प्राचीन भारतातील राजे आणि वंश - १
आताच नासदिय सूक्ताबद्दल लिहिताना त्यातील एक पंक्ती आठवली. 'सृष्टी निर्माण झाल्यावरच देव उदय पावले (निर्माण झाले)' अशा आशयाची. त्यावरून काही काळापूर्वी तयार केलेला हा चार्ट आठवला.
आपल्या पुराणांत आणि महाकाव्यांत येणार्या नायकांची/ राजांची अनेकदा वंशावळ दिलेली आढळते. ही वंशावळ कुठून कोठपर्यंत मिळू शकते असा विचार केला असता बराच मोठा काळ पुराणांत नमूद केल्याचे दिसते. प्राचीन भारतातील पहिला सम्राट म्हणून बरेचदा प्राचीनबर्ही किंवा दक्षप्रजापतीचे नाव घेतले जाते, परंतु सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव* असल्याचे सांगितले जाते.
प.वि.वर्तक यांच्या वास्तव रामायणाच्या अनुषंगाने असाच एक चार्ट मी फार पूर्वी बनवला होता परंतु त्याची सुरुवात कश्यप** ऋषींपासून सुरु होऊन महाभारतातील जनमेजयापर्यंत पोहोचत होती. तत्पूर्वी कोणते राजे झाले हे खालील चित्रात दाखवले आहे. मध्यंतरी मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की ध्रुवबाळाची गोष्ट केवळ आख्यायिका आहे की सत्य? आणि सत्य असल्यास तो कोणत्या वंशातील राजा होता. त्याचे उत्तर खालील चित्रात मिळेलच.
चित्राचा पसारा मोठा असल्याने न्याहळाकाच्या चौकटीत ते दिसणे थोडे कठिण होईल. संगणकावर उतरवून घेतल्यास व्यवस्थित पाहता येईल.
* ब्रह्मदेवाला प्रिया नावाची कन्या आणि नारद(मुनी) हे मानसपुत्रही होते.
** दक्ष प्रजापतीच्या १३ मुलींची लग्ने कश्यप ऋषींशी झाली होती, तो आणि पुढील चार्ट पुन्हा कधीतरी.
या अनुषंगाने होणारी चर्चा अपेक्षित आहे. चित्र किंवा माहिती परिपूर्ण असल्याचा दावा नाही. सुचवण्यांच्या प्रतीक्षेत.
संदर्भ : ब्रह्मपुराण आणि श्री मद्भागवत.
Comments
दक्ष
दक्षाला नक्की मुली किती होत्या?
पार्वती सोडली तर बाकीच्यांनी चंद्राला वर म्हणून पसंती दिल्याचे वाचले होते.
पार्वतीने अंगाला भस्म फासणार्या, व्याघ्रजीन नेसणार्या शंकराला वरले म्हणून तीला हसल्या होत्या.
अभिजित...
दक्षाच्या मुली
अनेक असाव्यात आणि त्या अर्थातच एकाच राणीपासून झालेल्या नसाव्यात. ;-)
पण पार्वती दक्षाची मुलगी नाही. दक्षाची मुलगी सती. जिने शंकराला वरले आणि नंतर यज्ञात समर्पण केले. पार्वती ही हिमालयाची मुलगी आणि शंकराची द्वितिय पत्नी. (सोयीसाठी ;-) ??) ती सतीचा पुनर्जन्म असल्याचे सांगितले जाते. तरी, सती आणि पार्वती या दोन्ही शक्तीस्वरुप मानल्या जातात.
सती / उमा
चांगला लेख/कल्पना आहे. अजून माहीती मिळत राहूदेत..
मला वाटते दक्षाची मुलगी सती हीचेच नाव उमा देखील होते. पुर्वीच्या मराठी गाण्यांवरून जायचे असेल आणि कविंच्या पौराणिक ज्ञानावर विश्वास ठेवायचा असेल तर खालील गाणि लक्षात घ्यावी लागतीलः
मानभंग हाची झाला मंडपी आहेर, उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर...
आणि
भस्म विलेपीत रूप साजीरे आणूनीया चिंतनी, अपर्णा तप कारीते काननी
उमा
सतीचे नाव उमा होते असे माझ्या वाचनात आलेले नाही, चू. भू. घे. दे. उमा नावाची शक्तीस्वरूप देवता वेदांत असल्याचे वाचले आहे. उमा, सती आणि पार्वती ही शक्तीची रुपे असल्याने त्यांचा घोळ कवी मंडळींनी व्यवस्थित घालून ठेवलेला आहे. ;-) मात्र, गौरी हे पार्वतीचे नाव.
शिवाय अपर्णा असे पार्वतीलाच म्हणतात
तपाने खंगलेली पार्वती अपर्णा, बाकीच्यांना हे नाव वापरलेले फाससे ऐकण्यात नाही.
बरोबर आहे
उमापण आणि अपर्णा ही पार्वतीचीच नावे असावीत.
कवी राजांनी गोंधळ घातलेला असेल (मात्र उपक्रम/मिसळपाववर्च्या नाही :) ) .
माडगुळकरांनी सतीस उमा म्हणले आहे (त्यांचे वाचन चांगले होते असे त्यांच्या काव्यावरून वाटते). पण भस्म विलेपीत कुणाचे गाणे आहे ते माहीत नाही पण त्यातल्या ओळी आठवून पाहील्यातर "ऑल इन्क्लूझिव्ह" आहेत!
...प्रेमणळ सुंदर हिमनग दुहीता (हिमालयाची मुलगी, पार्वती) हिमाचलावर तप आचरीता...
उमा व अपर्णा
वाचलेले आठवते ते लिहितो आहे -
पार्वतीने शिवाची प्राप्ती करून घेण्यासाठी उग्र तपसाधना केली.
त्यात एक पंचाग्निसाधन म्हणून प्रकारही होता, म्हणजे चारी बाजूंस अग्नी पेटवून वरून तळपते ऊन या सर्वांच्या मध्यभागी उभे राहून तप करणे.
तसेच अन्नाचा संपूर्ण त्याग, पानसुद्धा खायचे नाही असे केले म्हणून ती अपर्णा.
हे अघोरी तपाचरण पाहून कोणीतरी (बहुधा तिची आई) म्हणाले की बाळे, हे/असे (उ - भोजपुरी की काय?) करू नको (मा), म्हणून ती उमा.
"उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर" ही कवीची चूक असावी, उमेचे माहेर कधीच जळाले नाही.
- दिगम्भा
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर
"उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर" हे गाणे (पं. महदेवशास्त्री जोशींच्या कादंबरीवर आधारीत) मानीनी चित्रपटातील आहे. त्याची पूर्वपिठीका ही माहेरच्यांकडून (प्रेम विवाह झालेल्या पण साधा असलेल्या) नवर्याचा अपमान झालेल्या बाईने म्हणलेले गाणे आहे. त्याचा संबंध सतीचा नवरा म्हणजे शंकर याचा अपमान झालेला पाहून सती जीवनाचा त्याग करते त्या प्रसंगाशी लावला आहे. माहेर जळाले असा शब्दशः अर्थ त्यात नाही आहे. पारंपारीक चाल आणि साध्या सोप्या शब्दातले हे गाणे आहे,
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर
माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात
चहू दिशी चालू होते संपदेचे थेर
लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास
लेक पोटीचीही झाली कोपऱ्यात केर
आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी
दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर
दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली
पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर
परत सासुऱ्याशी जाता, तोंड कसे दावू नाथा
बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर
प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास
नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर
असो स्मशानी की रानी, पतीगृही पत्नी राणी
महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर
मानिनी
ही महादेव शास्त्री यांची गोष्ट आहे. कादंबरी नाही. ती आम्हाला १० वीच्या पुस्तकांत होती.
सुभाष
उमा = उ+मा
तुम्ही सांगता तशी व्युत्पत्ती सांगितली जाते.
अमरकोषाच्या रामाश्रमी टीकेच्या अनुसार
उ+मा = उमा
पण अर्थ दोन.
१. उ=महेश, मा=लक्ष्मी
महेशाची जणू लक्ष्मी लागते ती "उमा"
२. (तुम्ही सांगितलेली कथा)
उ=(मराठीत) अग, (किंवा अरे), मा=नको
"अग, नको!" = उमा
पूर्वीच्या पंडितांनाही व्युत्पत्ती समाधानकारक लागू नये, हे बघून मला वाटते की हा शब्द बहुतेक अव्युत्पन्न असावा (देशी=स्वयंभू शब्द असावा.)
(राजांच्या वंशावळीत हे अवांतर वाटते. पण राजांच्या कथांत त्यांच्या बायकांची वगैरे उपकथानके सुरू करण्याचा पुरातन प्रघात आहे.)
उमा=उ+मा= अहो, नको!
अहो, नको(=उमा) म्हणजेच, याला अवांतर म्हणू नका. :) असे शब्द, पुरातन नावे, त्यांचे अर्थ, आख्यायिका, व्युत्पत्ती हे सर्व येथे व्हावे.
वैदिककालीन नावं ठेवायची जाम फॅशन असते. निदान लोकांना आपली नावे, त्यांच्या व्युत्पत्ती कळल्या तर उत्तमच आहे.
अवांतरः मारिषा हे नाव मी अनेक पाश्चात्त्यांत ऐकलेले आहे. काही तर्कट मांडत नाही :) फक्त आठवले.
मरिषा
अवांतरः मारिषा हे नाव मी अनेक पाश्चात्त्यांत ऐकलेले आहे.
ही आताची मारिषा :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
आताची मारिषा
मारिषा पेस्ल आवडली.--वाचक्नवी
उमा
उ मेति मात्रा तपसो निषिद्धा पश्चादुमाख्यां सुमुखी जगाम । --कुमारसंभव १.२६.
मातेने 'तप गे ! नको करुं !' 'उ मा'या शब्दिं जैं वारिली ।
तैं तीतें पदवी 'उमा' अशि भली मागाहुनी लाभली! ॥-- रामचन्द चिन्तामण श्रीखंडेकृत समश्लोकी कुमारसंभव .
भोजपुरीतच नव्हे तर, संस्कृतमध्येसुद्धा 'उ ' हे अव्यय संबोधनार्थ वापरतात हे कालिदासाच्या वरील उक्तीवरून दिसते आहे. मला वाटते की 'किमु', 'अथो', 'नो' या शब्दांतले अन्त्यपद 'उ' आहे. (चू.भू.द्या.घ्या.)--वाचक्नवी
हे कोठून आले?
विवस्वत(सूर्य) वंश
१.मनू यम यमी
२. इक्ष्वाकू
३.विकुक्षी
६.पृथू
३३. हरिश्चंद्र
४१. सगर
६२. रघू
६५. राम
९४. बृहद्बल
चंद्र वंश
२. इला भ्र. बुध
३. पुरुरवा
६. ययाति
७. पुरु
४३.भरत
५१. हस्तिन
७१. कुरू
९४. पांडव
ही वंशावळ इतरत्र पाहिली. (विस्ताराने नंतर.):)
वर दर्शवलेली ब्रह्मदेवाची वंशावळ कुठे मिळाली?
हे सर्व नंतर
हे सर्व वैवस्वत मनू नंतर. किंवा कश्यप पुत्रांनंतर, तो संपूर्ण वेगळा चार्ट होईल. एकत्र देणे शक्य नाही. ती पूर्ण लिश्ट तयार आहे पण चार्ट बनवायला वेळ लागतो. :(
ही माहिती ब्रह्मपुराण आणि मद्भागवतात मिळाली.
यम यमी?
वैवस्वत मनूच्या पुढे यम, यमी का लिहिले आहे? ते दोघे आणि इक्ष्वाकू भावंडे. त्यांतली यम आणि यमी ही जुळी .--वाचक्नवी
यम आणि यमी
माझ्या माहितीप्रमाणे यमी/ यमुना ही वैवस्वत मनूची भावंडे. विसुनानांचे म्हणणे बरोबर आहे.
छान
वंशावळ मनोरंजक आहे. याचा साधारण काळ कळू शकेल का?
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
काळाचे गणित
माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. परंतु काही तज्ञांच्या मते साडे सात हजार वर्षे रामायण काळ धरला तर त्यापूर्वीचा हा काळ खचितच. काळाचे गणित कोणी मांडून दिले तर मीही आभारी असेन.
काळ
अजुन शिवाजी महाराजांचा जन्मकाळ नीट सांगता आला नाही १६२७ ते १६३० तिथ इतक्या मागच कस सांगणार. तरी अंदजे बीसी साडेसात ते दहा हजार वर्ष. तज्ञांचे मतभेद आहेत. मतभेद नसतील तर तज्ञ कसे?
प्रकाश घाटपांडे
दोन दक्ष?
दक्षाच्या २७ मुलींचा उल्लेख दोनदा का आहे? का हे दोन दक्ष वेगळे आहेत?
दोन दक्ष नाही
सोम कोणता आणि कोणत्या सोमाशी लग्न झाले ते दाखवण्याकरता.
वंशवृक्ष
प्रियालींनी दिलेला वंशवृक्ष संगणकावर अन्यत्र उतरवून घेऊन मोठा करून पाहिला तरी नीट वाचता येत नाही.
त्यातली नावे निळ्या रंगात नसती तर कदाचित अधिक वाचनीय झाला असता. तरीसुद्धा भिंग वापरून जेवढे
वाचता आले त्यावर ज्या शंका आल्या त्यातल्या काही अशा:
माझ्या आत्तापर्य़ंतच्या माहितीनुसार मरीची, अंगीरस वगैरे सात ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते.
वंशवृक्षावरून तसे वाटत नाही.
स्वायंभुव मनु हा शतरूपा या ब्रह्मदेवाच्या मानसकन्येचा नवरा. इथे तो मुलगा आहे अशा रीतीने दाखवला आहे.
सनत्कुमार हाही मानसपुत्र, पण रुद्र इथे कुठून आला? का माझ्या वाचनात काही चूक होते आहे?
उत्तानपाद राजाच्या भावाचे नाव प्रियव्रत होते असे वाचले होते, प्रियवर्त नाव अर्थहीन वाटते. दुसर्या भावाचे
नाव नीट वाचता आले नाही. ध्रुव आणि प्राचीनबर्ही यांच्या दरम्यान अनेक राजे होऊन गेले होते ते तुटक रेषेने
दाखवले हे योग्यच झाले; पण प्राचीनबर्हीच्या पित्याचे हविर्धान हे नाव द्यायला हरकत नव्हती.
प्रचेतस(या नावाच्या दहा मुलां )च्या आईचे नाव शतद्रु किंवा सवर्णा. त्यांच्या पत्नीचे नाव मारिषा. हे नाव
मारिशासारखे दिसते आहे. मारिष म्हणजे श्रेष्ठ किंवा तांदुळजा(एक पालेभाजी). मारिश किंवा मारिशा अर्थहीन.
नक्की काय लिहिले आहे ते वाचता आले नाही. लाल बाणाच्या पूर्वीचा मजकूर दहा मुलगे होते, ते राजकारभार सोडून
तप करायला गेले आ...असा काहीसा दिसतो आहे.
हा वंशवृक्ष नक्कल-चिकटव न करता पुनरालेखन करून दिल्यास डोळे न ताणता वाचता येईल.
बाकी या निमित्ताने पार विस्मरणात गेलेला इतिहास परत वाचायला मिळतो आहे हे काय थोडे आहे? --वाचक्नवी
रिझोल्यूशनचा प्रश्न/ रुद्र/ मनु-शतरुपा
हे असे का व्हावे याबद्दल कोणी तज्ज्ञच उत्तर देऊ शकतील. माझ्याकडील मूळ चित्र उत्तम रिझोल्यूशनचे आहे. ते उतरवून घेताना असे का होते याबद्दल मी अनभिज्ञ आहे. चित्रातील नावे निळ्या रंगाची नसून पार्श्वभूमी निळी आहे आणि त्याने फार मोठा फरक पडत असावा असे वाटत नाही. ही फाईल काहीजणांना इमेलने पाठवली होती. त्यांना ही नावे व्यवस्थित दिसत आहेत.
मारिशाचा श पोटफोड्या येतो का हा प्रश्न होताच, त्याचे निराकरण केल्याबद्दल धन्यवाद. मला इंग्रजीतून योग्य शुद्धलेखनात भाषांतर सहसा जमत नाही. प्रियवर्त मात्र माझी टायपो किंवा निष्काळजीपणा ते प्रियव्रतच हवे. या चुका अर्थातच सुधारते. उत्तानपादाच्या तिसर्या भावाचे नाव वीर.
रुद्र हा ब्रह्मदेवाचाच मानसपुत्र असल्याचे वाचले आहे. ब्रह्मदेवाने मनुष्यजात वृद्धिंगत व्हावी म्हणून सप्त-ऋषींची निर्मिती केली. परंतु हे सर्व मानसपुत्र संसार आणि प्रपंचात मग्न होण्याऐवजी भक्तीत मग्न होते. यामुळे एकदा ब्रह्मदेव प्रचंड रागावले आणि त्यांच्या रागातून अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्रीरुप असलेल्या रुद्राची निर्मिती झाली. रुद्रावर यापूर्वीही चर्चा झाली होतीच. त्यावरून तो शिवस्वरुप आहे हे नक्कीच. ब्रह्मपुराण आणि पद्मपुराण या दोहोंतही तसे संदर्भ सापडले.
दक्षाला अजूनही अनेक कन्या आहेत. त्यांचे सर्वांचे संदर्भ चित्रातून देणे अशक्य. मला महत्त्वाचे वाटणारे संदर्भ येथे दिले आहेत. इतरांना जर महत्त्वाचे वाटले तर मूळ चार्टमध्ये सुधारणा करता येईलच.
तसेच, शतरूपा आणि स्वयंभू मनु हे दोघेही ब्रह्माची निर्मिती (त्यांना बहिण-भाऊ मानता येत नाही.) ते एकमेकांना पूरक असावेत म्हणूनच ही निर्मिती केली गेली होती.
अवांतरः माझ्या जवळील फाईल सुमारे ५५० केबीची असून ती फ्लीकरवर चढवली आहे. ती तेथून उतरवली असता केवळ ९४ केबीची बनते आणि चित्राचे रुप पालटते. हे सुधारण्याकरता कोणाकडे काही क्लृप्ती आहे काय?
मारिषा
ही मारिषा कंडु नावाच्या ब्रह्मर्षीची कन्या. हिची आई प्रम्लोचा ही अप्सरा. (प्रियालींच्या 'अप्सरा'त उम्लोचा नाव असल्याचे आठवते, प्रम्लोचा नसावे, तसेच उर्वशी होते पण उर्वरा नव्हते!). मारिषाचे माहेरचे नाव वार्क्षी.--वाचक्नवी
कंडु- प्रम्लोचा आणि मारिषा
हे मारिषाचे आईवडिल. कंडु ऋषींचा आश्रम गोदावरी काठी होता. त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने प्रम्लोचेला पाठवले. तिने कंडुंची तपस्या भंग करून त्यांच्याशी लग्न केले. पुढे कंडुंना सत्य परिस्थितीची जाणीव झाल्यावर ते प्रायश्चित्त घेण्यास निघून गेले आणि प्रम्लोचा स्वर्गात परतली अशी गोष्ट आहे.
यावरून मारिषा ही आद्य मराठी स्त्री होती असे म्हणता यावे - ह. घ्या.
आता पुढे पाहिले तर जेव्हा प्रचेतस तप करण्यासाठी गेला तेव्हा पृथ्वी सांभाळणारे कोणीही उरले नाही. झाडांनी पृथ्वीचा ताबा घेतला. हे लक्षात आल्यावर प्रचेतसने क्रोधित होऊन सर्व झाडांचा विनाश करण्याचे ठरवले. तेव्हा झांडाचा पोषणकर्ता सोम (चंद्रदेव) याने येऊन रदबदली केली आणि प्रचेतसाचा राग शांत व्हावा त्याचे लक्ष हटावे म्हणून त्याचे लग्न मारिषाशी लावून दिले.
ब्रम्हदेवची मुलगी
मला वाटते, अहील्यापण ब्रम्हदेवाचीच मुलगी होती. म्हणून (आणि तीच्या सौंदर्यामुळे) ती इंद्राला पत्नी म्हणून हवी होती.
अहल्या
अहल्या(अहिल्या नाही) ही ब्रह्मदेवाची मानलेली कन्या. तिचे खरे वडील मुद्गलपुत्र वध्र्यश्व. आईचे नाव मेनका. ही मेनका अप्सरा नव्हती. --वाचक्नवी
आता महत्वाच्या कथांचा/घटनांच्या लेखनाचा उपक्रम सुरु करावा.
वा उत्तम विषय!
अतिशय मनोरंजक असा इतिहास डोळ्या समोर उलगडला.
अनेक कथा सापडल्या... पण अर्धवटच :(
प्रियालीताईंनी हा झकासच प्रकल्प सुरु केला आहे.
या निमित्ताने वाचक्नवी यांची इतिहासातली रूची व ज्ञान परत दिसून आले आहे.
विकास, धनंजय व इतर माहितगार मंडळी हे ही यात भर घालतील अशी अपेक्षा आहे.
मी परत एकदा आपले वाचक्नवी व इतर सर्व यांना आवाहन करतो की त्यांनी
या चार्ट ला धरून
त्या त्या राजांच्या/ऋषींच्या/कालखंडातल्या महत्वाच्या कथांचा/घटनांच्या लेखनाचा उपक्रम सुरु करावा.
या लेखनाने आमच्या सारख्या 'इतिहास दरिद्री' लोकांचे अज्ञान
दूर होवून आम्हालाही हा इतिहासाचा हा श्रीमंत वारसा लाभेल.
आपला
इतिहास दरिद्री
गुंडोपंत
तेच म्हणतो
पंत म्हणतात तसे आम्हाला सुद्धा पुराण, भागवत वगैरे वैदिक इतिहासाबद्दल प्रचंड अज्ञान आहे.
बाकी पंतांच्या म्हणण्याची कॉपी केल्याशिवाय राहवत नाही... (पंतांची माफी मागून)
वा उत्तम विषय!
अतिशय मनोरंजक असा इतिहास डोळ्या समोर उलगडला.
अनेक कथा सापडल्या... पण अर्धवटच :(
प्रियालीताईंनी हा झकासच प्रकल्प सुरु केला आहे.
या निमित्ताने वाचक्नवी यांची इतिहासातली रूची व ज्ञान परत दिसून आले आहे.
विकास, धनंजय व इतर माहितगार मंडळी हे ही यात भर घालतील अशी अपेक्षा आहे.
मी परत एकदा आपले वाचक्नवी व इतर सर्व यांना आवाहन करतो की त्यांनी
या चार्ट ला धरून
त्या त्या राजांच्या/ऋषींच्या/कालखंडातल्या महत्वाच्या कथांचा/घटनांच्या लेखनाचा उपक्रम सुरु करावा.
या लेखनाने आमच्या सारख्या 'इतिहास दरिद्री' लोकांचे अज्ञान
दूर होवून आम्हालाही हा इतिहासाचा हा श्रीमंत वारसा लाभेल.
आपला
इतिहास दरिद्री
भास्कर
आम्ही येथे वसतो.
महाजनपदापर्यंत येणार का ही वंशावळ !
आम्हाला सुद्धा पुराण, भागवत वगैरे वैदिक इतिहासाबद्दल प्रचंड अज्ञान आहे.
बाकी मस्त विषय आहे. आम्ही या बाबतीत इतिहास संस्कृतीची, दोन-चार पुस्तके चाळून पाहिली. पण, वंशावळीतील एकही नाव मॅच होईना, मग दिला प्रयत्न सोडून. पुढे ही वंशावळ मौर्य साम्राज्य स्थापणेच्या पुर्वी उत्तर भारतात छोटी- छोटी राज्य होती तिथपर्यंत येणार का ? आणि एक विचारायचे होते, ते असे की, रामायण, महाभारतात महाजनपदांची नावे, राज्यांची नावे आलेली आहेत त्याचा आणि आपण दिलेल्या वंशावळीचा काही संबध आहे का ? का आम्ही सांगतोय त्याचा आणि या विषयाचा काही संबध नाही.
तशी आली तर
उत्तमच होईल. पूर्वी वाचलेल्या काही संदर्भांनुसार ती करता यावी. अर्थात, प्रयत्न बरेच लागतील. या पुढील यादीवर काम करणे मी अद्याप सुरु केलेले नाही. पुढील महिन्यात ते करता येईल.
सर्वच नाही परंतु काही वंशावळींचे संबंध लावता येतात. परंतु हे माझ्याकडील माहितीप्रमाणे. अशी माहिती आपल्यापैकी अनेकांकडे असेल, ती जोडून एक सलग काम पूर्ण करता आले तर आनंदच आहे.
अवांतरः
असे नेहमीच शंकाग्रस्त का असता बॉ तुम्ही. तुमचं म्हणणं आणि प्रतिसाद अगदी योग्य असाच आहे.
महाजनपद ही घ्या काही नावे .
अंग. काशी. कोसल. वृज्जी महाजनपद-( यांचेही आठकुळे -वृज्जी,विदेह,लिच्छवी,ज्ञातृक,उग्र,भोग ऐच्श्वाव ) चेदी. वत्स.मत्स(मात्स्य). अवंती. मल्ल. कुरु.पांचाळ. अश्मक. गांधार. शूरसेन. कंबोज. मगध.
आणि मग पुढे १) ब्रहद्रथ वंश. २) हर्षक वंश. ३) शिशूनाग वंश.४)नंद वंश. ५) मौर्य वंश.
संदर्भ :- भारताचा इतिहास व संस्कृती ( इ.स.६५० पर्यंत ) डॉ. एस.एस. गाठाळ. प्रपाठक, इतिहास विभागप्रमुख.स्वा.रा.ती.म. अंबाजोगाई. पृ.क्र. १२४ ते १३१
( नावे आणि इतिहास तपासून घ्याव्या )
१६ महाजनपदे
बिरुटेसर,
तुमची माहिती योग्य आहे. १६ प्रमुख महाजनपदे होती. बघा तुम्ही १६च दिली आहेत. ही महाजनपदे म्हणजे आख्यायिका नाहीत, तो आपला इतिहास आहे. कुरु महाजनपदावर कधीतरी स्वतंत्र लेख लिहायचे मनात होते. या प्रत्येक जनपदावर लेख लिहिता येईल.
ही नावे येथे दिल्याबद्दल धन्यवाद. यांची जोडणी होऊ शकते का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
कटकटीचे
कटकटीचे काम दिसते. वंशवृक्ष करण्याची कल्पना चांगली आहे.
कटकटीचे आहे खरे - सुधारीत आवृत्ती
वंशावळ करायला वेळ लागत नाही त्याच्या चौपट वेळ त्याची इमेज करणे, रिझोल्यूशन राखणे याला वेळ लागतो.
हा फोटो पिकासावर चढवला आहे. त्यावर टिचकी मारली असता मोठा (झूम) करून पाहता येईल.
चांगला दिसतो आहे.
फोटो आता नीट दिसला.
मलासुद्धा
मलापण! पिकासावर वंशवृक्ष छान दिसला आणि त्यातली नावे व्यवस्थित वाचता आली. -वाचक्नवी
फोटोशॉप आहे का?
फोटोशॉप आहे का?
त्यात वाढू शकेल
आपला
गुंडोपंत
महत्त्वाचे म्हणजे -
इतिहास आणि पुराणे यांची सांगड घालून ब्रह्मदेवाचा काल ठरवता येईल का?
आपल्या सखोल संशोधनाबद्दल नवल वाटले.
प्रचेतस
प्रचेतस (की प्रचेतास्) हे नाव बंगाल भागात बरेच् आठळून येते.. तुम्ही तक्त्यात म्ह्टल्याप्रमाणे हे नाव आहे की पदवी आणि त्याचा अर्थ काय?
प्रचेतस
मी ऐकलेला उच्चार प्रचेतस पण शाश्वती नाही. असे १० मुलगे (प्रत्येकाचे नाव प्रचेतसच कसे असेल? तेव्हा ती पदवी असावी.) असल्याचे वाचले आहे. पैकी एक पुढे गादीवर बसला असावा.
प्रचेतसचा अर्थ बाकी मला माहित नाही, मलाही उत्सुकता आहे. इतर जाणकार मदत करतीलच. :)
माझ्या माहितीप्रमाणे
इतकी छान चर्चा चालू आहे म्हणून काहि माहिती आणखि प्रश्न :)
माझ्या माहितीप्रमाणे मनुला केवळ् दोन मुलगे (उत्तानपद आणि प्रियवर्त)होते आणि तीन मुली होत्या (आहुती, आरुशी आणि प्रसुती). आहुतीने ऋषी रुची, आरुशिने ऋषी च्यवन यांच्याशी विवाह केला तर प्रसुतीला तिचा भाऊ उत्तानपद याच्या मुलाबरोबर संग करायला लाऊन (की विवाह झाला? मला कल्पना नाही) वंश वाढवायचा ठरले. त्यांना प्राचिनवर्हि झाला. त्याने सागराची (समुद्र) मुलगी सवर्णा हिच्याबरोबर लग्न केले. त्यांना एकावेळी दहा मुले झाली (काही कथांच्या मते १० झरे( / नद्या )फुटले आणि प्रत्येक झरा म्हणजे एक मुल होतं) त्यांची सगळ्यांची मिळून एक पत्नी होती मरिषा (बहुपतित्वाची ही हिंदू पुराणातील पहिली कथा).
तर ह्या प्रचेतासांनी दहा हजार वर्षे पाण्याखाली उग्रतप करून विष्णूस प्रसन्न करून घेतलं व विष्णूने तुमचा मुलगा ब्रह्मासारखा विश्वनिर्मिता होइल असा वर दिला. हे प्रचेतास पाण्याबाहेर आले तोपर्यंत "अरण्याने" मरिषाचे पालनेपोषण केले होते. ते १० जणांना आपली मुलगी द्यायला तयार होइनात तेव्हा प्रचेतास क्रोधीत झाले आणी त्यांनी आपल्या डोळ्यातील अग्निने अरण्य जाळायला सुरवात केली. पृथ्वीवरील धोका ओळखून ब्रह्मा प्रकट झाला आणि अरण्याला त्याने सांगितले की तु मरिषाचा पालक आहेस. लग्नानंतर ती नवर्याकडेच जाईल तेव्हा तीला सन्मानाने जाऊदे.
पुढे या प्रचेतास-मरिषाला दक्ष झाला. विष्णूच्या वराप्रमाणे हा ब्रह्माच् होता (त्याचा अंगठा) फक्त शापामुळे त्याने मनुष्यजन्म घेतला होता. पुढे प्रचेतास यांनी कारभार मुलाकडे सोपवून सन्यास घेतला
आता प्रश्न:
१) वीर कोण? आणि त्याची कथा काय?
२) ध्रुव कोण? त्याचीही कथा काय? (द्रुव उत्तनपदाचा मुलगाच होता का? मग उत्तानपदाची पत्नी कोण?)
उत्तानपाद - ध्रुव
अढळपद मिळवणारा ध्रुवबाळ हाच उत्तानपादाचा पुत्र ध्रुव आणि उत्तानपादाला दोन पत्नी नाही का? एक आवडती एक नावडती. :) एक सुरुची आणि दुसरी सुनीती. मला यांची पुराणांत माहिती नाही मिळाली अद्याप. ही आपली बालकथा.
वीर?
ध्रुव कोण ते खाली आलेच आहे. वीर हे नाव यापूर्वी कधी उत्तानपादाच्या कथेत वाचलेले आठवत नाही. पण असिक्नी या दक्षाच्या बायकोच्या वडिलांचे नाव वीरण होते. म्हणून असिक्नीचे लग्नापूर्वीचे नाव वीरिणी होते. --वाचक्नवी
प्रचेतस्
प्रत्येक नावाला अर्थ असतोच, निदान तो असावा अशी अपेक्षा असते. प्रचेतस् म्हणजे सुखी, आनंदी. चतुर, शहाणा(महाभारत ३.२००.१४),
चांगल्या अन्त:करणाचा. अरुण. पहा: किं चायमरिदुर्वार: पाणौ पाश: प्रचेतस: । मंत्रेण हतवीर्यस्य फणिनो दैन्यमाश्रित: ॥--कुमारसंभव २.२१.
हा धरी वरुण जो स्वहस्तकीं । मूळचा अरिगणां अभेद्य की । पाश दीन दिसतो असा कसा । मंत्ररुद्ध हतवीर्य सर्पसा ॥--रा.चिं. श्रीखंडे.
----वाचक्नवी
दक्षाच्या बायका
आणि एक राहिलच् .... अक्षाला तीन बायका होत्या ना (पंचजनी, विराणपुत्री अक्सिली, आणि मनु-शत्रुप पुत्री प्रसुती )आणि दिती अदिती वगैरे १३ जणी (अदिती (देवगणाची माता), दिति (हिरण्यकश्यपू -- हिरण्याक्षाची माता), दनु(दानवगणाची माता), अरिष्टा, सुरसा, सुरभी, विनता(पक्षीगणाची [गरुड-जटायु] माता), तांम्रा(प्राणीगणाची माता), क्रोधवशा, इरा (की तुम्ही लिहिल्याप्रमाणे इला?), कद्रु, विष्वा (की तुम्ही लिहिल्याप्रमाणे खसा?)आणि मुनी) या दक्ष-अक्सिलीच्या नसून दक्ष-प्रसुतीच्या आहेत असं वाचल्याचं आठवतय.
प्रश्नः
१. पंचजनीपासून पुढे कोण झालं?
२. प्रसुतिला बर्याच मुली झाल्या त्यातल्या ह्या १३ जणींनी कश्यपाशी विवाह केला हे विधान बरोबर आहे का तिला १३च् मुली होत्या?