अरूणाचल प्रदेश - निसर्गाचे नंदनवन

गेल्या आठवड्यात दोन अरूणाचली रहिवाशांना भेटण्याचा अपूर्व असा योग आला. अपूर्व अशासाठी की कोणी अरूणाचली व्यक्ती माझ्या परिचयाच्या नव्हत्या. त्यापैकी एक म्हणजे डॉ. जोराम बेगी आणि दुसरे म्हणजे श्री. विजय स्वामी. स्वामी या आडनावावरून फसण्याचे कारण नाही, श्री. स्वामी हे सोलापूरमधले अस्खलित मराठी बोलणारे निघाले.

अरूणाचल प्रदेशात श्री. स्वामी यांच्या पुढाकाराने "रीवॉच" (Research Institute of World's Ancient Traditions, Culture and Heritage) या नावाची संस्था स्थापन केली गेली आहे. रीवॉच या संस्थेचे काम अमेरिकेतील लुईव्हिल येथील डॉ. यशवंत पाठक ह्यांनी स्थापन केलेल्या आयसीसीएस (International Center for Cultural Studies - इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज) ह्या अमेरिकेत स्थापन झालेल्या संस्थेच्या पाठिंब्यानिशी सुरू आहे. डॉ. पाठक यांच्या ओळखीतून आणि "रीवॉच" या संस्थेच्या पुढील विकासाच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी तसेच या विषयांवरच्या एका सभेत संस्थेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी या संस्थेचे चेअरमन डॉ. जोराम बेगी आणि कार्यकारी संचालक श्री. विजय स्वामी त्यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात बॉस्टन येथे आले होते. या दौर्‍यात ते अनेक अनिवासी भारतीयांना भेटले. आमच्याकडे चार दिवस असलेल्या त्यांच्या वास्तव्याच्या दरम्यान त्यांच्याशी गप्पाटप्पांच्या स्वरूपात बोलण्याची संधी मिळाली. दोघेही आपापल्या कार्यक्षेत्रात अनेक वर्षे काम करीत असल्याने, त्यांना विषयाची आणि प्रदेशाची चांगलीच जाण होती असे दिसले. ह्यावेळी अरूणाचलबद्दल कळलेल्या माहितीचे संकलन करण्याचा हेतू आहे. यातील काही माहिती वरील दोघांशी केलेल्या गप्पांमधून कळली तर काही मोकळ्या जागा भरण्यासाठी माहिती शोधावी लागली. राखाडी रंगात लिहीलेल्या वाक्यांची जबाबदारी पूर्णत्वे माझी.

डॉ. जोराम बेगी हे अरूणाचल प्रदेशातील न्यिशी या जमातीचे एक पुढारी आहेत. एका शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागातून आलेल्या केवळ जिद्दीच्या आणि हिमतीच्या जोरावर शिकलेल्या ह्या व्यक्तीचे आयुष्य हे आता पाहिल्यास वरकरणी अगदी तुमच्या आमच्यासारखे सरळ सोपे दिसते. नीट पाहिल्यास त्यांच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास दिसतो. १० वर्षे अरूणाचल युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रारपद ज्यांनी सांभाळले होते असे डॉ. बेगी हे सध्या "Director of Higher and Technical Education" म्हणून अरूणाचलमध्ये काम करतात. एकेकाळी वडिल लवकर गमावून बसलेला हा मुलगा केवळ काकांच्या आग्रहाखातर शिकू लागला. वयाच्या पाचव्या वर्षीपासून कुटुंबापासून लांब असलेल्या शाळांमध्ये शिकत, खर्चासाठी शिष्यवृत्या मिळवीत त्यांनी आपले उच्च शिक्षण आसाम आणि अरूणाचल प्रदेशमधून पूर्ण केले. अरूणाचल मध्ये मुख्य व्यवसाय सरकारी. त्यामुळे प्रथम व्याख्याता (लेक्चरर) म्हणून लागले. नंतर पीएचडी पदवी प्राप्त केली. गुणवत्ता असल्याने बढत्या होत गेल्या. डॉ. बेगी यांचे बोलणे अगदी तोलून मापून होते, पण खूप अभ्यासू वॄत्ती जाणवली. अरूणाचलच्या केवळ शैक्षणिक क्षेत्राचीच असे नव्हे तर इतरही खडानखडा माहिती, राज्याचे प्रश्न त्यांना माहिती होते आणि एका मोठ्या पण दुर्लक्षित समाजाला योग्य दिशा देण्याच्या मोठ्या जबाबदारीची जाणीवही दिसली. अरूणाचल प्रदेशमधील विवेकानंद केंद्र, अबोतानी मिशन आणि भारतीय इतिहास संकलन समिती या विविध संस्थांमध्ये त्यांनी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांच्याशी या दुर्लक्षित प्रदेशाबद्दल बोलताना आपल्याला किती कमी माहिती होती हेच सारखे जाणवत राहिले.

