द्रौपदी विवाह आणि तत्कालीन राजकारण

मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील महाभारताची सुधारित प्रत कोणी वाचली असल्यास आणि खालील लेखावर अधिक प्रकाश टाकू शकल्यास आभारी असेन.

चर्चेतील आक्षेप काहीसे असे होते.

  • द्रौपदी ही भीक होती का?
  • पांडवांनी बैलोबांप्रमाणे आईची आज्ञा शिरसावंद्य मानून द्रौपदीला वाटून कसे घेतले?
  • कुंतीने १-२ मिनिटांत भावांभावांत एकी रहावी म्हणून पाचांचा विवाह द्रौपदीशी करण्याचा जलद निर्णय कसा काय घेतला?
  • द्रौपदी उर्मट होती तर तिने पाचांची पत्नी बनणे कसे स्वीकारले?

भिक्षा ही भिकाऱ्याला दिलेली भीक नसून ब्राह्मणाची मिळकत समजली जाई. तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहता, स्त्रीही गोधनाप्रमाणेच पुरुषाची मिळकत असणे वावगे नसावे. आता वळू स्वयंवरपर्वाकडे - यातील स्वयंवराचा भाग सोडून, द्रौपदीला जिंकल्यावर ब्राह्मणवेशात पांडव तिला घेऊन कुंभाराच्या घरी येतात तिथपासून सुरुवात करू.

आपले पुत्र परतले नाहीत या काळजीत पाठमोऱ्या बसलेल्या कुंतीच्या समोर उभे राहून पांडव, आपण भिक्षा घेऊन आल्याचे सांगतात. 'जे काही मिळाले ते तुम्ही समान वाटून घ्या' असे कुंती सांगते आणि पुत्रांकडे वळते. समोर उभ्या असलेल्या याज्ञसेनीला पाहून कुंती चकित होते आणि तिला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. 'हे मी काय केले?' असे मोठ्याने बोलून ती द्रौपदीचा हात पकडते आणि पापाचे क्षालन व्हावे म्हणून युधिष्ठीरासमोर उभी राहते आणि सुनावते ' द्रुपद राजाची कन्या तुझ्या धाकट्या भावांनी जिंकून आणून माझ्यासमोर उभी केली आणि वर भिक्षा आणली असे ओरडले तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. हे राजा! भिक्षा आणली असे वाटल्याने मी काही चुकीचे बोलून गेले नाही पण आता तूच सांग की माझे बोलणे खोटे कसे पडावे? आपल्या हातून पाप कसे घडू नये आणि या नवपरिणित वधूला येथे अवघडल्यासारखे कसे वाटू नये?'

युधिष्ठीर आईची समजूत घालतो आणि अर्जुनाकडे वळून म्हणतो, 'याज्ञसेनीला तू पणात जिंकलेस, तेव्हा तिच्याशी लग्न केवळ तूच करावेस. तेच योग्य होईल.'

यावर अर्जुन म्हणतो, 'असे करून पापाचा घडा माझ्या नशिबी येणार. आपण सर्व काही वाटून घ्यायची शपथ घेतली होती, मातेने तशी आज्ञाही दिली. आता याज्ञसेनीशी सर्वप्रथम विवाह तुम्ही करावा, मग भीमाने, मी, नकुल आणि सहदेवाने विवाह करावेत असे मला वाटते. यानंतर, मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व आपली आज्ञा मानू.'

अर्जुनाचे वक्तव्य ऐकून बाकीच्या पांडवांनी द्रौपदीकडे निरखून पाहिले आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून ती आपलीही पत्नी होऊ शकते या शिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात येईना. युधिष्टीराने हे सर्व पाहून जाणले की आपल्या भावांच्या मनात द्रौपदीविषयी लालसा निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने 'द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल' असे घोषित केले.

हे सर्व घडत असता आपल्या बहिणीला जिंकणारे हे ब्राह्मण कोण हे पाहण्यासाठी धृष्टद्युम्न कुंभाराच्या घराबाहेर लपला होता. लाक्षागृहाच्या कांडापासून नाहीसे झालेले पांडव हेच ते पाच ब्राह्मण असावेत अशी शंका आल्याने श्रीकृष्ण आणि बलराम कुंभाराच्या घरात येऊन पांडवांना भेटून सल्ला मसलत करून गेले. ती रात्र पांडवांनी आनंदात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लपलेला धृष्टद्युम्न महालात परतला तसे द्रुपदाने उत्सुकतेने ब्राह्मणांविषयी विचारले तेव्हा धृष्टद्युम्नाने ते पांडव असल्याचा संशय व्यक्त केला. येथे द्रुपद विचारतो की त्या गरीबाच्या घरात द्रौपदी कशी राहिली आणि धृष्टद्युम्न सांगतो की अतिशय शालीन आणि मिळून मिसळून राहिली.

विवाहाची बोलणी करायला द्रुपद कुंभाराच्या घरी गेला आणि पांडवांना उत्सवासाठी आमंत्रित करून गेला. यानंतर मिरवणूक, भोजन इ. नंतर द्रुपदाने लग्नाची बोलणी सुरू केली. पांडवांनीही त्याला आपली खरी ओळख दिली आणि द्रुपदाकडे आश्रय मागितला. द्रुपद आणि पांडवांची कुरुराजघराण्यात चाललेल्या राजकारणाविषयी बोलणी झाली.

यानंतर द्रुपदाने युधिष्ठिराकडे विनंती केली की आता अर्जुन आणि द्रौपदीचा विवाह ठरावा. यावेळेस युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदीशी विवाह प्रथम मी करणार. झाला प्रकार माहित नसल्याने द्रुपदाने युधिष्ठिराला म्हटले की 'द्रौपदीला अर्जुनाने जिंकले आहे. सर्वांची संमती असेल की आपण मोठे भाऊ असल्याने तिच्याशी विवाह करावा तर माझी काहीच हरकत नाही.' यावर युधिष्ठिराने त्याला घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते ऐकून द्रुपद काळजीत पडला आणि म्हणाला की 'एका पुरुषाने अनेक विवाह करणे ही आपली प्रथा आहे परंतु एका स्त्रीने अनेक पती करणे धर्मबाह्य ठरणार नाही काय? असे पाप कसे करता येईल? या प्रसंगाने तुमच्या किर्तीला काळिमा तर नाही लागणार? अशा प्रकारचे लग्न मला समाजात आणि वेदांत आढळून आलेले नाही. हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे.'

