सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ४ : कोंबडी आधी की अंडं आधी?
_______________________________________________
सोकाम्यत बहुस्याम प्रजायेती - त्याने इच्छा केली मी अनेक व्हावे, जन्म घ्यावे ( तैत्तिरीय उपनिषद २.६.४)
"आपही माली, आप बगीचा, आपही कलिया तोडता" - कबीर.
_______________________________________________
"शक्तिवान टिकून राहतात" (Survival of the Fittest ) हे वाक्य उत्क्रांती प्रक्रियेचं थोडक्यात वर्णन करण्यासाठी वापरलं जातं. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादासाठी E = mc^२ हे साधं, लक्षात ठेवायला सोपं, आणि तरीही अणु बॉम्बची शक्ती गाभ्यात ठेवणारं सूत्र जसं वापरलं जातं तसं. पण E = mc^२ ने काही गैरसमज निर्माण होत नाहीत. एक तर ते गणिती सूत्र असल्यामुळे त्यातल्या राशींतून चुकीचा अर्थ काढण्याची संभाव्यता राहात नाही. दुसरं म्हणजे सापेक्षता वाद आपल्याला समजला आहे असा फार लोकांचा गैरसमज नसतो. तिसरं म्हणजे हे अणु, अवकाश वगैरे मंडळी मुळातच आपल्या फारशी परिचयातली नसतात. त्यामुळे आईनस्टाईनने जे म्हटलं व ते इतर माहितगार लोकांनी पडताळून पाहिलं एवढं आपल्याला पुरेसं असतं. शिवाय हिरोशिमा नागासाकी असतेच.
Survival of the Fittest च तसं नाही. आपल्याला शक्तिवान माहीत असतात, टिकणं म्हणजे काय हे माहीत असतं आणि आपण संघर्ष वगैरे पण दिलेले असतात. बरं, ज्या प्राण्यांविषयी तो सिद्धांत आहे त्यांना आपण जवळून पाहिलेलं असतं. त्यात उत्क्रांती वादाची पुरेशी माहिती नाही असा समज जरी असला तरी तो अशा सोप्या वाक्यांनी दूर व्हायला मदत होते. त्यामुळे या वाक्याचे आपण आत्मविश्वासाने अनेक सोयीस्कर अर्थ करून घेऊ शकतो. "टिकून राहण्यासाठी शक्तिवान असावं" पासून ते "शक्तीवानानीच टिकून राहावं" पर्यंत. विशेष दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते अर्थ "निसर्गनियम" हे अधिष्ठान देऊन मानवी सामाजिक स्थिती वर्णन करायला, व काही वेळा धोरण ठरवण्यासाठी वापरावे असा आग्रह ही दिसतो. तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट करणं आवश्यक आहे.
रिचर्ड डॉकीन्स ने आपल्या "सेल्फिश जीन" (तळटीप १) मध्ये Survival of the Fittest ऐवजी Survival of the Stable हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. तो म्हणतो की आपल्याला डोंगर टिकून राहिलेले दिसतात - कारण ते सहज मोडत नाहीत. पण टिकण्याची दुसरीही पद्धत आहे - पावसाचे थेंब टिकत नाहीत, पण पाऊस ही संकल्पना टिकून आहे कारण तो पुन्हा पुन्हा येतो. उंदीर पुनरुत्पादन करतात त्यामुळे ते टिकून राहतात - उंदीर ही संकल्पना टिकून राहते. निसर्गाच्या, परिस्थितीच्या धक्क्याना सोसून टिकून राहण्या साठी ज्या व्यवस्थांमध्ये स्थैर्य -स्थानाधिष्ठित(spatial ) अथवा कालाधिष्ठित ( temporal) असतं त्या टिकून राहातात व आपल्याला जागोजागी दिसतात. या अर्थाने या वाक्यात विशेष काहीच सांगितलेलं नाही. पण मूलभूत सत्याचा सरलता हा गुण आहे असे मी म्हणेन. मी Survival of the Stable चं भाषांतर "टिकला तो जिंकला" असं करेन. भर टिकण्यावर आहे. जिंकणं किंवा हरणं याची व्याख्याच कोण शिल्लक राहिला (निळ्या ठिणग्या प्रमाणे) ही आहे. आणि या विजयाच्या व्याख्येतूनच संघर्षाच्या कक्षा निश्चित होतात. आपल्याला संघर्ष व विजय माहीत असतो तो चेतना - प्रेरणा - विरुद्ध प्रेरणा - संघर्ष - विजय या क्लिष्ट मालिकेतला. पण त्याचं अत्यंत सरळ रूप आहे अस्तित्व - (विरुद्ध) परिस्थिती - टिकाव (विजय). हे अस्तित्व डोंगराचं असू शकतं किंवा पावसाच्या थेम्बाचं, किंवा उंदराचं . डोंगर विजय मिळवतात ते अत्यंत टिकाऊ, दणकट रचना बनवून तर उंदीर पुनरुत्पादन करून. आपल्याला रस आहे (पेली प्रमाणेच) ते पुनरुत्पादन करून अस्तित्व टिकवणाऱ्या मध्ये.
