अरूणाचल् प्रदेश - डॉ. जोराम बेगीं: बदलाचे वारे

भाग १ आणि २ वरून पुढे चालू.

डॉ. जोराम बेगी हे अरूणाचलचे सध्याचे उच्च शिक्षण संचालक आहेत. त्याआधी ते अरूणाचलच्या युनिव्हर्सिटीचे १० वर्षे रजिस्ट्रार होते. डॉ. बेगी हे तेथील तानी नावाच्या लोकसमूहातील न्यिशी या जमातीचे. "जोराम" हे त्यांचे खरे सांगायचे तर नाव नसून आडनावाप्रमाणे, किंवा त्यांच्या घराण्याच्या किताबाप्रमाणे (जसे आपल्याकडे पाटील, सरदेशमुख असते त्याप्रमाणे) आहे. त्यांच्या समाजात त्यांना मानप्रतिष्ठा आहे, एक म्हणजे या किताबामुळे आणि दुसरे म्हणजे त्यांच्या शिक्षण आणि प्रतिष्ठेमुळे. घरातील वडिलधार्‍या माणसांप्रमाणे त्यांना त्यांच्या समाजात मान आहे. बेगींचे कार्यक्षेत्र मुख्यत्वे अरूणाचलमध्ये असले तरी ते भारतात अनेक ठिकाणी फिरलेले आहेत, तसेच अरूणाचलच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीबद्दल त्यांना खूपच माहिती होती असे दिसले. तसेच सामान्य आणि उच्चपदस्थ सर्व लोकांमध्ये त्यांची उठबस आहे. त्यामुळे आज सामाजिक काम करीत असताना त्यांच्या सहभागाची गरज अनेक संघटनांना वाटते असे दिसले. सुरूवातीस अगदी मितभाषी आणि काहीसे अलिप्त वाटलेले बेगी नंतर मात्र मनापासून बोलते झाले. बेगींशी बोलताना एका अरूणाचली व्यक्तीच्या नजरेतून बाकीचा भारत कसा दिसत असेल आणि त्यांच्या विकासाच्या अपेक्षा काय असतील याचा अंदाज आला. आणि पुढील काळात भारताच्या दृष्टीने कोणते प्रश्न गंभीर ठरू शकतात याची जाणीव झाली.

बेगींशी बोलताना कळले की अरूणाचलमध्ये अनेक जमाती आहेत जसे अपातानी, न्यिशी, गालो, हिलमिरी, अशा एकंदर २५ जमाती आणि ८७ उपजमाती. यापैकी बेगी हे तानी समूहापैकी न्यिशी जमातीचे. न्यिशी ही अरूणाचलमधली संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी जमात.
TribalMan Arunachal Photo Credits Vijay Swami REWATCH

TribesArunachal Photo Credits Vijay Swami REWATCH

अपातानी, न्यिशी या तानी समूहातील जमाती त्यांचा एक "अबोतानी" नावाचा मूळ पुरूष मानतात. न्यिशी जमातीतील कुटुंबे मोठी असतात, बहुपत्नित्वाची चालही प्रचलित आहे. त्यांना अनेक मुले असतात आणि सगळेजण एकत्रच राहतात. त्यामुळे कुटुंब-कबिला एकंदरीत मोठा असतो. बाकी अन्नधान्याच्या बाबतीत विशेष अडचण येत नाही. आणि पुरेसे अन्न प्रत्येकास मिळते. चुकून भांडणे झाली तर गावातील जाणत्या व्यक्ती असतात, ते भांडणे सोडवतात. पण पंचायत असा विशिष्ट प्रकारे तयार केलेला प्रकार त्यांच्यात नाही. पण गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे, आणि परस्पर समझोत्यांनी वाद मिटवले जातात. हा समाज अतिशय स्वतंत्र वृत्तीचा आहे, त्यांच्यातील स्त्रिया शेती सांभाळतात, भात आणि मासे पैदास करणे हे मुख्य काम.

तानी लोकसमूहातील जमाती "दोन्यी-पोलो" म्हणजे सूर्य आणि चंद्र यांची पूजा करतात. "दोन्यी" म्हणजे सूर्य स्त्री-रूप आहे, तर "पोलो" म्हणजे चंद्र हा पुरुष-रूप आहे. कुठचाही आनंदाचा किंवा दु:खाचा क्षण असला, शेतात पेरणी किंवा कापणी करायची असली, किंवा घरातली आजारपणे दूर व्हावीत म्हणून सर्वासाठी दोन्यी-पोलोची पूजा करण्यात येते. पूजेत प्राण्यांचे बळी चढवले जातात. यात अनेकदा मिथुन नावाचा एक याक आणि गाय यांमधील संकराने बनलेला प्राणी बळी दिला जातो. पुजेसाठी एक पुजारीही असतो, आणि विशिष्ट मंत्र म्हणून पूजा करायची असते. एकंदरीतच पशूंना धन समजले जाते, पण त्यातही मिथुन या प्राण्यास अरूणाचलमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, संपत्तीचे ते प्रतिक असल्याप्रमाणे असते. लग्नात, तसेच सौद्यांमध्ये, मिथुन दिला-घेतला जातो.

हा खरे तर संघटित असा धर्म नाही. या लोकांच्या भाषेत "धर्म" असा खरे तर शब्दही नाही. पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा अरूणाचलमध्ये आजही पाळल्या जात आहेत. पण या निसर्गपूजेला हल्ली वेगळे रूप येत चालले आहे, याचे कारण काही स्थानिक लोक हे ख्रिश्चन धर्मीयांच्या ख्रिसमससारख्या देखण्या, लहान मुलांच्या दृष्टीने आकर्षक अशा उत्सव सोह्ळ्यांमुळे त्या धर्माकडे आकर्षित होत आहेत अशी Indigenous Faith and Cultural Society for Arunachal Pradesh (IFCSAP) यासारख्या संघटनांना वाटत असलेली भिती. यातूनच अशा संघटनांचे दोन्यी-पोलो एक धर्म म्हणून संघटित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चसारख्या संकल्पनांना शह म्हणून दोन्यी-पोलो या देवतांची आठवड्यातून एका दिवशी पूजा करणे, दर आठवड्यात एका छताखाली एकत्र भेटणे या संघटित धर्मांच्या वाटाव्यात अशा रिती पुढे येत आहेत. हे संघटन गरजेचे आहे किंवा नाही, हे मुद्दे वादाचे असले तरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे करणार्‍या संघटना स्थानिकांच्याच आहेत. बाहेरून येणार्‍या संस्कृतींमुळे येऊ घातलेल्या बदलांची त्यांना भिती वाटत असू शकते, यामुळे पुढे कधी त्यांच्या मूळ निसर्गपूजनाची जागा कदाचित एखादा संघटित धर्म घेईल असे होऊ शकते. तर दुसरीकडे अशा प्रकारे या चालिरीतींना धर्म म्हणून संघटित करण्याला परकी पद्धत समजून विरोध करणारे स्थानिक लोकही आहेत असे कळते.

बेगींच्या बोलण्यात अरूणाचलच्या विकासाच्या संदर्भात सतत काळजी दिसली. ही काळजी दुहेरी आहे, म्हणजे अरूणाचलचा विकास झाला पाहिजे ही काळजी आणि तो वेडावाकडा झाल्यास त्याचे एकंदरीतच अरूणाचलींवर दुष्परिणाम होतील ही दुसरी. एकंदरीतच भारतास स्वातंत्र्य मिळाल्यापासून काहीशी दुर्लक्षित राहिलेला हा भाग आहे. अरूणाचलमध्ये गेली अनेक वर्षे एकच मुख्यमंत्री आहे. केंद्रात अरूणाचलचे विशेष बळ नाही, त्यामुळे आणि मुळात अरूणाचलला वेगळे ठेवल्याने अरूणाचलचा विकास हा मर्यादित स्वरूपाचा झाला. त्यामुळे रस्ते, शिक्षण, वैद्यकीय सेवा या सर्वांच्याच बाबतीत अरूणाचल प्रदेश मागासलेला आहे म्हणायला हरकत नाही. पण विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे हे देखील त्यांनी सांगितले. १००० कोटींचे केंद्राचे पॅकेज हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे पॅकेजही उशीरा आले आहे, सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जानेवारी २००८च्या चीन भेटीनंतर. अरूणाचल प्रदेशातून १९६२ च्या युद्धात चीनने भारताला खूपच हानी पोहोचवली. स्वत: युद्ध सुरू करून प्रदेश नियंत्रणाखाली आणूनही त्यानंतर युद्धबंदी घोषित करून चिनी सैन्य माघारी परतले असले तरी आज अरूणाचल प्रदेशाबद्दल चीनचे उद्धेश सरळ आहेत असे समजण्याचे कारण नाही. गेली अनेक वर्षे मॅकमोहन रेषेवरून चीन आणि भारताचे झगडे सुरू आहेत. अरूणाचल प्रदेशातील तवांग येथे तिबेटमधील ल्हासा या सर्वात मोठ्या बौद्धमठाच्या खालोखाल आकाराने मोठा असा बौद्ध मठ आहे. परंतु एकीकडे असा हा बौद्ध मठ तर दुसरीकडे सतत लष्करी सावधानतेचे वारे. तवांगमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय सैन्याचा मोठा डेरा आहे. मॅकमोहन रेषेजवळील भारताचा ह्या भागात लष्कराची सतत गस्त घालणे सुरू असते. गेल्या काही महिन्यांमधली बातमी अशी आहे की अरूणाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यास चीनमध्ये भेटीस जाताना त्यांना व्हिसाची काहीच गरज नाही कारण चीनसाठी ते परकीय नागरिक नाहीत, असे सांगण्यात आले. यातच भर म्हणून शेजारील नागालँडमधील फुटिर लोक अरूणाचलमध्ये पाय रोवू पाहत आहेत.

यातच बाहेरून येऊ घातलेली संस्कृती अरूणाचलमध्ये भराभर पाय रोवू लागली आहे. ही संस्कृती पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित आहे आणि चंगळवाद बोकाळतो आहे अशी बेगींना आणि इतर अरूणाचलींना भिती वाटते. स्वामी म्हणाले होते की आजही अरूणाचलमध्ये केबल कंपन्यांकडून आलेले हिंदी चित्रपट सहज बघायला मिळू शकतात, पण बातम्या बघायला अडचण होते असे सर्वत्र आहे. अरूणाचलला नवीन अशा या सांस्कृतिक बदलांमुळे एक प्रकारचा स्वत्वाचा अभाव अरूणाचली मुलामुलींमध्ये निर्माण होतो आहे असे बेगींना वाटते.

यात भर म्हणजे अरूणाचलचा खुंटलेला विकास, आणि बाहेरच्या आणि राज्यातील आवश्यक सेवा-सुधारणांमधली दरी.
Arunachal Bridge Photo Credits Vijay Swami REWATCH
आजही अरूणाचलमधील शहरे खेडी यांना जोडणार्‍या रस्त्यांच्या जाळ्याची ज्याप्रमाणे कमतरता आहे त्याचप्रमाणे तेथील शि़क्षणाच्या सोयी अपुर्‍या पडत आहेत. बेगी यांच्या म्हणण्याप्रमाणे अलिकडे तेथे प्राथमिक शिक्षणास महत्त्व आले आहे, आणि जवळजवळ ५४% लोक हे आता साक्षर आहेत. परंतु उच्च शिक्षणास त्यामानाने कमी महत्त्व दिले गेले आहे. तसेच डॉ. बेगींना ज्याप्रमाणे शिक्षण घरापासून दूर राहून घ्यावे लागले त्याचप्रमाणे आजही अनेक अरूणाचली मुलामुलींना घरदार सोडून लहान वयातच वसतीगृहांमध्ये राहून शिक्षण घ्यावे लागते. या विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले तरी रोजगाराच्या संधी या मुख्यत: सरकारी आहेत. त्यामुळे कितीसे अरूणाचली युवक-युवती शिक्षण संपवून पदव्या घेतल्यानंतर अरूणाचलमधील सरकारी नोकर्‍या करू शकतील यास मर्यादा आहेत. तसेच इतर उपजीविकेची साधने कमी असल्याने या मुलांना शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी विशेष उपलब्ध नसतात. मग शेतीसारख्या पारंपारिक उद्योगांत मुले शिरतात. या उद्योगांमधून पोटाला पुरेसे अन्न मिळते पण उच्च शिक्षणासाठी काढून द्यायला हातात ओघवता पैसा येत नाही. यामुळे शिक्षण अर्धवट सोडून देणार्‍यांची संख्या जास्त आहे. परिणामी त्या भागाचा विकास होत नाही, तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती होत नाही.