युधिष्ठिर उत्तरादाखल म्हणतो, 'नैतिकता हा फार नाजूक मामला आहे. तिचा पथ सतत बदलत असतो. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. ज्येष्ठांचा अवमान केला नाही. आमच्या मातेने हे शब्द उच्चारले ते खोटे ठरावेत अशी तिची आणि माझी इच्छा नाही.'

यावरही द्रुपदाचे संपूर्ण समाधान झालेले दिसत नाही (असे माझे मत) तो उद्गारतो, 'हे कुंती, तू, तुझे पुत्र आणि माझा पुत्र धृष्टद्युम्न मिळून या गोष्टीवर निर्णय करा. तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलात ते मला कळवा. मी विवाहाची तयारी करेन.'

द्रुपद, पांडव, कुंती आणि धृष्टद्युम्न यांचा विचारविनिमय चालला असता तेथे व्यास पोहोचले. यानंतर द्रुपद, धृष्टद्युम्न, युधिष्ठीर आणि व्यास यांच्यात मोठी चर्चा झाली. त्या चर्चेचे फलीत असे निघाले की पूर्वीही एका स्त्रीला एकाहून अधिक नवरे असल्याचे दाखले आहेत. द्रौपदीही "श्री"चा पुनर्जन्म असून ती पूर्वजन्मी पाच इंद्रांची पत्नी होती. (ती गोष्ट विस्तारभयास्तव येथे देत नाही) तिचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाल्याने तिला पाचांची पत्नी होऊ देणे धर्मबाह्य नाही. आणि या चर्चांचे फलीत धर्मानुसार द्रौपदीने पांडवांशी केलेल्या विवाहात झाले.

असो. आता माझी टिप्पणीः

  • भिक्षा म्हणजे भिकाऱ्याला दिलेली भीक नाही.
  • कुंतीने एक दोन मिनिटांत निर्णय घेतला नाही किंबहुना, निर्णय कुंतीचा नाही हे सहज समजते.
  • युधिष्ठिराने लंपटपणे द्रौपदी मिळावी म्हणून प्रयत्न केले किंवा भावाभावांतील एकी राहावी म्हणून प्रयत्न केले हे मानणे ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. मला दोन्हींशी वावडे नाही.

राजकारणाचा विचार केला असता पांडवांची स्थिती त्यावेळी फार वाईट होती. त्यांना योग्य आश्रयदाता हवा होता आणि तो द्रुपदापेक्षा उत्तम मिळाला नसता. द्रुपदाचे आश्रित होण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्यावर राहण्यासाठी द्रौपदीला जिंकणे आवश्यक होते. ते न होता, भावाभावांतच कलह उत्पन्न झाले तर गेलेले राज्य मिळणे कठिण होते आणि विनाश निश्चित होता. आईची आज्ञा न मानणे, मोठ्या भावाच्या आधी धाकट्या भावाने लग्न करणे, शब्द खोटा पाडणे इ. गोष्टीही धर्मबाह्यच ठरल्या असत्या. म्हणजेच, इथून नाहीतर तिथून पांडवांचाच दोष मानला गेला असता. द्रुपदालाही द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी प्रबळ मित्रांची (allies मराठी शब्द आठवला नाही.) गरज होती. धर्मबाह्य वाटले तरी त्याने मान तुकवली असतीच. व्यासांनी तेथे येऊन धर्मचर्चा करून पांडव कोणतेही पाप करत नसल्याचा निर्वाळा दिला आणि द्रौपदीचा विवाह पाचांशी झाला.

द्रौपदी या प्रसंगात काहीच का बोलली नाही याचे एक कारण द्रौपदीला आपला जन्म कशासाठी झाला आहे याची कल्पना होती. श्रीकृष्णाच्या भेटीने हे ब्राह्मण पांडवच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. वडिलांच्या अपमानाचा बदला आणि त्यासाठीच आपला जन्म आहे आणि पांडवांशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही हे माहित असल्याने तिने गप्प राहणे पसंत केले.

किंवा, दुसर कारण जे महाभारताबाहेरील असावे - बाईने पतिविरुद्ध बोलले की संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी समजूत असल्याने कदाचित ते संवाद मूळ महाभारतात झालेल्या बदलांमध्ये काढून टाकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्याचा पुत्र म्हणून तेजस्वी कर्ण आणि यज्ञज्वालेतून बाहेर आलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोघेही उर्मट असल्याचे दाखले महाभारतात दिसतात. तेव्हा या सर्व प्रसंगात द्रौपदीने आपली नाराजी दाखवली नसेल असे वाटत नाही. कदाचित, तिने ती आपल्या पित्याकडे व्यक्त केली असेल किंवा भावाकडे कारण त्या दोघांच्या संवादांत चिंता, काळजी, पापाची भीती दिसून येते.

संदर्भः द महाभारता ऑफ कृष्णद्वैपायन व्यास - के. एम. गांगुली (पाने २४७ ते २५६)

सूचना: स्त्रीवाद आणि तत्सम विषयांकडे ही चर्चा वळवण्यापेक्षा तत्कालीन समाजाच्या समजूती, नैतिकता, आचरण यावर चर्चा व्हावी. वाचकांची मते जाणून घ्यायला आवडतील. कर्णाविषयी किंवा महाभारतातील इतर पात्रांविषयी चर्चा कराविशी वाटल्यास दुसरा धागा उघडावा. कर्णाची चर्चा मनोगतावर सुरु आहेच.

लेखनविषय: दुवे:

Comments

महाभारतातील स्त्रिया

डी डि कोसंबी स्मृती व्याखानमालेत मागच्याच महिन्यात पत्रकार भवन पुणे येथे वरील विषयावर श्रीमती .गौरी लाड (बहुतेक) यांच अभ्यासपुर्ण व सखोल व्याखान झाले. ते लिखित स्वरुपात ही आहे. ते वेगळयाच दृष्टिकोणातुन झाले. स्त्रीवादाचा , इतिहासाचा , विवाहाच्या आठ प्रकारांचा पण परामर्श घेतला होता. आपल्या टिप्पणीशी सहमती दर्शवणारे आहे.मी संपुर्ण ऐकले. अशी भाषणे आपल्यासार्ख्या लोकांना किमान ऑडियो फॉर्मॅट मध्ये पाठवता आली पाहिजे. ती एक बौद्धिक मेजवानीच असते.
प्रकाश घाटपांडे

असं खरंच झालं तर

अशी भाषणे आपल्यासार्ख्या लोकांना किमान ऑडियो फॉर्मॅट मध्ये पाठवता आली पाहिजे. ती एक बौद्धिक मेजवानीच असते.

असं खरंच झालं तर मेजवानीच होईल. :-)

खानदान

हा चर्चेचा विषय एकदम वेगळा आहे. नंतर अजून लिहीन पण राहून राहून एक गोष्ट वाटत आली आहे की संपूर्ण महाभारत हे फक्त खानदानांच्या मारामार्‍या वाटतात! त्यामुळे एक श्रीकृष्ण सोडून प्रत्येकाने प्रत्येकाचा सूड उगवण्याची भूक भागवायला प्रयत्न केला असे वाटते. म्हणूनच त्यात आपण म्हणता तसे राजकारण आहे हे ही समजते. सर्वात "हाईट" म्हणजे हा सूड उगवताना प्रत्येकास वाकड्या वळणानेच "युद्धात सर्व क्षम्य" याचा आधार घेत करावे लागले.

द्रौपदीच्या बाबतीत असलेले पाच पती हा प्रकार आजही "उत्तर-पूर्व" भागात काही जमातीत होतो असे ऐकून आहे. पण त्याचा आणि द्रौपदीच्या पाच नवर्‍यांचा काही संबंध असेल असे वाटत नाही. तीने पाप केले वगैरे काहीच नाही म्हणून तर तीचे नाव "पंचकंन्यां"मधे आहे. फक्त "चालू" धर्मराजास तीचे अर्जूनावर जास्त प्रेम होते (अर्थात तीने प्रेमाच्या भावनेची समान वाटणी केली नाही) म्हणून ती सर्वात प्रथम मेली असे भिमास सांगीतले. पण सर्व पांडवाच्या आधी मरण येऊन ती संपूर्ण सधवा/पतिव्रता आयुष्यभर राहीली ह्याकडे त्याने कानाडोळा केला. या संदर्भात वर्तकांचे भाष्य त्यांच्या तोंडून "ह्याची देही ह्याची डोळा" (त्यांच्या बाबतीत "कुठल्या देही" ते सांगावे लागते!) ऐकले होते, ते येथे सांगत नाही नाहीतर विषय प्रचंड भरकटेल....

खानदानाच्या मारामार्‍या

नंतर अजून लिहीन

लिहाच. :-)

राहून राहून एक गोष्ट वाटत आली आहे की संपूर्ण महाभारत हे फक्त खानदानांच्या मारामार्‍या वाटतात!

अगदी! आणि तसेच आहे म्हणजे विचार केला तर घराघरात युधिष्ठीर, दुर्योधन, शकुनी सापडतात, महाभारत हे केवळ महाकाव्य असेल तर व्यासांच्या बुद्धीची झेप अशक्यकोटीतील म्हणावी लागेल.

पण सर्व पांडवाच्या आधी मरण येऊन ती संपूर्ण सधवा/पतिव्रता आयुष्यभर राहीली ह्याकडे त्याने कानाडोळा केला.

खरे आहे.

एक पटण्यासारखा कथाप्रसंग

महाभारत मानवी प्रयोजन-अपप्रयोजनांच्या गुंतागुंती पटतील अशा दर्शवते. हा कथाप्रसंग सांगितल्याबद्दल धन्यवाद.

असेच/युगान्त

असेच म्हणतो. इरावती कर्व्यांच्या युगान्त मध्ये द्रौपदीवर एक आख्खे प्रकरण आहे. त्यात काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

युगान्त

युगान्तात काय आहे याची एक झलक मनोगतावरील या प्रतिसादात होती पण ती अपुरी वाटते. कोणाकडे हे पुस्तक असल्यास तो संदर्भ येथे दिल्यास आभारी असेन.

अजानूकर्ण

पुस्तक सध्या हाताशी नाही पण अजानुकर्ण युगान्त बाळगून आहेत असे इतरत्र समजले.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

युगान्तचा संदर्भ

प्रियाली ही चर्चा मुद्देसुद्पणे परत सुरु केल्याबद्दल धन्यवाद. माझा मनोगतावरील युगान्तचा संदर्भ त्रोटक होता, मी फक्त त्यातला निष्कर्ष लिहण्याचा प्रयत्न केला होता. पण आता खाली युगांत मधीलच काही भाग देत आहे - प्रकरण द्रौपदी - पाने १०५-१०९.

द्रौपदी पांडवांची झाली. तिच्या माहेरी राहूनच पांडवांनी राज्याच्या भागाची वाटणी मागितली. पांडवांचे पारडे इतके जड झाले होते की, धृतराष्ट्राला ही मागणी डावलता येईना. इंद्रप्रस्थला धर्माबरोबर द्रौपदीलाही अभिषेक झाला व ते राज्य द्रौपदीमुळे मिळाले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. द्रौपदी पांडवांची प्रतिष्ठा होती, त्यांच्या एकत्वाची, अभेद्यतेची चालती बोलती खूण होती.
पांडव शुर होते; पण एकाला द्युताचे व्यसन, एक आडदांड, एक लढाऊ पण राज्यावर मन नसलेला, धाकटे दोघे जुळे भाऊ वडील भाऊ करतील त्याला साथ देणारे, असे होते. पांडवांनी स्वतंत्रपणे काही राजकरण केले नाही. त्यांचे राजकारण श्रीकृष्णाने केले; व त्यांची जपणूक दोन बायांनी केली. पांडू मेला, माद्री सती गेली व ही लहान लहान पाच मुले घेऊन कुंती हस्तीनापुराला आली. त्या दिवसापासून त्यांचे लग्न झाले त्या दिवसापर्यंत कुंतीने मुलांवर पहारा केला. पांडवांना गंगेच्या काठी लांबच्या गावाला पाठविले तेव्हा कुंतीला राजधानीत राहता आले असते; पण ती त्यांच्याबरोबर गेली. लाक्षागृहातुन सुटल्यावर त्यांच्याबरोबर राहीली. पांडवांचे आईवरचे प्रेम हेह एक कारण ह्या घटनेला देता येईल; पण तिचे जागृत मातृत्व हेच कारण ह्याच्या पाठीमागे मुख्यत्वे होते.
द्रौपदी पहील्याने सासूकडे आली, तेव्हाचा प्रसंग विचार करण्यासारखा आहे. सासू म्हणाली, "काय आणलं आहे ते पाच जणांनी वाटून घ्या." मग बघते तो एक सुंदर मुलगी. ही कशी पाचांनी वाटून घ्यायची? धर्माने अर्जुनाला सांगितले, "बाबा तू हिला जिंकलेस. तू हिच्याशी लग्न कर." अर्जुन म्हणाला, "तुम्ही व भीम वडील असता मी धाकट्या भावाने लग्न करण्याचे पाप कसे करु? तुम्हीच मोठेपणी हिच्याशी लग्न करा." कुंतीच्या मनात होते, ती सर्वांची व्हावी. ही गुंतागुंत सुटावी कशी?

