विश्वधर्माचा पाईक - स्वामी विवेकानंद

१२ जानेवारी १८६३.पूर्व क्षितिजावरून सूर्याने अजून सृष्टीकडे कटाक्षही टाकला नसेल तोच ६ वाजून 33 मिनिटे आणि 33 सेकंदाच्या बह्ममुहूर्तावर भुवनेश्वरीदेवींचे घर उजळून निघाले. वीरेश्वराला मागितलेला मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला. या मुलाचा जन्म ज्या मुहूर्तावर झाला तो दिवस भारतीयांसाठी पवित्र सणासारखा आहे. तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा..

या मुलाच्या जन्मदिवशी सर्वत्र आनंद असावा अशी जणू परमेश्वरी इच्छाच असावी. हा असामान्य बालक म्हणजे भुवनेश्वरी देवींचा 'बिल्ले'. बंगाली लोकांचा नरेंद्रनाथ (नरेन) आणि तमाम भारतीयांचे श्रध्दास्थान 'स्वामी विवेकानंद'.

हा मुलगा पुढे जाऊन भारतीय तत्त्वज्ञानाची ध्वजा जगभरात फडकवेल असे कुणालाही वाटले नसते. जणू ग्लानी आलेल्या हिंदू धर्माला जागे करण्यासाठीच या महापुरुषाचे आगमन झाले. हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा त्यांनी जगापुढे आणला. हिंदू संस्कृतीचा मानवकेंद्रीत विचार त्यांनी जगभरात पोहोचविला.

जगाला शांततेचा संदेश देणारा नरेन बालपणी मात्र खूप खोडकर होता. अशांतता त्याच्या मनात सतत धुमसत असे. 'जमदग्नी' ऋषींपमाणे राग सतत त्याच्या नाकावर असे. हा राग एवढा प्रचंड की कधी-कधी भुवनेश्वरी देवींना नरेनला शांत करण्यासाठी त्याच्या डोक्यावर थंड पाण्याचा मारा करावा लागे. हा जलाभिषेक होत असताना भुवनेश्वरी देवी सतत 'शिव' चा उच्चार करत आणि आश्चर्य म्हणजे काही क्षणात नरेंद्र ध्यानस्थ होत असे.

नरेंद्राची पहिली शाळा म्हणजे त्याचे घरच होते. वडील विश्वनाथ आणि आई भुवनेश्वरी यांच्या सोबतीलाच भुवनेश्वरी देवींची आई या तिघांनी नरेंद्रावर भगवद्गीता आणि वैष्णव पंथांचे संस्कार केले. बंगाली परंपरेनुसार वयाच्या सहाव्या वर्षी नरेंद्राला शाळेत दाखल करण्यात आले. पण तो शाळेत रमत नसे. १८७१ मध्ये नरेंद्राला दुसर्‍या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पं. ईश्वरचंन्द विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटिन इन्स्टिट्यूट या इंग्रजी शाळेत नरेंद्राला पाठवण्यास सुरवात झाली. पुढे दत्त कुटुंब रायपूरला स्थलांतरित झाले. पाहता पाहता नरेंद्राने बी. ए. चे शिक्षण पूर्ण केले. शाळा ते महाविद्यालय हा नरेंद्राचा प्रवास आदर्शवत असला तरी त्याचे मन प्रचंड अस्थिर होते.

त्याच्या मनात सतत एकच विषय घोळत असे, परमेश्वर काय आहे? याचा शोध घेण्यासाठी तो तळमळू लागला. १८८१ मध्ये गुरू भेटीसाठी त्यांनी पहिल्यांदा पऱ्यांना केले. स्वामी रामकृष्ण हे पुराणमतवादी विचारसरणीचे होते. नरेंद्राने पहिल्या भेटीतच त्यांना प्रश्न केला आपण परमेश्वराला पाहिले आहे काय? त्यांच्या प्रश्नाने स्वामी रामकृष्ण काही क्षणासाठी स्तब्ध झाले. रामकृष्णांनी मानेनेच होकार देत तुला परमेश्वर पाहायचा का? असा प्रतिपश्न केला. नरेंद्राचा स्वामी विवेकानंद बनण्याचा प्रवास सुरू झाला तो इथून.

