अवतार, पुनर्जन्म वगैरे

अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते. आत्मा मात्र जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे गीतेत सांगितले आहे. ८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यावर मानव जन्म मिळतो असे म्हटले जाते म्हणजेच जन्म-पुनर्जन्माच्या चक्रातून आत्मा फिरत जातो. अवतार ही संकल्पना पुनर्जन्मापेक्षा थोडी वेगळी आहे. अवतार हा ईश्वराने किंवा स्वर्गस्थ देवांनी पृथ्वीवर दुसर्‍या रुपात किंवा जन्मात प्रकट होणे. याचा संबंध पुनर्जन्माशी थेट न लागता, मनुष्य म्हणून पृथ्वीवर आविर्भूत होण्याशी किंवा प्रकट होण्याशी लागतो. यापेक्षा किंचित वेगळी संकल्पना शापाची. शाप दिल्यावर एखादा विविक्षित जन्म घ्यावा लागे किंवा रुपांतर करावे लागे आणि शाप संपला की मूळ जन्मात जाता येई. अप्सरा, गंधर्व, यक्ष आणि देवही या संकल्पनेशी निगडित असत. म्हणजेच -

१. ८४ लक्ष योनींचा मानवास पडणारा फेरा - या मुद्द्यास तात्पुरते बाजूला ठेवू.

२. दैवी अवतार - देवांचा पृथ्वीवर आविर्भाव होणे. हे होताना देव मूळ रुपातही अस्तित्वात असत का काय याबाबत साशंकता आहे.

३. शापामुळे मानवेतर आणि देवांपेक्षा कनिष्ठ मानल्या गेलेल्या जाती (किंवा कनिष्ठ देव) यांना पृथ्वीवर वेगळ्या जन्मात किंवा रुपात यावे लागणे आणि शापाच्या पूर्तीनंतर पुन्हा परतता येणे.

या सर्व संकल्पनांची सुरुवात नेमकी कोठे झाली हे जाणून घ्यायचे आहे. महाभारत आणि पुढे पुराणे यांत पुनर्जन्म आणि अवतार यांचा भरणा दिसतो. किंबहुना, अवतार आणि पुनर्जन्माशी निगडित गोष्टी नसत्या तर महाभारत सुमारे एक लक्ष श्लोकांचे झालेच नसते. महाभारतातील प्रत्येक महत्त्वाचे पात्र हे पुनर्जन्माचे किंवा अवताराचे फलित आहे. या कथाही चमत्कारिक आहेत. पुढे जाऊन सांगायचे तर भाकड आहेत

१. गंगा - वसुंना शाप मिळाल्यावर ते गंगेच्या पोटी जन्माला येण्याची मनधरणी करतात गंगा मनुष्यरुपे अवतरते. शंतनुशी लग्न केल्यावर तिच्या पोटी वसु जन्म घेतात. गंगा त्यांना गंगेच्याच पाण्यात बुडवते म्हणजेच गंगा मनुष्यरुपात आणि जलरुपात एकाच वेळी अस्तित्वात आहे.

२. भीष्म - हा प्रभास नावाचा आठवा वसु. याचा प्रमाद अधिक असल्याने याला इतर वसुंप्रमाणे चटकन शापमुक्ती मिळत नाही. हा जन्म आणि मरणाच्या पूर्ण फेर्‍यातून जातो.

३. विदुर - यमधर्माला मांडव्य ऋषींचा शाप मिळाल्याने यमाचा पुनर्जन्म विदुराच्या रुपात होतो.

४. युधिष्ठिर - हा साक्षात यमधर्माचा पुत्र. आता हे कसे शक्य आहे? यमधर्म तर विदुराच्या रुपात जिवंत आहे. महाभारताप्रमाणे यमाला शापामुळे पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला आहे. अवतार नाही. युगान्तमध्ये इरावती कर्वे म्हणतात की विदुरच यमाचा पिता असण्याची शक्यता आहे. इतर तज्ज्ञ यास दुजोरा देत नाहीत. याबाबत माझे एकांशी बोलणे झाले त्यांचे मत असे की "जातीपातीच्या संकल्पना महाभारत काळी रुजलेल्या दिसतात. विदुराला पत्नी शोधतानाही शूद्रकन्याच शोधलेली दिसते. काही केल्या विदुर बलवान होऊ नये याची काळजी महाभारतात घेतलेली आहे. तेव्हा युवराजाचा जन्म शूद्रापोटी करवून घेण्याचा मूर्खपणा करण्यात आला नसावा. कुलीन, राजबिंड्या परंतु विनापाश पुरुषांची निवड येथे झाली असावी."

५. द्रौपदी - द्रौपदीच्या पुनर्जन्माची कथा आपण उपक्रमावर मागे वाचली होतीच. (पाच इंद्र, स्वर्णकमळे वगैरे) म्हणजेच द्रौपदी ही शची होती. जर का पाच इंद्र तिला या जन्मी मिळाले तर यमपुत्र, वायूपुत्र, अश्विनीकुमारपुत्र हे सर्व इंद्र मानावे लागतात आणि अर्जुनाचे काय त्याचा पिताही इंद्रच!!

पुन्हा द्रौपदी जन्माबाबत महाभारतात दुसरी कथाही उपलब्ध आहे.

एका ऋषीकन्येला तिच्या पूर्वजन्मांतील पापांमुळे या जन्मी दुर्दैव प्राप्त झाले होते. तिला कोणी नवरा मिळत नव्हता. त्यावर उपाय म्हणून तिने कडक तप आचरले. तिच्या तपावर शंकर प्रसन्न झाला आणि म्हणाला की हवा तो वर माग. या कन्येने आनंदाने "मला एक सुयोग्य वर हवा." अशी मागणी पुन्हा पुन्हा केली. त्यावर शंकराने वर दिला की भारतवर्षातील पाच सुयोग्य राजपुत्र तुझे पती होतील. कन्या म्हणाली, "मी फक्त एकच वर (पक्षी: नवरा) मागितला होता. हे पाच वर नकोत." शंकर म्हणाले, "तू वर (पक्षी: बून) पाच वेळा मागितलास. तेव्हा या जन्मी नसेल तर पुढील जन्मी तरी तुला पाचांची पत्नी व्हावेच लागेल." आणि अशा प्रकारे द्रौपदीला पाच पती मिळाले.

ही केवळ महाभारतातील काही उदाहरणे आहेत. अशा अनेक खाचाखोचा आणि घोळ शोधता येतात. याचे कारण अनेक मुखे मूळ महाभारतात भरणा झाली आणि ती होत असता मागचे संदर्भ ध्यानी घेतले नाहीत का काय हे कळत नाही.

अवतारांविषयी ही अनेक घोळ दिसतात. मत्स्यावतार, कूर्मावतार, वराहावतार, नरसिंहावतार वगैरें मध्ये जन्म-मृत्यूचे दाखले नाहीत. तेथे विष्णू पृथ्वीवर विविक्षित रुपात प्रकट झाला आणि दुष्टांचा संहार झाला हे कळते. वामनावतार, परशुरामावतार, रामावतार आणि कृष्णावतारात विष्णू पूर्ण मनुष्य रुपात जन्माला येतो. पैकी वामनाच्या मृत्यूबद्दल मला विशेष माहिती नाही. तो अदिती आणि कश्यपाचा पुत्र (पक्षी: देव) असल्याने त्याने अमृत प्याले होते काय याबाबत कल्पना नाही. परशुराम चिरंजीव. रामायणात आणि महाभारतात त्याचा वावर आहे म्हणजेच विष्णूचे दोन दोन अवतार एकाच वेळी भूतलावर काय करत होते? किंवा विष्णूचा एक अवतार भूतलावर उपलब्ध असताना त्याला दुसरा अवतार घेऊन पुन्हा पृथ्वीवर अवतरण्याची गरज कोणती? राम आणि कृष्ण या दोघांना मानवी जन्म आणि मृत्यू आहेत.

असो.

अवतार आणि पुनर्जन्म याबाबत माझा काही घोळ होतो आहे की हे घोळच आहेत यावर कोणी प्रकाश पाडला तर आवडेल आणि जर हे असे घोळ महाभारतात, पुराणांत आहेत तर या संकल्पनांवर विश्वास ठेवून आपण हिंदु धर्मातील अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पना आजही खर्‍या मानत आहोत आणि ग्राह्य धरत आहोत काय?

चर्चा कशी अपेक्षित आहे?

 • अवतार आणि पुनर्जन्म यांतील नेमका फरक काय?
 • महाभारतकालापूर्वीही वेदांत या संकल्पना आढळतात का?
 • महाभारताच्या कथेत घोळ आहे की काही वेगळे स्पष्टीकरण येथे आहे?
 • अवतार, पुनर्जन्म अशा कल्पना ग्राह्य धरल्याने व्यक्तिपूजेचे स्तोम आपल्याकडे अधिक दिसते का?

