पुस्तिका घेऊन श्लोक घोकण्याकडे नसल्याने मी तिथे जाणे सोडले :).. मात्र रविवारी दादांच्या विचारांवर कोणीतरी बोलायचे ते ऐकण्यास मात्र मी जायचो.. त्यांचे बरेचसे विचार हे आचारात आणण्यायोग्य वाटले.. त्यामुळे त्यांची काहि पुस्तके वाचली .. बरेचसे पटले.. जे नाहि पटले ते सोडून दिले.. :)
अजूनही घरातून बाहेर पडताना हा श्लोक आठवतो.. मी काहि स्वाध्यायी नाहि.. पण स्वाध्याय हा प्रयोग आवडला
महाराष्ट्रातील आद्य समाजसेवकांमधे पांडुरंग शास्त्री आठवले यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाहि हे नक्की
प्रा. डॉ. ,
मनुष्य गौरवदिनानिमित्त ह्या वाचनीय मेजवानीबद्दल आभार

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

स्वाध्याय परिवारात सद्या काय सुरु आहे?

पांडुरंगशास्त्रींच्या निधनानंतर स्वाध्याय परिवारात सत्ता आणि संपत्तीवरून चाललेले वाद पाहीले की लक्षात येते की तत्व कितीही चांगली असली तरीही ती प्रत्यक्षात आचरणात आणणे किती कठीण असते. दुसरी गोष्ट अशी की एखादी सामाजिक संघटना स्थापन करणे, ती मोठी करणे आणि तिच्यातून नियमितपणे चारित्र्यवान लोक तयार करणे हे तसे खायचे काम नाही. संघटना सामाजिक असो,राजकीय असो अथवा आध्यात्मिक असो त्यांचा करभार चालवण्यासाठी पैसा लागतोच आणि हाच पैसा त्या संघटनात विष पेरत असतो. सुरुवातीला असलेले नैतिक अधिष्ठान बघता बघता अनैतिकतेच्या दिशेने वाटचाल करायला लागते.
सद्या स्वाध्याय परिवारात जे काही चाललंय ते खरे तर पांडुरंगशास्त्रींच्या हयातीतही सुरु होते पण पांशांच्या व्यक्तिमत्वापुढे इतर गोष्टी गौण असल्यामुळे अशा गोष्टी कधीच प्रकाशात आलेल्या नव्हत्या. मात्र त्यांच्या मृत्त्युपश्चात त्यांच्या मानसकन्या जेव्हा त्याच गादीवर आरुढ झाल्या तेव्हापासून हळूहळू एकेक प्रकरणं बाहेर यायला लागलेली आहेत. ह्या त्यांच्या मानसकन्येवर भाडोत्री गुंडांकरवी खून करवल्याचे आरोपही सुरु झालेत.

गुजराथी वृत्तपत्रात ह्याबाबत अतिशय सविस्तरपणे बातम्या,लेख इत्यादि येत असतात. मराठी वृत्तपत्रांनी मात्र आजपर्यंत ह्याबाबत कमालीचे आणि आश्चर्यकारक मौन बाळगलेले दिसून येते.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

दुसरी बाजू

नाण्याची ही दुसरी धक्कादायक बाजू माहित नव्हती.

----

धन्यवाद!

माहितीपूर्ण दुव्याबद्दल धन्यवाद!

सापडला

पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही.? काय सांगताय? मी शोधायला सुरु केले आणि पुढच्या क्षणालाच सापडला. माझ्या शेजारीच. तुमचे विधान अतिशयोक्ती अलंकारायुक्त वाटले. असो.
अभियांत्रिकी महाविद्यालयात एका प्राध्यापकांमुळेच माझा काहीचा संबंध आला होता. ते प्राध्यापक आता हयात नाहीत. अकालीच वारले. मला विचार व्यक्त करण्या इतपत माहिती नाही. पण मला वाटतं की लोकांनी नसते कट्टे भरवण्यापेक्षा एकदा तरी शास्त्रीजी म्हणतात त्याप्रमाणे भेटायला हवे. बाकी अब्जावधी भारतीयांमध्ये असे होणारे लोकं कमीच आणि माहिती असणे तर फारच कमी. असो, एक चांगला लेख उपक्रमावर वाचायला मिळाला.

अवांतरः बाकी येथे सुद्धा स्वाध्याय परिवारा बद्दल माहिती देणारे सुद्धा प्राध्यापकच असल्याने मला पांडुरंगशास्त्री आठवले, प्राध्यापकी पेशा आणि स्वाध्याय यांची सांगड घालताना गोंधळ उडतो आहे. प्राध्यापकांना स्वाध्याय नावात स्वारस्य असल्याने असावे का?





प्रतिसाद राखून ठेवतो

माझा धक्कादायक प्रतिसाद राखून ठेवतो आहे.
प्रकाश घाटपांडे

ट्रेलर

मग हा काय ट्रेलर आहे काय? :)





क्रमशः

हा हा! प्रतिसादातही क्रमशः :)

(क्रमशः पंथाचा वारकरी) ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

का?

माझा धक्कादायक प्रतिसाद राखून ठेवतो आहे.

असे का बरे? जर आपल्याला असलेली माहीती ही खरी असेल आणि आपल्याला तशी खात्री असेल तर ती सांगण्यात गैर काही वाटत नाही. अर्थात त्या माहीतीचे विश्लेषण निरनिराळे होवू शकते...

मी तुमच्या प्रतिसादावरची प्रतिक्रीया राखून ठेवतो आहे.

माझा धक्कादायक प्रतिसाद राखून ठेवतो आहे.
प्रकाश घाटपांडे

मी तुमच्या प्रतिसादावरची प्रतिक्रीया राखून ठेवतो आहे. ;)))

आपला
गुंडोपंत

पंत

अंमळ उशीर झाला बघा. प्रकाशरावांनी खाली प्रतिसाद दिला आहे. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

देह झाला चंदनाचा..

