ओळख

ओळख

कॊग्रेस चळवळीच्या शतकोत्तर २३ व्या वर्धापन दिना निमित्त मी लिहीलेल्या लेख/चर्चेत एका माझ्याच प्रतिसादावरून श्रॊ. द्वारकानाथ कलंत्री आणि माझ्यात काही संवाद झाला पहाता येईलच. त्या संदर्भात माझ्या डोक्यात एक प्रश्न आला - स्वतःसाठी आणि इतरांसाठी - माझी-तुमची नक्की ओळख काय आहे? मी केवळ येथे काही घटना लिहीत जाईन म्हणतोय, त्यावर आपल्याला काय वाटते ते सांगा...

अशा प्रकारच्या प्रश्नावर बोलताना मला कायम इरावती कर्व्यांचा "परीपुर्ती" हा आम्हाला शाळेत असतानाचा धडा आठवतो. त्यांचे स्वतःचे नाव मोठे होतेच. पण ओळख करून देताना त्याही व्यतिरीक्त महर्षी धोंडों केशव कर्व्यांची सून, (नाव नक्की आठवत नाही पण) दिनकररावांची पत्नी म्हणूनपण बोलले जायचे. त्यांना त्यातपण अपूर्ण वाटायचे पण नंतर एकदा रस्त्यावरून जात असताना बाजूला खेळणार्‍या मुलांमधला एकजण म्हणाला (परत मला आठवत असल्याप्रमाणे नाव) "नंदूची आई..!" त्यावर त्यांनी लिहीले आहे की त्या दिवशी माझ्या ओळखीची परीपूर्ती झाली...

वरील गोष्टीतला मूळ गाभा इतकाच की प्रत्येक व्यक्तीस जन्मामुळे, नात्यांमुळे, स्थानामुळे, वंशामुळे , मातृभाषेमुळे, शिक्षणामुळे इत्यादी अनेक गोष्टींमुळे अनेक प्रकारच्या ओळखीना सामोरे जावे लागते. ज्या धर्मात जन्म झाला आहे अथवा जो धर्म अनुसरला आहे त्यामुळची ओळख हा त्यातील केवळ काही अंशी पण नक्की भाग आहे - आवडो अथवा नावडो..

आता दुसरी घटना. या वर्षि अमेरिकन प्रांत लुइझिआनाचा गव्हर्नर हा "बॉबी जिंदाल" जन्माने अमेरिकन पण मूळचा पंजाबी-हिंदू झाला. अतिशय हुशार आणि राजकारणि असलेल्या या महत्वाकांक्षि व्यक्तीने कॉलेजात असताना स्वतःचा धर्म बदलला - अर्थातच महत्वाकांक्षेपोटी - की येथे हिंदू व्यक्ती राजकारणात कशी येऊ शकेल वगैरे...आणि ते अशक्य आहे का माहीत नसले तरी अवघड नक्कीच आहे. हा बॉबी, अमेरिकन पद्धतीने वागणे आणि जगणे करू लागला. (अपवाद घरापुरता: तेथे तो भारतीय व्यक्तीप्रमाणे स्वतःच्या कुटूंबात समरस आहे). राजकीय दृष्ट्या सक्रीय झाला. बूश सरकारमधे सेक्रेटरी (मंत्री) झाला नंतर ते सोडले आणि एकदा पराभव पचवून डेमोक्रॅट्स जास्त असलेल्या या प्रांतात रिपब्लीकन पार्टीचा गव्हर्नर म्हणून निवडून आला. असे म्हणले जाते की जर या वर्षी डेमोक्रॅट्स राष्ट्राध्यक्ष झाला तर ४ अथवा ८ वर्षात हा रिपब्लीकन पक्षाचे तिकीट मिळवणार आहे...पण आज इतके अमेरिकन होऊन, कॉन्झ्सरेव्हेटीव्ह ख्रिश्च्न असल्याचे दाखवूनही अमेरिकन समाजात प्रसिद्धी काय मिळाली तर "भारतीय वंशाचा पहीला गव्हर्नर" झाला म्हणून. थोडक्यात दिसणे आणि रंग/वंश हे प्रयतन करूनही बदलता आले नाही. निवडून आला ते स्वकर्तुत्वावर पण भारतीय ही ओळख अमेरिकेत जन्माला आला असूनही जाऊ शकली नाही.

आमच्या लहान मुलीस (अमेरिकेत) ख्रिसमस ट्री ठेवायचे होते. कारण सर्वत्र छान सजावट असलेली झाडे पाहीली होती आणि सँटाक्लॉज येतो ह्या कल्पनेने. तसे बरेच भारतीय आणि इतरही ठेवतातपण. आम्ही छोटे आणि कृत्रीम झाड सजवून ठेवले. आमचे काही गोरे मित्र घरी आले होते. (परत अमेरिकन डावे - पण लिबरल्स - कम्यूनिस्ट नाही). लगेच प्र्श्न विचारला की तुम्ही का ठेवले? सांगीतले मुलीला हवे होते वगैरे आणि आम्हाला ते असल्यामुळे काही (धार्मीक भावना दुखवणे वगैरे अर्थाने) फरक पडत नाही. पण लगेच प्रश्न विचारला गेला की ते (म्हणजे अमेरीकन/ख्रिश्चन गोरे) दिवाळित डेकोरेशन करतील का? थोडक्यात परत ओळख आली - येथे मात्र अगदी धर्माची. आम्ही कितीही लिबरल असलो अथवा तसे दाखवायचा प्रयत्न केला तरी.

कॅथलीक अंत्यसंस्काराच्या - सर्व्हीसच्या वेळि आलेला अनुभव मी आधी दिला आहे, पण येथे परत चिकटवतो:

एका अंत्यविधीच्या वेळेस मी चर्चमधे हजर होतो. आजूबाजूस सर्व गोरे आणि "लिबरल्स" भरले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीप्रमाणे, सर्व त्यांच्यातले म्हणून जे काही "मंत्र(मंत्रासारखे) म्हणून झाल्यावर त्या कॉफिनच्या बाजूने सर्वजण जाऊ लागले. त्यात मृत व्यक्तीचे जसे अंत्यदर्शन घेणे (कॉफिनचेच कारण ते बंद असते) चालू होते तसेचे तेथील पाद्री आणि त्याचा सहाय्यक हे एक वाईनचा ग्लास आणि आठ आण्याचे नाणे दिसावे असा ब्रेडचा तुकडे घेऊन उभे होते. प्रत्येक व्यक्ती जाताना त्याच ग्लासातून ती रेड वाईन थोडी पित होती (जिझसचे रक्त समजून) आणि ब्रेड खात होती (जिझसचे शरीर समजून - दोन्ही स्वतःचा भाग करण्यासाठी). माझ्याबरोबरची सहकारी माझ्या कानात हळूच पुटपुटली की तुला ते करायची गरज नाही. म्हणले मला काहीच फरक पडत नाही. नंतर तीला सांगीतले की मी आत्ता जेथे आहे तेथील पद्धती हे एक "रिस्पेक्ट" म्हणून करतो. गेलेल्या व्यक्तिस, तिच्या नातेवाइकांस आणि ज्यांच्या बरोबर आहे त्यांत स्वतःला उगाच वेगळे ठरवण्यासाठी करणे मला पटत नाही. काही महीन्यांनी परत एका अशाच "सर्व्हीस" (अंत्यसंस्कार) जाण्याची वेळ आली. तेंव्हा आत जायच्या आधी या याच व्यक्तीने मला परत सांगीतले की "तसे करू नकोस". तर मी परत उत्तर दिले की "आय डोन्ट माइंड..." पुढे काही बोलायच्या आत तीने मला तोडून सांगीतले की "आय नो, यू डोन्ट, बट अदर्स (कॅथलीक्स) डू!" मग तीने मला सांगीतले की चूक तुझी नाही पण कॅथलीक्सना तसे केल्याचे आवडत नाही (जेंव्हा मी कॅथलीक नसतो तेंव्हा) कितीही लिबरल्स असले तरी...

