ह्या नौटंकीच्या औलादीला...

"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...

ह्या नौटंकीच्या औलादीला
प.पू. वगैरे म्हणून डॉ. आठवले महाशयांनी त्यांच्यावर फारच अन्याय केला. आठवले गप्प बसले असते तर बरे झाले असते.

***

१९७३-७४ सालाच्या आसपास धाराशीव (उस्मानाबाद) या ठिकाणी पन्नाशी ओलांडणारा एक छपरी मिशावाला धोतर, टोपी आणि काखेला झोळी असा आवतारात आमच्या घरी आला होता. त्याच्याशी माझे वडील काही काळ बोलले होते. चार पाच वर्षे गेल्यावर त्या व्यक्तीचे नाव संभाजीराव भिडे असे होते असे मला समजले. ते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशीव जिल्हाप्रमुख होते हेही नंतरच समजले.
संघाशी आमच्या घराचा तो पहिलाच थेट संबंध! संघाचे एक तरूण (पूर्णवेळ प्रचारक) श्री. ग. म. महाजन तेंव्हा धाराशीवला रहायला आले होते. त्यांच्या जेवणाची सोय लावण्याच्या खटपटीत संभाजीराव होते. ती त्यांची आमच्या घराला पहिली आणि शेवटची भेट.

त्यानंतर संभाजीराव सांगलीला रहायला गेले.

***

'संभाजीराव भिडे' हे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी ! खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे (?) विद्यापिठातून एम. एस्सी. फिजिक्सचं सुवर्णपदक पटकावणारा हा माणूस खरंतर एखादा नामांकित वैज्ञानिक व्हायला पाहिजे होता. पण 'संघाचिया संगे' बिघडलेला हा माणूस नंतर कुठच्या कुठे पोचला. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तीमित करणारी बुद्धीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने- चोवीस तास - तीन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय - हा माणूस ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाचा तो गुरूच झाला- भिडे गुरुजी...

पुढे संभाजीराव संघाचे सांगली जिल्हाप्रमुख झाले. तिथे संघाच्या रोपट्याचा त्यांनी डेरेदार वृक्ष केला. प्रत्येक तालुक्याच्या गावागावात शाखा सुरू झाल्या.बघताबघता संभाजीराव सांगली जिल्ह्याचे गुरुजी झाले. आता सांगली जिल्हा हीच आपली आजन्म कर्मभूमी करायचे त्यांनी ठरवले. पण म्हणतात ना... दैव योजी दुसरे!
दुर्दैवानं त्याचवेळी ठाण्याचे संघाचे अध्वर्यू श्री. रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांच्या जागी तितकाच खंदा कार्यकर्ता संघाला हवा होता."संघटनमें शक्ती है!" ही संघाची घोषणा. तिथे व्यक्तीला किंमत नाही. संभाजीरावांना ठाण्याला कूच करण्याचा आदेश झाला. सांगली जिल्ह्यातलं काम अर्धवट टाकून जायला संभाजीराव तयार होईनात. 'आदेशाचं उल्लंघन' हा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. तेंव्हा पूर्ण आयुष्य ज्या संघाला वाहिलं त्यालाच रामराम ठोकण्याची पाळी संभाजीरावांवर आली. 'संभाजीरावांनी संघ सोडला' ही बातमी फारच धक्कादायक होती. कित्येक संघकार्यकर्ते हळहळले.

***
संभाजीरावांना असलेला संघाचा आधार गेला की संघाचा आधारस्तंभ ढासळला? कोणास ठाऊक? पण प्रचंड हिंमत आणि धडाडी असलेल्या संभाजीरावांनी सांगली जिल्ह्यात स्वतःच 'श्री शिवप्रतिष्ठान' नावाची संघटना काढली.
रा.स्व. संघाबद्दल बहुजन हिंदू समाजात 'ही बामणांची संघटना' असा सर्वसाधारण समज! त्यामुळे वैचारीक बैठक असूनही तीन टक्के समाजाची संघटना जनजागृती करायला पुरेशी नाही हे संभाजीरावांनी ओळखलं होतं. बहुजन समाजात जागृती घडवायची असेल तर त्यांना आपली वाटेल अशी संघटना पाहिजे.
त्यातूनच गडांच्या वार्षिक मोहिमा काढण्याची कल्पना त्यांना सुचली. शिवाय संघाच्या धर्तीवर दसर्‍याला 'दुर्गामाता दौड'!

साडेपाच फूट उंची, उन्हातान्हात रापलेल्या तांबूस काळसर वर्णं, पांढर्‍याधोप मिशा, धोतर आणि पांढरा सदरा अशा वर्णनाचा - सांगली राजवाडा भागात एका खोलीत पुस्तकांच्या ढिगार्‍यात रहाणारा - स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून जेवण करणारा पासष्ट -सत्तर वर्षांचा एक अविवाहीत म्हातारा - तोच बनला शिवप्रतिष्ठानचा सर्वेसर्वा!

***
बघता बघता जतपासून शिराळ्यापर्यंत आणि विट्यापासून मिरजेपर्यंत गावागावातले तरूण शिवप्रतिष्ठानाचे कार्यकर्ते बनले. दरवर्षी च्या मोहिमेत गडकोट पायाखाली घालणार्‍यांची संख्या हजारांत पोचली. "पोरगं गुरुजींच्या संगतीनं रांगेला लागतंय. व्यसनं करत न्हाई. आई-बाला मानतंय.", गावागावात गुरुजींचा आदर दुणावत चालला. विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या तालमी याच शिवप्रतिष्ठानच्या 'शाखा' झाल्या. संघटनेची ताकद इतकी वाढली की काँग्रेस, जनता पक्ष, भाजप - या पक्षांचे पुढारी संभाजीरावांची मनधरणी करू लागले. आजवर प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुर्गामाता दौडीत भाग घेतला आहे.
संभाजीरावांनी कुणाला जवळ केलं नाही. पण दूरही लोटलं नाही.
हळूहळू प्रतिष्ठान लगतच्या जिल्ह्यांतही मूळ धरू लागलं.

***

१९९२ साल असावं. कॉलेज संपलेलं. लहानपणी घडलेले संघाचे विचारही धुवून गेलेले. पण गिर्यारोहण करण्याची हौस होती! शिवप्रतिष्ठानच्या एका मोहिमेवर मीही गेलो होतो. मांढरदेवीपर्यंत एस्टीनं जाऊन तिथून चंदन-वंदन, पांडवगड, लिंगाणा आणि रायगडावर सांगता अशी ती मोहीम. तीन दिवसांची.
तीन हजार तरूण लोकांचा एक प्रचंड प्रवाह रांगा धरून गडांवर चढाई करत होता. आणि सर्वात मागून आमच्यासारख्या टंगळमंगळ करणार्‍यांना हाकलत चाललेला तो विक्षिप्त म्हातारा. ते अविस्मरणीय दृष्य कोणीही आयुष्यात विसरणार नाही.
......................................
रायगड! संध्याकाळची वेळ. सूर्य अस्ताचलाशी लगट करत होता. कवठे महांकाळहून आलेल्या धनगर कार्यकर्त्यांनी गंभीर घुमणार्‍या ढोलांनी वातावरण भारून टाकलं. जनता पार्टीचे सांगलीचे खासदार(?) संभाजी पवार (जात्याच पैलवान) काहीतरी बोलले. पोरांना चांगलं वळण लावल्याबद्दल भिडे गुर्जींचे आभार मानले.
आणि मग संभाजीराव भिडे - तीन हजारांचा तो समुदाय श्वास रोखून त्यांचं भाषण ऐकत होता. शेवटच्या रांगेपर्यंत (माईकशिवाय) शब्द-न-शब्द स्पष्ट ऐकू येईल असा खणखणीत आवाज! रोमरोम थरथरवणारं वक्तृत्व...
त्याचवेळी त्यांनी प्रतिज्ञा केली - शिवछत्रपतींच्या मूर्तीची दररोज पूजा!
आजतागायत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज स्वखर्चाने रायगडावर छत्रपतींची पूजा करत आहेत. आपला नंबर कधी लागतो याची आतुरतेने वाट बघत आहेत.

***

गुरुजींना वंदन करण्यासाठी घाई उडाली होती. मीही त्यात घुसलो. या माणसाला उस्मानाबादनंतर मी प्रत्यक्षात नंतर कधीच भेटलो नव्हतो. जवळजवळ वीस वर्षे झाली होती. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि हळूच म्हणालो, "गुरुजी, अमुक -अमुक यांचा मुलगा. तुम्ही..."
माझं वाक्य संपण्याच्या आतच "असं का? कसे आहेत तुमचे वडील? धाराशीवला असताना भेट झाली होती. आता कुठे असतात? रिटायर झाले नसतील अजून..., खूप चांगलं वाटलं - तू आलास" असं म्हणत माझ्या वडिलांबद्दल मलाच सांगायला सुरुवात केली. खरे म्हणजे या माणसाला आयुष्यभरात माझ्या वडिलांसारखी लाखो माणसे भेटली असतील. पण भेटलेल्या प्रत्येक माणसाचं संपूर्ण नाव आणि संदर्भ त्यांच्या लक्षात होता. मी थक्क झालो.

***

संभाजीराव आणि शिवप्रतिष्ठानबद्दल ऐकत होतो. पुन्हा कधी 'मोहिमेवर' गेलो नाही. मग मधे नोकरीमुळे माझं गावच बदललं.
आणि आता जवळजवळ पंधरा वर्षांनी - ही नौटंकीची औलाद...

ह्या बातमीतसंभाजीरावांनी जे सांगितलं तसंच झालं असणार. तो ऋषितुल्य माणूस खोटं कशाला बोलेल? एखाद्याचा खून जरी केला तरी - 'मी खून केला आहे' असं सांगणार्‍यांपैकी माणूस तो. जुन्या पिढीतला. आज एकेक कार्यकर्ता पक्षांना किती किमतीला पडतो ते उघड आहे. हा फाटका, निर्धन माणूस केवळ स्वबळावर असे हजारो कार्यकर्ते उभे करतो , त्यांची बाई-बाटली बंद करतो, गुटखा-सिग्रेट बंद करतो, त्यांच्यात शिस्त बाणवतो, त्यांना ध्येयवादी बनवतो.ज्याच्या एका शब्दाखातर गुंड म्हणवले जाणारे तरूण राष्ट्रभक्त, शिवभक्त झाले त्याचं चारित्र्य कसं असेल ते वेगळं सांगायला नको. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही तर कोणावर?

***

हिंदुत्ववाद चूक की बरोबर हा वादाचा विषय! पण केवळ एक विचारप्रवाह म्हणून पाहिलं तर तोही अनेकांतलाच एक.
संभाजीरावांसारख्या माणसाला तो पटला म्हणून ते हिंदुत्ववादी झाले. कम्युनिझम पटला असता तर कट्टर कम्युनिष्ट झाले असते.
सावरकर हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांचं महात्म्य कमी होत नाही. भगतसिंग, चंद्रशेखर आजाद कम्युनिष्ट होते म्हणून देशद्रोही ठरत नाहीत. मोठी माणसं ती! आपण त्यांच्या विचारांबद्दल मतप्रदर्शन करणं म्हणजे उंटाच्या (गां) बुडख्याचा मुका.

संभाजीराव भिडे गुरुजी हा काय प्रकार आहे ते त्यांना ओळखणार्‍यांना माहित आहे. पैसे देऊन, चिथावणी देऊन दंगल घडवून आणणार्‍यातला तो माणूस नव्हेच.

***

आणि सरतेशेवटी अठ्याहत्तर वर्षाच्या एका किरकोळ म्हातार्‍याला रस्त्यावर पाडून चड्डीत शी- शू करेपर्यंत काठ्यांनी मारण्यात काय मर्दूमकी?

'साली, नौटंकीकी औलाद!' म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं.

Comments

शक्तिप्रदर्शनाचे अजून एक फळ - औरंगजेब

फ्रॅकॉइज् गॉटीयर या फ्रेंच वार्ताहराच्या "फॅक्ट" या संस्थेने औरंगजेबावर प्रदर्शन तयार केले आहे. ते जरी सरकारने मान्य केले असले तरी चेन्नईत दाखवायला लागल्यावर मुसलमानांनी आक्षेप घेतला की त्यामुळे सामाजीक तेढ निर्माण होऊ शकते. म्हणून लगेच पोलिसांनी त्यांना ते ललीत कला अकादमीतून काढून टाकायला लावले! त्यावर काही (वृत्तपत्रात)उलट सुलट चर्चा /बातम्य नाहीत की लाठीमार नाही की इतिहास, कला, इत्यादींच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जातो म्हणून उरबडवेगिरी नाही.... ह्याच मुळे रीऍ़क्शन तयार होते....

What was surprising was the media never came when invited for the inauguration of the Exhibition time and again, it was never to be seen while everything was peacful but once they smelled the disturbance all of them were there. (दुवा)

स्टेट्समन

प्रदर्शनाची माहीती (प्रेस रीलीज)

जोधा-अकबरमध्ये असं काय आहे?

वरील बातमी वाचली. "सामाजिक तेढ" वाढू नये म्हणून प्रदर्शन काढून टाकण्यात आले. येथे विकास यांना माहित असावेच पण इतरांच्या माहिती करता की फ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत. असो. भारतात ही विषमता आहे आणि ती पदोपदी जाणवते. येथील कोणी नाकारत असेल असे वाटत नाही. त्याला कोणीही सूज्ञ पाठींबा देत असेल असे वाटत नाही. न्याय सर्वांना सारखा हवा. यातून रिऍक्शन येते हे ही खरे पण ती आपल्याला नेणार कुठे हा प्रश्न पडतो.

असो. ज्यांना औरंगजेबाच्या प्रदर्शनाची बातमी वाचायची असेल त्यांनी ती येथे वाचावी. रामसेतू ते औरंगजेब अशी परिपूर्ण कथा आहे.

परंतु, जोधा-अकबर ज्याचा दिग्दर्शक हिंदू, कलाकार हिंदू, इतर तंत्रज्ञही बरेचसे हिंदूच असावेत त्या चित्रपटात "सामाजिक तेढ" वाढण्यासारखे काय आहे की इतर हिंदूंना तो बंद करावासा वाटला? आणि मुसलमानांनी आक्षेप घ्यावा असे काहीच नाही का या चित्रपटात? असेल तर ते गप्प कसे?

एकंदरीत चाललेल्या गदारोळात मला खरंच हा प्रश्न पडला आहे आणि निदान हे पाहण्यासाठी तरी जोधा-अकबर आवर्जून पाहिला पाहिजे.

कदाचित, यामुळेच जोधा-अकबर चांगला चालला असावा की खरंच चित्रपट उत्तम आहे?

प्रश्न विचारस्वातंत्र्याचा आहे

परंतु, जोधा-अकबर ज्याचा दिग्दर्शक हिंदू, कलाकार हिंदू, इतर तंत्रज्ञही बरेचसे हिंदूच असावेत त्या चित्रपटात "सामाजिक तेढ" वाढण्यासारखे काय आहे की इतर हिंदूंना तो बंद करावासा वाटला?

"न्याय सर्वांना सारखा हवा" असे म्हणून न थांबता परत या प्रश्नात आपण असे म्हणू इच्छिता की "सामाजीक तेढ" जर काही धार्मिक व्यक्तिंना वाटली तर त्यावर बंदी आणणे ठीक आहे. त्यातही अशा व्यक्तिंनी वैचारीक विरोध न करता, असलेला इतिहास दाखवण्यापासून बंदी घालायला लावली. म्हणजे त्या संबंधात विचारस्वातंत्र्याची मुस्कटदाबी ठिक आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? माझे परत तेच म्हणणे आहे की यात (घटनेत आणि निर्णयात) विचारस्वातंत्र्याचा आदर दिसत नाही. मला जोधा अकबराच्या विरुद्ध झालेली निदर्शने मान्य नाहीत पण तसेच आपण नकळत एका बाजूचे जस्टीफिकेशन करण्यासाठी विचारत असलेला प्रश्न खटकत आहे. आणि हेच बर्‍याचदा आपल्या समाजातील बुद्धीवंतांचे होते ज्यामुळे "सामाजीक तेढ" वाढते.

वरील बातमी देण्याचे कारण इतकेच होते की "विचार स्वातंत्र्य", "कला स्वातंत्र्य" इत्यादी भारतात सिलेक्टिव्हली दिले जाते, हे दाखवायचे होते. ज्यांचे मान्य नसते त्यांना धोपटले जाते. तसा मार खाण्यात हिंदूत्ववाद्यांचा मान मोठा असतो कारण परत राजकारणी, माध्यमे आणि त्यांच्या चष्म्यातून पहाणारे तुम्ही-आम्ही. जितका कडाडून विरोध आणि ऍपरन्टली एकतर्फी टिका तितका उद्रेक जास्त हे होत राहाणारच, असे वाटते.

आता बाकी जोधा-अकबर चित्रपटाबद्दल - तो आमच्या बायकोनी मैत्रिणींबरोबर मोठ्या स्क्रिनवर पाहीला. मी अजून पाहीला नसला तरी त्याबद्दल् फिल्मी अर्थाने चांगला घेतला असे ऐकले आहे. डिव्हीडी मिळाली की करमणूक म्हणून पाहणारही आहे. त्यातील एक गाणे विशेषकरून आवडले.

माफ करा

न्याय सर्वांना सारखा हवा" असे म्हणून न थांबता परत या प्रश्नात आपण असे म्हणू इच्छिता की "सामाजीक तेढ" जर काही धार्मिक व्यक्तिंना वाटली तर त्यावर बंदी आणणे ठीक आहे

असे मी कुठेही म्हटले नाही. बातमीत "सामाजिक तेढ" असे म्हटले आहे असे सांगितले.

वरील बातमी देण्याचे कारण इतकेच होते की "विचार स्वातंत्र्य", "कला स्वातंत्र्य" इत्यादी भारतात सिलेक्टिव्हली दिले जाते, हे दाखवायचे होते.

भारतात ही विषमता आहे आणि ती पदोपदी जाणवते. येथील कोणी नाकारत असेल असे वाटत नाही. त्याला कोणीही सूज्ञ पाठींबा देत असेल असे वाटत नाही. न्याय सर्वांना सारखा हवा. यातून रिऍक्शन येते हे ही खरे पण ती आपल्याला नेणार कुठे हा प्रश्न पडतो.
मीही तेच म्हटले आहे आणि म्हणूनच सामाजिक तेढीला अवतरण चिन्हे होती.

परंतु, जोधा-अकबर ज्याचा दिग्दर्शक हिंदू, कलाकार हिंदू, इतर तंत्रज्ञही बरेचसे हिंदूच असावेत त्या चित्रपटात "सामाजिक तेढ" वाढण्यासारखे काय आहे की इतर हिंदूंना तो बंद करावासा वाटला?

मी सहज प्रश्न विचारला होता. त्याला आपण माझी इच्छा लावणार असाल तर चूक झाली, माफ करा.

तसा उद्देश नव्हता...

पण तसेच आपण नकळत एका बाजूचे जस्टीफिकेशन करण्यासाठी विचारत असलेला प्रश्न खटकत आहे

आपण सहज प्रश्न विचारलात हे मला देखील माहीत आहे. ती शंका देखील मला आली नाही. म्हणूनच मी "आपण नकळत.." असे लिहीले. खटकण्याचे कारण आपला उद्देश नव्हता, पण आपण सगळेच - त्यात मी देखील अर्थातच आलो (कारण भिड्यांच्या आणि दंगलीच्या बाबतीत विसुनानांचे वाचल्यावर तसे वाटले) - हिंदूंबद्दल बोलायचे असले तर फटकन बोलतो पण इतरांबद्दल जास्त काळजी घेतो. दुसरा भाग नक्कीच चांगला आहे, फक्त तो पहील्या भागात पण असला पाहीजे असे वाटते. - कृपया हे आणि आधीचा प्रतिसाद वैयक्तिक घेउ नका कारण तसा उद्देश नव्हता/नाही.

असे का ?

फ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का ?

http://www.hindujagruti.org/news/4197.html
फ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का ?
फ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का ?
फ्रॅकॉइज् गॉटीए हे हिंदूंपेक्षाही अधिक हिंदूत्ववादी आहेत असे का ?

गणेश

कारण

ते सातत्याने भारताचा इतिहास आणि प्राचीन हिंदू इतिहासाबद्दल लिहित आले आहेत.

असो, हे लिहिण्यातही कोणता उपहास नाही हे सांगून ठेवते म्हणजे माझ्या तोंडात कोणी शब्द कोंबायला नकोत.

तरीही

ते हिंदूंपेक्षा हिंदू आहेत, हे खटकलेच! ते काहीतरी गुन्हा करत आहेत, असे सूचित केल्याचा उगाच भास झाला.