श्री. विजय स्वामी मूळचे सोलापूरचे. स्वामी यांनी कामगार कायदा (लेबर लॉ) ची पदवी प्राप्त केल्यानंतर पाच वर्षे ते कामगार कायदा ऑफिसर म्हणून एका सरकारी कापडकारखान्यात काम केले. त्यानंतर कन्याकुमारी नजिकच्या विवेकानंद केंद्रात त्यांनी प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांची नेमणूक ही अरूणाचल प्रदेशातील एका शाळेत शिक्षक म्हणून झाली. त्यानंतर म्हणजे १९८५ पासून आता जवळजवळ २२ वर्षे त्यांनी या दुर्गम भागात काम केले आहे. स्वामी हे एक संशोधकही आहेत तसेच त्यांनी अरूणाचलप्रदेशावरून अनेक डोक्युमेंटरी बनवल्या आहेत. आजमितीला अरूणाचल प्रदेशातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्पांची त्यांनी उभारणी केली आहे. या कामाची नोंद अरूणाचल प्रदेश सरकारने २००० साली त्यांना राज्यपालांकडून कौतुकपत्र देऊन (कमेंडेशन सर्टिफिकेट) घेतली आहे. २००५ मध्ये त्यांना अमेरिकेत इंडो-अमेरिकन इन्व्हायर्नमेंटल लीडरशिप प्रोग्रॅम अंतर्गत फुलब्राईट स्कॉलरशिप ही अमेरिकेतील एक अत्यंत सन्माननीय शिष्यवृत्ती मिळाली. या स्कॉलरशिपच्या दरम्यान अमेरिकेत केलेल्या संशोधनाचा उपयोग त्यांच्या सामाजिक कार्याला दिशा मिळण्यात झाला हे ते आवर्जून सांगतात. स्वामी हे खूपच तडफदार व्यक्तीमत्व आहे. त्यांचे अरूणाचल प्रदेशातले काम वाखाणण्यासारखेच आणि वैविध्यपूर्ण आहे.

अरूणाचल प्रदेश हे भारताच्या उत्तर पूर्व सीमेकडील राज्य. भारत, भूतान, तिबेट आणि चीन यांच्या सीमेवरील हा प्रदेश लष्करी दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. अरूणाचल प्रदेश हे भारतीय राज्य असे आहे की जेथे जाण्यासाठी भारताच्या इतर भागातील नागरिकांना आय एल पी (इनर लाईन परमिट) लागते. हे परमिट मिळण्यासाठी नवी दिल्ली आणि भारतातील इतर काही शहरे येथून अर्ज करता येतो. अर्ज मंजूर झाल्यावर आत प्रवेश मिळतो. आजही भारतीयांना अरूणाचल मध्ये जाण्यासाठी इनर लाईन परमिट लागते. भारतीय नागरिकांना हे परमिट मिळणे श्री. बेगी आणि श्री. स्वामी यांच्या मते तसे अवघड नसते.