शेवटचा प्रश्न विचारायचे कारण असे की बाबा-बुवा किंवा कोणत्याही लोकप्रिय व्यक्तिस ईश्वरी अवताराचे लेबल लावून टाकण्याची सवय आपल्याकडे दिसते.

विशेष खुलासा: ही चर्चा एकटाकी टाकल्याने संदर्भांत गफलत असण्याची शक्यता आहे. तसे आढळल्यास प्रतिसादांतून चूक सुधारून द्यावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

फरक

>>अवतार आणि पुनर्जन्म यांतील नेमका फरक काय?

पुनर्जन्म प्रत्येकाला. अवतार फक्त देव आणि सेमी देव यांचेच.

महाभारतात तरी हे उल्लेख पहिल्यापासून आहेत की भक्तीमार्गाच्या प्रसारानंतर (पक्षी= ७व्या/८व्या शतकानंतर) अवतार
वगैरे कल्पना घुसल्या?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

असा फरक नाही

पुनर्जन्म प्रत्येकाला. अवतार फक्त देव आणि सेमी देव यांचेच.

असा फरक नाही. :-) पुनर्जन्म म्हणजे मागील जन्माशी संपूर्ण नाते तोडून, शरीर सोडून नवा जन्म स्वीकारणे. अवताराबाबतही असेच होते का? की देव पृथ्वी आणि स्वर्ग दोन्ही ठिकाणी एकाचवेळी वास्तव्य करत. तसे असल्यास कुठल्याशा गोष्टीत, लक्ष्मी विष्णूच्या विरहाने बेजार झाली होती अशीही गोष्ट आहे.

महाभारतात तरी हे उल्लेख पहिल्यापासून आहेत की भक्तीमार्गाच्या प्रसारानंतर (पक्षी= ७व्या/८व्या शतकानंतर) अवतार वगैरे कल्पना घुसल्या?

नेमके माहित नाही परंतु शक्यता आहेच :-) आणि तेच तर जाणून घ्यायचे आहे.

स्वैर शक्यता

देव अमर असतात अशी पूर्वपिठीका असल्याने त्यांना पुनर्जन्मातून मुक्त केले असावे. मानव जातीकरता पुनर्जन्माची (की पुनर्मृत्युची) भीती दाखवून कर्म करणे का महत्त्वाचे आहे हे पटवून द्यायचे असावे. पुढे कदाचित सामान्यांमध्ये पुनर्जन्माविषयी साशंकता वाढू लागल्याने देवांना पृथ्वीवर आणणे गरजेचे वाटले असावे. आता अमर असलेल्यांना जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून कसे न्यावे? तेव्हा सुसंगतीसाठी अवताराची सोय काढली असावी.

डिस्क्लेमर: ही या विषयाबाबत फारशी माहिती नसतांना मांडलेली शक्यता आहे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

माझा अंदाज (ज्ञान नसताना..)

अनेक वेगवेगळ्या देवतांचं पूजन करणार्‍या संस्कृती एकत्र झाल्यामुळे देवतांचं एकमेकात विलिनिकरण झालं असावं. हे अवताराचं मूळ कारण असावं. तसंच लोककथांच्या नायकांना व त्या कथांना महाकाव्यात स्थान मिळताना चिरंजीवित्व, अवतारपद वगैरे मिळलं असावं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

देवतांचं विलिनिकरण

अनेक संस्कृतींतील देवतांना सामावून घेताना देवतांचं विलिनिकरण झाले असावे हा मुद्दा पटण्यासारखा वाटतो परंतु ते अवताराचे मूळ कारण असावे असे का म्हणताय ते कळले नाही.

ईश्वराची सगुण भक्ती किंवा त्याला मानवी स्वरुप देणे किंवा राजा हा ईश्वराचा अंश आहे, पर्यायाने तो जे म्हणेल ते सर्व मान्य आहे हे दाखवण्याचा हेतूही असू शकेल.

लोकनायकांना अवतारपद

तसंच लोककथांच्या नायकांना व त्या कथांना महाकाव्यात स्थान मिळताना चिरंजीवित्व, अवतारपद वगैरे मिळलं असावं.

या मताशी सहमत आहे. लोककथांच्या नायकांना किंबहुना खऱ्याखुऱ्या लोकनायकांनाही देवत्व व तद्नंतर त्यांच्या नसण्याची उणीव भरुन काढण्यासाठी अवताररुप प्रदान केले असावे. पुराणे व महाकाव्ये रचणाऱ्या समुहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीरेखांचेच पून्हा अवतार पहायला मिळतात. या महाकाव्यांमधील खलपात्रांचे अवतार अपेक्षितपणे चित्रित झालेले नाहीत.

बारीकसा फरक

चर्चा वाचत आहे.

प्रस्तावनेच्या परिच्छेदामधला एक फरक नोंदवला पाहिजे.

अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते.

यातील पुढची दोन वाक्ये बौद्धधर्माला लागू नाहीत. "सब्बे धम्मा अनत्ता" (धम्मपद : २७९). "आत्मा" अशी काही विचार करण्यालायक संकल्पना आहे, असे बौद्ध धर्मशास्त्रात मान्य नाही. इतकेच काय, दु:ख सोडण्यासाठीच्या विशुद्ध मार्गावरती हे जाणणे आवश्यक मानतात.

(मग "पुनर्जन्म होतो तो कोणाचा?" हा प्रश्न उभा राहातो. सुरुवातीला निरुत्तर करणारा प्रश्न वाटला तरी, त्याचे बर्‍यापैकी तर्कशुद्ध उत्तर बौद्ध तत्त्वज्ञानात सापडते. ते उत्तर आश्चर्यकारक आणि रोचक असले, तरी या चर्चेत अवांतर आहे. हा पूर्ण प्रतिसादच अवांतर वाटायची शक्यता आहे. परंतु बौद्धांचे हे तत्त्व इतिहासातील एक विचारपद्धती सांगते. त्याचा संदर्भ म्हणून प्रतिसाद समर्पक आहे.)

वाचतोय...!

चर्चा वाचतोय.

-दिलीप बिरुटे

अवतार म्हणजे "अंश"

असे वाटते की 'अवतार' म्हणजे 'अंश' - असे वाटायला कारण म्हणजे अनेक स्वामी वगैरे आपण जेव्हा म्हणतो की त्यांच्यात ईश्वराचा अंश आहे.

पुनर्जन्म म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने पूर्ण जन्म घेणे आणि त्याला 'मानवी' मर्यादा असणे - जसे राम, कृष्ण वगैरे

ह्या संकल्पनेमुळे व्यक्तिपूजेचे प्रस्थ वाढले असावे असे मानायला निश्चित जागा आहे.

अर्थात माझा काही अभ्यास वगैरे नाही, सहज सुचले ते लिहिले.

धन्यवाद

माझा काही अभ्यास वगैरे नाही, सहज सुचले ते लिहिले.

हरकत नाही. इतरांची मते जाणून घ्यायची आहेत. :-)

असे वाटते की 'अवतार' म्हणजे 'अंश' - असे वाटायला कारण म्हणजे अनेक स्वामी वगैरे आपण जेव्हा म्हणतो की त्यांच्यात ईश्वराचा अंश आहे. पुनर्जन्म म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने पूर्ण जन्म घेणे आणि त्याला 'मानवी' मर्यादा असणे - जसे राम, कृष्ण वगैरे.

अवतार म्हणजे अंश असे मलाही क्षणभर वाटले आहे परंतु ईश्वराचा अंश असणारे सर्व अवतार आहेत असे दिसत नाही. :-( राम आणि कृष्ण हे पुनर्जन्म आहेत असे मलाही वाटते कारण त्यांना जन्म आणि मृत्यू आहेत. पण मग दशावतारांत त्यांचा सहभाग का करण्यात यावा.

मत ..

अवतार - हा चार लोकांपेक्शा खुपच वेगळा , ह्याने संकटातुन(मोठया) अम्हाला वाचवले, हा असाधारण..... पुढे चालून याची दन्तकथा (चार अधीक शब्द).. त्याचा होतो अवतार.
लोकांपुढे आदर्श रहावा, जगण्यासाठी प्रोत्साहन मिळावं , समाजात वाईट कृत्यं करताना लोकांना भीति वाटावी..म्हणून ह्यांचे झाले देवं(रेफ्रन्स पॉइन्ट फॉर गूडनेस ,पॉवर.. )

पुनर्जन्म- मेल्यानंतर शरीराचं नेमक काय होतं हा मोठा गुढ प्रश्न. आणि जन्माला आलेलं मूल नेमकं कसं तयार होतं हा ही. ह्या दोन्हींचा सर्वात सोपा तर्क पुनर्जन्म सोडुन काय असेल?
आता वाईट कृत्य केला तरीही पुनर्जन्म मानवाचा आणि चांगले केले तरीही माणूसचं, हा तर्क बरोबर नाही , मग काय राहतं ?

