ह्या नौटंकीच्या औलादीला...

"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...

ह्या नौटंकीच्या औलादीला
प.पू. वगैरे म्हणून डॉ. आठवले महाशयांनी त्यांच्यावर फारच अन्याय केला. आठवले गप्प बसले असते तर बरे झाले असते.

***

१९७३-७४ सालाच्या आसपास धाराशीव (उस्मानाबाद) या ठिकाणी पन्नाशी ओलांडणारा एक छपरी मिशावाला धोतर, टोपी आणि काखेला झोळी असा आवतारात आमच्या घरी आला होता. त्याच्याशी माझे वडील काही काळ बोलले होते. चार पाच वर्षे गेल्यावर त्या व्यक्तीचे नाव संभाजीराव भिडे असे होते असे मला समजले. ते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशीव जिल्हाप्रमुख होते हेही नंतरच समजले.
संघाशी आमच्या घराचा तो पहिलाच थेट संबंध! संघाचे एक तरूण (पूर्णवेळ प्रचारक) श्री. ग. म. महाजन तेंव्हा धाराशीवला रहायला आले होते. त्यांच्या जेवणाची सोय लावण्याच्या खटपटीत संभाजीराव होते. ती त्यांची आमच्या घराला पहिली आणि शेवटची भेट.

त्यानंतर संभाजीराव सांगलीला रहायला गेले.

***

'संभाजीराव भिडे' हे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी ! खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे (?) विद्यापिठातून एम. एस्सी. फिजिक्सचं सुवर्णपदक पटकावणारा हा माणूस खरंतर एखादा नामांकित वैज्ञानिक व्हायला पाहिजे होता. पण 'संघाचिया संगे' बिघडलेला हा माणूस नंतर कुठच्या कुठे पोचला. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तीमित करणारी बुद्धीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने- चोवीस तास - तीन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय - हा माणूस ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाचा तो गुरूच झाला- भिडे गुरुजी...

पुढे संभाजीराव संघाचे सांगली जिल्हाप्रमुख झाले. तिथे संघाच्या रोपट्याचा त्यांनी डेरेदार वृक्ष केला. प्रत्येक तालुक्याच्या गावागावात शाखा सुरू झाल्या.बघताबघता संभाजीराव सांगली जिल्ह्याचे गुरुजी झाले. आता सांगली जिल्हा हीच आपली आजन्म कर्मभूमी करायचे त्यांनी ठरवले. पण म्हणतात ना... दैव योजी दुसरे!
दुर्दैवानं त्याचवेळी ठाण्याचे संघाचे अध्वर्यू श्री. रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांच्या जागी तितकाच खंदा कार्यकर्ता संघाला हवा होता."संघटनमें शक्ती है!" ही संघाची घोषणा. तिथे व्यक्तीला किंमत नाही. संभाजीरावांना ठाण्याला कूच करण्याचा आदेश झाला. सांगली जिल्ह्यातलं काम अर्धवट टाकून जायला संभाजीराव तयार होईनात. 'आदेशाचं उल्लंघन' हा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. तेंव्हा पूर्ण आयुष्य ज्या संघाला वाहिलं त्यालाच रामराम ठोकण्याची पाळी संभाजीरावांवर आली. 'संभाजीरावांनी संघ सोडला' ही बातमी फारच धक्कादायक होती. कित्येक संघकार्यकर्ते हळहळले.

***
संभाजीरावांना असलेला संघाचा आधार गेला की संघाचा आधारस्तंभ ढासळला? कोणास ठाऊक? पण प्रचंड हिंमत आणि धडाडी असलेल्या संभाजीरावांनी सांगली जिल्ह्यात स्वतःच 'श्री शिवप्रतिष्ठान' नावाची संघटना काढली.
रा.स्व. संघाबद्दल बहुजन हिंदू समाजात 'ही बामणांची संघटना' असा सर्वसाधारण समज! त्यामुळे वैचारीक बैठक असूनही तीन टक्के समाजाची संघटना जनजागृती करायला पुरेशी नाही हे संभाजीरावांनी ओळखलं होतं. बहुजन समाजात जागृती घडवायची असेल तर त्यांना आपली वाटेल अशी संघटना पाहिजे.
त्यातूनच गडांच्या वार्षिक मोहिमा काढण्याची कल्पना त्यांना सुचली. शिवाय संघाच्या धर्तीवर दसर्‍याला 'दुर्गामाता दौड'!

साडेपाच फूट उंची, उन्हातान्हात रापलेल्या तांबूस काळसर वर्णं, पांढर्‍याधोप मिशा, धोतर आणि पांढरा सदरा अशा वर्णनाचा - सांगली राजवाडा भागात एका खोलीत पुस्तकांच्या ढिगार्‍यात रहाणारा - स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून जेवण करणारा पासष्ट -सत्तर वर्षांचा एक अविवाहीत म्हातारा - तोच बनला शिवप्रतिष्ठानचा सर्वेसर्वा!

***
बघता बघता जतपासून शिराळ्यापर्यंत आणि विट्यापासून मिरजेपर्यंत गावागावातले तरूण शिवप्रतिष्ठानाचे कार्यकर्ते बनले. दरवर्षी च्या मोहिमेत गडकोट पायाखाली घालणार्‍यांची संख्या हजारांत पोचली. "पोरगं गुरुजींच्या संगतीनं रांगेला लागतंय. व्यसनं करत न्हाई. आई-बाला मानतंय.", गावागावात गुरुजींचा आदर दुणावत चालला. विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या तालमी याच शिवप्रतिष्ठानच्या 'शाखा' झाल्या. संघटनेची ताकद इतकी वाढली की काँग्रेस, जनता पक्ष, भाजप - या पक्षांचे पुढारी संभाजीरावांची मनधरणी करू लागले. आजवर प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुर्गामाता दौडीत भाग घेतला आहे.
संभाजीरावांनी कुणाला जवळ केलं नाही. पण दूरही लोटलं नाही.
हळूहळू प्रतिष्ठान लगतच्या जिल्ह्यांतही मूळ धरू लागलं.

***

१९९२ साल असावं. कॉलेज संपलेलं. लहानपणी घडलेले संघाचे विचारही धुवून गेलेले. पण गिर्यारोहण करण्याची हौस होती! शिवप्रतिष्ठानच्या एका मोहिमेवर मीही गेलो होतो. मांढरदेवीपर्यंत एस्टीनं जाऊन तिथून चंदन-वंदन, पांडवगड, लिंगाणा आणि रायगडावर सांगता अशी ती मोहीम. तीन दिवसांची.
तीन हजार तरूण लोकांचा एक प्रचंड प्रवाह रांगा धरून गडांवर चढाई करत होता. आणि सर्वात मागून आमच्यासारख्या टंगळमंगळ करणार्‍यांना हाकलत चाललेला तो विक्षिप्त म्हातारा. ते अविस्मरणीय दृष्य कोणीही आयुष्यात विसरणार नाही.
......................................
रायगड! संध्याकाळची वेळ. सूर्य अस्ताचलाशी लगट करत होता. कवठे महांकाळहून आलेल्या धनगर कार्यकर्त्यांनी गंभीर घुमणार्‍या ढोलांनी वातावरण भारून टाकलं. जनता पार्टीचे सांगलीचे खासदार(?) संभाजी पवार (जात्याच पैलवान) काहीतरी बोलले. पोरांना चांगलं वळण लावल्याबद्दल भिडे गुर्जींचे आभार मानले.
आणि मग संभाजीराव भिडे - तीन हजारांचा तो समुदाय श्वास रोखून त्यांचं भाषण ऐकत होता. शेवटच्या रांगेपर्यंत (माईकशिवाय) शब्द-न-शब्द स्पष्ट ऐकू येईल असा खणखणीत आवाज! रोमरोम थरथरवणारं वक्तृत्व...
त्याचवेळी त्यांनी प्रतिज्ञा केली - शिवछत्रपतींच्या मूर्तीची दररोज पूजा!
आजतागायत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज स्वखर्चाने रायगडावर छत्रपतींची पूजा करत आहेत. आपला नंबर कधी लागतो याची आतुरतेने वाट बघत आहेत.

***

गुरुजींना वंदन करण्यासाठी घाई उडाली होती. मीही त्यात घुसलो. या माणसाला उस्मानाबादनंतर मी प्रत्यक्षात नंतर कधीच भेटलो नव्हतो. जवळजवळ वीस वर्षे झाली होती. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि हळूच म्हणालो, "गुरुजी, अमुक -अमुक यांचा मुलगा. तुम्ही..."
माझं वाक्य संपण्याच्या आतच "असं का? कसे आहेत तुमचे वडील? धाराशीवला असताना भेट झाली होती. आता कुठे असतात? रिटायर झाले नसतील अजून..., खूप चांगलं वाटलं - तू आलास" असं म्हणत माझ्या वडिलांबद्दल मलाच सांगायला सुरुवात केली. खरे म्हणजे या माणसाला आयुष्यभरात माझ्या वडिलांसारखी लाखो माणसे भेटली असतील. पण भेटलेल्या प्रत्येक माणसाचं संपूर्ण नाव आणि संदर्भ त्यांच्या लक्षात होता. मी थक्क झालो.

***

संभाजीराव आणि शिवप्रतिष्ठानबद्दल ऐकत होतो. पुन्हा कधी 'मोहिमेवर' गेलो नाही. मग मधे नोकरीमुळे माझं गावच बदललं.
आणि आता जवळजवळ पंधरा वर्षांनी - ही नौटंकीची औलाद...

ह्या बातमीतसंभाजीरावांनी जे सांगितलं तसंच झालं असणार. तो ऋषितुल्य माणूस खोटं कशाला बोलेल? एखाद्याचा खून जरी केला तरी - 'मी खून केला आहे' असं सांगणार्‍यांपैकी माणूस तो. जुन्या पिढीतला. आज एकेक कार्यकर्ता पक्षांना किती किमतीला पडतो ते उघड आहे. हा फाटका, निर्धन माणूस केवळ स्वबळावर असे हजारो कार्यकर्ते उभे करतो , त्यांची बाई-बाटली बंद करतो, गुटखा-सिग्रेट बंद करतो, त्यांच्यात शिस्त बाणवतो, त्यांना ध्येयवादी बनवतो.ज्याच्या एका शब्दाखातर गुंड म्हणवले जाणारे तरूण राष्ट्रभक्त, शिवभक्त झाले त्याचं चारित्र्य कसं असेल ते वेगळं सांगायला नको. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर?

***

हिंदुत्ववाद चूक की बरोबर हा वादाचा विषय! पण केवळ एक विचारप्रवाह म्हणून पाहिलं तर तोही अनेकांतलाच एक.
संभाजीरावांसारख्या माणसाला तो पटला म्हणून ते हिंदुत्ववादी झाले. कम्युनिझम पटला असता तर कट्टर कम्युनिष्ट झाले असते.
सावरकर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांचं महात्म्य कमी होत नाही. भगतसिंग, चंद्रशेखर आजाद कम्युनिष्ट होते म्हणून देशद्रोही ठरत नाहीत. मोठी माणसं ती! आपण त्यांच्या विचारांबद्दल मतप्रदर्शन करणं म्हणजे उंटाच्या (गां) बुडख्याचा मुका.

संभाजीराव भिडे गुरुजी हा काय प्रकार आहे ते त्यांना ओळखणार्‍यांना माहित आहे. पैसे देऊन, चिथावणी देऊन दंगल घडवून आणणार्‍यातला तो माणूस नव्हेच.

***

आणि सरतेशेवटी अठ्याहत्तर वर्षाच्या एका किरकोळ म्हातार्‍याला रस्त्यावर पाडून चड्डीत शी- शू करेपर्यंत काठ्यांनी मारण्यात काय मर्दूमकी?

'साली, नौटंकीकी औलाद!' म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं.

Comments

निखळलेला दुवा

बातमी - इथे पहा
http://www.pudhari.com/SangliStanikDetailNews1.aspx?news_id=33653 इथे पहा.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत..प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

भापो.

विसुनाना,
आपल्या भावना पोहोचल्या. दुवा अजूनही मला दिसलेला नाही.
सतत आसपास 'नौटंकी' पहात असल्याने खरे काही असू शकते यावर पटकन विश्वास बसत नाही.

खरे म्हणजे या माणसाला आयुष्यभरात माझ्या वडिलांसारखी लाखो माणसे भेटली असतील. पण भेटलेल्या प्रत्येक माणसाचं संपूर्ण नाव आणि संदर्भ त्यांच्या लक्षात होता. मी थक्क झालो.
अनेक संघ प्रचारकांनी मला सुद्धा असे अनेकदा थक्क केले आहे.

--लिखाळ.

+१

प्रतिसादाशी सहमत.

+१

दुवा वाचायला आवडेल. किमान कुठल्या तारखेचा वृत्तांत आहे ते कळवा...

भापो.

विसुनाना,
आपल्या भावना पोहोचल्या.

नौटंकी


संभाजीराव भिडे गुरुजी हा काय प्रकार आहे ते त्यांना ओळखणार्‍यांना माहित आहे. पैसे देऊन, चिथावणी देऊन दंगल घडवून आणणार्‍यातला तो माणूस नव्हेच.


हेच मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. दै सकाळ बातमीत मी ते वाचले होते.

हिंदुत्ववाद चूक की बरोबर हा वादाचा विषय! पण केवळ एक विचारप्रवाह म्हणून पाहिलं तर तोही अनेकांतलाच एक.
संभाजीरावांसारख्या माणसाला तो पटला म्हणून ते हिंदुत्ववादी झाले. कम्युनिझम पटला असता तर कट्टर कम्युनिष्ट झाले असते.
सावरकर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांचं महात्म्य कमी होत नाही. भगतसिंग, चंद्रशेखर आजाद कम्युनिष्ट होते म्हणून देशद्रोही ठरत नाहीत.

