बंबईकू सलाम

मराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक माहितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)

मूळ स्रोत शब्दप्रपंच

भय्यांना सलाम, अण्णांना सलाम, बेपार्‍यांना सलाम
मुंबईतल्या जमिनींच्या व्यापार्‍यांना सलाम

चाळी सोडणार्‍यांना सलाम, मॉल बांधणार्‍यांना सलाम
टॅक्सीवाल्याला "दादरकू चलो" सांगणार्‍यांना सलाम

पोलीसांतल्या पसरिचांना सलाम, सरकारातल्या सिंहांना सलाम
"मध्य रेल"मधल्या उपर्‍या मोटरमनना सलाम

घुसखोर बम्बईला सलाम, श्रीमंत बॉम्बेला सलाम
त्यांच्यापुढे लाचार षंढ मुंबईला सलाम

संजय, जया, गोविंदांना सलाम
सगळ्या अमराठी सचिवांना सलाम
हिंदी बरळणारर्‍या एफएम स्टेशनांना सलाम
"मराठी वाचवा"च्या समस्त भाषणांना सलाम

मुंबई फक्त आमची म्हटले तर राष्ट्रदोही म्हणतील
मुंबई सगळ्यांची म्हटले तर आम्हांलाच हाकलतील
म्हणून पाठीचा कणा नसलेल्या "राष्ट्रभक्तां"ना सलाम
आणि आम्हांलाच बदडणार्‍या सर्व शक्तांना सलाम

हुतात्मा चौकाला सलाम
तिथल्या फुकट मेलेल्यांच्या स्मृतीला सलाम
त्यांना विसरणार्‍यांच्या विस्मृतीला सलाम
आम्हीच पोसलेल्या बम्बैया संस्कृतीला सलाम

गाड्या बाहेरून भरून येतायत? येऊ द्या.
भाजीवाले, मछ्छीवाले भय्ये होतायत? होऊ द्या.
मराठी पिक्चर गाळात जातायत? जाऊ द्या.
या उदार विचारांना सलाम,
मुंबई सर्वांची असल्याच्या प्रचाराला सलाम

हे सगळं बघून फक्त कविता लिहिणार्‍याला सलाम
हे सगळं इथपर्यंत वाचणार्‍याला सलाम
हे सगळं वाचून काही करणार्‍याला सलाम
हे सगळं वाचूनही काहीही न करणार्‍याला सलाम

सलाम भाईयों और बहनों, सब बम्बईवालोंको सलाम!
और सबकी प्यारी बम्बईकू सलाम!

-रोहित

(पाडगावकरांच्या "सलाम" वरून प्रेरित)

Comments

निव्वळ अप्रतिम

निव्वळ अप्रतिम बोलुन थाम्बणार आणि काय करणार आमच्यासारखे षन्ढ ????

सुरेख.

अतिशय सुरेख कविता! पाडगावकरांच्या सलाम वरून प्रेरीत होऊन रोहित यांनीसुद्धा तेवढीच सुरेख कविता केली आहे, याचे विशेष कौतुक वाटते.

माधवी.

आपलाही सलाम.

लयीच भारी कविता.

आपला.
संवेदना बोथट झालेला( मुबईकर)

काय लिहू .........

जय महाराष्ट्र !

अगदी खरं बोललास

वा योगेश,
अगदी खरं बोललास रे बाबा!
पण या सगळ्याला आता इतका गंज चढला आहे की,
मराठीत हे किती जणांना कळेल हा ही एक प्रश्नच आहे!

आपला
(मराठी मुंबई प्रेमी) गुंडोपंत

आवडली!

छान! अगदी मर्मभेदी आहे कविता.

माझे नाही

हे लेखन माझे नाही. आंतरजालावर सापडलेल्या एका मराठी अनुदिनीवरील आहे. मूळ स्रोत लेखनात दिला आहे.


मराठी टंकलेखनासाठी वापरा

सुंदर कविता, मराठी आणि मराठी माणूस!!

कविता म्हणून विचार केला तर रोहितशेठने सुरेखच लिहिलं आहे. त्याला आमची मनमुराद दाद!

पण मुंबईतून मराठी हद्दपार होत आहे म्हणून उगाच बोंबा मारण्यात काय अर्थ आहे? जे आहे ते आहे!

मुंबई हे मोठमोठ्या धंदेवाल्यांचं शहर. यातले किती धंदे मराठी माणसं करतात? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. मराठीच्या माणसाच्या हाती मुंबईच्या आर्थिक नाड्या आहेत का?