थोरल्या भावाआधी लहानाने लग्न करणे हे काही फक्त शिष्टाचाराविरुध्द् होते असे नव्हे; तर् खरोखरी असे करणे पाप आहे अशी फार जुनी समजूत होती. वेदांमध्ये व ब्राम्हणग्रंथांतही ह्याला स्पष्ट पुरावा सापडतो. थोरल्याच्या बायकोवर खालच्या भावांचा अधिकार असे; पण उलट मात्र होऊ शकत नसे. धाकट्याने लग्न आधी केले, तर तो धाकटा व थोरला भाऊ - एवढेच नव्हे, तर् अशा लग्नाला संमती देणारे आईबापही, पापाचे धनी होत. पूर्वीच्या काळी थोरल्या मुलाला वंशपरंपरा अधिकाराचा व द्रव्याचा वारसा मिळत असे. आई वडीलांचे श्राध्द् व गृहस्थापणाची सर्व कर्तव्य बजावण्यासाठी त्याला लग्न आवश्यक असे. खालच्या भावाने लग्न करणे म्हणजे थोरल्याचे सामाजिक, कौंटुबिक व धार्मिक अधिकार हिरावून घेण्यासारखे होते, म्हणून थोरल्याआधी लग्न करणे पाप होते. द्रौपदीच्या बाबतीत तर अर्जुनाने एकट्यानेच तिच्याशी लग्न केले असते, तर वरच्या भावांना इतक्या तोलाच्या राजघराण्यातील मुलगी मिळणे जड गेले असते. अर्जुनाने जिंकलेल्या मुलीचे धर्माशी लग्न होणे शक्य होते. त्यांच्या आजोबांच्या पिढीत भीष्माने आपल्या भावांकरीता मुली जिंकून आणल्या होत्या. द्रौपदीबद्दल बोलणी होत होती, तेव्हा सर्व भावांच्या नजर तिच्यावर खिळल्या होत्या, व सर्वांच्या मनात तिच्याबद्दल अभिलाषा उत्पन्न् झाली होती असे महाभारतकारांनी एका श्लोकात सांगुन टाकले आहे. ही गोष्ट कुंतीच्या नजरेतून निसटलेली नसणार. तिच्या शहाणपणाने व व्यासांच्या चलाखीने सर्व पेच सुटून द्रौपदी पाचांची बायको झाली. एकाची झाली असती तर जी कलहाची बीजे पेरली गेली असती, त्या सर्वांचा मुळातच नायनाट झाला; व पांडवाची एकी अभेद्य राहीली. अगदी हीच गोष्ट कर्णाने दुर्योधनाला सांगितली. लाक्षागृहातून वाचून परत येऊन प्रकट झालेल्या पांडवांचे आता काय करावे ह्या उहापोहात दुर्योधन म्हणाला, "कुंतीच्या मुलांना माद्रीच्या मुलांपासून फोडून वेगळे करावे, किंवा द्रुपदाला व त्याच्या मुलांना द्रव्याचा लोभ दाखवून पांडवांचा त्याग करायला लावावे, किंवा त्यातला त्यात भीमाचा काटा काढावा." कर्णाने ह्या सर्व उपायांचा फोलपणा दाखविला: "इथे आपल्या राजधानीत पांडव अनाथ पोरे असताना जे साधले नाही, ते आता तर अशक्य आहे. आता त्यांना पक्षपाती मित्र आहेत, ते दुस-या देशात आहेत. द्रुपद आर्यवृत राजा आहे. धनाचा लोभी नाही. द्रुपदाच्या मुलाच्या बाबतीत म्हणशील तर तो पांडवांचा भक्त आहे. द्रौपदी सर्वांची मिळून बायको झाली आहे. आता त्यांच्यात फूट पडणे कदापि शक्य नाही." आणि द्रौपदी जिवंत असेपर्यंत त्यांच्यात कधीही फूट पडली नाही. द्रौपदी मेल्यावर् जी फूट पडली, ती शरीराची.
कुंतीने पांडवांचे जतन केले, ते त्यांच्या जिवाची काळजी घेऊन. द्रौपदीने त्यांना सर्वनाशापासून वाचवले. ह्या तिच्या कृत्याचा मोठेपणा महाभारतात परत कर्णाच्याच तोंडून वदवला आहे. धर्माने द्युतामध्ये सर्वस्व गमावले; एवढेच नव्हे तर आपल्या बायकोला पणाला लावले. कौरवांच्या सभेत होऊ नये तशी तिची विटंबना झाली. त्या वेळी झाला एवढा दुष्टावा पुरे, गोष्टी पुढे जाऊ दिल्या तर परिणाम बरा होणार नाही, या भितीने धृतराष्ट्राने द्रौपदीला तीन वर मागायला सांगितले. एका वराने तिने धर्माला दास्यातून मुक्त केले; दुस-या वराने इतर चौघांना मुक्त केले. "नवरे शस्त्रास्त्रांसह मुक्त झाले, एवढे मला पुरेसे आहे." असे म्हणून तिने तिसरा वर मागितलाच नाही. वर मागण्याची तिची त-हा, अभिषिक्त राजा म्हणून धर्माला आधी मुक्त करण्याची तिची तत्परता, बाकीच्यांना शस्त्रांसह मुक्त करणे एवढेच मागून बाकी कशाचाही लोभ न धरणे यांनी तिने आपल्यालाच नव्हे तर पांडवांनाही अप्रतिष्ठेतून बाहेर काढले. या प्रसंगाला उद्देशुन कर्ण जे म्हणाला, ते लक्षात घेण्यासारखे आहे. "जगात सुंदर् बायकांच्या बाबतीत आत्तापर्यंत ऐकले होते. पण हिने जे केले, त्याला तोड नाही. इथे पांडव आणि कौरव रागाने जळत होते. ह्या आगीच्या डोंबात काय झाले असते, कोण जाणे! पण या कृष्णेने शांती प्रस्थापित केली. खोल समुद्रात गटांगळ्या खाणा-या, अप्रतिष्ठेमध्ये बुडून गेलेल्या पांडवांना पांचालीने एखाद्या नावेप्रमाणे तीराला आणून पोहोचवले." स्त्रीमुळे आपली प्रतिष्टा वाचली, हे शब्द् भीमाला झोंबले. पण पांडवाना राग यावा हा जरी एक उद्देश असला तरी कर्ण म्हणाला ते काही खोटे नव्हते. पांडवाचे लहानपणाचे आयुष्य कुंतिने रक्षिले होते, मोठेपणचे द्रौपदीने. द्रौपदी उभी होती तोपर्यंत पांडव उभे होते; द्रौपदी खाली पडली तेव्हा धर्माखेरीज इतरही पडले.

धन्यवाद, सखी

उपक्रमावर येऊन युगान्तचा संदर्भ टंकून या चर्चेला हातभार लावल्याबद्दल अतिशय आभारी आहे. इरावती कर्व्यांनी मांडलेले विचार आवडले, पटण्याजोगे आहेत.

पुन्हा एकदा धन्यवाद.

प्रियाली.

महत्वपूर्ण

लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात.

माझ्या मते हे वाक्य महत्त्वाचे आहे. दुसर्‍या चर्चेत म्हटल्याप्रमाणे महाभारतार इ.स्.पू. ५०० ते इ. स. ७००-८०० या कालावधीत विविध प्रतींमध्ये भर घातली गेली. त्यामुळे पहिला मुद्दा असा की मूळचे काय आणि भर घातलेले काय? दुसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इ.स्.पू. ५०० च्या आधी मूळ महाभारत लिहीले गेले, पण त्याचा नक्की कालावधी अजूनही निश्चित नाही. वेदांमध्ये महाभारताच्या कथेचा उल्लेख नाही. त्यामुळे याची रचना वेदांच्या रचनेनंतर झाली असे मानण्याला वाव आहे. याखेरीज महाभारतात बर्‍याच गोष्टींचा उल्लेख नाही. उदा. साखर, रेशीम, काच, चलनी नाणी इत्यादी. याचा अर्थ महाभारताचा काल या वस्तू वापरात येण्याच्या आधीचा असला पाहिजे. म्हणूनच आजची आपली विचारसरणी या संदर्भात विशेष उपयोगाची नाही. यासाठी त्या काळातील नैतिकता, कायदे लक्षात घेतले पाहिजेत.

संदर्भ : महाभारत : एक पुरातत्वीय दृष्टीकोन, गौरी लाड, भा. इ. सं. मं. त्रैमासिक : १ जुलै १९८५
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

योग्य मुद्दे

मूळ महाभारत म्हणून जे म्हटले जाते तेच रशियन बाहुल्यांप्रमाणे एकात एक आवरणात गुरफटलेले आहे. व्यासांचे महाभारत वैशंपायनांनी सांगताना बदल आणि नंतर सौतीने सांगताना बदल घडलेले असतीलच. त्यानंतर कितिदा घडत गेले त्याची गणती करणे कठिण वाटते.

महाभारतात वेदांचा उल्लेख येतो. या कथेतही आहे की प्रश्न उठतो की अनेक पतींची मान्यता वेदांत आहे का? त्यामुळे महाभारत वेदांच्या रचनेनंतरच लिहिले गेले असावे.

महाभारतात नाण्यांचा उल्लेख नाही हे मला निश्चित माहित आहे. भारतात पहिली नाणी फार नंतर पाडली गेली. साखर, रेशीम याबद्दल अनभिज्ञ. :-(

यासाठी त्या काळातील नैतिकता, कायदे लक्षात घेतले पाहिजेत.

खरंय!

महाभारतात काच

मला वाटते महाभारतात काचेचा अप्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे. पांडवांच्या नवीन राजमहालात पाण्याचा प्रवाह असल्यासारखा दिसतो पण प्रत्यक्षात नसतो, जाळ असल्यासारखा असतो पण प्रत्यक्षात तो सुद्धा नसतो. कदाचित हे काचेच्या वापराने साध्य केलेले असावे.

पांडवांच्या महालाचे वर्णन करणारे महाभारतातील श्लोक यावर प्रकाश पाडू शकतात.

आपला,
(कांस्यस्फूर्त) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

काच

याबद्दल वर दिलेल्या संदर्भात असे वर्णन आहे.
"महाभारतात मात्र काचेचा मागमूसही नाही. अर्थातच महाभारताच्या संशोधित आवृत्तीत! संशोधित आवृत्तीतून बरेच काही वगळले गेले आहे. त्यांत कचमण्याचा एक उल्लेखही आहे. द्रोणपर्वात भीमाने धृवाला बुकलून ठार केल्याची कथा आहे. ह्या घटनेसंबंधी तामिळ ग्रंथ आवृत्तीत थोडा आणखी तपशील आलेला आहे. एखादा काचमणी मुठीने ठेचावा तसे भीमाने धृवाला ठेचले असे वर्णन आहे. पण इतर आवृत्यांतून ह्या वर्णनास पुष्टी न मिळाल्याने संशोधित आवृत्तीने नेमक्या ह्याच ओळी गाळून टाकल्या आणि त्याबरोबर महाभारतात आलेला हा काचेचा एकमेव उल्लेखही गळून गेला."
ह्या लेखातील शेवटचे वाक्य या बाबतीत महत्वपूर्ण ठरावे.
"शेवटी एवढेच म्हणता येईल, की महाभारताच्या प्रत्येक श्लोकागणिक त्याची तिथि ठरवावी लागेल हे प्रसिद्ध जर्मन विद्वान विंटरनिट्झ यांचे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीचे मत आजही तितकेच खरे आहे."

संदर्भ : महाभारत : एक पुरातत्वीय दृष्टीकोन, गौरी लाड, भा. इ. सं. मं. त्रैमासिक : १ जुलै १९८५
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आता "बहुतेक" नाही "नक्की"

संदर्भ : महाभारत : एक पुरातत्वीय दृष्टीकोन, गौरी लाड, भा. इ. सं. मं. त्रैमासिक : १ जुलै १९८५

बरोबर मला याच गौरी लाड म्हणायच्या होत्या ( )बहुतेक शब्द मी घाबरुन लिहिला होता.
प्रकाश घाटपांडे

बरोबर

गौरी लाड यांचा या विषयात बराच अभ्यास आहे. संदर्भात दिलेला लेख हे त्यांचे पीएचडी प्रबंधाचे काम आहे. त्यांचे व्याख्यान ऐकायला मिळाले तर खरेच आवडेल.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

द्रौपदी विवाह -

ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने 'द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल' असे घोषित केले.
कथानकातील वरील विधानामुळे(च) युधिष्ठिराने ही घोषणा केली असे नव्हे. श्री गांगुलींच्या पुस्तकांतून भाषांतर करतांना तिथे एका ओळीचा उल्लेख बहुधा नजरेतून सुटला असावा असे वाटते. तो असा "And that bull among men immediately recollected the words of Krishna-Dwaipayana." व्यासांनी म्हटलेले काय आठवले हे पहाण्यासाठी श्री. गांगुलींच्या पुस्तकातील सेक्शन १९१ (चैत्ररथ पर्व)पहावा लागेल. [ http://www.sacred-texts.com/hin/m01/m01172.htm ] ह्या ठिकाणी जी कथा आलेली आहे त्यावरून स्पष्ट होते की युधिष्ठिराला आधीच माहित होते की पृषताची नात, द्रुपदाची कन्या ही पांच भावांची पत्नी होणार आहे.

[ मी युधिष्ठिराचे समर्थन करतो आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नये. कथेतील एक वाक्य सुटले असे वाटले आणि त्याचा संदर्भ कसा होता हे दाखविण्याकरितांच हा प्रतिसाद ]

धन्यवाद - चैत्ररथपर्व

कथानकातील वरील विधानामुळे(च) युधिष्ठिराने ही घोषणा केली असे नव्हे. श्री गांगुलींच्या पुस्तकांतून भाषांतर करतांना तिथे एका ओळीचा उल्लेख बहुधा नजरेतून सुटला असावा असे वाटते. तो असा "And that bull among men immediately recollected the words of Krishna-Dwaipayana."

तसे मी भाषांतर केले नव्हते, म्हणूनच गोषवारा असे लिहिले. :-) एकटाकी प्रतिसाद लिहिला होता त्याचे लेखात रुपांतर केले. ते करताना फक्त स्वयंवरपर्व वाचले. चैत्ररथपर्व वाचले नव्हते. म्हणूनच हा विषय चर्चा असा मांडला, जेणेकरून प्रत्येकाला त्यावर आपल्याकडील माहिती, संदर्भ पुरवता येईल. तुम्ही तो संदर्भ दिल्याने उत्तमच झाले. मीही एकच वर पाचवेळा मागणार्‍या युवतीची कथा पूर्वी वाचली होती पण ती स्वयंवरपर्वात मिळाली नाही. तिचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद.

मी युधिष्ठिराचे समर्थन करतो आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नये.

खरं सांगायचं तर युधिष्ठीराविषयी इतके उलट सुलट वाचले आहे की तो लंपट आणि स्वार्थी होता का काय असे वाटून जाते पण मूळ महाभारत वाचत गेले तर तो समज थोडाफार बदलत जातो. शेवटी, महाभारत ही माणसांची कथा आहे. To err is human हे खरे असल्याने युधिष्ठीराचे योग्य संदर्भाने समर्थन करण्यात काहीच हरकत नाही.

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. द्रौपदी विवाहाच्याकथेवर आपले अधिकही विचार असतील तर वाचायला आवडतील.

परत दुर्गा भागवत,,

प्रतिभा रानडे यांचे " ऐसपैस गप्पा : दुर्गा भागवतांशी" हे पुस्तक माझ्याकडे आहे, त्यातून त्यांचे एका प्रश्नावरचे विचार देते आहे. दुर्गाबाईंना महाभारताला इतिहास म्हणतात हे विशेष पटलेले नाही असाही उल्लेख पुस्तकात आहे. त्यांना तो सूडाचा प्रवासही वाटत नाही. मला त्यांचे सर्व विचार पटतात असे नाही, फक्त त्यांनी काय म्हटले आहे ते प्रियाली यांनी विचारलेल्या प्रश्नासंबंधी काहीसे आहे म्हणून येथे देते आहे (अवांतर वाटल्यास क्षमस्व!) -

प्रतिभा रानड्यांनी प्रश्न विचारला आहे की पाच पांडवांची पत्नी, कृष्णसखी, लोककथेनुसार कर्णावर मन गेलेल्या या द्रौपदीला पतिव्रता म्हटलं जातं, ते कसं काय?

यावर दुर्गाबाई म्हणतात, " कारण ती वाह्यात नव्हती. तिचं सगळंच वागणं अत्यंत भारदस्त, तेजस्वी आणि स्वाभिमानी आहे. वावगेपणाअ कुठे कणभरही नाही. पण त्याच वेळी ती कामिनी होती. माझी तर अशी ठाम समजूत आहे की पुरुषाशी अतिशय चांगले संबंध जिला ठेवायचे आहेत त्या बाईमध्ये स्त्रीत्वाचं विशिष्ट आकर्षण असलं पाहिजे. अशी स्त्री अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ असते. पण द्रौपदी फक्त कामिनीच नाही, तर महाभारतामध्ये तिला विदुषी, पंडिता आणि पतिव्रता म्हटलंय. सासूच्या आज्ञेमुळे तिला पाच पांडवांशी लग्न करावं लागलं. त्याबद्दलचे नियम होते, त्यांचं उल्लंघन तिनं कधीही केलं नाही. म्हणजे व्यवहारात ती चुकली नाही."

अवांतरः त्या हेही लक्षात आणून देतात की युधिष्ठिराला फक्त द्रौपदी ही एकच पत्नी होती, बाकी सर्वांना तिच्या खेरीज इतरही स्त्रिया होत्या. दुर्गाबाईंच्या अजून एका मते " (महाभारतात) प्रत्येक व्यक्तीत काही चांगलं, काही वाईट, नियतीपुढं त्याला शरणागती घ्यायला लागणं हे सगळं मला दिसलं, पण सूड कुठे दिसला नाही".

रोचक

प्रतिभा रानडे आणि दुर्गाबाई दोघींचेही महाभारताबद्दलचे विचार रोचक वाटतात. वाचायच्या पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाची भर घातली.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वाचा नक्की

खूप एंटरटेनिंग पुस्तक आहे. मला आवडले.

युधिष्ठीराची पत्नी

चित्रा, तुमचा प्रतिसाद हा अवांतर/ विषयांतर नक्कीच नाही.

द्रौपदीला साध्वी किंवा पतिव्रता का म्हटले जाते याचे प्रमुख कारण हेच आहे की पाचांशी विवाह करूनही ती आपल्या कर्तव्यात चुकली नाही. तिने सर्व पतींविषयी समान श्रद्धा आणि कर्तव्यांची अंमलबजावणी केली. (काहींच्या मते नकुल आणि सहदेव हे तिच्यापेक्षा वयाने लहानही असू शकतात.) आणखीही काही कारणे आहेत ती सर्व येथेच मांडत नाही.

त्या हेही लक्षात आणून देतात की युधिष्ठिराला फक्त द्रौपदी ही एकच पत्नी होती, बाकी सर्वांना तिच्या खेरीज इतरही स्त्रिया होत्या

हे मात्र तितकेसे खरे नाही. द्रौपदी खेरीज पांडवांना पुढील बायका आणि पुत्र होते.

पांडव - पत्नी - पुत्र
------------------------
युधिष्ठिर - पौरवी - देवक
भीम - हिडिंबा - घटोत्कच
भीम - काली - सर्वगत
अर्जुन - सुभद्रा - अभिमन्यू
अर्जुन - उलुपी - इरावण (किंवा असे काहीसे)
अर्जुन - चित्रांगदा - बभ्रुवाहन
नकुल - कर्णमती (किंवा असे काहीसे) - नरमित्र
सहदेव - विजया - सुहोत्र

युधिष्ठिर

पौरवीबद्दल माहिती नव्हते - आभार. मी म्हणते त्या प्रतिभा रानड्यांच्या पुस्तकात उल्लेख तसा होता, पण महाभारताच्या प्रतीत तसे असल्यास माहिती नव्हते.

युगंधर

चाळून पाहिले असता त्यात हे दिसले
नकुलच्या पत्नीचे नाव - करेणूमती
सहदेव - भानुमती - हिला पुत्रप्राप्ती झाली नाही
- तसेच एक जरासंध्य कन्येशी देखिल त्याचा विवाह झाला होता.

पांडव पत्नी - महाभारतातून

आवडाबाई, तुम्ही सांगितलेले नाव योग्य आहे. नकुलपत्नी करेणूमतीच होती. मला शंका होतीच.

असो. पूर्वी जी नावे मला मिळाली ती मद्भागवातातील असून मूळ महाभारतात नावे अशी मिळाली

युधिष्ठिराने देविका या सैव्य जमातीतील गोवसनच्या कन्येशी लग्न केले आणि तिच्यापासून त्याला यौधेय (हाच देवक असावा - देविकापुत्र) हा पुत्र झाला.
भीनाने काशीराजाची कन्या बलंधरा (हीच काली असावी) हीच्याशी लग्न केल्यावर त्याला सर्वगत् हा पुत्र झाला. अर्जुनाला सुभद्रेपासून अभिमन्यू.
नकुलाने चेदी राजकन्या (शिशुपालाची बहिण/मुलगी?) करेणूमती हिच्याशी लग्न केले आणि मुलगा निरामित्र.
सहदेवाने मद्र देशाचा राजा द्युतिमत याची कन्या विजया हीच्याशी स्वयंवरातून लग्न केले आणि त्याला सुहोत्र हा पुत्र होता.

द्रौपदि-सत्यभामा संवाद

द्रौपदी सर्व नवर्‍यांशी प्रामाणीक होती पण त्यातील प्रत्येकाने कमितकमी एक तरी लग्न केले होतेच (प्रियालींनी त्याचे उत्तर दिले आहेच). तरी पण एक गोष्ट होती ती म्हणजे तीचे पाचही नवरे तीचा जास्त मान राखत आणि त्यांचे तिच्यावर जास्त प्रेम होते. तीचे पण त्यांच्यावर प्रेम होते आणि पती-पत्नी नात्यावर विश्वास होता. त्यांच्या सुखदु:खात आणि स्वर्गारोहणापर्यंत केवळ द्रौपदीनेच त्यांना साथ दिली..

सत्यभामा ही कृष्णाची लाडकी पत्नी. तरी पण तीला सतत कृष्णाची काळजी वाटायची! तीचा स्वभाव हट्टी आणि वाईट अर्थाने नसला तरी किंचीत मत्सरी असावा.. तर अशी ही सत्यभामा कृष्णाबरोबर वनवासात असलेल्या पांडवांना भेटायला वनात गेली. तीने तिथे सर्व पांडवांचे द्रौपदीशी असलेले संबंध पाहीले आणि तिच्यातला मत्सर जागृत झाला. आणि द्रौपदीशि खाजगीत बोलत असताना तीने प्रश्न विचारला की माझी एक नवरा सांभाळताना झोप उडते तर तुझे हे पाच पाच नवरे कसे ऐकतात? तुला कुठली चेटूक विद्या अवगत आहे का? त्याचे मला ज्ञाने देशील का? हे ऐकून द्रौपदी खिन्न झाली आणि म्हणाली की असे बोलून तू (सत्यभामा) मला फारच कमी लेखत आहेस आणि दूष्ट प्रवृत्तीची स्त्री समजत आहेस. त्यानंतर नवर्‍याशी पत्नीचे संबंध कसे असावेत यावर तीने सत्यभामेस जे काही सांगीतले ते या दुव्या मधे वाचा. (ते वाचल्यावर डोळ्यात पाणि दाटून आले आणि वाटले की तो काळ आता राहीला नाही...चुकीच्या काळात आम्ही जन्मास आलो! ह. घ्या.)

द्रौपदी ही का पतिव्रता धरली गेली ती लक्षात येईल...

अचूक.


चुकीच्या काळात आम्ही जन्मास आलो!

हे अचूक नाही. ;-)

द्रौपदी सत्यभामेचा संवाद वाचला असता ती पतिव्रता का गणली जाते याचे उदाहरण मिळते. वर एका प्रतिसादात मागाहून त्याची कारणे लिहिण्याबद्दल मी लिहिले होते त्यापेक्षा हा दुवाच उत्तम आहे. धन्यवाद.