मान्य आहे. माझ तेच खरं . माझच बरोबर इतर चुक अशी भुमिका असु नये. माझे तेच देश प्रेम् इतरांचा तो देश द्रोह असेही असु नये. तरी पण प्रमाणीकरण आवश्यक आहे.

प्रकाश घाटपांडे

वा वा!

वा वा विसुनाना,
आपले असे लेखन वाचून बरे वाटले.
भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता. असो. अजूनही वेळ गेलेली नाही.

लहानपणी घडलेले संघाचे विचारही धुवून गेलेले.
असे आज कीतीतरी जण आहेत. यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे जुने संघाचे दिवस आठवतायेत पण (सहज)मार्गही दिसत नाही.
या लोकांनाही 'संघाचे लोक' (पण कार्यकर्ते नव्हेत) म्हणून एकत्रीत करणे शक्य आहे.
बाकी संघासाठी/सेवादलासाठी काम करणारी एक खास पीढीच होती हो. वेगळेच लोक ते. या देह्स्सतले नव्हतेच असे वाटणारे खरे खुरे प्रामाणिक. ते लोकही गेले नि ती निस्पृह पणे काम करण्याची इच्छाही...
जे काही उरले आहेत त्यांना पोलिस असे मारत सुटले आहेत...

आपला
गुंडोपंत

खरे आहे..

भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता.

खरे आहे. बर्‍याचदा लेखाच्या भाषेवर केवळ प्रतिसादच नाही तर त्या लेखाचे (आणि लेखकाचे) विश्लेषण होत असते.

ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन । जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥ (दासबोध दशक १९, समास १)

असे सांगावेसे वाटले.

ते लोकही गेले नि ती निस्पृह पणे काम करण्याची इच्छाही...

हे खरे नाही. सुदैवाने मी आजही अनेक व्यक्ती बघितल्या आहेत/बघतोय की ज्या विविध सामाजीक क्षेत्रात कामे करत आहेत.

असहमत

भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता.

असहमत.
लेखकाला गुरुजीबद्दल जे जाणवले ते त्यांनी लिहिले,ज्यांच्याबद्दल श्रद्धा आहे, त्या बद्दल माणूस भरभरुन बोलतो इतके आम्हाला कळते. ही ओळख आधीच करुन दिली असती तरी फारसा फरक आमच्यात तरी झाला नसता, असे आमचे मत आहे.

अनेक संघ प्रचारक,असे अनेकांना, अनेकदा थक्कच करतात, हा अनुभव आमच्याजवळही आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुलासा

भिडे गुरुजींची ओळाख येथे आधीच करून दिली असतीत तर मला वाटते की तांबे साहेबांच्या लेखाला काही वेगळाच प्रतिसाद आला असता.

गुंडोपंतांच्या वरील वाक्याशी मी सहमत आहे याचा अर्थ तांब्यांच्या लेखाशी आहे असा नाही अथवा कायदा हातात घेण्याशी सहमत आहे असेपण नाही. पण एखाद्या व्यक्तिचा असा परीचय दिल्या नंतर त्या व्यक्तिने काय केले असेल याचा अंदाज येतो. टग्यांनी दिलेल्या दुव्यावरील दै. पुढारीतील माहीती प्रमाणे ते स्वतःला अटक करून घेण्यास तयार होते तरी देखील "ये संभाजी भिडे, नौटंकी की औलाद, साले को मार दो" म्हणत त्यांना कृष्ण प्रकाशांनी मारले. यात त्यांचा (भिड्यांचा) दोष दिसत नाही. मला कुठल्याही चित्रपटाला/पुस्तकाला/कलेला विरोध करणे त्यावर विचार पटत नाहीत म्हणून बंदी घालणे मान्य नाही. फक्त मग त्यात जसे आंबेडकरांचे रीडल्स चालू शकते तसेच अरूण शौरींचे आंबेडकरांचे पुस्तक देखील चालले पाहीजे आणि जेम्स लेनचे शिवाजीवरील (जरी ते पुस्तक पटत नसले तरी). बुद्धीला उत्तर बुद्धीने द्या/कलेला कलेने असे मला वाटते आणि त्यात सर्वांना सारखेच तोलणे महत्वाचे वाटते. आणि त्याबाबतीत मला भिड्यांचा मूळ विरोध पटत देखील नाही. तसाच विरोध मला मेधा पाटकरांचा पण पटत नाही आणि तसेच इतरपण असतील...

सहमत ( न भारावता)

भिडेगुरुजींवरच काय, कोणावरही - झाले असल्यास! - पोलिसी अत्याचार ही एक अत्यंत निषेधार्ह बाब आहे, परंतु या बाबतीत नेमके काय घडले, हे -घटना घडतेवेळी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नसल्यामुळे - नक्की समजणे कठीण आहे.

सहमत आहे.


*टग्याचा पॅराडॉक्स:


धुर्त कोटी ब्र्हह्मांड नायक टग्या महाराज कि जय!!!!
प्रकाश घाटपांडे

प्रेरणा ?

'टग्याचा पॅराडॉक्स' मागे खालील ची प्रेरणा भासली.

विशीत तुम्ही समाजवादाने भारावला नाहीत तर तुम्हाला हृदय नाही आणि चाळीशीतही तुमचे विचार बदलले नाहीत तर तुम्हाला डोके नाही. - चर्चिल (?)

तुम्हाला बर्‍याच गोष्टींबद्दल काहीतरी माहित असते, पुढे काही थोडक्या गोष्टींबद्दल आणखी काही माहिती होते, शेवटी तुम्हाला कशातलेही काहीही कळत नाही हे लक्षात येते - आईनस्टाईन् (?)

प्याराडॉक्स

प्याराडॉक्स आवडला. यावरून रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलेले एक वाक्य आठवले.
"जेव्हा तुम्ही विशीत असता, तेव्हा लोक काय म्हणतील याची तुम्हाला सतत भीती असते. चाळीशीत लोक काय म्हणतील याबद्दल तुम्ही काळजी करणे सोडून दिलेले असते. साठीत गेल्यावर तुम्हाला कळते की लोक तुमच्याबद्दल विचारच करत नव्हते."
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

प्याराडॉक्स - तसेच अजून

खालील वाक्ये आठवली - माझी नाहीत पण कोणाची ते माहीत नाही

जेंव्हा तुम्हाला वाटते की तुम्हाला सर्व समजले, युनिव्हर्सिटी तुम्हाला बॅचलर्सची पदवी देते
जेंव्हा तुम्हाला कळते की आपल्याला काहीच माहीत नाही तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला मास्टर्सची पदवी देते
जेंव्हा तुम्हाला समजते (ट्यूब पेटते) की कुणालाचा काही माहीती नाही, तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला डॉक्टरेट बहाल करते आणि म्हणते गप बसा - तेरी भी चूप और मेरी भी चूप! :-)

अजून एक

जेंव्हा तुम्हाला समजते (ट्यूब पेटते) की कुणालाचा काही माहीती नाही, तेंव्हा युनिव्हर्सिटी तुम्हाला डॉक्टरेट बहाल करते
यावरून एक लिनक्स फॉर्च्यून आठवले. "OK. So you are a Ph.D. Just don't touch anything." :-)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमत आहे

मुद्दे पटले.

धन्यवाद

विसुनाना,

चांगला परिचय करून दिला आहे. "संभाजी भिडे" या असामीविषयी अगदी असेच फार पूर्वीपासून ऐकून आहे. त्यांचा कडवटपणा मान्य असणे वा नसणे हा वादाचा विषय असू शकतो. मात्र बाजारूपणा आणि सवंगपणा त्यांच्याकडून झाला असेल यावर विश्वास बसणे अवघड आहे.

एकलव्य

नौटंकी ती नौटंकीच

वयोवृद्ध माणसाला मारहाण न होता हा प्रकार टाळता आला असता. तो का टाळला गेला नाही ते बघीतले पाहीजे. पण तो मुद्दा गौण आहे. एकंदर मुळ प्रश्र सोडवण्यापेक्षा राजकारणात जास्त स्वारस्य असते बर्‍याच(जवळजवळ सर्वच) लोकांना. प्रत्येक घटनेतुन आपला फायदा कसा करुन घेता येइल हे बघणे. आणि त्याचे इतर काहीही परिणाम झाले तरी कोणाला त्याची तमा नाही. अगदी श्री. भिडे यांना देखील.

सांगलीला त्यादिवशीपुरते बोलायचे झाले तर दंगल व्हायची काही गरज नव्हती. वकीली कुठल्याही बाजुने करता येइल पण मुळ मुद्दा की दंगल न घडवू देणे ह्यात ज्यांची ज्यांची जबाबदारी होती त्या सगळ्यांनी आपली जबाबदारी टाळली.

एखाद्या कलाकृती बद्दल दंगा होणे ही काही नवी बाब राहीली नाही आणि हीच मोठी शरमेची बाब आहे. पहिल्यांदा जेव्हा असा प्रसंग आला असेल् तेव्हाच ह्यासंबधी काही धोरणे आखली असतील (असतीलही)तर त्याचा आधार घेउन अश्या कलाकृती येऊ देणे / न देणे व जर का त्या आल्या तर तो निर्णय मान्य करणे. असे का होत नाही? हम करे सो कायदा. मग आम्ही सगळे बंद करु, जाळपोळ करु. बर तेवढ्याने थांबत नाही. झाल्या प्रकारात विरोध करणारे म्हणजे "विशिष्ट औलादीचे" "अमक्याच" धर्माचे, आमच्या धर्माचे दुष्मन.. हे काय चाललेय, श्री. भिडे यांना समजत नाही?

झाला प्रकार सवंग प्रसिद्धीसाठी होता किंवा तसे नसेल तर माझे तेच खरे ह्या अतिरेकी हट्टासाठी होता असे माझे मत आहे. आवडत नाही, पटत नाही तर चित्रपट नका बघू. इथे मुळ प्रश्र/प्रॉब्लेम काय तर झालेली "दंगल". त्याचे परिणाम वाईट आहेत.

मुळ प्रश्र्न अकबर व इतिहास मुळीच नाही. झाला गेला तो अकबर किती वर्षे झाली पण असे इतिहासाचे ओझे घेउन बसलो तर मग सुड फक्त सुड!! त्याला काहीच अंत नाही.

झाला प्रकार हा बेजबाबदार आहेच व ह्याच वाटेने सांस्कृतीक दहशतवाद येतो. आज आम्ही म्हणतो तसाच इतिहास दाखवा. आम्ही म्हणतो तसेच वागा. आमच्या सत्तेखालीच रहा असाच ह्याचा प्रवास असतो. इतक्या टोकाला जाउन आंदोलन करणे ही केवळ स्वताची ताकद दाखवणे आहे. लोकशाही लोकशाही असे मिरवायचे व फक्त झुंडशाही करायची. स्वताच्या मागण्यांसाठी आम जनतेला, कायदा सुव्यवस्थेला वेठीस धरायचे?

स्वताच्या हाताने जेवण करणे, अविवाहीत , पुस्तकाच्या गराड्यात राहणे, ३००० लोकांपुढे माईक शिवाय बोलणे, शिवछत्रपतींच्या मूर्तीची दररोज पूजा ही "कार्ये" स्वताच्या मर्जीने केली ना ?कोणी जबरदस्ती तर नव्हती ना केली की त्यांनी असे केले म्हणुन जगात सर्व आलबेल आहे असे म्हणायचे आहे? पण पुर्ण सांगलीला त्या दिवशी त्या टोळीने सांगलीकरांच्या मर्जीशिवाय वेठीस का धरले?

थोडक्यात झाली ती टाळता येण्यासारखी गोष्ट होती व श्री. भिडे यांचा देखील काही प्रमाणात यात दोष आहेच.

का कोण जाणे, श्री. भिडे म्हणजे कोणीतरी महान भारतातील प्रचंड श्रेष्ठ व्यक्ती व त्यांनी केले ते कार्य ते योग्यच असा मुळ लेख व काही प्रतिसाद यातुन सुर उमटल्यासारखे मला वाटले.(तसे नसेलही पण असल्यास प्रतिवाद म्हणून) तसेच ह्या लेखाचा आधार / यापासुन स्फुर्ती घेउन अजुन यापुर्वी आले तसे चिथावणीखोर लेख येतील. म्हणुन ह्या समाजविघातक प्रवृत्तीचा पुन्हा निषेध करायला हे लिहले.

चुक ती चुकच. जे घडले ते निषेधार्हच!!

अवांतर- माझा यात कोणाबद्दल (भिडेगुरुजी किंवा विसुनाना) मुद्दाम वैयक्तिक किंवा चरित्रहनन करायचा हेतु नाही. मुद्दा व जबाबदारी अधोरेखीत करायला काही ठीकाणी परखड लिहले आहे. आशा आहे की समजुन घ्याल.

प्रश्न

लेख वाचून एक प्रश्न पडला. भिडे गुरूजींना या आंदोलनातील फोलपणा कळला नाही का? एका चित्रपटासाठी कायदा हातात घेणे, शहर वेठीस धरणे या गोष्टी कितपत योग्य आहेत? दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाचे कार्य थोर आहे म्हणून त्यांची विचारसरणी विनाशर्त स्वीकारावी हे पटत नाही. माझ्या एक मावशी म्हणत असत, "कुठल्याही माणसाला, कधीही देव्हार्‍यात बसवू नकोस. काही झालं तरी आपण सर्व माणसेच आहोत हे लक्षात ठेव." आणि याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. इथे कुणाबद्दलही अनादर व्यक्त करण्याचा हेतू नाही हे लक्षात घ्यावे. विरोध विनाशर्त विचारसरणीला मानण्यात आहे. प्रश्न न विचारता एखाद्या विचारसरणीचा स्वीकार केला तर त्याची परिणती मिळेल त्या गोष्टीचे कोलीत घेवून, एकाच अजेंड्यावर लेखमालिका लिहीण्यामध्ये होते हे आपण सर्व बघतो आहोतच.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

निष्ठा

"कुठल्याही माणसाला, कधीही देव्हार्‍यात बसवू नकोस. काही झालं तरी आपण सर्व माणसेच आहोत हे लक्षात ठेव."

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांनी संघटना स्थापन करताना हा धोका ओळखला होता. म्हणूनच त्यांनी कोणत्याही व्यक्तिला नव्हे तर भगव्या ध्वजाला गुरू मानले. निष्ठा ही फक्त विचारांशी असावी, व्यक्ती अथवा विशिष्ट परिसर वा संस्थेशी नसावी. अक्षरशः रक्ताचे पाणी करून अनेक संघटना उभ्या केलेल्या प्रचारकांनीही संघाने जेंव्हा सांगितले तेंव्हा अन्य जबाबदारी कोणतीही कुरबूर न करता स्वीकारली.

-जयेश

प्रतिसाद

मोठी माणसं ती! आपण त्यांच्या विचारांबद्दल मतप्रदर्शन करणं म्हणजे उंटाच्या (गां) बुडख्याचा मुका.
माझा आधीचा प्रतिसाद या वाक्याला उद्देशून होता. इथे संघपरिवाराच्या कार्याबद्दल काहीच म्हणायचे नाहीये. मुद्दा हा आहे की कुणाही थोर माणसाचे विचार फक्त त्याच्या थोरपणामुळे स्वीकारू नयेत. आपल्या बुद्धीच्या/विवेकाच्या कसोटीवर घासून पटले तरच स्वीकारावेत. म्हणजे नंतर या विचारांवर कृती करताना वैचारिक गोंधळ होत नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

शिवमूर्तीची पूजा

रायगडावरील शिवमूर्तीची रोज पूजा करण्याचा उपक्रम चालवणारे म्हणून संभाजी भिडे यांची माहिती आहे. याशिवाय त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून बर्‍याच ठिकाणी प्रभातफेर्‍याही निघतात असे वाटते.

शक्तीप्रदर्शन वि. सनदशीर मार्ग

वरील लेख आणि सर्व प्रतिसाद वाचले. वाचून जी प्रतिक्रिया आहे ती काही पूर्वानुभवावरून प्रामाणिकपणे देत आहे. व्यक्तिगत रोख किंवा आकस इ. आहे असे मला वाटत नाही, लेखकांना माझे स्नेहीच समजते परंतु काही समज गैरसमज होत असल्यास लेखकाने आक्षेप घ्यावा.

१. अश्रद्ध माणसालाही श्रद्धा असते हे लेख वाचून कळले. (हे लेखकाने आपण अश्रद्ध असल्याचे जाहिर लिहिल्याचे आठवते आणि त्याला या जगात कोणीही अश्रद्ध नाही असा उपप्रतिसाद मी दिल्याचे आठवते. परंतु घटनेला बराच काळ गेल्याने माझ्या आठवणीत गडबड असण्याची शक्यता आहे. लेखकाने तसे लिहिले नसेल आणि इतर कोणी तसे लिहिले असल्यास क्षमस्व तसेच हा मुद्दा ग्राह्यही धरू नये.)

२. लहानपणी आपले थोडेफार गोड बोलणारे सर्वच काका-मामा आपल्याला चांगले वाटत असतात. जर सतत संपर्कात राहीले तर घरातील राजकारण, भाऊबंदकी इ. कळते अन्यथा, मोठेपणीही ते चांगलेच वाटत राहतात. दूरून डोंगर साजरे.

३. लेखन भावनापूर्ण वाटले आणि भावना पोहोचल्या पण मानवी भावना दरवेळेस योग्यच असतात असे नाही.

४. चारित्र्यवान किंवा वयाने मोठ्या माणसाने खोटे बोलण्याची परंपरा धर्मराज आणि विश्वामित्रांपासून (माफ करा, पौराणिक पात्रांपुढे मला गती नसावी.) चालत आली आहे. त्यामुळे वेळप्रसंगी माणसे काय बोलून जातात ते सांगता येत नाही.

५. प्रत्येकजण आपल्या समजूतीप्रमाणे सनदशीर मार्गाची व्याख्या करतो. माझ्या मताप्रमाणे एखादा चित्रपट बंद करा सांगण्यासाठी निवेदन किंवा ४-५ जणांचे शिष्टमंडळ पुरेसे आहे. यंत्रणेला वेठीस धरणे, मोर्चे काढणे याला मी शक्तीप्रदर्शन म्हणेन. या शक्तीप्रदर्शनाने, अरेरावी किंवा हुकूमशाही यापेक्षा फार काही साध्य आहे असे वाटत नाही. मी स्वतः जोधा-अकबर पाहिलेला नाही, पहायचा आहे पण पाहून तो पुढील तीन तासांत मी बहुधा विसरेन. तो ऐतिहासीक चित्रपट आहे असे गोवारीकरांनी सांगितल्याचे आठवत नाही.

६. पोलीसांनी कोणालाच लाठीमार करू नये. धरपकड करणे हे योग्य पण पोलीस आपल्याच जीवाच्या भीतीने हा बचावात्मक पावित्रा घेतात का? आपली रग जिरवायला ते कळत नाही. परंतु, एकदा मोर्च्यात भाग घेतल्यावर तो बाई, पुरुष, वृद्ध, मूल आहे हे पाहत पाहत मूठभर पोलीसांनी निर्णय घ्यायचे सयुक्तिक वाटत नाही. मोर्च्यात येणारा मोर्चेकरी असतो. (हे माझ्याआधी फक्त जनरल डायरचे मत होते का काय कोणास ठाऊक.) असो, पोलीसांनी केलेल्या कृतीचे समर्थन अजीबात करायचे नाही. झाला प्रकार दोन्हीबाजूंनी सारखाच निषेधार्ह आहे.

७. तरूणांना विडी-काडी, दारू सोडून येथे येण्यास उद्युक्त केले ही गोष्ट चांगलीच. हीच गोष्ट मी मुंबईच्या अनिरुद्धबापूंविषयी ऐकली आहे. पण आता बघा, एखाद्या संघटनेचे कार्य, कार्यालय, पत्रके, निवेदने, बैठकी, वीज-पाणी यांची बिले इ. इ. साठी लागणारा पैसा कुठून येतो? शिवसेनेच्या नादी लागून आपल्या घराची होळी केलेली एक व्यक्ती माझ्या स्वतःच्या कुटुंबात आहे (सदर गृहस्थाला चहाचे व्यसन नाही परंतु अर्ध्यापेक्षा जास्त पगार शाखेला जातो). नेते मंडळी संख्येने कमी असते आणि ती आपली पैशांची किंवा प्रसिद्धीची तुंबडी व्यवस्थित भरत असते परंतु ज्या अनामिक कार्यकर्त्यांच्या जिवावर हे चालते ते सहसा आपल्या कुटुंबाला खाईत लोटूनच हे करत असतात. तेव्हा व्यसन हे वाईटच. दारू सिग्रेटचे किंवा संघटनेचे.

मुद्दे पटले

सहमत आहे. विशेष :

७. तरूणांना विडी-काडी, दारू सोडून येथे येण्यास उद्युक्त केले ही गोष्ट चांगलीच. हीच गोष्ट मी मुंबईच्या अनिरुद्धबापूंविषयी ऐकली आहे.

या प्रकाराचा मी आणखी एक धडा घेतला आहे. अतिरेकी इस्लामवादी संघटनांना सौम्य मुसलमान सहन कसे करून घेतात? अमेरिकेत ज्यू लोकांविरुद्ध गरळ ओकणारी कृष्णवर्णीय नेशन ऑफ इस्लाम ही संघटना अशाच प्रकारे युवकांना गुंडगिरीतून, व्यसनातून मुक्त करते. गझा येथील हमस संघटना, लुब्नानमधील हिझ्बुल्लाह् संघटना अनेक सेवाभावी कार्ये करतात. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे त्याच्या (लहान) कार्यकर्त्यांना स्वच्छ आणि अभ्रष्ट असल्याचे वलय प्राप्त होते. (त्यांचे सरसेनापती कितीका भ्रष्ट असेनात.)

आता लहानपणापासून आमच्या कुटुंबातले (सौम्य) लोक ज्याप्रकारे संघातल्या अशा सेवाभावी, स्वच्छ लोकांना पूज्य मानतात, त्याच प्रकारे माझे सौम्य मुसलमान मित्र मानत असावेत, असे मी समजून घेतले आहे. पण त्यामुळे हमसच्या धर्मांध राजकारणाला विरोध व्हावा असे माझे मत बदलत नाही. त्याचप्रमाणे अमेरिकेतील सनदशीर (कुठलेही आतंकवादी कृत्य न केलेल्या, पण धर्मांध) नेशन ऑफ इस्लामविषयी. आणि त्याचप्रमाणे भारतातील मुसलमान आणि हिंदू संघटनांविषयी. यात त्यात्या संस्थांच्या काही व्यसनमुक्तीवादी, बालवत्सल, आणि नावे लक्षात ठेवणार्‍या कार्यकर्त्यांबद्दल अनादर नाही.

तांबे यांनी लेख दिल्यावर, त्यांचे स्रोत संकेतस्थळ मी तपशीलवार वाचले. आणि येथे वृद्धाच्या मारहाणीचे नुसते निमित्त करून भारतात हिंदूंवरच अत्याचार होत आहेत, असा त्यांचा विचार-कार्यक्रम (अजेंडा) दिसला. "सनदशीर आंदोलनांवरचे पोलीस बडगे उठवा", "पोलीस अतिरेक थांबवा" असा विचार-कार्यक्रम असता, तर पूर्णपणे पाठिंबा दिला असता.

शक्तिप्रदर्शन

वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'ह्याचा फोलपणा भिडेंना जाणवला कसा नाही?' बरोबर आहे, कारण भारतातले शेळपट राष्ट्राभिमानी आवाज करून करून करणार तरी किती? आताच, येथल्यासारख्या एखाद्यादुसर्‍या चर्चा सोडल्या तर ह्या विषयावर (भिडेंना झालेली मारहाण वगैरे*) सगळे कसे शांत शांत झाले आहे.

"५. प्रत्येकजण आपल्या समजूतीप्रमाणे सनदशीर मार्गाची व्याख्या करतो. माझ्या मताप्रमाणे एखादा चित्रपट बंद करा सांगण्यासाठी निवेदन किंवा ४-५ जणांचे शिष्टमंडळ पुरेसे आहे. यंत्रणेला वेठीस धरणे, मोर्चे काढणे याला मी शक्तीप्रदर्शन म्हणेन. या शक्तीप्रदर्शनाने, अरेरावी किंवा हुकूमशाही यापेक्षा फार काही साध्य आहे असे वाटत नाही."

शक्तिप्रदर्शनाने व अरेरावीने तथाकथित प्रगत समाजालाही नमवता येते, हे तर आजकाल बरेचदा वरचेवर दिसून येते आहे. स्मरणशक्तिला विशेष चालना न देता सहज आठवली ती उदाहरणे पहा:

* सलमान रश्दीच्या पुस्तकाच्या वेळी जगभर झालेली निदर्शने-- त्यानंतर भारतात त्या पुस्तकावर बंदी घातली गेली.
* तस्लिमा नसरीनच्या विरूद्ध् भारतात अलिकडेच जी 'निदर्शने' झाली त्यानंतर भारतातल्या कुठच्याही राज्यात तिला रहाणे मुष्कील झाले आहे.
* डच व्यंगचित्रकाराने काढलेल्या चित्रांमुळे विशेषतः युरोपात आणि अर्थातच भारतात प्रक्षोभ उसळला, त्यामुळे युरोपातील अनेक सरकारांना जवळजवळ लोटांगण घालावे लागले. अत्यंत तत्पर व जागरूक अशी ख्याती असलेल्या भारत सरकारने ह्याबाबत संबंधित राष्ट्राकडे निषेध नोंदवला.
* मुस्लिम स्त्रीयांच्या बाबतीतल्या प्रथांबद्दल आवाज उठवणार्‍या एका (जन्माने मुस्लिमच) असलेल्या अयान हिरसी अली ह्या स्त्रीला नेदर्लंडमधून परागंदा व्हावे लागले.
* ताज्या बातमीनुसार नेदर्लंडमध्येच एका धर्माचे, त्याला जाणवले ते रूप, एका चित्रपट दिग्दर्शकाने चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा बेत दर्शवताच आताच तेथे इतका प्रक्षोभ उसळला आहे, तसेच तेथील सरकारवर इतका दबाव येत आहे, की आतापासूनच तेथे त्या चित्रपटाची व त्या दिग्दर्शकाची गळचेपी (यदाकदाचित खरोखरीच सुद्धा) होण्याची दाट शक्यता आहे.
* कॅंटरबरीच्याच्या आर्चबिशपने शरियातून काही ब्रिटिश कायद्यात घेता आले तर बघावे, असा सूर लावला आहे.

[*अशा विषयावरच्या चित्रपटावर बंदी आणावी इ. बद्दल मला काही म्हणायचे नाही. फक्त ह्याने काय साध्य होते अशा अर्थाचा सूर आहे, म्हणून वानगीदाखल काही उदाहरणे दिली आहेत].

अरेरावी, हुकूमशाही वगैरे

शक्तिप्रदर्शनाने व अरेरावीने तथाकथित प्रगत समाजालाही नमवता येते, हे तर आजकाल बरेचदा वरचेवर दिसून येते आहे.

नक्कीच येते. विशेषतः काही जहाल धर्मवेड्यांपुढे सर्व जग नमते असा अनुभव आहे पण म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे म्हणजेच शहाणपणा का? ते करतात म्हणून आम्ही करतो असे करायचे झाले तर त्यांच्यासोबत आपणही मध्ययुगीन काळात जाऊन बसावे असे निदान मला तरी वाटत नाही.

वरील मुद्दे वाचून माझ्या मनात जे आले ते येथे नमूद करते:

सदर गट/ पंथ/ धर्म हा कूपमंडुक आहे. आपले क्षितिज मोठे करण्याचे सोडून असंस्कृतपणाच्या गर्तेत खोल रूतत चालला आहे. मानवी अधिकाराला त्यांच्यामते काहीही किंमत नाही, अशा धर्माशी माझी बांधिलकी नाही याबद्दल मी स्वतःला सुदैवी मानते.

असो, माझ्या धर्माबद्दलही मी हाच विचार करावा काय?

राजकारणी त्यांचे तुष्टीकरण करून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी सदैव तत्पर असतात. या राजकारण्यांचा कोणताही धर्म नाही, त्यांचे कोणीही आई-वडिल नाहीत आणि सगे सोयरे नाही. सत्ता आणि खुर्ची यासाठी ते कोणत्याही थराला जातात.

या शक्तीप्रदर्शनाने, अरेरावी किंवा हुकूमशाही यापेक्षा फार काही साध्य आहे असे वाटत नाही.

मूठभर लोकांना हाताशी पकडून, सरकारचे विशेष अतिथी नसताना भारतात खरंच काही साध्य आहे का? हिंदूंना काठ्यांनी मारा आणि मुसलमानांचे लाड करा असा सूर कोणीही लावल्याचे येथे दिसत नाही पण ज्या समाजात एकी नाही. जिथे भय्यांना हाकला, बिहारींना हाकला आणि काही विशिष्ट गोष्टींमध्ये मात्र एकजूट करा असे कोणी म्हणू लागले तर ते शक्य आहे का?

मध्यम मार्ग असू शकतो

हा प्रप्तिसाद जरी मी प्रियालींच्या एका विशीष्ट प्रतिसादाला उत्तर म्हणून देत असलो, तरी त्यानिमीत्ताने मी काही इतर ह्या व ह्यासंदर्भात झालेल्या अगोदरच्या चर्चेत लिहील्या गेलेल्या बाबींच्या संदर्भात येथे लिहीत आहे.

सध्या हिंदूंची स्थिती 'कुणीही यावे, टपली मारून जावे' अशी आहे #. भारतात व जगात. ह्याउलट मुसलमानांची स्थिती आहे-- युरोपातील राज्ये व ब्रिटन त्यांच्यापुढे गुढघे टेकून उभे आहेत, ते मुख्यत्वे ह्या शक्तिप्रदर्शनामुळे. आणि भारतातले अवास्तव तुष्टिकरण मतांच्या राजकारणातून आहे.

"ते करतात म्हणून आम्ही करतो असे करायचे झाले तर त्यांच्यासोबत आपणही मध्ययुगीन काळात जाऊन बसावे असे निदान मला तरी वाटत नाही."

हे दुसरे टोक झाले. पण बहुसंख्य हिंदू 'मला काय त्याचे' असे सहज म्हणून ह्या सगळ्याकडे काणाडोळा करतात, त्यामुळे आपल्यात संघशक्ति अजिबात नाही, हे जगाने ओळखले आहे. तेव्हा अगदी धर्मांधांचे दुसरे टोकच गाठावे असे म्हणणे नाही, पण जरब बसावी, इथपत तरी वचक असावा. अर्थातच आता 'इथपत म्हणजे नक्की कितपत' वगैरे चर्चा होऊ शकते. पण जे आहे ते सारे आलबेल आहे, असे मानणे आत्मघातकी आहे.

भिडेंच्या सदर आंदोलनानिमीत्त झालेल्या ह्या व ह्या अगोदरच्या चर्चेत धर्मांतराचा सहज उल्लेख केला गेला. दोन्ही ठिकाणी तो उपसाहात्मक होता हे खरे, पण 'तुम्ही म्हणता भारतात हिंदूंवर अन्याय होतो आहे, पण मुसलमानांचे तुष्टिकरण होत आहे ना. मग व्हा मुसलमान' ह्या प्रकारच्या उठवळ सल्ला दिला गेला. तेव्हा सदर सल्लागाराला हे माहिती नसेल की भारतातच काय जगातल्या इतर अनेक देशात/ प्रांतात* मुसलमानांची ह्याच मुद्यावर आंदोलने सदैव चालू असतात. तेव्हा तसे धर्मांतर केल्याने गणेश तांबेंचा प्रश्न सुटणार नाही. उलट त्यांना तिथल्या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल! कुणीही कुणालाही (ह्या दुसर्‍या 'कुणाला' त सर्वच धर्मिय आले, केवळ हिंदूच नव्हेत) धर्मांतर करण्याचा सल्ला इतक्या थिल्लरपणे द्यावा हे व्यथित करणारे आहे.

* ब्रिटन (शरिया लागू करा, तिथे जे काही बॉंबहल्ले झाले, ते त्या समाजघटकांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवल्यामुळे झाले म्हणे).
* फ्रान्स, नेदर्लंड्स, नॉर्वे'
* बोस्निया (कोसोवो फुटून निघालाच)
* चेच्निया
* चीन
* फिलीपाईन्स
* थायलंड (२००४ पासून सुरू झालेल्या 'आंदोलना'त आतापर्यंत सुमारे २५०० मृत्यू झालेले आहेत).
* म्यनमार (करेन फुटिर)
* मध्य पूर्व (पॅलेस्टाईन- इस्राईल, लेबनॉन इ).
* भारत

तथाकथित मध्यम (मॉडरेटला मराठी प्रतिशब्द काय?) मलेशियातील केलांतनमधे शरिया लागू झालेला आहे. तुर्कस्थानातही प्रगत राजवट कितपत चालू राहिल ह्याबद्दल आता शंकाच आहे.

# भारतात जे काही चालले आहे, ते विकासांनी त्यांच्या एका दीर्घ प्रतिसादात विशद केले आहेच. त्यात थोडीफार भर टाकतो:

पोप भारतात- जेथील प्रजा बहुसंख्य हिंदू आहे- दिवाळीच्या सुमारास येतो, व 'येथल्या बहुसंख्य लोकांच्या मनात अंधकार आहे, त्यांच्यासाठी ज्ञानाची ज्योत उजळली पाहिजे' असे पॅट्रनायझिंग (म. प्र.?) उद्गार काढून जातो. ह्याउलट डॅनिश व्यंगचित्रकाराच्या प्रसंगानंतर, आताचा पोप मुस्लिम धर्मगुरूंबरोबर बैठक करतो, व बहुतांशी तुष्टिकरण करतो. चीनने वॅटिकनचा उत्तमपैकी हात पिरगळून ठेवला आहे. शेवटी वॅटिकन हवालदील झाले व आता ते चिनी सरकारशी 'तहाची' बोलणी करणार आहेत.

आपले अं. नि. स. चे कार्य घ्या. त्यात मुसलमानांच्या चुकिच्या रूढींबद्दल, रितीरिवाजांबद्दल काय आहे? माझ्या अल्प माहितीप्रमाणे शून्य. त्यांचे सगळे शौर्य हिंदूंपुरते मर्यादित आहे. हिंदूंचे अनेक रितीरिवाज, त्यांच्या अनेक रुढी चुकिच्या आहेत व त्या दूर केल्या पाहिजेत ह्यात शंकाच नाही. भोंदू साधू, बुवा बापूंपासून समाजाला वाचवले पाहिजे ह्याबाबत काहीच दुमत नाही. पण ह्याइतकीच, किंबहूना ह्यापेक्षाही जास्त भयानक रूढी (लहान मुलींचे सर्कमसायेझशन), समज (कुटुंबनियोजनाचा अभाव) व गंडेदोरे, धुपारे इ. मुस्लिम समाजात आहेत. व त्यांचाही एकंदरीत समाजजीवनावर तसेच देशाच्या रहाणीमानावरही विपरीत परिणाम होत आहे.

इतरस्त्रः

मलेशियातील हिंदूंची शांततामय निदर्शने लाठीहल्ला करून उधळून दिली जातात, इतकेच नव्हे, त्यांच्या पुढार्‍यांना देशघातकी असल्याच्या आरोपावरून अटक होते.

टॉयलेटसीटवर, पादत्राणांवर हिंदू देवतांची चित्रे काढणे, इ. नेहमीचेच झाले आहे.

ही काही ठळक उदाहरणे झाली.

फोलपणा

मी जेव्हा 'या आंदोलनातील फोलपणा' म्हटले तेव्हा मला हा अर्थ अभिप्रेत नव्हता. माझ्या मते हे आंदोलन चुकीच्या मुद्यांवर बेतलेले आहे, फोलपणाचा अर्थ त्याच्याशी संबंधित होता. असो.

दिलेल्या उदाहरणांखेरीज आणखीही बरीच सापडतील. विशेषतः मुस्लिम राष्ट्रांमध्ये.
*अफगाणिस्तानमध्ये एका विद्यार्थ्याने इस्लामविरोधी फाईल संगणकावर उतरवली म्हणून त्याला देहदंडाची शिक्षा फरमावण्यात आली होती. (नंतर काय झाले ठाउक नाही.)
*दोन आठवड्यांपूर्वी यूट्युबवर इस्लामविरोधी चित्रफीत आहे असे कळताच यूट्यूबचे जगभरचे प्रक्षेपण काही वेळासाठी बंद पाडण्यात आले. अधिक शोध घेतल्यानंतर याचा उगम पाकिस्तानमधून झाल्याचे कळाले.
इथे मुद्दा हा की आपणही याच मार्गावर जायचे आहे का? धर्म कुठलाही असो, त्यात कट्टरपणा आला की त्याचा परिणाम विनाशातच होतो. मग आम्हाला फायर पचत नाही, व्हॅलेंटाइन डेचे राजकीय भांडवल करता येते, शिल्पा शेट्टीने काही केले की आमच्या संस्कृतीचा र्‍हास होतो. यादी न संपणारी आहे.
[कँटरबरीच्या आर्चबिशपच्या वक्तव्यानंतर तिथेही बराच गदारोळ झाला होता.]

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

विकी

अजून एक उदाहरण

विकीवरती मोहंमदाचे चित्र असल्यामुळे गडबड करण्याचा प्रयत्न झाला पण तो तितकासा यशस्वी होऊ शकला नाही असे ऐकले. जरा (चांगल्या अर्थे) आश्चर्य वाटले की असा विरोध पचवणे विकीला कसे जमले! ते चित्र मी येथे टाकले नाही. उगाच उपक्रम संपादक मंडळाला त्रास नको म्हणून! आणि हा प्रतिसाद लिहीताना गुगल इमेजवर सर्च केला तर बरीच चित्रे दिसली...

बाकी, धर्म कुठलाही असो, त्यात कट्टरपणा आला की त्याचा परिणाम विनाशातच होतो. हे १००% मान्य. फक्त माझ्या आधीच्या प्रतिसादाचा संदर्भ देऊन पुढे इतकेच म्हणीन की एकाचा कट्टरपणा चालवून घेतला तर नकळत आपण उर्वरीत समाजातील भावनीक वृत्तींना कट्टरपणा बाणवायचे खतपाणि घालत असतो. म्हणून all should be always equal असे म्हणावेसे वाटते.

सहमत

एकाचा कट्टरपणा चालवून घेतला तर नकळत आपण उर्वरीत समाजातील भावनीक वृत्तींना कट्टरपणा बाणवायचे खतपाणि घालत असतो.
सहमत आहे. इथे हिंदुत्ववादाचा विषय आहे म्हणून त्याबद्दल बोलणे झाले. पण मुस्लिम कट्टरपंथीय किंवा अगदी माझ्या घरी येऊन मला 'कन्वर्ट' करण्याचा प्रयत्न करणारे जेहोवा यांचा कट्टरपणाही तितकाच हानिकारक आहे. कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधात बोललो तर त्याचा अर्थ इतर धर्मियांना पाठींबा आहे असे अजिबात नाही. प्रश्न आहे की इतर धर्मियांच्या कट्टरवादाला आपण कसे उत्तर देतो. राजकारण्यांच्या चुकांमुळे बरेच घोळ झाले आहेत हे ही मान्य कारण त्यांना पहिला त्यांचा स्वार्थ (मतपेटी) दिसते. पण या बाबतीत म्हणजे जोधा-अकबर चित्रपट प्रदर्शित झाल्याने आपल्या समाजात इतका फरक पडला नसता असे वाटते. आणि त्यासाठी दंगली करायचीही गरज नव्हती.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमती

राजकारण्यांच्या चुकांमुळे बरेच घोळ झाले आहेत हे ही मान्य कारण त्यांना पहिला त्यांचा स्वार्थ (मतपेटी) दिसते. पण या बाबतीत म्हणजे जोधा-अकबर चित्रपट प्रदर्शित झाल्याने आपल्या समाजात इतका फरक पडला नसता असे वाटते. आणि त्यासाठी दंगली करायचीही गरज नव्हती.

मला वाटते येथील बहुतांशी लोकांचे मत यापेक्षा वेगळे नाही. मी देखील हे वारंवार बोललो आहेच. मी आधी पण काही चर्चांसंदर्भात सांगीतले होते की अमेरिकेत अशाकाही गोष्टींचा संबंध आला होता की त्यावर आवाज उठवणे सोपे होते. पण जिथे हे होत होते ते हिंदूंच्या विरुद्ध असण्यापेक्षा त्याच लायकीचे मार्केटींग कुठल्याही धर्माचा (इस्लाम सोडून) गैरवापर करत होते. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणे म्हणजे त्याला प्रसिद्धी देणे आणि काहीच पदरात पाडून न घेणे असला प्रकार होता. तेंव्हा दुर्लक्ष करून मोकळा झालो. हिंदू धर्माचे, धर्मियांचे आणि हिंदुत्वाचे त्यामुळे काही नुकसान झाले नाही...

मी फक्त (अर्थातच माझ्या दृष्टीने !) विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय की हे का होते. जे होते ते चूक आहेच आणि स्वतःतील उर्जेचा/शक्तीचा गैरवापरपण आहे. आणि माझ्या विश्लेषणात हे जर कमी होणे गरजेचे असेल तर समान न्याय लावा. कुणाचाच चावटपणा चालून देऊ नका. हे काम एका रात्रीत होणारे नाही आहे. पण ते लवकरात लवकर होणे नितांत आवश्यक आहे.

थोडे अवांतर, पण - ह्याला समान दुसरे उदाहरण म्हणजे जो काही मराठी-अमराठी वाद चालू आहे आणि त्यात जसे मराठी लोकांना आणि नेत्यांना माध्यमे आणि त्यामुळे माझ्या-तुमच्यासाराखी शिकली सवरलेली मराठी माणसे पण पिटतात पण तेच जेंव्हा अमराठी लोकांकडून होते तेंव्हा गप्प बसतात. उत्तर भारतीय महाराष्ट्र सोडून चालले म्हणून गळा काढला, पण आता समजले त्याप्रमाणे तसे काही नाही - आत्ता गेले असले तरी खबरदारी म्हणून तात्पुरते गेलेत. त्यांच्या नसण्याने म्हणे बांधकामे बंद पडत आहेत. म्हणजे? त्या आधी काय महाराष्ट्रात इमारती बांधल्या गेल्या नाहीत का? शिवाय आता संसदेत मराठी माणसांना सडक्या मेंदूचे म्हणले गेले तर गप्प! उद्या बाळासाहेबांना ओरडायला परत हे तयार होणार... असो. हा जो भेदभाव आहे तो मारक आहे. मग तो कुठल्याही पद्धतीतले अल्पसंख्य-बहुसंख्य असोत, इतकेच माझे म्हणणे आहे.

सहमत!

एकाचा कट्टरपणा चालवून घेतला तर नकळत आपण उर्वरीत समाजातील भावनीक वृत्तींना कट्टरपणा बाणवायचे खतपाणि घालत असतो. म्हणून all should be always equal असे म्हणावेसे वाटते.

मान्य. पण सगळेच जण सारखे असू शकत नाही ना! मी गुन्हा केला हे मान्य. मी एकट्यानेच गुन्हा केला हे अमान्य. इतरांनी ही गुन्हा केला पण त्यांचे काहीच झाले नाहि. सबब मी गुन्हा केला हे अमान्य.
प्रकाश घाटपांडे

परत परत

इतरांनी ही गुन्हा केला पण त्यांचे काहीच झाले नाहि. सबब मी गुन्हा केला हे अमान्य.

माझा मुद्दा हा कोणाचे अथवा कुठल्या कृत्याचे उदात्तीकरण करण्याचा अथवा तसे इतरांचे वर्तन दाखवून "उदासिनीकरण" करण्याचा नाही हे सतत सांगतोय. पण रोगाबद्दल बोलले जात आहे, रोग्याचा द्वेष केला जातो आहे पण इलाज म्हणले की चिडीचूप् हे मान्य नाही. इलाजाची बात काढली की तुम्ही म्हणणार " पण सगळेच जण सारखे असू शकत नाही ना! " हे बरे आहे! तिथेच तर गोची होत आहे. या एका वाक्यात तुम्ही समाजभेद करता असे नाही का वाटत?

समाजातील दुर्बल घटकांना काही बाबतीत प्राधान्य देणे हे समाजातील विविध घटकांना त्यांच्या जाती-धर्मावरून कमी अधिक प्राधान्य देण्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. पहीलीला कुणाचा विरोध असू नये पण ती न होता दुसरी गोष्ट सतत होत असते आणि तिथेच घोडे पेंड खात बसते.

जेंव्हा समाजातील प्रत्येक स्तरास समजेल की झुंडशाही मग ती अल्पसंख्यांकाची असोत अथवा बहुसंख्यांकाची - ती चालणार नाही, असलेली भुते गप्प होतील आणि नवीन पण तयार होणार नाही. पण आधी म्हणले तसे यात राजकारण्यापेंक्षा तथाकथीत बुद्धीवादी आणि पंचमस्तंभ - माध्यमे ही नुसती जबाबदार नाहीत तर दोषी आहेतताअणि काही लोकं भिड्यांच्या मागे जात असले तर ज्यांना बुद्धीवाद आवडतो ते असल्या माध्यमांवरून पण स्वतःची मते तयारच करत असतात आणि ते ही अयोग्य आहे. त्यात मी आणि तुम्ही येतो....असेच परत परत सांगावेसे वाटते.

प्रतिसाद वाचत आहे.

लेखाला आलेले प्रतिसाद वाचत आहे. अत्यंत समतोल आहेत. प्रतिसादांबद्दल आभार. पुढे लिहीन.

रिऍक्शन

वरील सर्व प्रतिक्रीया वाचताना एक गोष्ट कोण बरोबर कोण चूक हा वाद न घालता , राहून राहून लक्षात येते की, ज्या गोष्टी आपल्याला तत्व म्हणून मान्य होत नाहीत त्याबद्दल आपण अत्यंत पोटतिडकीने बोलतो. बर्‍याचदा तसे बोलताना आपण अगदी उपक्रमासारख्या समाज्याच्या मानाने छोट्याशा समुहात -आपला मुद्दा कितीही बरोबर असला तरी एकमेकांच्या भावनांचा विचार न करता टोचून बोलतो, कधी कोणी अपशब्द पण वापरतो. आणि आपण सर्व "सुशिक्षित" की जे जग उघड्या डोळ्यांनी जगात वावरतो आहोत आणि नक्कीच यातील "बहुतांशी" व्यक्तिगत जीवनात सभ्यपणे आणि चांगल्या अर्थाने मवाळपणे वागतो. तरी देखील जेंव्हा "रिऍक्शन" देण्याची वेळ येते तेंव्हा आपल्यातला मवाळपणा सहज लोप पावू शकतो आणि मग शब्द आणि वाक्ये कधी कधी घसरगुंडीवरून तळ गाठायला लागतात.

आता मी यात (विचार स्वातंत्र्याच्या विरुद्ध जाणे मलाही मान्य नसल्याने) प्रामाणिकपणे कोणाचीही बाजू न घेता एक विचार करण्याची विनंती करतो की जेंव्हा सरकार/राजकारणी, बहुतांशी तथाकथीत प्रतिष्ठा लाभलेली प्रसार माध्यमे (त्यात पण विशेष करून इंग्रजी) ही वर्षानुवर्षे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत आले - किती? तर ३/४ बहुमत आहे म्हणल्यावर शहाबानोला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला पोटगीचा अधिकारपण घटना दुरूस्ती करून काढून (रिव्होक) करायला कमी पडले नाहीत. का तर अल्पसंख्यांकांच्या भावना! त्याच वेळेस या बातमी संदर्भात सोडा कारण यात नक्कीच चुकीच्या पद्धतीने निषेध करणार्‍यांची चूक आहे, पण अनेकदा असे दिसून येते की हिंदूत्व म्हणले की गरळ ओकल्यासारखे लिहीणार. सावरकर म्हणल्यानंतर त्या गरळीला अजून कशाची फोडणी, त्यांनी हे जग सोडून ४२ वर्षे झाली, तरी घालणार...

थोडक्यात वर्षानुवर्षे बुद्धीवादाच्या नावाखाली हिंदूंना "टेकन फॉर ग्रँटेड" असे कायमस्वरूपी पद (परमनंट स्टेटस) देऊन ठेवले आहे. कधीतरी त्याचा उद्रेक होणारच. व्यक्तीच्या बाबतीत हा उद्रेक एका दिवसात होत असला तर समाजासाठी चालू होण्यास वेळ लागतो पण एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की समाज / सामाजीक भाग पेटून उठतो. आणि व्यक्तीचा उद्रेक जर काही दिवस/फार तर महीने टिकत असला तर समाजाचा उद्रेक हा वर्षानुवर्षे टिकतो. आज आपण भारतात त्याच अवस्थेतून जात आहोत.

याचा अर्थ त्या उद्रेकाचे समर्थन करायचे अथवा तसे मी करतो आहे असे समजू नका कारण तो माझा उद्देश नाही. जसा हिंदू/भारतीय तत्वज्ञान मला नुसते आणि संदर्भ म्हणून आवडते तसेच या संदर्भात कायम आवडते/आठवते ते ऍसिमोव्हचे "फाउंडेशन". त्यात सायकोहिस्टरी असे नवीन शास्त्र तयार करणारा ऍरी सेल्डन म्हणतो की ही गॅलेक्टीक सिव्हिलिझेशन आता १००० वर्षात लयास जाणार आहे आणि पुढची ३०००० वर्षे बार्बारिझम येणार आहे. लयास जाणे हे आधीच्या घटनांनी निश्चित केले आहे, ते आपण टाळू शकणार नाही, पण येणारा बार्बारिझमचा/रानटीपणाचा(चांगला मराठी शब्द?) काळ ३०००० वर्षांपासून १००० वर्षांपर्यंत कमी करू शकतो. आणि मग टाईम कॅप्सुलद्वारा तो त्याच्या हयातीत आणि नंतरही त्याची भाकीते सांगत जातो आणि योग्य वाटेवर घडामोडी होण्यासाठी मार्ग सुचवत (दाखवत नाही) राहतो.

आज त्याच धर्तीवर म्हणावेसे वाटते की हा उद्रेक कितीही चुकीचा वाटला तरी तो अनेक काळ रहाण्याच्या ऐवजी तो काळ जर कमी करायचा असला तर सगळ्यांना समान वागणूक करा - फक्त कायद्यानेच नाही, राजकारण्यांनीच नाही तर तुमच्या-आमच्या सारख्यांनी जे यात कुठेच गुंतलेले नसतात....

जाताजाता एक अनुभव सांगतो: दहा बारा वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एम आय टी त एका भारत सरकारच्या पैशाने आलेल्या एका एनजीओ मधल्या व्यक्तीचे भाषण होते - विषय होता, काश्मिर मधे मुसलमान स्त्रीयांवर अत्याचार कसे होत आहेत आणि काश्मिर पाकीस्तानला देण्यावाचून पर्याय कसा नाही इत्यादी...मी विद्यार्थी दशेतच होतो आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून गेलो. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख फेमिनिस्ट, कम्यूनिस्ट अशी करून दिली (नावावरून अर्थातच हिंदू नाव होते). नंतर तिने इतरांना आपापली ओळख करण्याची विनंती केली. त्याच पद्धतीने त्यातील बहुतांशी म्होरक्या मुलांनी स्वतःची ओळख "ऍक्टीव्हीस्ट्", भारतात असताना "कम्यूनिस्ट" (कारण इथे तेच म्हणायची हिंमत नाही) , "लेफ्टीस्ट" अशी करून दिली. साध्या भारतीय मुलांनी आणि पाकीस्तानी मुलांनी नुसतीच ओळख करून दिली. मी माझे नाव सांगत म्हणालो की , "मी भारतीय आहे, परदेशात असल्याने जिथे देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे तिथे करतो आणि आपली माणसे तसेच प्रतिनिधित्व कसे करतात हे पहाण्याचा प्रयत्न करतो. त्या अर्थी मी केवळ राष्ट्रवादी (नॅशनॅलीस्ट) आहे. " माझी ओळख त्या बयेला इतकी झोंबली की तिने स्वतःचे लेक्चर "नॅशनॅलीस्ट" असणे कसे "डेंजर" असते वगैरे सांगतच सुरू केले. बाकी किस्सा मनोरंजनात्मक असला तरी येथेच थांबवतो.

मुद्दा इतकाच सांगायचा होता की आपल्याकडील तथाकथीत बुद्धीवाद्यांनी, राजकारण्यांनी, गेल्या अनेक दशकांत, असल्या वागण्याने असलेल्या भुतांचे निराकरण तर केले नाहीच पण नसलेली भुते मात्र तयार केली. आज आपण यातील एकाबद्दल बोलत असताना शस्त्रासारखे शब्द वापरत स्वतः त्यातील एक भूत होत अजून नवीन भूते तयार करायला प्रोत्साहन तर देत नाही आहोत ना असे वाटते.

एक इरसाल रिऍक्शन

सतत एखादी गोष्ट अनुभवत राहीले किंवा ऐकत राहीले तर त्याची रिऍक्शन मानवी मन देतेच. कालचाच किस्सा

माझा पावणे तीन वर्षांचा भाचा रस्त्यातून भावाच्या कडेवर बसून जात होता. मध्येच एक रिक्षा आडवी आली तर अचानक हा ओरडला, "भय्याचा मानूश*, मधेमधे येतो." माझा भाऊ अवाक की हा काय प्रकार आहे पण घरातले बोलणे, टिव्हीवरचे बोलणे इ. ऐकून ही प्रतिक्रिया निर्माण झाली होती.

पण वाढत्या वयानुसार कोणत्या प्रसंगावर कोणती प्रतिक्रिया द्यायला हवी हे माणसाला कळायला हवे आणि प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते हे मानले तरी कोणती गोष्ट किती धरून ठेवावी हे देखील. मतप्रदर्शन (जे आपण करतो, जे उत्स्फुर्त असते. जे बरेचदा चुकीचे असते हे पटल्यावर आपण क्षमाही मागतो) आणि शक्तीप्रदर्शन (जे येथे झाले आणि ठरवून केले गेले. अचानक रस्त्यावरचा जमाव जमला आणि मोर्चा निघाला असे तर झाले नव्हते.) यांत मला फरक वाटतो.

* भय्याचा मानूश (माणूस) म्हणजे काय ते तोच जाणो, या घटनेची थोडीशी मजा वाटली तरी माझी प्रतिक्रिया, "सांभाळा त्याला" अशीच होती.

विषयांतराबद्दल क्षमस्व!

आपले विचार पटतात

टग्याराव, आपले दोन्ही मुद्दे पटण्यासारखे आहेत,त्याच्याशी सहमत आहेच, तेव्हा लेखकाला ऋषीतुल्य वाटलेला माणूस प्रत्येकालाच ऋषीतुल्य वाटलाच पाहिजे असे काही नाही. खरे तर अशा माणसांनी काय करावे हे सांगण्याइतपत आम्ही मोठेही नाहीत. पण, या वयात 'चलोरे' म्हटल्यावर इतकी माणसं गोळा होत असतील तर विधायक कामासाठी त्यांनी अधिक वेळ द्यावा असे वाटते, आता रस्त्यावर येऊन चिथावणीचे काम करणे हेच काम विधायक असेल तर मग काही बोलणेच नको. पण समाजविकासाच्या अनेक कामात त्यांनी कोणत्याही गटाचा म्हणुन काम न करता सर्वसमावेशक म्हणुन झोकून दिले तर भविष्यात आम्हीही भारावून जावून असाच लेख लिहिला तर कोणालाही आश्चर्य वाटू नये, पण आता ते त्यांच्याकडूनही शक्यही नाही असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाईट वाटले

भिडे गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचे वरील वर्णन भारावुन जाण्यासारखेच आहे. मी हे नाव पहिल्यांदाच ऐकले असले तरी वरील वर्णनावरुन (संघटन गुण, स्मरण शक्ती, बुद्धीमत्ता, चिकाटी, वक्तृत्व) ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व असावे असा अंदाज येतो. इतक्या टॅलेंटेड माणसाने जोधा अकबर नामक हिंदी सिनेमा बंद पाडण्यासाठी पोलिसांच्या लाठ्या खाव्यात ह्यापेक्षा आपल्या क्षमतेचा अधिक दुरुपयोग तो काय?

एखाद्या जात्याच हुशार मुलाला आई वडील 'अभ्यास कर! उनाडक्या करण्यात तुझी हुशारी वाया घालवू नकोस' असे सांगतात तेव्हा त्यांनी भिड्यांचे उदाहरण द्यावे.

पटण्यासारखे उत्तर

विशेष करून हा भाग...

एखाद्या जात्याच हुशार मुलाला आई वडील 'अभ्यास कर! उनाडक्या करण्यात तुझी हुशारी वाया घालवू नकोस' असे सांगतात तेव्हा त्यांनी भिड्यांचे उदाहरण द्यावे.

रामराम

गुंडोपंताच्या प्रतिसादातील वैयक्तिक उल्लेख, पुंगळी करणे इत्यादी येथील संपादक मंडळाला आक्षेपार्ह वाटले नाहीत याचे आश्चर्य वाटले. शेवटी इथेही "All men are equal but some are more equal than others" याचा प्रत्यय आला. जॉर्ज ऑर्वेलच्या दूरदृष्टीला त्रिवार प्रणाम. ही लोकशाहीची व्याख्या मान्य नसल्याने हा या संकेतस्थळावरचा माझा शेवटचा प्रतिसाद.
कलोअ
राजेंद्र
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

वरील प्रतिसाद ज्यावेळेस आले त्यावेळेस संपादन मंडळ कार्यरत असेलच असे नाही. विनाकारण वैयक्तिक उल्लेख आणि व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद उपक्रमावरून अप्रकाशित करण्यात येतात. या कामास संपादकांच्या उपलब्धतेप्रमाणे थोडा-फार काळ लागण्याचा संभव आहे. सध्या मूळ प्रतिसाद आणि त्या अनुषंगाने येणारे उपप्रतिसाद अप्रकाशित केले आहेत. सदस्यांची नावे घेऊन व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद दिले गेले त्याबद्दल संपादन मंडळाला खेद वाटतो. उपक्रमाचा मंच एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी नाही याची सर्व सदस्यांनी जाणीव ठेवून कृपया सहकार्य करावे. -- संपादन मंडळ.

काय करणार?

काय करणार? पेटून प्रतिसाद दिला होता...
असो,
राजेंद्र इतका काही वैयक्तिक घेवू नको बाबा...
पण तूम्ही लोक पण सारखीच टवाळी या लेखकांना बुली करताय असे नाही का वाटत?
जिव्हारी लागले असेल तर क्षमा करा.

आपला
गुंडोपंत

काय करणार!

१) अचपळ मन माझे नावरे आवरिता
२) स्वतःला विवेकात जखडून घेणे किती अवघड असत ना
३) स्वत:ला संतुलित ठेवताना सगळी शक्ती खर्च होते. मग काय आउटपुट देणार?
४) ज्याच जळत त्याला कळतं
५) तुम्ही बसा हस्तीदंती मनोर्‍यात
६) आम्ही पुष्कळ जात धर्म पंथ मानत नाही पण इतरांच्या मानण्याने आम्हाला हानी/धोका पोचतो त्याच काय? वाहतुकीचे नियम तुम्ही पुष्कळ पाळाल हो पण मागच्याने नाही पाळले तर नुकसान कुणाचे होणार आहे?
७) काय विवेकी /संयमित/ सनसशीर घेउन बसलात? त्याची दखल घेतली असती तर आम्हाला कशाला आकांडतांडव करावे लागले असते? नुसते सनदशीर निवेदन दिले असते तर साधी बातमी तरी आली असती का?
८) भरल्या पोटी तत्वज्ञान सुचते. उपाशी राहून बघा बरं.
९) दोन रेड्यांच्या मस्तीत शेतकर्‍याचे भरल्या पिकाचे नुकसान होते त्याचे काय?
काय करणार? गुंडोपंत सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाही. म्हणुन सोपा उपाय प्रश्नचिन्ह काढा आन उदगार चिन्ह घाला. नंतर पुर्ण विराम द्या नाही तर हे असच चालायचं.अनेक पिढ्या सुडाच्या चक्रव्युहात बरबाद होतील्.
भाकित (शाप)- जो कुणी जास्त प्रश्न विचारेल तो स्किझोफ्रेनिक होईल.
प्रकाश घाटपांडे

विनंती

राजेंद्रराव, तुमचे प्रतिसाद/लेख मी नेहमी वाचतो..तुमच्या लेखनातुन अनेक इंटरेष्टींग दुवे पण पहायला मिळतात..आणि आता तो गुंडोपंतांचा वादग्रस्त प्रतिसाद देखिल काढून टाकला आहे तेव्हा तुम्ही कृपया लिहायला सुरूवात करावी ही विनंती!

आभार

अधिक विचारांती मी वरील निर्णय मागे घेत आहे. मला या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी ज्या मित्र-मैत्रिणींनी व्यनि/विरोप/खरडी पाठवल्या त्यांचे अनेक धन्यवाद.
कलोअ
राजेंद्र

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सर्व बाजू दिसल्या

हा लेख व त्याखालील प्रतिसाद यांमुळे प्रश्नाच्या बहुधा सर्व बाजूंवर प्रकाश पडला. "उपक्रमा"वरील अशी वहिवाट मला आदर्श वाटते.
माझे वैयक्तिक मत त्यात विशेष भर टाकणारे नाही, पण पूज्य संभाजीराव गुरुजींचा निषेधाला मोठे सार्वजनिक स्वरूप देण्याचा प्रकार संभाजी ब्रिगेड इतकाच अयोग्य वाटला एवढेच नोंदवतो. पोलिसी अत्याचारसुद्धा अपरिहार्य नसावेत असे वाटले.
बाकी हल्लीच्या "परिस्थिती काहीही असो, प्रेझेंटेशन प्रभावी हवे" च्या युगात कोणीही (मग एखाद्या महान हेतूने किंवा ध्येयासाठी का असेना) खोटे बोलू शकतो हे अगदी मान्य. पण यात हल्लीच्या युगाला तरी नावे कशाला ठेवावीत? (प्रियालीताईंनी लिहिल्याप्रमाणे) धर्मराज व स्वतः कृष्ण यांची उदाहरणे आहेतच की.
- दिगम्भा

हायजॅक्ड प्रतिक्रिया

माझ्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार भिडे यांनी कधीही राजकीय पक्षांशी हातमिळवणी केली नाही किंवा कधी राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. उलट तथाकथित हिंदुत्त्ववादी राजकारणी त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असत. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जी प्रतिक्रिया उमटली ती राजकीय पक्षांनी राजकीय मायलेजसाठी हायजॅक केली.

पाहा सकाळमधील बातमी अवैध धंदेवाले, गुंड दंगलींत आघाडीवर

सांगली, ता. २७ - हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुरवातीला दगडफेक केली; पण नंतर अवैध धंदेवाले आणि गुंड अग्रेसर झाले होते. त्यांनी शहरात दिवसभर हैदोस घातला अन्‌ पोलिसांनीही दिसेल त्या दंगलखोरांऐवजी निरपराधींना मारहाण करून धुडगूस घालून खाकी वर्दीची नशा दाखवून दिली. ....
जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी अवैध धंदे बंद केले आहेत; त्यामुळे त्यांच्यावर गुंड आणि अवैध धंदेवाल्यांचा राग आहे. त्यांनी तो आजच्या दंगलीच्या निमित्ताने काढला. हिंदुत्ववादी संघटनांपेक्षा अवैध धंदेवाले आणि गुंडच दगडफेक करण्यात अग्रेसर होते. दिवसभर शहरात दगडफेक सुरू होती. पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वारंवार लाठीमार केला; पण आंदोलकांऐवजी बघ्या लोकांनाच झोडपून काढले. दुपारी तीन वाजता शहर शांत झाले होते; पण नव्याने भरती झालेले पोलिस कर्मचारी जिप्सी गाडीतून भरधाव वेगात फेरफटका मारत दिसेल त्याला मारहाण करीत होते. पोलिसांच्या भीतीने पळून जाणाऱ्यांचा पाठलाग करून त्याला खाली पडेपर्यंत मारहाण सुरू होती; त्यामुळे लोक आणखी भडकले आणि पुन्हा दगडफेकीला सुरवात झाली. दुपारनंतर पोलिसांनीच तणाव निर्माण करण्यास दंगलखोरांना प्रवृत्त केले. शासकीय रुग्णालयात पोलिसांनी धुडगूस घातला होता. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनाही पोलिसांनी झोडपले. काही डॉक्‍टर, कर्मचारीही त्यांच्या मारहाणीतून सुटले नाहीत. पोलिसांनी दगडफेक करणारे अथवा दंगल घडवून आणणाऱ्यांवर लाठी उगारण्याचे धाडस न करता निरपराधींना झोडपून काढून खाकी वर्दीची नशा दाखवून दिली.

सकाळमधील आणखी एक बातमी

'हुल्लडबाजी नको, शांत राहा' - संभाजीराव भिडे
सांगली, ता. २८ - शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी शहरात चाललेल्या हुल्लडबाजीला कडाडून विरोध करीत या पुढे असे प्रकार खपवून घेणार नसल्याचे स्पष्टपणे बजावले. ते म्हणाले, ""शिस्त आणि संयम पाळणारे आपण शिवबाचे मावळे आहोत. हा अध्याय संपला आहे. आता या पुढे संघटना आपल्या विहित कार्याला वाहून घेईल.

खुलासा

माझ्या "ह्या नौटंकीच्या औलादीला..." या लेखावर प्रतिसादांमध्ये बरीच चर्चा झाली. चर्चेत माझ्या वैयक्तिक वैचारिक भूमिका/पातळीपासून ते संभाजीरावांच्या लहानमोठेपणापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा झाली.

प्रतिसादांवर प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसे प्रतिसाद जमले आहेत असे समजून लिहित आहे - (समजूत ही एक सापेक्ष गोष्ट आहे आणि निखळ सत्त्याबाबत सात आंधळ्यांची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. अर्थात जे लोक स्वतःला आंधळा मानत नाहीत त्यांबाबत मी बोलणार नाही. )

*********************************************************************

मी संभाजीरावांबद्दल का लिहिले?
या संकेतस्थळावर श्री. गणेश तांबे यांनी दिलेल्या सनातन प्रभात या वृत्तपत्रातील बातमीवजा लेखाला खूप प्रतिसाद आले. गणेश तांबे यांच्या या पूर्वीच्या येथील लेखनामुळे आणि सनातन प्रभात या वृत्तपत्राची एकांगी विचारसरणी जगजाहीर असल्याने एका पक्षाची बाजू आपोआपच कमकुवत झाली. त्या लेखाला आलेल्या प्रतिसादांत संभाजी भिडे ही व्यक्ती म्हणजे एक खलनायक असून त्यांच्यामुळे सांगलीसारख्या पांढरपेशा, सुसंस्कृत गावाला (नुकतेच साहित्य संमेलन...) काळीमा लागला असा सूर उमटला. तसेच पोलीस कारवाईचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले.(चोर सोडून संन्याशाला फाशी.)

प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते.
मी स्वतःला (नशेत नसताना) संतुलित(!) समजत असल्यामुळे( :)) आणि संभाजीराव भिडे या व्यक्तीशी माझा एक सामान्य माणूस म्हणून थोडासा संपर्क आल्यामुळे या व्यक्तिमत्वाबद्दल असलेली माझी समजूत (जी चांगली आहे) वाचकांपुढे मांडावी असे वाटले.

माझे वैचारीक आधिष्ठान काय?
असला जडजंबाळ शब्द वापरून मला माझीच लाज काढायची नाही. थोडासा विचार करू शकणारा एक सामान्य माणूस इतकीच माझी ओळख. बुद्धीवादी ही पदवी घेणारी माणसे माझ्यापेक्षा वेगळी असतात.

धर्माबदल बोलायचे झाल्यास मी जन्माने हिंदू असलो तरी हिंदू धर्मातील अनेक गोष्टी मला मान्य नाहीत. जातीप्रथा, अंधश्रद्धा, देवालयांमधील अस्वच्छता, वैचारीक मागासलेपणा, चमत्कार, बुवाबाजी,दांभिकपणा इ. अनेक. (उरलेल्या अनेक गोष्टी मला मान्य आहेत असाही याचा अर्थ होतोच!) मी ज्ञानेश्वरांना मानतो ते त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी. भिंत चालवली म्हणून नव्हे. पण संतांनी स्वतःची जात प्रिय आहे असे म्हणण्यापेक्षा (त्यांनी) जातीप्रथेविरुद्ध विद्रोह केला असता तर जास्त बरे झाले असते हेही पटते. तिरुपतीचा पैशांचा बाजार पाहून मी तिथे पुन्हा जाणार नाही. साई, अनिरुद्ध, रविशंकर, नरेंद्र इ. बाबांना मानत नाही. शिर्डीला कधीच गेलो नाही. देवळांपेक्षा मला चर्च आवडतात. वगैरे... डॉ. आंबेडकरांसारखे किंवा सावरकरांसारखे धर्मावर कोरडे ओढण्याचे सामर्थ्य आणि मोठेपण माझ्याअंगी नाही. इतर धर्मांबाबतही माझी काही मते आहेत. इतर धर्मातही काही चांगल्या-वाईट बाबी आहेतच.तरीही हिंदू धर्म हा सापेक्षतेने सर्वसमावेशक, मतसहिष्णू धर्म आहे असे वाटते. सांप्रत काळात धर्माची गरज काय? यावरही माझी काही मते आहेत. कोणताही धर्म परीपूर्ण नाही असा ठाम विश्वास असल्याने आणि कागदोपत्री 'अधार्मिक' असा उल्लेख करता येतो की नाही तेही माहित नसल्याने मी हिंदू म्हणूनच मरणार. (कदाचित येत्या तीस-चाळीस वर्षात एखादा परीपूर्ण धर्म नव्याने निर्माण झाला किंवा कोणत्याही इतर धर्माने मला ठार करण्याची धमकी दिली तर हा विचार बदलू शकेल. इतरही काही शक्यता असू शकतील.)

माणूस हा विचारशील प्राणी आहे. तो सातत्याने कसला तरी विचार करत असतो. त्यामुळे एखाद्या वयात (उदा. विशीत) माणसावर जे वैचारीक संस्कार होतात तेच घट्ट रहातात आणि त्यावेळी वाटणारे आदर्श मनात कायमचे ठाण मांडतात हा विचार मला पटत नाही. समज येण्याच्या काळापासून ते मृत्यूपर्यंत माणसाचे विचार आणि समज दोन्ही बदलत जातात, तसेच त्याचे आदर्शही! मला स्टॅलिन,अलेक्झांडर, हिटलर, सावरकर यांच्यापासून लिओनार्दो , टॉलस्टॉय, गांधी, बुद्ध यांच्यापर्यंत अनेक व्यक्ती प्रभावी वाटल्या. कम्युनिझम नॅशनॅलिझमपासून ते पॅन-इस्लामिझमपर्यंतचे इझम महत्वाचे वाटले. प्रत्येकात काही गुण-दोष होते हे स्पष्टच आहे.

थोडक्यात, मी एक मध्यममार्गी, मवाळ आहे. (काही लोक याला मिडिऑकर, कुंपणावरचा शहाणा किंवा कातडीबचाऊ म्हणतात याची मला कल्पना आहे.ती त्यांची समजूत असावी. मी तिचा आदरच करतो.)
हे सारे सांगण्याची गरज पडण्याचे कारण हे की माझा चष्मा कोणत्या रंगाचा आहे किंवा नाही ते वाचकांना कळावे. अन्यथा लेखनातील विश्वासार्हता कमी होते.

'ह्या नौटंकीच्या...' लेखामागची भूमिका काय?
संभाजीराव भिडे ही एक सत्त्वशील चारित्र्याची व्यक्ती असून ती पोलिसांवर खोटे आरोप करणार नाही. केवळ निदर्शने, दबाव आणि वाटाघाटी करून जोधा-अकबर हा चित्रपट सांगलीत बंद करणे इतकेच त्यांच्या आंदोलनाचे उद्दिष्ट होते. संभाजीरावांना अकारण लाठीहल्ल्याला समोरे जावे लागले. संभाजीराव अत्यवस्थ आहेत अशी भूमका सांगलीत उठली. सांगलीतील दंगल भिडे यांना झालेल्या मारहाणीचे वृत्त पसरल्यानंतर झाली.(http://www.esakal.com/esakal/02282008/Kolhapur0E82208C34.htm. फोटोखालील ओळ पहा.) ती पूर्वनियोजीत नव्हती.दंगल घडवून आणण्यामागे संभाजीरावांचा 'हात' नसावा. तिचे खापर संभाजीरावांवर फोडणे अयोग्य आहे. त्यामुळे या माणसाची वेगळी ओळख करून देणे ही या लेखामागची भूमिका होती.

याला अनेक पुरावे आहेत. मी तो लेख लिहिण्यापूर्वी सांगलीतील काही लोकांशी बोललो. त्यात सी.पी.आय.च्या लोकांचाही समावेश आहे. प्रत्यक्ष साक्षीदार आणि छायाचित्रे याआधारे हे स्पष्ट दिसते की त्रिमूर्ती आणि सिनेप्लेक्स या दोन्ही चित्रपटगृहांची मोडतोड झालेली नाही. हे शक्तीप्रदर्शन नव्हते. तसेच प्रत्यक्ष धरपकड आणि लाठीमाराच्यावेळी कार्यकर्त्यांकडे कसलेच शस्त्र नव्हते. दै. सकाळ आणि दै. पुढारी या दोन्ही वृत्तपत्रांतून पोलीस कारवाईला दंगलीसाठी दोषी धरलेले आहे. इतकेच काय? पण नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, "हे शिवप्रतिष्ठानचे निदर्शन होते हे मला माहीत नव्हते, मी पुणे दौर्‍यावर होतो, शहरात गडबड सुरू असल्याचे कनिष्ठांकडून समजले म्हणून अचानक परत यावे लागले, त्यामुळे चुकून हा मारहाणीचा प्रकार घडला" असे गुळमुळीत उत्तर पोलिस अधीक्षक श्री. कृष्णप्रकाश यांनी दिले. (http://www.esakal.com/esakal/02282008/Kolhapur2623D8EF86.htm) श्री. कृष्णप्रकाश यांनी जत येथे असाच अमानुष मारहाणीचा प्रकार यापूर्वी केला होता.

झालेल्या दंगलीत नेहमीप्रमाणे श्री. कृष्णप्रकाश यांच्या कारवायांमुळे हवालदिल झालेल्या अवैध धंदेवाले-गुंड पुंडांनी पुरते हात धुऊन घेतले. संभाजीराव भिडे यांना शांततेने अटक करून ही दंगल पोलिसांना टाळता आली असती.(http://www.esakal.com/esakal/02282008/Kolhapur62A9B8EFA6.htm)

उलट दंगल झाल्याने संभाजीराव भिडेंसारख्या सत्शील माणसाच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले असे माझे मत झाले. ते थोडे साफ करण्याचा हेतू या लेखामागे होता.

जोधा-अकबर या चित्रपटावर बंदी योग्य आहे काय?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोग्य आहे. इतर भाजपा शासित राज्यांचे सोडा, पण उत्तरप्रदेशासारख्या बसपा शासित राज्यात त्यावर बंदी घालण्यात आली याचा अर्थ मतांचे राजकारण करणार्‍या पक्षांना एक बहुसंख्य गट चित्रपटाच्या कथेवर नाराज आहे हे मान्य होते असे दिसते.
एखादा बहुसंख्य गट एका कलाकृतीवर, एका विचारावर रुष्ट आहे हे दिसताच त्यावर बंदी घालण्याचा पायंडा पडत चालला आहे. तो अनिष्ट आहे, हा एक भाग झाला.

खरीखोटी गुह्यछिद्रे शोधून किंवा खरीखोटी रंगसफेदी करून नवे ऐतिहासिक 'संशोधन' करण्याचेही काही लोकांनी मनावर घेतलेले दिसते. तसेच 'घटं भिंद्यात्... प्रसिद्धपुरुषोभवेत्' हे चार्वाकाच्या नावावरचे वचन काही लोकांनी अंगी बाणवलेले आहे. त्यामुळे इतर कुणाला दु:ख होत असेल याची पर्वा ते करत नाहीत. (अगदी साधे उदाहरण - 'अमक्या तमक्याची बायको/मुलगी चालू आहे' हे वाक्य चविष्टपणे चघळणार्‍यांनी त्याजागी स्वतः आहोत अशी कल्पना करावी.) एका धर्माच्या प्रेषिताची टिंगल करणारी व्यंगचित्रे केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी काढणे हे साफ चुकीचे आहे. सद्य समाजात स्त्रियांच्या विवस्त्र चित्रांनासुद्धा (न्यूड्स) स्त्रीसंघटनांचा विरोध असतो. अशा प्रकाशचित्रांवर तर बंदीच आहे. वैदिक काळातील स्त्रिया अंतर्वस्त्रे परिधान करत नसत किंवा सरस्वतीतील मातृत्त्वाने मला आकर्षित केले असे म्हणून तिचे (एका धार्मिक देवतेचे) विवस्त्र चित्र आजच्या काळात काढणे हेही गैर आहे असे मला वाटते. एका विपर्यस्त चर्चेबद्दल परवा-परवा राहूल गांधींनी एका संकेतस्थळावर कारवाई केल्याचे ऐकीवात आहे. याचा सामाजिक पातळीवर शांततामय विरोध झाला पाहिजे. हिंसक विरोध नव्हे. कोणताही विचार किंवा कलाकृती हा सम्यक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवूनच जनतेसमोर आला पाहिजे. हा या विचाराचा दुसरा भाग.

टाळी दोन हातांनी वाजते.

जोधा अकबर हा चित्रपट कलात्मकदृष्ट्या उत्कृष्ट आणि भव्य आहे हे खचित. गोवरीकरांनी व्यक्तीरेखाही चांगल्या रंगवल्या आहेत . चित्रपट अ वर्गात मोडणारा आहेच आहे.

पण..जोधा ही अकबराची स्नुषा होती असाही प्रतिवाद इतिहासात आहे. (जेम्स टॉड - http://en.wikipedia.org/wiki/Annals_and_Antiquities_of_Rajasthan )
(http://timesofindia.indiatimes.com/India/Trade_not_invasion_brought_Isla...) तसेच त्यात जोधाबाई ही अंबेरचा राजा भारमलची मुलगी नसून मारवाडचा राजा उदयसिंगची मुलगी होती आणि तिचे अकबरपुत्र जहांगीर याच्याशी लग्न झाले होते असा सबळ दावा आहे.

चित्रपटात जोधा-अकबर यांचे परस्परांवर विवाहपूर्व प्रेम होते हा भाग निखालस खोटा आहे. चित्रपटकारांनी हा चित्रपट इतिहासाचे संशोधन करून काढला आहे अशा आशयाची माहिती प्रसृत केली होती. आता विरोधी आंदोलने झाल्यावर यातील ३०% भाग खरा असून बाकी फक्त कल्पनाविलास आहे असे ते म्हणतात. तसेच हा चित्रपट सुरू होण्याआधी अकबराच्या राणीचे नाव काय होते त्याबद्दल त्यांनी पडद्यावर त्याचा अव्हेर केला आहे असेही ते म्हणतात.(पहा : विकीपेडिआ- जोधा अकबर)

पण मग त्यांनी ऐतिहासिक नावे का घेतली? आमिरखानच्या 'लगान'सारखा एक भव्य काल्पनिक चित्रपट काढायचा होता. चित्रपट पहाणारे अर्धशिक्षित लोक इंग्रजी आणि हिंदीतली 'डिस्क्लेमर' वाचतात काय आणि वाचली तरी त्याचा अर्थ त्यांना कळतो का? चित्रपट पहाणार्‍या बहुसंख्य लोकांची 'हा खरा इतिहास आहे' अशी समजूत होऊ शकेल की नाही? हे प्रश्न अनुत्तरीत रहातात.

त्यात सेन्सॉरच्या आजच्या नियमात न बसणारे हिंसा किंवा प्रणय चित्रपटात नाहीत. चित्रपटकथा खरी ऐतिहासिक आहे की नाही ते सेन्सॉर पहात नाही.त्यामुळे सेन्सॉरने त्यात काहीच सुधारणा/आक्षेप सुचवले नाहीत. पण चित्रपटकथाच मुळात चुकीच्या पायावर उभी केलेली असल्याने नावासकट पूर्ण चित्रपट खोटा ठरतो.

अर्थात 'गतंगतः' किंवा 'तो चित्रपट लोक तीन तासात विसरून जातील' असे म्हणून इतिहासाचा विपर्यास मान्य करायचा असेल तर प्रश्नच नाही. पण काही लोकांना तो मान्य नाही हे स्पष्टच आहे.

मग ज्यांना तो चित्रपट मान्य नाही अशांनी चित्रपट कायद्यात बसतो म्हणून त्याला मूक संमती द्यायची का? किंबहुना हा इतिहासाचा विपर्यास आहे हे केवळ या विरोधामुळे सामान्य माणसांपर्यंत पोचले. नाहीतर हाच खरा इतिहास आहे असे माझ्यासारख्या अनेकांना वाटले असते. अकबराबद्दल पूर्ण आयुष्यात तीन पाने वाचणार्‍या माणसाकडून आणखी काय अपेक्षा करणार?

पुढे जाऊन इतिहास शिकून काय दिवे लागणार आहेत? असाही प्रश्न उभा रहातो. ती प्रश्नांची रांग पुढे आहेच.

कदाचित चित्रपटाचे नाव " जोधा अकबरः एक काल्पनिक प्रेमकहानी" असे ठेवल्याने सगळा अनर्थ टळला असता.(ही माझी समजूत आहे.)

हे सारे माझे विचार आहेत. संभाजीरावांनी काय विचार केला ते मी सांगू शकणार नाही.

संभाजीरावांचे मोठेपण माझ्या लेखामुळे 'एस्टॅब्लिश' होत नाही त्याचे काय?
तो माझा दोष आहे. माझा आणि त्यांचा थेट संपर्क फारतर तीस मिनिटांचा असेल. बाकी ते दुरून इतरांना दिसतात तसेच मला दिसले.