आज नरिमन पॉईंट, कफ परेड, वरळी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेकस् इथे बरीच लहानमोठी कार्यालये आहेत. किती मराठी माणसांच्या मालकीची ही कार्यालये आहेत?

कुर्ला-अंधेरी-मरोळ इथे छोटेमोठे कारखाने आणि त्यांची कार्यालये असलेली औद्योगिक वसाहत आहे. यात मराठी कारखानदार किती आहेत? फारच कमी! अन्य भाषिक मंडळी इथे कष्ट करतात, घड्याळ न बघता काम करतात. मराठी माणसं इथे आहेत, पण ती फक्त घड्याळ पाहून १० ते ६ नोकरी करणारी!!

बॉलिवुड हे येथील हिंदी चित्रपटाचं साम्राज्य. त्या क्षेत्रातले लहानमोठे कलाकार, तंत्रज्ञ, हे सगळे अमराठी. बारा बारा, अठरा अठरा तास काम करतात. बॉलिवुडची फायनान्सर मंडळी, वितरक ही सगळी अमराठी मंडळी आहेत. वाट्टेल तसा पैसा खर्च करतात, आणि सिनेमे काढतात.

आज मराठी चित्रपट सृष्टीची काय अवस्था आहे? मध्यंतरीच्या काळात अशोक सराफ आणि लक्ष्या बेर्डे यांचे एकापेक्षा एक फालतू सिनेमे येऊन गेले. लक्ष्या बेर्डे हा मराठीतला म्हणे सुपरस्टार, पण शेवटी त्यानेही मैने प्यार किया, साजन इत्यादी चित्रपटात केलीच ना दुय्यम दर्जाची आणि नोकरांची कामं? अशोक सराफ हाही एक मराठी अभिनेता. तोही गेला शेवटी हिंदी चित्रपटात दुय्यम दर्जाची कामं करायला. सन्माननीय अपवाद फक्त नानाचा! त्याने अशोक लक्ष्यासारखी नोकरांची किंवा दुय्यम दर्जाची कामं न करता स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं!

आज हॉटेल व्यवसायात किती मराठी माणसं आहेत? सगळा कारभार शेट्टी लोकांच्या हाती आहे.

शेअर बाजारात गुज्जू-मारवाड्यांच्या तुलनेत किती मराठी गुंतवणूकदार आहेत? रोजचे सौदे करणारी किती मराठी माणसं आहेत? फारच नगण्य! ब्रोकर म्हणूनही किती मराठी माणसं आहेत? फारच नगण्य. किती मराठी माणसांच्या हातात मोठमोठी ब्रोकिंग हाउसेस आहेत?

असो, मुंबई मराठी माणसाची राहिली नाही याची अनेक कारणं आहेत. उगाच बोंबा मारण्यात काय अर्थ आहे? आज जुहू, खार, बांद्रा, अंधेरी पश्चिम, मालाबार हिल, इथे मराठीला आणि मराठी माणसाला काळा कुत्रा विचारत नाही ही वस्तुस्थिती आहे. गिरगाव सारखा मोक्याचा भाग आज गुज्जू लोकांनी काबीज केला आहे. नाही म्हणायला दादर भागात आणि पुलंच्या पार्ल्यात पूर्वेला अजून मराठी वस्ती आहे. सायन कोळीवाडा, चेंबूर, ह विभाग शेट्टी आणि पंजाबी लोकांनी काबीज केले आहे. घाटकोपर, मुलुंड हे विभाग गुज्जू मारवाड्यांनी काबीज केले आहे. कंबाला हिल, नाना चौक, ग्रँटरोड, फोर्ट, मरीनलाइइनस्, चर्नीरोड हे भाग पारशी लोकांच्या ताब्यात आहेत.

मराठी माणसं आहेत कुठे? ती आहेत लालबाग आणि परळच्या गिरणगावात! आणि बाकी बरेचसे नालासोपारा, भाईंदर, मीरारोड या लांबच्या उपनगरात.

असो!

आपला,
(मुंबईचा माहितगार!) तात्या.

दुकाने, आणि छोटेमोठे व्यापार..

आज मुंबईतली किती मराठी माणसं दुकान चालवतात? दुकानदारी करतात? कोणी मनाई केली होती त्यांना? गुजरात्यांनी की मारवाड्यांनी?

एका लहानश्या गाळ्यात मुंबईतला भैय्या सकाळी ७ ते रात्री १२ पानाचा ठेला चालवतो, कष्ट करतो. लालबागच्या गिरण्या बंद पडल्या आणि तिथला मराठी माणूस अक्षरशः देशोधडीला लागला? त्यापैकी किती मराठी माणसांनी रस्त्यावर भैय्ये लावतात तश्या केळ्याच्या गाड्या लावल्या? त्यातली किती मराठी माणसं न लाजता टॅक्सी चालवू लागली?

आज मुंबईतले किती टॅक्सी चालक मराठी आहेत? फारच नगण्य! तो सगळा व्यवसाय भैय्यांच्याच हातात आहे. असो!

मराठी माणसाची मुंबई राहिली नाही, याला मराठी माणसंच जबाबदार आहेत. उगाच इतरांच्या नांवानी बोंबा मारण्यात काय अर्थ आहे?

आपला,
(बंबईवाला!) तात्या.

आवडला

प्रतिसाद आवडला. जे बाहेरून येतात त्यांना नेहमीच झगडून, जास्त कष्ट करून स्थान निर्माण करावे लागते. सगळ्या जगात तीच त‍र्हा आहे.

तात्यानू....

तात्या आपण तर भटक्या(प्रमोद नवलकर )झालात त्यामुळे प्रतिसाद आवडला. आता करायचे काय.आपण परप्रांतियांची बाजू घेऊ नये अशी आपणास नम्र विनंती. गिरणी संपामुळे मराठी संख्या कमी झाली.वाढवण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत.आता येत्या काही वर्षात मुंबईतून मराठी माणुस हद्दपार होणार यात शंकाच नाही.
त्यासाठी सर्वप्रथम मुंबई बहुभाषिक नगरी आहे हा जो चुकीचा प्रचार प्रसारमाध्यमे ,मराठी वृत्तपत्रे यांनीच चालवला आहे तो बंद झाला पाहीजे .
आपला
कॉ.विकि

फुकट

तात्या म्हणतात ते अगदी बरोबर आहे.
मराठी लोकांना फुकट् ठेले दिले तरी ते चालवणार नाहीत्.

अनिरुद्ध दातार

त्या साठी बाळासाहेबांचे शपथपत्र वाचा.

नमस्कार,

जय महाराष्ट्र !

लोकसत्ता (२१ जाने. २००७)- हिरकमहोत्सव विशेषांक भाग: २( शिवसेनेचा झंझावात)

शिवसेना स्थापन झाली तेव्हा बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी आदर्श असे एक शपथपत्र बनवले ते पुढीलप्रमाणे शिवसैनिकांसाठी शपथ

' मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी' स्थापन झालेल्या शिवसेनेचे सदस्यत्व घेताना शिवसैनिकांना बारा कलमी शपथ पत्रावर स्वाक्षरी करावी लागे. त्या शपथेचा हा मसुदा

१. यापुढे मराठी माणसाने मराठी माणसाला पाण्यात पाहू नये. एकमेकांना मदत करावी. परस्परांनी आपला उत्कर्ष साधावा.

२. मराठी दुकानदारांकडून मराठी उत्पादकांच्याच मालाची खरेदी करावी. उत्पादक व दुकानदार यांनीही उलटपक्षी मराठी माणसाबद्दल सहृद्यतेचे धोरण ठेवावे.

३. मराठी माणसाने आपल्या जागा ( घरे,दुकान वा प्लॉटस) परप्रांतीयांना विकू नयेत.विकल्यास शिवसैनिकाने त्याचे नाव,पत्ता 'शिवसेना कचेरीला कळवावा.

४. मराठी अधिकाऱ्यांनी मराठी माणसांचीच नोकऱ्यांच्या जागी भरती करावी.

५. मराठी तरुणांनी उत्तम इंग्रजी शिकलेच पाहिजे. शॉर्टहॅंन्ड ,टायपिंग शिकावे.उत्तमस्तेनो म्हणून पुढे यावे. तसेच आजच निघणाऱ्या नवनवीन तांत्रिक कोर्सकडे जाण्याची धमक ठेवावी.

६. अंगचुकारपणा सोडावा . मिळेल तिथे जावे. मग तो हाऊसिंग गाळ असो वा नोकरी असो.

७. मराठी माणसाचे होत होईल याच दृष्टिकोनातून सर्व व्यवहार कारावेत.

८. मराठी शाळा,संस्था ,आश्रम सांस्कृतिक कार्यक्रम यांनाच सक्रिय ,मदत करावी.

९. उडप्यांच्या हॉटेलांवर बहिष्कार टाकावा. स्वाभिमानी महाराष्ट्रीय मंडळींनी रस्त्यावर, फूटपाथवर विक्री करणाऱ्या उपऱ्या फेरीवाल्यांचा कसालाही माल खरेदी करी नये.

१०. आपल्या माणसांना हॉटेल वैगेरे धंधात पुढे आणणयाची व हीन न लेखण्याची बुद्धी बाणवावी.

११. आपल्या माणसाशी उद्धऱ व उर्मटपणाने वागू नये.

१२. मराठी माणसावर कुठे अन्याय झाल्यास संघटित आवाज उठवून त्याचा प्रतिकार करावा.

काळ बदलला तशी शिवसेना बदलली आजच्या(हिदुत्ववादी) शिवनेनेत आणि जुन्या (मराठी)शिवसेनेत खुप फरक आहे. वरिल शपथपत्र पाहून जुनी शिवसेना परत हवी असे वाटते.

आपला

कॉ.विकि

चर्चा व हास्यास्पद उदाहरणे

वरती प्रश्न विचारणार्‍यांनी खालील प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत

१. स्वाती दांडेकर अमेरिकन प्रतिनिधीगृहात (सिनेट किंवा काँग्रेस जे असेल ते) मराठीत भाषण करतात का?
२. बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष "आम्चा येक म्हराटी मानूस हितल्या धा अमेरिकनांना भारी पडेल" अशी दर्पोक्ती करतात का?
३. न्यूयॉर्क मधला टॅक्सीवाला गाडीत बसलेल्या अमेरिकन गिर्‍हाईकाला "किधर जाना बे?" असं स्वतःच्या मातृभाषेत विचारतो का?
४. कॅलिफोर्नियामधल्या सरकारी नोकरीच्या जाहिराती फक्त महाराष्ट्रातील सकाळ व लोकसत्ता या मराठी वृत्तपत्रात दिल्या जातात् का?
५. न्यू जर्सीमध्ये मराठी जनतेची संख्या जास्त आहे म्हणून लोकल एफएम वाहिन्या फक्त मराठीतून निवेदन करतात का?
६. सिएटल मराठी मंडळाचे अध्यक्ष "अमेरिकेत इंग्रजीचा आग्रह धरणार्‍यांचे हात तोड देंगे" अशी जाहीर धमकी देतात का?

जर महाराष्ट्रातल्या व मुंबईतल्या जनतेला हे सगळे सोसावे लागत असेल तर त्यांनी काय करायचे?

कल्याणमध्ये होणार्‍या रेल्वे भरतीची जाहिरात फक्त बिहार व उत्तरप्रदेशातील हिंदी वृत्तपत्रात कशी काय होते? नंतर होणार्‍या भरतीमध्ये ८० टक्याहून बिहारींची भरती कशी काय होते? मराठी संस्कृतीचे केंद्र असणार्‍या पुण्यातल्या एफएम वाहिन्यांवर ९० टक्के निवेदन हिंदीतून कसे काय केले जाते? महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेसाठी वृत्तपत्रात येणार्‍या सरकारी जाहिराती फक्त हिंदीतून कशा काय असतात्? स्टेट बँकेसारख्या सरकारी व एचडीएफसी सारख्या खासगी बँका केवळ हिंदी व इंग्रजी हे दोनच पर्याय महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी देण्याचे धाडस कसे काय करतात? मराठी वाहिन्यांवर हिंदी जाहिराती कशा काय लागतात? मराठी ही हिंदीची बोलीभाषा आहे का? मराठी चित्रपटांना आजकाल उत्तम प्रतिसाद मिळत असूनही मॉलचालक मराठी चित्रपट प्रदर्शनाला नकार कसा काय देऊ शकतात?

या सर्व गोष्टींमध्ये मराठी माणसाच्या कामचुकारपणाचा व अठरा तास काम करण्याचा काय संबंध आहे?

नवीन मराठी पिढी ही अतिशय कष्टाळू व मेहनत करणारीच आहे. वर दिलेली बहुतेक उदाहरणे ही पूर्वानुभवावर आधारित असावीत मात्र आजकाल बहुसंख्य परप्रांतीय अधिकार्‍यांच्या पूर्वग्रहदूषित वर्तनामुळे या तरुणांना योग्य संधी मिळत नाही हे सत्य आहे.

महाराष्ट्रातील अधिकार्‍यांची यादी येथे पहा .

ता.क. आता बिहारभूषण संजय निरुपम यांनी रेल्वे स्थानकांवर संरक्षण पथके सुरू केली आहेत.

-शॉर्ट सर्किट

 
^ वर