ह्म्म्.. सद्ध्या स्वाध्याय परिवारात् काय् चालू आहे इत्यादी माहीती मला नाही.
परंतू मी आठवल्यांचं 'देह् झाला चंदनाचा' हे आत्मचरीत्र वाचले तेव्हा मी भारावून गेले होते. अर्थात त्यात सगळ्या चांगल्याच गोष्टी असणार.
त्यासाठी तुम्ही दिलेली टिकाकारांची पुस्तकं वाचली पाहीजेत.
पण एकंदरीत त्यांनी बरीच चांगली कामं केली असं समजलं त्या पुस्तकातून.. ( मला नक्की आठवत नाही, पण सुरवातीला कोळी समजासाठी वगैरे जास्त काम केलं का त्यांनी?? मला असं वाचल्यासारखं वाटत् आहे. चु.भु.द्या.घ्या..)

आपापले जग.

आपण जेंव्हा म्हणतो की जग बदलले आहे तेंव्हा आपला संबंध फारतर १००/२०० मैलाशी आणि १००/२०० लोकांशीच आलेला असतो. ते जग बदललेले असते म्हणून आपण असे म्हणतो की जग किती बदलले आहे ना?

त्यामूळे अश्या वाक्यांचा अर्थ अश्याच पद्धतीने घ्यायला हवा.

( वरील कल्पना शंतनुराव किर्लोस्कराच्या जेट युगातील मराठी माणूस या पुस्तकातील आहे.)

माझा प्रतिसाद

स्वाध्यायी मी स्वाध्यायी । नाथाघरचा वासुदेव मी असे भजन आमच्या राममंदिरात पुण्याहून येणारे दोन स्वाध्यायी ज्य योगेश्वर असे म्हणत नमस्कार करायचे. स्वाध्याय चे प्रस्थ लोकांच्या सात्विक श्रद्धांवर उभारलेले मी पाहिले. कारण आमच्याही घरात ते होते. गावात होते.
जेव्हा स्वाध्याय परिवाराला ज्यांनी कुटुंब वाहुन घेतले होते असे प्रा. एस के जोशी व त्यांचे सुपुत्र श्री मिलिंद जोशी यांचेशी जेव्हा पुण्यात माझा संपर्क आला त्यावेळी मी त्याची दुसरी बाजु जेव्हा ऐकली त्यावेळि मी हबकलोच. कारण बिरुटे सरांप्रमाणे मला पहिली बाजुच ज्ञात होती आणी बर्‍याच वर्षात मी लक्षही दिले नव्हते. श्रद्धेतुन चार चांगली काम होत असतील बिधडल कुठं? ज्ञान प्रबोधिनीत जेव्हा मिलिंद जोशी यांचे राष्ट्रवाद अभ्यास मंडळात व्याखान ऐकले तेव्हा मी अवाक झालो. माझ्या प्रतिमेला धक्का पोचला. माझे कडे त्याचे रेकॉर्डिंग आहे.
जोशी कुटुंबीय सुद्धा पहिल्या बाजुने प्रेरीत झाल्यामुळे वाहवत गेले होते. जेव्हा दुसरी बाजु हळू हळू लक्षात आली व ते विरोध करु लागले त्यावेळी त्यांना अक्षरशः धमक्यांचे फोन आले . देव धर्म या गोष्टींना वेठीस धरुन भाबड्या श्रद्धाळू लोकांच्या जीवावर हे लोक मोठे होतात. दोन चांगल्या कामांमागे चार वाईट कामे कशी लपलेली असतात हे झापडे लावल्या मुळे त्यांना समजत नाही. त्यांनी नेटाने लढा दिला. त्यांचेकडे दुसर्‍या बाजुचे संकलनच आहे. ते मी त्यांच्या निवासी जाउन पाहिले आहे. आत्ता सर्व गोष्टी लक्षात नाहीत.
दुवा १

दुवा२
दुवा३

दुवा४
प्रमोद देवांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. गुगलून पहा दुसरी बाजु भरपुर मिळेल. एनाअराआय मर्डर केस अगोदर देखील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवला गफला, जमीनीचा गैरव्यवहार, आर्थिक भ्रष्टाचार इ... सुरुवातीपासुन आहेत.
प्रकाश घाटपांडे

अरे बापरे

हे फारच भयानक आहे. स्वाध्यायऐवजी दाऊद किंवा रमा नाईक यांच्याविषयी वाचतो आहे असे वाटले. दुव्यांबद्दल आभार.
प्रमोद देव यांनी म्हटल्याप्रमाणे मराठी वृत्तपत्रे याबाबत मौन का हा मुद्दा रोचक आहेच, पण धोकादायकही आहे. ही एक प्रकारची दिशाभूलच आहे.

----

एक प्रश्न...

दुव्यांबद्दल धन्यवाद!

फक्त एकच प्रश्न - केवळ दुवेच नाहीत तर आपण जे काही प्रत्यक्ष एकलेत त्यात पांडूरंग शास्त्रींचा संबंध आहे असे सांगितले होते, म्हणजे ते हयात असताना अथवा किमान ऍक्टीव्ह असताना झाले का त्यांच्या पश्चात अथवा ते परीवाराचे नाममात्र (आजारपण, वृद्धापकाळ आदी गोष्टींमुळे) झाल्यावर झाले आहे?

मला व्यक्तिगत कोणीच स्वाध्यायी माहीत नाही, पण जे काही आता चालले आहे त्याचे आश्चर्य वाटणार नाही, कारण त्यात परीवार रहाण्यापेक्षा सत्ताकेंद्र तयार झाले आहे. पण ते त्यांनीच म्हणजे पांडुरंगशास्त्री यांनीच केले आहे असे जर म्हणणे असलेतर आश्चर्य वाटेल कारण त्यांच्याबद्दल कायम चांगले ऐकले आहे.

पांडुरंगशास्त्री!

नेहमीच प्रत्येक माणसाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असा आजवरचा अनुभव आहे. त्याला हे तथाकथित अध्यात्मवादी लोक कसे अपवाद असणार? जीभेवर सदैव गोड्वा,चेहर्‍यावर सतत हास्य अशा अवतारात वावरणारी पण प्रत्यक्षात अतिशय धुर्त आणि कावेबाज माणसे दुसर्‍यांना चटकन आकर्षित करतात. त्यात त्यांना काही अध्यात्माबद्दलचे थोडेफार ज्ञान असले की झाले...अशा माणसाचा बाबा बनायला फारसा वेळ लागत नाही. मग राजकारणी,नेते,सुप्रसिद्ध व्यक्ती,उद्योगपती,डॉक्टर-इंजिनियर्स वगरे लोक ह्यांच्या जाळ्यात येतात. ते बाबांचा ऊदोऊदो करतात. बाबांना आश्रम स्थापन करण्यासाठी लागणारी जमीन मातीमोल भावाने मिळते किंवा कैक वेळेला ते ती जागा अनधिकृतपणे बळकावतात. सत्ताधारी राजकारणी ह्याकडे सोयिस्कर रित्या दूर्लक्ष करतात. कारण मग बाबांचा आशीर्वाद राहतो त्यांच्या पाठीशी.... त्यांच्या भक्तांच्या रुपाने...एकगठ्ठा मतदानासाठी. ह्या भक्तांबद्दल तर काही बोलायलाच नको. आत्मविश्वास गमावलेली एकजात मेंढरं आहेत ती. बाबा वाक्यम्‌ प्रमाणम्‌...असा सगळा प्रकार असतो त्यांच्याबाबतीत. सारासार विचार असणार्‍या लोकांना अशा भक्तगणात थारा मिळत नसतो.
अध्यात्माच्या बुरख्याखाली ह्या जगात जास्तीत जास्त पापे होत असतात. ह्यामध्ये कोणताही धर्म मागे नाही.
सत्य साईबाबा,आसाराम बापू किंवा पांडुरंगशास्त्री वगैरे वगैरे कुणीही बाबा लोक असोत,त्यांच्या संपत्तीची मोजदाद कुणीही करू शकणार नाही इतकी ती गडगंज आहे. लोकांना भूलवण्यासाठी वरवर लोकांची सेवा करण्यासाठी काही इस्पितळे वगैरे स्थापन केली की मग बाकी भानगडी करायला हे लोक मोकळे असतात.
जाऊ द्या! कोळसा उगाळावा तितका काळाच !

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रमोदकाका

माझेही मत प्रमोदकाकांसारखेच आहे. त्यांचा प्रतिसाद फार आवडला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ही

तरुण पिढीच्या माथी अनेकदा टिकेचीच लेबलं चिकटवली जातात. 'तरुण मुलं म्हणजे कॉलेजच्या नावावर मौजमजा करणारी, मल्टिप्लेक्स, सीसीडी, मॅकडोनाल्ड सारख्या ठिकाणी आईबापाचा पैसा ऊधळणारी. त्यांना ना समाजाशी घेणं, ना संस्कृतीशी. स्वच्छंदतेच्या नावाखाली सगळा स्वैराचार!' अशा एक ना अनेक आक्षेपांची जंत्री तरुणांच्या माथी मारली जाते. ही स्थिती पूर्णपणे नाकारता येईल, असं नाही. पण समाजात असे अनेक तरुण आहेत की जे या सगळ्याला अपवाद ठरावेत. असे हजारो नव्हे, तर लाखो तरुण पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वाध्याय परिवारात घडवले आहेत. समाजातल्या तरुणाईचा एक आश्वासक चेहरा त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसतो. पांडुरंगशास्त्री यांनी गेल्या तीन दशकांपासून तरुणांसाठी दरवषीर् गीताजयंतीनिमित्त वक्तृत्त्व स्पर्धा सुरू केल्या. गीता ही केवळ पठणासाठी नव्हे, तर जीवनशैलीत अंगीकारण्यासाठी आहे. हे पटवून देणं हा या स्पर्धांचा उद्देश. त्यानिमित्ताने तरुण गीतेचा अभ्यास करतील. तिच्या जवळ जातील. असा विचार करुन पांडुरंगशास्त्री आठवले यांनी सुरू केलेल्या या स्पर्धांना आता स्वाध्याय परिवाराच्या दीदी अर्थात धनश्री तळवलकर यांनी अत्यंत व्यापक स्वरुप दिलंय.
तरूणांसाठी युवाकेंद्र देउन आत्मविश्वास उभा केला universal format देउन एकसुत्रात बांधले
ते
कुठलीही अपेक्षा न ठेवता
कुठलीही फीस न घेता

स्वाध्याय का एक मंत्र है


लेना देना बंद है
फिरभी आनंद है

अवतार

या प्रतिसादासाठी आपला आंतरजालीय अवतार निर्माण झाला आहे का? तसे असल्यास हा ही एक चमत्कार मानावा का?
चमत्कार अशासाठी की नवीन सदस्य आल्या आल्या बाकी कुठेही न बघता सहा महिने जुना लेख शोधून काढतो काय, लगेच त्याला प्रतिसाद देतो काय. जगन्नियंत्याची करणी अगाध आहे हेच खरे.

----

प्रत्यक्ष ऐका

http://drop.io/praghat या ठिकाणी श्री मिलिंद जोशी यांचे भाषण ठेवले आहे . उचला आन ऐका. दुसरी बाजू
प्रकाश घाटपांडे

विश्वरूपदर्शन

दुव्याबद्दल धन्यवाद. भाषण ऐकल्यावर विश्वरूपदर्शन झाले.
महंमद आणि ख्रिस्त यांना ११ आणि १२ वे अवतार मानावेत (आणि तेरावा खुद्द त्यांना) हे पाशांचे मत रोचक आहे. :)
आणखी ठळक बातम्या :) :
- नोबेल विजेता कॉम्प्टन यांनी पाशांना नोकरीची (म्हणे) ऑफर दिली होती. प्रत्यक्षात या दोघांची भेटही झाली नव्हती.
- गीतेच्या आधी हिंदू धर्म नव्हता, वैदिक धर्म होता. स्वाध्याय परिवार हिंदूंसाठी नसून वैदिक धर्मासाठी आहे.
- परदेशगमन समूहाने केले तर पाप, पण एकट्याने केलेले चालते. :)))
- परिवाराअंतर्गत सुमारे १०० ट्रस्ट आहेत. यांचा कारभार खुला नाही. याअंतर्गत जो प्रचंड पैसा जमा होता त्याचे पुढे काय होते याची कुणालाच माहीती नाही.
- 'योगेश्वर श्रीकृष्ण स्वाध्याय परिवार' यातल्या योगेश्वर या नावाचा कॉपीराइट केलेला आहे. हे नाव दुसर्‍यांनी वापरल्यावर परिवाराने त्यांच्यावर केस केली होती.

----

प्रत्यक्ष ऐका

http://drop.io/praghat या ठिकाणी श्री मिलिंद जोशी यांचे भाषण ठेवले आहे . उचला आन ऐका. दुसरी बाजू
प्रकाश घाटपांडे

भाषण ऐकले

सुरुवातीचे मुद्दे मिलिंद जोशी यांचे (त्यांच्या दृष्टिकोनातूनही) पटले नाहीत.

मिलिंद जोशी तीन वेगवेगळे (मुख्य) मुद्दे मांडतात :
१. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रवर्तकांना बहुदेवक प्रथेत विलीन करणे - हा पांडुरंगशास्त्रींचा विचार
२. पांडुरंगशास्त्र्यांनी स्वत:ला योगेश्वर म्हणवुन घेणे
३. आर्थिक गैरव्यवहार

पैकी उलट्या क्रमाने :
३. आर्थिक गैरव्यवहार ठीक नाही - मान्य
२. अलौकिक नेत्यांचा लवाजमा त्यांना दैवी मानणारच. शिवाय अशा परिस्थितीत नेता काही दैवी-विभूती-पणा दाखवणार. सर्व संत-महंत अधून-मधून चमत्कार करून सिद्धी दाखवतात - ही सर्वोत्तम पद्धती आहे की नाही हे मला माहीत नाही. पण कदाचित एक चांगली मॅनेजमेंट पद्धत असू शकेल...

पैकी मुद्दा १. बद्दल श्री. जोशी बरेच बोलतात. (मला या धर्मकलहात कोण जिंकते, यात मुळीच स्वारस्य नाही - पण हिंदूंचा विजय व्हावा असा श्री मिलिंद जोशी यांचा दृष्टिकोन असल्यास हा विचार मी करतो आहे...)

दुसर्‍या धर्मातील लोकांना आपल्या धर्माचा उपप्रवाह म्हणून सांगणे, हे अनेक सफल धर्मांचे/पंथांचे धोरण राहिले आहे. आर्यांनी द्रविड देव आपलेसे केलेत आणि ग्रामीण देव (म्हणजे साती आसरा, शितळादेवी, वगैरे) आपल्या मुख्य देवांच्या लव्याजम्यात सामावून घेतले, आणि अशा प्रकारे, त्या बारीकसारीक (द्रविड धर्म बारीक-सारीक होता का?)

धर्मांचे वेगळे अस्तित्व नाहिसे केले. हा प्रश्न त्या मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मांनाही सोडवावा लागला आहे - दुसर्‍या धर्माच्या देवांचे काय करायचे. पैकी ख्रिस्ती धर्माने वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत, पण मुख्य मार्ग निकृष्ट आहे. मुख्य मार्गात एकच वैश्विक देव आहे, आणि बाकी थोतांडे आहेत. द्वितीय मार्गात अनेक देव आहेत, पण एक ज्यू-ख्रिस्ती याहवेह सोडला तर बाकी दुष्ट आहेत. तिसरा (त्यातल्या त्यात बरा, पण अप्रसिद्ध) मार्ग असा की ख्रिस्तपूर्व, आणि ख्रिस्ताबद्दल बातमी ऐकण्यापूर्वी लोक एकाच देवाची पूजा करण्यात भरकटले होते, पण ते काही मनापासून दुष्ट नव्हेत. पण ख्रिस्ताच्या प्रवचनांनंतर, आणि त्याच्या प्रवचनांबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंकडून ऐकल्यानंतर सर्व शाहाणे लोक योग्य तर्‍हेने पूजा करू लागतील.

या समस्येचे त्यातल्या त्यात बरे (धोरणात्मक विचार करता) उत्तर मुसलमानांचे आहे. की देवाने जगात सर्वत्र प्रेषित पाठवलेत, आणि सर्वत्र सर्व धर्म म्हणजे इस्लामच स्थापित केलेत. पण धर्माच्या आद्य प्रवर्तकांचे म्हणणे शिष्यांनी भ्रष्ट केले. त्यामुळे जगातील सर्व धर्म जरी पुर्वी इस्लामच असले, तरी पण आता भ्रष्ट झालेले आहेत. शेवटचा प्रेषित मुहम्मद, त्याला देवाने दिलेला संदेश अजून शुद्ध आहे... वगैरे, वगैरे. म्हणजे हिंदू, किंवा ख्रिस्ती माणसाला इस्लाम सांगायचा म्हणजे खरे तर त्यांचाच खरा मूळचा धर्म समजावून सांगायचा, वगैरे, वगैरे... (समोरचा माणूस दुष्ट असेल, तर त्याचाच मूळ धर्म त्यालाच तलवारीच्या जरबेने समजावून सांगायचा, वगैरे, वगैरे...)