एखादा आयुर्विमा प्रतिनिधी किंवा आणखी कोणी हजारो लोकांची नावे लक्षात ठेवत असेल तर ते नक्कीच स्पृहणीय आहे. तो 'करोडपती' पोटार्थी असतो हा भाग निराळा.
कविता महाजनांचे 'ब्र' वाचल्यापासून समाजसेवकांबद्दल फारसा आदर राहिला नाही. प्रत्येक समाजसेवक समाजाची सेवा करण्यासाठी पगार घेत असेल अशी शंका येते.
स्वतःचा अहंभाव कुरवाळता येतो म्हणूनही आपले आयुष्य समाजकार्यात वाहून घेणारी माणसे आहेत.
त्यांना शासनदरबारी पद्मश्री किंवा वरच्या पदव्या मिळतात. प्रसिद्धी मिळते. जागतिक परिसंवादात भाग घेण्यासाठी बोलावणी येतात. एखाद्या गावात दारूबंदी झाली तर बातम्या येतात.असो.
(एखादा समाजसेवक जितका अप्रसिद्ध तितका तो चांगला समाजसेवक... :))

जो उच्चविद्याविभुषित, विद्वान माणूस स्वतःसाठी एकही पैसा न खर्च करता, स्वतःला विसरून, - कसल्याही मानसन्मानाची किंवा राजकीय लाभाची अपेक्षा न ठेवता समाजकल्याणासाठी आहोरात्र धडपडतो, आपल्या समाजकार्यामुळे आपल्या कुटुंबाला झळ पोहोचू नये आणि कुटुंबामुळे समाजकार्याला झळ पोचू नये म्हणून अविवाहित रहातो-
तो केवळ हिंदुत्ववादी आहे या एकाच निकषावर मोठा नाही असे म्हणणे अन्यायाचे ठरेल.
त्याने त्याचा अहंभाव कुरवाळण्यासाठी हे सारे केले असे म्हटले तर अपेक्षित प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.

'शिस्त आणि संयम' हा ज्याचा स्थायीभाव आहे असा हा माणूस, मार खाल्ल्यावरही 'हुल्लडबाजी खपवून घेणार नाही' असा इशारा आपल्याच साथीदारांना देतो तेंव्हा १९४२चे आंदोलन मागे घेणारे गांधीजी आठवतात. असो.

धार्मिक संघटना म्हणाल तर आजवर झालेल्या कोणत्याही धार्मिक वादात शिवप्रतिष्ठानचं नाव आलेलं नाही. इतकेच काय, झालेल्या या दंगलीत इतरधर्मीयांवर रोख नव्हता.

'घटं भिंद्यात्... प्रसिद्धपुरुषोभवेत्' या वचनाप्रमाणे आजवर संभाजीराव चालले असते तर ते आजवर कित्येकदा बातम्यांमध्ये झळकले असते. चारदोन पत्रकारांना हाताशी धरून मुलाखती प्रसिद्ध केल्या असत्या तरी पुरे होते. असल्या दंगली करण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. (शिवाय ही दंगलसुद्धा त्यांनी केलीच नाही हा भाग वेगळा.)

आणि त्याहीपलिकडे जाऊन असे म्हणावेसे वाटते की ज्यादिवशी त्यांच्या चारित्र्याबद्दल कसलीही वदंता कानी पडेल त्यादिवशी त्यांच्याबद्दल असलेला जनमानसातील विश्वास आपोआपच नाहीस होईल.

मग संभाजीराव भिड्यांनी असल्या क्षुल्लक वादात पडायचेच कशाला?

त्यांनी याबाबत विचार केला असावा. समग्र समाजावर या चित्रपटाचा काय दूरगामी परिणाम होईल याचा विचार करून हिंदुत्त्ववादी विचारसरणीला योग्य वाटलेला तो निर्णय ( जो माझ्या दृष्टीने चुकीचा) होता. पण त्यांचा शांततामय निदर्शने करण्याचा हक्क का हिरावून घ्यावा? त्यांच्याबरोबर पोलिसांचा फौजफाटाही होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अटक करताना त्यांनी विरोध केला नाही. . अशी आंदोलने नेहमी सुरू असतात. पोलीस निदर्शन करणार्‍यांना चक्क एस्टी बसमधून ठाण्यावर नेतात. गुन्हा नोंदवून किंवा समज देवून सोडून देतात. कोणत्याही "ऍक्टिव्हिस्ट"च्या अंगवळणी पडलेली ही गोष्ट आहे. पण इथे परिस्थितीची पूर्ण जाणीव नसलेल्या एका पोलिस उच्चाधिकार्‍याच्या आततायी लाठीमाराने विरोधी प्रतिक्रिया उमटली. संभाजीराव स्वतः इस्पितळात (गेले) नसते तर ही दंगल झाली नसती.

संभाजीरावांना रस्त्यावर पाडून काठीने बदडण्याइतका तो काही 'गयागुजरा' माणूस नाही. संभाजीरावांबद्दल आदर असणारी माझ्यासारखी असंख्य माणसे आहेत. पण आदर म्हणजे (अंध)श्रद्धा नव्हे. त्यांच्या पाठीवर पडणार्‍या प्रत्येक फटक्याबरोबर अनेकजण कळवळले असतील. त्यातले सर्वच काही कुंपणावरचे शहाणे नसणार. कट्टर, जहाल हिंदुत्ववादीसुद्धा असणार.

तरीही इस्पितळात दाखल केलेल्या संभाजीरावांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. हा माणूस समाजविघातक आहे, त्याने केलेले कृत्य गर्हणीय आहे असे कसे म्हणणार?

अर्थात एका 'अमुकतमुकवाद्याला' फटके बसले याचाच आनंद होत असेल तर तो वेगळा मुद्दा! त्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही. या प्रकारच्या काविळीला माझ्याकडे औषध नाही.

*********************************************************************

शेवटी माझा मूळ लेख किंवा प्रतिसादांना दिलेले हे उत्तर हा - "घटं भिंद्यात्..." चा माझा प्रयोग नव्हे.

इतके लिहिले तेच पुष्कळ झाले. जितक्या आहेत तितक्या ओळखींमध्ये मी संतुष्ट आहे. नाहीतरी सगळ्यांची नावं माझ्या लक्षात रहाण्याइतका मी मोठा नाही किंवा वीमाएजंटही नाही किंवा संघकार्यकर्ताही नाही! फक्त एक मिडिऑकर! (:))
असो. हा विषय माझ्या दृष्टीने इथे संपला. नाहीतर या लेखामुळे संभाजीरावांवर कोतेपणाचा आणि माझ्यावर हिंदुत्त्ववादाचा किंवा सवंग प्रसिद्धीचा नाहक आरोप व्हायचा.

रजा द्यावी.

समतोल प्रतिसाद

आपला प्रतिसाद समतोल आणि निष्पक्ष वाटला.

  • संभाजीराव अत्यवस्थ आहेत अशी भूमका सांगलीत उठली. सांगलीतील दंगल भिडे यांना झालेल्या मारहाणीचे वृत्त पसरल्यानंतर झाली.(http://www.esakal.com/esakal/02282008/Kolhapur0E82208C34.htm. फोटोखालील ओळ पहा.) ती पूर्वनियोजीत नव्हती.दंगल घडवून आणण्यामागे संभाजीरावांचा 'हात' नसावा. तिचे खापर संभाजीरावांवर फोडणे अयोग्य आहे. त्यामुळे या माणसाची वेगळी ओळख करून देणे ही या लेखामागची भूमिका होती.
  • पण नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, "हे शिवप्रतिष्ठानचे निदर्शन होते हे मला माहीत नव्हते, मी पुणे दौर्‍यावर होतो, शहरात गडबड सुरू असल्याचे कनिष्ठांकडून समजले म्हणून अचानक परत यावे लागले, त्यामुळे चुकून हा मारहाणीचा प्रकार घडला" असे गुळमुळीत उत्तर पोलिस अधीक्षक श्री. कृष्णप्रकाश यांनी दिले. (http://www.esakal.com/esakal/02282008/Kolhapur2623D8EF86.htm) श्री. कृष्णप्रकाश यांनी जत येथे असाच अमानुष मारहाणीचा प्रकार यापूर्वी केला होता.
  • पण मग त्यांनी ऐतिहासिक नावे का घेतली? आमिरखानच्या 'लगान'सारखा एक भव्य काल्पनिक चित्रपट काढायचा होता. चित्रपट पहाणारे अर्धशिक्षित लोक इंग्रजी आणि हिंदीतली 'डिस्क्लेमर' वाचतात काय आणि वाचली तरी त्याचा अर्थ त्यांना कळतो का? चित्रपट पहाणार्‍या बहुसंख्य लोकांची 'हा खरा इतिहास आहे' अशी समजूत होऊ शकेल की नाही? हे प्रश्न अनुत्तरीत रहातात.
  • जो उच्चविद्याविभुषित, विद्वान माणूस स्वतःसाठी एकही पैसा न खर्च करता, स्वतःला विसरून, - कसल्याही मानसन्मानाची किंवा राजकीय लाभाची अपेक्षा न ठेवता समाजकल्याणासाठी आहोरात्र धडपडतो, आपल्या समाजकार्यामुळे आपल्या कुटुंबाला झळ पोहोचू नये आणि कुटुंबामुळे समाजकार्याला झळ पोचू नये म्हणून अविवाहित रहातो-तो केवळ हिंदुत्ववादी आहे या एकाच निकषावर मोठा नाही असे म्हणणे अन्यायाचे ठरेल. त्याने त्याचा अहंभाव कुरवाळण्यासाठी हे सारे केले असे म्हटले तर अपेक्षित प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही.
  • धार्मिक संघटना म्हणाल तर आजवर झालेल्या कोणत्याही धार्मिक वादात शिवप्रतिष्ठानचं नाव आलेलं नाही. इतकेच काय, झालेल्या या दंगलीत इतरधर्मीयांवर रोख नव्हता.
  • त्यांनी याबाबत विचार केला असावा. समग्र समाजावर या चित्रपटाचा काय दूरगामी परिणाम होईल याचा विचार करून हिंदुत्त्ववादी विचारसरणीला योग्य वाटलेला तो निर्णय ( जो माझ्या दृष्टीने चुकीचा) होता. पण त्यांचा शांततामय निदर्शने करण्याचा हक्क का हिरावून घ्यावा? त्यांच्याबरोबर पोलिसांचा फौजफाटाही होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अटक करताना त्यांनी विरोध केला नाही. . अशी आंदोलने नेहमी सुरू असतात.अर्थात एका 'अमुकतमुकवाद्याला' फटके बसले याचाच आनंद होत असेल तर तो वेगळा मुद्दा! त्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही. या प्रकारच्या काविळीला माझ्याकडे औषध नाही.

या सर्व मुद्यांनंतर शेवटी आपण "आय रेस्ट माय केस" असे म्हणणेच योग्य आहे. येथील वाचकांनी पण या सर्व मुद्यांचा शांत डोक्याने आणि पूर्वग्रहदुषित न राहता विचार करावा अशी विनंती कराविशी वाटते.

एकच प्रश्न

तुम्ही रजा घेतली आहे पण तुमची केस कोणाला चालवावीशी वाटली तर हरकत नाही.

मुघलेआजम चित्रपट हल्लीच नव्या प्रिंटेत दाखवण्यात आला. तुफान चालला. मी स्वतः पाहिला. त्यातही जोधा-अकबर होते. तेव्हा ही बंदी का नाही घालण्यात आली? गोवारीकर गेले वर्ष दिडवर्ष तर चित्रपट बनवत असावेत. गाजावाजाही भरपूर झाला होता. गोवारीकरांनाच गाठायचे होते थेट. त्यांचा पैसा आणि श्रम वाचले असते. त्यांना जोधा-अकबरः मेरे दिमागकी ट्यूबलाईट असे काहीसे नाव देऊन सर्वांचाच मनस्ताप थांबवता आला असता.

मला भिड्यांबद्दल काहीही म्हणायचे नाही पण अगदी सुरूवातीपासून हा प्रश्न पडला होता.

-राजीव.

शक्यता...

'त्यांना ह्या एका चित्रपटाविषयी तात्विक भूमिकेतून विरोध करावासा वाटला, तर त्यांनी त्या दुसर्‍या चित्रपटाबद्दलही तसेच का केले नाही?' ह्याचे एक उत्तर म्हणजे ह्या भिडेंना ह्या प्रकरणात गोवारीकरांबद्दल काही वैयक्तिक आकस असेल. दुसरी शक्यता ही की ह्यातून त्यांना कुणीतरी [पक्षी: गोवारीकर/ आमिर खान इत्यादीपैकी एक अथवा अनेक-- ह्यांच्या शत्रूने] मुद्दाम (पैसे अथवा अन्य काहीतरी देऊन) हे घडवून आणले असेल. तिसरी शक्यता ही की अशा सगळ्या चित्रपट अथवा अन्य कलाकृतिंबद्दल भिडेंना माहिती नसेल. चौथी शक्यता ही की तशी ती त्यांना माहिती असली तरी त्या सर्व कलाकृतिंच्या जनकांशी जाऊन भिडण्याची त्यांची ताकद नसेल.

सर्वसामान्यपणे ह्यातील शक्यता क्र. एक व दोन असतील असे मलातरी वाटत नाही. आपणास असे वाटत असेल तर तसे सांगावे. शक्यता क्र. तीन अथवा विशेषतः क्र. चार असावी असे म्हटले तर फार चुकिचे ठरू नये. ह्यापेक्षा ह्या मुद्यांबद्दल काय सांगणार?

कुठल्यातरी सांगलीसारख्या दूरच्या शहरात समाजसेवेचे कार्य करणार्या भिडेंना गोवारीकरांच्या चित्रपटाची अगोदर कल्पना असणे फारसे संभव वाटत नाही.

सांगलीसारख्या दूरच्या शहरात???

>> कुठल्यातरी सांगलीसारख्या दूरच्या शहरात समाजसेवेचे कार्य करणार्या भिडेंना गोवारीकरांच्या चित्रपटाची अगोदर कल्पना असणे फारसे संभव वाटत नाही.

आँ??? सांगली म्हणजे काय समजलात काय? या अज्ञानजन्य सरसकटीकरणाचा निषेध असो.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर