स्वाध्यायींचा 'मनुष्य गौरव दिन'
पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही. कधी तरी 'जय-योगेश्वर' म्हणुन कोणी तरी स्वाध्यायी आपल्याला भेटलाच असेल. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते आणि तत्वज्ञ अशी ज्यांची ओळख ते पांडुरंग शास्त्री आठवले यांना . रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, गांधी पुरस्कार, टिळक पुरस्कार, पद्मभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी परिवार जगभर मनुष्य गौरवदिन म्हणून साजरा करतात. त्यांच्या कार्याची धावती ओळख करुन देण्याचा हा एक प्रयत्न.
पांडुरंग शास्त्री आठवलेंसारखी माणसे समाजाचे नुसते भुषण नसतात त्यांच्या सारख्यांच्या कार्यामुळे समाजाला एक आगळा अर्थ प्राप्त होतो. त्यांच्यामुळेच समाजात आशेचा किरण दिसतो, आणि म्हणुनच स्वाध्यायाची ध्वजा लाखो स्वाध्यायी परिवार देश-विदेशात मिरवतांना दिसतात.
पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० ला रोहे या कोकणातील गावी झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्यायी 'मनुष्य गौरव दिन' म्हणुन साजरा करतात. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृतच्या व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्रजी साहित्याचा अभ्यास पांडूरंग शास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतेल प्रमुख लेखकांचे, प्रसिद्ध ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे,स्मृती, पुराणे यावर चिंतन केले.
श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबा मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worshipa & way of thinaking याचा विचार सतत दिला. त्यांचे तेजस्वी विचार ऐकण्यासाठी डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते, व्यापारी, मालक, मजूर, कारागीर, कलाकार, कर्मचारी, कोट्याधीश, विद्यार्थी शिक्षक, समाजसेवक, राजकारणी, अर्थतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विद्वान, अज्ञानी, तरुण, वृद्ध , स्त्रिया, पुरुष आपापले प्रापंचीक झगे बाजूला ठेवून मांडीला-मांडी लावून भावपूर्ण अभिवादन करुन एकमेकांना भेटत असतात.
'स्वाध्याय' हा पंथ नाही, पक्ष नाही, गट नाही, संप्रदाय नाही किंवा धर्म नाही. 'स्वाध्याय' ही एक संस्थादेखील नाही.
मग स्वाध्याय आहे तरी आहे काय ?
स्वाध्याय' ही एक प्रवृत्ती आहे; चळवळ किंवा आंदोलन नाही. वृत्तीला मुख्य श्रेष्ठ बनवते आणि मनुष्याला श्रेष्ठाचा भगवंताचा बनवते, तिचे नाव प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे प्रभूचे काम करण्याची प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे धर्म व संस्कृती समजावणारा खरा दृष्टीकोण.
'स्वाध्याय' म्हणजे समजूतदारपणा. स्वाध्याय म्हणजे विवेक. स्वाध्याय म्हणजे ध्येय-आदरनिष्ठा. स्वाध्याय म्हणजे जीवन निष्ठा. स्वाध्याय म्हणजे कर्तव्यपरायणता. स्वाध्याय म्हणजे प्रभुप्रेम . स्वाध्याय म्हणजे 'स्व' चा अभ्यास 'स्व' म्हणजे शरिरात असलेले चैतन्यतत्त्व, त्याला चिकटलेला अहम व इच्छा. 'स्वतःचा 'स्व' ओळखणे, दुस-याच्या 'स्व' बद्दल आदर बाळगणे आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे 'स्वाध्याय'१
कोणत्याही प्रक्रारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता स्वाध्यायाचे कार्य चालते. स्वाध्यायाच्या कार्यासाठी पांडुरंगशास्त्रींनी
१) ऐकणे २) भेटणे ३) विचार करणे आणि ४) सोडणे या चतु:सूत्रीची बैठक तयार केली. यच्चयावत मानवमात्राचा आत्मविकास साधण्याचा ध्येयातून स्वाध्याची निर्मिती झाली आहे. जीवनातील श्रेष्ठतम संबंध जो प्रभू-प्रेम त्याची प्राप्ती करण्याचे ध्येय समोर ठेवून स्वाध्याची पायाभरणी केली. आपल्या प्रवचनाद्वारे त्यांनी एका विचारसरणीचा श्रोतावर्ग तयार केला. तो श्रोतावर्ग जाणतो की साधुत्वाची निर्मिती झाल्याशिवाय आत्मविकास साधणार नाही. ' वसुधैव कुटुंबक' ची वृत्तीची जोपासणा करण्याचा प्रयत्न त्यांचा विचार करतो. कोणत्याही लाभाशिवाय आठवड्यातून एकदा भेटणे.विकासाच्या बाबतीत जे काही ऐकायचे असेल त्याचा विचार करायचा. स्वाध्यायात बसल्यावर व्यवहारी वृत्ती, स्थिती, अधिकार, स्थान विसरुन जायचे त्यामुळे सर्व एका पित्याची लेकरे आहोत ही भावना वाढीस लागते.