तर्क

पुनर्जन्म- मेल्यानंतर शरीराचं नेमक काय होतं हा मोठा गुढ प्रश्न. आणि जन्माला आलेलं मूल नेमकं कसं तयार होतं हा ही. ह्या दोन्हींचा सर्वात सोपा तर्क पुनर्जन्म सोडुन काय असेल?

मुले कशी येतात यासाठी अजून एक सोपा स्टॉर्क सिद्धांत आहे. त्याचा संख्याशास्त्रीय अभ्यासही आहे.

हा हा ...

स्टॉर्क सिद्धांत हा मनोरंजन म्हणून ठीक वाटतो. पण त्यापासुन अनेक लेवल २ प्रश्न पडतात. आणि हा सिद्धांत खोडुन काढणे सोपे आहे.
पुनर्जन्म सिद्धांत खोडुन काढणे अवघड आहे.. आणि सिद्ध करणे पण. हा म्हणजे फर्म्याट च्या शेवटच्या प्रमेयाप्रमाणे आहे, १९९४ (दुवा) पर्यन्त तो धड
खरा आहे असही म्हणता येत नव्हते ना चूक आहे सिद्ध करता येत होते, पण तार्कीक रित्या खरा वाटायचा..

पुनर्जन्मा मधे कितपत सत्य आहे हे ठावूक नाही पण सध्या तरी हाच ठीक...

गुढ कसला?

मेल्यानंतर शरीराचं नेमक काय होतं हा मोठा गुढ प्रश्न.

या प्रश्नात गुढ कसले? माझ्या माहितीप्रमाणे तर मेल्यानंतर शरीराला जाळले तर त्याची राख होते. कुठे खितपत पडले तर जीवजंतू त्याचे विघटन करुन मातीत मिसळून टाकतात.
आयुष्य व्यर्थ काथ्याकुट करण्यात संपत चालले आहे. काहीतरी भरीव करायला हवे.

जीव.

मला तिथे जीव म्हणायचे होते.

आधीचा जन्म ठेवणे / सोडणे हा फरक?

माझ्यामते अवतार म्हणजे शक्यतो आधीचा जन्म तसाच ठेऊन घेतलेले (नवे) अधिकचे रूप. क्वचित प्रसंगी (वेळेअभावी) भगवंत थेट अवतरत असावेत ;)

बाकी पुनर्जन्मासाठी आधीचा जन्म संपवणं आवश्यक असावं

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

प्रश्नपंचक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्
ही गोष्ट सर्वपरिचित आहे. या गोष्टीच्या संदर्भात पुढील प्रश्न उद्भवतात:
१.ही गोष्ट कोणत्या काळात रचली गेली?
२.अख्खी म्हातारी मावूं शकेल एव्हढ्या मोठ्या आकाराचे भोपळे महाराष्ट्रात कुठे आणि कोणत्या काळी निपजत असत?
३.भोपळा साधारणपणे गोलाकार मानल्यास त्याचा व्यास किती सें.मी.असावा?
४.भोपळ्याचे वजन म्हातारीने खांद्यावर पेलले असणार.ते किती किलो.असावे?
५.म्हातारी लांडग्याला म्हणते,"लेकीकडे जाते. तूप रोटी खाते.धाटीमुटी होऊन परत येते. मग तू मला खा." ती जाताना अस्थिपंजर होती. म्हणजे तिची सून तिला धड जेऊ घालत नव्हती.सुनेने सासूला असा जाच करण्याची चाल कधी रूढ झाली?

माफ करा

आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास वेगळी चर्चा सुरु करावी परंतु याच चर्चेत उत्तरे हवी असतील तर पुढील गोष्टी त्वरित कराव्यात.

 1. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ही गोष्ट आमच्या धर्माचा पाया आहे असा प्रचार करावा. कदाचित, आपण भ्रमसेन आहात की ठकसेन हे आम्हाला त्यावरून कळून येईल.
 2. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गोष्टीवर "यनेश्वरी" असा टिकात्मक ग्रंथ लिहावा.
 3. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गोष्टीवर किर्तने वगैरे रचावीत.
 4. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गोष्टीवर हात ठेवून कोर्टात शपथ घेता यावी यासाठी प्रयत्न करावेत.

यानंतर, आपल्याला या चर्चेत वरील प्रश्न उपस्थित करण्याची मुभा आहे. तोपर्यंत नाही.

हा हा हा हा हा

हा हा हा हा हा (हास्यपंचक)

यनावालांचे प्रश्न मार्मिक आहेत. फार आवडले!

(हसरा) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वय/मनोरंजन ..

बेसिक्स : गोष्ट बनवने आणि सांगणे ह्या दोन्ही गोष्टींचा मूळ उद्देश्य हा मनोरंजन , बुद्धी विकास ,भाषा सुधार , एकाग्रता वाढवणे हा आहे. मुलांच्या वयानुसार हा उद्देश्य गाठण्यासाठी
गोष्टींचा प्रकार बदलतो. आता विचार करा की ३ वर्षाच्या मुलाला तुम्ही अलकेमीष्ट ची गोष्ट सांगीतली तर त्याचे किती मनोरंजन होइल (दोन मिनीटात तो बाहेर खेळायला नाही गेला तरच कमाल).
आता भोपळ्याची गोष्ट तुम्हाला पी.एच.डी. करताना कुणी सांगीतली तर किती मन लावून ऐकाल ? तर वयानुसार गोष्टीचा प्रकार बदलतो.
ही गोष्ट फक्त वयोगट २-६ पर्यंत ठीक राहील. ह्या गोष्टीमधे बुद्धी विकास आणि एकाग्रता वाढवणे हे साध्य होइल. मी लहानपणी चार वर्ष (अन्दाजे) फक्त हा विचार करत होतो की
वाघाला मराठी कसा कळालं, आणि बरचं काही. ह्यावरुण माझा मुर्खपणा सिद्ध होतं नही पण गोष्टीचे सामर्थ्य सिद्ध होते. मी विचार करु लागलो होतो....

अर्थात हा फक्त माझा तर्क बरका...

असे नेहमीच होते असे दिसते आहे.

यनावाला आणि इतर काही सदस्य चर्चा एकाच दिशेने ओढून अनेकदा सगळ्या चर्चेचा नूर घालवून टाकतात असे दिसते आहे.
चर्चेचा हेतू भलतीकडेच राहतो आणि त्याच्या अस्तित्वा विषयीच चर्चा भरकटत राहते. (किंवा परत कुणी अशी चर्चा करूच नये, म्हणून मुद्दाम भरकटवली जाते!)

ज्योतिष असो अथवा कोणतेही धार्मिक, परमार्थिक आणि पुराण कालीनविषय यांना वर्ज्य आहेत असे दिसून येते.
अगदी अभ्यासासाठी सुद्धा नाव काढू नका असे म्हणणारे कर्मठ लोक आहेत हे!

फक्त विज्ञान विज्ञान असे भजन करत अणि तर्कसिद्धता तर्कसिद्धता
अश्या चिपळ्या वाजवत बसलेले हे भंपक पण कर्मठ भजनकरी आहेत असे मला वाटते.

एखादा विषय आपल्याला पटला नाही म्हणून त्यावर चर्चाच होऊ नये,
किंवा ते सर्व निरर्थकच मानले जावे असे म्हणणे असेल,
तर तुमच्यात आणि बुद्धाच्या मूती फोडून टाकणार्‍या तालिबान्यात काय फरक आहे?

तुम्हाला पटत नसेल तर चर्चा वाचून सोडून द्या ना.
आपल्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, म्हणून इतरांचेही ऐकायचेच नाही हा हट्ट कशाला?
इतरांचा रसभंग कशासाठी करता?

प्रियालींना इतिहास या विषयात रस आहे त्यांचा अभ्यासही आहे. हा विषय वादग्रस्त आणि अनेक फाटे फोडणारा आहे. डोके ठिकाणी ठेवून, शांतपणे चहूबाजूंनी ५० वेळा विचार करावा आणि तरीही निष्कर्षावर येतांना हाती काही लागू नये असा आहे. पण त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत होईल असे पाहण्याऐवजी तुम्ही तर त्यांना त्रास कसा होईल असेच पाहताय? हे कसले लक्षण आहे हो? कुठे जाते अशा वेळी सगळ्यांचे तर्कशास्त्र? गाभा का नाही समजून घेत?

प्रियालींचे लेख वाचले तर असे जाणवते की त्या विषयाचा धागा चिवटपणे धरून त्यावर माहितीपूर्ण लेखन करत असतात. ही चर्चा एखाद्या लेखाची जुळवाजुळव असेल. आज आंतरजालावर चांगल्या आणि अभ्यासपूर्ण मराठी लेखनाची कमी असतांना एखाद्या लेखकाचा वेळ असा घालवणे हा अक्ष्यम अपराध आहे!

ही चर्चा मूर्खपणे तर्कटवणारे किती जण किमान दोन पाने भरतील असे अभ्यासपूर्ण लेखन त्यांच्या आवडत्या विषयात
दर आठवड्याला करत आहेत?

या बाबतीत मी धनंजय कडून काही गोष्टी शिकलो आहे हे मात्र नक्की. तो जेथे असे चर्वण होते तेथे फक्त विषयापुरताच जाणीवपूर्वक चर्चेत भाग घेतो असे मी पाहतो. चतुरस्त्र असूनही काही चर्चात तो दखलच घेत नाही असेही दिसून येते.

खरे म्हणजे हा प्रतिसादही नाव घेऊन टाकायला नको होता, कारण हे असे प्रतिसाद म्हणजे चर्चेला विषयापासून दूर नेतात पण सुंभ जळाल तरी पीळ...

आणि चर्चा तर पार विझवून टाकलीच आहे या तर्ककर्कश्य लोकांनी
असो,
काय करणार... हे लोक बुली आहेत असे वाटते -
इतके असूनही मी काही वावगे बोललो असेन तर माफ करा अजून काय म्हणणार....?

मनापासून जे आले ते बोललो... यातून बोध घ्यायचा की मी कसे कोणत्याही तर्काशिवाय आरोप करतो आहे, याची चर्चा करायची हे तुमच्या हाती...

आपला
गुंडोपंत
तर्कटांना मनापासून कंटाळलेला

इतिहास!

अगदी अभ्यासासाठी सुद्धा नाव काढू नका असे म्हणणारे कर्मठ लोक आहेत हे!

त्याला इतिहास म्हणणे चूक आहे. साहित्याचा अभ्यास मान्य आहे.

एखादा विषय आपल्याला पटला नाही म्हणून त्यावर चर्चाच होऊ नये,
किंवा ते सर्व निरर्थकच मानले जावे असे म्हणणे असेल,
तर तुमच्यात आणि बुद्धाच्या मूती फोडून टाकणार्‍या तालिबान्यात काय फरक आहे?

आम्हाला पटला नाही तर तो पटवून देण्याची मागणी करणे आमचा हक्क आहे. पटविण्याचे कष्ट न घेणार्‍यांना चर्चा करण्यापासून अडविण्याची क्षमता आमच्यात नाही. असती तर...

तुम्हाला पटत नसेल तर चर्चा वाचून सोडून द्या ना.
आपल्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, म्हणून इतरांचेही ऐकायचेच नाही हा हट्ट कशाला?
इतरांचा रसभंग कशासाठी करता?

तुम्हाला उत्तर द्यायचे नसेल तर तुमची चर्चा चालू ठेवा ना. आमचे आक्षेप वाचून कोणाचे डोळे जळतात का?

ही चर्चा मूर्खपणे तर्कटवणारे किती जण किमान दोन पाने भरतील असे अभ्यासपूर्ण लेखन त्यांच्या आवडत्या विषयात
दर आठवड्याला करत आहेत?

आम्ही अंडे घालत नाही आणि ऑम्लेटही करू शकत नाही पण ऑम्लेटची चव आम्हाला कळते.

आणि चर्चा तर पार विझवून टाकलीच आहे या तर्ककर्कश्य लोकांनी

ती कशी?

सहमत

आम्हाला पटला नाही तर तो पटवून देण्याची मागणी करणे आमचा हक्क आहे.

सहमत


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इतरांचे सोडून द्या

इतरांचे जाऊ द्या. एखाद्याला वितंडवाद घालण्यात मोठेपणा वाटत असावा किंवा नसावा पण तुम्ही चर्चेशी संबंधीत प्रतिसाद द्या बघू. कशाला इतरांची नावे घेता? मला त्यांच्याकडून आणि तुमच्याकडूनही काही अपेक्षित असेल तर चर्चेशी संबंधीत प्रतिसाद तेवढा आल्यास पुरेसे आहे.

एकंदरीत विषय व्यवस्थित अंगाने गेला असता असे मला आलेल्या विषयाशी संबंधीत व्य. नि. आणि खरडींवरून वाटते परंतु काहीजणांच्या अरेरावीने माहिती असूनही लोकांनी भाग घेण्याचे टाळले असेल तर उपक्रमासाठी हे दुर्दैवी आहे.

सहमत

सहमत आहे. त्यामुळेच इथे ठराविक विषयांवरील चर्चाच निर्धोकपणे होऊ शकतात. मी हल्ली शेजारचा माणूस कट्टर विज्ञानवादी आहे असे कळले तर ती खुर्ची, रांग, गल्ली, बस सोडून बसतो. :)

धनंजय खूपच संयमी आहेत, त्यामुळे त्यांना तर्कटांकडे दुर्लक्ष करणे चांगले जमते. असा संयम आमच्याही ठिकाणी येवो हीच प्रार्थना*.

प्रियालीचे लेख माहितीपूर्ण आणि कष्टपूर्वक लिहीलेले असतात. त्या विषयात तिला चर्चा करायची असेल तर मध्येच आपला अजेंडा घुसडून दंगल माजवायची यामागचे कारण कळत नाही. आणि तिने म्हटल्याप्रमाणे असेच होणार असेल तर उपक्रमावर मोजक्या विषयांसाठीच चर्चा करता येतील.

*आता इथे प्रार्थना शब्द दिसला रे दिसला की लगेच टोळधाड तुटून पडेल. प्रार्थना? म्हणजे तुम्ही आस्तिक? मग उत्क्रांतीचे काय? माणसाला फ्री विल असते की नाही? लगेच डॉकिन्सचे दोन-चार व्हिडीओ. (डॉकिन्स मलाही आवडतात पण कीस काढताना जिथेतिथे त्यांचा संदर्भ देणे आजकाल बोअर व्हायला लागले आहे. ते आहेत प्राणिशास्त्रज्ञ, त्या विषयात त्यांचे संदर्भ द्यावेत. डॉकिन्स यांनीच सेल्फिश जीनमध्ये फ्रेड हॉइल यांच्या संदर्भात म्हटले आहे की एखादा शास्त्रज्ञ एका विषयात तज्ञ आहे म्हणून दुसर्‍या विषयातही असेलच असे गृहीत धरू नये.)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

गुंडोपंतांशी सहमत

नेहमीच होते याविषयी काही म्हणायचे नाही. पण या धाग्यावर होत आहे असे दिसते.

प्रियालींचा धागा महाभारत (वा इतर घटना) खरेच घडल्या की नाही याविषयी नसून त्यातल्या पुनर्जन्म अवतार वगैरे कल्पनांचे स्वरूप काय आणि त्या कल्पनांचा समाजावर काय परिणाम झाला, होतो आणि होऊ शकतो याविषयी आहे. त्यामुळे या धाग्यावर महाभारत घडलेच नाही किंवा तत्सम चर्चा अनाठायी ठरेल.

म्हणून गुंडोपंतांशी सहमत आहे. धाग्यावरील चर्चा या संकल्पना व्यूहातली सुसंगती विसंगती इथपर्यंतच मर्यादित रहायला हवी.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

धाग्याचा उद्देश

गुंडोपंत, एकोहम्, यांचे या धाग्यावरचे प्रतिसाद 'संकल्पना व्यूहातली सुसंगती विसंगती' या प्रकारचे नाहीत.

चिऊ-काऊच्या गोष्टी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चिऊ-काऊ च्या गोष्टी
*कूर्मावतारात विष्णूने पृथ्वीला पाठीवर घेतले. नाहीतर ती रसातळाला गेली असती.
*हिरण्यकशिपूने लाथ मारून खांब मोडला. त्यातून नरसिंह प्रकट झाला. त्याने हिरण्यकशिपूचे पोट फाडले.
*बटु वामनाने तीन पावलांत त्रैलोक्य व्यापले.
*पुत्रकामेष्टी यज्ञात अग्निदेव प्रकटला. त्याने पायसकुंभ दशरथाला दिला. पायसप्राशनामुळे राण्यांना पुत्र झाले .
*"मला वर दे" असे पाच वेळां उच्चारल्याने पाच वरांना वरण्याची पाळी द्रौपदीवर आली.
या पुराणकथा आणि "चल रे भोपळ्या..." ही गोष्ट यांत तत्त्वत: काही भेद नाही. या सर्वांची रचना मनोरंजनार्थ झाली आहे.या गोष्टी काल्पनिक,अवास्तव आणि असंभाव्य आहेत.या चिऊ(पक्षीं चिमणी पक्षी)-काऊ(पक्षीं कावळा पक्षी) प्रकारांत मोडतात.अपेक्षित वयोगटात फ़ारसा भेद नाही.
धर्माशी निगडित केल्याने असत्य गोष्टी सत्य ठरत नाहीत." सात हजार वर्षांपूर्वी देवाने(गॉड) सहा दिवसांत सर्व चराचर सृष्टी निर्माण केली आणि सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली" असे बायबलांत आहे. बायबल अधिकृत धर्मग्रंथ असला तरी हे विधान अज्ञानमूलकच आहे. धर्मग्रंथात आहे म्हणून ते पवित्र आणि सत्य असले पाहिजे असे आज मानणे हास्यास्पद ठरेल.
"चल रे भोपळ्या... "वरील प्रश्नांवर चर्चा करणे निरर्थक ,वायफळ आहे हे समजते. हे दाखविण्यासाठी प्रश्नपंचक प्रतिसाद लिहिला.तो मूळ लेखाशी निगडित असून योग्य स्थानी आहे असे माझे दृढमत आहे.
प्रश्नपंचकावर प्रियाली यांची तीव्र प्रतिक्रिया अपेक्षितच होती.(वास्तविक असे प्रतिसाद खेळी मेळीने[स्पोर्टिंगली] घ्यायला हवेत.ते असो.) त्यांचा अभ्यास, व्यासंग, वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली या गोष्टी नि:संशय उच्च श्रेणीच्या आहेत.या तीव्र प्रतिक्रियेतही त्यांची लेखनप्रतिभा दिसून येते. ज्ञानेश्वरीच्या जागी यनेश्वरी शब्द सुचणे हे प्रत्युत्पन्नमतीचे(क्विक विट) द्योतक आहे........ असा प्रचार करावा. कदाचित, आपण भ्रमसेन आहात की ठकसेन हे आम्हाला त्यावरून कळून येईल.
हे वाचून मात्र करमणूक झाली.