या इनर लाईन परमिट मागचे एक कारण श्री. बेगी यांनी सांगितले ते असे - की आसाम या अरूणाचलच्या शेजारी राज्यात पूर्वी ब्रिटीश लोक राहत, आणि अनेकांचे चहाचे मळे होते. चहाला भरपूर मागणी असल्याकारणाने चहाचे शेतकरी मळे वाढवीत नेण्यासाठी बरीच जंगलतोड करीत . त्यामुळे तेथील सध्याच्या अरूणाचल प्रदेशातील स्थानिक रहिवाशी या चहाच्या मळेमालकांना उपद्रव करीत. यासाठी जंगलतोड होऊ नये तसेच स्थानिक रहिवाशांकडून होणारा त्रास कमी व्हावा यासाठी ब्रिटीशांनी इनर लाईन परमिटची कल्पना तयार केली. दुसरे कारण असे की ही इनर लाईन म्हणजे २० व्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिशांनी तेथील स्थानिकांशी करार करून नियमित प्रशासनाखाली आणलेला प्रदेश. या इनर लाईनप्रमाणे आउटर लाईन - बाह्य रेषाही (मॅकमोहन लाईन- जी १९१२-१३ च्या सिमला कराराप्रमाणे ठरवली गेली होती. या सिमला कराराने ब्रिटिश सरकारने स्थानिक नेत्यांशी समझोता करून हा भाग ब्रिटीश अंमलाखाली आणला. परंतु चीनने या रेषेस संमती दिली नाही, १९६१ आणि ६२ मध्ये लढाई करून ते भारताच्या सीमेच्या आत घुसले.). यानंतर होती, जी ब्रिटीश भारताची काहीशी विवाद्य अशी चीनच्या सीमेची रेषा होती. या रेषेमुळेच आजही चीन आणि भारत यांत झगडा सुरू असतो. या प्रदेशाला नेफा (नॉर्थ इस्ट फ्रंटिअर ऍडमिनिस्ट्रेशन) असे नाव होते. नेफाबद्दल पंडित नेहरू यांचे विचार काहीसे असे होते की हा प्रदेश वृत्तीने मुक्त अशा स्थानिक ट्रायबल लोकांचा आहे, त्यामुळे त्यांची प्रगती ही त्यांच्या मर्जीने व्हावी, त्यावर भारताने प्रमाणाबाहेर अधिकार चालवू नये. परंतु १९६२ च्या युद्धात नेफा किंवा सध्याच्या अरूणाचल प्रदेशावर चीनने कबजा केला, आणि नंतर तो आपण होऊन सोडून दिला, भारतीय सैनिकांनाही सोडून दिले. या पराभवाचा धक्का पं.नेहरूंना बसला आणि त्यानंतर आलेल्या सरकारांनी अरूणाचलकडे गांभिर्याने पाहण्यास सुरूवात केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षांनी म्हणजे १९७२ साली हा नेफा म्हणून ओळखला जाणारा प्रदेश इंदिरा गांधींच्या सरकारने केंद्रशासित केला, आणि अरूणाचल प्रदेश हे नाव ठेवले गेले. या राज्यास स्वतंत्र राज्याचा दर्जा १९८७ साली राजीव गांधींच्या सरकार केंद्रात असताना देण्यात आला. या सर्व भानगडींमध्ये अरूणाचल प्रदेशाकडे केंद्राचे काहीसे दुर्लक्ष झाले ज्याचा परिणाम अरूणाचल मधील शासनव्यवस्था आणि रस्तेबांधणी यांवर तसेच आरोग्य आणि शिक्षण या व्यवस्थांवर झाला.

Arunachal Pradesh

ईटानगर ही या राज्याची राजधानी. तवांग, सुबानसिरी, पोपुंम्पारे, सीयांग, दिबांग व्हॅली, लोहित आणि इतर असे एकंदर १५ जिल्हे या राज्यात आहेत. जीरो, रोइंग, इटानगर, तेझू अशी काही मोजकी प्रमुख वस्तीची गावे आहेत. संपूर्ण राज्याची लोकसंख्या १२-१५ लाखांच्या आत असावी. भिष्मकनगर, मालिनीथान, परशुराम कुंड, तवांग बुद्धविहार अशी काही प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. अतिशय विरळ वस्तीचा हा प्रदेश डोंगराळ आणि नद्यांच्या खोर्‍यांनी बनलेला आहे. ब्रह्मपुत्रा ही मुख्य नदी. या नदीस येथे सीयांग हे नाव आहे. लोहित, सुबानसिरी, कमला, दिबांग, अशा अनेक नद्या, उपनद्या यांनी हा प्रदेश वेढलेला आहे. येथील नद्या कधी कधी पात्रेही बदलतात. यापैकी लोहित्य नावाच्या नदीचा महाभारतात उल्लेख आहे असे म्हणतात, तसेच किराट नावाचे नेपाळपासून पूर्वेकडील प्रदेशांतील लोक कौरवांच्या बाजूने प्रागज्योतिषपूर येथील राजाच्या सैन्यात लढले असे म्हणतात, या किराटांचे वर्णन येथील लोकांशी जुळते. सध्या येथे २५ मुख्य जमाती आणि ८७ उपजमातींचे लोक राहतात.