स्वाध्याय करुन काय फायदा काय ? असा प्रश्न विचारला जाणे शक्य आहे.
स्वाध्यायाच्या दिव्य दृष्टीकोणातून क्षणभंगूर नश्वर असा कोणताही फायदा स्वाध्यायीला नको असतो. स्वाध्याने सर्वांना आशा, स्फूर्ती, व धैर्य मिळते. स्वतःचा जीवन विकास होईलच असा दृढ आशावाद निर्माण होत. ' सुखदु:खे समे कृत्वा...'' या गीता मंत्राद्वारे स्वाध्यायींना सतत स्फुर्ती मिळते. 'केलेले फुकट जात नाही ' हा दृढ विश्वास असल्यामुळे त्यांचे अखंड धैर्य अधिकच वाढते.
स्वाध्याय काय करतो; १)स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीत आत्मगौरव निर्माण करतो. २) स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीला कृतीशील बनवतो. ३) स्वाध्याय मानवा-मानवातील भेदभाव दूर करतो. जात, वर्ण, संप्रदाय किंवा पंथ यांना महत्त्व न देता, सर्व एकाच पित्याची लेकरे आहेत आणि आपल्या रक्ताच्या संबधापेक्षा उच्च असा रक्त बनवणराचा संबंध आहे याचा अनुभव आणून देतो जगात जन्मलेली कोणतीही व्यक्ती हीन नाही, अस्पृश्य नाही् हे समजावते. ४) स्वाध्याय माणसामधे कार्यात्सोव वाढवितो. स्वाध्यायी माणूस एकांताता चित्त एकाग्र करुन भक्तीद्वारे आंतरिक विकास साधतो आणि समूहात पिरुन कर्मयोग करुन बहिर्भक्तिद्वारे स्वतःचा जीवन विकास साधतो. ५) स्वाध्याय भक्तीचे खरे ज्ञान देते.भक्ती ही केवळ कृती नाही तर ती एक वृत्ती आहे. याची जाणीव स्वाध्यायाने येते. ६) स्वाध्याय ऐक्य भावना दृढ करतो, सर्व स्वाध्यायी एकाच परिवारातील समजतो आमचे एक दैवी कुटूंब आहे.
त्याचबरोबर स्वाध्यायाद्वारे येणारी गुण-संपत्ती कोणती. १) कृतज्ञता: कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय केलेल्या कामाची प्रेमाची कदर करणे म्हणजे व त्यासाठी काही तरी करीत राहण्याची वृती म्हणजे कृतज्ञता. भगवंताबद्दल, संस्कृतीबद्दल, गुरुबद्दल, आई-वडिलांबद्दल, कुटूंब, समाज आणि राष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मानवाचे कर्तव्य आहे.
२) अस्मिता : मी आहे याचे भान असले पाहिजे. मी करु शकतो,बनू शकतो, बनवू शकतो, बदलवू शकतो, उभे करु शकतो,प्राप्त करु शकतो, यावृत्तीचे भान म्हणजे अस्मिता. मी मोठा आहे, तसाच दुसराही लहान नाही. तुच्छ नाही याचे नाव अस्मिता.
३)तेजिस्विता: जो बापूडा नाही, दीन बनत नाही, लाचारी करीत नाही आणि बिचारा राहात नाही तो खरा तेजस्वी.
४)भावपूर्णता: मानवजीवनाचा दोन तृतीयांश भाग भावाने भरले आहे. एक तृतीयांश भाग भोगाचा आहे. 'भावपूर्णता' हे विकसित मानवाचे द्योतक आहे. आपले भावजीव समृद्ध करणे आणि दुस-याचे भावजीवन पुष्ट करणे हे भगवंताचे कार्य आहे.
५) समर्पण : सुगंधी बनलेले जीवन प्रभुचरणी समर्पण करणे.