नरेंद्र रामकृष्णांच्या भजनी लागला तरी त्यामुळे घरात मात्र भलतेच संकट उद्भवले होते. त्यांच्या वडिलांचा स्वभाव भलताच दानशूर असल्याचा अनेकांनी फायदा उठविला. आता परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी नरेंद्राने काही काम करावे अशी त्याच्या आईची इच्छा होती. परंतु, नरेंद्र आता या सर्वांपासून खूप दूर गेला होता. एके दिवशी आर्थिक विवंचनेला कंटाळून रागाच्या भरात नरेंद्र कालीमातेच्या मंदिरात गेला त्याने मातेला सर्व ऐहिक सुख मागण्याचे ठरविले. माता प्रसन्न झाली, त्यावेळी नरेंद्र म्हणाले, 'हे माते, मला विचार दे. मला बुद्धी दे. मला चांगले चारित्र्य दे. मला वैराग्य दे आणि संन्यास दे.............!

वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी नरेंद्र सर्व काही त्यागून जनकल्याणासाठी संन्यासी झाला. यानंतर स्वामी विवेकानंदांचा प्रवास विलक्षण होता. आपल्या गुरुंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. परमेश्वर भेटीची ओढ लागल्याने स्वामींची परिव्राजक भ्रमंती सुरू झाली.

आता त्यांना शिकागोला धर्मपरिषदेला जायचे होते. मा शारदेचा आशीर्वाद घेऊन ते अमेरिकेकडे निघाले.शिकागोच्या धर्मपरिषदेत पहिल्यांदा भारतीय संस्कृतीची विजयी पताका स्वामी विवेकानंदांनी फडकवली. भारतीय संन्यासी म्हणत त्यांची कुचेष्टाही काही जणांनी केली. परंतु, ते शांत होते. शिकागो धर्मपरिषदेच्या व्यासपीठावर उपस्थित धर्मीयांचे धर्मग्रंथ ठेवण्यात आले होते. पण वरच्या बाजूला असलेली भगवद्गीता कोणीतरी अलगद काढून सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. स्वामीजींनी ते हेरलं. ते हसले. आणि बोलण्यास उभे राहिले. उपस्थित बंधू-भगिनींनो अशी सुरवात करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढे ते कितीतरी वेळ बोलत होते. आणि उपस्थित ते ऐकत होते.

'' व्यासपीठावर माझ्या धर्माचा ग्रंथ सर्वांत खाली ठेवण्यात आला आहे. ज्यांनी तो तिथे ठेवला त्यांचे मी आभार मानतो. माझी चूक मला त्यांनी उमजवून दिली. सर्व धर्म आणि त्यांच्या सर्व ग्रंथांचा पायाच मुळी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता आहे.

स्वामीजींच्या या भाषणाने सर्व सभागृह स्तब्ध झाले. अमेरिकेतील सर्वच प्रसारमाध्यमांनी स्वामीजींचे विचार अद्वितीय असल्याचे मान्य केले. आणि हेही मान्य केले की जगाला नैतिक अधिष्ठान जीवनमूल्यांची नवी पद्धती देणारा विश्वधर्म स्थापनेसाठी जन्माला आलेला महापुरुष तो हाच.

Comments

आपले (एकमेकांशी) का पटत नाही? - व्हाय वुई डिसऍग्री?

चांगला लेख आहे गणेशराव! विवेकानंदांचे काम प्रचंड होते. मुख्यत्वे त्यांच्यामुळे पाश्चात्य जगताला हिंदू धर्माची ओळख झाली. आपण त्यांच्या पहील्या भाषणाबद्दल आपल्या लेखात सांगीतले आहेतच. आता मी त्यांना परत जेंव्हा दुसर्‍या दिवशी भाषण करायला सांगीतले त्या भाषणाचा मला जमतोय तसा अनुवाद लिहीतो. आपल्याला आणि इतर वाचक उपक्रमींना तो नक्की आवडेल याची खात्री आहे.

Why we disagree?
At The World’s Parliament of Religions
Chicago, 15th September 1893
आपले (एकमेकांशी) का पटत नाही?

मी तुम्हालाएक लहान गोष्ट सांगतो. माझ्या आधीच्या एका उत्तम वक्त्याचे आपण ऐकलेतच जो म्हणाला की, "चला, आपण सर्वजण एकमेकांची निंदानालस्ती, अपशब्द वापरणे थांबवूया," आणि त्याला वाईट वाटत होते की सतत सर्वत्र इतका (variance) फरक आहे.

पण मला आता एक गोष्ट सांगाविशी वाटत आहे जी या फरक (फारकत?) होण्याच्या मूळाबद्दल बोलते. एक बेडूक आपल्या विहीरीत राहत असतो. खूप वर्षे राहत असतो. तो तेथेच जन्माला आलेला असतो आणि तेथेच वाढलेला असतो. त्या विहीरीतच त्याचे जीवन गेलेले असते/चाललेले असते. अर्थात तेथे उत्क्रांतीवादी नव्हते जे सांगू शकले असते की त्या बेडकाचे डोळे शाबूत होते का नाही ते. पण गोष्टीपुरते आपण असे धरून चालूया की त्याचे डोळे चांगले होते आणि तो त्यांची निगा चांगली राखायचा. तिथे (एका ठिकाणी) राहून त्याची त्वचा गुळगुळीत/चकचकीत झाली होती आणि तो जाड झाला होता. एक दिवस अचानक त्या विहीरीत, समुद्रात राहत असलेला बेडूक येउन पडला.

"तू कुठून आलास?"
"समुद्रातून"
"समुद्रातून? केव्हढा मोठा असतो? या विहीरी एव्हढा?" आणि त्याने विहीरीच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूस उडी मारली.
"माझ्या मित्रा" समुद्रातील बेडूक म्हणाला, " समुद्राच्या भव्यतेची तुलना तू विहीरीशी कशी करतोस?"
मग विहीरीतील बेडकाने अजून एक उडी मारली आणि विचारले (दोन उड्यांच्या अंतराइतकी) की इतका समुद्र मोठा असतो?
"हा काय वेडेपणा आहे? समुद्राची तुलना तू विहीरीशी करूच कशी शकतोस?"
"असे काय!" विहीरीतील बेडूक (तेथील इतर बेडकांना म्हणाला) "म्हणजे हा (समुद्रातील) बेडूक खोटारडा आहे. माझ्या विहीरीपेक्षा काहीही मोठे असू शकत नाही! तेंव्हा हाकलून देउया याला!"

ही आपली नेहमीची अडचण आहे.

मी हिंदू आहे. मी माझ्या विहीरीत बसतो आणि तेच जग समजतो. तेच ख्रिश्चनांचे आणि मुसलमानांचे, आपापल्या विहीरीला जग समजत बसतात. (मला या पुढे जाउन तेच कम्यूनिस्टांचे आणि सेक्युलरवाद्यांचे म्हणावेसे वाटत आहे!) . हे अमेरिके, मी तुझा आभारी आहे, या प्रयत्नामुळे (सर्वधर्मपरीषदेमुळे) हे अडथळे मोडायला मदत होत आहे आणि मी आशा करतो की देवकृपेने येणार्‍या भविष्यात तू हे ध्येय साध्य करशील!
- स्वामी विवेकानंद

यावरून आणखी एका कथेची मी कल्पना करतो

विवेकानंदांची प्रतिभा तर माझ्या पुढील रूपकात नाहीच आहे, पण त्यांच्या आशयाशी फारकत करणारी नसल्यामुळे त्यांची फक्त साहित्यिक माफी मागतो.

एक बेडूक काळ्या कडाप्प्याच्या दगडाने बांधलेल्या विहिरीत राहाणारा होता. आणखी एक राजाच्या संगमरवरी विहिरीत राहाणारा होता. आणखी एक बेडूक कोकणातल्या लाल चिर्‍याच्या बांधलेल्या विहिरीत राहाणारा होता. एक मोठा पूर आला, ते तिघेही समुद्रात पोचले आणि कोणास ठाऊक कसे एकमेकाशेजारी आले. त्या अथांग समुद्रात त्यांना विसावा घ्यायला भिंत, आडोसा, काही सापडेना.

मग तिघे आपल्या सुखी घराचे स्मरण करू लागले. एक बेडूक वरच्या भल्या मोठ्या काळ्या ढगाकडे पाहून म्हणाला, "ते तिकडे वर दिसते, तसे चहूकडे माझ्या भोवती होते. त्याच्यापाशी पोचताच आडोसा मिळून विसावा घेता येतो."
दुसरा वर उडणार्‍या पांढर्‍या बगळ्यांकडे बघून म्हणाला, "ते तिकडे वरती दिसते, तसे चहूकडे माझ्या भोवती होते. त्याच्यापाशी पोचताच आडोसा मिळून विसावा घेता येतो."
तिसरा मावळत्या लाल सूर्याकडे बघून म्हणाला, "ते तिकडे वरती दिसते, तसे चहूकडे माझ्या भोवती होते. त्याच्यापाशी पोचताच आडोसा मिळून विसावा घेता येतो."

(आपल्या जुन्या घरांतून दिसणार्‍या आकाशाच्या कवडशात कोणीच यापूर्वी अजस्र ढग, बगळ्यांची माळ, मावळता सूर्य बघितला नव्हता.)

तिघांचे अर्थात काही एकमेकांशी पटले नाही.
पहिला ढगाकडे पाहून म्हणाला, "माझ्या विसाव्याच्या आडोशासारखे ते तिकडे वरती आहे, ते किती मोठे आहे. अर्धे आकाश त्याने व्यापलेले आहे."
दुसरा बगळ्यांकडे पाहून म्हणाला, "माझ्या विसाव्याच्या आडोशासारखे ते तिकडे वरती आहे, ते किती क्रियाशील आहे. तुझ्या त्या ढबोर्‍या ढब्बूपेक्षा किती रेखीव आहे."
तिसरा मावळत्या लाल सूर्याकडे पाहून म्हणाला, "माझ्या विसाव्याच्या आडोशासारखे ते तिकडे वरती आहे, ते किती तेजस्वी आहे. तुझ्या ढब्बूसारखे ढिम्म नाही, आणि तुझ्या लकेरीसारखे सारखे लटपटत नाही."

जवळच एक समुद्रातला बेडूक पोहत होता. मैत्रीपूर्ण भावनेने तिघांचे ऐकत होता. हे तिघेही काहीतरी खरे बोलत आहेत असे त्यांच्या ठामपणावरून त्याला पटत होते. "आडोशाचा विसावा" हा काही महत्त्वाचा प्रकार आहे, हे त्याला लगेच जाणवले. ढग, बगळे आणि सूर्य यात काय साम्य आहे, जे की आडोशाच्या विसाव्यात असेल, असा विचार तो करू लागला. कारण जे त्या तिघांत असेल, ते "आडोशाच्या विसाव्यात" असेल. पण त्या तिन्ही वस्तू वर आकाशात आहेत, यापेक्षा त्याला काही साम्य दिसेना. आणि हे तिन्ही तर म्हणतात की त्यांच्या आदोशाच्या विसाव्याकडे चहूकडून पोचता येण्यासारखे होते.

शेवटी त्या तिघांच्या तपशीलवार वादातून आपल्याला काही कळणार नाही असे त्याच्या लक्षात आले. आपल्या अज्ञपणाबद्दल खंत वाटत तो निघून गेला.

ही रूपके ढोबळमानाने वरील कथेप्रमाणेच घ्यावीत.

(कोणालाच खोटारडा न म्हणणारा सेक्युलरवादी) धनंजय

हा हा हा!

(कोणालाच खोटारडा न म्हणणारा सेक्युलरवादी) धनंजय

अहो तुम्हाला कोण म्हणतयं तुम्ही विहीरीतले आहात म्हणून? (अगदी खर्‍या अर्थाने आणि मनापासून म्हणतोय!).

पण तसे विवेकानंद पण हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन असले तरी त्या विहीरीतले बेडूक नव्हते ही वस्तुस्थिती त्यांचे वाचले तर लक्षात येईल. तेच अनेकांबाबत अनेक धर्मातील सामान्य-असामान्यांबद्दल बोलता येईल. पण अपवाद सोडल्यास, त्याच संदर्भात मी पुढे म्हणले की ही मनुष्य वृत्ती आहे जीला आपण जे काही आचरतो तेच (only) बरोबर असणार असे कायम वाटते. ते काही केवळ धर्म आचरण्यांच्याबाबतीतच होते असे नाही तर निधर्मी अथवा सेक्यूलर तसेच कम्यूनिस्टांच्या बाबतीतपण होऊ शकते असे म्हणायचे होते.

थोडक्यात विवेकानंद हे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कुठेही कुठल्याही विचारसरणीत असतात, उरलेल्यांच्या बाबतीत विवेकाबद्दल सगळा आनंद असतो असे म्हणावे लागते हा माझ्या वाक्याचा मतितार्थ होता. कृपया गैरसमज करू नये. यावर अजून एक तत्ववेत्याचे नाही पण श्रेष्ठ कवीच्या (गदीमा) ओळी सांगतो त्यातून मला काय म्हणायचे आहे ते समजेल अशी आशा करतो:

ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला...
... जो तो अपुल्या जागी जखडे, नजर न धावे तटापलीकडे
उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लिला...
...कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला, जग हे बंदीशाला||

उत्तम

विवेकानंद हे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कुठेही कुठल्याही विचारसरणीत असतात, उरलेल्यांच्या बाबतीत विवेकाबद्दल सगळा आनंद असतो असे म्हणावे लागते
कथा आवडल्या. आणि हे वाक्य तर कोट(इंग्रजी) म्हणून वापरता येण्यासारखे आहे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

इंग्रजी शाळा असूनही

धन्यवाद.

बरीच माहीती मिळाली.
लहानपणी वाचले होते त्या नंतर विसरले गेले होते. (कुणाला आठवतात का ती छोटी छोटी पुस्तके व त्यांची सीरीज?)

बाकी

पं. ईश्वरचंन्द विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटिन इन्स्टिट्यूट या इंग्रजी शाळेत नरेंद्राला पाठवण्यास सुरवात झाली. पुढे दत्त कुटुंब रायपूरला स्थलांतरित झाले. पाहता पाहता नरेंद्राने बी. ए. चे शिक्षण पूर्ण केले.

इंग्रजी शाळेतल्या शिक्षणा नंतरही विवेकानंदांचे मन वैराग्याकडे होते.

बाकी आपले भाग्य की ते काँव्हेंट मधे नाही गेले.
नाही तर किती कडवा व इफेक्टीव ख्रिश्चन धर्म प्रसारक भारताला झेलावा लागला असता?

-निनाद

अपवाद

बाकी आपले भाग्य की ते काँव्हेंट मधे नाही गेले. नाही तर किती कडवा व इफेक्टीव ख्रिश्चन धर्म प्रसारक भारताला झेलावा लागला असता?

असे अनेक अपवाद आहेत:

योगी अरविंद घोष: त्यांना तर त्यांच्या आईवडिलांनी दार्जिलिंगला आधी नन्सच्या छायेत ठेवले आणि लहानपणीच लंडनला पाठवणी केली. इंग्रजी-फ्रेंच भाषेवर प्रभुत्व आणि वाड्मयीन जाण जेणे करून साहेबासारखेच राहतील. पण पोरं थोडीच आईबापाचे ऐकतात! ते नंतर सनदी नोकर झाल्यावर सयाजीराव गायकवाडांकडे आले. नंतर हळू हळू बदलत जात क्रांतिकारक आणि नंतर योगी बनून हिंदू धर्माच्या पताका घेत हिंडले.

ज्योतिबा फुले: मिशनर्‍याने शिकवले. काही अंशी वेगळे झाले पण चांगल्या अर्थी च.

गोळवळकर गुरूजी: त्यांच्या बद्दल यासंबंधात विशेष माहीती नाही पण ते देखील इंग्रजी माध्यमातील. इंग्रजी भाषा-वाड्मय दोन्हीवर प्रभुत्व होते.

शंकराचार्य चंद्रशेखरेन्द्र सरस्वती, कांची कामकोटी - आत्ताच्या शंकराचार्यांचे गुरू. त्यांना बराच सामाजीक-अध्यात्मिक मान होता. शिक्षण कॉन्व्हेंटमधेच झाले होते.

आणि आता विवेकानंदांबद्दल:

देव शोधत ते सर्वत्र फिरत होते. सर्व धर्मोपदेशकांना/विचारवंतांना विचारून पाहीले पण कोणिही खात्रीने उत्तर देत नव्हते. ब्रम्हो समाजात जाऊ लागले पण ते ही पटत नव्हते. अशा वेळेस ज्या महाविद्यालयात शिकताना हे प्रश्न मनात घोळू लागले त्या महाविद्यालयातील म्हणजे स्कॉटीश चर्च कॉलेजच्या प्राचार्यांना प्रा. रेव्हरंड हेस्टींगना त्यांनी प्रश्न विचारला की "तुम्ही कधी देवाला पाहीले आहे का?" ते म्हणाले नाही, पण कोणी पाहीले आहे ते सांगतो असे म्हणून त्यांनी पुढे दक्षिणेश्वराला जाऊन तिथला अवलीया पुजारी रामकृष्ण परमहंसाना भेट असे सांगीतले! आणि आता रामकृष्ण परमहंस पण कोण तर ज्यांनी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म स्विकारून त्यातील अनुभव घेऊन परत हिंदू धर्मातील श्रेष्ठ स्वामी झाले.

थोडक्यात कोण कुठे शिकले याच्यावर फार कमी गोष्टी अवलंबून असतात. Where there is will, there is way and where there is no will, there are excuses या वाक्प्रचाराप्रमाणे या सर्वांना त्यांना जे ज्ञान अभिप्रेत होते ते आत्मसात करण्याची जबर इच्छा होती म्हणून त्यांनी ते केले, आहे त्या परीस्थितीतून, कारणे न सांगत बसता.

चांगला लेख

गणेशराव, विवेकानंदांवरील लेख आणि त्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद आवडले.

असेच

म्हणतो.

हिंदूंना जागवण्यासाठी एका विवेकानंदांची गरज !

विवेकानंदांवरील लेख आणि त्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद आवडले. सहमत
आजच्या भारताचे दुसरे नाव असलेल्या हिंदुस्थानातील `हिंदु' हा शब्द काही काळाने लोप पावणार, असे हिंदूंच्या आजच्या स्थितीवरून वाटत आहे. किंबहुना पुढे त्यात `हिंदु' या शब्दाऐवजी नक्की कोणता शब्द जोडला जाईल, हे सांगता येत नाही.
अत्यंत तेजस्वी असलेला भारत हा हिंदूंमुळेच घडला, हे विसरून चालणार नाही. या देशाचे शिल्पकार प्राचीन काळात होऊन गेलेले ऋषी-मुनीच आहेत. भारतीय संस्कृती हिंदूंनीच निर्माण केली आणि आज टिकवूनही तेच ठेवत आहेत; पण आजचा भारताचा शासक काँग्रेस पक्ष हिंदूंवर का कुर्‍हाड मारत सुटला आहे, ते लक्षात येत नाही.
िख्र्चाश्‍नांच्या शाळा नव्या पिढीला िख्र्चाश्‍न धर्मतत्त्वाकडे सर्रास वळवतांना दिसतात. आजच्या तरुण पिढीला `गुरुपौर्णिमा' व `राखीपौर्णिमा' काय हे ठाऊक नाही; पण `मदर डे', `फ्रेंडशीप डे', `व्हॅलेंटाईन डे' माहीत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेतील येशूची प्रार्थना न चुकता म्हणता येते; पण `अथर्वशीर्ष' किंवा `शारदास्तवन' पाठ नसते. सर्व मुले `हॅरी पॉटरची' पुस्तके आनंदाने वाचतांना दिसतात; पण कोणी शिवाजी महाराजांची जीवनगाथा किंवा विवेकानंदांचे चरित्र हाती घेतले आहे का ? यावरूनच भारताची पाळेमुळे उखडून टाकण्याचा व हिंदूंना नष्ट करण्याचा प्रयत्‍न सगळीकडे चालला आहे. असे असतांनाही हिंदू निद्रिस्त आहेत. त्यामुळे या निद्रिस्त हिंदूंना जागवण्यासाठी विवेकानंदांची आज गरज आहे. सोबतच हिंदूंना पायदळी तुडवणार्‍या शासनावर सिंहगर्जना करून चाल करणार्‍या शिवाजी महाराजांची गरज आहे.
वास्तविक हिंदूंच्या अतीनम्रतेचा फायदा इतर धर्म घेत आहेत. त्यांनी हेही लक्षात घ्यायला हवे की, हिंदू जेवढे शांत आहेत, तेवढेच ते प्रक्षुब्धही आहेत. कोणी आमच्या गळयाला नख लावण्याचा प्रयत्‍न केला, तर हिंदू आगीसारखा पेटून उठेल. त्यामुळे शासनाने व इतर धर्मियांनी भारतात फक्‍त भारतीय संस्कृतीचाच विचार करावा. इतर संस्कृतींचा नाही.

:-)

बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफिल कभी ऐसी तो न थी

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

फास्टर फेणे

आपला बराचसा प्रतिसाद आपले मत मांडतो आणि काहि अंशी त्याच्याशी सहमत देखील आहे. फक्त

सर्व मुले `हॅरी पॉटरची' पुस्तके आनंदाने वाचतांना दिसतात; पण कोणी शिवाजी महाराजांची जीवनगाथा किंवा विवेकानंदांचे चरित्र हाती घेतले आहे का ?

हे खटकले.. हॅरी पॉटरची तुलनाच चरित्रांशी करता कामा नये. हॅरी हा बालगोपालांचा दोस्त आहे. त्या वयात विवेकानंदाचे चरित्र वगैरे वाचल्याने हिंदु धर्म टिकेल असे वाटते का? हवतर असं म्हणा सर्व मुले `हॅरी पॉटरची' पुस्तके आनंदाने वाचतांना दिसतात; पण कोणी फास्टर फेणे हाती घेतले आहे का ? ;) (फास्टर फेणेनेहि हिंदु धर्म वाचेल असे नाहि ;) पण लहान मुलांच्या भावविश्वात इतक्या जवळ पोचणारे दुसरे मराठी पुस्तक डोळ्यासमोर आले नाहि, त्यामेळे तुलनेला तोच घेतला. अगदी विवेकानंद त्या वयात जरा जास्त वाटतात :) )

मान्य +

हे खटकले.. हॅरी पॉटरची तुलनाच चरित्रांशी करता कामा नये. हॅरी हा बालगोपालांचा दोस्त आहे. त्या वयात विवेकानंदाचे चरित्र वगैरे वाचल्याने हिंदु धर्म टिकेल असे वाटते का? हवतर असं म्हणा सर्व मुले `हॅरी पॉटरची' पुस्तके आनंदाने वाचतांना दिसतात; पण कोणी फास्टर फेणे हाती घेतले आहे का ? ;) (फास्टर फेणेनेहि हिंदु धर्म वाचेल असे नाहि ;) पण लहान मुलांच्या भावविश्वात इतक्या जवळ पोचणारे दुसरे मराठी पुस्तक डोळ्यासमोर आले नाहि, त्यामेळे तुलनेला तोच घेतला. अगदी विवेकानंद त्या वयात जरा जास्त वाटतात :) )

हे संपूर्ण विधान पटण्यासारखेच आहे. यात मी अजून काही मुद्दे मांडू इच्छितो:

  1. बाकीच्यांचे जाऊदेत आपण स्वतः किती विवेकानंद आणि तत्सम वाचलेत तसेच समजावून घेतलेत हा प्रश्न स्वतःलाच विचारून पाहीला पाहीजे.
  2. हिंदूंनी जागृक रहाणे आणि स्वतःबद्दल माहीती ठेवणे हे अगदी मान्य आहे. पण विवेकानंदांची आणि शिवाजी परत होण्याची गरज आहे असे म्हणताना ते आपल्याला "शेजार्‍याच्या घरात" तयार व्हायला हवे असतात का स्वतः काहीतरी त्याबद्दल सक्रीय करण्याची तयारी आहे / अथवा करत आहात, ह्याचा पण विचार केला पाहीजे असे प्रामाणिकपणे सुचवावेसे वाटते.

वाचन

सर्व कथा छान आहेत.

मुलांच्या वाचनाबद्दल् एक विचार मांडावासा वाटतो.

साधारणपणे दहावर्षाची मुले हि पुस्तके वाचायला हरकत नाहि असे वाटते.
आई बाबा दोघेहि वाचत असतील तर मुलेपण हि पुस्तके नक्कि वाचतात.

मी दहा ते पंधरा वयात हि पुस्तके वाचुन आमच्या घरी आणि शाळेत गप्पा व्हायच्या.

खरा संदेश विसरू नये

विवेकानंद जरी शिकागोला हिंदू धर्माचे प्रवक्ते म्हणून गेले होते तरी त्यांनी तिथे आणि त्यानंतर इतरत्रही सर्वधर्मसमभावाचेच तत्त्व सांगितले आहे. सर्व धर्म खरे आहेत आणि सारखेच चांगले आहेत हे त्यांनी आणि रामकृष्ण परमहंसांनी सांगितले आहे. हा त्यांचा संदेश विसरू नये. भारतीयांनी पाश्चात्यांकडून भौतिक ज्ञान शिकावे, आणि त्यायोगे सुधारणा व्हाव्यात असाही त्यांचा आग्रह होता.

आवडला

लेख आवडला.
पण विवेकानंदांचा संबंध हिंदु जनजागृतीशी जोदण्याचे काही कारण मला दिसत नाही.
त्यापेक्षा विनय कटियार/प्रविण तोगडिया यांचे काम जास्त त्या क्लेम ला जवळ जाणारे असेल कदाचित.

आपला
गुंडोपंत

पाहीजे : मालक >>

स्वामीजींचे यश आपण हिंदुंना आत्मभान व आत्मविश्वास देणारे आहे.
प्रथम काही बाळबोध प्रश्न >
स्वामीजींना अमेरीकेत जाण्याचा खर्च किती आला होता ?
तजवीज कशी करण्यात आली ? कुणी मुख्य स्पोन्सरर होता काय ?
वाक चातुर्याने सभा जिंकल्या नंतर किती अन्य धर्मीय लोकांनी स्वामीजींचे शिष्यत्व किंवा हिंदुत्व स्विकारले ?
मुख्य विषय >
आमच्या सर्वात जुन्या कंपनीला स्वामीजीं इतका प्रखर चीफ प्रमोटर अनेक सहस्त्रकांनंतर लाभला हे खरोखर दैवी अहोभाग्यच आहे.
आमची फंडामॆंट्ल्स चांगली असुन देखील आमच्या शेयर होल्डर्स चे आत्मीक व कार्मीक दारिद्रय किती शोचनीय आहे ते आम्हाला स्वामीजीं मुळेच कळू शकले.
असो !
आता पुढे काय ?
आमच्या कंपनीला बोर्ड औफ डायरेक्टर, चेयरमन कोणीही नाही.. !! प्रतीस्पर्धी कंपनीला टेक ओव्ह्रर करणे आमच्या प्रोस्पेक्ट्स मधे निषिद्ध नसले तरी या कल्पनेचा उल्लेख देखील कुठेच नाही. !!
ब्रिटिश कंपानीला कुठेही विरोध न करता, देशाभिमानाचे, सर्व धर्म समभावाचे नाटक न करता जमशेट्जी ने जे केले त्याची न्यानो फळे व टेट्ली ची केट्ली चाखण्या साठी आमची लाळ टपकू लागली आहे ..पण स्वामीजीनी दिलेल्या आत्मभानाची भानामती करण्याचे करंटेपण आम्ही सर्वत्र जोपासत आहोत.
या कंपनीला एका मालकाची प्रतीक्षा आहे जो नवे प्रोस्पेक्ट्स लिहील नवी टेकोव्हर्स सहज व दिन चर्येत आणून देईल !!

केवळ म्हणूनच >

पाहीजे >> मालक .

 
^ वर