उत्क्रांतिवादाचा थोडक्यात सारांश आपण गेल्या लेखात बघितला. "पुनरुत्पादन करणारा समुदाय आपल्या अंगचे गुणधर्म पुढच्या पिढीत देतो. काही ना काही कारणाने या गुणधर्मात मर्यादित स्वरूपात बदल नैसर्गिकरीत्या होतात. यातले जे बदल तत्कालीन परिस्थितीत अधिक प्रमाणात पुढची पिढी निपजवायला, जोपासायला कारणीभूत ठरतात/मदत करतात ते बदल अधिकाधिक स्वरूपात पुढच्या पिढीत दिसतात." किंबहुना असंही म्हणता येईल की सचेतनांचा इतिहास हा पुनरुत्पादन पद्धतीच्या विकासाचा (उत्क्रांतीचा) इतिहास आहे. पुनरुत्पादनाची क्लिष्टता कशी वाढली, या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय सचेतना पर्यंत जाताच येत नाही.
आता आपण सर्वात कठीण प्रश्नापाशी आलो. पुनरुत्पादन क्षमता हाही एक गुणधर्मच आहे. एखादा गुणधर्म उत्क्रांत होण्यासाठी त्याची थोड्या फार प्रमाणात उपस्थिती आवश्यक असते. आणि त्याचबरोबर पुनरुत्पादनाची आवश्यकता असते. हा खर्या अर्थाने कोंबडी आधी की अंडं आधी? या स्वरूपाचा प्रश्न झाला. पुनरुत्पादना शिवाय पुनरुत्पादनाची उत्क्रांती शक्य नाही. अद्वैतात दोन प्रकारची कारणं उद्भवतात - निमित्त व उपादान. मडकं घडवणारा कुंभार हा त्या मडक्याचं निमित्त कारण असतो तर चिकणमाती हे उपादान कारण असते. सृष्टीचं कारण शोधायचं असेल तर निमित्त व उपादान हे एकच असले पाहिजेत - पण त्याहीपुढे जाऊन कार्य व कारण एकच असतं तेव्हाच कोंबडी आधी की अंडं आधी हा प्रश्न सुटतो. मातीच जेव्हा मडकं घडवते व ते मडके इतर मडकी बनवतात, तेव्हाच आपल्याला कुंभाराशिवाय निर्मिती करता येते.
आपण तथाकथित "अचेतन" सृष्टीत दिसणारं अति सरल पुनरुत्पादन शोधायला हवं. टप्प्या टप्प्याने आपण पुनरुत्पादनाची क्लिष्टता कमी केली तर काय दिसतं?
आपल्या माहितीचे प्राणी : लैंगिक पुनरुत्पादन : अति क्लिष्ट (जोडीदार, गुणसूत्र देण्याची पद्धती, जटील गर्भ वर्धन प्रक्रिया आवश्यक)
रोटीफर सारखे प्राणी : अलैंगिक पुनरुत्पादन : क्लिष्ट (गुणसूत्र विभाजन, जटील गर्भ वर्धन प्रक्रिया आवश्यक)
अमिबा, जीवाणू : अलैंगिक, एकपेशीय पुनरुत्पादन : कमी क्लिष्ट (गुणसूत्र विभाजन, एकाच पेशीचा जन्म)
विषाणू : अलैंगिक, बिन पेशीय पुनरुत्पादन : अजून कमी क्लिष्ट ( होस्ट ची आवश्यकता)
मी जी उतरंड मांडली आहे ती अगदी अचूक असेल असं नाही. काही पायर्या गाळल्या असतील. आणि क्लिष्टतेचं मोजमाप नसल्याने मी "कमी, अजून कमी" असे बोथट शब्द वापरले आहेत. पण तरीही या पायर्या उतरताना आपल्याला "जीव" हळू हळू त्यांची जीवन्तता हरवताना दिसत आहेत. प्रश्न असा आहे की आपण अजून काही पायर्या उतरलो तर आपल्याला अगदी कमी आवश्यकता असलेलं, निश्चित निर्जीव मानलेल्या एककांमध्ये पुनरुत्पादन दिसेल का? मातीच मडकं घडवेल का?