जॉर्ज बूश जेंव्हा भारतभेटीस आला तेंव्हा आधी ठरल्याप्रमाणे त्याला गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेण्यास जायचे नव्हते (गांधीजींच्या समाधीचे परदेशी राष्ट्रप्रमुखाने दर्शन घेणे हा अनऑफिशियल प्रोटोकोल आहे). कारण अर्थातच त्यांचे दहन करून समाधी करणे हे ख्रिस्ती धर्मात बसत नाही आणि तो तर रीबॉर्न ख्रिश्चन! थोडक्यात गांधीजींची ओळख राष्ट्रपिता, महात्मा वगैरे न राहता हिंदू एव्ह्द्ढीच राहीली.

आणि स्वतः गांधीजी कुठलाही न्यूनगंड न ठेवता स्वत:च्या (आणि इतरांच्या) धार्मीक ओळखीबद्दल काय म्हणायचे? (विचार सालाप्रमाणे - क्रोनोलॉजीत" खाली लिहीले आहेत)

"I call myself a Sanatani Hindu, because I believe in the Vedas, the Upanishads, the Puranas, and all that goes by the name of Hindu scripture, and therefore in avataras and rebirth; I believe in the varnashrama dharma in a sense, in my opinion strictly Vedic but not in its presently popular crude sense; I believe in the protection of cow … I do not disbelieve in murti puja." (Young India: June 10, 1921)

All Religions are True: "I came to the conclusion long ago … that all religions were true and also that all had some error in them, and whilst I hold by my own, I should hold others as dear as Hinduism. So we can only pray, if we are Hindus, not that a Christian should become a Hindu … But our innermost prayer should be a Hindu should be a better Hindu, a Muslim a better Muslim, a Christian a better Christian." (Young India: January 19, 1928)

"I regard Jesus as a great teacher of humanity, but I do not regard him as the only begotten son of God. That epithet in its material interpretation is quite unacceptable. Metaphorically we are all sons of God, but for each of us there may be different sons of God in a special sense. Thus for me Chaitanya may be the only begotten son of God … God cannot be the exclusive Father and I cannot ascribe exclusive divinity to Jesus." (Harijan: June 3, 1937)

आज अमेरीकेत ओळख होत असताना वर म्हणलेल्या अनेक गोष्टींबरोबर कपड्यांमुळे आणि खाण्यामुळेपण होते. इतरांना वगळे वाटते म्हणून मग काय आपण आपले खाणेच टाकून देयचे की काय? का कपडे फक्त अमेरिकन पद्धतीचे घालायचे?

मला या सर्वात मूळ प्रश्न पडतो आणि तो केवळ भारतीयांबद्दल् कारण जगात इतर कुठल्याही देशातील लोकं असे वागत नाहीत (थोडेफार अमेरिकन्सच सोडले तर!) की असा स्वतःच्याबाबतीत आपण न्यूनगंड का ठेवतो? अमेरिकेत अथवा भारताबाहेर कुठेही, "आज आमच्याकडे गणपती आहेत, अथवा दिवाळी आहे" वगैरे म्हणले तर त्यात कुणाच्या काय भावना दुखावणार आहेत? अनुभव नाही, पण निरीक्षण आहे की तसे स्वतःस कमी लेखणार्‍या लोकांना इतरांकडून काही "बेसीक रीस्पेक्ट" मिळत नाही.

इतिहासात तर ठळक गोष्ट आहे: मिर्झाराजे जयसिंग व्यक्तिगत शिवभक्त, पण स्वतःचे इमान काशिविश्वेश्वराचे देऊळ फोडणार्‍या औरंगजेबाला विकलेले (का? - आपला दुर्दैवी इतिहास आणि स्वसामर्थ्याविषयी असलेला न्यूनगंड...) . त्याच औरंगजेबाने इमानबिमान काही न बघता, या जयसिंगाचा शेवट हा विषप्रयोगाने केला...

ह्या विषयाची सुरवात आपली ओळख कशाने असते आणि त्यात धर्माची नावे घेणे आणि त्यातही हिंदूंनी इतरांबद्दल बोलणे याने झाली होती. त्यासंदर्भात शेवटी एकच मला वाटते ते लिहीतो की आपण स्वतःस हिंदू समजत असलात तर ते काही "गर्वसे कहो.." करत म्हणायची अजीबातच गरज नाही पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का?

Comments

धन्यवाद

माझ्या आठवणीप्रमाणे इरावतीबाई दिनूची (दिनकर कर्वेंची) आई. बहुधा र धों कर्वेंची बायको.

दुरूस्तीबद्दल धन्यवाद, काहीतरी असे छोटे (लाडातले) नाव मुलासाठी वापरल्याचे लक्षात होते.

दिनू

म्हणजे मला वाटते दिनकरराव कर्वे. इरावतींबाईंचे पती.
इरावतीबाई त्या काळीही (सर्वांसमक्ष) नवर्‍याला अरे तुरे करीत असा माझा समज आहे. नंदू म्हणजे आनंद. आनंद कर्वे इरावती कर्व्यांचे सुपुत्र.

चांगला

चांगला विषय आहे. विस्तृत प्रतिसाद नंतर लिहीतो. आजच बीबीसीवर राजन दातार नावाच्या वार्ताहराने स्वत:चीच ओळख रॅजन दॅतार अशी करून दिल्याचे पाहिल्यावर हसावे की रडावे ते कळले नाही.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अनेक पदरी ओळख

प्रत्येकाच्या ओळख ही अनेक पदरी असते. त्यात वंश, नागरीकत्व, धर्म, भाषा इ. चा समावेश होतो. हे सर्व पदर एकाच वेळेस सारखेच महत्त्वाचे नसतात. त्यांची क्रमवारी (हयेरार्की) स्थळ-काळाप्रमाणे बदलत असते.

माझ्या गावात माझे ओळख भारतीय, हिंदू किंवा मराठी अशी असण्याचे काहीच कारण नाही, कारण गावातील जवळपास सर्वांचीच ती ओळख असणार आहे. तेव्हा तेथे माझी ओळख ठरवते माझी जात (मानत नसलात तरी) आणि घराणे (अमक्यातमक्याचा नातू इ.).

मुंबईत मात्र मराठी ही ओळख जास्त महत्वाची!

अमेरीकेत मुख्य ओळख भारतीय ही. हिंदू ओळख नंतरची.

उद्या कदाचित परग्रहावरून कोणी आले तर समस्त मानवजातीची ओळख पृथ्वीवासी हीच !

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुंदर लेख

कोण कोणाची आई हे एकीकडे ठरत असतानाच :) हेही नमुद करावेसे वाटते, की हा लेख या चर्चेपेक्षा फार वेगळ्या विषयाला हात घालणारा आहे ;).

असो.. लेख खूप आवडला. विचार करायला लावणारा आहे. पुन्हा चिंतन केल्यावर व "खरी चर्चा" सुरु झाल्यावर मतांच्या पिंका टाकीनच :)
पण्, "मी कोण" या प्रश्नाचे उत्तर या जागतीक गावातील (ग्लोबल व्हिलेज) कोणीही गावकरी देऊ शकेल असे वाटत नाहि.
किंबहुना तुम्ही स्वतःला कोण समजता या पेक्षा लोक तुम्हाला कोण मानतात यावर तुमची ओळख ठरते हे तुमचे म्हणणे मात्र् सोळा आणे पटले.

-ऋषिकेश

अनेक आभार

अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलात. कोण असा असेल ज्याला आयुष्यात कधी ना कधी "कोSहम् ?" हा प्रश्न पडला नसेल ! शतकानुशतके जो प्रश्न एका आध्यात्मिक पातळीवर विचारला जातो आहे , आजच्या जगात हाच प्रश्न इतर अनेक संदर्भात महत्त्वाचा ठरतो आहे.

मला असे वाटते की आजचा माणूस अनेक थरांचा बनलेला आहे. "जडणघडण" या प्रक्रियेतून तुम्ही आम्ही सर्वजण जातो. प्रत्येक जण आपापल्या "घडण्याच्या" कुवतीनुसार घडत जातो. बदलाना जी व्यक्ती यशस्वीपणे सामोरे जाते त्या व्यक्तीवर अनेक संस्कारांचे लेप चढत जातात ; त्याची विचारप्रक्रिया अधिकाधिक सर्वसमावेशक आणि प्रसंगी गुंतागुंतीची बनते. अशा व्यक्तीला कधीतरी , केव्हातरी "मी कोण ? माझी ओळख काय ?" यासारखे प्रश्न पडणारच. ज्याने कधी आपली चिंचोळी , कोती विचारसरणी सोडली नाही, नवनवीन प्रदेशाना, वेगवेगळ्या वंश-जाति-धर्माना , आचारविचाराना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्याला असे प्रश्न पडणे कठीण. "मळ्यास कुंपण पडणे" ज्याला साहावत नाही त्या "नव्या शिपायाला" मात्र हे प्रश्न पडणार हे अपरिहार्य.

या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याचे स्वतःचे. ते ज्याने त्याने स्वतः शोधायचे. ("प्रत्येकाला आपला क्रूस स्वतः वहावा लागतो" अशा अर्थाच्या एका इंग्रजी वाक्याची आठवण येते.)

मला वाटते, एखाद्या नॉन्-कॅथ्लिक् व्यक्तिला अंत्यदर्शनाच्या प्रसंगी "बाजूला हो" असे सांगणे काय, की आपल्यावरील धर्माच्या जबरदस्त पगड्यामुळे एखाद्या नॉन्-ख्रिश्चन माणसाच्या समाधीचे दर्शन घ्यायला नकार देणे हे त्या त्या व्यक्तिंच्या "न घडण्याच्या" द्योतक आहेत. अशी उदाहरणे केवळ ख्रिश्चन-कॅथ्लिक सनातनवाद्यांचीच आहेत असे मानायचे काहीच कारण नाही. सर्व धर्मामधे हे सापडायचेच.

थोडा खुलासा

प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम धन्यवाद!

धर्माच्या जबरदस्त पगड्यामुळे एखाद्या नॉन्-ख्रिश्चन माणसाच्या समाधीचे दर्शन घ्यायला नकार देणे हे त्या त्या व्यक्तिंच्या "न घडण्याच्या" द्योतक आहेत. अशी उदाहरणे केवळ ख्रिश्चन-कॅथ्लिक सनातनवाद्यांचीच आहेत असे मानायचे काहीच कारण नाही. सर्व धर्मामधे हे सापडायचेच.

ज्यांच्या बरोबर मला हा अनुभव आला ते आजपर्यंत मला कधी कोते वाटले नाहीत की सनातनी वाटले नाहीत. त्यांचे म्हणणे इतकेच की ज्या "सिस्टीम"चा म्हणून मी भाग नाही त्यातला आहे असे कितीही मनापासून उदारमतवादी होत दाखवले तरी त्याची काही गरज नाही. प्रत्येकजण जसे आहे तसेच चांगले आहेत - जो पर्यंत ते इतरांना त्रास देत नाहीत तो पर्यंत ते वेगळ्या सिस्टीममधील (धार्मीक/रूढी/पद्धती या अर्थाने) असले म्हणून काही बिघडत नाही. तसे ते आहेत हे जाणून एकमेकांचा आदर ठेवू शकतो असा त्यातील मुद्दा आहे.

या संदर्भात अजून एक आठवण सांगतो. आमच्या गावचा महापौर पत्रकारांशी बोलताना (काही वर्षांपूर्वी) "ख्रिसमस पार्टी असणार आहे" असे म्हणाला. तशी ती होती ख्रिसमसच्या वेळचीच पार्टी, पण परत उदारमतवादीपणाचा अतिरेकीपणा: पत्रकाराने विचारले की "ख्रिसमस पार्टी?" लगेच महापौराने शब्द बदलत म्हणले "आय ऍम सॉरी, आय मीन टू से, हॉलीडे पार्टी". ती बातमी छापून येताना आली की महापौराने ख्रिसमस पार्टी शब्द वापरल्याबद्दल माफी मागीतली! त्या सगळ्या किश्श्यानंतर मी त्याच्याशी बोलताना म्हणले की काय बिघडले ख्रिसमस पार्टी म्हणले म्हणून, मी ख्रिश्चन नसूनही मला त्याला उगाच सेक्यूलर करत "हॉलीडे पार्टी" म्हणणे पटत नाही... आम्ही (भारतात) दिवाळीला दिवाळीच म्हणतो आणि ख्रिसमसला ख्रिसमसच आणि ईदला ईद...पण त्याचे (निदान तोंडावर मनापासून) म्हणणे पडले की डिसेंबर हा हॉलीडे सिझन असल्याने त्याला एकाच धर्माचा न करता सगळ्यांना एन्जॉय करता यावा यासाठी हॉलीडे म्हणणे योग्य वाटते...त्याच अनुषंगाने मला नंतर आलेला अनुभव (घरात "ख्रिसमस ट्री का? " ) तो सांगीतलाच!