यातील आदी, न्यिशी, अपातानी, गालो, मीशीमी, सिंगफो, खामटी, अशा अनेक मुख्य जमाती आहेत. मुख्य धर्म एकतर निसर्गपूजक, किंवा बौद्ध. बौद्ध धर्मात दोन पंथ आहेत, महायान आणि हिनायन. नोक्टेंसारख्या काही जमाती या प्राथमिक स्वरूपाचा वैष्णव धर्म पाळतात. या लोकांच्या भाषा या मुख्यत्वे बोली म्हणजे लिपी नसलेल्या आहेत. भाषांमध्ये विविधता असली तरी अरूणाचलमध्ये भाषा कळत नाही, संवाद साधण्यास अडचणी होतात असे नाही असे डॉ. बेगी आणि श्री. स्वामी यांनी सांगितले. ज्यांना हिंदी समजते असे लोक अनेक आहेत. खाम्प्टी किंवा सिंघपो या जमाती थायलंड किंवा म्यानमारमधून स्थलांतरित होऊन आल्या आहेत, पण आता पूर्णपणे मिसळून गेले आहेत, या जमातीचे लोक त्यांच्या मूळ लिपीच वापरतात. या जमातींबद्दल आणि अरूणाचल बद्दल अधिक पुढच्या भागांत..

(क्रमशः)

Comments

पहिला भाग आवडला

राज्याची माहिती आणि व्यक्तींची ओळख गुंफून रंजकता छान साधली आहे.

वा! सुरेख लेख

वेगळ्या विषयावरचा लेख/ अनुभव आवडला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

नोक्टेंसारख्या काही जमाती या प्राथमिक स्वरूपाचा वैष्णव धर्म पाळतात.

प्राथमिक स्वरूपाचा वैष्णव धर्म म्हणजे नेमके काय?

अवांतरः अर्जुनाचे गर्वहरण करण्यासाठी शंकर किराताचे (शिकारी/ पारधी) रूप घेऊन समोर आला आणि शिकार कोणाची यावर दोघांत युद्ध झाले. युद्धाशेवटी शंकराने अर्जुनाला पाशुपातास्त्र दिले अशी काहीशी गोष्ट आहे. किरात लोक हिमालयाच्या पायथ्याशी अनेक नेपाळसह अनेक राज्यांत आढळतात आणि त्यांचे मूळ मंगोलॉईड+मध्य आशियाई असावे. अर्जुनाला पाशुपातास्त्र नेमके कोणत्या स्थळी मिळाले ते सध्याआठवत नाही.

वैष्णव

धन्यवाद.
नक्की कल्पना नाही, स्वामी आणि बेगी यांच्याशी बोलताना आपातानी लोकांसंबंधी अधिक बोलणे झाले. कदाचित बेगी हे तानीं या जमातसमूहापैकी न्यिशी या जमातीचे असल्याने. पण नेक्टोंबद्दलची माहिती अरूणाचलच्या सरकारी सं. स्थळावरची आहे. ते जोबान (?) नावाच्या एका सर्वशक्तीमान देवाची पूजा करतात. ह्या देवाने सर्व निर्माण केले असे ते समजतात, पण त्याचबरोबर इतरही रागीट किंवा शांत देवांची पूजा करतात. त्यांच्यात पूजा करणारा एक महंतही असतो.
http://en.wikipedia.org/wiki/Nocte येथे थोडी जास्त माहिती मिळेल.