बेगींशी बोलताना कळले की आज अरूणाचलमध्ये एकही वैद्यकिय शिक्षणसंस्था नाही, अभियांत्रिकीच्या जागा मर्यादित असल्याने आणि त्यातही बाहेरच्या राज्यांतील मुलांसाठी आरक्षित जागा असल्याने शिक्षणाच्या यातही शास्त्रविषयांच्या (सायन्स) अभ्यासाच्या संधीही अरूणाचलमध्ये कमी आहेत. असे असल्याने अनेक मुलांना बाहेरच्या राज्यांमध्ये शिक्षणासाठी जावे लागते. बेगींना विचारले की ही मुले एकदा बाहेर पडली की मग परत येत नसतील? ते म्हणाले ते धक्कादायक होते. त्यांच्या मते मुले उर्वरित भारतातून परतच अधिक येतात. उर्वरित भारतास ते "मेनलँड" म्हणजे "मुख्य भूमी" म्हणत होते. या अरूणाचली मुलांच्या परतीचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे अरूणाचलींना बाकीच्या भारतात मिळत असणारी वागणूक. अरूणाचलींच्या विशिष्ट चेहरेपट्टीमुळे त्यांना नेपाळी, चिनी, थायलंडमधील समजले जाते. आणि परक्यासारखी वागणूक मिळते. त्यांना भारतात अन्यत्र कामास असलेल्या नेपाळी गुरख्यांप्रमाणे समजून त्यांच्याशी तसेच निम्नस्तरातील कामगारांप्रमाणे वागवले जाते. अरूणाचली मुलींना त्यांच्या दिसण्यामुळे भारतात ज्याप्रमाणे अनेक नेपाळी वेश्या आहेत त्यांप्रमाणे समजून तसेच वागवण्यात येते. खरे तर अरूणाचली मुलींना त्यांच्या राज्यात असताना मोकळ्या वागण्याची सवय असते, रात्री येणे जाणे, कामे करणे, मोकळेपणे पुरूषांशी बोलणे अशा वागण्यावर कसलीही बंधने नसण्याची सवय असलेल्या, मनमोकळेपणे हसणार्‍या वागणार्‍या या मुलींच्या मुक्त वागण्याला सरसकट त्यांचा उच्छृ़ंखलपणा समजून त्यांना उर्वरित भारतात अपमानास्पद वागणूक मिळते. हे सर्व दिसण्यावरून होणारे गैरसमज. याखेरीज त्यांच्या खाण्यातील बांबू शूटस, अखुनी यासारखे पदार्थ/मसाले यांच्या विशिष्ट वासामुळे त्यांना राहण्यास जागा मिळत नाही किंवा त्यांच्या खाण्याच्या सवयींवरून गदारोळ माजवण्यात येतो. मध्यंतरी दिल्ली पोलिसांनी खास अरूणाचली विद्यार्थ्यांसाठी एक "do's and don'ts" ("काय करा आणि काय करू नका") ची यादी बनवली होती त्यात यासारखे वासाचे ("smelly") पदार्थ करताना शेजार्‍यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे करावे, तोकडे कपडे घालू नयेत, अशा प्रकारचे सल्ले दिले होते. हे सल्ले बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना न देता केवळ ईशान्येकडील मुलामुलींना वेगळे काढून दिले गेल्याने ईशान्येकडील अनेक विद्यार्थ्यांना रूचले नाही, त्यामुळे याविरूद्ध बराच आरडा ओरडा झाला असे कळते. अशा गोष्टींमुळे अशा मुलांना कधीकधी इतर राज्यांतील भारतीयांचा तिटकारा यावा अशी परिस्थिती तयार होते. आणि उर्वरित भारतात राहण्याची इच्छा उरत नाही त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी परत अरूणाचलमध्ये येतात. हे असे जरी असले तरी बहुसंख्य अरूणाचली हे शांत स्वभावाचे असल्याने हिंसक प्रसंगांमध्ये त्याचे रूपांतर होत नाही. मात्र या सर्व प्रकारांनी परतणार्‍या अरूणाचलींच्या मनात कडवट चव मात्र उरत असावी.

अशा काहीशा मानहानीकारक प्रसंगांना तोंड देऊनही आज तरी बहुसंख्य अरूणाचली युवक युवती भारताच्या बाजूने उभे आहेत असेच चित्र आहे. एवढा डोंगराळ आणि दुर्गम प्रदेश असूनही भारतीय लोकशाही तेथे रूजली आहे, आजही पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला तेथे भारताचा झेंडा घेऊन प्रभातफेर्‍या काढल्या जातात, लोक एकमेकांचे स्वागत हे "जय हिंद" ने करतात. खरे तर आसाम, नागालँड यासारखी शेजारील राज्ये फुटिर कारवायांनी ग्रासलेली असतानाही अरूणाचलमध्ये आजही शांतता आहे ही एक आश्चर्याचीच गोष्ट समजावी लागेल. पण या सर्व शांततेस अरूणाचलींचा शांत स्वभाव कारणीभूत असावा. पण शिकलेली आणि जगात वावरलेली नवीन पिढी अशीच शांत किंवा अल्पसंतुष्ट राहणे हे शक्य वाटत नाही.

यासाठीच अरूणाचली जनतेला योग्य संधी मिळाव्यात यासाठी विकासाचे नवे मार्ग आखण्याची गरज आहे. बेगींच्या मते आजच्या अरूणाचलमध्ये अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. अरूणाचलचा विकास हा पर्यटन, वीजनिर्मिती, अन्नप्रक्रिया अशा अनेक क्षेत्रांत होऊ शकतो. पर्यटकांसाठी हे तर दुसरे नंदनवन ठरू शकते. तेथील अस्पर्शित अशी वने आणि जीवसृष्टी, शांत सुंदर सरोवरे, भरभरून वाहणार्‍या नद्या आणि डोंगराळ प्रदेश, यांवर आधारित पर्यटन, खेळ, भ्रमंती अशी अनेक आकर्षणे येथे निर्माण करता येऊ शकतात असे बेगींना वाटते.
Arunachal Nature Photo Credits Vijay Swami REWATCH
तसेच भारताच्या विस्तृत भागास किंवा आशिया खंडास विद्युत पुरवठा करता येईल इतपत मोठे किंवा महत्त्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्प उभे राहू शकतील एवढी अरूणाचलमधील नद्यांची क्षमता आहे असे त्यांच्या बोलण्यात आले. याआधीच रिलायन्स सारख्या कंपन्यांनी आधीच प्रकल्पांच्या निमित्ताने आपला पाय अरूणाचलमध्ये रोवला आहे. हे सर्व होत असताना अरूणाचली आणि "मेनलँड" भारतातील संस्कृतीची देवघेव होणार हे तर साहजिकच आहे. विचार करणारे अरूणाचली या बदलाच्या दृष्टीने साशंक असू शकतील. पण त्याचबरोबर हे जाणले पाहिजे की हे बदल होणे अरूणाचल आणि भारत यांच्या दृष्टीने हिताचे आहे. पण ते घडत असताना अरूणाचलींच्या भारतियत्वाची शंका घेत त्यांना वेगळे ठेवणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे यातून माहिती किंवा संस्कृती यांची कसलीही देवाणघेवाण न झाल्याने भविष्यात अरूणाचलींच्या स्वत्वाचा मुद्दा कदाचित भविष्यात कळीचा ठरू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे. यासाठी अरूणाचलमध्ये आणि तेथील लोकांमध्ये तसेच ग्रामीण आणि शहरी विकासात रस घेणे, तेथील उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक करणे, तेथे स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यास मदत करणे, तसेच अरूणाचलच्या संस्कृतीची माहिती करून घेणे, हे राज्यांमधील भारतीयांनी आणि बिनसरकारी किंवा सेवाभावी संस्थांनी केले पाहिजे.

अमेरिकेतील भेटीत बेगींनी इथे काही स्थानिक अमेरिकन (नेटिव्ह) लोकांच्या स्थानांना भेटी दिल्या. त्यांची निसर्गपूजक संस्कृती ही अनेक प्रकारे नेटिव्ह अमेरिकनांच्या संस्कृतीप्रमाणे होती. स्थानिक अमेरिकनांच्या संस्कृतीचा विलय कशा प्रकारे झाला हे अरूणाचलींच्या संदर्भात सध्याच्या झपाट्याने बदलणार्‍या परिस्थितीत भारताच्या सीमेवरचे हे राज्य असल्याने समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. यातूनच त्यांच्या बोलण्यात गांधीजी (रवींद्रनाथ टागोरांचे बहुदा) एक वाक्य वापरीत असावे ते आले -"I would let the winds of the world blow through the doors and windows of my house but I will not be blown away". अरूणाचलमधले नवीन बदल स्विकारताना कदाचित हे वाक्य अरूणाचलींना मार्गदर्शक ठरू शकेल असे त्यांना वाटते. अरूणाचलमधील बदल हा भारताच्या दृष्टीने योग्य प्रकारे व्हायला हवे असतील तर ते अरूणाचलींच्या पद्धतीनेच आणि त्यांना बरोबर घेऊन करावे लागतील याची ही नांदी समजायला हरकत नाही.

Comments

टीप

समाप्त.
आधीचे दोन लेख खालील दुव्यांवर वाचता येतील -
भाग १

भाग २

विशेष टीप :
वरील लेखातील सर्व छायाचित्रे श्री. विजय स्वामी, अरूणाचल प्रदेश यांच्या सौजन्याने. श्री. स्वामी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ह्या छायाचित्रांचा कृपया वापर करू नये. तसेच श्री. स्वामी यांच्याशी संपर्कासाठी मला उपक्रमावरून व्य. नि. पाठवावा. मी त्यांची माहिती पाठवण्याची व्यवस्था करू शकेन. धन्यवाद!

वा! सुरेख लेखमाला

अतिशय माहितीपूर्ण आणि अप्रतिम साच्यात "बांधलेला" लेख. हा लेख कुठेही विस्कळीत झाला नाही हे मला विषेश वाटले (अश्या भारावणार्‍या विषयावर लिहिणे कठीण असते हा वैयक्तिक अनुभव आहे; कारण इतकं सांगायचं असतं की तुमच्या लेखमालेत असलेला मुद्देसुदपणा, तर्कशुद्ध क्रम एरवी बर्‍याचदा हरवतो .)
बाकी अरुणाचल नवा घडण्याच्या वाटेवर आहे आणि तो कसा घडवायचा हे मेनलँडवासियांच्या बरेचसे हातात आहे याची जाणीव करून दिलीत.

या सुरेख लेखमालेबद्द्ल अनेक आभार!

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

अगदी असेच म्हणतो !!!

अतिशय माहितीपूर्ण आणि अप्रतिम साच्यात "बांधलेला" लेख. हा लेख कुठेही विस्कळीत झाला नाही हे मला विषेश वाटले (अश्या भारावणार्‍या विषयावर लिहिणे कठीण असते हा वैयक्तिक अनुभव आहे; कारण इतकं सांगायचं असतं की तुमच्या लेखमालेत असलेला मुद्देसुदपणा, तर्कशुद्ध क्रम एरवी बर्‍याचदा हरवतो .)
बाकी अरुणाचल नवा घडण्याच्या वाटेवर आहे आणि तो कसा घडवायचा हे मेनलँडवासियांच्या बरेचसे हातात आहे याची जाणीव करून दिलीत.

या सुरेख लेखमालेबद्द्ल अनेक आभार!

मेघना ढोकेच्या दै.लोकमत मधील अरुणाचल प्रदेशावरील लेखाचीही योगायोगाने आजच सांगता झाली :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच

सुरेख लेखमाला.

धन्यवाद चित्राताई. अतिशय माहितीपूर्ण व सुंदर लेखन!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सुरेख लेख

अरुणाचल तसेच इशान्य भारतातील सर्व राज्यांचे भारतातील इतर राज्यांशी पर्यटनाने चांगले संबध व्हावेत.

स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी देखील भारतात त्यांना परके समजले जाणे हे राष्ट्रिय एकात्मतेच्या दृष्टिने नक्किच हितावह नाही.

तुमची ही लेखमाला वृत्तपत्रात, मासिकात इ. नक्की छापुन यावी ही इच्छा.

+१

सर्व बाबतीत.

अरुणाचलातील विद्यार्थी

शरद
आमच्या घरी पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थी राहून गेलेले आहेत. पुण्यात रहाणार्‍या अशा
विद्यार्थ्यांना भेटावयास व त्यांचा पाहुणचार करावयास आनंदच वाटेल.श्री. स्वामी यांच्याकडून
विद्यार्थ्यांची माहिती मिळाली तर मी त्यांना भेटावयास जाईन. आंतर्भारतीचा ,महाराष्ट्र व
अरुणाचल यांचा दुवा जुळावा म्हणून एक छोटासा प्रयत्न.
शरद

धन्यवाद,

मी तुमची विनंती नक्कीच श्री. स्वामींपर्यंत पोहोचवीन. तुम्ही जो सहभाग घेत आहात, अशाच प्रकारचा सहभाग त्यांना लोकांकडून अपेक्षित आहे असे वाटते. आंतर्भारतीच्या कामावरूनही वाचायला आवडेल.

पॅकेज

जाहिर झाले हे चांगले आहे. पण एकंदरीत आपल्या सगळ्या कारभाराचा गलथानपणा बघता त्याची अंमलबजावणी कधी सुरू होईल व त्यापुढे त्यात अंतर्गत असलेले कार्य कधी संपून तेथील जनतेला त्याचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल, हे महत्वाचे. (आणि तोपर्यंत अरुणाचल प्रदेश आपलाच राहिला तर मिळवली म्हणायचे!)

ह्या लेखात तेथील समाजासमोर असलेल्या इतर प्रश्नांचाही उहापोह केलेला आहे. उदा. ख्रिश्चन धर्माचा हळूहळू बसणारा पगडा, शिक्षण मिळूनही नोकर्‍या न मिळाल्याने तरूणांना येणारी अस्वस्थता, इतर भारतीयांकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक वगैरे. एक अजून चांगला लेख, धन्यवाद.

हेच!

हे सर्व दिसण्यावरून होणारे गैरसमज. हे वाचून तीव्र संताप आला. अजून किती दिवस आपण तद्दन पंजाबी किंवा भय्याचा चेहरा म्हणजे भारतीय माणूस असे म्हणणार आहोत?
दाक्षिणात्यांना नाकारतोच अधून मधून.

भारतात भेदभाव प्रतिबंधक विचार समाजात रुजणे आवश्यक वाटते. मुळात नेपाळे म्हणजे निम्न. हा विचारही किती भयंकर आहे...
कशाचा बळावर इतर 'उच्च' म्हणायचे?
का नाही त्यांनी स्वतंत्र होवू? त्यांना असेही काय मिळते आहे इथे राहून?
एका क्षणी तर मला त्यांच्या स्वतंत्र होण्याच्या कल्पनेला पाठींबाच द्यावासा वाटतो आहे.

शिवाय तशी वागण्यावर बंधने आणणार्‍या अधिकार्‍यावरही कारवाई व्हायला हवी. भारत सरकारने 'हा भारतही आपलाच आहे, असे चेहरेही भारतीयच आहेत' अशी देशव्यापी जाहिरात मोहिम चालवायला हवी असे वाटले.

आपला
गुंडोपंत

सुरेख लेखमाला

लेखमाला सुरेख जमली आहे. थोडेफार संपादन करून वर्तमानपत्रासाठी पाठवता यावी.

यातच बाहेरून येऊ घातलेली संस्कृती अरूणाचलमध्ये भराभर पाय रोवू लागली आहे. ही संस्कृती पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित आहे आणि चंगळवाद बोकाळतो आहे अशी बेगींना आणि इतर अरूणाचलींना भिती वाटते.

सुधारणा, आधुनिकीकरण यांच्यासोबत चंगळवाद येणे अपरिहार्य आहे. यासर्वांत समन्वय साधणे हे अतिशय कठिण कार्य असावे.

फारा वर्षांपूर्वी माझ्या ट्रेनच्या डब्ब्यात दोन मणिपूरी मुली होत्या. त्यांचे अनुभवही असेच होते. त्यांना नेपाळी ते चिनी इ. काहीही समजले जाई. बरेचदा तुम्ही तुमचा देश सोडून इथे येऊन नोकरी का करता यासारखे प्रश्न विचारले जात.

आभार,

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.
ऋषिकेश, हा भारावणारा विषय हे खरेच. स्वामी आणि बेगी यांची मुलाखत घ्यायला आलेल्या एक ओळखीची भारतीय पत्रकार स्त्री अशीच भारावून गेली , ती नंतर भेटली तेव्हाही भारावून बोलत होती. पण हे एवढे पुरेसे नाही आहे, हे जाणवले.

अर्थात आपण प्रत्येक जण काहीना काही स्वरूपाने वेगवेगळ्या सामाजिक कामांना मदत करीतच असतो असे निरीक्षण आहे, त्यामुळे नुसतेच मदत करा अशा नेहमीच्या ठोकळेबाज आवाहनापेक्षा सध्या या विषयी एवढेच म्हणते की रस वाटला असल्यास अधिक माहिती गोळा करा आणि इतरांपर्यंतही पोचवा.

बिरूटेसर, लोकमतातील लेख हा तर प्रत्यक्ष अरूणाचल अनुभवलेल्या पत्रकार स्त्रीचा आहे. त्याचा दुवा मध्यंतरी प्रदीप यांच्याकडून समजला (इतरांसाठी - दैनिक लोकमतची मंथन पुरवणी ), आणि ते वर्णन ऐकीव माहितीशी बर्‍यापैकी जुळते आहे हे पाहून बरे वाटले.

हे लेख काही दुरुस्त्या करून वर्तमानपत्रात द्यायला काहीच हरकत नाही (मुख्यत्वे अरूणाचलला देण्यात येणार्‍या पॅकेजसंबंधी), फक्त लेखमाला म्हणून छापण्यासाठी बरीच जागा लागेल, आणि एवढी जागा कोणते वर्तमानपत्र देणार हा प्रश्नच आहे. :-)

बाकी, प्रतिक्रियांबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार.

काळजी

लेख छानच आहे आणि माहितीपूर्ण सुद्धा. पण माहिती वाचून काळजी जास्त वाटते. स्वतःला भारतीय समजणारे भारतीयत्वाची व्याख्या नक्की काय करतात? खास करून अरुणाचली तरूण-तरूणींना मिळणारी वागणूक वाचून जास्त काळजी वाटते. आपल्या देशाच्या एकुणच भौगोलिक विस्ताराकडे पाहता, भारतीयांच्या मनोवृत्तीचा विस्तार मात्र तितका नाही याचा खेद वाटतो.

 
^ वर