व्यासपर्व-दुर्गाबाई भागवत

दुर्गा भागवत, यांचे व्यासपर्व वाचण्यासारखे आहे. 'कामिनी' म्हणून शिर्षक असलेल्या द्रौपदीच्या जीवनाकडे पाहतांना जे विचार दुर्गाबाईंनी मांडले आहेत त्याचे एक स्वतंत्र आणि अतिशय सुंदर प्रकरण आहे. द्रौपदीचा सखा कृष्ण, द्रौपदीचे सौंदर्य, कौरवसभेतील द्रौपदीचे प्रश्न आणि विकर्णाची न्यायाची भुमिका,तिचा गोड आवाज (तिचा आवाज '' विणेवर मधुर आलापात गांधाराची सुंदर सूर लागावा, असेच काही तरी ) कुंतीच्या आज्ञेपेक्षा भावांचा एकोपा मोडेल हाच हेतु ,चोखंदळ बुद्धी आणि प्राकृतिक वासना, प्रिया, सुंदरी,पतिव्रता आणि पंडिता, कर्णावर मन बसल्यामुळे देहपात झाला तरी त्याच कारणामुळे सदेह स्वर्गात जाऊ शकली नाही, असेच काहीतरी आहे.

अवांतर :- आम्हाला आवडलेल्या व्यासपर्वाचा उल्लेख चर्चेत दिसला नाही म्हणून हा प्रपंच ! विषयांतराबद्दल क्षमस्व !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषयांतर नाही

तुमची माहिती विषयाशी सुसंगतच आहे. व्यासपर्वातील टिप्पणी अधिक देता आली तर आभारी असेन.


कर्णावर मन बसल्यामुळे देहपात झाला तरी त्याच कारणामुळे सदेह स्वर्गात जाऊ शकली नाही, असेच काहीतरी आहे.

अर्जुनावर हवे नाही का? ;-) या कर्णाचं काय करावं??? :)))

ऐसपैस च्या प्रतिसादात !

चित्रांजीनी जो मुलाखतीतला भाग मांडलेला आहे, तोच महत्वाचा सारांश वाटतो !

" कारण ती वाह्यात नव्हती. तिचं सगळंच वागणं अत्यंत भारदस्त, तेजस्वी आणि स्वाभिमानी आहे. वावगेपणाअ कुठे कणभरही नाही. पण त्याच वेळी ती कामिनी होती. माझी तर अशी ठाम समजूत आहे की पुरुषाशी अतिशय चांगले संबंध जिला ठेवायचे आहेत त्या बाईमध्ये स्त्रीत्वाचं विशिष्ट आकर्षण असलं पाहिजे. अशी स्त्री अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ असते. पण द्रौपदी फक्त कामिनीच नाही, तर महाभारतामध्ये तिला विदुषी, पंडिता आणि पतिव्रता म्हटलंय. सासूच्या आज्ञेमुळे तिला पाच पांडवांशी लग्न करावं लागलं. त्याबद्दलचे नियम होते, त्यांचं उल्लंघन तिनं कधीही केलं नाही. म्हणजे व्यवहारात ती चुकली नाही."

हा भाग कामिनीचाच असावा असे वाटते , मिळाले पुस्तक तर नक्की इथे टंकेन !

या कर्णाचं काय करावं??? :)))
आमच्यापुढेही तोच प्रश्न आहे !!! :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर

ह्या ईतक्या सुंदर चर्चे मध्ये हा कर्ण् कोठून उपटला ??

कर्णाचं काय करावं??? :)))

काही साटेलोटे होते का ?

महाभारतामध्ये मला आवडलेला व ज्याचा मान राखावे असा हा कर्ण पात्र [नायक - महाभारताचा] .. ह्यांचे ही लफडे असावे ? क्या बात है... आम्ही दुखी: झालो आहोत...

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

कर्णावर मन

कर्णावर मन बसल्यामुळे देहपात झाला तरी त्याच कारणामुळे सदेह स्वर्गात जाऊ शकली नाही, असेच काहीतरी आहे.

कर्णावर नाही (आणि अजानुकर्णावरपण नाही:)). तीचे अर्जुनावर जास्त प्रेम होते असे कारण युधिष्ठीर भिमाला देतो. गांगुलींच्या महाभारत संकेतस्थळावर मला पटकन मिळाले नाही पण या दुव्यावर ते पाहता आले:

"Draupadi had led a virtuous life," replied Yudhishthir, "But she had committed a solitary sin. She was married to us five brothers. She cared equally for us all and showed no partiality in sexual relations. But in the secret of her mind she favoured Arjun more than the rest of us. This was her sin for which she is being denied entry to heaven. But do not worry about her. Continue on your way to eternal bliss."

बाकी व्यासपर्व पुस्तक मला पण आवडले कदाचीत (युगांत पेक्षा) त्याची भाषाही आवडली.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

या कर्णाचे काय करावे? - जांभुळाख्यान

कर्णावर मन बसल्यामुळे देहपात झाला तरी त्याच कारणामुळे सदेह स्वर्गात जाऊ शकली नाही

हे वाक्य पाहून मागे मी चकित झाले होते पण एका मनोगती स्नेह्यांशी बोलताना याचा संदर्भ जांभुळाख्यान या सुप्रसिद्ध लोकनाट्याशी आहे याचा पत्ता लागला. यांत एकदा पांडव घरी नसताना कर्ण त्यांच्याकडे येतो आणि द्रौपदी पाघळते आणि ते कृष्णाला कळतं आणि तो त्याचा छडा लावतो. हे एक अतिशय सुंदर लोकनाट्य गणले जाते.

तरी, व्यासांच्या मूळ महाभारताशी त्याचा काडीमात्र संबंध नाही. महाभारतात असा कोणताही प्रसंग घडलेला नाही.

संदर्भः महाराष्ट्र टाईम्समधील हा लेख.

माहीती

मला वाटतं वरील गोष्ट मी कोठे तरी... कोणाच्या तरी प्रवचनात कानावरुन गेली आहे...
पण तेव्हा कर्ण पांडवांच्या घरी गेला होता पण तो त्या धर्मराजाला भेटायला... महाभारत युध्द होण्याच्या आधी.
व अजून एक कथा आहे, जेव्हा श्री कृष्ण अर्जुनाला कर्णाच्या शक्ती तथा कवच कुंडल ह्यांची माहीती देत होता तेव्हा ती तेथेच होती व कर्णा बद्दल तीने तेजस्वी हा शब्द वापरला होता तेव्हा कृष्ण ने तीला पाच पांडवांची तू पत्नी आहेस हे खडसावून सांगितले होते.

[ही माहीती सध्या अपुर्ण आहे पण शोध करीत आहे लवकरच पुस्तक व संदर्भ येथे देईन]

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

 
^ वर