फेस्टिव्हल

... वरून आठवले.

"गणेश फेस्टिव्हल" चे "पुणे फेस्टिव्हल" असे नामांतर! हा हा हा!!

चांगले स्फुट. धन्यवाद.

अजून थोडेसे

मूळ विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्याबद्दल सुचत जाईल तसे लिहावे लागणार.

काही दिवसांपूर्वी मी "वहाणा" या नावाचा एक विषय सुरू केला होता. मैलोन् मैल चालल्यानंतर जशा आपल्याला आपल्या वहाणा बदलाव्या लागतात , तसेच , अनेक अनुभवानंतर गेल्यावर आपल्याला आपली मूल्ये , तत्वे यांचा नव्याने विचार करावा लागतो अशा अर्थाचे ते चिंतन होते. या लेखाशी मला त्याचा सांधा जोडता येईल असे वाटते. जसजसे आपण नवनव्या अनुभवाना सामोरे जातो तसतशी आपली नव्याने ओळख आपल्याला पटत जाते - आणि कदाचित् याच न्यायाने, काही वर्षांपूर्वीचे आपण आपल्याला काहीसे अनोळखीसुद्धा बनत जातो. माझ्या अयुष्यातील अशा पटलेल्या नव्या ओळखी आणि टाकलेल्या जुन्या "वहाणा" यांचा थोडा परामर्श घेता येईल.

एका अगदी कर्मठ म्हणता येईल अशा वातावरणात मी वाढलो. कर्मठपणातही प्रकार असतात. दुर्दैवाने, माझ्या वाट्याला जो कर्मठपणा आला त्यात धर्माच्या सांगोपांग ज्ञानाच्या डोळसपणाचा फार संबंध नव्हता. होता तो देवभोळेपणा , अवडंबर , आंधळे विश्वास. देवाधर्माची आणि माझी ताटातूट होण्याला कारणीभूत ठरले त्या संस्थांचेच आमच्या घरातील विश्वस्त. एक हिंदू , एक ब्राह्मण अशा ओळखींमधला पोकळपणा पौगंडावस्थेमधेच जाणवायला लागला होता. ज्या ओळखींचा , प्रसंगी जबरदस्त प्रभाव माझ्या आजूबाजूच्या मुलांमधे पडत असताना मी पहात होतो, नेमक्या त्याच ओळखीना मी वाढत्या वयात पारखा झालो होतो. वृथा बंडखोरीची पौगंडावस्था ओलांडताना पुन्हा धर्म-वेदोपनिषदे-गीता याची माझ्या वकूबाप्रमाणे मी ओळख करून घेतली. मात्र त्यावेळाच्या "ओळख-परेडी"त आणि लहानपणीच्या धाक-दपटशाखालच्या ओळखीत पुष्कळ फरक पडला होता. नंतरची ही ओळख आतापर्यंत टिकून आहे असे अजूनतरी वाटते. वडील गेल्यानंतरच्या प्रसंगी त्याचा प्रत्यय आला. या प्रसंगी -इतर नातेवाईकांच्या विरोधाला बिलकुल भीक न घालता - सनातनी धर्मसंस्कार नाकारून वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चांगल्या कामाला दर वर्षी देणग्या देण्याचा निर्णय घेतला.

याच अनुषंगाने असे म्हणता येईल की, "अमुक अमुक आडनावाचा" अशी एक ओळख सांगणारे लोक - शहरी भागात वाढताना क्वचितच पण तरीही - मला भेटायचे. आधुनिक जगाच्या संदर्भात मला अशा कुटुंबाच्या अभिमानाचे म्हणा किंवा जातीच्या ओळखीचे फार नवल वाटते. अशी ओळख फार काळ टिकली नाही हे सांगायला नकोच.

आज वर्षानुवर्षात मला त्या त्या देवळांमधे जायला मिळत नाही. मात्र जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा काही क्षण असे येतात की, वर्षानुवर्षाची टरफले गळून पडतात आणि "त्या" जुन्या जीर्ण "मी"ला मी भेटतो. एक शिरशीरी येऊन जाते - गतकाळाच्या स्मृतींची , विसरलेल्या ओळखीची.

थोडेसे नव्हे- बरेच काही

आज वर्षानुवर्षात मला त्या त्या देवळांमधे जायला मिळत नाही. मात्र जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा काही क्षण असे येतात की, वर्षानुवर्षाची टरफले गळून पडतात आणि "त्या" जुन्या जीर्ण "मी"ला मी भेटतो. एक शिरशीरी येऊन जाते - गतकाळाच्या स्मृतींची , विसरलेल्या ओळखीची.

मुक्तसुनीतराव, आपला शेवटचा हा परिच्छेद बरेच काही सांगुन गेला, मला प्रा दत्ता दंडगे लिखित "सो ऽऽहम को ऽहमच्या गोष्टी" या प्रायोगिक रंगभुमीवरील नाटकाची आठवण आली.
बा़की प्रतिसाद स्वतःशी जवळचा वाटला.
(आपला जवळकर)
प्रकाश घाटपांडे

लेख

बराच विचारमग्न करुन गेला. उत्तर अर्थातच सापडलेले नाही.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

उत्तर

तसे बरेचसे मूळ लेखात आहेच.

------------------------------------------------------------------
कोण रे तू? धर्म काय? जात काय तुझी? - मी एक सामान्य. समंजस जातीचा म्हणून अल्पसंख्यांक.

लेख मस्त

लेख विचार करायला लावणारा आहे. पण, काय लिहावे सुचत नाही.


प्रतिभा हरवलेला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

न्युनगंड

फारच सुंदर लेख. आमच्या मनातले सगळेच मुद्दे तुम्ही मांडले. लेखाचा शेवट - पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का? - खुप काही सांगुन जातो.
मुळातच इतर धर्मांना महान म्हणण्याची संस्कृती मनाला कुठे तरी पटत नाही. इतर धर्म हिंदू धर्मा पेक्षा तरुण आहेत. त्यामुळे त्या धर्मियांना ते जास्त पुरोगामी वाटतात आणि त्यांचा प्रचार-प्रसार देखील तसाच होतो. आम्हा हिंदूंना आमचा इतिहास मान्य करायचा नसतो. मग त्यातुन न्युनगंडाची भावना. ती लपवण्यासाठी इतरांना महान म्हणायचे या अपेक्षेने कि ते ही आम्हाला महान म्हणतील. असे का?
खरच असे सगळे प्रश्न अस्वस्थ करुन जातात.





तुम्हाला किरण बेदींचे सेफर इंडिया माहित आहे काय?

आणखी काही प्रश्न

"ओळख" या प्रकाराची एकूण व्याप्ति इतकी मोठी आहे आणि हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे की , या अनुषंगाने जे अनेक प्रश्न उपस्थित होतात त्याना या निमित्ताने वाट मिळते आहे.

अनिवासी भारतीयाना सापडलेली/न सापडलेली स्वतःची ओळख हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. एका नव्या देशाचे नागरिक बनण्याच्या प्रक्रियेमधे अनेक गोष्टी घडतात. नवीन देशातच स्थायिक होण्याबद्दल कसलाही संदेह न बाळगणारे आणि कायमचे स्थायिक व्हावे - नव्हावे याबद्द्ल केवळ संदेहच असणारे (आणि कुठल्याच निर्णयाला येऊ न शकल्यामुळे आहे त्या स्थितीत - पर्यायाने नवीन देशातच - स्थायिक होणारे ), व्यवस्थित नियोजन करून दीर्घकालीन वास्तव्यानंतरही परत भारतात परतणारे , नोकरी धांद्यातील अपयशामुळे , आर्थिक व्यवस्थेच्या संकटामुळे नाइलाज म्हणून भारतात परत जाणारे , स्वेच्छेने भारतात परत आल्यावरसुद्धा एकूण सर्व तंत्रे न जमल्याने पुन्हा परदेशी परत जाणारे , अपयशामुळे आणि नाइलाजाने भारतात जाऊनही पुन्हा परदेशी कायमस्वरूपी येण्याची स्वप्ने पहाणारे..... प्रकार तरी किती सांगावेत.

तर यापैकी तुमचा प्रकार कुठलाही असो, तुम्ही जर अनिवासी भारतीय असाल तर तुम्हाला तुमच्या ओळखीबद्द्लच्या प्रश्नाशी कधी ना कधी तरी गाठ पडली असेलच.

आपला देश म्हणजे नेमका कुठला ? परदेशात आपण कायमस्वरूपी नेमके का रहातो आहोत ? भूतकाळातील आपली आवडती माणसे, ठिकाणे, गोष्टी यांचे नि आपले नेमके काय नाते रहाते ? जेथे आपण स्थायिक झालो तिकडे आपले रोपटे नीट लावले गेले का ? लावले गेले तर रुजले का ? तिथल्या समाजाशी, लोकांशी, आचारविचारांशी (एक नोकरीधंद्याचे वगळता) आपले किती अभिसरण झाले ? एकूणच, परदेशी आल्याने आणि इथे कायमस्वरूपी राहिल्याने आपल्या एकंदर आयुष्यात भेग तर नाही पडलेली ?

मला वाटते , "ओळख" (आयडेंटीटी) ही गोष्ट या संदर्भात वर्मस्थानीची आहे. वर उल्लेख केलेले प्रश्न हे त्याशी संबंधित आहेत.

आयडेंटीटी क्रायसीस

तुम्ही जर अनिवासी भारतीय असाल तर तुम्हाला तुमच्या ओळखीबद्द्लच्या प्रश्नाशी कधी ना कधी तरी गाठ पडली असेलच. ...मला वाटते , "ओळख" (आयडेंटीटी) ही गोष्ट या संदर्भात वर्मस्थानीची आहे. वर उल्लेख केलेले प्रश्न हे त्याशी संबंधित आहेत.

अगदी पटतील असे मुद्दे आहेत. मी ९०च्य दशकाच्या सुरवातीस आणि तेही शिकायला म्हणून अमेरिकेत आलो. तेंव्हा भारतीयांमधे "आयडेंटीटी क्रायसीस" हा प्रकार जास्त आढळला. कदाचीत येथील संख्या त्यामानाने कमी होती. बर्‍याचदा एक भारतीय दुसर्‍या (नव्याने आला आहे असे वाटलेल्या) भारतीयास "मी अमेरिकेत राहतो" असा अमेरिकेतच तसे शब्द न वापरता "देखावा (शो ऑफ) करताना दिसायचा. सुरवातीस कधी कधी राग आला पण नंतर कीव वाटायला लागली. पुढे एकदा मायदेशी बाहेर घरच्यांबरोबर भटकत असताना रस्त्यात भेटलेल्या कुणाची तरी मला माहीत नसलेल्या आणि तशी त्यांचीपण तोंड ओळखच असलेल्या एका व्यक्तीची ओळख करून दिली ..मी नमस्कार वगैरे म्हणालो. कुठेही कुठे राहतो ते सांगीतले नाही. पण नंतर त्या व्यक्तीने विचारले की काय करतोस म्हणून, तेंव्हा कुठेही विशेष महत्व (आविर्भाव) न देता म्हणालो की "बॉस्टनमधे" असतो. लगेच प्रतिसाद आला, "अरे अरे, स्वतःचा देश सोडून बाहेर राहतोस, आम्ही कसे आमच्या देशाचे ...." काय करत होता ते तोच जाणे. कुठल्या गावात हा किस्सा झाला असेल? :) मला एकदम हिंदू समाजात समुद्रबंदी कशी आली असेल हे कळले. त्यामुळे काय झाले ते माहीत आहेच.

माझ्यापुरते बोलायचे तर जेथे जी ओळख ठेवायची ती ठेवतो. कारण या संदर्भातला ओळख हा प्रकार कालसापेक्ष असतो - येथे ही आणि कुठेही...जिथे भारतीय म्हणून तेथे भारतीय, हिंदू म्हणून तेथे हिंदू म्हणून. पण जेंव्हा स्टेट हाऊस मधे एखाद्या (पर्यावरण संदर्भात) कायदा होण्यास पाठींबा देण्यासाठी, तो कसा महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी जातो, तेंव्हा मी केवळ माझ्या शहराचे अथवा राज्यातील समविचारी माणसांचे प्रतिनिधित्व करत असतो. उगाच तेथे मी हिंदू अथवा भारतीय असण्याचा संबंध काय!

आपला देश म्हणजे नेमका कुठला ? परदेशात आपण कायमस्वरूपी नेमके का रहातो आहोत ? भूतकाळातील आपली आवडती माणसे, ठिकाणे, गोष्टी यांचे नि आपले नेमके काय नाते रहाते ? जेथे आपण स्थायिक झालो तिकडे आपले रोपटे नीट लावले गेले का ? लावले गेले तर रुजले का ? तिथल्या समाजाशी, लोकांशी, आचारविचारांशी (एक नोकरीधंद्याचे वगळता) आपले किती अभिसरण झाले ?

याची माझ्यपुरती/वाटतात ती उत्तरे:

आपला देश हा ज्या देशाचा पासपोर्ट तो. मी भारतीय आहे. पण कोणी इतर देशाचे नागरीकत्व घेतले असले म्हणून अयिग्य नाही. किंबहूना तुम्ही जर नक्की स्थायीक होत असाल तर तसे घ्यावेच कारण नाहीतर कालांतराने कायद्याच्या कचाट्याचा (मालमत्ते साठी वगैरे) त्रास होउ शकतो. आपण इतरत्र का रहातो याचे प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकेल. कुणाला आवडते म्हणून, कुणाला भारत आवडत नाही म्हणून, कोणी कामानिमित्ताने तर कोणी मोठे घर आणि बॅकयार्ड घेण्याचा "घरोंदा"च्या इच्छेने. भूतकाळाशी नाते तोडता येत नाही आणि तोडू ही नये पण म्हणून गरजे पेक्षा जास्त जेंव्हा रमले जाते तेंव्हा त्रास होऊ शकतो हे ही समजून घ्यावे. बाहेरच्या (परदेशी) माणसांशी चांगले संबंध होऊ शकतात हा अनुभव आहे, पण उगाच त्यांच्यासारखे वागायची गरज नसते किंबहूना वागूही नये असे वाटते. आचारविचारांच्य बाबतीत देवाणघेवाण असावी. उ.दा. आमच्या कडे कोणी गोरे जेवायला आले आणि त्यांना पास्टा दिला तर ते परत घराची पायरी चढणार नाहीत :-)

एकूणच, परदेशी आल्याने आणि इथे कायमस्वरूपी राहिल्याने आपल्या एकंदर आयुष्यात भेग तर नाही पडलेली ?

होऊ शकते, जसे मोठे होवू तसे. आधीच्या पिढीत जास्त झाले - अमेरिकेपुरते बोलतोय. आता आपली माणसे वाढली आहेत दळण वळण सोपे झाले आहे, कदाचीत तेव्ह्ढे होणार नाही. पण केवळ घराच्या आणि पैशाच्या अपेक्षेने येथे राहणार्‍यांना कदाचीत कालांतराने असे वाटू शकते, की, "Money buys comforts, not happinenss".

यावर एक उपाय आहे, स्वतःच्या बाहेर जाऊन काहीतरी (सामाजीक/कम्युनिटीसाठी) काम करायची (ज्यात आवड असेल त्यात) सवय लावणे आणि तसे नेमाने काम करणे...

अवांतर :कर्वे कुटुंबीयः नाती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या विषयी निश्चित माहिती अशी:
* १. दिनकर धोंडो कर्वे. २ रघुनाथ धोंडो कर्वे...हे दोघेही महर्षी धोंडो केशव कर्वे याचे पुत्र.
* इरावतीबाई कर्वे या दि.धों.कर्वे यांच्या पत्नी. म्हणून महर्षी कर्वे यांच्या स्नुषा.
*डॉ. आनंदराव कर्वे (नंदू) हे इरावतीबाई आणि दि. धों. यांचे पुत्र.
* त्या काळी इरावतीबाई आपल्या पतीला 'दिनू' अशा एकेरी नावाने संबोधित असत.त्याविषयी एक किस्सा.$
..........................................................................

किस्सा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वेळे अभावी किस्सा लिहायचा राहिला. फारसा चांगला आहे असेही नव्हे. पण लिहितो.अर्थातच ऐकीव आहे.लिखित स्वरूपात वाचलेला नाही.
डॉ.दि धों. कर्वे फर्ग्यूसन कॉलेजचे प्राचार्य होते. डॉ. इरावती डेक्कन कॉलेजात प्राध्यापिका होत्या. त्या आपल्या पतीला "अरे दिनू " असे संबोधित.(हे सर्व खरे आहे.)
....* एकदा इरावतीबाई कॉलेजात जाण्यासाठी घरातून लौकर बाहेर पडल्या. त्यांना फाटकातून एक माणूस आत येताना दिसला. त्याला पाहून बाई म्हणाल्या
"दिनू, हा नळ दुरुस्त करणारा माणूस आला बघ. त्याच्याकडून काय ते व्यवस्थित काम करून घे. मी निघाले."
अर्धी चड्डी आणि बनियन अशा वेषात असलेले डॉ कर्वे बागेला पाणी घालत होते. ते हो म्हणाले.
थोड्यावेळाने ते घरात आले. सिगारेट शिलगावून आरामखुर्चीत पेपर वाचत बसले.
त्यांना पाहून तो कामगार म्हणाला, "दिन्या, बाईसाहेब बाहेर पडल्यावर तू आरामात खुर्चीत बसून विडी ओढतो आहेस. वर पेपर वाचण्याचे सोंग करतोयस. चल, मला दे एक विडी. आणि काय काम करायचे ते दाखव."

किस्सा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
यात काही वाईत आहे असे नव्हे. पण विषेश वाचनीय नाही एवढेच. बाई याला अरे दिनू म्हणतात त्या अर्थी हा कोणी गडी माणूस असावा असा त्या कामगाराचा समज होणे स्वाभाविक आहे.

संध्या = सँडी

श्री. विकासराव,

अत्यंत कळीच्या मुद्द्याला हात घातलात. मला वाटते की दुर्दैवाने मागच्या हजार वर्षांच्या इतिहासातून तयार झालेली पराभूता मानसिकता भारतीयांच्या न्यूनगंडाचे कारण आहे. स्वतःच्या ओळखी संदर्भातही हीच मानसिकता दिसून येते.

मला या सर्वात मूळ प्रश्न पडतो आणि तो केवळ भारतीयांबद्दल् कारण जगात इतर कुठल्याही देशातील लोकं असे वागत नाहीत (थोडेफार अमेरिकन्सच सोडले तर!) की असा स्वतःच्याबाबतीत आपण न्यूनगंड का ठेवतो?
--- सतत हजार वर्षे पारतंत्र्यात राहिलेल्या भारतीयांना आपल्या स्वभिमाणाचा विसर पडला होता (शिवाजी, राणा प्रताप असे काही अपवाद). या मानसिकतेतून जनतेला बाहेर काढण्याचे काम स्वतंत्र भारताच्या नेत्यांचे होते. परंतू "मी केवळ जन्माने हिंदू आहे" असे निर्लज्जपणे सांगणार्‍या नेत्याकडे भारताचे नेतृत्व गेले अन हा समान अणखीच जास्त न्यूनगंडात गेला. या न्यूनगंडाशी माझी ओळख तशी बालपणीच झाली. आमच्या गावी केवळ एक मुस्लीम कुटुंब होते. ते धार्मिकही होते पण हिंदू सणवार, देवधर्म करायचे, मुस्लिम नव्हे. त्या कुटुंबाने गावातल्या सामुहिक रामायणाचा खर्च सुद्धा उचललेला आठवतो. पण गावकरी मात्र त्या घरातील सदस्यांना "सलामालेकूम" म्हणत तसेच मोडक्या-तोडक्या उर्दूत बोलायचा प्रयत्न करत (निजामीचा पगडा). मला प्रश्न पडायचा की ज्यांना मराठी खूप व्यवस्थित येते त्यांना ही माणसे उर्दूत का बरे बोलत असावेत. "राम राम" केल्यावर "राम राम"नेच उत्तर देणार्‍या या मंडळीला "सलामेलुकुम" का बरे करत असावेत? उत्तर...न्यूनगंड. हीच स्थिती येथे आमच्या मराठी मित्रांच्या टोळक्यात सुद्धा आहे. "शूर आम्ही सरदार" हे गीत पाडव्याच्या कार्यक्रमात गाणार्‍या सय्यदशी बोलताना आमच्यातले काही लोक विनाकारण हिंदी (उर्दू) मध्ये संभाषण सुरु करतात! मला मात्र हाच सय्यद "नमस्कार" म्हणतो. "या" मित्रांचे म्हणने होते की त्याला नमस्कार म्हणून तू त्याच्या भावना दुखावत नाहीस काय? मी सर्वांच्या समक्ष त्यालाच विचारले. त्याचे म्हणने "मी सुद्धा तुमच्यातलाच आहे हो. तुम्ही वेगळे समजू नका".

अमेरिकेत अथवा भारताबाहेर कुठेही, "आज आमच्याकडे गणपती आहेत, अथवा दिवाळी आहे" वगैरे म्हणले तर त्यात कुणाच्या काय भावना दुखावणार आहेत? अनुभव नाही, पण निरीक्षण आहे की तसे स्वतःस कमी लेखणार्‍या लोकांना इतरांकडून काही "बेसीक रीस्पेक्ट" मिळत नाही.
--- आमच्या टीममध्ये मुरली आला तेव्हा त्याने आमच्या व्यवस्थापकास (मॅनेजर) ओळख करुन देताना "मुराली" असे म्हणाला. व्यवस्थापकाने म्हटले "इज मुरली डिफरंट दॅन मुराली?" पुढे तो म्हणाला, "डू इंडियन्स इन इंडिया नो द प्रोनान्सिएशन ऑफ मॅकडोनाल्डस?". मुरली, "येस". व्यवस्थापक, "वाट इफ मॅकडोनाल्ड (एम सी डोनाल्ड) हॅड मेसड अप हीज नेम लाइक यू आर डुइंग?"
--- आमच्या एका मित्राच्या बायकोचे नाव संध्या. पण ते ओळख सँडी म्हणून करुन देतात.

ह्या विषयाची सुरवात आपली ओळख कशाने असते आणि त्यात धर्माची नावे घेणे आणि त्यातही हिंदूंनी इतरांबद्दल बोलणे याने झाली होती. त्यासंदर्भात शेवटी एकच मला वाटते ते लिहीतो की आपण स्वतःस हिंदू समजत असलात तर ते काही "गर्वसे कहो.." करत म्हणायची अजीबातच गरज नाही पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का?
---अगदी पटले.

या विषयावर बरेच काही चर्चिले जाण्यासारखे आहे. पुढे आजून लिहूच.

आपला,
(स्वाभिमानी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सलामालेकुम्

आमचा एक बिनतारी मित्र सय्यद त्याला एक विभागातील दुसरा माणुस भेटला
"सलामालेकुम"
"नमस्कार"
"क्या कैसे क्या चल रहा है"
"मजेत आहे"
"अभि किधर है"
"अलिबागला आहे"
"फिर ट्रानस्फर बिनस्फरका कुछ सोच रहेला है कि नई"
"नाही . बघु होईल तेव्हा."
"ठीक् है फिर"
"बरायं"
थोडा वेळाने सय्यद मला म्हणाला मी त्याच्याशी मराठीत बोलतोय हे त्याच्या शेवटपर्यंत लक्षात आलं नाही. हे असच होत बर्‍याच वेळा.
प्रकाश घाटपांडे

मस्त!

सॉलीड किस्सा आहे. आणि तो तसा घडू शकतो याबद्दल खात्री आहे. अशा प्रकारच्या लोकांमधे म्हणजे आपल्या उदाहरणात सय्यद पेक्षा त्याच्याशी बोलणार्‍या व्यक्तीचीच जास्त ओळख घडते...

जेंव्हा परदेशी जाणे म्हणजे नवलाईपेक्षाही जास्त होते, तेंव्हा आमच्या (त्यावेळच्या) गावातल्या एका बाईचा नवरा कामानिमित्त कुठेतरी देशाबाहेर ८-१० दिवसाकरता जाऊन आला. त्यानंतर या बाईचे अचानक बोलताना इंग्लीश फाडणे आणि (त्या काळासाठी) कपड्यातील "मॉडर्न" (यातला "न" जरा ठसक्यात) पणा आला. या घटनेची आठवण झाली...

विचार करायला लावणारा प्रश्न

त्यासंदर्भात शेवटी एकच मला वाटते ते लिहीतो की आपण स्वतःस हिंदू समजत असलात तर ते काही "गर्वसे कहो.." करत म्हणायची अजीबातच गरज नाही पण एक धर्म, जो आचाराने बदलण्याची गरज जरी असली तरी विचाराने कालातीत तत्वज्ञान आहे, अशा हिंदू धर्माचा एक वाळूच्या कणा एव्ह्ढा आपण भाग आहोत याबद्दल लाज वाटून घेण्याची तरी गरज आहे का?

जन्माने? विचाराने? आचाराने? यावर अंतर्नाद च्या एका दिवाळी अंकात / विशेषांकात (साल आठवत नाही पण मुख पृष्ठावर चा मजकूर आठवतो "मजहब नही सिखाता आपस में बैर रखना |) यावर परिसंवाद होता. संग्राह्य अंक होता.

प्रकाश घाटपांडे

उत्तम

विकासराव,
प्रथम हा चर्चाविषय सुरू केल्याबद्दल अभिनंदन. या विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की यावर एक लेखमाला किंवा चर्चासत्रही सहज चालू शकेल. दुसरा मुद्दा म्हणजे या प्रश्नाची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वेगवेगळी उत्तरे आहेत, त्यातील कुठलेही बरोबर किंवा चूक नाही. प्रत्येकाला आपापले उत्तर शोधण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मानसशास्त्रीय दृष्टीकोन : यातही वेगवेगळी मते आहेत. आपल्याला आपण जसे वाटतो तसे इतरांना बरेचदा वाटत नाही. याचा पडताळा घ्यायचा असेल तर एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीला तुमची १० वैशिष्ट्ये लिहायला सांगा. तुम्ही तुमची १० वैशिष्ट्ये लिहा आणि दोन्हींची तुलना करा. यात बरेचदा तफावत आढळून येते. (असे झाल्यास मित्राशी वाद घालू नका :) ) बरेचदा तुम्हाला एखाद्या माणसाचा एखादा गुण आवडत नाही याचे कारण तो गुण तुमच्यात असतो पण ते तुम्ही नाकारत असता. मला रागीट माणसे आवडत नसली तर कुठेतरी माझ्या स्वभावातील रागीटपणा मी नाकारत असल्याची शक्यता असते. यालाच प्रोजेक्शन असे म्हणतात.
तत्त्वज्ञानाचा दृष्टीकोन : तुमची नेमकी ओळख काय? तुम्ही बाकीच्या लोकांना जसे दिसता ती तुमची ओळख मानली तर ती प्रत्येक दिवसाला बदलत असते. शिवाय यात त्या व्यक्तीच्या पूर्वग्रहांचा परिणामही असू शकतो. यावर जे. कृष्णमूर्ती यांचा एक रोचक विचार आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखता तेव्हा त्याची एक प्रतिमा तुमच्या डोक्यात फिट्ट असते. तो जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्ही त्याच्याशी नव्हे तर तुमच्या डोक्यातील त्याच्या असलेल्या प्रतिमेशी संवाद साधत असता. या दरम्यान प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, नवनवीन अनुभव, संवेदना यामुळे तो बदलत असतो. म्हणूनच जेव्हा एखाद्या दिवशी त्याचे वागणे तुमच्या डोक्यातील प्रतिमेशी जुळत नाही तेव्हा तुम्हाला धक्का बसतो.
याखेरीज आपली देशानुसार, धर्मानुसार, भाषेनुसार ओळख असतेच आणि तीही स्थानाप्रमाणे बदलत असते. आपल्या ओळखी नात्याप्रमाणेही बदलत असतात. तुमचा बॉसला असणारी तुमची ओळख आणि तुमच्या जिवलग मित्राला असणारी तुमची ओळख यात जमीन अस्मानचा फरक असतो. म्हणूनच ते दोघे एकमेकांना भेटले तर कधीकधी ऑकवर्ड (शब्द?) प्रसंग येऊ शकतो. याखेरीज परदेशातील भारतीयांच्या ओळखीबद्दल वर बरेच विचार आलेच आहेत.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

अनुभव

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

दुसरा मुद्दा म्हणजे या प्रश्नाची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वेगवेगळी उत्तरे आहेत, त्यातील कुठलेही बरोबर किंवा चूक नाही. प्रत्येकाला आपापले उत्तर शोधण्याचा पूर्ण अधिकार आहे.

अगदी बरोबर बोललात!

याचा पडताळा घ्यायचा असेल तर एखाद्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीला तुमची १० वैशिष्ट्ये लिहायला सांगा.

या वरून एक अनुभव सांगावासा वाटला. असा एक प्रकार आमच्या ग्रुपने केला होता. प्रत्येकाने/प्रत्येकीने इतर प्रत्येकातील त्याला/तीला जो काही चांगला गूण वाटतो तो सांगायचा आणि तसेच जे काही चुकीचे वाटते ते पण सांगायचे. कोणीही आधी सांगीतलेल्यातले गूण/दुर्गूण पुन्हा सांगायचा नाही. दोन्ही गुण/दुर्गूण प्रामाणीकपणे सांगावेत. गूण सांगताना उगाच हा/ही चांगला/ली आहे असले मोघम नाही आणि दुर्गुण म्हणून सांगताना मानहानी - मजा म्हणून पण करायची नाही एव्ह्ढीच काय ती अट... "बेस्ट मिरर इज द फ्रेंडज् आय" असे का म्हणतात ते तेंव्हा कळले.

"जिग्-सॉ"

या "ओळख" शब्दावरून आणि त्यावर चाललेल्या उहापोहावरून मला रामदास भटकळांच्या "जिग्-सॉ" या व्यक्तिचरित्रसंग्रहाची आठवण झाली. भटकळांच्या आयुष्यात त्याना भेटलेल्या लेखक-प्रकाशक आणि इतर सुहृदांची त्यानी वेळोवेळी काढलेली व्यक्तिचित्रे.

पुस्तकाचे नाव फार अर्थपूर्ण आहे : "जिग्-सॉ". तुकडे तुकडे सांधण्याचा , त्यातून एखादे अर्थपूर्ण चित्र बनविण्याचा खेळ. भटकळांची ही व्यक्तिचित्रे प्रदीर्घ आहेत. प्रत्येक व्यक्तिला जवळून पाहताना, तिच्या सहवासात वर्षानुवर्षे घालवल्यानंतर आपल्याला ती व्यक्ति कितपत कळली , तिने आपल्याला आणि कमी जास्त प्रमाणात आपण तिला कितपत "घडविले" या सार्‍याचा सांगोपांग धांडोळा त्यानी घेतलाय्. आठवणींचे, व्यक्तिंच्या सहवासात घालवलेल्या कालखंडाचे सगळे तुकडे जणू ते जुळवत बसले आहेत आणि शोध करत आहेत आपल्या स्वतःच्या चेहर्‍याच्या चित्राचा.

"स्व"ची ओळख आयुष्यात आलेल्या गुणी व्यक्तिंच्या संदर्भात लावणे हा देखील एक अर्थपूर्ण आयाम ओळख या सदरात येतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण.

कॅलिडोस्कोप

एकाच माणसाविषयी वेगवेगळी मते कशी असतात याचे उदाहरण म्हणून अच्युत बर्वेंचे कॅलिडोस्कोप हे पुस्तक वाचावे. (ते अत्र्यांशी वाद असलेल्या एका प्रसिद्ध लेखकाच्या जीवनावरुन घेतले आहे असे ऐकले होते.)
मूळ चर्चाविषयावर मतः एखाद्या परदेशात पूर्ण एकरुप होणे कठीणच असावे,सभोवतालचा प्रसंग व लोक पाहून कसे वागावे ते त्या त्या वेळी ठरवावे असे वाटते.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

हत्ती आणि सात आंधळे.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
ही कथा आठवा म्हणजे मग लक्षात येईल की आपल्या बद्दलच्या इतरांच्या काय कल्पना आहेत ते.
वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या माणसात वावरताना प्रत्येक माणूस वेगवेगळाच असतो. ह्या वेगळेपणातच आपली खरी ओळख असते.

वळख

"काय वळाखल का?" गावाकडे गेल्यावर् समोरच्याने प्रश्न विचारला. निमिषार्धात मेंदुला संदेश गेला. मनुष्य जवळपास ८० वर्षाचा होता. २०-२५ वर्पंपुर्वीची प्रतिमा डोळ्यासमोर आली. त्यात आता बराच चेहर्‍यात फरक पडला होता.मेंदुने क्षणार्धात कौल दिला हाच तो आपल्या वाड्यावर येणारा माणुस.
"ओळखल ना!" मी
" मंग सांगा बरं मी कोन?" असा पेचात टाकणारा प्रश्न त्याने विचारला. मेंदुला परत संदेश गेला. झटकन तोंडातुन उत्तर बाहेर पडलं "बापु पिंगट"
"बराब्बर" मग पुढील गप्पा.
( स्मरणशील )
प्रकाश घाटपांडे

पैचान कोन?..

सॉरी सॉरी गंभीर विषयात विषयांतर करणार होतो.

पण असं ऐकलं आहे कि त्या नितीन प्रभाकरला आता "पैचान कोन्?" वाला म्हणूनच ओळखतात. त्याला आता टाईपकास्ट होण्याची भिती वाटते आहे.

पैचान कोन

हे नक्की काय आहे बुवा ?

 
^ वर