आमचे पूर्वज महान होते, एक पुरवणी.

पुराणे व उपनिषदे :
कीर्तनाला गेल्यावर बायका वाती वळतांना गप्पा मारतात (बहुदा सुनेबद्दलच्या कागाळ्या असाव्यात !) पुराणीक काय सांगतो आहे तिकडे दुर्लक्ष करतात, हे ऐकून होतो पण आता खात्रीच पटली की हे जागतिक (पक्षी : अमेरीकेतही) सत्य आहे. नाही तर शरदबुवांच्या थापांकडे त्यांचे लक्ष नक्कीच गेले असते. " माहित नसले तर स्कंदोपनिषदात आहे " असे ठोकून द्यावे असे उपक्रमवर वाचल्याचे आठवते (म्हणजे मीच लिहलेले) व जोसेफोनिषद हे (अल्लोपनिषद वा विक्टोरियोपनिषद ही नाही का एकोणिसाव्या शतकात लिहली गेली !) स्वकल्पित आहे हेही ध्यानात आले असते. अस्तु. आजची इंद्राची गोष्ट मात्र महाभारत, आदिपर्व, अ.१९७, पंचेद्रोपाख्यान, मुंबईप्रत येथून घेतली आहे.(दुवा काय ? असे टंकावयाची गरज नाही.)

द्रौपदी स्वयंवरा नंतर ती पाच भावांची बायको होणार असे कळल्यानंतर द्रुपद व धृष्टद्युम्न हे मोठ्या संकटात पडले. काय करावे हे त्यांना कळेना. तेव्हा भगवान व्यास द्रुपदाकडे आले व एकांतात त्यांनी द्रुपदाला पुढील गोष्ट सांगितली.

देवांच्या एका सत्रात यमाने दीक्षा घेतली व तो प्रजेला मारेनासा झाला.मानव आता आपल्यासारखाच अमर झाला (कारण यम त्यांना मारत नाही) हे पाहून काळजीत पडलेला इंद्र गंगेकाठी बसला असता त्याला प्रवाहात एक दिव्य कमळ दिसले. त्याचा शोध घेतांना त्याला आढळले की एक दैदीप्यमान, लावण्यवती स्त्री अश्रु ढळत आहे व तीचे अश्रु गंगेत पडले की त्यांचे एक एक कमळ होते. त्याने विचारल्यावर ती स्त्री म्हणाली,"हे देवराज, माझे मागोमाग चल, म्हणजे मी का रडते ते तुला सर्व ठीक समजेल."
तीच्या मागोमाग जातांना ते हिमाल्यावर पोचले व तेथे त्याने एका पुरुषाला स्त्रीबरोबर द्युत खेळतांना पहिले. आपणाकडे दुर्लक्ष केल्याचा राग येऊन इंद्र त्या पुरुषावर ओरडला पण तरीही तो लक्ष देत नाही म्हटल्यावर संतापून इंद्राने वज्र उगारले.तेव्हा शंकराने ( तो पुरुष म्हणजे शंकर हे हुषार वाचकांच्या लक्षात आले असेलच) नुसते इंद्राकडे हसून पाहिले व इंद्र स्तंभित होऊन खांबासारखा निश्चल झाला. खेळ संपल्यावर शंकर त्या स्त्रीला म्हणाले, "आण त्याला इकडे" त्या स्त्रीने इंद्राचा हात धरल्यावर इंद्राचे हातपाय भेंडुळले व तो धरणीवर कोसळलाच. शंकर म्हणाले, "परत असा उद्धटपणा करू नकोस.आता तुझे एवढे बळ आहेच तर हा पर्वत बाजूला सार आणि त्याखालच्या विवरात शीर. तुझ्यासारखेच तेजस्वी पुरुष त्यात आहेत." इंद्राने त्याप्रमाणे केले तर त्याला आपल्यासारखेच चार इंद्र तेथे दिसले. शंकर म्हणाले " हे ही(विष्वभुक,भूतधामा,शिबि व शांती हे चार पूर्वेंद्र) तुझ्यासारखेच उन्मत्त झाले म्हणून त्यांची ही गत झाली " इंद्राने फार गयावाया केली तेव्हा ते म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही सर्वांनी मृत्युलोकात जन्म घ्या. तेथे इतरांना असह्य असा पराक्रम करून हजारो लोकांना यमसदनी पाठवा व नंतर परत इंद्रलोकी या. ही स्वर्गलक्ष्मी तेथे तुम्हा सर्वांची पत्नी होईल." तर ते पाच इंद्र पांडव म्हणून जन्माला आले आहेत व द्रौपदी ही स्वर्गलक्ष्मी आहे.

भगवान व्यासांनी अशी समजूत घातल्यावर द्रुपद द्रौपदीचे लग्न चौघा भावांशी करून द्यावयास तयार झाला.
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

कथा

माहीत नव्हती कथा.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद !

कथा माहिती नव्हती. आभार्.....!

-दिलीप बिरुटे

''काय 'राव' ! संकेतस्थळाच्या खच्चीकरण करण्याच्या 'उपक्रमा'त तुमचा सहभाग गृहीत धरु ना?''

स्कंद पुराण आणि अर्धवट गोष्ट

नाही तर शरदबुवांच्या थापांकडे त्यांचे लक्ष नक्कीच गेले असते.

शरदबुवा थापा इतक्या बेमालूम मारतात की जे काही मिळत नाही ते स्कंद पुराणात असते यावर आम्ही सर्व डोळे झाकून विश्वास ठेवत आहोत. ;-) असो. ही गोष्ट देखील अपूर्ण आहे आणि यावरून आमचे पूर्वज महान होते हे सिद्ध होत नाही. ते सिद्ध करण्यासाठी खालील भाग पहा.

व्यास पुढे सांगतात -

ठीक आहे, तुम्ही सर्वांनी मृत्युलोकात जन्म घ्या. तेथे इतरांना असह्य असा पराक्रम करून हजारो लोकांना यमसदनी पाठवा व नंतर परत इंद्रलोकी या. ही स्वर्गलक्ष्मी तेथे तुम्हा सर्वांची पत्नी होईल." तर ते पाच इंद्र पांडव म्हणून जन्माला आले आहेत व द्रौपदी ही स्वर्गलक्ष्मी आहे.

शंकराच्या या आज्ञेला साक्षात नारायणानेही अनुमोदन दिले. त्यानंतर त्याने आपल्या डोक्यावरचे दोन केस काढले. एक पांढरा आणि एक काळा (आता सांगा देव अमर होते तर त्यांचे केस पांढरे कसे झाले?) हे केस गेले रोहिणी आणि देवकीच्या गर्भात. (वसुदेव नेमका काय करत होता? आणि नारायणाच्या केवळ केसा पासून श्रीकृष्ण जन्मला तर त्याला अवतार म्हणता यावे का? आणि बलरामाचे काय? दुसरीकडे कोठेतरी बलराम हा शेषनाग होता अशी गोष्ट मिळते. अरेरे! व्यास अजबच होते.) आणि जन्मले बलराम आणि कृष्ण.

आता हेच व्यास चैत्ररथपर्वात युधिष्ठिराला वेगळीच गोष्ट सांगतात. त्यात म्हणे -

एका ऋषीकन्येला तिच्या पूर्वजन्मांतील पापांमुळे या जन्मी दुर्दैव प्राप्त झाले होते. तिला कोणी नवरा मिळत नव्हता. त्यावर उपाय म्हणून तिने कडक तप आचरले. तिच्या तपावर शंकर प्रसन्न झाला आणि म्हणाला की हवा तो वर माग. या कन्येने आनंदाने "मला एक सुयोग्य वर हवा." अशी मागणी पुन्हा पुन्हा केली. त्यावर शंकराने वर दिला की भारतवर्षातील पाच सुयोग्य राजपुत्र तुझे पती होतील. कन्या म्हणाली, "मी फक्त एकच वर (पक्षी: नवरा) मागितला होता. हे पाच वर नकोत." शंकर म्हणाले, "तू वर (पक्षी: बून) पाच वेळा मागितलास. तेव्हा या जन्मी नसेल तर पुढील जन्मी तरी तुला पाचांची पत्नी व्हावेच लागेल." आणि अशा प्रकारे द्रौपदीला पाच पती मिळाले.

संदर्भ: येथे आहे.
आता बघा की आमचे पूर्वज महान का होते.

द्रौपदीला पाचांची पत्नी बनवण्याचा हेतू साध्य करण्यासाठी व्यासांनी जो मुत्सद्दीपणा दाखवला तो आजही वाखाणण्यासारखा आहे. ;-) खरे नाही, खोटे नाही जे काही मनाला येईल त्याला पूर्वजन्माचे नाव देऊन दिले ठोकून. (आजही अनेकजण पूर्वजन्माच्या संचितावर लोकांच्या "नाड्या" आवळतात म्हणे) ज्यांच्याशी आपण हा प्रकार करतो आहोत ते आपला नातू आहे आणि पुढे द्रुपद-युधिष्ठीर सासरा-जावई होणार आहेत याचा विचार न करता बेमालूमपणे व्यासांनी ज्या थापा ठोकल्या आणि "दुनिया पागल है| पागल बनानेवाला चाहिये" या तत्वाचा वापर केला तो आजही कोणा मुत्सद्द्याला करता यावा. किंबहुना, ते करत असावेतच.

अवांतरः वरील प्रतिसादाकडे गंमत म्हणून पहावे. गांभीर्याने दिलेले मत येथे आहेच.

एक प्रश्न

आधीच्या जन्मात शंकराला, पाच वेळा "पती दे" असे म्हणल्याने द्रौपदीस पाच पती मिळाल्याचे वाचले होते. महाभारत मालीकेत त्याला जरा शर्करावेष्ठीत करत पाच गूण असलेला पती मागितला, पण असे गूण एकात असणे शक्य नव्हते तेंव्हा तुला पाच पती मिळाले असे श्रीकृष्ण द्रौपदीस सांगतो अशी मला वाटते अधुनिक हरदासी कथा घेतली आहे.

मात्र वर शरद यांनी सांगितलेली कथा नवीनच आहे. त्यातील एक भाग कळला नाही, "एक दैदीप्यमान, लावण्यवती स्त्री", स्वर्गलक्ष्मी आहे इतके कळले, पण "ती अश्रु ढळत" का बसली होती? हे समजले नाही.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

ते व्यास सांगत नाहीत

मात्र वर शरद यांनी सांगितलेली कथा नवीनच आहे. त्यातील एक भाग कळला नाही, "एक दैदीप्यमान, लावण्यवती स्त्री", स्वर्गलक्ष्मी आहे इतके कळले, पण "ती अश्रु ढळत" का बसली होती? हे समजले नाही.

ते व्यास गोष्टीत सांगत नाहीत एवढेच सांगतात की तिच्या अश्रूंची सुवर्णकमळे बनली. यमाचे पुढे काय झाले हे देखील सांगत नाहीत. गोष्ट सुरु कुठे होते आणि संपते कुठे असा प्रकार आहे. (मला तरी सापडले नाही. चू. भू. द्या. घ्या.) देवांच्या तर्‍हा आणि व्यासांचा स्मार्टपणा किंवा द्रुपदाचा बावळटपणा की त्याला हा प्रश्न पडला नाही.

एका प्रश्नाचे उत्तर

स्वर्गलक्ष्मीने अश्रु ढाळू नयेत तर काय करावे ? जर हिमालयातला एक भणंग जोगी जरा राग आला म्हणून तुमच्या एक,दोन, नाही तर चार नवर्‍यांना (चार पूर्वेंद्र) गर्तेत ढकलून देत असेल तर बिचारी दुसरे काय करू शकते ?
एका प्रश्नाचे उत्तर तर दिले. पण बुवांच्या प्रश्नाचे काय ? अमेरिकेत वाती वळतांना काय चर्चा चालते ?
शरद (अमेरिका नकाशातच पहाणारा)

असा उल्लेख कोठे आहे?

तुमच्या एक,दोन, नाही तर चार नवर्‍यांना (चार पूर्वेंद्र) गर्तेत ढकलून देत असेल तर बिचारी दुसरे काय करू शकते ?

ते चार तिचे पती होते असा उल्लेख त्या अध्यायात नेमका कोठे आहे? मला तरी तसा स्पष्ट उल्लेख सापडला नाही (चू.भू.द्या.घ्या) आणि ही काय लाकूडतोड्याची गोष्ट आहे का किंवा जंगी सेल की चार पतींची सुटका झाली म्हणून पाचवा मोफत? :-) आणि [स्वर्ग]लक्ष्मी इंद्रांची बायको का? शचीने काय करावे आणि विष्णूला कसे चालले? यमाचे काय झाले पुढे? आपण अमर नाही म्हणजे यम पूर्वपदावर आलेला दिसतो.

गोष्टीत घोळ आहे. कोणीतरी व्यासांच्या नावावर चिकटवली असावी असा अंदाज आहे,वाती न वळता.

हा हा हा !!

=))

हा हा हा !!

बाकी यमाचे काय् झाले ?

त्याचे काम कोणाकडे आऊटसोर्स झालं मग् ;)

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

 
^ वर