म्हणजे दुसर्‍या धर्मातील महापुरुषांना (किंवा आद्य प्रवर्तकांना) आपल्या धर्मातील दुय्यम स्थान देणे, हे धोरण काही नवीन नाही, इतकेच काय, हे धोरण वेगवेगळ्या प्रसंगांत सफल झालेले आहे. मिलिंद जोशी म्हणतात, की हे एकतर्फा प्रेम आहे - पांडुरंगशास्त्रांनी मुसलमानांचा पैगंबर मानायचा, पण मुसलमानांनी कृष्ण मानायचा नाही - ही हिंदूंची हानी आहे. हे बरोबर नाही. खुद्द मुसलमानांनी बाकी धर्मांचे प्रेषित आपले दुय्यम प्रेषित मानलेत, ते त्या धर्मांशी समेट करून नव्हेत. येशूला मुसलमान प्रेषित मानतात, पण उलट ख्रिस्ती मुहम्मदाला प्रेषित मुळीच मानत नाहीत. त्यामुळे काही मुसलमानांचे धोरण एकतर्फा प्रेम नव्हे - असलेच तर एकतर्फा मगरमिठी आहे! म्हणजे मुसलमान प्रचारक ख्रिस्ती "बांधवा"ला आधी प्रेमाने, मग "नाइलाजाने" रागावून समजावू शकतो की "तुमचा येशू आम्हालाच चांगला समजला आहे. जिथे तुमचे-आमचे येशूबद्दल मतभेद आहेत, तिथे तुमचे बायबल येशूच्या नालायक शिष्यांनी भ्रष्ट केले आहे..."

दुसर्‍यांचे देव (दुय्यम म्हणून) आत्मसात् करण्याची लकब सर्वच धर्मांना दैदीप्यमान साफल्य देत नाही. बहा'ई धर्मात येशू, मुहम्मद, कृष्ण, वगैरे प्रेषित मानलेले आहेत. पण त्या धर्माला हवा तितक्या मोठ्या प्रमाणात लोकसंग्रह करता आला नाही. (त्या धर्माचा प्रवर्तक = शेवटचा प्रेषित हल्ली-हल्लीचाच एक बहा'उल्लाह नावाचा गृहस्थ होता.) तरी हा बहा'ई पंथ अगदीच फुसका नाही. वेगवेगळ्या देशांतली या धर्माची प्रचंड आणि सुरेख देवळे लोकांनी पाहिलीच असतील.

तर हे ट्राइड-अँड-टेस्टेड धोरण पांडुरंगशास्त्र्यांनी वापरायचा प्रयत्न जर केला असेल तर हिंदूधर्माचा तोटा होतो, असे काही सांगता येत नाही. कदाचित फायदा होत असेल, कदाचित तोटा होत असेल. मुसलमानांनी उलटपक्षी कृष्णाला मानले नाही, तरी त्यांच्या प्रेषिताला हरण करून आपल्या देवकात (दुय्यम स्थानावर) बसवणे, हे जर जमले तर मग पुढे कधी त्यांना सांगता येईल - "तुमचा प्रेषित तुम्हालाच समजला नाही, आम्हाला समजला आहे. आमच्या बोलण्यात आणि कुर'आनात मतभेद दिसला तर नालायक शिष्यांनी कुर'आन भ्रष्ट केले आहे... इत्यादि." (स्वाध्याय परिवाराला सांगता येईल. मला या सर्व धोरणाम्त आणि डावपेचांत केवळ सैद्धांतिक-ऐतिहासिक कुतूहल आहे.) हे धोरण यशस्वी होईलच की नाही सांगता येत नाही. पण हे धोरण हिंदूविरोधी आहे, असे श्री मिलिंद जोशी यांचे म्हणणे इतिहासाच्या उदाहरणांच्या विरुद्ध आहे.

अर्थात हे धोरण "धोरण म्हणून" राबवून चालणार नाही. मुसलमानांना जसा खरोखरच येशू दुय्यम प्रेषित आहे अशी श्रद्धा असावी लागते, तशी स्वाध्याय परिवाराला खरोखरच मुहम्मद हा दुय्यम "योगेश्वर" आहे, अशी श्रद्धा बाणावी लागेल.

थोडे अजुन काही...

मी अजून संपूर्ण भाषण शांतपणे ऐकू शकलो नाही. तेंव्हा मर्यादीत प्रतिसाद देत आहे. सर्वप्रथम मी काही स्वाध्यायपंथीय नाही, कुणा बुवा-बाबाच्या घोळक्यात मी नाही. आधी एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे विश्लेषण आणि नक्की काय असू शकते इतके नक्की विचार करू शकतो.

आता मी काही वरीष्ठ व्यक्तींकडून काही वर्षांपुर्वी ऐकलेली हकीकतः पोप जॉन पॉल जेंव्हा प्रथम भारतात येऊन गेले, त्या नंतर त्यांनी ख्रिस्ती धर्मधुरीणांना स्पष्टपणे सांगितले की (या अर्थाचे, शब्द माझे आहेत!) हे हिंदू लोकं फार चावट आहेत. बघता बघता ते ख्रिस्ताला ११ वा अवतार म्हणता येईल आणि भारतात ख्रिस्चॅनिटी आणण्याची आणि पर्यायाने त्यांच्या मानसिकतेवर राज्य करणे अवघड जाईल. तेंव्हा ख्रिश्चन धर्म जर भारतात वाढवायचा असेल तर त्याचे वरकरणी हिंदूकरण करा. आता आपण जर पाहीलेत तर त्या अर्थाने ख्रिस्तीधर्मप्रसारकांनी अनेक हिंदू चालीरीती भारतापुरत्या उचलल्या....

कृष्णाला काही मुसलमान मुस्लीमधर्माशी संबध लावताना ऐकले आहे. (दुवा मिळाल्यास सांगेन). तसेच थोड्या वेगळ्या फरकाने पण जैनांना कृष्ण हा पण एक तिर्थंकर आहे असे ऐकल्याचे आठवते.

थोडक्यात ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. आपले सध्याचे अनेक संतमहंत अत्यंत सहजतेने धर्म सांभाळायचे जाणिवेने अथवा नेणिवेने कसेही असेल पण राजकारण करतात. तसे असल्यास यात काही नवल नाही. थोडक्यात केवळ मिलींद जोशी ज्या पद्धतीने सांगतात त्यावरून ते काही अंशी का होईना आउट ऑफ कॉन्टेक्स्ट माहीती देत तर नाहीत ना असे वाटले.

आर्थिक व्यवहारांसंदर्भात पण तेचः जे काही कायद्याने जाहीर सांगायचे असते ते ते करत असले आणि बाकी माहीती देत नसले तर त्यात विशेष काही गैर मला वाटणार नाही. किंबहूना तशी अपेक्षा केवळ स्वाध्यायींकडून करणे आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून पांडूरंगशास्त्री चोर होते असे वाटावे असे परत बोलणे मात्र नक्कीच गैर वाटते. मिलींद जोशी ज्ञानप्रबोधिनीची सर्व बुके उघडून दाखवतील का? तसेच हाच मुद्दा ख्रिश्चन अथवा मुसलमान संस्थांना विचारायला गेल्यास ते उत्तर देतील का? नाही दिले तर तुम्ही त्यांना काय म्हणाल? पांडूरंगशास्त्री आणि त्यांच्या संस्थाना जर सरकारने कारणे दाखवा नोटीस वगैरे दिली असली तर गोष्ट वेगळी आहे. (तो भाग मी अजून ऐकला नाही. परीणामी येथेच थांबतो!)

बाकी एकदा चिन्मयानंदांना बॉस्टनच्या एम आय टी मधे पाहीले होते. तेंव्हा ते वयोवृद्ध झालेले असल्याने व्हिलचेयर वर होते. ते लेक्चरहॉल मधून बाहेर येताच त्यांच्या भक्त गणांनी त्यांचा हात हातात घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवलेला पाहीला... जुलमाचा रामराम माहीत होता, आशिर्वाद प्रथमच पाहीला :-) पांडुरंगशास्री खरेच स्वतःला योगेश्वर म्हणत असले तर ते चू़क आहे पण त्यांचे भक्तगण ते ही नंतरच्या काळातील उच्चभ्रू म्हणत असतील तर तो मुद्दा परत वेगळा होतो...

दुसरी बाजू

स्वाध्याय परिवारा विषयी मध्यंतरी पेपरात बरंच उलट सुलट छापून आल्याचं आठवतं.
इथं दुसर्‍या बाजूवर देखिल 'प्रकाश' टाकल्या बद्दल घाटपांडे काकांचे आभार! ह्यावर आता चर्चा प्रवर्तक डॉ.बिरुटेंचे मत ऐकायला आवडेल.

मलाही

ह्यावर आता चर्चा प्रवर्तक डॉ.बिरुटेंचे मत ऐकायला आवडेल.

मलाही आवडेल!

----

मलाही

मलाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पांडुरंगशेठ

पांडुरंगशेठ यांच्याबद्दल असेही ऐकले होते की ते स्वत:च्याच फोटोची पूजा करतात म्हणून. म्हणे त्यांच्याकडे अशी शक्ती आहे की ते स्वत:चा आत्मा थोड्या वेळापुरता बाहेर काढून फोटोत ठेवतात आणि तेवढ्या वेळात पूजा उरकून घेतात.

हाच प्रकार नाना पाटेकराने 'ब्लफमास्टर' या सिनेमातही केला आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मजा आला.

स्वतःच्याच फोटोची पूजा? मग पूजा करताना फोटोला हार देखील घालतात काय? ;-) अवघडच दिसतंय सगळं!
हे आत्मा थोड्या वेळापुरता बाहेर काढणारे पांडुरंगशास्त्री, वर्तक अशांसारख्या व्यक्तींना भेटायची खूप इच्छा आहे. हे सगळं कसं करतात याची उत्सुकता लागून राहिली आहे. पण अशी माहिती उघड लिहण्यात काय 'अर्थ'? ( येथे अर्थ शब्दाचे दोन अर्थ लक्षात घेण्यासारखे आहेत. ;-)

-सौरभ.

दक्षिणेतील देऊळ

कधीकाळी दूरदर्शनवर एका दक्षिणेतील (मला वाटते आंध्रमधील) एका स्वामी/महाराजांनी तयार केलेले देऊळ दाखवले होते. त्याच्या गाभार्‍यात कुठल्या देवदेवतेच्या मुर्तीऐवजी फक्त "आरसा" होता. कारण त्यांचे म्हणणे होते की देव तुमच्यात आहे. तसे काही विचार असू शकतात. (परत बचावात्मक म्हणून नाही, पण दुसरी बाजू म्हणून)

पण जर येथे आत्मावगैरे बाहेर काढणे चालत असेल तर बोलणेच खुंटेल :-)

जादू

एक हकीकत सत्यसाईबाबांच्या संदर्भात ऐकली होती. त्यांना पी सी सरकार भेटायला गेलेले असताना साइबाबांनी हवेत हात फिरवून त्यांना विभूती दिली. उत्तरादाखल सरकार यांनी हवेत हात फिरवून त्यांना अंगठी दिली. :)

----

त्याच संदर्भात

उत्तरादाखल सरकार यांनी हवेत हात फिरवून त्यांना अंगठी दिली. :)

जादूगाराचे नाव माहीत नाही, पण या "प्रतिसादात्मक चमत्कारा" नंतर भक्तगणांनी अथवा आतल्या माणसांनी या जादूगाराला बाहेर काढले :-)

नक्की कोणाला

या जादूगाराला बाहेर काढले :-)

म्हणजे नक्की कोणाला? सत्यसाईबाबाला की सरकाराला?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सरकॉर यांना बाहेर काढण्याची शक्यता जास्त वाटते.

भक्तगण कट्टर असतात याची प्रचीतीच अनेकदा आल्याने सरकॉर यांनाच बाहेर काढल्याची शक्यता जास्त वाटते. उलट घडले असल्यास आश्चर्य आहे.
तरी भक्तगण सत्यसाईबाबांना सोडून सत्य-पी.सी.सरकॉर यांच्या पाया पडले नाही ना! ही शक्यताही नाकारता येत नाही

अर्थातच

म्हणजे नक्की कोणाला? सत्यसाईबाबाला की सरकाराला?

सत्यश्रीसाईबाबांनी चमत्कार केला जादू नाही :-) तेंव्हा जादूगार म्हणजे सरकार अथवा जो कोणी असेल तो...

सत्यश्रीसाईबाबा आहेत तेथेच आहेत आणि सर्व सेक्यूलर - धार्मिक राजकारणी यांच्याशी भेटणे पण चालूच आहे.

+१

सत्यश्रीसाईबाबा आहेत तेथेच आहेत आणि सर्व सेक्यूलर - धार्मिक राजकारणी यांच्याशी भेटणे पण चालूच आहे.

अगदी आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम देखिल

आभार !!! समारोपाचे दोन शब्द....

पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचाराचा परिचय करुन देतांना केलेल्या साधक-बाधक चर्चेबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!

स्वाध्याय परिवारात स्वाध्यायी विचाराने प्रभावित होऊन काम करणारी समाजातील सर्वस्तरातील माणसे आहेत. त्यांच्या विचारानुसार स्वाध्याय परिवाराचे काम चालु आहे. स्वाध्याय परिवारात येणा-या माणसाचे चारित्र्य तपासलेले नसते, म्हणजेच स्वाध्यायी म्हणून वावरणा-यास त्याच्या गुणदोषासहीत स्वीकारलेले असते, पण पुढे कधीतरी याच लोकांचा इगो जागृत होतो. आणि एखाद्या कार्याला गालबोट लागू शकते, आणि लोक त्याचा कसा-कसा अर्थ काढू शकतात ते आपण काही प्रतिसादात पाहिलेच आहे. त्याच बरोबर स्वाध्यायी म्हणून येणा-याकडून कोणतीही वर्गणी, शुल्क घेतल्या जात नाही. तसेच स्वाध्याय परिवारात वावरणा-या माणसाकडून काही चूका घडत असतील असे ग्रहीत धरले तर तो विचारांचा दोष नाही, त्याच्या वृत्तीचा दोष असावा असे वाटते. म्हणुन जी काही उदाहरणे आली आहेत ती चुकीच्या माहितीवर, आणि प्रसिद्धीमाध्यमाचा दृष्टीकोणानुसार ती आपल्यासमोर येतात असेही वाटते.

स्वाध्यायाच्या पुस्तकांमधे स्वाध्याय समजून सांगतांना मला एक चांगला विचार दिसला होता की, 'भक्त म्हणजे विभक्त नाही तो' कोणाशी तरी जोडल्या जाणे. कोणाशी जोडल्या जायचे आहे. याचा विचार स्वाध्याय समजावतो. त्याच बरोबर स्वाध्यायामधे भ्रामक समजूतीवर आधारलेली, अंधश्रद्धेने भरलेली, चमत्कारात फसलेली खोटी भक्ती इथे दिसत नाही. प्रभुप्रेम समजावणारी भक्ती इथे आहे. भक्ती केवळ वृत्ती नाही. ती कृती आहे. वृत्तीने उपासनेची सुरुवात होते तर श्रवणाने कृती घडते याचे ज्ञान स्वाध्यायी समजून घेत असल्यामुळे स्वाध्यायी, पांडुरंग शास्त्री आठवलेंना योगेश्वर समजतात किंवा स्वतः ते असे समजत होते असे कोणतेही विचार स्वाध्यांच्या पुस्तकामधे दिसत नाही. तसेच ते स्वतःचीच पूजा स्वत: करतात. ते स्वतःचा आत्मा बाहेर काढतात अशी नाविण्यपूर्ण माहिती इथेच मिळाली :) स्वाध्यायी विचारामधे तसे काहीही दिसत नाही, आणि वाचायलाही मिळत नाही.

भक्तीफेरीसाठी जाणारा स्वाध्यायी स्वतःची शिदोरी घेऊन स्वखर्चाने स्वाध्यायी विचार सांगण्यासाठी जातो. त्यामुळे स्वाध्यायी विचारांच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा कोणत्याही आडमार्गे पैसे मागितल्या जात नाही. हा अनेक स्वाध्यायींचा अनुभव असावा. प्रत्यक्ष काही लोकांशी भेटण्याचा योग आलेला असल्यामुळे आणि काही प्रयोगही पाहिलेले असल्यामुळे त्यावर पुढे कधी बोलताही येईल.

अध्यात्मिक विचारासंबधी काही जेष्ठ सदस्यांनी केलेली काही सरसकट विधानांचे आश्चर्य वाटले तरी मते म्हणून त्याबद्दल आदर आहे.

असे असले तरी लेखकाचा स्वाध्याय विचार कोणावरही लादण्याचा प्रयत्न नाही. पण बुद्धीजीवी म्हणवणा-यांनी कोणताही विचार बुद्धीच्या कसोटीला घासून घेतला पाहिजे, त्याकरिताच लेखकाचा लेखनाचा प्रपंच होता. त्याबरोबर लेखाच्या निमित्ताने आम्ही उल्ल्लेख केलेल्या संदर्भ टीकेच्या पुस्तकांपुढे इथे आलेल्या टीकेच्या प्रतिक्रिया फार सौम्य आहेत असे वाटते.

एक मात्र सांगावेसे वाटते की, माणूस तत्त्वज्ञानाचे उत्कृष्ट विचार सांगू शकतो,पण त्या विचारांना साकार करुन हजारो कार्यकर्त्यांना त्याच तेजस्वी वृत्त्तीने, भक्तीभावाने कामाला लावणे, गीता आणि प्रभुचे नाव घेऊन स्वतःच्या खर्चाने गावोगाव फिरणारा माणूस घडवणे ही असामान्य गोष्ट आहे. आजच्या कराल काळात 'भक्ती ही एक सामाजिक शक्ती' आहे असा विचार सांगत समाजात आदर्श असे जीवन वाटावे इतके आयुष्यच बदलून जावे, तसेच स्वाध्याय कार्यात नव-नवीन प्रयोग पाहावयास मिळणे ही प्रथम श्रेणीच्या भारतीय तसेच पाश्चात्य तत्त्वचिंतकांना विचार करायला लावणारी गोष्ट वाटते.

जाता-जाता,

१९५४ मधे ऑक्टोंबर महिन्यात जपानमधे द्वितीय विश्वतत्वज्ञान परिषद भरली होती. अमेरिकेतल्या इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल सोसायटीच्या वतीनं त्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतातून पांडुरंगशास्त्री आठवले यांना मोठ्या सन्मानानं पाचारण करण्यात आलेले होते. त्या परिषदेत तत्त्वचिंतकांनी श्रीकृष्णाबद्दल, गीतेबद्दल, अवताराबद्दल काही आक्षेप उभे केले होते, ते सर्व आक्षेप पांडुरंगशास्त्री यांनी खोडून काढले होते. अवतारवाद, श्रीकृष्ण,गीता, यातून त्यांनी अर्थशास्त्र, मानसशास्त्र, आणि समाजशास्त्र समजावून सांगितले होते. 'भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे' यासारखे नवनवीन विचार त्यांनी मांडले होते. इतर तत्त्वचिंतकाप्रमाणेच अमेरिकेच डॉ. कॉम्टन अतिशय भारावून गेले होते. असामान्य बुद्धीमत्ता, तेजस्विता, आणि तडफदारपणा पाहून पांडुरंगशास्त्रीविषयींचा त्यांचा आदर द्विगुणित झाला होता. ते म्हणाले होते '' आपल्याबद्दल मला फार आदर वाटतो. तुमच्या प्राचीन संस्कृतीचा आधार घेऊन तुम्ही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी निश्चितच कार्य करु शकाल याविषयी मला मुळीच शंका नाही. ' इन्डवेलिंग गॉड' ही अनुभूती आहे असं मी समजत होतो. पण ते एक इन्स्ट्रूमेन्टही आहे, ही संकल्पना तुम्ही मांडलीत. ही कन्सेप्ट सांगायला तुम्ही अमिरिकेत या........ ......... पाच वर्षासाठी ! तिथे आम्ही पाहिजे ते सहाय्य तुम्हाला देऊ. तिथे तुमची सर्व व्यवस्थाहोइल. पण त्याशिवाय तुमच्या भारतातल्या अकाउन्टमधे वर्षाकाठी काही लाख रुपये जमा होतील. अमेरिकेत सर्व सुखसोयींमधे राहून तुम्ही मानवतेचं कार्य करा. ( माहिती मिळाली- देह झाला चंदनाचा- राजेंद्र खेर यांच्या पुस्तकातून )

अर्थात ती ऑफर त्यांनी धुडकावली. 'माणूस बदलला पाहिजे यासाठीच भारत हेच स्वाध्यायींचे कार्यक्षेत्र झाले. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा विचार सांगतांता लेखकाच्या लिहिण्याच्या उणीवांमु़ळे स्वाध्यायची ओळख नीटपणे करुन देता आली नसेल तर तो लेखकाचा दोष समजावा, विचारांचा, कार्याचा नव्हे, धन्यवाद !!!

पुन्हा एकदा सर्वांचे मनःपुर्वक आभार !!!

मानले

श्री बिरुटे सरांचा इतका संतुलित प्रतिसाद पाहून मी प्रभावित झालो आहे.
अनेक दिवसांनी इतका संयमीत प्रतिसाद वाचला.
दोन्ही बाजू समजून त्यातल्या विरोधी मताचा आदर ठेवून पूढे जाता येणे ही मोठी आहे.

अशा प्रकारचे विचार येण्यामध्ये स्वाध्यायाचा भाग असेल तर या विचारांमध्ये तथ्य आहे असे मानायला काय हरकत आहे?

आपला
गुंडोपंत

सरांचा प्रतिसाद

सरांचा प्रतिसाद व त्यावर गुंडोपंताची टिप्पणी विचार करण्याजोगी.

खरे स्वाध्यायी.

सहमत. प्रा. साहेबांनी खरा स्वाध्यायी, साधक आणि योगी कसा असतो याचेच खर्‍या अर्थाने चित्र प्रस्तुत केले आहे.

विरोधक आणि टिकाकार कोणाला बरे चुकले आहे. पैगंबर साहेब, ख्रिस्त, गांधीजी सारख्यांना हे भोग चुकत नाही तेथे बराचसा जनसमुदाय मागे असतो, बराच पैसा उभा राहतो तेथे असे प्रवाद निर्माण होणे हीही या प्रक्रियेचा स्वभाव समजले पाहिजे.

बिरुटे साहेबांचा हा प्रतिसाद वाचुन सात्विक आनंद झाला असे मी नमुद करतो.

 
^ वर