सत्यता, वास्तवता आणि संभाव्यता

या सर्वांची रचना मनोरंजनार्थ झाली आहे.या गोष्टी काल्पनिक,अवास्तव आणि असंभाव्य आहेत.

वरील मताशी सहमत आहे. परंतु तरीही तत्कालीन धुरीणांना अशा कथा का रचाव्या लागल्या (किंबहूना त्यांनी त्या का रचल्या) याच्या कारणांचाही शोध घेतला पाहीजे. या कथा ज्यांना सांगितल्या गेल्या ते अर्थात बालीश अथवा मुर्ख नव्हते. पण ती जनता देवत्वाच्या प्रभावाखाली आपली विचारशक्ती गमावून बसलेलेली होती. म्हणून देव सांगत आहेत आणि देवांबद्दलचे आहे म्हणजे डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवला जात होता.

माझ्या मते या कथानिर्मीतीमागे खालील कारणे असावीत.
प्राचीन महाकाव्यात कुंती ही नायिका म्हणून दाखवली गेली. पण नंतर तिच्या विवाहपूर्व संततीचा उल्लेख या काव्यातच सापडला. मग त्याला उत्तर म्हणून सुर्याची किरणे तिच्या अंगावर पडून तिला गर्भप्राप्ती झाली असे स्पष्टीकरण देण्यात आले. यात तिचे नायिकापण ही अबाधित राहीले आणि सुर्य नावाचा खराखुऱ्या नायकाशी तिचे असलेले विवाहपूर्व संबंध ही दडपल्या गेले.

मारुतीपुत्राच्या गोष्टीत हनुमानाचे ब्रह्मचर्यही कायम ठेउन त्याच्या अपत्याचे स्पष्टीकरण द्यावयाची कसरत त्याचा घाम मगरीने गिळला मग तिला त्यापासून गर्भधारणा होऊन पुत्रप्राप्ती झाली अशी यातायात करुन पार पाडली आहे.

एका पुरूषापासून (हे कदाचित शक्य होईल) एकाच स्रीला शंभर पु्त्र होणे हे अशक्य आहे. पण मग गांधारीच्या शंभर पुत्रांचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञाची कथा रचण्यात आली.

थोडा विचार केला तर पुराणातल्या प्रत्येक वांग्याचे चवदार भरीत तयार होईल.
परंतु ती जनता देवत्वाच्या प्रभावाखाली आपली विचारशक्ती गमावून बसलेलेली होती असे मी वर म्हटले आहे. आपण त्याच जनतेचे वंशज, कदाचित त्यांच्यापेक्षाही वरताण आहोत.

एक-अनेक!

आर्यांचे नागांवर आक्रमण या विषयाशी संबंधित खांडववनाची कथासुद्धा तशीच आहे. (तुमच्या प्रतिक्रियेत 'पुरोहित' विरुद्ध 'बहुजन' वाद दडला असल्याचा संशय येतो म्हणून लिहिले.)

BTW

एका पुरूषापासून (हे कदाचित शक्य होईल) एकाच स्रीला शंभर पु्त्र होणे हे अशक्य आहे.

या वाक्यातून असा अर्थ ध्वनीत होतो की अनेक पुरूषांपासून एकाच स्रीला शंभर पु्त्र होणे शक्य आहे.

अर्थ

एका पुरूषापासून शंभर पुत्र होऊ शकतात (म्हणजे त्याने पंचवीस एक बायका केल्या तर) असा अर्थ घ्यावा.

'पुरोहित' विरुद्ध 'बहुजन' वाद दडला असल्याचा संशय येतो

हा संशय पुरोहित विरुद्ध पुरोहितांकारणे आलेल्या स्थितीवादी दृष्टीकोनामूळे पिडीत असा घ्यावा.

गंमत?

कदाचित प्रियाली तुम्हाला आता असे सांगतील की
"ही चर्चा ही केवळ एक गंमत होती."

गंमत नाही

कदाचित प्रियाली तुम्हाला आता असे सांगतील की "ही चर्चा ही केवळ एक गंमत होती."

ती चर्चा ही गंमतीचा भाग होता असे मी आधीच चर्चेत म्हटले आहे. -

दरवेळेस गंभीर चर्चा करण्यापेक्षा या सर्व यंव-त्यंव मतवाद्यांपासून फारकत घेऊन आज पुराणातील एक गोष्ट इथे देते. केवळ एक गंमत म्हणून पण तरीही गोष्ट वाचल्यावर आपले पूर्वज महान होते याची प्रचीती यावी.

आपले पूर्वज महान होते हे अनेकजण सांगतात म्हणून गंमतीने लिहिलेली ती गोष्ट होती. माझ्या प्रोजेक्टचा स्कोप आयत्यावेळी अचानक वाढल्याने सहजच मला आठवली आणि गंमत म्हणून दिलेली. त्या चर्चेतील इतर प्रतिसादही तसेच आहेत. उदा. किंवा उदा आणि इतरही.

या चर्चेत मी असे कुठेही म्हटलेले नाही. चर्चेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यात मला खरेच रस आहे. आपल्याला नसल्यास कृपया, इतरांचा रसभंग करू नये.

 • अवतार आणि पुनर्जन्म यांतील नेमका फरक काय?
 • महाभारतकालापूर्वीही वेदांत या संकल्पना आढळतात का?
 • महाभारताच्या कथेत घोळ आहे की काही वेगळे स्पष्टीकरण येथे आहे?
 • अवतार, पुनर्जन्म अशा कल्पना ग्राह्य धरल्याने व्यक्तिपूजेचे स्तोम आपल्याकडे अधिक दिसते का?

वरील प्रश्नांत मला कोणत्याही प्रकारे गंमत वाटत नाही. मला ते प्रश्न जाणून घेण्यात रस आहे. इतरांना हे प्रश्न फुटकळ किंवा मूर्खपणाचे वाटणे शक्य आहे. वाटोत बापडे! त्यांनी निदान चर्चा भरकटवू नये इतकी विनंती तरी मी करेनच.

शब्दांचा कीस

केवळ ती गोष्टच तुम्ही गंमत म्हणून दिली होती, त्या वाक्यापुढील 'पण तरीही गोष्ट वाचल्यावर आपले पूर्वज महान होते याची प्रचीती यावी' या वाक्यांशातील 'पण' या शब्दाचा अर्थ होतो की 'आपले पूर्वज महान होते' याची प्रचीती तुम्हाला गंभीरपणे द्यायची होती. "देव अस्तित्वात नव्हते हे विधान नेमक्या कोणत्या पुराव्यांनिशी केलेले आहे ते कळेल का? इंद्र, विष्णू आणि कश्यप- अदितीची इतर मुले ज्यांना देव असे संबोधले जाते ते अस्तित्वात नव्हतेच असे सांगणारे पुरावे दिल्यास वाचायला आवडेल." ही प्रतिक्रिया गमतीशीर नव्हती.

मला वाटते...

त्या वाक्यापुढील 'पण तरीही गोष्ट वाचल्यावर आपले पूर्वज महान होते याची प्रचीती यावी' या वाक्यांशातील 'पण' या शब्दाचा अर्थ होतो की 'आपले पूर्वज महान होते' याची प्रचीती तुम्हाला गंभीरपणे द्यायची होती.

असे आपण सोडून त्या चर्चेत इतर कोणालाही वाटलेले नाही. किंवा, या संकेतस्थळावर माझी मते जाणणारे अनेक आहेत त्यांना तसा संभ्रम निर्माण होणे शक्य नाही. उपक्रमावर इतरत्र प्रसिद्ध झालेल्या माझ्या प्रतिक्रिया आपण वाचून पहाव्यात. इतक्या लवकर निष्कर्षावर येऊ नये.

"देव अस्तित्वात नव्हते हे विधान नेमक्या कोणत्या पुराव्यांनिशी केलेले आहे ते कळेल का? इंद्र, विष्णू आणि कश्यप- अदितीची इतर मुले ज्यांना देव असे संबोधले जाते ते अस्तित्वात नव्हतेच असे सांगणारे पुरावे दिल्यास वाचायला आवडेल." ही प्रतिक्रिया गमतीशीर नव्हती.

तो गंमतीचाच एक भाग होता. जर, मला काही करून माझे पूर्वज महानच होते हे सिद्ध करायचे असेल तर मी विविध प्रश्न उपस्थित करून माझेच म्हणणे कसे खरे आहे ते दाखवण्याचा, इतरांकडून अधिक पुरावे वगैरे मागण्याचा. याच प्रकारे इतर प्रतिसादही आहेत. उदा. , उदा. वाचक्नवींनी दिलेल्या गोष्टीच्या उत्तरार्धाशिवाय कोणताही गंभीर प्रतिसाद तेथे नाही.

असो. आपला गैरसमज होत आहे असे वाटल्याने आपल्याला हे स्पष्टीकरण दिले. यानंतर आपल्याला कोणतेही स्पष्टीकरण मी देऊ इच्छित नाही हे सांगावेसे वाटते.

शंका

रसा म्हणजे पृथ्वी. ती रसातळाला म्हणजे कुठे गेली असती?

दुर्दैव माझं

.(वास्तविक असे प्रतिसाद खेळी मेळीने[स्पोर्टिंगली] घ्यायला हवेत.ते असो.) त्यांचा अभ्यास, व्यासंग, वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली या गोष्टी नि:संशय उच्च श्रेणीच्या आहेत.या तीव्र प्रतिक्रियेतही त्यांची लेखनप्रतिभा दिसून येते. ज्ञानेश्वरीच्या जागी यनेश्वरी शब्द सुचणे हे प्रत्युत्पन्नमतीचे(क्विक विट) द्योतक आहे........ असा प्रचार करावा. कदाचित, आपण भ्रमसेन आहात की ठकसेन हे आम्हाला त्यावरून कळून येईल.
हे वाचून मात्र करमणूक झाली

हे वाचून हसावे का रडावे हे क्षणभर कळले नाही. अर्थातच, हसलेले बरे. अधोरेखिते लिहूनही आपण वर असे प्रतिसाद खेळीमेळीने घ्यायला हवेत असे सांगता हे माझे दुर्दैव. आपण जसा प्रतिसाद लिहिलात तसेच मी उत्तर दिले. ते आपल्याला खेळीमेळीचे वाटले नाही ही गंमत आहे. असो.

"चल रे भोपळ्या... "वरील प्रश्नांवर चर्चा करणे निरर्थक ,वायफळ आहे हे समजते. हे दाखविण्यासाठी प्रश्नपंचक प्रतिसाद लिहिला.तो मूळ लेखाशी निगडित असून योग्य स्थानी आहे असे माझे दृढमत आहे.

मला असे वाटत नाही परंतु आपल्याला वाटत असावे. जे प्रश्न मी चर्चेसाठी उपस्थित केले आहेत ते मला योग्य वाटतात. इतरांनी आपापल्या परीने त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला आहे. आपण चर्चा किंवा त्यातील प्रश्न वाचण्याची तसदीही घेतली नसावी असे दिसते. किंवा घेतली असल्यासही आपल्याला चर्चा उपयुक्त वाटली नसावी. परंतु, इतर अनेकांना हे विषय चर्चेत घेण्याजोगे वाटतात.

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या गोष्टीला भगवद्गीतेचे महत्त्व अद्याप प्राप्त झालेले नाही. ती गोष्ट कोणीही देवघरात ठेवून तिची पूजा करत असल्याचे ऐकलेले नाही. (चू. भू. दे. घे) त्यावर कोणाही संताने ग्रंथ वगैरे लिहून नंतर आपले जीवनकार्य याच साठी होते आता ते सफल झाले असे म्हटल्याचे ऐकलेले नाही. कोणा, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, दुर्गा भागवत, ईरावती कर्वेंनी चल रे भोपळ्या टुणुक टुणुकवर साहित्य किंवा शोधकार्य प्रकाशित केलेले नाही. तेव्हा आपण तरी ते करावे :-) म्हणजे गीता आणि चल रे एका पंक्तित बसू शकतील अशी माझी आपल्याला विनंती आहे. :-)

महाभारतातील कथा भाकड आहेत हे मीच वरील चर्चेत म्हटले आहे परंतु त्या भाकड कथांची भलावण करणे हा चर्चेचा हेतू आहे काय इतके तरी आपण जाणून घेणे आवश्यक होते. ते न करता आपण आपल्या अजेंड्यानुसार त्याला लेबल लावून टाकलेत.

 • अवतार आणि पुनर्जन्म यांतील नेमका फरक काय?
 • महाभारतकालापूर्वीही वेदांत या संकल्पना आढळतात का?
 • महाभारताच्या कथेत घोळ आहे की काही वेगळे स्पष्टीकरण येथे आहे?
 • अवतार, पुनर्जन्म अशा कल्पना ग्राह्य धरल्याने व्यक्तिपूजेचे स्तोम आपल्याकडे अधिक दिसते का?

मला हे प्रश्न पडले. ते मूर्खपणाचे आहेत असे आपल्याला वाटत असावे, मला तसे वाटत नाही. आपल्याला या प्रश्नांची उत्तरे माहित असल्यास चर्चेला हातभार लावावा.

तरीही

चल रे भोपळ्या... "वरील प्रश्नांवर चर्चा करणे निरर्थक ,वायफळ आहे हे समजते. हे दाखविण्यासाठी प्रश्नपंचक प्रतिसाद लिहिला.तो मूळ लेखाशी निगडित असून योग्य स्थानी आहे असे माझे दृढमत आहे.

अशा चर्चा निरर्थक किंवा वायफळ असल्या तरी अशा स्वरुपाच्या चर्चा उपक्रमावर करु नयेत असे बंधन नाही. किंबहुना अशा चर्चा वाचून माफक मनोरंजन होते. आणि तसाही उपक्रमावरील चर्चांचा कोणीही शास्त्रीय किंवा ऐतिहासिक संदर्भ म्हणून वापर करत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मायथॉलॉजी

मायथॉलॉजीचा गंभीरपणे अभ्यास करणारे अनेक जण आहेत. साहित्य, मानसशास्त्र अशा दृष्टीकोनातून बर्‍याच लोकांनी यावर गंभीर लेख लिहीले आहेत. पलिकडे जोसेफ कँपबेल, एरिक बर्न आणि आपल्याकडे दुर्गाबाई भागवत किंवा इरावती कर्वे ही काही ठळक उदाहरणे.

हे सर्व लोक "भाकडकथा तर आहेत, त्यांचा इतका काय विचार करायचा" असे म्हणून थांबले नाहीत हे आपले सुदैव.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

भाकडकथा...

यनावालांनी विनोदी स्वरूपात मांडलं म्हणून उत्तर त्याज्य होत नाही, किंवा प्रश्न निरर्थक होत नाही. (पुलंन अनेक वेळा हे केलं, पण लोकांनी त्यांचा विनोद लक्षात ठेवून संदेशाकडे दुर्लक्ष केलं) अवतार, पुनर्जन्म हे कथा सांगण्यासाठी वापरलेली कलात्मक तंत्रं आहेत. ती वापरून सांगितलेल्या कथा इतक्या प्रभावी ठरल्या की त्यांनी जनमानसाचा पगडा घेऊन त्या समाजाच्या विश्वास-संकुलाचा भाग झाल्या. त्यामुळे मायथॉलॉजीचा अभ्यासही योग्यच, पण त्यात ही तंत्रं आहेत हे भान असावं. वेगवेगळ्या कथाकारांनी ही तंत्रं वापरल्याने त्यांन एकसंध अर्थ नाही हा त्यातून निष्कर्ष.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

असहमत

अवतार, पुनर्जन्म हे कथा सांगण्यासाठी वापरलेली कलात्मक तंत्रं आहेत.

अवतार, पुनर्जन्म हे कथा सांगण्यासाठी वापरलेली कलात्मक तंत्रे नसून "मूळ व्यथा" लपवण्यासाठी वापरलेली कलात्मक तंत्रे आहेत. एखाद्याला पूज्य मानावे अशी समाजाची धारणा करून द्यायची असल्यास त्याच्यावर आलेली सर्व आरोप, बालंट अथवा डाग हे साफसूफ करावे लागतात किंवा ती व्यक्ती मर्त्य मानवापेक्षा श्रेष्ठ असल्याने (ईश्वरी अंश) तिचे म्हणणे मुकाटपणे मानावे अशी अपेक्षा ठेवली जाते तेव्हा पुनर्जन्म, अवतार यांचे दाखले दिले जातात.

त्यामुळे मायथॉलॉजीचा अभ्यासही योग्यच, पण त्यात ही तंत्रं आहेत हे भान असावं.

म्हणजे? राजेंद्रने ज्यांची नावे दिली त्यांना त्या तंत्राचे भान नव्हते असे म्हणायचे आहे की वरील चर्चेत तसे भान आपल्याला दिसले नाही?

यनावालांनी विनोदी स्वरूपात मांडलं म्हणून उत्तर त्याज्य होत नाही, किंवा प्रश्न निरर्थक होत नाही.

पण यना स्वतः म्हणतात : "चल रे भोपळ्या... "वरील प्रश्नांवर चर्चा करणे निरर्थक ,वायफळ आहे हे समजते. हा त्यांचा विचार/ मत झाले. अन्यथा, ते ज्या बायबलचा संदर्भ देतात त्या बायबलमधील सात प्लेग, विश्वाची निर्मिती, सॉलोमन किंवा डेविड हे राजे वगैरे कथांवर अनेक चर्चांतून, मिडिआतून विविध विश्लेषणे होत असतात. चर्चेत विरोधी सूर मांडायला हरकत नाही परंतु जर इतरांच्या चर्चांना तुम्ही भाकड, वायफळ आणि निरर्थक म्हणणार असाल तर त्यांचा रसभंग न करता आपली इतरत्र चर्चा करावी असे आवाहन केले होते कारण असे करण्याने मूळ चर्चा भरकटेल असा अंदाज होता तो योग्य ठरला.

निरर्थकता

तुमच्या "मूळ व्यथा लपवणे" सिद्धांतात त्या विशिष्ट व्यक्तींचं अस्तित्व गृहित धरलेलं आहे. कृपया सर्व अवतार पुरुष - स्त्रियांचं अस्तित्व सिद्ध करणारे पुरावे किंवा ते कोणी आधीच केलं असल्यास संदर्भ द्या. ते नसल्यास "कथा सांगणे" हा अधिक सर्व-साधारण पर्याय आहे.

मी कुठेही कोणाला तंत्राचं भान नसल्याचं म्हटलं किंवा सूचित केलेलं नाही. या विशिष्ट विषयातलं अज्ञान मी आधीच जाहीर केलं आहे. त्यात हेत्वारोप कुठून करू?

"प्रश्न निरर्थक आहे" च्या अनेक छटा आहेत.
१. )(*&*&^&%&%()(*#$#( ? या 'प्रश्ना'ला मुळातच अर्थ नाही.
२. एक अब्जापर्यंतच्या मूळ संख्या लिहून काढा, जेणेकरून एक कोटीपेक्षा मोठी मूळ संख्या आहे हे सिद्ध होईल.. हे करण्याची गरजच नाही कारण इतर मार्गांनी ते आधीच सिद्ध झालेलं आहे.
३. गुरुत्वाकर्षणाचा सहा वस्तू (ग्रह, तारे) असलेलं जनरल सोल्यूशन काय?... हे इतकं कठीण आहे की ते करण्यात काही अर्थ नाही.
४. लसणीचा ठेचा व लसणीचं तिखट यात फरक काय? ठेचा व तिखट हे निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या पद्धतीने बनवलं जातं. कधी कधी एकाच पदार्थाला दिली जाणारी ही दोन नावं आहेत. म्हणजे प्रत्येक कल्पनेतली अंगभूत भिन्नता इतकी आहे, की त्या दोन पदार्थांच्या भिन्नतेपेक्षा तिची व्याप्ती अधिक आहे. ही निरर्थकता तितकी वाईट नाही.
वगैरे वगैरे...

पैकी तुमचा मूळ प्रश्न ४ जातीचा वाटतो. त्यामुळेच त्याला ३ प्रकारचा कठीणपणाही येतो. प्रश्नाच्या सार्थतेला आव्हान करणं म्हणजे चर्चा भरकटवणं नव्हे. त्यात कुठच्या जातीचा निरर्थकपणा आहे हे माहीत असलं की पुढचं काम सोपं होतं.

तुमचं उत्तर "खूप लोक ठेचा व तिखट दोन्ही खात आलेले आहेत, म्हणून तो प्रश्न सार्थ. शिवाय परदेशांतही केक व ब्राउनी यात फरक काय या प्रश्नांचा अभ्यास करणारे आहेतच की" हे विचार करण्याजोगं आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

छान

५. हॅरी पॉटरने बघितलेले एल्फ आणि फ्रोडो बॅगिन्सने बघितलेले एल्फ यांच्या वर्णनात एवढी तफावत कशी? TOS आणि TNG यांत क्लिंगॉन लोकांची चेहरेपट्टी भिन्न असण्यामागच्या कारणांची चर्चा अनेकजण करतात तर आपणही एल्फ विषयी चर्चा करू.

अवश्य चर्चा करा

अवश्य चर्चा करा किंबहुना अशाप्रकारच्या अनेक चर्चा होतात. एकच संकल्पना विविध पुस्तकांत किंवा संस्कृतीत कशी विविधतेने मांडली गेली आहे याची चर्चा अनेकदा होते. मग ती देव असो, रीतभात असो, अमानवी शक्ती असो किंवा इतर काही.

व्हँपायर या संकल्पनेचा उहापोह येथे बघा आणि अनेक कथांतून येणारे त्यांचे वर्णन तक्त्याच्या स्वरूपात येथे मिळेल.

अस्तित्व?

तुमच्या "मूळ व्यथा लपवणे" सिद्धांतात त्या विशिष्ट व्यक्तींचं अस्तित्व गृहित धरलेलं आहे.

त्या त्या कथेत त्या त्या व्यक्तिला अस्तित्व नाही काय? त्या कथांतून जेव्हा जेव्हा त्यांना किंवा त्यांच्या अपत्यांना मानवापेक्षा मोठे दाखवण्यासाठी त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी या कथांची निर्मिती आहे. वर ही महाभारताला कथाच म्हटल्याचे लक्षात आले असावेच.

मी कुठेही कोणाला तंत्राचं भान नसल्याचं म्हटलं किंवा सूचित केलेलं नाही. या विशिष्ट विषयातलं अज्ञान मी आधीच जाहीर केलं आहे. त्यात हेत्वारोप कुठून करू?

म्हणूनच आपल्या प्रश्नाचा अर्थ विचारला आहे की मायथॉलॉजीचा अभ्यासही योग्यच, पण त्यात ही तंत्रं आहेत हे भान असावं. हे भान येथे नेमके कोणाला असावे असे आपण म्हणता आहात.

तुमचं उत्तर "खूप लोक ठेचा व तिखट दोन्ही खात आलेले आहेत, म्हणून तो प्रश्न सार्थ. शिवाय परदेशांतही केक व ब्राउनी यात फरक काय या प्रश्नांचा अभ्यास करणारे आहेतच की" हे विचार करण्याजोगं आहे.

प्रश्न केवळ हाच होता का? तर खेदाने आपणही चर्चा न वाचता आणि समजता लिहित आहात असे वाटते. कारण प्रश्न असे होते

 • केक आणि ब्राऊनी यांत नेमका फरक काय?
 • केक आणि ब्राऊनी हे "क्ष" पाककृतीचे पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधी अस्तित्वात होते काय?
 • "क्ष" पाककृतीच्या पुस्तकातील पाककृतीत घोळ आहे की काही वेगळे स्पष्टीकरण येथे आहे?
 • केकला अवास्तव महत्व मिळाल्याने वाढदिवसाला केक कापण्याचे स्तोम आपल्याकडे अधिक दिसते का?

प्रश्नाच्या सार्थतेला आव्हान करणं म्हणजे चर्चा भरकटवणं नव्हे. त्यात कुठच्या जातीचा निरर्थकपणा आहे हे माहीत असलं की पुढचं काम सोपं होतं.

चर्चा भरकटली हे खरे ना कारण तोपर्यंत प्रत्येकजण आपापल्यापरीने योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता. ज्याला डायबेटिस आहे त्याला केक आणि ब्राऊनीची चर्चा निरर्थक वाटू शकेल म्हणून त्याने इतरांना केकवर चर्चा करूच नका ते निरर्थक आहे असे सांगणे मूर्खपणाचे आहे.

स्पॉईलर ऍलर्ट

त्या त्या कथेत त्या त्या व्यक्तिला अस्तित्व नाही काय?

'राजूचाचा' या चित्रपटात कोणी राजूचाचा नाही. 'वेटिंग फॉर गोदो' या नाटकात गोदो नाही. :D

धन्यवाद! काम सोपे केलेत

'राजूचाचा' या चित्रपटात कोणी राजूचाचा नाही. 'वेटिंग फॉर गोदो' या नाटकात गोदो नाही. :D

ही उदाहरणे देऊन त्या व्यक्तिंचे अस्तित्व दाखवा वगैरे प्रश्नांवर आपण पडदा टाकलात. :-)

व्यक्ती व लोकनायक/व्यक्तीरेखा

तुम्ही व्यक्ती व लोकनायक/व्यक्तीरेखा हे शब्द एकाच अर्थाने वापरत होतात/आहात हे आधीच सांगितलं असतं तर इतका घोळ झाला नसता असं वाटतं. खर्‍या व्यक्तीचा इतिहास गोमटा करून सांगणे व ए़खाद्या लोककथेतल्या नायकाला अभूतपूर्व गुण अर्पण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकात बदलाची प्रक्रिया आहे, व दुसर्‍यात नवनिर्माण. एकदा खरी व्यक्ती कथानायक बनली की पुन्हा या दोन वेगळ्या काढता येत नाहीत हेही खरंच.

बाकी विचारांती तुमचे प्रश्न अभ्यासार्ह आहेत हे थोडं पटलं. जनसामान्यांच्या मनावरचा पगडा हेच केवळ एखादा विषय अभ्यासार्ह होण्यास कारणीभूत होऊ शकतं. न पटलेला भाग म्हणजे या संकल्पनांच्या उत्क्रांतीला काही एकसंधता आहे असं वाटत नाही.

उदाहरण द्यायचं तर सजीवांत डोळा कधी उत्पन्न झाला? डोळ्याच्या अस्तित्वाचा सजीवांच्या दिसणार्‍या वागणुकीत काय परिणाम दिसतो? हे प्रश्न विचारता येतात. पण डोळा हा किमान १० वेगवेगळ्या प्रकारचा असतो, व तो इतिहासात किमान चाळीस वेळा वेगवेगळ्या प्रजातीत शून्यापासून उत्क्रांत झाला आहे हे लक्षात घेतलं तर डोळ्याचा इतिहास बघण्यापेक्षा त्याचा उपयोग काय हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरतं एवढंच म्हणायचं होतं.... अवतार व पुनर्जन्म यांचा मनोरंजन हाच केवळ उपयोग वाटला, म्हणून ही (काहीशी अवांतर वाटेल अशी) चर्चा.

असो. ही माझ्या ज्ञानाची मर्यादा. यापुढे या विषयावर मला आणखी भर घालता येईल असं वाटत नाही. याच कल्पनांचा विस्तार करता येईल पण तो या चर्चेत खूपच अवांतर होईल असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उत्क्रांती

तुम्ही व्यक्ती व लोकनायक/व्यक्तीरेखा हे शब्द एकाच अर्थाने वापरत होतात/आहात हे आधीच सांगितलं असतं तर इतका घोळ झाला नसता असं वाटतं. खर्‍या व्यक्तीचा इतिहास गोमटा करून सांगणे व ए़खाद्या लोककथेतल्या नायकाला अभूतपूर्व गुण अर्पण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकात बदलाची प्रक्रिया आहे, व दुसर्‍यात नवनिर्माण. एकदा खरी व्यक्ती कथानायक बनली की पुन्हा या दोन वेगळ्या काढता येत नाहीत हेही खरंच.

मी संपूर्ण चर्चेत महाभारतातील पात्रांशिवाय कोणतेही उदाहरण वापरलेले नाही तेव्हा आणखीही स्पष्टीकरण द्यावे लागेल याची कल्पना नव्हती. महाभारताची पात्रे वापरायचे कारण म्हणजे गीता हे महाभारताचे अंग समजले जाते किंवा कृष्णार्जुनांचा त्यात आविर्भाव आहे म्हणून.

डोळा हा किमान १० वेगवेगळ्या प्रकारचा असतो, व तो इतिहासात किमान चाळीस वेळा वेगवेगळ्या प्रजातीत शून्यापासून उत्क्रांत झाला आहे हे लक्षात घेतलं तर डोळ्याचा इतिहास बघण्यापेक्षा त्याचा उपयोग काय हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरतं एवढंच म्हणायचं होतं.

हे त्या अभ्यासकावर अवलंबून नाही का? डोळ्याचा अभ्यास करणार्‍या डॉक्टर किंवा संशोधकाला त्याच्या ४० वेळांतील इतिहासात रस नसेल परंतु एखाद्या पुरातत्ववेत्ता किंवा मानववंशाचा इतिहास शोधणार्‍या संशोधकाला तो असू शकेल. आता त्याने ४० संशोधने करायची का वीस हे त्याला ठरवू द्या ना. ज्यांना ते करायचे नाही त्यांनी त्याला वायफळ का म्हणावे?

अवतार - http://en.wikipedia.org/wiki/Avatar
पुनर्जन्म - http://en.wikipedia.org/wiki/Reincarnation

येथे या दोन्ही विषयांवर दोन स्वतंत्र लेख असून अतिशय संयत शब्दांत माहिती दिली गेली आहे परंतु विकी हे चर्चा करण्याचे करण्याचे स्थान नाही म्हणून येथे चर्चा टाकून इतरांची किंवा भारतीय आणि हिंदु धर्माचे लोक बहुसंख्य असल्याने त्यांचे विचार माहित करून घ्यायचे होते. एखादी संकल्पना समजावून घेताना माझाच घोळ होत आहे का हे जाणून घ्यायचे होते. या संकेतस्थळावर अशी माहिती राखणारे अनेकजण आहेत परंतु अशाप्रकारे धांगडधिंगा घातल्यावर पुढे येण्यास कचरत असावेत का काय असे वाटते. केवळ भौतिकशास्त्र, पर्यावरण, व्याकरण आणि तर्कक्रिडा एवढेच विषय येथे अर्थपूर्ण आहेत असे कोणीही जाहीर केल्याचे मला आठवत नाही तेव्हा इतर विषय निरर्थक कसे ठरतात? उपक्रमावर याहीपूर्वी अवास्तव आणि असंभाव्य कथांवर विचार विश्लेषण झाले आहे लेख १, लेख २. (फक्त माझेच लेख दिले आहेत. इथे जो धांगडधिंगा घातला गेला तो अन्य कोणा लेखकाच्या लेखांत घालावा अशी माझी इच्छा नाही) आणि त्यांत वाह्यातपणा केला गेल्याचे किंवा त्याला खतपाणी घातल्याचे मला आठवत नाही. याच चर्चेत असे का व्हावे याचे कारण यनावालांचा भगवंत दयाळू आहे या चर्चेतील हा प्रतिसाद असावा. त्यांच्या पूर्वग्रहदूषित मतांमुळे त्यांनी या चर्चेला निरर्थक ठरवले आणि या दोन्ही चर्चा एकच आहेत असे समजून प्रतिसाद दिला.

असो.

चर्चेचा उद्देश न समजता केवळ "हे भाकड आहे, वायफळ आहे, निरर्थक आहे" असे लिहून आणि चर्चा वाया घालवून काय साधले हे यनावाला आणि त्यांना समर्थन देणारे प्रतिसादीच जाणोत.

प्रत्येक

न पटलेला भाग म्हणजे या संकल्पनांच्या उत्क्रांतीला काही एकसंधता आहे असं वाटत नाही.

उदाहरण द्यायचं तर सजीवांत डोळा कधी उत्पन्न झाला? डोळ्याच्या अस्तित्वाचा सजीवांच्या दिसणार्‍या वागणुकीत काय परिणाम दिसतो? हे प्रश्न विचारता येतात. पण डोळा हा किमान १० वेगवेगळ्या प्रकारचा असतो, व तो इतिहासात किमान चाळीस वेळा वेगवेगळ्या प्रजातीत शून्यापासून उत्क्रांत झाला आहे हे लक्षात घेतलं तर डोळ्याचा इतिहास बघण्यापेक्षा त्याचा उपयोग काय हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरतं एवढंच म्हणायचं होतं.... अवतार व पुनर्जन्म यांचा मनोरंजन हाच केवळ उपयोग वाटला,

प्रत्येक संकल्पना उत्क्रांतीच्याच चष्यातून बघितली पाहिजे असे आहे का? तो एक पैलू होऊ शकतो पण याखेरीज अनेक पैलू असू शकतात. मायथॉलॉजीचे उदाहरण घ्यायचे झाले तर

जगातील प्रत्येक प्रकारच्या मायथॉलॉजीमध्ये काही साम्ये आढळतात. त्याचे कारण काय असावे? माणसाच्या मूलभून भावनांशी याचे काय नाते असेल?
ग्रीक मायथॉलॉजीमध्ये मानसशास्त्राच्या दृष्टीने बरेच रोचक पैलू आहेत. उदा. फ्रॉइडचा ओडीपस कॉम्प्लेक्स मुळात ग्रीक कथेवरूनच आला आहे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

 
^ वर