याचं उत्तर हो असंच आहे. अगदी सोपं उदाहरण म्हणजे मीठ. काय? मीठ पुनरुत्पादन करतं? एक लक्षात घेतलं पाहिजे की सरलतेच्या या पातळीला आपण अपेक्षा देखील अत्यंत सरल व साध्या पुनरुत्पादनाच्या ठेवल्या पाहिजेत. आसपास जेव्हा जम्बो जेट उडताना दिसतात तव्हा आपल्या उडण्याच्या व्याख्या जटील व्यवस्थांच्या असतात. पण ज्या विश्वात इतकं जटील उडणंच नाही तिथे आपल्याला त्याचे अंकूर शोधावे लागतात. जेव्हा आसपास सोडियम व क्लोरीन चे आयन माध्यमात फिरत असतात, व बाह्य उर्जेमुळे पाणी बाष्पी भूत होतं तेव्हा मिठाचे खडे (स्फटिक) तयार होतात. हे स्फटिक म्हणजे इतर आयन एका बीज स्फटिका वर जमलेले थर. आता तुम्ही म्हणाल की असलेलाच मीठ पुन्हा बनतं व विरघळत. नवीन मीठ होत नाही. पण माणसांचं काय होतं? जर सर्व सेंद्रिय रेणू वापरून माणसं बनली, तर त्यानंतर संख्या वाढेल का? असलेलीच माणसं recycle होतील. पुनरुत्पादनाची सुरुवात ही अशाच सामान्य पातळीवर झाली.
पुनरुत्पादनाच्या उत्क्रांतीची व तीतून सजीव सृष्टीच्या फुलण्याची कथा अशी आहे.
फार फार वर्षांपूर्वी एक ग्रह होता. आजचे त्याचे रहिवासी त्याला पृथ्वी म्हणतात, पण त्यावेळी त्यावर कोणी रहिवासी नव्हते. किंबहुना आजच्या रहिवाशांना काल-प्रवास करून तीन चार अब्ज वर्षं मागे नेलं तर त्यांना हा आपलाच ग्रह अशी ओळखही पटणार नाही. फार रौद्र स्वरूप होतं त्याचं. प्राणवायू जवळपास नव्हताच. वातावरणात कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण धोकादायक होतं. जागोजाग भूकंप होते, ज्वालामुखीचे स्फोट होते, सूर्याचा प्रखर प्रकाश होता. अशा या ज्वलंत, अस्थिर वातावरणात अनेक बदल होत होते. अनेक रासायनिक अभिक्रिया होत होत्या. अनेक नवीन रेणू बनत होते, तुटत होते. परस्परांशी प्रक्रिया करत होते. आणि उर्जा मुबलक असल्या मुळे नवीन अधिकाधिक क्लिष्ट रेणू आपली हजेरी लावत होते. पण "मी इथे होतो" असं लिहिण्याची कोणताच शक्ती नव्हती. कारण चिरंतन स्थैर्य कोणालाच नव्हतं. "अणू असशी अणूंत मिळशी" हा न्याय सर्वच रेणूंना लागू होता.