स्वाध्यायाचे फलीत म्हणजे स्वयंशासित , प्रभुप्रेमी, आत्मश्रद्धावान, पुरुषार्थप्रिय, शास्त्रविचार जाणणारा, संस्कृतीप्रेमी, जीवन लाभलेला समाज स्वाध्यायींना तयार करायचा आहे. जेथे कृतीपेक्षा वृत्तीला, वस्तूपेक्षा विचाराला, भोगापेक्षा भावाला, स्वार्थापेक्षा समर्पणाला, व्यक्तीपेक्षा संघाला, सभ्यतेपेक्षा संस्कृतीला, परिणामापेक्षा प्रयत्नाला, शक्तीपेक्षा सत्त्वाला. तर्कापेक्षा तत्त्वाला, आणि धनापेक्षा धर्माला प्रतिष्ठा असेल असा समाज स्वाध्यायींना बनवायचा आहे. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीत राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमान आशेचा किरण् आहेत'' आयुष्यच बदलून गेले असे सांगणारे अगदी कोळी,माळी,अदिवासी,उच्चविद्याविभुषीत, अशिक्षीत, कितीतरी विविध जातीजमातींची माणसे बंधुभावाने या परिवारात दिसतील, ते या परिवाराचे मोठे यश मानले पाहिजे. २
स्वाध्यायी परिवाराचे विविध प्रयोग आहेत. तत्त्वज्ञान विद्यापीठातून (ठाणे) पारंपारिक शिक्षणाबरोबर संस्कृती, वेदांचा अभ्यास याचे शिक्षण इथे दिले जाते. मत्स्यगंधा प्रयोग, योगेश्वर कृषी, अमृतालयम, भक्तीफेरी, बालसंस्कार केंद्र, युवा केंद्र, भगिणी केंद्र, प्रवचन केंद्र, अशा विविध प्रयोगांनी पांडुरंगशास्त्री आठवले यांचे कार्य चालते. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २००३ मधे वयाच्या ८४ वर्षी निधन झाल्यानंतर स्वाध्यायींचे कार्य (मानस कन्या ) धनश्री तळवळकर (दीदी) स्वाध्यायींबरोबर अहोरात्र पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या विचाराला,कार्याला घरा-घरात घेऊन जात आहे, आणि त्यांच्या कार्याला वैश्विक बनवत आहेत. त्यांच्या कार्याला स्वाध्यायी प्रेमी म्हणून आम्हीही वंदन करतो.
संदर्भ : १. एष पन्था एतत्कर्म : पृ. क्र. ६ प्रकाशक : सद्विचार दर्शन निर्मल निकेतन, २ डॉ. भाजेकर लेन, मुंबई.
(पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनावरुन संपादित केलेली मराठी भाषेत पन्नास किंवा अधिक पुस्तके आहेत.)
संदर्भ २. शासनपुरस्कृत मनुवादी पांडुरंगशास्त्री आठवले : पृ.क्र. ३.शेषराव मोरे, सुगावा प्रकाशन, ५६२ सदाशिव पेठ, चित्रशाळा बिल्डिंग पुणे.
३)पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारीत सुंदर कादंबरी : देह झाला चंदनाचा : लेखक राजेंद्र खेर, विहंग प्रकाशन, पुणे.
४) लोकसत्तात त्यांच्या कार्याविषयीचा एक सुंदर लेख 'तव चाहा परिणाम होगा दादाजी '
स्वाध्याय विचारांवर टीका करणारी पुस्तके ( टीकेसाठी टीका अशी पुस्तके आहेत, तरी वाचकांनी वाचायला हवी )
१) विचार कलह : शेषराव मोरे, संगत प्रकाशन, नांदेड
२) शासनपुरस्कृत मनुवादी पांडुरंगशास्त्री आठवले, शेषराव मोरे.
Comments
निनाद यांचे आभार !!!
आपले उपक्रमी सदस्य आणि आमचे मित्र निनाद यांनी सदरील लेखावर अतिशय मेहनत घेऊन सदरील माहिती मराठी विकिपीडियावर इथे आणि इथे चढवली आहे. त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो. लिहिणे सार्थकी लागले म्हणतात ते यालाच, या पेक्षा कोणता मोठा आनंद असावा !!!
निनादला विनंती : हा लेख, लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या संमतीने उपक्रम या संकेत स्थळावर असलेल्या लेखावर आधारीत आहे. असा आपण उल्लेख केला आहे. सदरील लेखाबाबत माझी माझी कोणतीही हरकत नाही. तेव्हा तिथे असलेला माझा उल्लेख काढून टाकावा ही नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे