आमचे पूर्वज महान होते
बाजूच्या एका चर्चेत काही सदस्यांचे प्रतिसाद नुकतेच वाचले. त्यात श्री. धम्मकलाडू म्हणतात -
अजूनही काही नव-पुराणमतवादी "आपली भारतीय संस्कृती किती थोर" ह्या रम्य देखाव्याच्या निर्मितीसाठी प्राचीन ग्रंथांतल्या सोयीच्या ओळींची मदत घेत असतात.
आमची भारतीय संस्कृती थोर आहेच आणि आमचे पूर्वजही महान होते, त्याबद्दल आपल्या सर्वांचे एकमत असते. फक्त ते सिद्ध करण्याचे प्रयत्न निरनिराळे असतात. दरवेळेस गंभीर चर्चा करण्यापेक्षा या सर्व यंव-त्यंव मतवाद्यांपासून फारकत घेऊन आज पुराणातील एक गोष्ट इथे देते. केवळ एक गंमत म्हणून पण तरीही गोष्ट वाचल्यावर आपले पूर्वज महान होते याची प्रचीती यावी.
इंद्राने वृत्रासुराचा पराभव केल्यावर आपल्या पराक्रमावर तो प्रचंड खूश झाला. हा विजय साजरा करण्यासाठी किंवा आठवणीत ठेवण्यासाठी त्याने स्वतःसाठी एका प्रासादाची निर्मिती करण्याचे ठरवले. तो महाल बांधण्यासाठी त्याने अर्थातच देवांचा आर्किटेक्ट विश्वकर्म्याला पाचारण केले. विश्वकर्मा आल्यावर इंद्राने त्याला आपल्या सर्व रिक्वायरमेंटस सांगितल्या. वर एक डेड लाईनही दिली. विश्वकर्म्याने एक डिझाईन तयार केले आणि इंद्राचे ऍप्रूवल घेतले आणि लगेच कामाला सुरुवात केली.
इंद्राला प्रासादाचे हे नवे प्रोजेक्ट कसे आकार घेत आहे हे जाणून घेण्याची भारी उत्सुकता होती. आठवड्याभराने त्याने साईटवर चक्कर मारली. विश्वकर्म्यानेही मोठ्या उत्साहाने त्याला प्रोग्रेस दाखवला. तो पाहून इंद्राच्या कपाळावर आठ्या पडल्या, म्हणाला 'यांत आणखी सुधारणा हवी. अमुक सुविधा हव्यात.' देवांच्या राजासमोर आणि आपल्या क्लायंटसमोर विश्वकर्म्याने मान तुकवली. वेळ वाढवून दे - सर्व सोयी सुविधा उपलब्ध करतो असे सांगितले. इंद्र खूश झाला, थोडी मुदत वाढवून दिली. डिझाईन बदलले, डेवलपमेंट बदलली.
त्यानंतर इंद्र आला पुढच्या आठवड्यात. पुन्हा बांधकाम बघून त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. म्हणाला - आणखी सुधारणा हवी. थोडा वेळ वाढवून देतो. विश्वकर्म्याने मान तुकवली. पुन्हा डिझाईन बदलले, डेवलपमेंट बदलली.
इंद्र पुन्हा आला - पुढच्या आठवड्यात. आधीप्रमाणेच बांधकाम बघून त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. म्हणाला - आणखी सुधारणा हवी. थोडा वेळ वाढवून देतो. विश्वकर्म्याने मान तुकवली. पुन्हा तेच - डिझाईन, डेवलपमेंट बदलले.
दर आठवड्याला हाच प्रकार. शेवटी विश्वकर्म्याची सहनशक्ती संपली. त्याने सरळ ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि म्हणाला, "वाचवा या इंद्रापासून." ब्रह्मदेवाने विचारले 'काय झाले?' त्यासरशी वैतागलेला विश्वकर्मा म्हणाला, "काय करू? या इंद्रदेवाचा प्रोजेक्ट स्कोप दर आठवड्याला वाढतच चालला आहे. हे घाल, ते वाढव, ते बांध, हे तोड... संपतच नाही. आता तुम्हीच सांगा - तोही अमर आणि मीही अमर अशाने प्रोजेक्ट संपायचे कसे? "
निवेदनः
१. कृपया ही गोष्ट किती हजार वर्षांपूर्वीची ते विचारू नये. ही गोष्ट आजच्या जीवनात लागू आहे का हे विचारता येईल. मला वाटते हो आहे. तो अमरत्वाचा भाग सोडून आणि तो लागू नाही म्हणून मी सध्या विश्वकर्म्यापेक्षा जास्त वैतागलेली असले तरीही कोठेतरी निर्धास्त आहे.
२. ही गोष्ट उपनिषदांमध्ये कोठेतरी येते. (कोठे ते नेमके माहित नाही.) मला मिळाली ती जोसेफ कॅम्पबेल यांच्या एका मुलाखतीत. दुय्यम स्रोत वापरल्याचा दोष मला मान्य आहे असे आधीच सांगून टाकते.
३. वरील गोष्ट सांगताना थोडा मीठ-मसाला लावलेला आहे. त्याबद्दल कृपया आक्षेप घेऊ नये. असे मीठ-मसाले लावणार्यांची यादी हजारो वर्षांची आहे. माझी त्यात अर्धी चिमूट.
असो.
आमचे पूर्वज महान होते हे दाखवून देण्याचे एक ढळढळीत उदाहरण इथे दिलेले आहे कारण जे आम्ही प्रोजेक्ट प्ल्यानिंग वगैरेच्या नावाखाली आज करतो आणि त्याची येथेच्छ वाट लावतो ते आमचे पूर्वज हजारोवर्षांपूर्वीही करत होते. तुमच्याकडे अशी उदाहरणे असतील तर द्या बघू.
Comments
हे हे ..
छान मनोरंजन आहे.
परन्तु इंद्र वगैरे आपले पुर्वज असावेत असं आपल्याला का बरे वाटते ? एक तर ती लोकं अमर-बीमर होती,आणि त्याकाळात पृथ्वीवर माणसे पण होती.
असो , पाण्डवांचे ते पूर्वज असावेत म्हणूण की काय तुम्हाला ते आपले पुर्वज असावेत असा वाटलं असेल.
आणि प्रियाली ताई, इन-हाऊस प्रोजेक्ट मधे हे चालायचचं. सहा महिन्यात टीम मेंबर रिलीज घेतातच. विश्वकर्म्याने जर पेपर टाकले (रिझाइन केले) असते तर
इन्द्राचा प्रोजेक्ट थोडा अवाक्यात आला असता(घाबरुन का होइना).
आमचे पूर्वजच आहेत
जे कोणी आमच्या पुराणांत आहेत ते सर्व देव, मनुष्य, सर्प, राक्षस आणि पिशाच्चे आमचे पूर्वज आहेत. आपले नसतील तर नसोत बापडे. ;-) यापुढे जाऊन, मुघल सम्राट शहाजाहान, जहांगिर आणि दुर्दैवाने औरंगझेब आमचे पूर्वज आहेत असे कोणी म्हणत असेल तरी मला प्रत्यवाय नाही.
प्रोजेक्टची गरज विश्वकर्म्याला असते. इंद्र पैसे फेकून असे ५६ विश्वकर्मे तयार करू शकतो आणि विश्वकर्मा रिझाईन करून जाईल कुठे? दुसरीकडे त्याला असे इंद्र आहेतच भेटायला.
पुर्वज
सगळ्या "पुर्वीच्या लोकांना " पुर्वज म्हणतात हे आज कळाले. धन्यवाद. आइन्स्टाइन सुद्धा माझा(आपला) पुर्वज का हो ?
प्रोजेक्टची गरज विश्वकर्म्याला असते. इंद्र पैसे फेकून असे ५६ विश्वकर्मे तयार करू शकतो आणि विश्वकर्मा रिझाईन करून जाईल कुठे?
दुसरीकडे त्याला असे इंद्र आहेतच भेटायला
आपले पुर्वज (इथे इंद्र ) किती महान होते हे कळत आहे . माझा क्लाएन्ट मैनेजर अगदी असाच आहे. मला स्वतःहाला विश्वकर्म्याची जागा
घेताना अक्षरः रडु आले .
आईनस्टाईन कुठे मध्येच कडमडला
आईनस्टाईन आईनगुरु, आयनेश्वर, आईनदेव किंवा तत्सम नावाने पुराणांत येत असेल किंवा किमानपक्षी भारतीय इतिहासात येत असेल तर त्याला आपला पूर्वज मानता येईल. तो तसा येत नसेल तरीही मानावयास हरकत नाही. आपापली मर्जी आहे. शेवटी, माया संस्कृती भारतीय आहेच की नाही? आणि ऍझटेक हे आस्तिक ऋषींचे वंशज. तसाच आईनस्टाईन आपला पूर्वज असू शकेल.
कदाचित, आपल्या कोणा पूर्वजांकडूनच किंवा भारतीय ग्रंथांतूनच आईनस्टाईन E = mc2 हे समीकरण शिकला असावा.
९ वी च्या इतिहासाच्या पुस्तकात ...
आमच्या ९ वी चा इतिहासाच्या पुस्तकात तर होता बुआ हा माणुस. तुमच्या पुस्तकांत बहुतेक इंद्र असावेत (smile).
मधल्या काळात (between) तुम्ही मला पुर्वजांची व्याख्या सांगाल काय ?
पूर्वज कोण म्हणूनी काय पुसता?
ही घ्या व्याख्या - जे जे माझ्या देशातील (परदेशातीलही चालतील), माझ्या धर्मातील (परधर्मातीलही चालतील), माझ्या संस्कृतीतील (इतर संस्कृतींतील कदाचित चालणार नाहीत - आईनगुरु चालेल. आईनस्टाईन नाही. या हिशेबाने अजून काही वर्षांनी सोनीया गांधीही आपल्या पूर्वज ठरतील. क्वात्रोची नाही.) आणि माझी मर्जी असल्यास मला जे वाटतील ते ते - माझ्या आधी जन्माला आलेले सर्व पूर्वज.
माझ्या पुस्तकांत धर्मेंद्र आणि जीतेंद्रही होते. एनी प्रॉब्लेम्स? :-)
मोठा भाऊ ?
काय हो तुमचा मोठा भाऊ तुमचा पुर्वज का ?
आणि प्रोब्लेम वगैरे काहि नही. उपक्रमावर ब-याच नविन गोष्टी शिकायला मिळतात असं ऐकल होतं. आणि इंद्र वगैरे पुर्वज असावेत असं
वाटला नाही म्हणून फक्त हो.
चु.भु.दे.घे.
प्रति: मोठा भाऊ ?
मोठ्या भावाला अग्रज म्हणतात.
पण, 'ज' हे suffix जन्माविषयी आहे. देव वास्तवात अस्तित्वात नव्हते. त्यामुळे त्यांना पूर्वज म्हणणे चूक आहेच.
देव अस्तित्वात नव्हते(?)
देव अस्तित्वात नव्हते हे विधान नेमक्या कोणत्या पुराव्यांनिशी केलेले आहे ते कळेल का?
इंद्र, विष्णू आणि कश्यप- अदितीची इतर मुले ज्यांना देव असे संबोधले जाते ते अस्तित्वात नव्हतेच असे सांगणारे पुरावे दिल्यास वाचायला आवडेल.
रसेलची किटली
देवाच्या व्याख्येत अमरत्वाचा गुणधर्म तुम्ही नमूद केला आहे. त्यामुळे माझी सोय झाली.
सुभाषचंद्र बोस, परशुराम, किंवा हनुमान या शब्दांच्या व्याखेत बसणार्या व्यक्ती आज अस्तित्वात नाहीत याचा पुरावा तुम्ही बघितला आहे का?
ऑकॅमचा वस्तरा वापरावाच लागतो.
BTW, इंद्र एक (पक्षी: सिंगल) माणूस नव्हता, ते पद होते.
अमर
त्यांनी अमृत प्यायले म्हणून अमर झाले. ;-) नाहीतर तीही माणसेच. त्यांना आमचे पूर्वज म्हणण्यात कोणाला अडचण असावी?
बोस मनुष्यरुपे जन्माला आलेले. आता झालाच तर त्यांचा पुनर्जन्म असेल. परशुराम आणि हनुमान चिरंजीव. ते आहेत हं!
अरेच्चा मला माहितच नव्हते पण त्या पदावर एकावेळी एकच माणूस बसत होता ना! का काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी भागीदारी होती? :-)
घराणेशाही?
त्यांचे निधन झाले याचा पुरावा काय?
हे विधान नेमक्या कोणत्या पुराव्यांनिशी केलेले आहे ते कळेल का? 'ते अस्तित्वात आहेत' या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे दिल्यास तपासायला आवडेल.
सगळे इंद्र कश्यपाच्या खानदानातलेच होते का? सगळे अमृत प्यायले का?
पुरावा
मी कुठे म्हटले की त्यांचे निधन झाले असे? :-) द्या बघू पुरावा मी म्हटले त्याला.
हा श्लोक आहे ना सांगणारा. आमच्या पूर्वजांनी सांगितले म्हणजे आहेतच ते अस्तित्वात.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषण: ।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: ॥
माझ्या गोष्टीतला इंद्र होता. इतरांचे मला काय करायचे? :-)
गोष्ट
तुमचा दावा होता "आता झालाच तर त्यांचा पुनर्जन्म असेल." म्हणजे त्यांचा मृत्यु झाल्याचा तुमचा दावा आहे. मी त्या दाव्यामागचा तुमचा पुरावा मागत आहे.
ती त्याकाळीच्या ब्लॉगवरील 'गोष्ट' असेल हो!
गोष्टीतला इंद्र वास्तवात पूर्वज?
दावा(?)
दावा नाही अंदाज. दावा वगैरे मी केलेला नाही. असेल असा अंदाज मांडला आहे. नेताजींचा जन्म १८९७चा तेव्हा त्यांचा तो जन्म आता नसावा असे मला वाटते. :-)
हा आपला "दावा" काय? :-)
हो म्हणूनच आमचे पूर्वज महान.
असो. आता मला रिकामटेकडेपणाचा कंटाळा आला आहे. कामाला लागते.
पुरावा अग्राह्य
मानवी आयुष्य १२२ वर्षे असू शकते तरीही नेताजी जिवंत असतील या दाव्याला आपली मान्यता नाही. याला अप्रत्यक्ष सिद्धता म्हणतात. मुद्दा हा की एखाद्या दाव्याच्या विरोधी पुरावा नसला तरी तो दावा त्यागता येतो. त्यासाठी ऑकॅमचा वस्तरा वापरता येतो. 'देव होते (आणि आहेत)' या दाव्याचा त्याग करण्यासाठीचा पुरावा न मागता तो दावा त्यागावा.
नाही. चिरंजीवींच्या अस्तित्वाच्या समर्थनार्थ आपण दिलेला 'पुरावा' अग्राह्य असल्याचा माझा युक्तिवाद आहे.
huhwhat?
सावकाश उत्तर द्या. काही घाई नाही.
पुरावा अग्राह्य नाही
आपण दिलेल्या दुव्यात एकही भारतीय व्यक्ती नाही. त्यामुळे भारतीय समाजाची आयुष्यमर्यादा येथे लागू असेलच असे नाही. ज्या खडतर परिस्थितीतून नेताजी गेले त्यातून ते ११३ वर्षांचे आयुष्य जगले असावेत असे मला वाटत नाही. तशीही मान्यता देणारी न देणारी मी कोण? मी दावाच केलेला नाही. तो दावा आहे असे मानून आपण दोरीला साप समजून धोपटता आहात.
हा युक्तिवाद नाही. केवळ इतरांचे पुरावे खोडून काढण्याची हलकी पद्धत आहे. त्यामुळे माझा पुरावा अग्राह्य होत नाही. :-) मी योग्य पुरावा दिला आहे.
आपल्याकडे उत्तरे नसली की युक्तिवाद करायचे नाहीतर huhwhat? म्हणायचे. ब्राव्हो!!
मला घाई आहे. हे शेवटचे उत्तर कारण आता चर्चा खूप भरकटली तेव्हा यापुढे खरडवहीत.
प्रति: पुरावा अग्राह्य नाही
हा काही 'नेताजी जिवंत असतील' या दाव्याच्या विरोधी पुरावा नाही. या युक्तिवादाने शक्यता कमी होते, शून्य नाही.
अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये असेच असते.
'नेताजी जिवंत असतील' हा दावा तुमचा आहे असे मी म्हटलेच नाही. माझा युक्तिवाद एवढाच आहे की तो दावा तुम्ही 'विरोधी पुरावा दिल्यावाचून' नाकारला. त्याचप्रमाणे 'देव होते (आणि आहेत)' हा दावा 'विरोधी पुरावा दिल्यावाचून' नाकारणे योग्य आहे.
तुम्ही केवळ तुमच्या धर्माच्या एका ग्रंथातील श्लोक दिला. ज्यूंच्या ग्रंथानुसार जग सहा हजार वर्षांपूर्वी बनले. ग्रंथप्रामाण्य हा पुरावा नव्हे.
"गोष्टीतला इंद्र वास्तवात पूर्वज म्हणूनच आमचे पूर्वज महान." हे वाक्य 'huhwhat?' च्याच लायकीचे आहे.
मुळीच नाही. 'अमर असे कोणी देव होते' या तुमच्या विधानाविषयीच चर्चा चालू आहे.
ग्रंथप्रामाण्य
हाहाहाहा!!!!! काहीही.
हे देखील काहीही!
होतेच देव अमर! मग आता पुढे?
अवांतरः अरेरे! उपक्रमावर लोळण घेऊन हसणारी स्मायली दिसत नाही याचा आज पहिल्यांदाच मला खेद झाला. असो. आता टाईमपास खरंच खूप झाला. ही चर्चा ही केवळ एक गंमत होती आणि माझे सर्व प्रतिसाद त्याचाच भाग आहेत असेही खेदाने नमूद करावेसे वाटते.
प्रति: ग्रंथप्रामाण्य
माझा बकरा केला? :P
अजाईल का नाहि वापरले?
त्यापेक्षा विश्वकर्म्याने प्रोजेक्ट अजाईल(Agile) डेव्ह्लपमेंट मेथडॉलॉजी वापरली असती तर!!!???
त्यांना हे न सुचल्याने तेव्हा ते प्रगत होते का याबाबतीत संभ्रम वाटतो ;)
(अजाईल स्क्रममास्टर) ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
फ्लॉप
एजाईल मेथडॉलॉजी बर्याचदा फ्लॉप होते असा विश्वकर्म्याचा स्वानुभव असावा, ऋषीकेशराव. आपल्या पूर्वजांना ऐरेगैरे समजण्याचा प्रमाद कृपया करू नका. ;-)
अजब न्याय वर्तुळाचा...
माझी गोष्ट इथल्या सर्वांना आवडेलच असे नाही...
एका गावी एक बंडू नावाचा गडी होता. त्याचे काम होते की कंपनीच्या क्लायेन्टाना जे हवे आहे ते कंपनीतल्या वस्तू बनवणार्यांना समजावून सांगणे व त्यांच्याकडून जे तयार होईल ते क्लायेंटाना "तुम्ही हेच मागितले होते" "हा कीडा नव्हे हे वैशिष्ट्य आहे" असे सांगून त्यांच्या गळी उतरवणे...
एकदा असेच काही क्ष बनवण्यास सांगितले असता, त्या बनविणार्यांनी त्याला अ बनवून दिले. बंडूने बघितले, क्ष व अ मध्ये इतके अंतर होते की त्या क्लायेंटांनाही कळावे. म्हणून तो त्या बनविणार्यांकडे गेला व त्यांना सांगितले की यापेक्षा जवळचे काही बनवा. खरे तर क्ष बनवा असेच सांगायचा तो, पण त्याने पाहिले, की मुळात क्ष सांगितल्याव त्यांनी अ बनविला तेव्हा पुन्हा तेच सांगून काय उपयोग... काही दिवसांनी तो काय बनलेय हे पहायला गेला तो काय - त्यांनी ब बनविला होता. ब हा क्ष पासून अगदीअ इतकाच समदूर... त्यांच्या उत्साहावर पाणी फिरू न देता पुन्हा त्याने क्ष ची कल्पना सांगितली व निदान अ व ब च्या मधले तरी बनवा असे तो म्हणाला.
काही दिवसांनी बनविणार्यांच्या मुख्याने उत्साहाने त्याला बोलावले व त्याला क दाखविला. हा नवीन पदार्थ क, अ व ब पेक्षाही क्ष पासून दूर होता. बंडूने धीर खचू न देता क्ष चे पुन्हा वर्णन केले. बनविणार्यांना ते समजले असे त्यांच्या उत्साहामुळे त्याला वाटले. पण तो अर्थातच त्याचा भ्रम होता. कारण काहीच दिवसांनी त्याला नवीन पदार्थ दाखवण्यात आला - तो दुसरे तिसरे काही नसून पुन्हा अ च होता.
आता बंडूला कळून चुकले की यापुढे जाणे शक्य नाही. तो आपल्या टेबलापाशी आला. भिंतीवर त्याने एक वर्तुळ काढले, त्यावर अ, ब, क हे बिंदू दर्शवले. क्ष बिंदू त्या वर्तुळापासून लांबवर काढला. त्या चित्राकडे पाहात त्या वर्तुळावर पुन्हा पुन्हा आपले डोके आपटून घेऊ लागला....
इटस् ए फीचर...
"इटस् ए फीचर, नॉट ए बग" असे म्हणायची सवय आहे आम्हाला आणि "निर्लज्जम् सदा सुखी|" असे म्हणायचीही. त्यामुळे काळजी नसावी.
गोष्ट आवडली पण त्यावरून आमचे पूर्वज महान होते असे सिद्ध झाले नाही. बंडेश्वर नावाचे कोणी पुराणांत असल्याचा दाखलाही नाही. :-(
कलियुग
सिद्धता? सिद्धता? कोण धार्ष्ट्य हे तुमचे? स्वयंसिद्ध सत्यासाठी तुम्ही सिद्धता मागता? तुम्ही स्वतःला समजता कोण? तुम्ही ते करण्याचा प्रयत्न केला हेच मुळात पाप. असल्या भलत्यासलत्या गोष्टी केल्यामुळेच लोकांच्या अपेक्षा वाढतात. असो. कलियुग आले आहे, दुसरे काय. ठीक आहे, ही घ्या सिद्धता.
ही कलियुगातली कथा आहे. पूर्वी असल्या वाईट साईट गोष्टी होतच नसत. तद्वतच आपले पूर्वज थोर होते.
झाले समाधान?
अशी कथा जरी तुम्हाला पुराणांत सापडली व आम्हांस ती कळविलीत तरी तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आमचे विचार तसेच कायम टिकवण्याइतका कॉग्निटिव्ह डिझोनन्स आहे म्हणावे आमच्यात. हा एक गुण कलियुगात नाश पावत चाललेला आहे.
त्याच्या पुढची गोष्ट्..
ब्रह्मदेवाने विष्णूला सांगितले, की जा आणि काय प्रकार आहे ते पाहून ये. विष्णूने ब्राह्मणाच्या मुलाचे रूप घेतले आणि तो त्या बांधकामापाशी आला. विष्णू म्हणाला की, राजवाडा फारच छान आहे, यापूर्वीच्या कुठल्याही इंद्राला आपला राजवाडा पूर्ण बांधून घेता आला नव्हता. इंद्राला आश्चर्य वाटले. माझ्या अगोदर इंद्र होता? कोण बरे? विष्णूने इंद्राला त्याचे पूर्वज, विश्वाची निर्मिती आणि विनाश यांच्या पुनरावृत्तीचे चक्रीय स्वरूप यांची, तसेच पूर्वीची अगणित विश्वे आणि त्या प्रत्येक विश्वातला एकेक इंद्र याबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. त्या मुलाने हे सर्व आपल्या डोळ्याने पाहिले असे इंद्राला जाणवावे इतकी ती माहिती स्पष्ट होती. तेवढ्यात त्या राजवाड्यात येणारी मुंग्यांची एक रांग मुलाने बघितली आणि तो हसायला लागला. इंद्राने कारण विचारल्यावर मुलगा म्हणाला, ह्या सर्व मुंग्या म्हणजे पूर्वीचे इंद्र आहेत.
अचानक राजवाड्यात साधूच्या वेशातल्या शंकराने प्रवेश केला. त्याच्या छातीवर एकमेकांत गुंतलेल्या केसांचे एक वर्तुळ होते. वर्तुळाच्या मध्यभागी मात्र केस नव्हते, बहुधा पडून गेले असावेत. शंकराने सांगितले, जेव्हाजेव्हा एक केस गळतो, तेव्हातेव्हा एक इंद्र संपतो आणि दुसरा त्याची जागा घेतो.
हे ऐकल्याबरोबर इंद्राच्या छातीत धस्स झाले आणि त्याची संपत्ती आणि मानमरातबाची इच्छा अचानक संपुष्टात आली. त्याने विश्वकर्म्याची पुढील बांधकामातून सुटका केली, आणि आपणही साधू होऊन भ्रमंती सुरू करावी असे ठरवले. यावर शुची घाबरून गेली. तिने शंकराला विनंती केली की, आपल्या नवर्याने हा विचार सोडून द्यावा यासाठी काहीतरी करावे. अंती, शंकराने ऐहिक सुख आणि पारमार्थिक सुख यांची सांगड कशी घालावी हे इंद्राला समजावून सांगितले. राज्य करीत असतानाच आपले शहाणपण कसे शाबूत ठेवावे हे इंद्राला आता कळून चुकले. विश्वकर्म्याने घाईघाईने आपले बांधकाम पूर्ण झाले आहे असे जाहीर केले आणि तिथून काढता पाय घेतला. --वाचक्नवी
.
बरोबर!
पुढची गोष्ट बरोबर आहे. ही नेमकी कुठे येते ते पण सांगावे. जोसेफ कॅम्पबेलांच्या मुलाखतीत तो उल्लेख नव्हता.
दुर्दैवाने आजच्या जगात विष्णू आणि शंकराने कल्टी मारलेली आहे. त्यामुळे राज्य इंद्राचेच आहे. :-( गोष्टीचा उत्तरार्ध मागाहून कधीतरी घुसडण्यात आला असावा असाही अंदाज मांडायला आम्ही मोकळे आहोत.
अर्थात, विश्वकर्म्याच्या पावलावर पाऊल ठेवून घाईघाईने बांधकाम पूर्ण करण्याचा बोध अनेकांनी घेतला आहेच म्हणा.
कुठे येते?
पुढची गोष्ट बरोबर आहे. ही नेमकी कुठे येते ते पण सांगावे.
ही गोष्ट कुठे येते? नक्की माहीत नाही, पण बहुधा ब्रह्मावर्तपुराणात आली असावी. नक्की संदर्भ शोधावा लागेल.--वाचक्नवी
या उपनिषदात व पुराणात
पहिली गोष्ट जेसोफ़ोनिषदातील असून वाचक्नवी यांची गोष्ट स्कंदपुराणातील आहे. जी गोष्ट नक्की कोठे आहे हे सांगता येत नसेल तर ती स्कंद्पुराणात आहे असे म्हणावयाची पद्धत आहे असे पूर्वीच उपक्रमवर वाचले होते.
(अमेरिकेत बायका वाती कशाच्या वळतात, कशाकरिता वळतात, त्यांचे पुढे काय करतात व वाती वळतांना कशाची चर्चा करतात ? )
चातुर्मासातील पुराणिक शरदबुवा
अमेरिका असो की भारत
अमेरिका असो की भारत - वात ही "लावण्यासाठीच" वळली जाते. सध्या वात चांगली वळली आहे. :-)
स्कंदपुराणाचा संदर्भ मान्य आहे. किंबहुना, स्कंदपुराणातच असावी ही गोष्ट.
प्रियाली म्हणाताहेत् त्याअर्थी..
प्रियाली म्हणाताहेत त्याअर्थी ही गोष्ट स्कंदपुराणात असेलही. परंतु ती गोष्ट ब्रह्मवैवर्त पुराणात आहे असे . इंद्र आणि मुंग्या हा दुवा सांगतो.
ते पुराण चाळून त्यातून नक्की संदर्भ शोधल्याखेरीज कुणाचीही खात्री पटणार नाही हे उघड आहे. तोपर्यंत, ही गोष्ट स्कंदपुराणात आहे असे धरून चालायला हरकत नाही. वाती वळता वळता सांगायला एक नवीन गोष्ट मिळाली, हेही नसे थोडके!--वाचक्नवी
पुरावा
यावरील संशोधनातून आम्ही हा पुरावा निळवला आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
आपले पूर्वज महान होते,
याचे सरळ सोपे कारण म्हणजे त्यांना कोबॉल नामक भाषा अवगत होती, अन् टूएट्सिक्स नामक यंत्र दिमतीस होते. कालौघात कोबॉल नष्ट झाल्याने तुम्ही महान नाहीत. तुम्हाला कोबॉल आली असती, तर तुम्ही बेसिकली महान झाला असता अन एन्डलेस लूपमधे अडकून तुमचीही गणती महान पूर्वजांत झाली असती.
(इफ्...एन्डिफ् वाला) इब्लिस.