जाहीर माफी

ते हिंदूंपेक्षा हिंदू आहेत, हे खटकलेच! ते काहीतरी गुन्हा करत आहेत, असे सूचित केल्याचा उगाच भास झाला.

तसे वाटू दिल्याबद्दल तुम्हीही माफ करा. चुकलं माझं. तसा उद्देश नव्हता*. गणेश तांब्यांचीही माफी मागते. त्यानिमित्ताने गॉतिए यांच्यावर शिंतोडे उडवले गेले असतील तर त्यांचीही माफी मागते.

त्यानिमित्ताने, आक्रस्ताळी लिहिणे, हिंदूंच्या भावना दुखावणे याबद्दलही माफी मागते.

असो.

हल्ली कोणाला काय खटकेल ते सांगणे कठिण आहे. असो. वेळ मिळाल्यास त्यांचे हे पुस्तक वाचा आणि नंतर ते हिंदूंपेक्षाही अधिक हिंदू आहेत यावर तुमचे मत कळवा.

दुर्दैवाने, हिंदू हा शब्द बघून मला बिथरल्यासारखे होत नाही. पण या शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या किंवा ज्याप्रमाणे शब्द वापरला ते गैर आहे असे वाटत असेल तर त्यांनीही माफ करावे.

* किंवा तसाच उद्देश होता पण काही सजग सदस्यांनी कान पकडल्यावर डोळे उघडले. यापैकी ज्याला जे न खटकेल ते घ्यावे.

एखादी बातमी

असो. ज्यांना औरंगजेबाच्या प्रदर्शनाची बातमी वाचायची असेल त्यांनी ती येथे वाचावी. रामसेतू ते औरंगजेब अशी परिपूर्ण कथा आहे.

हिंदू जागृती माझे होम पेज नाही आहे. आणि मला बातमी वेगळ्याच कारणाने वेगळ्याच संदर्भात जालावर बातम्यांचा शोध घेताना मिळाली. फ्रॅ़कॉईज् गॉटीयर यांचे लेखन रिडीफ.कॉम वर सातत्याने येतात त्यामुळे मला माहीत आहे. आधीच्या चर्चेत हिंदू जागृती मधील काही गोष्टी मला आणि इतरांना देखील खटकल्या होत्या त्यामुळे केवळ तोच दुवा देणे म्हणजे परत चष्मे लावणे होईल असे वाटते. हिंदू जागृतीच्या नावात हिंदू नाव आहे म्हणून जसे त्या नावाचे माहात्म्य (चांगल्या/वाईट अर्थाने) कमी होत नाही तसेच गॉटीयर बाबतीत म्हणता येईल.

म्हणून आपण दिलेला दुवा म्हणजे या संदर्भाने "गिल्टी बाय असोसिएशन" होऊ शकेल असे वाटले, म्हणून हा खुलासा.

अरेच्चा!!

हिंदू जागृती माझे होम पेज नाही आहे.

हिंदू जागृती तुमचे होम पेज आहे, असेही मी कुठेही दर्शवलेले नाही. :-)

आणि मला बातमी वेगळ्याच कारणाने वेगळ्याच संदर्भात जालावर बातम्यांचा शोध घेताना मिळाली.

हिंदू जागृतीची बातमी मलाही सहजच मिळाली. मी गॉटिए हा उच्चार आहे का गॉटिएर ते शोधत होते कारण फ्रेंच नाव आहे.

फ्रॅ़कॉईज् गॉटीयर यांचे लेखन रिडीफ.कॉम वर सातत्याने येतात त्यामुळे मला माहीत आहे.

मला त्यासंदर्भात आपले बोलणे झाल्याचे आठवते.

चर्चेत हिंदू जागृती मधील काही गोष्टी मला आणि इतरांना देखील खटकल्या होत्या त्यामुळे केवळ तोच दुवा देणे म्हणजे परत चष्मे लावणे होईल असे वाटते.

ज्या बातमीचा मी दुवा दिला ती फार काही भन्नाट नव्हती पण लेखाच्या शेवटी काहीतरी गुगली दिसली इतकीच म्हणून मजेशीर वाटली.

आपण दिलेला दुवा म्हणजे या संदर्भाने "गिल्टी बाय असोसिएशन" होऊ शकेल असे वाटले

शक्य आहे पण तसा काहीही हेतू नव्हता.

 
^ वर