पहिला भाग आवडला

अरुणाचल प्रदेशाच्या माहितीबरोबर, उच्च शिक्षण संचालक, पुर्वी कुलसचिव राहिलेले डॉ. बेगी न्यिशी जमातीसांठी सामाजिक उपक्रम राबवतात ही फारच आश्चर्यचकीत करणारी अशीच बातमी आहे. ( आमच्या डोळ्या समोर आमच्या विभागाच्या उच्च शिक्षण संचालकाची छबी आहे )इनर लाईन परमिटची माहिती आवडली. दुस-या भागाच्या प्रतिक्षेत !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांना

मग त्यांना पण हा लेख मुद्रित करून् द्यायला/पाठवला पाहिजे...
आपला
गुंडोपंत

सुंदर.

लेख आवडला.

आपण अनेक पैलुचा उहापोह आणि परस्पर संबंध सांगितला तेही आवडले. क्रमशः हा शब्द विशेषकरुन आवडला....

हेच म्हणतो

अरुणाचल ओळख आवडली. क्रमशः असल्याने पुढील भाग वाचायला उत्सुक.

सुंदर लेख

लेख सुंदर आहे. जोराम बेगींचे कौतुक वाटतेच पण स्वामींचे अधिक. स्वामी हे रामकृष्ण मिशनशी संबंधित आहेत का? त्यांच्या बर्‍याच शाळा त्या भागात चालतात असे ऐकले आहे. या व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था तुम्ही केली होती हे वाचूनही बरे वाटले.

क्रमशः हा शब्द विशेषकरुन आवडला....

या द्वारकानाथ यांच्या मताशी सहमत आहे :)

मस्त

लेख आहे.
अगदि व्यवस्थित मांडणी केलिये माहितीची.
"प्राथमिक स्वरूपाचा वैष्णव धर्म"?
मला तर वाटत होतं की इशान्य भारतात (ख्रिश्चन,बौद्ध् ह्याशिवाय) शाक्त मताचा प्रभाव आहे.
(जसं की "कामाख्यपुरा" आसाममधील. )
बाकी , लेख खरच आवडला.
इनर लाइन परमिट ह्याशिवाय आणखी एक गोष्ट् ऐकलिये, ती म्हणजे, लष्कराच्या/सरकारच्या परवानगीशिवाय
तिथं(इशान्येकडील राज्ये आणि काश्मीर मध्ये) प्रीपेड(प्रीपेड = पूर्वसंचित??) भ्रमणध्वनी वापरता येत नाही.
ह्याच्यावर जरा प्रकाश टाकलात तर बरं होइल.

जन सामान्यांचे मन

माहितीपूर्ण

नव्या लोकांच्या ओळखी होतात. नव्या गोष्टी समजतात. इतरांसोबत शेअर कराव्याश्या वाटतात. परंतु लिहायचा कंटाळा येतो. म्हणूनच कौतुक अशासाठी की, ऐकीव माहिती सोप्या भाषेत संकलित करून लेख लिहिण्याचे कष्ट घेतले. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

जयेश

लेख आवडला.

अरुणाचल प्रदेश किंवा नेफाबद्दल भारत-चीन युद्धासंदर्भात वाचले होते. परंतु तेथील रहिवासी, परंपरा, भाषा यांची काहीच माहिती नव्हती.
या लेखामुळे ही माहिती मिळू लागली आहे.
पुढच्या लेखांकाच्या प्रतिक्षेत..

अवांतरः सोलापूर विद्यापिठाचे प्रथम (आता माजी) कुलगुरू सोलापूरचेच डॉ. इरेश स्वामी आणि श्री. विजय स्वामी यांचे काही नाते आहे काय?