पण या सर्व कोट्यावधी वर्षं चाललेल्या उलाढालीत एक नवीन प्रकारचा रेणू बनला. तो सर्वात मोठा नव्हता की सर्वात क्लिष्टही नव्हता. पण त्यात एक विशेष गुण होता. तो म्हणजे स्वत:च्या प्रती निर्माण करण्याचा. निमित्त व उपादान एकाच वेळी असण्याचा. या गुणामुळे त्याला आपण स्वजनक म्हणू. स्वजननात खरं तर तितकं आश्चर्यकारक काही नाही. अनेक अणू आपल्या सारख्या किंवा आपल्या विरुद्ध प्रकारच्या अणूंना आकर्षित करतात. अबक अशी संगती असलेल्या रेणूने स्वतंत्र भरकटणारे अ ब व क यांना आकर्षित केलं तर त्यांचात रासायनिक बंध निर्माण होऊ शकतात. (संप्रेरक याच तत्त्वावर काम करतात) आता नवीन तयार झालेला अबक मूळ रेणूपासून स्वतंत्र झाला तर हे दोन्ही रेणू इतर भटकणार्या एकट्या अ, ब आणि क ना अबक या स्वरूपात बांधण्याचं काम करायला लागतील. लवकरच अ, ब, क पैकी किमान एक तरी घटक संपून जाईल. उष्णतेने, उर्जेने त्यातले काही अबक रेणू तुटतील, पण लवकरच त्यांचे घटक इतर अबक रेणूंवर आकर्षित होऊन बांधले जातील. आता त्या विशिष्ट अबक संगतीला एक वेगळाच स्थैर्य आलं. निसर्गाच्या अव्याहत तोडफोडीला झुगारून ते त्याच्या नाकावर टिच्चून शिल्लक राहिले. जिथे जिथे ते पसरले तिथे त्यांनी घटक रेणूंना "खाउन" नवीन अबक रेणू बनवायला सुरुवात केली.
पण कुठचीही प्रतिकृती बनवण्याची प्रक्रिया ही १००% अचूक नसते. आपल्याला कानगोष्टी चा खेळ ठाऊक असेलच. बायबल मध्ये भाषांतरात असाच "तरुणीच्या पोटी जन्म घेईल.." चं "कुमारिकेच्या पोटी जन्म घेईल" असा बदल झाला. आणि तो इतका टिकला की विचारता सोय नाही. पण अशा चुका होण्यासाठी सजीव माध्यमांची गरज नाही. स्फटिका मध्येही अनेक कारणांमुळे imperfections येतात. त्यामुळे सर्व ठिकाणी या अबक रेणूच्या वेगवेगळ्या versions होत्या. काही अबक', काही अब'क याप्रकारे. सर्वच नव्या versions मध्ये स्वजन चा गुण होता असं नाही. किंबहुना बहुतेक वेळा चूक होते तेव्हा तिच्यामुळे मूळ प्रतीत सुधारणा होण्याची शक्यता अगदी कमी असते. पण रेणूंची संख्या ही प्रचंड (१०^३५ +) असल्याने व अबक तयार होणे/मोडणे यांची संख्या त्याहूनही अधिक असल्यामुळे अशा अब्जावधी चुका आल्या व गेल्या. ज्या चुका/बदलांमुळे स्वजन ची शक्ती कमी झाली, त्या मागे पडल्या. "चुकी"च्या प्रती निसर्गाच्या मार्या पुढे तुटून गेल्या, त्यांची गोष्ट संपली. पण काही चुका अशा झाल्या की त्यामुळे तयार झालेल्या नव्या रेणूचं स्थैर्य, टिकाऊ पणा वाढला.
हे अनेक पद्धतींनी होऊ शकता. नवीन रेणूचे बंध अधिक मजबूत आहेत (आयुष्य अधिक आहे), आपल्या घटक रेणूंना तो अधिक सहज आकर्षित करतो व लवकर सोडून देतो (जनन क्षमता अधिक आहे), किंवा कमी चुका करतो (अधिक प्रती मागे ठेवतो) अधिक सहजपणे दूरवर पसरतो. या सर्व गुणधर्मांची परिणती जनन क्षमता वाढण्यात झाली. घटक रेणू मर्यादित असल्यामुळे त्यांच्यातही आपल्या निळ्या पिवळ्या ठिणग्या प्रमाणे संघर्ष सुरू झाला. आणि अर्थातच माल्थासच्या भाकिताप्रमाणे अधिक गतीचं चक्रवाढ असलेला नवीन ("चूक" असलेला) रेणू विजयी ठरला.
अशी अनेक कोटी वर्षं गेली. अशा संघर्षा ची मालिका सतत चालू राहिली. मूळ रेणू मध्ये "सुधारणा" होत होत आता चेहेरा मोहोरा पार बदलून गेलेला होता. सध्याचा नवीन राज्यकर्ता व मुळातला साधा सुधा अबक रेणू - त्याचा खापर खापर .... पणजोबा यांच्यात काहीही साम्य नव्हतं - केवळ एका गोष्टी व्यतिरिक्त - दोघेही स्वजनक होते. पण इ. स. पूर्व २००० मध्ये आर्यांनी केलेला रथ व अत्याधुनिक रणगाडा या दोहोंना "युद्धात वापरण्याच वाहन" या समान लेबलाखाली टाकता येतं पण त्यांच्या शक्ती मध्ये जमीन आस्मानाचं अंतर असतं तसच या स्वजनकाचं होतं. नवीन स्वजनक अधिक भक्कम, अधिक वेगाने पुनरुत्पादन करणारा व कमी चुका करणारा होता.
याचं कारण म्हणजे जसजसा संघर्ष तीव्र होत गेला तसतसं साधं सोपं पुनरुत्पादन एवढंच पुरेसं नव्हतं. स्थैर्य, जननक्षमता, अचूकता, व पसरण्याची क्षमता यात जवळपास अंतिम पातळी गाठल्या नंतर काही नवीन गुणांची स्पर्धा सुरु झाली. काही स्वजनक असे झाले की त्यांच्या रासायनिक अभिक्रीयांतून तयार होणारे घटक इतर प्रकारच्या स्वजनकांना मारक ठरले. म्हणजे केवळ नवीन स्वजनकाच्या अस्तित्वामुळे इतर "मरायला" लागले. त्यांचे तुटलेले घटक हे या रेणूसाठी "खाद्य" झाले. हे पहिले "भक्षक". त्यांच्यापुढे बहुतेक स्वजनक हतबल झाले. काहींमध्ये आपल्या भोवती पटल निर्माण होईल असे बदल झाले. जुन्या काळी हे बदल टिकले नसते, पण या पटलांचा भक्षक रेणूंपासून बचाव करण्यासाठी उपयोग झाला. या ढाली, कवचं व हत्यारामुळे स्वजनकाचं काम दुहेरी झालं. एक म्हणजे पुनरुत्पादन करणं. दुसरं म्हणजे ही यंत्रणा तयार करणं.
जसजशी वर्षं जात चालली तसतशी जास्त जास्त प्रगत यंत्र निर्माण व्हायला लागली. स्वजनक आता पूर्वीसारखे उघड्यावर फिरत नव्हते. ते त्यांच्या यंत्रांच्या आत रहायला लागले होते. त्यांचं पुनरुत्पादनाचं काम अजूनही अव्याहतपणे चालू होतं. पण कार्यपद्धती बदलली होती. अजूनही त्याच निकषांवर त्यांची हार जीत ठरत होती - कोणाच्या किती प्रती या जगात शिल्लक आहेत. पण आयुष्यमान वाढवण्यासाठी ते बंदिस्त राहात, पुनरुत्पादनासाठी आवश्यक कामं त्यांनी यंत्रांवर सोपवली होती. त्यांची यंत्रं पुनरुत्पादनासाठी किती चांगली, यावर आता त्यांचं अस्तित्व अवलंबून राहायला लागलं. जसजशी यंत्रं सुधारली तसतसा संघर्ष कठीण झाला. त्यातल्या ज्यांना डोळे येऊन आसपासच्या जगाची ओळख झाली, अंधपणे चाचपडण्या ऐवजी थोड्या फार प्रमाणात काळं-पांढरं, मित्र-शत्रू, वर-खाली या माहितीवर आधारित निर्णय घेता आले त्यांच्यातले स्वजनक जास्त शरीरांतून टिकले, पुढच्या पिढीत गेले.
आता ते स्वजनक कुठे आहेत? ते प्रत्येक सजीवाच्या, सचेतनाच्या, प्राण्याच्या - प्रत्येक पेशिकेंद्रकाच्या गाभार्यात अधिष्ठित असतात. त्यांना आपण गुणसूत्रे (DNA) म्हणतो. आपण त्यांनी टिकण्यासाठी बनवलेली यंत्रं आहोत. मनुष्य पुनरुत्पादना साठी गुणसूत्र वापरतो हे साफ खोटं आहे. गुणसूत्र पुनरुत्पादना साठी मनुष्याला वापरतात. आपल्याला त्यांनी बनवलं. आपल्या असण्याचं कारण तेच आहेत. निमित्त तेच आहेत.
तळटीप १. अतिशय सुंदर पुस्तक. विज्ञान जन-सामन्यात पोचवण्या बाबतीत डॉकीन्स हा आधुनिक कार्ल सेगन म्हणता येईल. त्याची सेल्फिश जीन व ब्लाइन्ड वॉचमेकर (पेलिला उत्तर) ही दोन पुस्तकं माझ्या उत्क्रांतीविषयीच्या कल्पना घट्ट करायला कारणीभूत झाली. या लेखातली स्वजनकाची कथा त्याच्या "replicators" वरून घेतली आहे. तो एक भाग वाचून जगाचं कोडं उलगडल्यागत मी भारून गेल्याचं इतक्या वर्षा नंतरही स्पष्ट आठवतंय.
Comments
काव्यात्मक, + काही टिप्पण्या
"गुणसूत्र पुनरुत्पादना साठी मनुष्याला वापरतात."
काव्यात्मक दृष्टांत म्हणून ठीक. पण रंगसूत्रांना आशा-आकांक्षा, वापर करण्याची मनीषा, वगैरे गुण असतात, असा शब्दभ्रम व्हायचा. हा शब्दभ्रम "सर्व्हायव्हल ऑफ् द फिटेस्ट" म्हधून होणार्या शब्दभ्रमाइतकाच घातक होऊ नये.
एकट्या उपादान कारणाने जैविक गुंतागुंतीचे स्पष्टीकरण मिळते, निमित्त कारण हे निरवकाश (अन्नेसेसरी अँड इर्रेलेव्हंट फॉर द एक्स्पेनेशन) आहे, हे उत्क्रांतीसिद्धांताचे वैशिष्ट्य होय. एक गृहीतक निरवकाश होते, यात शास्त्रीय लाघव आहे (लूझिंग ऍन अन्नेसेसरी ऍक्सियम इज् बेटर बाय ऑकम्स रेझर). निमित्तकारणात अंतिम रचनेची पूर्वकल्पना असलेले एकक लागते. निमित्तकारण या ठिकाणी निरवकाश केले नाही, म्हणूनच "मनुष्यांना वापरतात" हा शब्दप्रयोग मला विशेष भ्रामक वाटतो - जणूकाही रंगसूत्रांना भावी संरचनेची पूर्वकल्पना असते. (लेखात लेखकाला असे वाटत नाही, याचे वर्णन आहे.)
(काही बारीकसारीक तपशील पटण्यासारखे नसले, तरी ठीक. उदा. - विषाणूंचे प्रजनन सोपे नव्हे. कारण विषाणूंचे प्रजनन म्हणजे विषाणू+पेशी दोहोंचे अस्तित्व टिकणे आले. विषाणूंचे प्रजनन हे पेशींच्या प्रजननात व्याज असते, म्हणून ही व्याज प्रक्रिया पेशींच्या प्रजननापेक्षा गुंतागुंतीची असते.)
लेखन ओघवते आहे, रोचक आहे. मालिका उत्साहाने वाचतो आहे.
काव्य आणि वैज्ञानिक सत्य
आपण जे मुद्दे मांडलेले आहेत ते सर्व पटले. वैज्ञानिक सत्यकथन व काव्य यांचं मिश्रण करणं सोपं नसतं. अर्थप्रवाहासाठी लालित्य, नाट्यमयता उपयुक्त असले तरी त्यातून अर्थभ्रम उद्भवण्याचा धोका असतो. पण कधी कधी मोह आवरत नाही. पेशी व शरीर या वरच्या पातळीवरील रचना या गुणसूत्रांच्या "संघर्षातून" झाल्या ही दिशा अधोरेखित करण्याचा हेतू होता. गुणसूत्र/गुणक या पातळीवरच्या प्रेरणा या "जणू काही आहेत" हा संदेश या लेखात यायला हवा होता. आपल्या टिप्पणीमुळे ती त्रुटी भरून आलेली आहे.
तांत्रिक शब्द (निमित्त, उपादान व कारण) वापरण्यात ढिसाळपणा झाला तरी अर्थाला बाधा येते. पण एक टोकाची विचारसरणी अशी आहे की सचेतनांच्या आशा आकांक्षा देखील आरोपितच, after the fact आहेत असं म्हणता येईल, गुणकांच्या "प्रेरणा" हे त्यांचे अतिसरल रूप. पुंजभौतिकीत classical mechanics च्या संकल्पना अणूंच्या पातळीवर निकामी होतात तसंच काहीसं शब्दांचं होतं. ही सारवासारव नाही, तर परिस्थिती आहे. असो. ती चर्चा इथे करण्याची गरज नाही. आपला मुद्दा मान्य आहे. विशेषतः निमित्तांची निर्मिती कशी झाली हे समजावून घेताना नक्की काय झाले यात संदिग्धता असता कामा नये. याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.
सिद्धांतांना अनावश्यक आधार देणार्या गृहितकांना छाटून टाकणारी ऑकमची कुर्हाडच "जादू नष्ट करण्यात" अभिप्रेत आहे. ते आपण अधिक चपखलपणे मांडलं आहे.
"विषाणूंचे प्रजनन सोपे नव्हे. कारण विषाणूंचे प्रजनन म्हणजे विषाणू+पेशी दोहोंचे अस्तित्व टिकणे आले." हेही योग्यच. संगणक, त्याची भाषा, व प्रोग्राम लिहिणे कठीण आहे, पण त्यांना "हॅक" करणारा प्रोग्राम लिहिणे तितके कठीण नाही. तरी त्यातला सोपेपणा हा फसवा आहे. विषाणू हे दिसायला सोपे दिसले, तरी ते पुनरुत्पादन व्यवस्था पेशींकडे आहे हे गृहित धरतात.
शरीरे
"गुणसूत्रे ही सातत्य टिकवणारी आणि शरीरे ही त्यांची यंत्रे '
हे आमच्या पूर्वजांना फारच पूर्वी माहिती होते.
वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृहणाति नरोपराणि, तथा शरीरानि.......... (गृहणाति यातला ह पायमोडका आहे असे समजून घेणे नाहीतर काय लिहिले आहे ते दिसणारच नाही)
इ इ इ लेटेस्ट म्हणजे आठव्या शतकात तरी नक्कीच. हा हा हा हा हा हा हा हा
अहो आम्ही ज्याला आत्मा म्हणतो तीच ही गुणसूत्रे/डी एन ए चे रेणू
हलकेच घेणे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
द्वैतही आणि अद्वैतही...
हलक्यानेच घेऊन प्रतिसाद - तोही मनावर घेऊ नये...
म्हणजे एकाच वेळी शरीर व गुणसूत्रे वेगळी असण्याचे द्वैत आणि मुळातच ती एकाच मातीतून, रेणूंतून उद्भवली हे अद्वैतही. तुमचा केक फारच छान आहे ठेवूनही देता येतो व खाताही येतो...
राजेश
अजून एक केक...
तुमचा केक फारच छान आहे ठेवूनही देता येतो व खाताही येतो...
येथे अजून एक केक मिळेल :-)
दुवा: The Dual Nature of Light as Reflected in the Nobel Archives http://bit.ly/2DzHzI
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
सरलतेकढुन ---
लेख आवडला!!
लेखाच्या शिर्षका प्रमाणे ले़ख सुद्धा क्लिष्ट(किमान मझ्यासाठी तरी) बनत चालला आहे. पण सुन्दर आहे. २ दा वाचल्यास समजायला काहिच हरकत नाही. तुमच्या
जबर्या अभ्यासाचे कौतुक.
कोंबडी आधी की अन्ड या प्रश्नामधे काही अडचणी :
१. बर-याचदा वरील प्रश्नामधे "अन्ड " ह्याविषयी गफलत होते. ज्या पक्षाला आपण आज कोंबडी असं म्हण्तो ती कोंबडी जे अन्ड( य) देते ते आणि प्रश्नातिल अन्ड (क्ष)
हे सार्खेच का ? आज जे अन्ड आपण पाहतो त्याचे गुणधर्म ५०००( किन्वा अजुन मागे ) वर्ष्यापुर्वी असणा-या अन्ड्यच्या (र) गुणधर्मा पेक्षा वेगळेच आसणार(डार्विन नुसार).
जर प्रश्न विचारणार-याला "य = क्ष " हे अभिप्रेत आसेल तर ह्या प्रश्नाचे उत्तर कोंबडी असं आहे.
२. जर प्रश्न विचारणार-याला "र = क्ष " हे अभिप्रेत आसेल तर ह्या प्रश्नाचे उत्तर "अन्ड " अस होइल (पण इथे गोम आहे , याठिकाणी प्रश्नातिल कोंबडी म्हणजे आज आपण ज्या प्राण्याला कोंबडी म्ह्नणतो ती ती होय).
तर प्रश्नामधे गफलत आहे असा माझं म्हणणं आहे. माझा तर्क अर्थातच कितपत बरोबर आहे हे मला आता कळेलच.
पुढच्या लेखाच्या प्रति़क्षेत.
पुढील लेखासाठी शुभेच्छा !
बदलणार्या संकल्पना...
यातच आपण या प्रश्नाचं गुपित पकडलेलं आहे. बदलांचं वर्णन करताना शब्द ताणून तुटतात, निरुपयोगी होतात.
समजा आपण सध्याच्या एका कोंबडीचा तिच्या नवजात अंड्याबरोबरचा फोटो घेतला. नंतर ती आई कोंबडी अंड्यात असताना त्या अंड्याबरोबर तिच्या आईचा फोटो घेतला... असं करत करत चार अब्जं वर्षं मागे गेलो तर आपल्याला काय दिसेल? प्रत्येक आई ही जवळपास आपल्या मुलीसारखीच असेल, पण काही लाख पिढ्यांनी त्यांच्यात बदल होत जाताना दिसेल. कोंबडीचं "कोंबडीत्व" आणि अंड्याचं "अंडत्व" कमी होत जाताना दिसतील. पुरेसं मागे गेलं तर कदाचित डायनोसॉर सारखे प्राणी दिसतील. त्याही आधी जमीन व पाणी यांच्या सीमेवर राहाणारे प्राणी दिसतील. कदाचित अंड्याचं कवच नाहीसं होत जात नव-अर्भकावर केवळ पातळ, चिकट थर दिसेल. त्याही आधी पाण्यात राहाणारे प्राणी दिसतील. अगदी टोकाला गेलं तर एकपेशीय जीव, व सर्वात आधी आपला स्वजनक दिसेल. हे उत्तर मी थोडं सोपं करून सांगतोय, व माझी साखळी चुकीची असेल, पण गाभा बदलत नाही.
प्रश्नातले कोंबडी व अंडं हे कार्य व कारणाचे प्रतीक आहेत. कोंबडी हे निमित्त कारण आहे व अंडं हे कार्य आहे. या दोहोंचा क्लिष्टपणा व परस्परावलंबन समजून घ्यायचे असतील तर उत्क्रांतीतून व तीमधील पुनरुत्पादनामुळे तो क्लिष्टपणा अचेतनांमधून वाढला असं म्हणावं लागेल.
रोचक लेख पण पुन्हा प्रश्न
श्री घासकडवी, लेख नेहमीप्रमाणेच रोचक आहे पण मागील लेखात स्पष्ट झालेले पुन्हा एकदा प्रश्न म्हणून पडले आहे.
मागील लेखात मला पडलेला प्रश्न असा:
त्यावर तुमचे उत्तर पुढीलप्रमाणे:
जे मला योग्यच वाटले. या लेखात तुम्ही म्हणता "गुणसूत्र पुनरुत्पादना साठी मनुष्याला वापरतात". हेही एक्स पोस्ट, after the fact निरीक्षण आहे का? तसे असले तरीही म्हणजे नंतर ते 'वापरतात' असे लक्षात आले तरी ते का बरे वापरत असावेत? घडतेच आहे, हे बरोबर. का घडते आहे? पुनरुत्पादन हा गुणधर्मांचा गुणधर्म आहे का?
तुमचे वाक्य समजा "मनुष्य पुनरुत्पादनासाठी गुणसूत्रांना वापरतात" आणि असे करत असतांना मनुष्यांमध्ये बदल घडतात, असे बदलल्यास काय फरक पडेल?
...............
थोडा विचार केल्यानंतर मला पडलेला प्रश्न आता व्यवस्थित व्यक्त करता येईल असे वाटते. गुणधर्म आणि वाहक असे द्वैत आणि त्यानंतर गुणधर्माच्या टिकण्यासाठी वाहकाचे पुनरुत्पादन यात कॉजॅलिटीची गल्लत होते आहे का? गुणधर्म वाहकाशिवाय अस्तित्त्वात असू शकत नाही तर गुणधर्माला टिकायचे आहे की वाहकाला हे कसे ठरवता यावे?
**हा संज्ञांचा गोंधळ नसावा अशी आशा आहे.
सुंदर
बर्याच दिचसांनी भेजा चाळवणारं काहीतरी वाचायला मिळतंय.
अचूकता आणि सरलता दोन्हीत सुंदर.
विषयाचा फ्लो ही उत्तम.
भागांच्या सादरीकरणातले अंतरही सही वाटतंय.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
क्लीष्टतेकडे प्रवास सुरू
क्लीष्टतेकडे प्रवास सुरू झाला आहे हे पटलं :) मला समजायला कठीण गेलं. दोनदा वाचायला लागलं.
पण छान लिहिलं आहे. येऊ दे पुढला भाग.
अचेतन वस्तुंच्या निर्माणाला पुनरुत्पादन हा शब्द खटकला
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे