अरूणाचल प्रदेश - उत्साही विजय स्वामी
आधीचा भाग येथे वाचू शकता.
भाग २ - मागच्या भागापासून पुढे चालू.
विशेष टीपः या लेखातील छायाचित्रांसंबंधी कृपया तळटीप पहावी.
अरूणाचल प्रदेश आणि मूळचे सोलापूरचे असलेले श्री. विजय स्वामी यांचा संबंध विवेकानंद केंद्रामुळे आला. श्री. स्वामी यांनी कामगार कायदा (लेबर लॉ) ची पदवी प्राप्त केल्यानंतर पाच वर्षे कामगार कायदा ऑफिसर म्हणून एका सरकारी कापड कारखान्यात काम केले. त्यानंतर कन्याकुमारी नजिकच्या विवेकानंद केंद्रात त्यांनी प्रशिक्षण घेतले. धाडसी स्वभाव आणि कामाची आवड यामुळे विजय स्वामी यांनी केंद्रातील प्रशिक्षणानंतर बहुदा अरूणाचलची निवड केली असावी. त्यांची नेमणूक ही अरूणाचल प्रदेशातील एका विवेकानंद केंद्राच्या शाळेत शिक्षक म्हणून झाली. तेव्हापासून म्हणजे सुमारे १९८५ पासून जवळजवळ २२ वर्षे त्यांनी या दुर्गम भागात काम केले आहे.
स्वामी यांचा अरूणाचल मधील प्रवेश मोठा रंगतदार झाला. आयुष्यात पुढे काय कठीण प्रसंग वाढून ठेवले असतील ह्याची त्यांना कल्पना तेव्हाच आली असावी. विवेकानंद्र केंद्राच्या संचालकांनी अरूणाचल प्रदेशात दाखल हो म्हटल्यानंतर सर्व सामान घेऊन ते निघाले. आसाममधील दिब्रूगढ पासून प्रवासाचा एक टप्पा १०० किमी चा होता, त्यासाठी त्यांना १२ तास लागले. कारण या प्रदेशात नद्या खूप, त्याही अनेक पात्रे असलेल्या, प्रत्येक ठिकाणी बोटी किंवा गाड्या बदलाव्या लागत. अशा तर्हेने स्वामी एकदाचे त्या गावी पोचले. पोचल्यावर एका हॉटेलमध्ये तात्पुरते उतरले. हॉटेल तसे गलिच्छ होते, पण काही पर्याय नव्हता. तेथून केंद्राच्या शाळेत जाण्यासाठी एखादी त्या दिशेला जाणारी गाडी पकडायची होती. गाड्या नव्हत्याच, खाजगी गाड्या थांबल्या तर पहायच्या. काही ठराविक वेळापत्रक नव्हतेच. स्वामी रोज सकाळी नाक्यावर जायचे, गाड्यांची ४.३०-५ पर्यंत वाट पहायचे, गाडी दिसली तर थांबवायचा प्रयत्न करायचे. असे गाडी न मिळता चार दिवस गेले. शेवटी पाचव्या दिवशी त्यांना भारतीय जवानांच्या गाडीने जागा दिली. त्या गाडीत उभे राहून प्रवास करावा लागला. विवेकानंद केंद्रास अशा तर्हेने ते एकदाचे पोचले. केंद्राची शाळा जेथे होती ते गाव अत्यंत एकाकी, एका खोलगट घळीत वसले होते. स्वामींना चपात्या खाण्याची सवय होती, त्या नाहीत, वीज नाही, अन्नपुरवठा हा विमानातून खाली अन्नाची पोती फेकून व्हायचा. त्यातच तेथील पाउसपाण्याची सवय नव्हती, त्यांना मलेरिया झाला. २-३ दिवस तसेच गेले पण प्रकृती बिघडत गेली. शेवटी हॉस्पिटल शोधावे लागले, अंगात शक्ती नसल्याने हॉस्पिटलला जाण्यासाठी तिरडीप्रमाणे खांद्यावर उचलून चार अरूणाचली लोकांनी चालत त्यांना १४ किमी वर असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले. येथे अरूणाचल प्रदेशातील प्राथमिक वैद्यकीय सेवा आणि औषधे मिळाली. या वेळी त्यांना हॉर्लिक्स दिले, स्वामींना नंतर त्याची इतकी शिसारी आली की आजही कोणी चुकून हॉर्लिक्स देऊ केले तर त्यांना आजारी असल्याप्रमाणे वाटते! अशा खडतर प्रवासानंतर एखादा माणूस निमूटपणे माघारी फिरला असता, पण स्वामी टिकून राहिले. यात तत्त्वाचा भाग होता आणि जिद्दही होती. तसेच ते म्हणतात "मी टिकलो कारण अरूणाचलमधील लोकांचा अतिशय सरळ, प्रेमळ, आतिथ्यशील स्वभाव आणि अरूणाचलचा निसर्ग".
अरूणाचली लोकांच्या स्वभावाची त्यांनी खूप उदाहरणे दिली. लोक तुमच्या घरी आले, तर तुमचे काम चालू असले तर शांत बसून राहतील, उगाच बोलून त्रास देणार नाहीत. दारे उघडी ठेवून गेलात तरी वस्तूंना हात काही लावणार नाहीत. चोरीमारी दूरच. शहरी लोक आपापल्या वस्तू एवढ्याही अंगाबाहेर ठेवत नाहीत, सतत दुसर्याबद्दल अविश्वास बाळगतील,असे चित्र त्यांच्याकडे दिसत नाही. सरळ साधे आयुष्य, घरची शेती-काम बघणे हेच त्यांना पुरेसे असते. पोटाला पुरेसे अन्न सर्वांकडे असते. त्यामुळे भीक मागणे, चोरणे, मुद्दाम त्रास देणे असे काही अरूणाचलमध्ये नाहीच असे स्वामी म्हणाले.
बोलताना एका भाजी विकणार्या अरूणाचली माणसाची गंमत त्यांनी सांगितली. श्री. स्वामी कामामुळे सर्वत्र फिरणार,ते आपल्याकडे येत आहेत असे म्हटले की दुर्गम भागात सर्व भाज्या किंवा वस्तू मिळत नसल्याने कोणी त्यांना भाजी आणायला सांगे, आणि कोणी इतर काही. असे करून पन्नासएक रूपयांचा खर्च झाला, की त्या माणसाला सगळी रक्कम ही फक्त २ रूपयांच्या नोटांमध्ये द्यावी लागे, दहाच्या नोटा चालत नसत. कारण त्याला केवळ दोनच रूपयांची नोट माहिती होती! मग कधी तोच भाजीविक्या त्यांना अंडी खात नाही म्हणत असतानाही घरून आणून २ अंडी त्यांना देई, कारण त्यांच्याकडून व्यवसाय मिळतो हे त्याला माहिती होते! स्वामी सांगतात अरूणाचली लोक साधे असले तरी त्यांच्यात व्यवसायकौशल्य आहे, विशेषतः तानी समाजात. पिसी कल्चर म्हणून एक शेतीचा प्रकार त्यांच्याकडे रूढ आहे.
या प्रकारात एकाच पाणथळ जागेत एकाच वेळी भात आणि मासे यांचे उत्पादन होते. अजून एक वैशिष्ट्य असे आहे की हे काम मुख्यत्वे स्त्रियाच सांभाळतात. असे असूनही पाण्यावरून भांडणे अजिबात होत नाहीत! उलट पाण्याचे व्यवस्थापन सर्व समाज मिळून सर्वांना नीट मिळेल अशा पद्धतीने करतो. डॉ. बेगी याच समाजातील आहेत. अरूणाचली स्त्रिया अतिशय कामसू आणि उद्योगी असतात. त्या बाहेर कामात मदत करण्याबरोबरच मुले-घर सांभाळणे इत्यादी देखील भरपूर करतात.
अशा परिस्थितीत स्वामी तेथे राहिले. त्यांनी शाळांमध्ये काम केले. डॉ. बेगी आणि स्वामी सांगतात की अरूणाचलमध्ये शिक्षण उशीरा आले, पण जे आले ते जोमाने. साक्षरता जवळजवळ ५४% आहे. शाळांमधून मुलांना केंद्रिय अभ्यासक्रमातून (सीबीएसई), हिंदी आणि इंग्रजी या माध्यमांतून शिक्षण मिळते. शाळा आजही घराच्या जवळ नाहीत, यामुळे मुलांना लहानपणापासून घरापासून लांब वसतीगृहात राहणे भाग असते. मुले शिक्षणाच्या बाबतीत गुणवत्ता असलेली आहेत, कोणापेक्षा कमी नाहीत, पण साधनांच्या कमतरतेचे परिणाम शाळांना भोगावे लागतात. अनेक मुले उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत.
अरूणाचलला राज्य म्हणून दर्जा खूपच उशीरा मिळाल्याने येथील दळणवळणाच्या सोयींवर एकंदरीत वाईट परिणाम झाला आहे. संपूर्ण अरूणाचलला जोडणारा एकही रस्ता अनेक वर्षे नव्हता. आजही जवळजवळ दोन तॄतियांश खेडी ही कुठच्याही मुख्य रस्त्याला जोडलेली नाहीत. स्वामी सांगतात, ते शिकवत होते त्या शाळेतील मुलांना एकदा कळले की त्यांच्या घरी भावंडांकडे सायकली आहेत आणि मुले शाळेला सायकलने जातात. तर ती सगळ्या शाळेत मोठी बातमी झाली की विजय सरांकडे घरी सायकल आहे! स्वामी पुढे यावरूनच गंमत सांगतात, की नंतर महाराष्ट्रात आले असताना त्यांना मुलांनी विचारले की ही मुले कशी शाळेत जातात? त्यावर स्वामींनी सांगितले की हेलिकॉप्टरमधून, त्यामुळे मुलांच्या आश्चर्यास पारावार उरला नाही! आणि ते खरेच होते. अरूणाचल मध्ये हेलिकॉप्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी केला जातो. अन्नधान्य, फळे, वस्तू आणि माणसे या सर्वाची वाहतूक हेलिकॉप्टरने होते. अरूणाचलमधील लष्करी केंद्राचा हा प्रभाव आहे.
पूर्वीच्या भारतीय सरकारांचे धोरण सुरूवातीपासून असे राहिले की हा प्रदेश दुर्गम ठेवल्यास चीनपासून रक्षण करणे सोपे जाईल. पण परिणाम असा झाला की त्यामुळे येथील इतर दळणवळणाच्या सोयी मागासलेल्या राहिल्या आणि नवीन युद्धनिती आणि तंत्रज्ञानाच्या या जगात हे धोरण तसे उपयुक्त नसल्याचे कळून चुकले आहे. यात खेदाची गोष्ट ही स्वामींनी सांगितली की या भागात भारतीय आकाशवाणी ऐकायला त्रास होतो, पण चीनमधील रेडिओचे प्रक्षेपण नीट ऐकता येते. या अशा धोरणांमुळे येथील अनेक भाग एकमेकांना थेट जोडलेले नाहीत. जो रस्ता आहे तो अरूणाचलच्या आसामनजिकच्या पट्ट्यातून जाणारा आहे, त्यामुळे एका गावाहून दुसरीकडे जायचे तर खूप मोठा फेरा पडतो. यात डॉ. बेगी आणि स्वामी यांच्या दृष्टीने एक नवीन आशेचा किरण आहे तो म्हणजे सध्याच्या मनमोहन सिंग सरकारने जानेवारी २००८ च्या चीन भेटीनंतर १५ दिवसात अरूणाचल प्रदेशासाठी ताबडतोब हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले आहे, ज्याच्या अंतर्गत रस्तेबांधणी होऊ शकते. पण तरी प्रस्ताव असलेले रस्ते पुरे पडणार नाहीत याचे कारण चीनच्या सीमेलगतच्या अरूणाचलच्या पट्ट्यासाठी अजूनही रस्तेबांधणीची खूप मोठी योजना नाही.
या दळणवळणाच्या गैरसोयींमुळे अशा भागांचा विकास झालेला नाही, त्यामुळे तेथे डॉक्टर जाऊन राहण्यास कुरकुर करतात. अर्थातच या गोष्टीचा परिणाम हा तेथील आरोग्यसेवांवर झाला आहे. अरूणाचल मधील मुख्य विकार म्हणजे दूषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार, पाणथळ जागांमुळे डासांची पैदास होऊन त्यापासून होणारा मलेरिया किंवा सेरीब्रल मलेरिया.
असे सर्व प्रतिकूल वातावरण असतानाही स्वामींचा स्वभाव तडफदार असल्याने ते या भागात टिकून राहिले असावेत. आजमितीला अरूणाचल प्रदेशातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्पांची त्यांनी उभारणी केली आहे किंवा काम केले आहे. सुरूवातीची वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर विवेकानंद केंद्रासाठी त्यांनी ग्रामीण विकासासाठी / महिला उद्योगांसाठी लहान कर्जांच्या संधी तयार करणे अशा विविध प्रकल्पांमध्ये काम केले. व्यवसाय मार्गदर्शन करणारी ज्ञानोदय ही संस्था, रोईंग येथील इंतया पब्लिक स्कूल ही शाळा, तसेच समाजसुधारणेसाठी इसोमी फाउंडेशन ट्रस्ट अशा संस्था त्यांनी उभारण्यात मदत केली.
स्वामी सांगत होते, अरूणाचलमधील स्टेट बँक ही विशेष करून सरकारी कामकाजांमध्ये, त्यातही अनेकदा लष्करी जवानांच्या कामामध्येच गुंतलेली असते. त्यामुळे ते आणि त्यांचे सहकारी नाबार्डकडे (नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट) प्रकल्प घेऊन गेले. नाबार्डचा प्रकल्प अत्यंत यशस्वी आणि आकर्षक झाला. स्वामी सांगतात अरूणाचलमध्ये व्यवसायनिर्मितीसाठी छोट्या कर्जांची गरज असते. या प्रकल्पाच्या अंतर्गत स्त्रियांना हिशेब ठेवणे शिकवणे, स्वत:स मदत (सेल्फ हेल्प) करणारे गट तयार केले. तसेच यात २४ गावे आणि ५०० कुटुंबे दत्तक घेण्यात आली. गुजरातमधील मणीभाई देसाई यांनी केलेल्या कामाच्या धर्तीवरचा हा प्रकल्प लोअर दिबांग व्हॅली आणि रोईंग या भागात राबवण्यात आला. यात एक एकर जागेला बांबू किंवा फणस आदी झाडांचे कुंपण घालून संत्र्यांची ११० आणि अननसांची २८०० रोपे सरळ रेषेत लावली जातात. यातून दरवर्षी प्रत्येक कुटुंबास साधारण ३०-४५ हजार रू. चे उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था केली आहे. यासाठी पाणी किती द्यावे याला मार्गदर्शन केले जाते. गावामध्ये काही प्रशिक्षित व्यक्तींना यात लोकांनी सहभागी व्हावे यासाठी उद्युक्त केले जाते, ह्यांना मोटरबाईक दिल्या आहेत आणि ते जवळची गावे हिंडून मार्गदर्शन करू शकतात. गांडूळ शेती, आणि बियाणांचा पुरवठाही या प्रकल्पाने केला जातो. अरूणाचली लोकांच्या घरांमध्येच त्यांची स्वच्छतागृहे असत, म्हणजे काही अंशी आपल्याकडील पाटीच्या संडासांप्रमाणेच. पण याखाली डुकरे राहत. घरे उंचावर बांधलेली असत,खाली पडणारे मल-मूत्र डुकरे खाऊन टाकीत. ही व्यवस्था एका अर्थी कचरा कमी करणारी असली तरी अस्वच्छता निर्माण करीत. म्हणून या प्रकल्पाच्या अंतर्गत स्वच्छतागॄहे घरातून बाहेर नेण्यात आली. आणि डुकरांशी पैदास घरापासून दूर केली जाऊ लागली.
तरूण मुलांना व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी लहान कर्जे दिली गेली, तसेच अन्नप्रक्रिया (फूड प्रोसेसिंग) च्या व्यवसायांसाठी देखील कर्जे दिली गेली. स्वामींनी "राजीव गांधी ड्रिंकिंग वॉटर (पिण्याचे पाणी) मिशन " योजनेचाही उल्लेख केला. यात पाणी जेथल्या तेथे स्वच्छ करण्यासाठी गाळणी बनवणे अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्यात आले.
ह्या सर्व कामांमुळे त्यांना २००० साली अरूणाचलच्या राज्यपालांकडून कौतुकाचे पत्र मिळाले. या सर्व कामांमुळे त्यांना २००५ मध्ये त्यांना अमेरिकेत इंडो-अमेरिकन इन्व्हायर्नमेंटल लीडरशिप प्रोग्रॅम अंतर्गत अमेरिकेतील मान्यताप्राप्त अशी फुलब्राईट स्कॉलरशिपही मिळाली. यावेळी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथे ते आले होते. तेव्हा त्यांनी येथील शाळांमध्ये पर्यावरणाचे शि़क्षण कसे दिले जाते हे अनेक शाळांना भेटी देऊन जाणून घेतले. आरोग्य, वस्तूंचे पुनर्चक्रिकरण (रीसायक्लिंग) इत्यादी गोष्टी मुलांना कशा शिकवल्या जातात याबद्दल अभ्यास केला. अमेरिकेत प्रॉजेक्ट लर्निंग ट्री (पीएलटी) म्हणून एका प्रकल्पात १ली ते १२ वी पर्यंतच्या मुलांना पर्यावरणासंबंधी शिक्षण देण्यासाठी त्यांच्या वयास योग्य अशी चित्रमय पुस्तके तयार केली जातात, या प्रकल्पाचाही अभ्यास त्यांनी केला. स्वामींच्या मते आपल्याकडील शिक्षणात "काय" हे शिकवतात पण "असे का" हा प्रश्न सहसा विचारला जात नाही. यासाठी त्यांनी परत गेल्यानंतर काही शिक्षकांना मदतीस घेऊन असा प्रकल्प राबवला. त्यात मुले "हल्ली कुठच्या पक्ष्यांचे आवाज येणे बंद झाले आहे, माकडे कोणती दिसत नाहीत, याची कारणे काय असतील" अशा प्रश्नांची उत्तरे शोधू लागली. असा हा प्रकल्प अजूनही शाळांमध्ये चालू आहे. ते म्हणतात या कामामुळे नक्की कशा प्रकारे शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे, ह्यासारख्या गोष्टी त्यांना समजल्या.
स्वामी आणि त्यांच्या स्थानिक सहकार्यांनी काही अनिवासी भारतीयांच्या मदतीने एक अजून प्रकल्प राबवला आहे - तो म्हणजे फिरती प्रयोगशाळा (मोबाईल लॅबोरेटरी). साधनांच्या आणि उपकरणांच्या अभावी अरूणाचलमधील अनेक शाळांतील मुलांना हातात काचेचे प्रयोगसामान घेण्यापासूनही वंचित राहावे लागते. यासाठी एक पाठीवरच्या दप्तरात राहील अशा प्रकारची छोटी फिरती प्रयोगशाळाच तयार केली आहे. प्रशिक्षित सहायक ती पाठीवर घेऊन खेड्यांमधील शाळांमध्ये नेतात. यामुळे दूरवरच्या खेड्यातील मुले हे प्रयोगाचे सामान हाताळू शकतात, आणि शिकू शकतात. याखेरीज एक अजून वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प स्वामी यांनी सांगितला तो म्हणजे "कथोत्सव". अरूणाचलमधील शाळा या केंद्रिय अभ्यासक्रम राबवत असल्याने हिंदी आणि इंग्रजी भाषा याच मुलांच्या भाषा होतात, आणि मुलांची मातृभाषेपासून नाळ तुटते. म्हणून कथोत्सव करून त्यात मुलांना आपापल्या मातृभाषेतून घरी आजी आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी सांगायला प्रोत्साहन दिले जाते. यामुळे आपल्या भाषेबद्दलची लाज दूर होऊन मुलांचा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे.
त्यांना २००५ साली मिळालेल्या फुलब्राईट स्कॉलरशिपचा एक त्यांना स्वत:ला झालेला फायदा ते असा सांगतात की यामुळे त्यांचा अमेरिकेतील "आयसीसीएस (इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज)" या संस्थेशी संबंध आला. या संबंधांमधून आयसीसीएसने त्यांना २००६ साली अमेरिकेत ४६ देशांतून येणार्या विविध संस्कृतीच्या प्रतिनिधींच्या एका कार्यशाळेत येण्याचे आमंत्रण दिले. या सर्व भेटींमुळे त्यांच्या अमेरिकेतील अनेक क्षेत्रांत काम करणार्या लोकांशी आणि संस्थांशी ओळखी झाल्या, आणि दृष्टीकोन बदलला, विकसित झाला असे स्वामी सांगतात. तसेच "आयसीसीएस" या संस्थेचा एक प्रकल्प म्हणून रीवॉच (REWATCH : Research Institute of Worlds's Ancient Traditions, Culture and Heritage) ही संस्था स्थापन केली गेली. आता त्यांचे काम हे "रीवॉच" चे कार्यकारी संचालक म्हणून तिचे उपक्रम वाढवून ती मोठी करण्याच्या दृष्टीने सुरू झाले आहे.
रिवॉचची कल्पना अशी आहे की तिचे रूपांतर पुढे एका वैशिष्ट्यपूर्ण विश्वविद्यालयात व्हावे. शेजारी नागालँड, मणिपूर, मिझोराम यासारख्या राज्यांमध्ये हिंसाचार चालतो तसे अरूणाचलच्या शांत प्रदेशात होऊ नये यासाठी स्वामींना जाणवलेली गरज अशी की तेथील तरूण मुलांना शिक्षणानंतर किंवा शिक्षण अर्धवट सोडल्यास रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्या पाहिजेत. तसेच एकीकडे स्थानिक संस्कृती जपत दुसरीकडे विकासही टप्प्याटप्प्याने स्विकारला पाहिजे. यासाठी अरूणाचली लोकांच्या भाषा आणि स्थानिक संस्कृतीचे संवंर्धन करणे , अरूणाचलमधील मुलांसाठी रोजगार आणि शि़क्षणाच्या संधी उपलब्ध करणे तसेच त्या अनुषंगाने पाठबळ मिळावे यासाठी विकास ज्या मार्गांनी शक्य आहे त्याप्रकारचे शिक्षण देणे, हा रीवॉचचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या सर्वासाठी एक व्यासपीठ तयार करणे अशा प्रकारे या संस्थेचे काम आणि विकास व्हावा अशी इच्छा आहे. अरूणाचलमधील मुलांना देश-परदेशातील संधी कळाव्यात, किंवा अरूणाचली विद्यार्थ्यांना परदेशात प्रवास करून इथल्या शिक्षणाचा आणि संस्कृतीचा अनुभव घेता यावा किंवा उलटउद्यमशीलतेचा म्हणजे अमेरिकेतील विद्यापीठांनी आपले विद्यार्थी प्रवास योजनेच्या अंतर्गत अरूणाचलमध्ये पाठवावे अशा प्रकारच्या योजनाही विचाराधीन आहेत. फारच थोडे अरूणाचली विद्यार्थी आज परदेशात आहेत, याची त्यांना खंत आहे. आणि त्यामुळे अरूणाचली विद्यार्थ्यांना जगात काय चालले आहे ते कळावे असे त्यांना वाटते. या कामाला पाठिंबा आहे अशा लोकांमध्ये अरूणाचलमधील सामाजिक, शैक्षणिक आणि जिल्हा प्रशासन यातील अधिकारी, आणि सामान्य जनता यांचा सर्वांचा समावेश आहे. अरूणाचल मधील डॉ. बेगींसारख्या अनेक स्तरातील लोकांबरोबर ते या कामात गुंतलेले आहेत. अमेरिकेतील वास्तव्यात ते आणि डॉ. बेगी हे लोकांना ह्या सर्व कामाचे महत्त्व पटवून देत आहेत.
स्वामींना जेव्हा विचारले की तुम्हाला एवढ्या खडतर अशा अरूणाचलमध्ये रहावे, असे का वाटले, तेथून निघून यावे, महाराष्ट्रात सर्वसाधारण आयुष्य काढावे असे कसे वाटले नाही? यावर ते म्हणाले की "माझ्या भावाने मला असेच पत्रातून विचारले होते, त्याला मी उत्तर दिले की अरूणाचलमध्ये आल्यानंतर मला मिळाली ती सहा तासांची निश्चिंत झोप आणि आरोग्य!" अजून एकदा विचारले तेव्हा ते म्हणाले, "अरूणाचलमध्ये आलो आणि मी खूप बदललो, खूप परीक्षा पाहणारे क्षण आले, पण आज अरूणाचल मध्ये आहे कारण तिथे काम करताना मी आनंदात आहे, तो आनंद संपला तर समजाच की मी अरूणाचलमधून बाहेर पडेन! " अशी ही जिद्दी आणि मनस्वी व्यक्ती.
टीप: या लेखातील सर्व छायाचित्रे श्री. विजय स्वामी, अरूणाचल प्रदेश यांच्या सौजन्याने. श्री. स्वामी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय ह्या छायाचित्रांचा कृपया वापर करू नये. तसेच श्री. स्वामी यांच्याशी संपर्कासाठी मला उपक्रमावरून व्य. नि. पाठवावा. मी त्यांची माहिती पाठवण्याची व्यवस्था करू शकेन.
Comments
सुंदर!
चित्रा ताईंचे
दोन्ही लेख अतिशय सुंदर आहेत.
अशा व्यक्तींच्या परिचयानेही मनाला अतिशय आनंद वाटतो.
आपण तर त्यांच्या बरोबर काळ व्यतीत केलात ही काहीशी भाग्याची गोष्टच आहे असे म्हणावेसे वाटते.
आपला
गुंडोपंत
विजय स्वामी
श्री. स्वामी यांचे कार्य अतिशय प्रशंसनीय.
त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
फारच सुंदर!
दोन्ही भाग फारच सुंदर आणि माहितीपूर्ण झालेत.
श्री.स्वामींसारख्या सर्वस्व झोकून देणार्या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
चित्राजी आपणही अतिशय सिद्धहस्तपणे हे लिखाण केल्याचे जाणवतेय. वाचताना कोठेही कंटाळा आला नाही.
माहितीपूर्ण अशा ह्या लेखाबद्दल तुमचेही मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
+१
++१
बाकी निसर्गाच्या सानिध्यात तयार झालेला अरुणाचली निष्कपट, मनस्वी स्वभाव होऊ घातलेल्या "प्रगती"(!) नंतरही टिको हीच प्रार्थना.
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणरे आणि न समजणारे
सहमत
आहे. हाही भाग आवडला.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख लेख
विविध अडचणींबरोबर, सामाजिक उपक्रमासाठी उचलेल्या दु:खात आनंद शोधणारा माणुस म्हणजे श्री स्वामी. आपण दिलेल्या माहितीवरुन निसर्गाचा माणसाच्या स्वभावावर कसा प्रभाव पडतो, त्याचे उदाहरण म्हणजे निष्कपटी अरुणाचली लोक. अतिशय सुंदर लेख !!!
बहुतेक मासे आणि भातासाठी असलेल्या पाणथळ जागेचा फोटोही सुरेख !!!
सहमत आहे
सहमत आहे. हे लेख पाठ्यपुस्तकात आले पाहिजेत या द्वारकानाथ यांच्या मताशीही सहमत आहे.
थोडेफार संपादन करुन...
या दोन्ही लेखात थोडेफार संपादन करुन हा धडा प्राथमिक पाठ्यपुस्तकात यायला हवा.
समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. त्यांना अश्याप्रकारे प्रसिद्धी मिळायला हवी.
सुरेख लेख
पौर्वात्य देशांप्रमाणे अरूणाचल प्रदेशातही स्त्रिया घरातील मुख्य काम करतात किंवा पोटापाण्याचे व्यवसाय करून कुटुंबव्यवस्था पाहतात असे वाटते.
शेजारी नागालँड, मणिपूर, मिझोराम यासारख्या राज्यांमध्ये हिंसाचार चालतो तसे अरूणाचलच्या शांत प्रदेशात होऊ नये यासाठी स्वामींना जाणवलेली गरज अशी की तेथील तरूण मुलांना शिक्षणानंतर किंवा शिक्षण अर्धवट सोडल्यास रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्या पाहिजेत.
अरूणाचल इतर ईशान्य राज्यांच्या प्रश्नांपासून वेगळे कसे राहिले? यावर थोडा प्रकाश टाकता येईल का?
लेख आवडला. वेगळ्या व्यक्तिमत्वांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
कामसू
पौर्वात्य देशांप्रमाणे अरूणाचल प्रदेशातही स्त्रिया घरातील मुख्य काम करतात किंवा पोटापाण्याचे व्यवसाय करून कुटुंबव्यवस्था पाहतात असे वाटते.
तिथे रूढार्थाने मातृसत्ताक म्हणावी अशी स्थिती नाही, पण अरूणाचली स्त्रिया खूप स्वतंत्र असतात, उद्यमशील आहेत, असे कळले. वस्तूंची विक्री आदी गोष्टी त्याच करतात. पण शेतीचे काम बेगींचा समाज सोडल्यास इतरत्र घरातील मुले, स्त्रिया आणि पुरूष सर्वचजण करतात.
अरूणाचल इतर ईशान्य राज्यांच्या प्रश्नांपासून वेगळे कसे राहिले? यावर थोडा प्रकाश टाकता येईल का?
अरूणाचलच्या लोकांचा साधा स्वभाव, चालिरीती आणि तेथे जाण्यास बाहेरील लोकांना परमिट लागते ही सर्वच कारणे असावीत. तसेच स्वतंत्र वृत्ती असली तरी फुटीरतेची वॄत्ती कमी आहे, पण त्याचबरोबर हे चित्र बदलू शकते ही भिती आहेच. ब्रिटिशांचे साम्राज्य तेथे फारसे पोचले नाही, तसेच तेथील स्थानिकांनी पहिल्यापासून सलोख्याचे धोरण ठेवले (सिमला करार). स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अरूणाचलींचे एकात्मीकरण चांगले झाले आहे, अजूनही तेथे भारतीय स्वातंत्र्यदिनास प्रभातफेर्या काढल्या जातात, इतकेच नाही तर लोक एकमेकांना "नमस्ते" किंवा "नमस्कार" नी सुरूवात करण्याऐवजी "जय हिंद" म्हणतात, असे कळले.
याउलट नागालँडसारख्या राज्यात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रह्मदेशातील अतिशय जुलमी सत्ता काही काळ होती. तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता, नंतर ब्रिटीशांनी तेथे बस्तान बसवले. त्यांमुळे त्यांच्यात त्वेषाची आणि वेगळेपणाची जाणीव अधिक झाली असावी. अजून एक म्हणजे तेथे ख्रिश्चन मिशनरी काम खूपच झाले आहे, हे काम नुसते धार्मिक राहिले नसून राजकीय सीमा ओलांडल्या आहेत तसेच एकात्मीकरण करण्यात तत्कालिन (५३ सालापासून) भारतीय सरकारे कमी पडली असावीत असे वाटते. तसेच या सर्व राजकिय भानगडींमुळे तेथे नवीन उद्योग तयार झाले नाहीत, शिक्षण आणि इतर नागरी सेवा या अत्यंत कमी आहेत. या सर्वामुळे त्यांचे केंद्राशी वाद सुरू आहेत.
आवडला +
दोन्ही लेख चांगले आणि माहीतीपूर्ण आहेत
>>>पौर्वात्य देशांप्रमाणे अरूणाचल प्रदेशातही स्त्रिया घरातील मुख्य काम करतात किंवा पोटापाण्याचे व्यवसाय करून कुटुंबव्यवस्था पाहतात असे वाटते.
असं वाचलं की वाटतं की उर्वरीतभारताला पण या सूर्य उगवणार्या देशा कडून घेण्यासारखे बरेच काही आहे ;) ह.घ्या. नाहीतर भलेमोठे विषयांतर होईल :)
>>>अरूणाचल इतर ईशान्य राज्यांच्या प्रश्नांपासून वेगळे कसे राहिले? यावर थोडा प्रकाश टाकता येईल का?
माझ्या थोड्याफार माहीतीप्रमाणे, अरूणाचल मधे मिशनरी लोकांना जाण्यास सहज मार्ग मिळाला नाही. संपूर्ण भागात भारतीयांना जायला इनर लाईन परमिट लागते तर अभारतीयांना अजूनही विशेष परवाना. शिवाय सरकारी धोरण हे तेथील स्थानीक संस्कृती जी बहुतांशी स्थानीकच आहे आणि दलाई लामांच्या बुद्ध संप्रदायातील आहे.
(जरी काही अंशी त्यात प्राचीन हिंदू संस्कॄतीच्या काही खुणा/संदर्भ दिसू शकत असले तरी). म्हणून धर्मप्रसाराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बंदी आहे. तरी देखील काळजी करण्यासारखी परीस्थिती आहे. बांग्लादेशी मुसलमानांनी आसाममध्ये अनेक जिल्ह्यात स्वतःची लोकसंख्या वाढवली आहे आणि अरूणाचल अथवा अशा इतर राखीव (ट्राईबल्स) असलेल्या भागांतून त्या जमातीबाहेर जमीन सरळपणे विकत घेता येत नाही तेथे त्या जमातीतील व्यक्तिंशी लग्ने करून हळू हळू कब्जा केला जात आहे. पण हा प्रकार पण अरूणाचल प्रदेशमधे अजून तरी कमी आहे - जरी सभोवताली जास्त असला तरी. येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की हा प्रश्न धार्मिक नसून राजकीय आणि राष्ट्रीय सुरक्षेचा/एकात्मतेचा आहे. कारण नव्याने धर्म जेथे बदलला जात आहे तेथे नंतर देशापासून वेगळे होण्याची मागणी केली जात आहे. याचे अजून एक कारण असे पण आहे की स्थानिकांना रोजगारी नाही कारण शिक्षण नाही, मग वेगळे पणाची भावना पटकन भडकवता येते.
अधुनीक शिक्षण, स्वतःच्या स्थानीक संस्कृतीबद्दल आत्मियता, अधुनिकीकरण, स्वयंरोजगार आणि नोकरीधंदा निर्मिती यां गोष्टी आमलात आणल्यास इतरत्र झालेल्या चुका टाळता येतील आणि हा भाग जसा आहे तसा म्हणजे चांगला राहील असे वाटते
छानच
टीप सोडून सारे काहि आवडले.
अशी आयुष्य वेचणारी माणसे फारच थोडी असतात.
प्रकाश घाटपांडे
धन्यवाद,
सर्वांना प्रतिसादांबद्दल तसेच प्रोत्साहनपर शब्दांबद्दल मनापासून आभार.
यावरून एक अजून लेख लिहायचा आहे, महत्त्वाचे काही मुद्दे लिहायचे राहिले आहेत, (क्रमशः लिहायला विसरले). तो या आठवड्याभरात लिहीन.
लेख आवडले.
दोन्ही लेख वाचले. अत्यंत माहितीपूर्ण आणि मुख्य म्हणजे प्रेरणादायकही !
लेख आवडले
अत्यंत माहितीपूर्ण लेखांबद्दल धन्यवाद. दोन्ही लेखांना येथे एकच प्रतिसाद देत आहे.
स्वामींचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, त्यांची स्वतःला वाहून घेतलेल्या कार्याबद्दल तळमळ, त्यांनी दर्शवलेली चिकाटी हे सर्वच विलक्षण आहे.
सर्वसाधारण भारतीयांना अरूणाचल प्रदेशाबद्दल काही विशेष माहिती नाही. खरे तर आपल्याला ह्या प्रदेशाबद्दल संपूर्ण अनास्था आहे. प्रजा व सरकार दोन्ही इशान्य प्रदेशाबद्दल उदासिन असल्याने तेथे उत्पादनाची काहीच साधने नाहीत, तसेच दळणवळणाची साधनेही जवळजवळ नसल्यासारखीच. अशा परिस्थितीत चिकाटीने, जिद्दीने समाजसेवा करत रहाणार्या श्री. स्वामींसारख्या व्यक्तिंचे कौतुक आहेच, पण ही बोचही जाणवते की अशा कार्यकर्त्यांची बरीचशी शक्ति 'अ' स्थळापासून 'ब' स्थळापर्यंत जाण्यातच खर्ची पडत आहे.
अरुणाचल प्रदेशावरच 'दैनिक लोकमत'च्या गेल्या रविवारच्या 'मंथन' पुरवणीत एका स्त्री- पत्रकाराचा लेख आला आहे. लेखिकेचे नाव दिलेले नाही. ही पत्रकार स्वतः अलिकडेच तेथे जाऊन आली. तिचे तेथल्या प्रांताचे, लोकांचे, समाजजीवनाचे सुंदर निरीक्षण ह्या लेखात आले आहे. ह्या प्रदेशावर चीनने हक्क सांगितला आहे, त्यासंदर्भात तेथील जनतेच्या मनात काय आहे ह्याचा तिने नेटाने मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. ('मंथन'चा दुवा देता येत नाही. सदर लेख दोन भागात आहे, पहिला भाग दि. ८ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. दुसरा दि. १५ च्या पुरवणीत यावा).
आता आहे तशीच परिस्थिती चालू राहिली तर आपण पुढील दहा-वीस वर्षात ह्या प्रदेशावर पाणी सोडू , अशी भीति वाटते.
धन्यवाद,
लोकमतमधील लेख आत्ताच वाचला. तवांगबद्दलही बोलणे झाले, ते असेच.
आता पुढचा लेख वाचण्याची उत्सुकता आहे.
ही अशीच भिती आहे, ती आपल्याकडच्या राजकारण्यांना आणि लोकांना कधी कळेल ते खरे.
मस्त लेख
स्वामी यान्चे काम भारावून टाकणारे आहे.