आवडला

छान् माहिती. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

धन्यवाद

सर्वांना प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

मन,
अरूणाचलवर तरी शाक्त मताचा प्रभाव असल्याचे कळले नाही. ख्रिश्चन लोक सध्या तरी कमी आहेत, पण शेजारील नागालँड हे प्रामुख्याने ख्रिश्चन आहे आणि नागालिम (नागांचे राष्ट्र) त्यांना हवे आहे. ते अरूणाचलचा काही प्रदेश नागालिमचा भाग समजतात असे कळले आणि त्यामुळे या भागात नागालँडमधून येणारे ख्रिश्चन असू शकतात.
बौद्ध प्रभाव आहेच. प्रीपेड भ्रमणध्वनीचे ऐकले नाही, पण विचारून सांगते. मुलाखत घेण्याचा अजिबात अनुभव नसल्याने - माणसे बोलू लागली की त्यांना बोलू द्यावे, प्रश्न विचारून अनेकदा शॄंखला तुटते अशा विचारामुळे काही प्रश्न तसेच राहिले, आणि त्या दोघांकडे भ्रमणध्वनी दिसल्याने हा प्रश्न सुचला नाही! पण एकंदरीत कामकाजावर भारतीय लष्कराचा प्रभाव खूपच आहे.

नवीन,
स्वामी रामकृष्ण मिशनशी संलग्न नाहीत, पण त्यांनी विवेकानंद केंद्रात अनेक वर्षे सक्रिय काम केले आहे. सध्या ते स्वतंत्र वेगवेगळी कामे करतात. त्याविषयी पुढच्या भागात.

बिरूटे सर,
तुम्ही त्या क्षेत्रातच असल्याने तुलना कराल अशी अपेक्षा करीतच होते, ती पूर्ण झाली. धन्यवाद! बेगी हे तेथील सामाजिक स्थितीचा सतत विचार करीत होते हे जाणवले. आपल्याकडे महाराष्ट्रातही अशा लोकांची वानवा आहे असे नाही (असा विचार करायला आवडेल) पण, कदाचित त्यांचे काम कधी वेगवेगळ्या कारणांनी पुढे येत नसेल.

विसूनाना,
ईरेश स्वामींचे काही नाते आहे का ती कल्पना नाही.

पुढचा भाग आजच शक्यतो टाकते..

उत्तराबद्दल

सर्वप्रथम आभार.
ते प्रीपेड(पूर्वसंचित) भ्रमणध्वनीचं कळलं तर बरं होइलच.
शिवाय काही गोष्टीता अणखीही ऐकल्यात त्या अशा:-
तिथं (मनुष्य सोडुन)काहीही खाल्लं जातं.
गाय,डुक्कर इथपासुन ते मुंग्या, पाली आणि चक्क उंदीर आणि कुत्री सुद्धा!
आता हे सगळं अति-रंजित आहे, की खरं आहे?
मी तर इथ पर्यंत ऐअकल्य की, इथं डुक्कर कापुन खाल्ल्यावर त्याची हाडं (हाडावरच्या तुरळक मासासकट)फेकुन
देत नाहित, तर ती घराजवळच ठेवतात.त्याला यथावकाश कीटक आणि मुंग्या लागले, तेच पुनः पुनः अधाशीपणे ओरबाडुन
(कुल्फीसारखं हाड तोंडात टाकुन) खातात.
हे खरयं का?
आणि शिवाय, तिथल्या स्थानिकांना समजा ब्यांकेत दिले पैसे ठेवायचे फायदे समजवुन,(म्हणजे व्याज वगैरे)
तर ही मंडळी पैसे तर ठेवतात सुरुवातीला,पण नंतर जेव्हा मागाय्ला येतात, तेव्हा त्यांना त्याच नोटा जशास तशा
म्हणजे, ठेवताना ज्या नोटा होत्या त्या,जशा होत्या तश्शाच.
हव्या असतात. हे खरय का? का कुणी पुन्हा माझ्या चेहर्‍याकडं पाहुन पुडी सोडलिये.
(येताना विमानात कुठल्याश्या विभागाचा सचिव विमानात भेटला होता, तो म्हटला की दिल्ली सरकार इशान्येतील
हरेक माणसासाठी दर माणशी दर महिना ७८ कीलो तांदुळ वाटप करते(निदान कागदोपत्री तरी)म्हणुन.सैतकं असुनही खाण्याची बोंब्
आहे, म्हणजे त्यांच्या नावानं निघालेलं काहिच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही की काय?)

जन सामान्यांचे मन

असलेली माहिती

तुम्ही तिथल्या लोकांबद्दल माहिती तर खूप काढली आहे, त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये बराच रस आहे असे दिसते आहे. त्यासाठी उत्तर द्यायचा प्रयत्न करते.

फक्त त्याआधी तुम्ही ऐकीव माहितीवर बोलत आहात का काही ठोस खात्रीलायक माहिती आहे? अशी माहिती असल्यास जरूर सांगा.

नोटांचे खरे असू शकेल कारण असाच एक अनुभव दुसर्‍या भागात दिला आहे.

तेथील लोक मांसाहारी आहेत, शिवाय भाज्या, कंदमुळेही खूप खातात. भाज्या काहीशा कच्च्या, मीठ घालून, बटाटेही, सर्व पाण्यात नुसते उकळून असे कळले. शिवाय भात हे मुख्य अन्न. मांसाहारासाठी मिथुन नावाचा प्राणी, तसेच कोंबड्या, मासे, आणि शिकार करून काही लहान प्राणी इत्यादी. स्वामी आणि बेगी या दोघांशी बोलताना हे एवढेच प्राणी कळले. काही भागात अरूणाचली लोकांना तांदूळ पिकवता येत नसावा. पण इतर धान्यप्रकार असतात, तसेच प्राणी असतात. अरूणाचलमध्ये तरी खाण्याची बोंब आहे असे ऐकले नाही. उलट प्रत्येकास पोटाला पुरेल असे अन्न आहे असे समजले.

उत्तम

लेख. अबोतानी मिशन, आय. एल. पी. अशा अनेक नवीन गोष्टी कळल्या. (मात्र अजूनही परमिट पद्धत सुरु का असावी, याचे कारण कळले नाही -- भूमिपुत्रांचे हक्क शाबूत राखणे असा कलम ३७० सारखा उद्देश असणे शक्य आहे का?). पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

अवांतर - अरुणाचली रहिवाशांना भेटण्याचा योग खरोखरच अ'पूर्व' म्हणायला हवा. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

परमिट

अपूर्व शब्दावरची कोटी आवडली.

अजूनही परमिट असण्याचे कारण काहीसे समजून घेण्यास अवघड असले तरी त्यामुळे या विरळ वस्तीच्या प्रदेशात बाहेरचे लोक बळजबरीने स्थानिक लोकांना सहन न होऊ शकेल अशा वेगाने विकास घडवून आणणार नाहीत अशी काही कल्पना आहे. शिवाय लष्करीदलाच्या उपस्थितीमुळे देखील परमिट घ्यावे लागते.

प्रशंसनिय लेख

वा चित्राताई,
अतिशय प्रशंसनिय लेख आणि मेहनत!! उपक्रमावर "दिर्घ" लेख पुन्हा येताना पाहून आनंद झाला :)
लेख आवडलाच. फक्त एक छोटीशी सुचवणः
ब्रह्मपुत्रा ही नदी नसून नद आहे (विस्तॄत पात्रामुळे) (नेहेरू देखील गुवाहाटीला आपल्या भाषणात नदी म्हणाले होते आणि लोक त्यांना हसले होते अशी 'आख्यायिका' आहे :) ) .

बाकी पुढील लेख वाचून प्रतिक्रिया देतोच!

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

धन्यवाद

ऋषिकेश,
सुचवणीबद्दल धन्यवाद.
ब्रम्हपुत्रा हे नाव नारदावरून आले आहे असे माहिती होते. सीयांग ह्या नदीचे पात्र काहीसे मोठे असले तरी ब्रह्मपुत्रेप्रमाणे मोठे नाही, तर तिला नंतर दीबांग आणि लोहित या नद्या मिळतात आणि ती नदात बदलते असे कळले होते. तसेच सीयांग ही अरूणाचलमधली ब्रह्मपुत्रा समजली जाते. सीयांग त्यामानाने लहान आहे, त्यामुळे नदी लिहीले गेले. पण तुझेही बरोबर आहे -ब्रह्मपुत्रेला नद म्हटले जाते हे योग्य आहे.

नेहरूंची आख्यायिका माहिती नव्हती.

फारच छान

फारच छान लेख. माहितीपूर्ण तरीही रंजक.

अवांतर: उत्तर-पूर्व = ईशान्य

अरुणाचलची छान सैर घडली

अरुणाचलची छान सैर घडली

 
^ वर